तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स!

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Jul 2019 - 2:13 pm

तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स!

दोन्ही एकमेकांपासून पूर्ण वेगळे आणि तरीही माझे दोन्ही आवडते प्रकार.

तुंबाडचे खोत हि कादंबरी जेव्हा मी पाहिल्यान्दा हातात घेतली तेव्हा तिचा आकार बघूनच धास्ती घेतली कि हि मी वाचून पूर्ण करू शकेन का? आणि जेवढा मोठा एक भाग तेवढाच मोठा दुसरा भाग. बाप रे! पण या पुस्तकाविषयी खूप काही ऐकलं होत, वाचलं होत,अगदी वाचण्यासारखं काही इत्यादी सदरातून या कादंबरीचा हमखास उल्लेख व्हायचा. जेव्हा मी हि कादंबरी वाचायला घेतली त्यानंतर मात्र भारावून जाऊन मी एकच काय दुसरा भाग देखील अधीरतेने वाचून संपवला. त्यानंतर आतापर्यंत मी किमान ८-९ वेळा तरी ती कादंबरी दोन्ही भागांसह वाचलेय आणि तरी आजही ती वाचताना मी अजूनही तेवढ्याच अधीरतेने वाचते. एक मी मूळ कोकणातली. त्यामुळे यातली भाषा अगदीच माझी जवळची वाटते. दर १२ मैलावर भाषा बदलते म्हणतात. पण कादंबरी सगळी तुंबाड मधेच जास्त करून घडते. त्यामुळे मला अगदीच ती सगळी गावं, नावं नि भाषा माझी आपली वाटते. अगदी त्यात मुक्तपणे वापरलेल्या शिव्यांसकट. आता कोकणात देखील शहरीकरण झाल्यामुळे सोफास्टीकेटेड वातावरण झालाय थोडंफार. पण अशीच अगदी येता जाता एकमेकांना हाक मारताना सुद्धा शिव्यांनीच हाका मारणारी माणसं बघतली आहेत. अजूनही काही ठिकाणी शिल्लक देखील आहेत.

तुंबाड हि कुणा एकाची गोष्ट नाही पण एकाच कुटुंबाची मात्र आहे. जवळ जवळ ३ ते ४ पिढ्यांची हि गोष्ट आहे. त्या अनुषंगाने येणारी इतर पात्र देखील आहेतच. खोत घराण्यापासून सुरु झालेली कथा अनेक चित्र विचित्र वळणे घेत शेवटाला पोचते तेव्हा चुकल्याचुकल्यासारखं होतं. अजूनही पुढच्या पिढीची हकीकत वाचायला मिळाली असती तरी चाललं असतं असं वाटत राहत. दादा खोतापासून सुरु झालेली कथा गणेश शास्त्रीची होऊन मग त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची होऊन संपते. श्री ना पेंडसे यांनी सगळी वर्णनं इतकी तंतोतंत केलेली आहेत कि त्याला काही तुलनाच नाही. मग ते वर्णन गावाचं असो वा व्यक्तीच. अनेक उत्कंठा वाढवणाऱ्या घटना यात आहेत. आणि इतकं सहज आणि ओघवतं वर्णन आहे कि दृश्य डोळ्यासमोर उभी राहतील. मग तो खोतांचा वाडा असो कि शाळा असो किंवा जगबुडी नदी नि वैशाखीचा सण असो. खोत आडनावापासून तुंबाडकर आडनावापर्यंतचा प्रवास मनोरंजक आहे. अनेक अनपेक्षित गोष्टी धक्के देत येत राहतात. यात सगळ्या गोष्टी एकदम टोकाच्या वाटतात. माणसाच्या कितीतरी गुणांचं दर्शन यात आपल्याला होत. प्रचंड प्रेम ,प्रचंड द्वेष , प्रचंड निग्रह, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड भक्ती, प्रचंड साहस, प्रचंड प्रसिद्धी, तेव्हढीच बदनामी, राजकीय डावपेच, कौटुंबिक कलह, जिवाभावाची मैत्री, सद्गुण, दुर्गुण, इत्यादी इत्यादी. काय नाही यात. अशाच सगळ्या गुणांसाठी अनेक प्रकारची पात्रं. कथा जरी एकाच घराण्याची असली तरी त्याच्या अनुषंगाने कितीतरी इतर पात्र या कथेत येतात. एवढी सगळी पात्र रंगवायची, त्यांचा आपसात मेळ घालायचा, घटना रंगवून आणायच्या आणि तरीही मूळ कथेला धक्का न लावता ती एका बाजूला चालूच ठेवायची. इथेच श्री नांची ताकद दिसून येते. हे सर्व करायला तेवढाच समर्थ माणूस हवा. एवढी सगळी पात्र आणि कथा असून वाचक यात कुठेही गोंधळत नाही. प्रत्येकाचं दुसर्याशी असलेलं नातं अगदी व्यवस्थित समजून येत आणि गोष्टही समजते. या सगळ्यासाठी श्री ना पेंडसे याना माझा सलाम!

गेम ऑफ थ्रोन्स

हि माझी आवडती सिरीज सध्याच संपली आणि मला खूप वाईट वाटलं. पुढे काय? हा प्रश्न पडला. खरं तर अगदी सुरवातीपासून मी नव्हती बघितली हि सिरीज. माझ्या नवऱ्यामुळे श्रीनिवासमुळे मी बघायला सुरवात केली. आणि मग मात्र अगदी व्यसन लागलं म्हणायला हरकत नाही. श्रीनिवास म्हणजे GOT चा डाय हार्ड फॅन. इतका कि त्याने हातावर टॅटू सुद्धा काढून घेतलाय. त्यामुळे सुरवातीचे सगळे एपिसोड्स त्याच्याकडे सेव्ह केलेले होतेच. हळू हळू एक एक एपिसोड करत सगळे एपिसोड बघितले आणि नवीनची वाट बघत राहिले.

‘सोंग ऑफ आईस अँड फायर’ या पुस्तकावर आधारित हि वेब सिरीज होती. ८ सीझन्स मध्ये हि प्रदर्शित झाली. जगभरात या सिरीज ने बरंच नाव, प्रतिष्ठा मिळवली आहे. दर वर्षी साधारण १० भागांचा एक सिझन अशी हि मालिका प्रदर्शित होत होती. मात्र शेवटचा ८वा सिझन पूर्ण दोन वर्ष वाट बघितल्यानंतर प्रदर्शित झाला. जगभरात लाखो करोडो लोक अतिशय उत्सुकतेने याची वाट बघत होते.

थोडक्यात कथानक म्हणजे वेगवेगळी घराणी आणि सत्तेसाठीचा संघर्ष यात दाखवला आहे. वेगवेगळी घराणी, त्यांचे नातेसंबंध, सिंहासन आणि त्यासाठी खेळलं जाणार राजकारण. म्हटलं तर एकदम टिपिकल गोष्ट. पण ती टिपिकल न होता उत्कंठावर्धक कशी होते ते हि सिरीज बघितल्याशिवाय नाही कळणार. यात काम केलेले कलाकार जे पहिल्या भागापासून आहेत, अगदी 9 वर्षांनंतर देखील तेच आहेत. आणि जशी प्रत्यक्षात त्यांची वय वाढत गेली तशीच ती सिरीज मधेही वाढलं गेल्येत. आणि हे पाहताना फार मजेशीर वाटत. आज 9 वर्षानंतर अगदी पहिल्या भागातली पात्र बघणे म्हणजे जुना अल्बम उघडून त्यातले फोटो बघणंच आहे.9 वर्षांचा हा प्रवास खूपच सुंदर होता. प्रत्येक भूमिकेसाठी योग्य तोच नट अथवा नटी निवडणं हे दिग्दर्शकाचं काम अतिशय उत्कृष्ट झालाय. म्हणजे त्या कलाकाराशिवाय त्या जागी दुसरं कोणी आपण कल्पनाच करू शकणार नाही इतकं त्या कलाकारांनी जीव ओतून यात काम केलय. तसंच मालिका कोणत्या काळात घडते त्यानुसार सगळ्यांची वेशभूषा, सगळे सेट तयार करणं, लढाइ असल्याने त्यावेळेनुसार वापरात असणारी हत्यार, इत्यादी अगदी बारीक सारीक गोष्टी सुंदर आणि कलात्मक पद्धतीने केलेल्या आहेत. अगदी एका घराण्याची म्हणून एक भाषा सुद्धा नवीन तयार करण्यात आली इतकी या मालिकेवर मेहनत घेण्यात आलेय. या मालिकेचं वैशिट्य म्हणजे जसजशी मालिका पुढे पुढे सरकत गेली तसतसं तिच्या फॅन्सनी त्याबद्दल काही ठोकताळे मांडायला सुरवात केली .थिअरीजम्हणून या पुढे नावाजल्या गेल्या. नवीन भाग प्रदर्शित झाला कि त्यात असं का घडलं आणि पुढील भागात काय घडेल, त्याची कारणमीमांसा एवढं अगदी स्पष्ट करणं इथपर्यंत फॅन्स ची मजल गेली. दुर्दैवाने शेवटच्या सिझनला या मालिकेने मार खाल्लंन. अर्थात फॅन्सच्या अपेक्षा जास्त होत्या. ज्या तर्हेने मालीका उत्तरोत्तर रंगत गेली त्याप्रमाणात शेवट फॅन्सना आवडला नाही. तरीही मालिका संपल्याची चुटपुट मात्र लागून राहिलीच. अतिरेकी हिंसा हा एक या मालिकेचा टीकेचा विषय झाला होता. अत्यंत क्रूर पद्धतीची हिंसा यात दाखवली गेली आहे. बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो. सुरवातीला मला अजिबात आवडायचं नाही. पण हळूहळू सवय झाली. आणि नंतर नंतर तर अगदी उत्सुकतेनं मीही पुढील भागांची वाट पाहायला लागले. यात जस राजकारण, घराण्यांचा संघर्ष आहे तसंच काळी जादू, अमानवीय शक्ती, आग ओकणारे ड्रॅगन्स असेही प्रकार पाहावयास मिळतात. पण म्हणून मालिका कुठेही कंटाळवाणी न होता उलट अधिकच रंजक होत जाते.

दोन्ही गोष्टी एकदम आठवायचं कारण या दोन्हीतही मला काही साम्य आढळली.

तुंबाडचे खोत कादंबरी एकदा वाचायला घेतली कि अधाशासारखी वाचून मगच खाली ठेवली जाते. गोष्ट एवढी छान रंगवलेली आहे कि प्रत्यक्षात तिथे असल्याचा भास होतो. जणू एखादा चित्रपट नजरेसमोर चालू आहे. जशाच्या तश्या व्यक्तीरेखा, गावं, घडत असलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर येतात. GOT च पण तेच होत. एक भाग बघून समाधान होत नाही. पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहते. अगदी सुरवातीला जेव्हा GOT प्रदर्शित झाली तेव्हा मी नव्हती पहिली पण जेव्हा पहिली तेव्हा मात्र एका पुढे एक असे सलग सगळे भाग संपवून पुढच्या भागांची वाट बघायला लागले. आपण प्रत्यक्षात तिथे असल्याचा भास इथेही होतो. कादंबरी आणि मालिका हे दोन्ही पूर्ण वेगळे प्रांत असले तरीही हि जाणीव निदान मला तरी दोन्ही वेळा झाली. अगदी GOT मध्ये जेव्हा आर्या नाईट किंगला मारते तेव्हा आपण या घटनेचा साक्षीदार असल्याचा फील येतो.

अतिरेकी हिंसा हा GOTचा टीकेचा विषय आहे. GOT मध्ये म्हणजे अगदी एकेमकांचे गळे चिरण ते डोळे फोडणं प्रत्यक्षात घडावं असं चित्रण केलं आहे. येता जाता चाकू भोसकून मारणं म्हणजे तर अगदी शेम्बड़ पोर पण करेल इतकं सहज दाखवलाय. प्रत्येक भागात कुणाचा ना कुणाचा खून होणं हा जणू अलिखित करारच. तुंबाडचे खोत मध्ये एवढा अतिरेक नसला तरीही दादा खोतांनी म्हाताऱ्याचा बळी देणं, भागीचे केस भादरण किंवा जमावाने वखार जाळून त्यात भिकापाचा मृत्यू होणं या घटना देखील अंगावर शहारे आणतात.

दोन्ही मध्ये असलेला प्रणय. तुंबाडचे खोत मध्ये काही ठिकाणी प्रणयाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. टेम्भ्यात जाणे याचा अनेक ठिकाणी उल्लेख येतो. कितीतरी जणांची दुसऱ्या बायकांशी लफडी असलेली दाखवालयेत. आणि राजरोसपणे सगळे व्यवहार चालू असलेले वाटतात. GOT म्हणजे ब्लु फिल्म बघतोय कि काय वाटावे इतके न्यूड सिन त्यात आहेत. जसे एखादा खून झाल्याशिवाय एपिसोड संपत नाही तसाच एखाद प्रणयदृश्य झाल्याशिवाय एपिसोड झाला असं वाटत नाही इतकि प्रणयदृश्य यात आहेत.

आणखी एक समान मुद्दा मला जाणवला तो म्हणजे असंख्य पात्र. तुंबाडचे खोत मध्ये असंख्य पात्र येत राहतात. ३ ते ४ पिढ्यांची कथा असल्याने प्रत्येक पिढीप्रमाणे पात्रांमध्ये वाढ होते. कुठेही उगाच घुसडल्यासारखं एकही पात्र नाही. इतकी पात्र असून देखील प्रत्येकाचं दुसर्याशी असलेलं नातं स्पष्ट आहे. कधी कुठून अचानक उगवत नाही. नवीन पात्र कथेत आलं कि त्याची बॅकग्राऊंड कथेत चपखलपणे मांडलेली आहे. तीच गोष्ट GOT ची . यातदेखील असंख्य पात्र आहेत. कधी कधी एखाद पात्र अख्खा सिझनच्या सिझन कुठेही फिरकत नाही. तरीही पुढच्या वेळी हा कोण? कुठून आला? असा प्रश्न पडत नाही. त्या त्या प्रसंगी ते ते पात्र कथेत येत. इथेदेखील आपण कुठल्याही पात्राशी गोंधळात नाही. एकूण खूप पात्र असून देखील कुठच्याही गुंतागुंत न करता एकमेक्नाशी संबंध ठेवून कथा छान फुलवली आहे.

साहस हा विषय देखील असाच. GOT मध्ये पूर्ण राजकारण आणि सिंहासनाचा खेळ असल्याने सगळेच शूरवीर, तलवारबाज, साहसी दाखवले आहे. ठराविक मोठ्या लढाया आणि शिवाय बारीक सारीक छोट्या लढाया. पण त्यामुळे सगळेच साहसी वीर. तुंबाडचे खोत मध्ये बजापा साहसी दाखवलाय. जो अगदी डुक्कर हुंगून गेलं तरी घाबरत नाही कि बिबट्याशी दोन हात करायला देखील घाबरत नाही. तसाच विश्राम. जो पोलिसांचा मार खातो पण वाकत नाही. स्वातंत्र्यासाठी सहजपणे आपलं आयुष्य दान करून टाकतो.

तुंबाड हि कुणा एका हिरो भोवती फिरणारी कथा नाही. ती एका घराण्याच्या चढ उताराची कथा आहे. कुणा एकाच पात्राला यात महत्व नाही. तरीही अगदी विचारच करायचा तर नरसू या पात्राचा यात जास्त सहभाग आहे. एकूण कथेत नरसू बरेच ठिकाणी येतो. खरं तर त्यांच्या पिढीची कथा सुरु झाल्यावर नरसू शिवाय पान हालत नाही. घराण्याची असलेली हि कथा मधेच अचानक नरसूची होऊन जाते. GOT पण तसच आहे. कुणा एकाची हि कथा नाही. तरीही शेवट शेवट हि जॉन स्नो ची कथा होत जाते. पण सुरवातीला मात्र कुठेही याचा मागमूस येत नाही. प्रत्येक पात्र त्याची कथा, त्याचा प्रवास, त्याची जडघडण यात अतिशय सुंदर रित्या दाखवली आहे.

असो सध्या एवढे बास. मला वाटलं त्याप्रमाणे मी लिहिलं. हे परीक्षण नव्हे. श्री ना पेंडसे किंवा जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या पुस्तकांच परीक्षण करण्याएवढी मी मोठी नक्कीच नाही. तेव्हा जे जस वाटलं ते लिहिलं.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

हस्तर's picture

18 Jul 2019 - 2:22 pm | हस्तर

तसे बघितला तर गँग्स ऑफ वास्सेपूर पण होईल

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 4:06 pm | जॉनविक्क

इरामयी's picture

18 Jul 2019 - 8:25 pm | इरामयी

खरं आहे. +१

GoW चे भाग अंगावर काटा आणतात.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

18 Jul 2019 - 2:27 pm | प्रलयनाथ गेंडास...

एक वेगळा लेख !..
१+

जालिम लोशन's picture

18 Jul 2019 - 3:36 pm | जालिम लोशन

चांगले रसग्रहण.

पाटीलबाबा's picture

18 Jul 2019 - 4:52 pm | पाटीलबाबा

छान लेख, पण" तुंबाड..."ची सर" GOT "ला नाही.
तुंबाड मधे जी वास्तविकता आहे त्याला तोड नाही.
आग ओकणारे ड्रँगन,जादूटोणा, भोसकाभोसकी असला "भंपकपणा" तुंबाड मध्ये नाही.

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 4:54 pm | जॉनविक्क

फक्त बलात्कारच काय ते GOT सोबत कंपेर होतील

उगा काहितरीच's picture

18 Jul 2019 - 6:22 pm | उगा काहितरीच

GOT लै भारी आहे होतं राव ! मी पहिले ७सिजन कमीत कमी ५-७ वेळेस बघितले आहेत. फक्त शेवटचे सहा भाग बघता यावेत म्हणून ९९९ रुपयाचे Hotstar subscription घेतले. सोमवारी सकाळी ६ ला उठून बघितले सगळे भाग. फॕन शब्द कमी पडेल असा भक्त होतो मी GOT चा वॉलपासून डॉर्नपर्यंत पूर्ण नकाशा बिनचूक सांगू शकेल मी.

पण...

शेवटच्या सीजन मधे जी घाण केलीए ना *%*#--% ---#%%
ती खूपच बेक्कार आहे राव ! आठवा सीजन परत शूट करा राव :'( :'( :'(

रच्याकने तूंबाड चित्रपट याच कादंबरीवरून घेतलेला आहे का ?

Ujjwal's picture

18 Jul 2019 - 9:46 pm | Ujjwal

+1111111

तिथे सरसे सारखी क्रूरकर्मा आणि रिडमशन भोगलेला जिमी एकमेकांच्या मिठीत चटकन मरतात हि कट्टर GOT फॅन्स ची केलेली क्रूर चेष्टा होती.

खलिसीच्या character सोबत पहिला सिजन सोडला तर कनेक्टच होणं अवघड बनवलं होतं इतकं ती कृत्रिम बनत गेली, पण जॉन स्नो सोबत तिला जोडून अफलातून ट्विस्ट तयार झाला होता.

म्हणजे भावासोबत झोपणारी सरसे योग्य कि आत्यासोबत संबंध ठेवणारा जॉन स्नो यात नायकाचे आदर्शीकरण अपेक्षित असणारी जनता प्रचंड भरडली होती. ते संबंध घडावेत असं जनमत होतं आणि ते चूक म्हणणारेही हि तेव्हढेच होते. मजा आली होती तेंव्हा गप्पा मारताना.

माझ्यापुरतं खलनायक कोण हे ठरवणं सोपं जात होतं कारण व्यक्तिगत आयुष्यात कोण काय झक मारतं याकडे कुणालाच देणं घेणं नसतं, यापेक्षा लोकांसाठी कोण काय भूमिका घेतात यावर ते नायक कि खलनायक ठरत असते. एक सरसे होती जिन्हे मुलाची गादि सुरक्षित रहावी म्हणून राज्यातले प्रत्येक बास्टर्ड मुलं मरवले, आणि एक जॉन स्नो होता ज्याने काहीही संबंध नसलेल्या भिंतीपल्याडच्यांसाठी जीवही गमावला... व प्रसंगी प्रेमिकेचाही खून केला इथेच नायक खलनायक कोण हे ठळक होतं.

आणि इतकं व्यवस्थित गुंतागुंत आणि व्यक्ती चित्रण राखणारी मालिका डकवर्थ लुईस नियमाने सामना संपवा अशी संपवली यापेक्षा मोठी प्रेक्षकांची प्रतारणा नाहीच

उगा काहितरीच's picture

19 Jul 2019 - 8:07 am | उगा काहितरीच

सहमत !

माझा असा plan (हा शब्द टाइप नाही होत आहे.) होता की, सगळे सिजन रिलीज झाल्यावर परत सुरूवातीपासून सगळे भाग बघायचे. पण शेवटच्या सिजनमधे जो गोंधळ घातला आहे ना, त्यामुळे अजिबात इच्छा होत नाहीये.

चांदणे संदीप's picture

19 Jul 2019 - 1:02 pm | चांदणे संदीप

शेवटच्या सिजनमध्ये ठीकच चाललं होतं सगळं. फक्त शेवटच्या एपिसोडने अपेक्षाभंग केला. Long Night ची लढाई मला वैयक्तिक प्रचंड आवडली. अजून एक दोन एपिसोड वाढवले असते तर कदाचित सर्व काही यथासांग पार पडले असते.

शेवटी आर आर आबा मार्टिन म्हणाले तसे... "Art is not democracy. People don't get to vote how its end."

Sandy

महासंग्राम's picture

22 Jul 2019 - 12:00 pm | महासंग्राम

रच्याकने तूंबाड चित्रपट याच कादंबरीवरून घेतलेला आहे का ?

तुंबाड नारायण धारपांच्या आज्जी आणि बळी या कथांवर आधारित आहे.

इरामयी's picture

18 Jul 2019 - 8:22 pm | इरामयी

खूप छान रसग्रहण.

Person of interest (serial), Matrix 1, 2, 3, The Lord of the Rings अश्या बऱ्याच कलाकृती पाहताना असाच काहीसा अनुभव आला.

धर्मराजमुटके's picture

18 Jul 2019 - 8:36 pm | धर्मराजमुटके

तुंबाडचे खोत - १००% टक्के सहमती ! माझ्या संग्रही आहे हे पुस्तक .
गेम ऑफ थ्रोन्स - कधी वाट्याला गेलो नाही बॉ.

सभ्य माणुस's picture

19 Jul 2019 - 11:24 am | सभ्य माणुस

तुंबाडचे खोत चे किती खन्ड आहेत आणि प्रत्येक खन्डात किती पार्ट्स आहेत ते जरा सान्गाल का? मी online order करायचा प्रयत्न केला, पण खन्ड आणि पार्ट्स मधे confuse झालोय.

प्रचेतस's picture

19 Jul 2019 - 12:05 pm | प्रचेतस

दोन खंड आहेत.
तुंबाडचे खोत भाग १ आणि भाग २.

अभ्या..'s picture

19 Jul 2019 - 12:35 pm | अभ्या..

तुंबाड कुठे....
जीओटी कुठे.....
कैच्या कै...
त्या पेंडश्यांनी नुसत्या शब्दातून चारपाच पिढ्या त्या जगबुडीसह उभ्या केल्या हो...
इथं विज्युअल, ऑडिओ, व्हीएफेक्स सगळं साथीला असताना दरिद्रता..एक पार्ट बघितला. काहीच लागत नाही हो अंगी.

जॉनविक्क's picture

19 Jul 2019 - 2:36 pm | जॉनविक्क

साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यम याची तुलनाच मुळात चुकीची आहे. सोंग आफ फायर अन आईस कदाचित योग्य ठरेल तुलना करायला.

चांदणे संदीप's picture

19 Jul 2019 - 1:05 pm | चांदणे संदीप

GOT बघताना मित्रांशी चर्चा व्हायची त्यात तुंबाड हीच एकमेव कशी GOT सारखी भव्य दिव्य स्वरूपात छोट्या पडद्यावर साकारता येईल यावर चर्चा व्हायची. तुंबाड मध्ये ते पोटेन्शिअल आहे.

गेले ते दिवस!

Sandy

खरं तर तुंबड सिनेमा पाहून मी तुंबाडचे खोतचे दोन्ही खंड विकत घेतले . पहिला खंड वाचून संपवला, दुसरा खंड सवडीने वाचणार आहे.
खूप साऱ्या नवीन (म्हणजे जुन्या रूढी ,परंपरा ) गोष्टी समजल्या. सिनेमा आणि पुस्तकाचा फक्त नाव सोडला तर काहीच संबंध नाहीये , बाकी मला दोन्ही आवडले . पुस्तक खूपच मोठे व विस्तृत असल्याने थोडे कंटाळवाणे वाटू शकेल .

फारएन्ड's picture

19 Jul 2019 - 8:35 pm | फारएन्ड

मीही तुंबाडचे खोत किमान दोन तीन वेळा पूर्ण वाचली आहे. कायमच खिळवून ठेवते.

गॉटही दोन वेळा सलग पाहिली आहे. तुंबाडमधे अशा मोठ्या सिरीजचे नक्कीच पोटेन्शियल आहे. आणि इतकी स्पेशल इफेक्ट्सची गरज नसल्याने इतकी खर्चिकही होणार नाही.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2019 - 10:43 pm | मुक्त विहारि

तुंबाड , बहुतेक वाचलंय.

GOT, अजून तरी बघीतले नाही. हिंदी मध्ये असेल तर कदाचित बघीन...इंग्रजी संभाषण समजत नाही, ही माझी अडचण आहे....

अभ्या..'s picture

19 Jul 2019 - 11:23 pm | अभ्या..

हायला मुवि, मेरेकू भी नई समजते अंगरेजी डोयलॉगा.
क्या नॉटओन्लीबटाल्सो बोलतंय की क्या की.

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 2:00 am | जॉनविक्क

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 9:16 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ...

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 9:41 pm | जॉनविक्क

रेडफ्लीक्सवरही मोफत उपलब्ध आहे पण ते वापरणे अनधिकृत असेल तर मात्र ते स्वप्नातही डाउनलोड करू नका अशी हात जोडून विन्नती आहे.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 9:45 pm | मुक्त विहारि

ही मालिका हाॅट स्टार वर आहे.

आणि त्याचे पैसे भरलेले आहेत.

तर बघू शकतो का?

हा खरेतर मी फक्त महिला मंडळींना रेकमेंड करतो, पण दर्जेदार अभिनय कशाला म्हणावा हे जाणून घ्यायचे असेल तर काजोलने एका मराठी मुलीची केलेली अफलातून भूमिका म्हणून हा चित्रपट मस्ट वॉचच.

काजोलच्या पुन्हा एकदा प्रेमात पडलो.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 9:13 pm | मुक्त विहारि

बहूतेक शब्द कळत नाहीत.

सब टायटल असेल तर समजते पण बरेचदा त्यांच्या म्हणी आणि वाक्प्रचार समजत नाहीत.

आपल्या बुद्धीची क्षमता ओळखून, उगाच वेळ घालवण्यात काय अर्थ?

इतरांना समजते म्हणून इंग्रजीचा द्वेष करायचा नाही आणि येत नाही, म्हणून न्यूनगंड पण बाळगायचा नाही....

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2019 - 4:48 pm | मराठी कथालेखक

इतरांना समजते म्हणून इंग्रजीचा द्वेष करायचा नाही आणि येत नाही, म्हणून न्यूनगंड पण बाळगायचा नाही...

हे आवडलं.. आणि जगात अनेक हिंदी-इंग्लिश दुभाषी असताना हे आपल्याला समजलेच पाहिजे असा अट्टहासही नाही.. त्या भाषांतरकार , डबिंगवाल्यांचा धंदा चालतोय की आपल्या सारख्यांमुळेच तर चालूदेत की.

उपेक्षित's picture

21 Jul 2019 - 7:12 pm | उपेक्षित

जल्ला मेला तुंबाड आपली आवडती कादंबरी आहे किती पारायणे केली असतील दोन्ही खंडांची माहित नाही.
तुंबाड चा आवाका पाहिला तर घेरी यायची बाकी राहील इतका मोठ्ठा आहे.

पण बाकी तुंबाडचे खोत/ रात्र काळी घागर काळी/ कोंडुरा असली अस्सल कोकणी वातावरणाची पुस्तकांची बातच वेगळी.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 12:30 am | मुक्त विहारि

प्रत्येक कोकणी माणूस म्हणजे एक कादंबरी आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे, महाकाव्य आहे....

आमच्या कुटरे नामक खेडेगावात 3-4 महाकाव्ये आहेत....कुणी 400-450 वर्षे सोबत घेतात तर कुणी चंद्रावर...कुणी महानगरात तर कुणी तुरुंगात.... लिहायचा कंटाळा आला आहे...लेखनिक मिळाला तर नक्कीच लिहीन....

आजूबाजूला इतके नमुने आहेत की घराबाहेर न पडता, कुणाच्या घरी आज काय झालं, हे सहज समजतं. एक पेग भरला की तोंड मोकळे होत असेलही...पण एक कप चहा पण तेच काम करतो....

कधी फूरसत काढून या. घर आपलेच आहे.

उपेक्षित's picture

23 Jul 2019 - 1:09 pm | उपेक्षित

काका मी पुण्यात राहतो, पण बायडी कोकणातली (चिपळूण ची) त्यामुळे कोकण लयी फिरलोय.
एकदा तर काय सनक आली मला आणि मित्राला काढली साधी १०० CC बाईक आणि ८ दिवस पुण्यापासून कोकण पालथा घालत घालत गोव्यास्नी पोचलो होतो
पणजीतून निघताना खिशात कवडी नव्हती राहिली पण लयी धमाल केली मंदिरात झोपायचो मिळेल तिथे, असो लयी अवांतर झाल पण साला कोकणा हा आशय काढला कि आपण असच वाहवत जातो.

जाता जाता आमच्या धाग्याची जाहिरात करून जातु http://www.misalpav.com/node/40958 ;)

मालविका's picture

20 Aug 2019 - 11:03 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !