हात तुझा हातात......

अगस्ती's picture
अगस्ती in जे न देखे रवी...
19 Dec 2007 - 9:55 pm

हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?
आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला

मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला

कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी?
माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला

----अगस्ती

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Dec 2007 - 10:12 pm | विसोबा खेचर

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?
आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला

कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी?
माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला

आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला

वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या...

-- तात्या.

धनंजय's picture

19 Dec 2007 - 10:57 pm | धनंजय

येथे मिसळपावावर बह्'र वगैरेबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल. स्वागत.

सर्किट's picture

19 Dec 2007 - 11:10 pm | सर्किट (not verified)

अगस्ती,

कविता आवडली.

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या

येथे कारा म्हणजे काय ?

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

ही द्विपदी खूप आवडली.

- सर्किट

बेसनलाडू's picture

19 Dec 2007 - 11:38 pm | बेसनलाडू

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला

कविवर्य, गझल फार आवडली.

सर्कीटकाका,
कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी?

(आस्वादक)बेसनलाडू

प्राजु's picture

20 Dec 2007 - 12:09 am | प्राजु

अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली..

खास करून खालील ओळी,

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला

आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला...

-प्राजु.

नंदन's picture

20 Dec 2007 - 6:00 am | नंदन

गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

ध्रुव's picture

20 Dec 2007 - 11:38 am | ध्रुव

फार सुरेख कविता...
अजुनही येऊद्यत!!!
--
ध्रुव

केशवसुमार's picture

20 Dec 2007 - 5:34 pm | केशवसुमार

अगस्तीशेठ,
बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती.

आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा
केशवसुमार

अगस्ती's picture

20 Dec 2007 - 6:52 pm | अगस्ती

गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

अगस्ती

शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे.

अगस्ती

स्वाती राजेश's picture

20 Dec 2007 - 7:46 pm | स्वाती राजेश

हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला

ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रमोद देव's picture

21 Dec 2007 - 9:15 am | प्रमोद देव

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला...

ये मरणा,येरे ये मरणा
तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.