भाग ३ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - येरवड्याची लढाई

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
6 Apr 2020 - 5:18 pm
गाभा: 

1

1

भाग ३ येरवड्याची लढाई

कै. शि.म. परांजप्याच्या लेखनशैलीची झलक या निमित्ताने सादर करत आहे…

“...बखर आणि पोवाडा यातील वर दिलेल्या वर्णनावरून असे दिसते की, पेशव्यांचे शिपाई नुसते मुळा-मुठा नदीच्या पलीकडेच जाऊन पोहोचले होते, एवढेच नसून श्रीमंतांच्या फौजेतील आरब आणि गोसावी हे येरवड्याच्या टेकडीवरही चढून गेलेले होते. पण त्या सगळ्या मर्दुमकीचा अखेरीस काही उपयोग झाला नाही.
पेशव्यांचे फौजेतील काही आरब आणि गोसावी टेकडी चढून वर गेले खरे; पण बाकीचे लोक काय करीत होते ? जे आरब आणि गोसावी लढत होते, त्यांच्या जवळच्या दारुगोळा नाहीसा झाला असता त्यांना आणखी दारूगोळ्याची कुमक-पाठीमागून व्हायला पाहिजे होती. पण ती करतो कोण ? तिकडे टेकडीवर काही लोक लढाई करून शत्रूला मारीत होते, तर इकडे पाठीमागे गारपिराच्या छावणीमधील बाकीचे लोक आपआपले बोजे बांधून पळून जाण्याची तयारी करीत होते ! महाकाळ तोफ पुरंदराहन पुण्यास आणली होती, ही गोष्ट खरी. पण ती नुसती तोफ काय करील ? तिच्यांत दारू आणि गोळे भरणार दमदार गोलंदाज कोणी तरी पाहिजेत की नकोत ? माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण 'मी जिवंत आहे तोपर्यंत मी या तोफेपासून न हलता शत्रूचा नि:पात होईपावेतो मी ही तोफ चालवीन', अशा दृढ निश्चयाचे गोलंदाज जेव्हा एखाद्या तोफेच्या पाठीमागे असतील, आणि एक मरण पावला तर त्याची जागा घेण्याला अशा प्रकारचे दुसरे अनेक गोलंदाज तयार असतील, तेव्हाच त्या तोफेच्या हातून काही तरी काम होऊ शकते. एखाद्या निर्जीव तोफेचे नाव महाकाळ ठेवण्यात काही मुद्दा नाही. तोफ ही महाकाळ नव्हे, तर मनुष्याची छाती ही महाकाळ आहे ! ती महाकाळ छातीची माणसे मराठ्यांच्या मधून निघून गेलेली ही आणि महाकाळ नावाची नुसती तोफ मात्र पाठीमागे राहिली होती. पण तीही काली महाकाळ तोफ कालवशात् आज कोणीकडे जाऊन पडलेली आहे, याचा कोणालाच पत्ता नाही. पूर्वी ज्या तोफा ओढण्यात येऊ लागल्या, म्हणजे धरणी भरथर कापत असे, आणि ज्या तोफांच्या तोंडातून धुराच्या लोटांमधून आगीसारखे गोळे बाहेर पडू लागले म्हणजे सगळे वातावरण हादरून जात असे, त्या तोफा छिन्नविच्छिन्न होऊन आपल्या समकालीन योद्ध्यांच्या बरोबर ठिकठिकाणी जमिनीत पुरून टाकलेल्या पाहून मनाला अतिशय वाईट वाटते. ज्या आपल्या गर्जनेने दशदिशा दणाणून सोडीत होत्या, त्यांच्यावर असा प्रसंग यावा, हे पाहून कोणाला वाईट वाटणार नाही ?

"Fifteen years in India" या पुस्तकाचा कर्ता (रॉबर्ट ग्रेनव्हील वॉलेस हे त्याचे नाव) हा खडकीच्या लढाईमध्ये इंग्लिशांचा एक ऑफिसर या नात्याने इग्लिशांच्या बाजूने हजर होता. त्याने बापू गोखले यांच्याबद्दल सदर पुस्तकामध्ये फार प्रशंसापर उद्गार काढलेले आहेत:- "बापू गोखले यांचा बांधा धिप्पाड असून त्यांचे नाक, डोळे सुरेख आणि पाणीदार असे होते आणि त्यांची शरीरकांती गौरवर्णाची होती. सर आर्थर वेलस्ली याच्या हाताखाली पेशव्यांचे जे सैन्य देण्यात आलेले होते, त्या सैन्यात बापू गोखले हे एक अधिकारी म्हणून होते. त्या वेळी इंग्लिशांच्या सैन्यातील शिस्त कशी असते आणि लढाईमध्ये ते कशा प्रकारच्या युक्त्या करीत असतात, हे सर्व बापू गोखले यांनी पाहिलेले होते. आणि शिवाय ते स्वत: फार शूर आणि अनुभवी होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हाताखाली खडकीच्या लढाईच्या वेळी जे सैन्य होते, त्यात शिस्त नसून अव्यवस्था फार होती. तरी पण जनरल स्मिथ यांच्याशी लढाई देण्याच्या कामी त्यांनी जे शौर्य आणि कौशल्य दाखविले, ते खरोखर वर्णन करण्यासारखे आहे. आणि पुढे कधी, जेव्हा कवितादेवी त्यांच्या इतिहासाचे वर्णन करण्याला प्रवृत्त होईल, त्या वेळी आपल्या देशाच्या एकनिष्ठ सेवेबद्दल ती देवी त्यांच्या डोक्यावर आपला पुष्प मंडित मुकुट घातल्याशिवाय केव्हाही राहणार नाही !"

येरवड्याच्या लढाईमध्येही पेशव्यांच्या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले यांच्याकडेच होते व या लढाईमध्येही बापू गोखले यांनी आपल्या शौर्याची आणि युध्दकौशल्याची शिकस्त करून सोडली. तरी पण त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीपुढे त्यांच्या पराक्रमाचे काही तेज पडू शकले नाही. खडकीची लढाई अश्विन वद्य एकादशीस (५ नोव्हेंबर)रोजी झाली. आणि त्या नंतर येरवड्याची लढाई कार्तिक शुध्द अष्टमीस ( १७ नोव्हेंबर) रविवार रोजी झाली. या दोन लढायांच्या दरम्यान जे बारा दिवस फुकट गेले, ते तसे गेले नसते, तर पुढील परिणाम खात्रीने इतका अनिष्ट झाला नसता. घोडनदीहून येणारी पलटणे पुण्याच्या सैन्याला येऊन मिळण्यापूर्वीच त्यांचा पराभव करून टाकावयाला पाहिजे होता. परंतु मध्यंतरी कपटी एल्फिन्स्टनसाहेब याने बाजीरावापाशी जे बोलणे खडकीच्या लढाईच्या सुरुवातीपासून सुरू केलेले होते. त्या बोलण्यावर बाजीरावसाहेबांची जास्त भिस्त बसल्यामळे त्यांच्या सैन्याकडून लढाईचा काहीच उद्योग झाला नाही.

1

खडकीच्या लढाईला ता. 5 नोव्हेंबर 1817 रोजी सुरुवात होण्याच्या पूर्वीच ब्रिगेडिअर जनरल स्मिथ यांच्या हाताखाली फोर्थ डिव्हिजनचे जे लष्कर होते त्या लष्कराने जलदी जलदीने कूच करून खडकीच्या सैन्याच्या मदतीला येऊन मिळावे, असे हकूम मि. एल्फिन्स्टन यांचेकडून ब्रिगेडिअर जनरल स्मिथ यांचेकडे पाठविण्यात आलेले होते. परंतु ते सैन्य खडकीच्या लढाईत खडकीच्या लष्कराला मदत करण्याकरिता वेळेवर येऊन पोहोचू शकले नाही आणि ती मदत येऊन पोहोचण्याच्या आधीच पेशव्यांनी खडकीच्या लढाईला सुरुवात केली. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ याच्या हाताखालचे सैन्य येऊन पोहोचण्यापूर्वीच कर्नल बर याच्या खडकीच्या सैन्याला गाठून त्याचा पराभव करावा, हा बाप गोखले यांचा डाव होता; व ते सैन्य येऊन पोहोचेपर्यंत कसे तरी दिवस काढावेत, अशी मि. एल्फिन्स्टन यांची एकसारखी खटपट चाललेली होती. खडकीची लढाई चाललेली असतानाही एल्फिन्स्टनसाहेबांचे निरोप पर्वतीवर पेशव्यांकडे जात होते, असे बखरकारांनी लिहिलेले आहे. हे निरोप साहेबाकडून पेशव्यांकडे का जात आहेत, यातील लष्करी धोरण बापू गोखले यांना पूर्णपणे समजून चुकलेले होते. पण बाजीरावसाहेबांच्या मनात बापू गोखल्यांचा करारीपणा आणि दृढनिश्चयीपणा दुर्दैवाने नव्हता ! इंग्रजांचे निरोप येऊ लागल्याबरोबर बाजीरावसाहेबांचे मन डळमळू लागले. खावंदाचे मनात इंग्रज मोडावयाचा नव्हता, असे बखरकाराने लिहिलेले आहे. त्यामुळे खडकीच्या मैदानावर बापू गोखले शत्रूला नामोहरम करण्यामध्ये गुंतलेले असता ती लढाई थांबवून तुम्ही माघारी फिरावे, असे निरोप पर्वतीवरून बापू गोखल्यांकडे जाऊ लागले व या निरोपाचे स्वरूप जेव्हा अगदी निकराचे दिसू लागले, तेव्हा बापू गोखले शह सोडून माघारी आले, असेही बखरकारांनी वर्णन केलेले आहे. हे वर्णन जर विश्वसनीय असेल, तर बापू गोखल्यांसारखा सेनापती असताना आणि इंग्लिशांच्या तीन हजार सैन्याच्या विरुद्ध त्यांच्यापाशी तीस हजार सैन्य असताना शत्रूचा बीमोड केल्यावाचून बापू गोखले खडकीच्या रणमैदानावरून माघारी का फिरले ह्या असंभाव्य गोष्टीतील कोडे उकलण्यासारखे आहे. नाहीतर ता. 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळ झाली म्हणून परत फिरलेल्या पेशव्यांच्या सैन्याने फिरून दुसऱ्या दिवशी खडकीच्या इंग्लिश सैन्यावर घाला घालण्याला काय हरकत होती ? परंतु एल्फिन्स्टनसाहेबांच्या निरोपावरून इंग्रज मोडावयाचा नाही अशा इराद्याने बाजीरावसाहेबांनीच पुढील लढाईचे काम तहकूब करविले असले पाहिजे, हे उघड दिसते. पण बाजीरावसाहेबांनी लढाईचे काम अशा रीतीने तहकूब करविले, म्हणून इंग्लिशांनीही आपली पुढील लढाईची तयारी थांबविली होती, असे मात्र नाही. तर वरती सांगितल्याप्रमाणे ब्रिगेडीअर जनरल स्मिथ याच्या हाताखालील फोर्थ डिव्हिजनमधील लष्कर अहमदनगराहून खडकीच्या लष्कराच्या मदतीला येण्याकरिता दर कूच दर मजल जलदीने चाल करून येत हे सैन्य अहमदनगराहून ता. 8 नोव्हेंबर रोजी निघून शिरूरला पोहोचल्यावर पेशव्यांचे काही स्वार त्याच्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी पाठविण्यात होते. हे स्वार इंग्लिशांच्या सैन्याला ठिकठिकाणी वाटेत अडवीत होते त्रास देत होते व शिरूर आणि पुणे यांच्या दरम्यान असलेल्या कोंडापूर
या दोन्ही सैन्यांची एक लहानशी चकमक होऊन पेशव्यांच्या स्वारांनी इंग्लिशांचे सामानांनी भरलेले दोन हजार बैल पकडून आणले. परंतु या किरकोळ अडथळ्याचा फारसा परिणाम न होता, ब्रिगेडिअर जनरल स्मिथ याच्या हाताखालचे सैन्य ता. 13 नोव्हेंबर रोजी

1

पुण्याजवळ येऊन, येरवड्याच्या जवळच्या नदीच्या काठची ‘शादिलबुवाची' म्हणून जी टेकडी प्रसिध्द आहे व जिला इंग्लिशांनी

1

“पिकेट हिल' (Piquet Hill) असे नाव दिलेले आहे, त्या टेकडीच्या पश्चिमेच्या अंगाला तळ देऊन राहिले. हल्ली खडकीच्या पुलावरून, म्हणजे होळकर पुलावरून, बंड गार्डनच्या पुलाकडे जाण्याचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या आसपास सायपर्स मायनर्सच्या छावणीची आणि डेक्कन कॉलेजची जी जागा आहे, त्या ठिकाणी बहुतकरून हे सैन्य उतरले असले पाहिजे. हे सैन्य खडकीच्या पुलाच्या पूर्व बाजूला उतरलेले असता त्या पुलाच्या पश्चिम बाजूला खडकीच्या गावात कर्नल बर यांच्या सैन्याची छावणी होती: व ही दोन्ही सैन्ये आता एकत्र येणार हे अगदी उघड होते. आणि वास्तविक पाहिले असता या दोन्ही सैन्यांना एकत्र होऊ द्यावयाचे नाही; अशी तजविज करणे हे पेशव्यांच्या सैन्याचे त्या वेळी मुख्य काम होते. पण ते त्यांनी केले नाही, आणि अखेरीस कर्नल बर आणि ब्रिगेडिअर जनरल स्मिथ या दोघांच्या हाताखालची सैन्ये येरवड्याच्या टेकडीमागे तारीख 13 नोव्हेंबर 1817 या दिवशी एकत्र झाली. बंडगार्डनच्या जवळ मुळा-मुठा नदीला जे हल्ली धरण बांधलेले आहे, ते पूर्वी नव्हते. त्यामुळे बंडगार्डनच्या पुढे हल्ली जो पूल आहे त्याच्या सुमाराला नदीमध्ये पाण्यातून पलीकडे जाण्यासारखी पायउताराची एक वाट होती व या पाण्यातील उताराच्या वाटेने पलीकडे जाऊन पुण्यातील गारपिरावरील पेशव्यांच्या लष्करावर हल्ला करावयाचा, असा इंग्लिश सैन्याचा बेत होता; व त्यासाठी नदीतील पायउताराची वाट आपल्या तोफेच्या माऱ्यांत सुरक्षित राहावी, म्हणून इंग्लिश सैन्याने ती पिकेट हिल ता. 14 नोव्हेंबर रोजी आपल्या ताब्यात घेतली व त्या टेकडीवर एक तोफ डागण्यात आली.

1

हल्ली सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी या येरवड्याच्या टेकडीवर जो एक सुंदर बंगला बांधलेला आहे व ज्याच्या जवळच दगडी पायऱ्यांचे एक महादेवाचे जुने देऊळ आहे, तेथेच कोठे तरी आसपास ही तोफ बहुतकरून डागण्यात आलेली असून येथून मुळा-मुठा नदीतील पायउताराने कोणी पेशव्यांकडील शिपाई अडथळा करण्याकरिता येऊ लागतील तर त्यांच्या विरुध्द हिचा बरोबर मारा होईल अशा रीतीने ही तोफ ठेवण्यात आलेली होती व याच टेकडीवरून समोरच्या गारपिरावरील पेशव्यांच्या छावणीवरही नेमके गोळे जाऊन पडतील, अशी आणखीही एक तोफ येथे डागण्यात आलेली होती.
हल्लीच्या बंडगार्डनच्या पुलाजवळ मुळा-मुठा नदीला जो एक पायउतार होता, म्हणून सांगितले आहे, त्याच्याशिवाय त्याच्या वरच्या अंगाला संगमाजवळही आणखी एक त्या नदीला पायउतार होता. या दोन्ही पायउतारांच्या बाजूने सैन्याच्या दोन तुकड्यांनी नदी उतरून पुण्यातील सैन्यावर हल्ला करावयाचा, असा विचार ठरला होता व हा हल्ला ता. 14 नोव्हेंबर रोजी रात्री करण्याचे ठरले होते. परंतु येरवड्याच्या पायउतारावरून तोफा जाऊ शकत नाहीत, असे आढळून आल्यामुळे त्या रात्रीचा बेत रहित करण्यात आला; व ता. 15 नोव्हेंबर रोजी त्या पायउताराची वाट दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु त्या येरवड्याच्या पायउताराची वाट इंग्लिशांच्या पायोनियर पलटणीतील शिपाई दुरुस्त करीत आहेत व त्या वाटेने पुण्याकडे येण्याचा शत्रूचा विचार आहे, असे समजून आल्यांनतर त्या नदीत काम करणाऱ्या शिपायांना अडथळा करण्याकरिता पेशव्यांच्या सैन्यातील काही लोक ता. 16 नोव्हेंबर रोजी तेथे आले; व अरबांचे घोडेस्वार त्यांना हरकत करू लागले; व तिसरे प्रहरी त्यांच्या मदतीला पेशव्याच्या सैन्यातील आणखीही बरेच लोक आले. पेशव्यांच्या या सैन्याने या वेळा चांगला जोर केला व कित्येक तासपर्यंत दोन्ही पक्षांच्या लोकांमध्ये बराच चकमक झडली.

1

पेशव्यांचे सैन्य नदीतून लढत-लढत येरवड्याच्या बाजूच्या तीरापर्यंत येऊन पोहोचले व त्यांनी ही लढाई रात्री 11 वाजेपर्यंत चालविली होती. परंतु या सगळ्या पराक्रमाचा फारसा उपयोग न होता इंग्लिशांचे सैन्य येरवड्याच्या पायउताराने नदी उतरून अलीकडच्या तीराला येऊन इंग्रजी सैन्याचा हा भाग लेफ्टनंट कर्नल मिलने याच्या हाताखाली देण्यात आला होता. या सैन्यात मुंबईची युरोपियन पलटण, रेसिडेंटच्या तैनातीतील आणि पहिल्या, सहाव्या आणि सातव्या नेटिव्ह पायदळ पलटणीतील एक बॅटेलियन, याप्रमाणे निरनिराळ्या तुकड्या होत्या; व निरनिराळ्या जातींंच्या मिळून त्यांच्यापाशी एकंदर दहा तोफा होत्या. हे सैन्य ता. 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमाराला येरवड्याच्या पायउताराने नदी उतरून पलीकडे जाऊन पोहोचले व त्या नंतर लगेच 3 वाजता म्हणजे ता. 17 नोव्हेंबरच्या पहाटेस ब्रिगेडिअर जनरल स्मिथ यांच्या छावणीत जे सैन्य होते, ते संगमाजवळच्या पायउताराने दुसऱ्या बाजूने पुण्यावर हल्ला करण्याकरिता निघाले. या सैन्यामध्ये 65 वी पायदळाची पलटण व दुसरी, तिसरी आणि नववी रेजिमेंट यांच्यापैकी प्रत्येकाची एक-एक बॅटेलियन आणि घोड्यावरील तोफखाना, अशा तुकड्या होत्या.
अशा रीतीने ही दोन्ही सैन्ये निरनिराळ्या बाजूंनी 17 तारखेच्या पहाटेच्या प्रहरी पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्याकरिता निघाली. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ याच्या हाताखालील सैन्य संगमावरून गारपिराकडे वळले व लेफ्टनंट कर्नल मिलने याच्या हाताखालचे सैन्य

1

येरवडा येथे नदी उतरून घोरपडीकडे वळले व तेथून पुढे वानवडीच्या दिशेने काही वळण घेऊन नंतर ते समोर पश्चिमेकडे गारपिराच्या बाजूला वळले. अशा रीतीने ही दोन्ही सैन्ये उजाडण्याच्या सुमारास गारपिराजवळ आली. पण ती तेथे येऊन पाहातात, तो त्यांच्या दृष्टीला काय पडले ? पेशव्यांचे सगळे सैन्य तेथून आपला तळ उठवून रातोरात कूच करून निघून गेलेले आहे, असे त्यांना आढळून आले. गारपिराच्या छावणीमध्ये जे काही थोडेसे अरब लोक शिल्लक राहिलेले होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले व पुढे त्याच दिवशी तिसरे प्रहरी पुण्यातील शनिवारवाड्यावर इंग्लिशांचे निशाण उभारण्याचा दुःखकारक प्रकार घडून आला.

“श्रीमंत दिवाळी होऊन बाहेर पडले ते डेऱ्यास येऊन दाखल झाले. तेथे अवघी फौज
जमा जाहली. तोफखानाही तयार होऊन तेथे आला. अशी तयारी होऊन कार्तिक शु. अष्टमीस तिसरे प्रहरी, लढाईस प्रारंभ झाला." अशा प्रकारचे बखरीमध्ये जे वर्णन
आहे, त्यावरून येरवड्याच्या लढाईपर्यंत पेशवे पुण्यात होते … (त्याच १७ नोव्हेंबरच्या )रात्री ते दिव्याच्या घाटाने निघून गेले, हे उघड आहे. बाजीरावसाहेब निघून गेल्यानंतर बापू गोखले यांनाही दुसरा मार्ग उरला नाही. आपल्या धन्याच्या पाठोपाठ कूच करून निघाले. तरी पण या कृत्याने बापू गोखल्यांच्या कीतीला कमीपणा आला, असे मुळीच झाले नाही. शिपाई या नात्याने त्यांची कीर्ती अजरामर होऊन राहिलेली आहे. …

पुढे चालू…

कोरेगाव भीमा लढाई

प्रतिक्रिया

कोणी मिपाकर धाग्यात वर्णन केलेल्या टेकड्या, रस्त्यांचे मंदिरांचे त्या ठिकाणी जाऊन तेथून फोटो काढून सादर करावेत. ही विनंती...

दुर्गविहारी's picture

11 Apr 2020 - 8:08 pm | दुर्गविहारी

एका फारश्या माहिती नसलेल्या लढाईचे अत्यंत रोचक वर्णन. अजून येउ देत.

शशिकांत ओक's picture

11 Apr 2020 - 10:53 pm | शशिकांत ओक

पुण्यात जाताना या भागातून यावे जावे लागते...
आता वेळ मिळाला की ॐ नमः शिवाय लिहिलेल्या येरवडा टेकडीवरील शिव मंदिराजवळून तोफांचा मारा कसा केला गेला असेल याचा अंदाज घ्यायचा आहे...