या वळणावर...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
25 Sep 2019 - 10:20 pm
गाभा: 

माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरद पवार यांची सत्तावन्न वर्षांची राजकीय कारकिर्द अनपेक्षितपणे एका नव्या वळणावर दाखल झाली आहे.
सन २०१२ मध्येच निवडणुकीच्या राजकारणातून पवार यांनी निवृत्ती जाहीर केली, आणि स्वत: नियोजनपूर्वक बांधलेला बारामती लोकसभा मतदारसंघ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कन्येच्या, सुप्रिया सुळे यांच्या
हवाली केला. २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, पण त्यांनी स्वत:च त्याला पूर्णविराम दिला.
आता मात्र निवडणूकीच्या राजकारणात पुन्हा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आणि उदयनराजेंच्या समोर कोण उभे ठाकणार याची चर्चा सुरू झाली. उदयनराजे हा सहाजिकच तगडा उमेदवार असल्याने त्यांना आव्हान देणारा उमेदवारही तगडा असावा या चर्चेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरविण्याचा प्रयत्न सुरू होताच चव्हाण यांनी स्वत:च अंग काढून घेत शरद पवार यांनी सातारा पोटनिवडणूक लढवावी असा पेंच टाकला. त्यावर कडी म्हणजे, ‘पवार निवडणूक लढविणार असतील तर आपली माघार’ असे जाहीर करून स्वत: उदयनराजेंनीच पवार यांच्यासाठी सातारा लोकसभेची गादी मोकळी करून दिली.
आता साताऱ्यात पवार यांना पोटनिवडणुकीत बहुधा कोणतेच आव्हान राहणार नसले, तरी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचे काय याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पवार यांनी निवडणूक लढविली तर साताऱ्यातील पक्षांतराच्या व त्यातून योजलेल्या काॅंग्रेसमुक्तीच्या राजकारणावर सहज मात होईल. त्यामुळे उदयनराजेंचे आव्हान नसले तरी भाजपला सातार्याचा गड राखण्यासाठी कमालीची कसरत करावी लागेल. म्हणजे ही पोटनिवडणूक पवारांसाठी सहज तर भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरेल.
म्हणून, पवारांच्या राजकारणाला या पोटनिवडणुकीने एका वेगळ्या टप्प्यावर आणून सोडले आहे.
सहाजिकच, आता पवार काय निकाल घेतात ते पाहणे औत्सुक्याचे आहे!

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

26 Sep 2019 - 11:20 pm | जालिम लोशन

शब्दांपलिकडे आहे हे सगळे.