बस्तर

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
23 Apr 2018 - 2:07 pm

झगड्यानं एक दगड उचलला आणि मागून पळत येत भिरकावून दिला. दगड डोक्यात बसला. पण डायवर हूं की चू न करता तसाच मातीत डोकं रूतवून पडला. दुपारची काहिली झळाळत होती. पाण्यावाचून तहानलेल्या बाभळीच्या वनात तो आडमुठा ट्रक उभा होता. कमरेवर हात ठेऊन दाद्या म्हणाला,
"मेला की काय आयघालीचा?"
"ह्या... आसा कसा मरंल.. उठंय ये शिकड्या.." बुटाडान त्याचंं थोबाड ढकलत झगड्या खाली बसला. तसा रक्ताचा एक ओघळंच त्या डायवरची पगडी भिजवत खाली निथळला.

भर दुपारी आग ओकत दोघे चालू लागले. एका डबक्यात बुटाला लागलेलं रक्त झगड्यानं पुसून घेतलं. खंडोबाच्या माळावर आल्यावर दोघं जरा सावलीत विसावले.
"शम्न्या तू दगूड कशाला मारला?" बऱ्याच वेळ डोकं थंड ठेऊन अखेर दाद्या भडकला.
"आता हायका.. हाणला लागला.. झालं ती झालं.." बारक्या काटकीनं दात कोरत झगड्या उडत बोलला.
"झालं ती झालं मजी?" त्याच्या डोक्यावर एक झमाटा मारून दाद्या चवताळत उठला.
"ह्ये बग दाद्या, मारायचं नाय. सांगतूय... हा"

"नायतर काय? मादरच्योद"

पुन्हा दोघे चालू लागले. येड्या बाभळींची फोफावलेली मातीपायवाट. दूर कुठेतरी नांगरट चालू आहे. मात्र त्यात त्यांना रस नाही. एक शाळकरी पण थोराड वाटावी अशी एक पोर.
"कुणाची रं ही?" कपाळावरचा घाम पुसत दाद्या म्हणाला.
"ही पारध्याची. नाक्यावर घरं न्हायती का ह्यंची"
"आसं आसं.." दाद्या बोलत मध्येच थांबला. "तू पुढनं जा वळसा घालून. मी आत या बाभळीत घुसतो.."

काहीच न बोलता झगड्या झपाझप पुढे जाऊ लागला. कशाचा तरी सुगावा लागून ती शाळकरी पोर झपाझप मातीरस्त्यावर जाऊ लागली.
"ये... ईकडे तू. ईकडे.." मग मात्र ती जिवाच्या आकांतानं धावू लागली.

"आयनिजवीची.." झगड्या तिच्यामागे धावू लागला.
गगनभेदी आक्रोश फोडत ती पोर जेव्हा वेगवाग धावू लागली तेव्हा कुठे झगड्याचा वेग मंदावला. मग तो पिरापशी जाऊन बसला. फुललेल्या श्वासाने त्याची छाती भरून गेली होती.

बऱ्याच वेळाने दाद्या मागून चालत आला. पिरापशी जाऊन त्याने झगड्याच्या डोक्यावर एक जोरदार झम्माटा दिला.
"हिजड्या साल्या, तुला पळाय कुणी सांगितलं हुतं?"

महादेवाच्या मंदिरात दोघे झोपले. संध्याकाळ होत आली तसा त्यांनी आळस झटकला. दारू प्यायला झगड्या निघून गेला आणि झगड्याचा बाप मंदिरात शिरला.
"आरं ती पारध्याची माणसं आलती घरला. कुटं आय घातली तुमी दोघांनी? तो डुक्कूर कुटं गेला?" म्हातारा धोरत सांभाळत तावातावात बोलला.
"आरं तुझं डुक्कार तू बग, माझं पाश्शे कधी दितूय आधी सांग?" अर्धवट झोपेतला दाद्या मूठ आवळत बोलला.
"द्याय येत्याल की आयनिजवीच्या, पळून चाल्लू काय? गावात काय तमाशा लावलाय?"
"मला आत्ताच पाजीतं बोल.." दाद्यानं त्याला ढकलून दिला. "..च्यायची गांड.."

तसा म्हाताऱ्यानं मातीतला दगड हातात घेतला.
"आजचं गावात आलाव आन काय तमाशा लावलाय. आला आसं माघारी फिरायचं"

दाद्या शांतपणे समोरच्या घरापाशी गेला. भिताडाकडं ठेवलेला कोयत्या त्यानं हातात घेतला. गच्च आवळून पुन्हा म्हाताऱ्याकडं चालत आला. म्हाताऱ्याला कापरं भरलं.
"पाश्शे.."
"न्हाय आता खरंच न्हायतं.."
आडव्या हातानं कोयत्याचा जोरदार वार म्हाताऱ्याच्या गळ्यावर झाला. मातीत म्हातारं पडलं ते उठलंच नाही.

दाद्या मग चालत राहिला. रात्री खंडोबाच्या माळावर जाऊन झोपला.

दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला झगड्या येताना दिसला. खंडोबाचा माळ रखरखत होता.
झगड्या येऊन सावलीत बसला. बोलला मात्र काहीच नाही. जरा वेळ बसून दाद्या उठून चालायला लागला. मागून झगड्याही उठला. आणि चालू लागला.
हायवेला आल्यावर दोघांनी टपरीवर भजीपाव खाल्ला.

कुठूनतरी हेलकावे खात आलेला एक ट्रक वळणावर थांबला.
"हायद्राबाद.. हायद्राबाद जानेका..." दाद्या हात दाखवत म्हणाला.
"नै नै.." म्हणत डायवरने ट्रक तसाच पुढे दामटला.
घाम पुसत दाद्याने झगड्याकडे बघितले.अन चवताळत त्याच्या डोक्यावर एक झम्माटा ठेवून दिला.
"चाकू आधीच कशाला भाईर काढला? आयफळवीच्या.."

body {
background: url(https://s18.postimg.cc/f1z01akax/image.jpg);

background-size: 1000px;
}

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

बस्तर या शीर्षकावरून वेगळी अपेक्षा निर्माण झाली होती. पण आत जरा वेगळाच मुद्देमाल निघाला.

जव्हेरस्टाईल कथा! मस्त.

कंजूस's picture

23 Apr 2018 - 4:10 pm | कंजूस

बस्तर म्हणजे? मुद्देमाल कोणत्या भागाकडचा?

अंगावर लपवण्याजोग्या पात्याला (चाकूच्या, गुप्तीच्या, तलवारीच्या) बस्तर म्हणतेत आमच्याकडे.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 4:54 pm | जेम्स वांड

वस्तऱ्याचं स्थानिक उच्चारण असावं!

वकील साहेब's picture

23 Apr 2018 - 5:14 pm | वकील साहेब

काय उलगडा नाय झाला बॉ

आदूबाळ's picture

23 Apr 2018 - 6:47 pm | आदूबाळ

जबरदस्त कथा, जव्हेरभाऊ.

लिखाण आवडलं आणि गाभाही . मस्त .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सुचिता१'s picture

25 Apr 2018 - 12:59 pm | सुचिता१

नाही समजली , खीळवुन ठेवते , पण गाभा समजला नाही.

शिवोऽहम्'s picture

4 May 2018 - 2:10 am | शिवोऽहम्

मस्त! नवाजुद्दीन आणि इरफान खानच्या 'बायपास' ची आठवण झाली हे वाचून.

समाधान राऊत's picture

6 May 2018 - 3:24 pm | समाधान राऊत

आवडली जव्हेर इस्टाईल

ज्योति अळवणी's picture

7 Jul 2018 - 9:39 pm | ज्योति अळवणी

आवडली. एकदम तुमची style