अनय

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
3 Apr 2020 - 11:43 pm

अनय

"नको जाऊस राधे! माझ्यासाठी नाही म्हणत ग मी... तुझ्यासाठीच सांगतो आहे.... नको जाऊस त्याला निरोप द्यायला."

"निरोप द्यायला जाते आहे; हे कोणी सांगितलं तुला अनय? थांबवायला जाते आहे मी."

"तुला वाटतं तो तुझं ऐकेल?"

"तुला वाटतं नाही ऐकणार न? बघू, कोण बरोबर ठरतं."

असं म्हणून राधा धावत घराबाहेर पडली. तिला लवकरात लवकर वेस गाठायची होती. तिचा शाम गोकुळ सोडून निघाला होता. आताच आलेल्या नंदिनीने तिला तसं सांगितलं होतं. खरतर राधेचा यावर विश्वास नव्हता बसला. पण नंदिनी ही राधेची एकुलती एक मैत्रीण होती जी राधेचं मन समजू शकत होती. त्यामुळे ती काहीतरी खोटं सांगेल असं राधेला वाटत नव्हतं..... धावताना तिच्या मानत सारखं येत होतं... तो खरंच निघाला? मला न सांगता? सांगितलं नाही म्हणजे कदाचित कायमचा नसेल जात तो.... माझ्याकडे येणार तो परत. हृदय एकीकडे आणि शरीर एकीकडे असं नाही जगता येणार त्याला... आणि मलासुद्धा.

वेशीपाशी प्रचंड गर्दी झाली होती. यशोदा माई हतबलतेने चालत होती. तिच्या अंगातले त्राण संपले होते जणू; तिला नंद महाराज धरून कसंबसं चालवत होते. एक क्षण त्यांच्या जवळ वेग कमी करून राधेने माईच्या डोळ्यात पाहिले आणि तिचं हृदय हललं. ती अकृराच्या राजेशाही रथाच्या दिशेने धावली. रथाचं सारथ्य बहुतेक स्वतः अकृर करत होते. वस्त्राभूषणांवरून तरी कोणी सामान्य सारथी नसावा; तिच्या मनात येऊन गेलं. रथाच्या पुढच्या नीडावर बलराम दादा उभे होते; आणि तो? तो......!!! तो गंभीर मुद्रेवर हलकेच हसू खेळवत रडणाऱ्या गोकुलवासीयांना हात करत होता. त्याच्या विनवण्या करत सगळेच रथाच्या बाजूने चालत होते. काहीजण त्या दुष्ट अकृराची निर्भसना करत होते. मात्र अकृर शांत होता... रथ आता वेस पारच करणार होता; त्यामुळे काहीसा वेग आला होता त्याला.

राधा कोणतीही पर्वा न करता रथासमोर जाऊन उभी राहिली; आणि अकृराने घाईघाईने घोड्यांचा लगाम खेचला. रथ जोरात धक्का लागून थांबला. त्याची तीच ती शामल-मोहक नेत्रकमलं तिच्याकडे वळली. मात्र आज तिने स्वतःला त्या जादूमध्ये विरघळू दिले नाही. जर आज त्याच्या प्रेमशब्दांच्या जादूमध्ये अडकले तर कायमची त्याला मुकेन; तिने स्वतःला समजावलं. तिचे डोळे त्याच्या नजरेला नजर देत स्थिर झाले. तोपर्यंत रथाच्या जवळ पोहोचलेल्या यशोदा माईच्या मनात परत एकदा आशेचा किरण उगवला. जनाची लाज सोडून त्या अविवाहित तरुण राधेला मिठीत मारीत तिने हंबरडा फोडला आणि म्हणाली;"राधे थांबव माझ्या किसनाला. काल हा दुष्ट अकृर आल्यापासून मी त्याची मनधरणी करते आहे; त्याने जाऊ नये म्हणून. पण जणूकाही त्याला माझे शब्द ऐकूच येत नाही आहेत. आता ऐकलं तर फक्त तुझंच ऐकेल तो. तू त्याची......." त्यापुढे काय म्हणावं ते न सुचून माई एकदम गोंधळली. इतकं बोलून देखील तिला धाप लागली होती. कालपासून सतत डोळ्याला लागलेली धार आणि अन्नाचा एक कण पोटात नाही; त्यामुळे तिची अवस्था फारच वाईट झाली होती.

राधेने एकवार यशोदा माईकडे बघितले. 'मी त्याची....?' अहं! 'मी त्याची! बास... इतकंच. त्यापुढे प्रश्नचिन्ह असूच शकत नाही. पण हे का कोणाला सांगू? तिच्या मनात एका क्षणात हा विचार येऊन गेला आणि परत एकदा तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं. आता त्याची गंभीर नजर बोलत होती....

"अडवते आहेस?"

"कायमचा?"

"हो!"

"मला न सांगता?"

"सांगितलं असतं तर?"

"जाऊ दिलं नसतं...."

आणि त्याचे डोळे हसले. तिची नजर झुकली. पण परत एकदा खंबीरपणे तिने नजर उचलून स्वतःला त्याच्या डोळ्यात गुंतवले. तिच्या डोळ्यातली आतुरता त्याच्यापर्यंत तिला पोहोचवायची होती. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती आपणहून रथा समोरून बाजूला झाली. तिची नजर आता शांत झाली होती. "जातोस? जा! तुला अडवणार नाही. तुझ्या शिवायचं माझं हे अर्थहीन... प्राणहीन.... जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि कधीतरी तुझ्याही नकळत तुझ्यातच विलीन होईन. तुला मात्र  मी आठवेनच... आणि त्यावेळी मात्र......" तिचे मन त्याला सांगत होते. तिचे पाणीदार डोळे एका तेजाने चमकत होते... पण आता त्यात अश्रू नव्हते. तिने त्याच्याकडे पाठ केली आणि ती चालू पडली. वेशी जवळून वाहणाऱ्या यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... 

राधा बाजूला झाली आणि यशोदा माईची शेवटची आस लोप पावली. तिची शुद्ध हरपली. नंद महाराज तिला सांभाळत रथापासून दूर झाले. त्यांच्याकडे एकवार सौहाद्र नजरेने बघून श्रीकृष्णाने अकृराला चलण्याची खुण केली. काही क्षणांसाठी स्थब्द झालेले गोकुळवासी परत एकदा हंबरडा फोडून रडू लागले. "सांभाळा स्वतःला! मी इथून गेलो तरी माझं हृदय तुमच्याकडेच राहील. तुम्हाला दिसलेला कृष्ण जगाला कधीच दिसणार नाही." तो म्हणाला आणि एकदाही मागे वळून न बघता दूर दूर जात राहिला. रथ दिसेनासा झाला आणि जड अंतःकरणाने सगळे मागे फिरले. मात्र कोणाच्याही लक्षात आले नाही की दूरवर एक काळा ठिपका वेशीच्या दुसऱ्या दरवाजाने वेगाने बाहेर पडून रथाचा पाठलाग करायला लागला होता.

अकृराच्या खांद्याला स्पर्श करून श्रीकृष्णाने रथ थांबवण्याचा संकेत दिला. बलराम दादाने आणि अकृराने एकत्रच प्रश्नार्थक नजरेने मागे वळून बघितले. कृष्णाच्या हसऱ्या शांत नजरेत गंभीर भाव होता. तो काळा ठिपका रथाच्या जवळ येत होता. कृष्ण रथाखाली उतरला आणि त्याच्या येण्याची वाट बघू लागला. तो जवळ येताच बलराम दादाने त्याला ओळखले. तो अनय होता!

कृष्ण दोन पावलं चालून त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याच्याकडे पाहू लागला. अनयची नजर यमुनेच्या वाळूमध्ये एखाद्या खडकाप्रमाणे ऋतून बसली होती.

"तिला सांभाळ."

"ती माझीच आहे." अजूनही नजर खालीच होती.

कृष्ण मनापासून हसला. गेल्या दोन दिवसात त्याने पांघरलेला गंभीरतेचा मुखवटा एकदम नाहीसा झाला.

"अनय, जोपर्यंत ती नक्की कोणाची आहे हे तुला कळेल तोपर्यंत तरी तिला संभाळशील?"

"असं एकसारखं सांभाळ! संभाळशील? असं म्हणून तिच्याबद्दलची काळजी माझ्याकडे दाखवण्यापेक्षा तिला घेऊन का नाही जात तू किसना? ती इथे राहिली तर आमचं लग्न नक्की होणार बघ. गोकळवासीयांना तिचं मन कधी कळणार नाही रे. आणि एकदा लग्न झालं की मग ती फक्त माझीच असेल." अनय काहीसा अडखळत म्हणाला.

आता कृष्णच्या चेहेऱ्यावर त्याच नेहेमीच मंद गूढ हसू खेळायला लागलं होतं. "अनय, मी समजू शकतो तुझं मन. ठीक आहे! तू सुखानं संसार कर. मला खात्री आहे इतर कोणाला जरी कळलं नाही तरी तुला तिचं मन कायम कळेल. चल! उशीर होतो आहे मला; जातो मी!"

"किसना, जातो म्हणू नये रे.... येतो म्हणावं. किसना, आपण एकत्र खेळलो आहोत लहानपणी.... आपली मैत्री आहे रे! पण एक सांगू? तुझ्या जाण्याने मला आनंदच होतो आहे. मला कळतंय तुझ्या जाण्याने तिच्या मनाला जखम झाली आहे; पण जाणाऱ्या काळाबरोबर जख्मा बऱ्या होतात. कधीतरी तुला आमची आठवण येईल आणि तू इथे येशील तेव्हा तुला तिच्या चेहेऱ्यावर सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसेल." सुरवातीला अडखळणारा अनय भविष्याच्या सुख स्वप्नांमध्ये हरवून स्पष्ट बोलायला लागला होता.

त्याच्या चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातील सुखाच्या कल्पनेने सुखावलेलं त्याचं मन बघून कृष्णाला क्षणभर का होईना त्याचा हेवा वाटला; आणि मग अनयला तिथे तसाच सोडून देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण कर्तव्यकठोर आयुष्य जगण्यासाठी राथारुढ होऊन निघाला.

अनय त्याच्या सुखस्वप्नातून जागा झाला तोपर्यंत बराच अंधार झाला होता. तो एकटाच असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि एकदा दूर क्षितिजाकडे नजर उचलून बघून तो परत वळला. त्याच्या घराकडे... त्याच्या राधेकडे.

काही दिवासातच अनयची आई राधेच्या घरी विडा-सुपारी घेऊन राधेचा हात मागायला गेली. किसन-राधेबद्दल गोकुळातली चर्चा कानावर असणाऱ्या राधेच्या आई-वडीलांना दही-दुभत्याने भरलेल्या घरचं स्थळ आलेलं बघून प्रचंड आनंद झाला. त्यांनी लगेच विडा-सुपारी स्वीकारून राधेच लग्न अनयशी नक्की केलं. कृष्ण गेल्यापासून कुठेतरी हरवून गेलेली राधा यासर्वापासून दूरचं होती. रोज सकाळी उठून यामुनेवर जायचं; मनसोक्त अंघोळ करायची, कपडे धुवायचे आणि येताना आणलेले हंडे भरून दुपार कलताना घराकडे परतायचं असा तिचा दिनक्रम झाला होता. पूर्वी सतत सर्वांशी बोलणारी, हसरी राधा आता हरवून गेली होती.

एकदिवस अशीच ती आपल्यातच मग्न घराकडे परतत असताना तिला अनय आडवा आला. त्याने तिची वाट रोखून धरल्यामुळे नाईलाजाने तिने नजर उचलून वर बघितले.

"तू बरोबर ठरलास. मान्य करते मी. जाऊ दे बघू मला आता." त्याच्याकडे बघून राधा दुखावलेल्या स्वरात म्हणाली.

"राधे, मी बरोबर ठरलो हे सांगायला मी आलो असं वाटलं का तुला? तेच जर सांगायचं असतं तर इतके दिवस वाट नसती बघितली मी. राधे, तुला तुझ्या तातांनी सांगितलं का आपलं लग्न ठरलं आहे ते?"

अनयच बोलणं ऐकून राधाला मोठा धक्का बसला. तिच्या डोक्यावरचा घडा तिच्या हातून सुटून जमिनीवर कोसळला.

"आपलं लग्न? पण मी.... मला.... माझं लग्न......"

"अहं! काही बोलू नकोस राधे. मला कळतंय तू काय म्हणणार आहेस ते. नको बोलुस असं काही. एक सांगू तुला? राधे तू मला नाही म्हणालीस तरी तुझे आई-तात तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी नक्कीच ठरवतील. तो कसा असेल कोण जाणे? पण तो तुला समजू शकणार नाही हे नक्की. राधे, तू आणि किसन यांच्याबद्दलची गोकुळात झालेली चर्चा मला माहीत आहे.."

त्याला मध्येच अडवत आनंदाने चमचमणाऱ्या डोळ्यांनी राधेने त्याला विचारले;"अनय, खरंच का रे आमच्याबद्दल चर्चा होती गोकुळात? खरं तर मी तशी थोडी मोठीच की रे त्याच्याहून. पण तरीही.... तो आणि मी... असं होऊ शकतं याबद्दल गोकुळात चर्चा होती..... हे ऐकून देखील मन हलकं झालं रे."

आपण हिला काय सांगायला आलो आणि ही कुठल्या विषयात हरवली आहे..... अनयच्या मनात विचार आला. त्याने स्वप्नात हरवलेल्या राधेकडे बघितले आणि तसाच मागे वळून निघून गेला. दोन दिवसांनी राधेचे तात अनयच्या घरी आले. त्यांचा चेहेरा उतरला होता.... हातातील विडा-सुपारीचे ताट जमिनीवर ठेवून भरल्या डोळ्यांनी त्यांनी अनयचा हात हातात घेतला; मात्र त्यांना काही बोलायला न देता अनयच म्हणाला;"तात, माझा आणि राधेचा विवाह नक्की होणार. तुम्ही सगळे विचार बाजूला ठेऊन तयारीला लागा." अनयचे बोलणे ऐकून राधेचे तात अजूनच अवघडले. मात्र एकवार अनयकडे बघून ते परत गेले. अनयने त्याच संध्याकाळी परत एकदा राधेची वाट अडवली.

"अनय, असं का करतो आहेस तू? किती कष्टाने मी तातांना पटवले होते की मला लग्नच करायचे नाही. मात्र तू त्यांना सांगितलेस की आपला विवाह नक्की होणार. ते हरखून गेले आहेत आता. का माझं आयुष्य अजून अवघड करतो आहेस?" कधीही आवाजाची मध्य लय न सोडणारी राधा काहीशा रागाने बोलली. एक पाऊल पुढे होऊन अनयने तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाला;"राधे, नको करुस माझ्याशी लग्न. पण किती दिवस हा विषय टाळशील तू? एकदिवस तुझं न ऐकता तुझे तात तुझं लग्न कोणाशीतरी नक्की लावून देतील. कुणा अनोळखी व्यक्तीपेक्षा मग माझ्याशी कर न लग्न."

आता मात्र राधेचा आवाज कातर झाला. तिने देखील त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाली;"अनय मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. तो फक्त माझ्या तना-मनात नाही तर माझ्या संपूर्ण अवकाशात व्यापून राहिला आहे. लग्नानंतर देखील जेव्हा तुला त्याचेच प्रतिबिंब माझ्या डोळ्यात दिसेल तेव्हा तू खूप दुखावला जाशील."

तिच्याकडे हसत बघत अनय म्हणाला,"मी दुखावला जाईन याचं तुला वाईट वाटतंय राधे यातच माझं सुख दडलं आहे अस मी म्हंटल तर?"

त्याच्याकडे एकदा बघून राधेने नजर वळवली आणि निघण्यासाठी पाऊल उचललं. मात्र परत त्याच्याकडे वळून ती म्हणाली;"अनय, तू म्हणशील त्या मुहूर्तावर तुझ्याशी विवाह करायला मी तयार आहे." तिच्या त्या एका वाक्याने तो हरखून गेला.

.... आणि राधा अनयचा विवाह झाला. नंद महाराज आणि यशोदा माई देखील त्यांच्या लग्नाला आले होते. लग्न लागले आणि यशोदा माई इडा-पीडा घेण्यासाठी नववधू जवळ आली. तिने राधेचा झुकलेला चेहेरा हनुवटीला धरून वर उचलला. राधेच्या डोळ्यात बघत ती हलकेच म्हणाली;"अजूनही माझा मोहन आहे ग तुझ्या डोळ्यात..." पण मग स्वतःला सावरत तिने राधेची इडा-पीडा घेतली आणि म्हणाली;"उत्तम संसार कर राधे. सर्वांना सुखी कर."

अनय राधेचा संसार सुरू झाला. राधा एक उत्तम गृहिणी होती. घर काम उरकून यमुनेवर जावं; स्नान उरकून कपडे धुवून पाणी भरून आणावं... खिल्लारांची काळजी घ्यावी. दुधाची धार काढून त्याचं दही, ताक, लोणी, तूप करून अनयकडे सुपूर्द करावं.... ती कुठेही कमी पडत नव्हती. अनयचा विवाह राधेशी ठरवल्यामुळे अनयच्या माईला गोकुलवासीयांनी अगोदर खूप दोष दिले होते; तेच आज राधेचे कौतुक करताना थकत नव्हते.

हाताला प्रचंड उरका असणारी राधा संध्याकाळ होताच मात्र मलूल होऊन जायची. माडीवर जाताना तिची पाऊलं जड होऊन जायची. रोज वर येणाऱ्या राधेची आतुरतेने वाट बघणारा अनय तिच्या जड पायातील पैंजणांच्या आवाजावरून काय ते समजून जायचा आणि भिंतीकडे तोंड करून झोप लागल्याची बतावणी करायचा. राधा देखील काहीएक न बोलता दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपून जायची. अशीच वर्ष सरली.... अनयची माई नातवंड खेळवायची इच्छा मनात ठेऊन जगाचा निरोप घेऊन गेली.

माई गेल्यानंतर राधेने माडीवर जाणे सोडून दिले होते. अनयने देखील आता वाट बघणे सोडून दिले होते. अलीकडे राधेच्या केसांमधली रुपेरी छटा अनयला जाणवायला लागली होती. तिच्या कामातली चपळता कमी झाली होती. एकदिवस गाई चरून आणून अनय घराच्या ओसरीशी बसला आणि त्याने राधेला हाक मारली. एरवी लगेच उत्तर देणाऱ्या राधेची कोणतीही हालचाल त्याला जाणवली नाही. तो तसाच घरात धावला. राधा जमिनीवर पडली होती. अनयने संपूर्ण आयुष्यात पाहिल्यादाच राधेला उचलून हृदयाशी कवटाळले. पण तिला जवळ घेताक्षणी त्याच्या छातीला काहीतरी टोचले. त्याने तिच्या हृदयाजवळ धरलेल्या हाताची मूठ सोडवली.... त्यात शामवर्णी किसनाची मूर्ती होती. अनय राधेच्या कलेवराला बिलगून मूकपणे रडत होता आणि मनातच त्या मृदू मनाच्या किसनाला म्हणत होता....

"किसना, तिच्या अवकाशात फक्त तूच राहिलास रे आयुष्यभर. पण एक सांगू? मी कधीच ते अवकाश मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता यापुढील आयुष्य किमान एका विचारावर जगू शकेन की कदाचित प्रयत्न केला असता तर ती खरंच कायमची माझी झाली असती आणि तू आला असतास तर तुला तिच्या चेहेऱ्यावर आमच्या सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसला असता.... पण...... तू आला नाहीस... आणि हेच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर!"

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

4 Apr 2020 - 3:03 am | चामुंडराय

छान लिहिलंय.

राधेच्या आयुष्यातील हा पैलू माहित नव्हता.

ज्योति अळवणी's picture

4 Apr 2020 - 10:07 am | ज्योति अळवणी

राधा अनय चा विवाह झाला होता असा उल्लेख आहे.

ज्योति अळवणी's picture

4 Apr 2020 - 10:07 am | ज्योति अळवणी

राधा अनय चा विवाह झाला होता असा उल्लेख आहे.