मास्तरांची जिरवली!

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
20 Sep 2019 - 3:09 pm

मी सातवीत होतो. माझं हायस्कूल तालुक्यातील उत्तम नावाजलेले होते. अतिशय शिस्तप्रिय आणि मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्राचार्य आम्हाला लाभले होते. सहकार सम्राट, साखर सम्राटाची संस्था असली तरी भ्रष्टाचार, पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करणं वगैरे गोष्टी तेव्हा अजिबात नव्हत्या. केवळ गुणवत्ता हाच निकष होता. प्राचार्यांच्या कावळ्याच्या नजरेतून एकही चूकीची गोष्ट सुटत नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व शिक्षक वर्ग तळमळीने काम करत होते.
अशातच एक नवीन शिक्षक आम्हाला चित्रकलेला आले. त्यांचं नाव भैलुमे असे होते. ठेंगणी मुर्ती. आडवं पसरलेलं शरीर. सर चित्रकलेत खूप पारंगत होते. तसेच नृत्य, संगित यातही त्यांना चांगलीच गती होती. वर्गात चित्र काढून दिले की रांगांमधून फेऱ्या मारताना काहीतरी गुणगुणत असत. मध्येच नाचाची स्टेप केल्यासारखा ठुमका मारायचे. त्यामुळे त्यांना मोठ्या वर्गातील मुलांनी नाच्या भैलुमे हे नाव पाडलं होतं. सर रागीट होते. चूक झाली की खूप बोलायचे. तो काळ शिक्षकांचा मार निमुटपणे खायचा होता. तक्रार केली तर घरून मार मिळण्याची भीती असायची.
असेच दिवस जात होते. सव्वीस जानेवारीला खूप मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. सरांनी आमच्या वर्गाच्या मुलांना लाकडी डंबेल्सची कवायत शिकवायला सुरुवात केली. आमची कवायत कचेरीच्या मैदानावर होणार होती. जिथे प्रांत तहसीलदार साहेब, तालुक्याचे आमदार ध्वजवंदनाला उपस्थित रहायचे. नंतर गावातील शाळा कॉलेज मधील मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असत.
एक दिवस सर मैदानावर आमचा डंबेल्सचा सराव घेत होते. त्यांनी आमच्या रांगेकडे पाहून तू इकडे येरे असे लांबून बोलावले. काही तरी आणायला सांगायचं होतं. सर नेमके कोणाला बोलावत आहे हे समजत नव्हते व नावाने हाक मारत नव्हते. मलाही कळलं नाही. तेवढ्यात सर रागाने तरातरा चालत आले नि खाडकन एक थोबाडीत ठेवून दिली माझ्या. माझ्या डोळ्यांसमोर तर काजवेच चमकले. डोळ्यात पाणी आलं.
मुलांना सुध्दा हे आवडलं नाही पण कुणी काहीच बोललं नाही. विशेष म्हणजे मैदानावर इतर वर्गातल्या मुलींनी मला थोबाडीत खाताना पाहिलं याचा अतिशय संताप आला.
होता होता सव्वीस जानेवारी उजाडला. सरांनी आम्हाला पाच-सहा जणांना शाळेतील ध्वजवंदन झाल्यावर डंबेल्सची पोती कचेरीच्या ग्रांउंडकडे घेऊन जाण्याची सुचना केली होती. बाकी मुलांना डायरेक्ट ग्राऊंडवर यायला सांगितले होते. सरांनी तोंडात मारल्याचा राग मनात होताच. मी बाकीच्या मुलांना सरांची फजिती करायची आहे हे सांगून तुम्ही येऊ नका असे सांगितले होते. आले तरी दुरून मजा बघा असं सांगून ठेवले. शाळेचा कार्यक्रम झाला नि लगेच आम्ही सरांच्या समोर साळसुदपणे डंबेल्सची पोती घेऊन निघालो. मैदानावर पोहोचलो तेव्हा तिथं हजारो लोक, विद्यार्थी उपस्थित होते. आम्ही डंबेल्सची पोती टेकवली नि सरांची नजर चुकवून एक एक जण पसार झाला. गर्दीत लांब जाऊन काय होणार हे पहात होतो.
आमच्या शाळेचं नाव पुकारले गेले व शाळेच्या विद्यार्थ्यांची कवायत होणार आहे अशी सुचना निवेदकानं केली. पण... कोणीच मैदानात आलं नाही. सर कावरे बावरे झाले. परत सुचना झाली तरीही कुणीच पुढे आले नाही तेव्हा पुढचा कार्यक्रम चालू केला गेला.
आम्ही मजा पाहून गुपचूप सटकलो. नंतर सरांनी विचारलं तर सगळे चूप बसले. सरांनी शिक्षाही केली नाही ना हेडसरांकडे तक्रार केली. बाकीच्या शिक्षकांना सरांची फजिती पाहून हसण्याचा विषय झाला. परत त्यांनी आमच्या वर्गाला घेऊन काही कार्यक्रम बसवला नाही.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

20 Sep 2019 - 6:46 pm | दुर्गविहारी

छान ! शाळेतील आठवणी मजेदार असतात.

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 7:04 pm | राजे १०७

धन्यवाद दुर्गविहारी जी.

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2019 - 7:35 pm | ज्योति अळवणी

मस्तच

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 7:47 pm | राजे १०७

धन्यवाद ज्योति जी.

योगी९००'s picture

20 Sep 2019 - 8:03 pm | योगी९००

छान लिहीले आहे. सरांची चांगलीच जिरवली.

असेच एक मारकुटे मास्तर आम्हाला पण होते. हिंदीला सहावीला होते. काही छोटी चूक जरी झाली की मार पडायचा. एकदा तर आख्या वर्गाला झोडपले होते. त्याचा राग म्हणून सगळ्यांनी ठरवले की तिमाईचा हिंदीच्या पेपरला कोणीच बसायचे नाही. त्यावेळी आम्ही सहावीत होतो त्यामुळे आम्हाला असे मास बंक वगैरे प्रकार माहीत नव्हता. आमच्यातल्याच एकाचा मोठा भाऊ कॉलेजला होता आणि त्याने येऊन सगळ्यांचे कान भरले होते. ठरवून बरेच जण हिंदीच्या पेपरा गेले नाही. काही पाच-सहा नेभळत पोरं मास्तरला किंवा घरच्यांना घाबरून पेपरला बसली होती पण या मास बंक मुळे मुख्याध्यापकांनी नंतर वर्गात येऊन आमची खरडपट्टी काढली. आमच्याकडून कारण ऐकल्यावर घरच्यांना ही कळवले गेले. काही पालकांनी परत हिंदीचा पेपर घ्या असे सांगितले पण मुख्याध्यापकांनी काही ऐकले नाही. जे बसले नव्हते त्या सगळ्यांना हिंदीत शून्य मार्क दिले. मला तरी घरचे काही बोलले नाहीत. पण याचा परीणाम म्हणून त्या मास्तराने मारहाण करणे सोडले. तसेच इतर शिक्षकांनी पण कमी केले. पण टोमणे मारणे मात्र कमी झाले नाही.

धन्यवाद योगी जी. वय लहान असतं तेव्हा सन्मानाच्या /
आपुलकीच्या वागणुकीची भुक/ अपेक्षा जास्त असते. बरेचसे शिक्षक हे हिमजीकल सारखे वागायचे त्या काळी.

खरी मजा आली असती. असो, जमेल हळू हळू. आत्ता फक्त फोरप्लेच बरा झाला पण टायटलनुसार क्लायमॅक्स रंगलाच नाही.

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 8:51 pm | राजे १०७

भलतंच अश्लील वळण देवू रायले तुम्ही जवान भौ. शब्दशः अर्थ नका काढीत जौ.

जॉनविक्क's picture

20 Sep 2019 - 9:20 pm | जॉनविक्क

या उपमा आहेत(पोहेही समजा हवे तर ).

या शब्दामधे कोणतीही अश्लीलता नाही हे नम्रतेने नमूद करतो.

उपेक्षित's picture

23 Sep 2019 - 2:34 pm | उपेक्षित

विमलाबाई गरवारे ला असताना असाच तावातावाने एकदा मास्तर ला तुमची मुख्याधापकाकडे तक्रार करतो अशी धमकी दिली होती मी आणि मित्राने नंतर ते मास्तर पट्टी घेऊन जे धावले होते आम्ही जे XXX पाय लावून पळालो ते बाथरूम मध्ये जाऊन लपलो होतो डायरेक्ट. :)

राजे १०७'s picture

23 Sep 2019 - 7:31 pm | राजे १०७

हा हा हा