Mp4 trek

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
4 Mar 2018 - 7:15 pm

MP4 TREK
माणिकपुंज - पिनाकेश्वर महादेव - पेडका - पाटणादेवी - पितळखोरे लेणी

१. हनुमान मंदिरामागील पुष्करणी, माणिकपुंज

पाटणादेवी-पितळखोरा ट्रेक करायचे ब-याच दिवसांपासून घाटत होते. २४ जानेवारीला ठाण्यातून निघेपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले. पुढे पावणेतीनशे किमीचा प्रवास होता. सियाझमध्ये पाच जण आणि डिकी सामान आणि पाण्यानी ठासून भरलेली होती. बुधवारचा दिवस असल्यामुळे सुदैवानी रस्त्यावरची वाहने गतीशील होती. त्यामुळे कुठेही खोळंबा झाला नाही. मी, अनंत, डाॕक्टर तिघे एकत्र ट्रेक करतोच पण सुखदा आणि तिचे पती निमकर हे आमच्याबरोबर ट्रेकला प्रथमच आले होते. सुखदाची आणि माझी समितीमुळे फार जुनी ओळख; पण कार्यक्रमाशिवाय अशी भेट विरळाच. मग जुन्या आठवणी निघाल्या. सुखदानी आरे फॕक्टरीमधली नोकरी सोडून स्वतःचे पोळी भाजी केंद्र सुरु केलेय, हे ऐकून कौतुक वाटले. तिचे पती निमकर नेव्हल डॉकमध्ये आहेत. त्यांच्या ओळखपत्रामुळे आमच्या प्रवासातल्या टोळधाडी टळल्या. 
         सुखदा नुकतीच मुंबई ते शेगाव पदयात्रा करुन आली होती. तिला जागोजागी ओळखीची स्थळे दिसत होती. त्यांचा पडाव कुठे-कुठे पडला होता, चहा, जेवण कुठे घेतले होते, कोणी-कोणी त्यांचे यथोचित स्वागत केले इ. सारे सांगत होती. मागच्या वर्षी २५-२६ ला साल्हेर-मुल्हेर ट्रेक केला होता; हाच रस्ता हीच गाडी; सोबती मात्र सगळे नव्हते. बाबा दा ढाब्यावर दिलखुश चहा झाला. सकाळसाठी थर्मासमध्ये चहा घेऊन झटपट पुढे निघालो. सोग्रास फाटा मागे सोडला आणि चांदवडला नांदगावकडे चाके वळवली. माझे माहेरचे गाव नांदगाव. बालपणीच्या अनेक स्मृती मनात तरळू लागल्या. मे महिन्याच्या सुट्टीत सगळ्या भावंडांनी नांदगावला केलेली दंगामस्ती मज्जा आठवली आणि आजीचा सुरकुतलेला मऊशार हातही प्रेमळ स्पर्श करुन गेला. नांदगावचे रेल्वे फाटक आले. फाटक बंद होते. आमचे उत्साही सोबती आपण स्वतः ते फाटक उघडावे या विचारानी गाडीतून उतरले आणि गार्डकडून दोन्ही बाजूनी गाड्या गेल्या की फाटक उघडेल अशी माहिती घेऊन आले. दोन्ही रुळांवरुन दोन दिशांना गाड्या धडधडत गेल्या. पहाटेचे तीन वाजले होते. चोहीकडे काळोखाचे साम्राज्य होते. रेल्वे फाटक पार करुन नांदगाव मागे सोडून माणिकपुंज किल्ल्याकडे गाडी धावू लागली. या प्रदेशी आम्ही सारेच नवखे होतो. गवताचे भारे रचून ठेवलेले, बैठी घरे, मातीचे रस्ते, झाडांनी रस्त्यावर धरलेल्या कमानी सारे अद्भुतरम्य भासत होते. माणिकपुंजच्या पायथ्याचे देऊळ आले. आवाराचे फाटक बंद दिसत होते. उतरुन ते ढकलून बघितले तर दार उघडले. देवळामध्ये थोडा वेळ आराम करावा असा विचार करुन आम्ही तिथे विसावलो. पहाटेचे चार वाजले होते. थोड्याच वेळात सभामंडपात ३-४ उत्साही भक्त मंडळी जमली आणि त्यांनी भक्तीगीते आणि भजने गाऊन देवाला झोपेतून उठवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पोटतिडिकीनी सुरु केला. साथीला तालवाद्ये आणि संवादिनीही होती मात्र  या मंडळींना सूर काही सापडत नव्हता. काकड भक्तीच्या आविष्कारानी मन अगदी गहिवरुन गेले.
             पहाटेच्या वेळी अजून फटफटले नव्हते, हवा थंड होती. देवळाच्या आवारात झाड-झाडोरा, रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि वृक्ष-वल्ली असा माणिकपुंज परिसर निसर्गरम्य दिसत होता.

२. धुक्याच्या दाट पटलातून माणिकपुंज गाव

नांदगावाच्या दक्षिणेला साडेतीन किमी वर वसलेले माणिकपुंज ऐतिहासिक महत्त्वाचे परंतु आता दुर्लक्षित झालेले एक ठिकाण; कॕप्टन ब्रिग्ज यांनी १८१८ मध्ये  माणिकपुंज किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी येथे पडझड झालेले दोन दरवाजे आणि खिंडारे पडलेली तटबंदी बघितल्याची नोंद केली आहे. तसेच येथे पाणीपुरवठा मुबलक असल्याचा उल्लेख आहे. थर्मासमधला गरम चहा पिऊन ताजेतवाने झालो. मारुती मंदिराच्या मागच्या बाजूचे पुरातन देवालय व पुष्करणी बघितली.

३. बोधीवृक्षाखाली बुद्ध

वटवृक्षाच्या पारावर एक बुद्धमूर्ती व इतरही काही अवशेष मांडून ठेवलेले होते. किल्ल्याची उंची अगदी बेताची दिसत होती. किल्ल्याकडे जाणारा रस्ता कच्चा होता. पंधरा मिनिटात पहिला टप्पा गाठून मातेच्या मंदिरापाशी पोहोचलो. मातेची मूर्ती साधीशीच, मूर्तीवरील भाव ममतामयी, वात्सल्ययुक्त. चतुर्भुजा, दगडात कोरलेली, साडी नेसलेली; रोज पूजा होत असावी. मातेचा मळवट भरलेला होता, झेंडूचा तिहेरी हार गळ्यात घातलेला, प्रसन्न ध्यान होते. बाजू-बाजूला मोठ्या पाषाणात कोरलेली दोन गुफा मंदिरे होती.


४. मातेची वत्सल मूर्ती

५. गुफा मंदिरांसमोर

वाटेत पीरबाबाचे थडगे दिसले. पुढे कातळात खोदलेल्या सुबक पायऱ्या दिसल्या. त्या एका सुकलेल्या पाण्याच्या टाक्याकडे घेऊन गेल्या. थोडे चालून पुढे गेल्यावर मानवनिर्मित खिंड लागली. इथे आम्ही सोपी पायवाट सोडून (अर्थात चुकून) घसरडी वाट धरली. या खिंडीची निर्मिती गडाच्या संरक्षणासाठी केलेली असावी. खिंडीतून चौफेर विहंगम दृश्य दिसत होते.

६. खिंडीतून दिसणारे विहंगम दृश्य

नंतर पुढच्या टप्प्यावर  पोहोचायला १०-१५ मिनिटे लागली. इथे थंडगार पाण्याचे टाके झाडो-यात दडलेले दिसले. या परिसराची खूण म्हणजे इथे विशिष्ट आकाराची दोन वडाची झाडे आहेत. झाडांचे नैसर्गिकरित्या तयार झालेले असे आकार प्रथमच बघितले.

७,८. झाडांचे विशिष्ट आकार

इथेही मोकळ्या नभाखाली मूर्ती स्थापून पूजा मांडली होती. या टप्प्यावरुनही सभोवतालच्या
परिसराचे निसर्गरम्य दृश्य बघायला मिळाले. उतरताना पीरबाबाचा दुसरा दर्गाही दिसला. आता सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे पुढे निघण्याची घाई केली. 
          देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण. या राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी निर्माण केलेल्या किल्ल्यांच्या साखळीतील एक 'पेडका'; विस्मरणात गेलेला किल्ला. या पेडक्याकडे आता आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत एक छोटे उपहारगृह दिसले. गरमागरम मिरची भजी, बटाटेवडे, मिसळपाव, चहा इ. फराळ मिळाला. जातेगावला पिनाकेश्वराचे मंदिर आहे तिथे जरा वाट वाकडी केली. पिनाकेश्वर महादेवाच्या टेकडीवरचा रस्ता शेवटी-शेवटी फारच खराब होता. मग गाडीला आराम देऊन पायगाडी सुरु केली. अर्ध्या तासात देवळापाशी पोहोचलो. या परिसरातील हीच सर्वात उंच टेकडी आहे. नंदी आणि शिवलिंग  असलेले डोक्यावर छप्पर असलेले पण  भिंती नसलेले आणि मारुतीचे तीन बाजूंनी दगडी भिंती असून डोक्यावर छप्पर नसलेले अशी छोटेखानी जुनी मंदिरे आणि पाण्याचे आयताकृती टाके इतिहासाशी घट्ट नाते सांगत होती. परंतु जीर्णोद्धारीत मंदिर मात्र रंगीत व चकाकक आहे.

९. पिनाकेश्वर महादेव

'शिर हे आणिले पदी नमविण्या, नयन पहाण्या रूप तुझे....
नैवेद्याची सोय तूच आता जाण आत्मसमर्पण घेई माझे'
हा पूजनाचा भाव मनी स्मरत देवदर्शन घेतले. सभोवतालचा रम्य परिसर डोळ्यात साठवून देवाला पुनश्च नमन केले.

१०. तुझ्या पूजेसाठी...

खाली उतरताना बरेच वीर या खराब रस्त्यावर बाइक घेऊन आलेले दिसले. एका बाइकवर तर तिघे आले होते. आणि नेमकी बाइक पंक्चर झाली. मनात म्हटलं, बरं झालं आपण गाडी वरपर्यंत चढविण्याचा अट्टहास केला नाही. गाडीत बसल्यावर नंतरचा वेळ वाचावा म्हणून पेडका किल्ल्याची माहिती वाचण्यासाठी डॉक्टरांच्या हातात दिली तर त्यांच्या लक्षात आले की डोळ्यावर चष्मा नाही, तो तर देवाच्या चरणीच आपण ठेवून आलोय. मग डॉक्टर चष्म्याच्या ओढीनी पुन्हा एकदा टेकडी चढून देव-दर्शन घेऊन आले. तोपर्यंत आम्ही फलाहार घेऊन पेडका, राजदेहेर (ढेरीचा किल्ला), पाटणादेवी, कान्हेर इ. सारा अभ्यास करुन घेतला आणि अतिअभ्यासाचा परिणाम डुलक्या येण्यात झाला. अशा
त-हेनी महादेवाच्या कृपेनी आम्हाला भरपूर विश्रांतीचा अनपेक्षित लाभ झाला.
             पेडका किल्ल्याचा रस्ता छोट्या-छोट्या खेड्यापाड्यातून जात होता. गवताचे रचून ठेवलेले भारे, दुतर्फा शेती, बैठी घरे, चरणारी गुरे, झाडांनी रस्त्यांवर धरलेल्या कमानी अशा परिसरातून जात होता. पेडकेवाडीला गाडी लावून काकांना किल्ल्यावर जाण्याचा रस्ता विचारला.वस्तीतली दोन-चार मुलंही रस्ता दाखवायला उत्साहानी बरोबर आली. पंधरा-वीस मिनिटांत वर पोहोचलो. किल्ल्याची माहिती वाचली आणि किल्ल्यावरील बांधकामाचा, अवशेषांचा माग काढू लागलो. पण इथे ओळखीची एकही खूण दिसेना. हरीणांची जोडी मात्र दिसली. मग शंका यायला लागली खरोखर हाच पेडका आहे ना? मग खाली उतरण्याचा ठराव झाला. उतरताना कळले की हा पेडका नसून पेडकेवाडीचा डोंगर आहे. पेडक्याची वाट तर धरणाच्या बांधावरून जाते. पेडकेवाडीला उजवीकडे वळूनही एका पाड्यातून किल्ल्याकडे वाट होती. पेडक्याच्या पलीकडच्या कळंकी गावामधूनही किल्ल्यावर जायला वाट आहे, पण ते फारच दूर आहे. संध्याकाळचे पाच वाजले होते. मग हेडलाइट, थोडा खाऊ, पाण्याची बाटली असे काही सामान घेऊन किल्ल्यावर जायला निघालो.

११. संध्याकाळी पाच वाजता दूर दिसणारा पेडका...

अनंत ड्रायव्हर, मधले डबेही त्यांच्या मागे झपाझप आणि सुखदा आणि निमकरांचा गार्डचा डबा मात्र बरेच अंतर राखून अशी गाडी निघाली. त्या दोघांना पटापट पावले उचलायला सांगून आम्ही जात राहिलो. थोड्याच वेळात त्यांनी पांढरे निशाण दाखवले - 'आम्ही खालीच थांबतो.' मग गाडी सुसाट सुटली. वाटेतल्या खाणाखुणा लक्षात ठेवत वाट कापत होतो, कारण परतताना अंधार होणार होता. वेळ फार कमी होता. माहितीप्रमाणे वर पोहोचणे अवघड होते. पण तरीही किल्ला न बघता परत जाणे  जिवावर आले होते. मळलेली पायवाट न शोधता फक्त माथ्याच्या दिशेनी आगेकूच करत राहिलो आणि माघार न घेता किल्ल्याचा माथा गाठला, तो क्षण सुखद होता. सभोवार पाहून घेतले, गडफेरी पुढच्या वेळी. 
              आता अंधार पडू लागला होता. हेडलाइट लावून उतरायला सज्ज झालो. अंधारातून पाड्याच्या दिशेनी वेगानी निघालो. घसा-यावर मात्र जपूनच जाणे भाग होते. नजरा अंधाराला सरावल्या, टॉर्च बंद केले. तिघांनीही एकत्रच राहून वाट कापत राहिलो. सुदैवानी वाट चुकलो नाही आणि जंगलातल्या प्राण्यांच्या भेटीही घडल्या नाहीत. कारण त्या एकाकी वाटेवर आम्हा तिघांशिवाय इतर कोणीही नव्हते. अपरिचित गड आणि वेळही कातर असा आचरटपणा अजून कोण करणार? पाडा जवळ आला तसे दोन - तीन टॉर्च दिसू लागले; आम्हाला काहीतरी संकेत करत असावेत. श्वानमंडळाचा ओळखीचा सामूहिक आवाज आला, पाड्यातले शेवटचे घरही आले. सुखदा आणि निमकर एका घराच्या ओट्यावर बसले होते. मजेत गप्पा चालल्या होत्या. आमचे टॉर्च अदृश्य झाले म्हणून आम्ही वाट चुकलोय की काय अशी शंका येऊन त्यांनीच गावातल्या दोन-तीन मुलांना आमच्या शोधार्थ पाठवले होते, आणि ते टॉर्च आम्हाला संकेत करत होते आसा उलगडा झाला. आम्ही पोहोचल्यावर चहा अगत्यानी मिळाला. मग पाटणादेवीच्या रस्त्याची चौकशी करुन आणि पाणी भरुन घेऊन सगळ्यांचा निरोप घेतला. हायवे लागेपर्यंतचा १०-१५ किमी चा रस्ता अतिखडतर म्हणजे त्याला रस्ता का म्हणावे अशा जातीचा होता. सगळीकडे शांतता होती. रात्रीचे  जागरण आणि दिवसभराचे श्रम यामुळे चालकाचा म्हणजे माझा ताबा निद्रादेवी घेऊ पाहत होती. मग रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून चक्क पंधरा मिनिटे झोप काढली. ब-याच प्रतीक्षेनंतर जरा बरा रस्ता आला. सगळ्यांना भूक लागली होती. गरम जेवण हवे होते, पण एकही हॉटेल दिसत नव्हते. पोटतिडीकीने शोध घेतल्यावर मात्र एक हॉटेल मुख्य रस्त्यावर मिळाले. आणि जे हवे ते बनवून द्यायलाही तो सज्ज होता. सगळे एकदम खुश. त्यावेळी गरम जेवण मिळाल्याचा जो आनंद होता त्याला कसलीही तोड नाही. वीज गेल्यामुळे चक्क कँडललाइट डिनर झाले. जेवणानंतर गरमागरम आलं घातलेला चहा मिळाला. दुसऱ्या
दिवशी सकाळी पिण्यासाठीही तो भरुन थर्मासमध्ये घेतला. हॉटेलचालक चाळीसगावचा होता. त्यानी सल्ला दिला की आता एवढ्या रात्री पाटणादेवीला जाऊ नका; त्यापेक्षा चाळीसगावला जाऊन मुक्काम करा. तुम्हाला फक्त सात किमी घाट चढून जावे लागेल. पाटणादेवीला रात्री जायला एरव्ही आमची काही हरकत नव्हती पण आतला रस्ता कसा असेल माहीत नव्हते, आणि आता पुन्हा एखाद्या खराब रस्त्यावर गाडी नेण्याची तयारी नव्हती. कारण गाडी बिचारी धक्के खाऊन फार दमली होती. गरमागरम जेवल्यावर सगळ्यांनाच उत्साह आला. गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवायला मजा येत होती. चाळीसगावचा घाट सुरु झाला. घाटातला रस्ता अगदी अरुंद होता. २-४ मिनिटांत गाडीला स्थितिस्थापकत्व आले कारण वाहनांचा खोळंबा होऊन लांबच लांब रांग लागली होती. मुंगीच्या गतीनेही रेष हलत नव्हती. डोळे पुन्हा मिटू लागले. गाडी बाजूला लावून चक्क झोप काढली. वाहतूक सुरु झाल्यावर आपोआप जाग आली आणि सरसावून पुढे निघालो. वाटलं होतं की कुठे काही अपघात झाला असेल, पण तसं काहीच नव्हतं. अरुंद रस्त्यावर रस्ता दुरुस्तीसाठी दोन-तीन ठिकाणी खडीचे आणि वाळूचे ढिगारे पडले होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक खोळंबली होती. चाळीसगाव तर आले हळुहळू, पण हॉटेल काही मिळेना. राहायला एखादे मंदिरही दिसेना. रात्री एक-दीड वाजता सगळे जग शांत झोपले होते. सायकलवरुन चाललेला एक बांधव आम्हाला निवारा शोधण्यासाठी बरीच खटपट करत होता. चाळीसगाव स्टेशनचेही दर्शन घेतले. अथक प्रयत्न केल्यानंतर रात्री पावणे दोन वाजता एका लॉजमध्ये दोन खोल्या मिळाल्या. मग झटपट सामान लावून आणि फ्रेश होऊन सकाळी सहा वाजता उठण्याचा ठराव केला. झोपेनी कधी ताबा घेतला ते कळलेही नाही.
          चार तासांत झोप हलकेच उघडली. चहा-बिस्किट खाऊन, स्नान उरकून पाटण्याच्या चंडिकादेवीकडे प्रयाण केले. पाटणा हे पूर्वीच्या बिज्जलगड परगण्याचे राजधानीचे ठिकाण, इतिहासाशी अतूट नाते सांगणारे. यादवकालीन राजांचे ते एक महत्त्वाचे ठाणे होते. गर्द वृक्ष-वेलींनी सजलेले रम्य असे हे नगर चारी बाजूंनी ङोंगर रांगांनी वेढलेले होते. धातूंच्या खाणी, विविध कलांचा विकास, व्यापार-उदीम इ. गोष्टींमुळे भरभराटीला आलेले हे दळणवळणाचे मुख्य केंद्र होते. चंडिकादेवीचे मंदिर शके ११२८ मधील असून इथे शारदादेवी व अन्य काही देवतांची मंदिरेही आहेत. शून्याचा शोध लावणा-या भास्कराचार्यांच्या 'लीलावती' या ग्रंथाची माहिती असलेला एक शिलालेख पुरातत्व खात्याला इथे मिळाला. त्यांच्या स्मरणार्थ 'भास्कराचार्य निसर्ग शिक्षण केंद्र' वनविभागाने येथे उभारले आहे.
             रम्य वनराईने नटलेल्या गौताळा-अत्रमघाट अभयारण्य परिसरात प्रवेश केल्यानंतर अत्यंत शांत व प्रसन्न वाटले. पक्षांचा मजुळ किलबिलाट ऐकत  द्राक्षे, ठेपले, शेगाव कचोरी असा नाश्ता व गवती चहा घालून केलेला चहा घेतला. चंडिकादेवीला जाताना वाटेत एक ओढा पार करुन जावे लागते.

१२. ओढ्याकाठी विचारविनिमय

ओढ्यावर आता पूल बांधलेला आहे. पुलावर प्रवेश करताच मंदिराच्या दोन भव्य दगडी दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात.
पुरातन अशी ही चंडिकादेवी माझ्या माहेरची, कुलकर्ण्यांची  कुलदेवता. थंडगार पाण्यात पाय बुडवून, मंदिराच्या पाय-या चढून वर गेल्यावर आपण दगडी सभामंडपात प्रवेश करतो.

१३. आदिशक्ती चंडिकादेवी

आदिशक्तीची ही मूर्ती भव्य असून देवीच्या चेह-यावरील भाव उग्र आहेत. सिंहवाहिनी माता अष्टादशभुजा आहे. पुढच्या दोन हातांनी तिनी त्रिशूळ उगारला आहे, तर डाव्या बाजूला एका असुराची गचांडी पकडली आहे. उजवीकडील बाहुंनी एका नागाला पकडले असून इतर बाहूंमध्ये विविध आयुधे धारण केली आहेत. जगत् कल्याणार्थ असे रौद्ररुप धारण केलेल्या मातेला नमन करुन मनोभावे प्रार्थना केली आणि तिच्याभोवती प्रदक्षिणा घातली.

१४. देवीला प्रदक्षिणा

आवारातील इतर देवी-देवतांची मंदिरे व चंडिकादेवीचे जुने छोटेखानी मंदिर बघून आणि प्रसाद ग्रहण करून देवीचा आशीर्वाद  घेतला.
          देवळाच्या डाव्या बाजूनी अभयारण्यात प्रवेश करुन पितळखोरा लेण्यांकडे जाऊ लागलो.

१५. पितळखोरा लेण्यांकडे

लेण्यांना जायला पायऱ्यांची सोपी वाट असूनही आम्ही मात्र घसाऱ्याची आणि खडे पाषाण अडवत असलेली वाट चोखाळली. या वाटेनी पितळखोरा ट्रेकच्या थरारामध्ये अजूनच भर घातली. मजल दरमजल करत आम्ही लेण्यांपर्यंत पोहोचलो. इथे बौद्धकालीन चौदा गुफा आहेत.

१६. बौद्धकालीन गुफा

ही लेणी बसाल्ट खडकात कोरलेली आहेत. एका गुहेतील मूर्तीचे रंगही कायम आहेत. इतर गुहांमधील कोरीव काम सुबक आहे. इथे आम्हाला एक वास्तुविशारद भेटले. त्यांनी या लेण्यांचा इतिहास व माहिती सांगितली. गुहेबाहेरील पायऱ्यांवर चढून मान उंच करुन नीट निरखून बघितले तर गुफेच्या वरच्या बाजूलाही कोरीव काम केलेले दिसले.

१७, १८, १९. पितळखोरे लेणी

काही गुहांच्या बाहेर हत्ती, सिंह इ. जंगली प्राण्यांची शिल्पे आहेत. परंतु एकही शिल्प पूर्ण सुस्थितीत नाही. हत्तीची सोंड तर मला वाटतं स्वतः पुढे होऊन सारे वार झेलते. काही गुहांमध्ये स्तूप आहेत तर काही गुहांमध्ये खांबांची अर्धवर्तुळाकार रचना. येथील कमानी, शिल्पे, कोरीव काम चित्रे सारेच खिळवून ठेवते. एकासारखे दुसरे नाही. एका गुहेमध्ये भग्नावस्थेतील बुद्धमूर्ती व मागे स्तूप दिसतो. यापैकी आधी काय आणि नंतर काय बांधले असावे, त्याचे प्रयोजन काय असावे, छोट्या-छोट्या आखीव-रेखीव कक्षांचा उपयोग कशा-कशासाठी करत असावेत हे सारे एखाद्या तज्ज्ञाकडूनच जाणून घ्यावे.
             परतीची वाट वेगळी होती. या वाटेवर वैशिष्ट्यपूर्ण अशा तेरा आणि चौदा क्रमांकाच्या गुहा होत्या. पावसाळ्यात येथील निसर्ग जलधारेने चिंब न्हाऊन निघत असेल आणि तृप्त झालेली धरणीमाता हिरवा शालू परिधान करत असेल, तेव्हा येथे यायलाच हवे. परतीची वाट पटापट संपली. लेणी बघून झाल्यावर सगळ्यांनी गोड सफरचंदांचा आस्वाद घेतला आणि गार्डचा डबा पोहोचेपर्यंत पुढच्या मंडळींनी खाली चटकदार भेळ तयर ठेवली. स्वतः तयार केलेली मस्त भेळ आणि आलं घातलेला गरम चहा यांनी जठराग्नी शमवितानाच मनही ताजेतवाने केले. आतापर्यत चंडिका देवी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. इथून आम्ही आमचा मोर्चा प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिराकडे वळवला. 
             महादेव मंदिराच्या छोट्या रस्त्यावर गच्च झाडीनी दाट सावली धरली होती. काळ्या पाषाणात उंच चौथऱ्यावर बांधलेले हे मंदिर तेजाळलेल्या रविराजांनी आपल्या बाहुपाशात घेतले होते.

२०. पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर

भडक रंगरंगोटी करुन चकाचक केलेल्या मंदिरांमध्ये भक्तगण नवस करतात.पण सच्च्या भटक्याला आडबाजूला वसलेल्या अशा दगडी देवालयांमधील देवच अगम्य ओढ लावतो. बाराव्या शतकातील हे महादेव मंदिर पूर्वाभिमुख असून अनेक कोरीव खाबांनी तोलून धरले आहे. प्रवेशद्वाराशी आठ खांबांची महिरप असलेल्या नंदी महाराजांचा डामडौल त्यांच्या लौकिकाला साजेसा असाच आहे. ऐसपैस सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना पूर्वी मूर्ती असाव्यात. गर्भगृहाचा दरवाजा आणि छत यांवरचे कोरीव काम आपल्याला थक्क करुन सोडते. शिवलिंगही बरेच जुने असावे. पण दृष्ट लागू नये म्हणून की काय ते बाजूनी पिवळ्या रंगानी रंगविले आहे. महादेवांचे यथासांग दर्शन घेतल्यावर अर्धप्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर जाताच खांबांवरील कोरीव काम, सप्तमातृका, देवादिकांची व प्राण्यांची शिल्पे आणि कोरलेले विविध प्रसंग हे सारे आपल्याला खिळवून ठेवते.

२१, २२. मंदिराबाहेरील कोरीव काम

हे मंदिर बारकाईनी बघायचे असेल तर किमान चार तास तरी हवेत, पण आपल्याकडे हे नीट बघायलाही वेळ नाही ही जाणीव मन अस्वस्थ करुन गेली. वेळेचे भान ठेवून भेट आवरती घेतली आणि जड अंतःकरणानी या निर्माणाच्या अज्ञात शिल्पकारांचा निरोप घेतला.
               ट्रेकचा परतीचा प्रवास हा नेहमीच मनाला हुरहूर लावणारा असतो. कान्हेरगड, नागार्जुन कोठडी,सीता न्हाणी, शृंगारचौरी या गुफा इ. सारे बघण्यासाठी पुन्हा यायलाच हवे. त्याशिवाय ढेरीचा किल्ला (राजदेहेर), अंतूर, सुतोंडा हेही खुणावात आहेतच. पण आज नाइलाज होता. पावाणेचारशे किमी चा प्रवास करुन ठाणे मुक्काम गाठायचा होता. रस्ते चांगले होते, त्यामुळे गाडीनी चांगलाच वेग घेतला. वाटेत चहा पिण्यासाठी एखादे बरे उपहारगृह मिळते का, यासाठी सगळ्यांच्या नजरा शोध घेत होत्या. नांदगावच्या १०-१५ किमी अलीकडे काही लोकांचा घोळका गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभा असलेला दिसला. मदतीसाठी त्यांनी आम्हाला हात केला. मोटरसायकल वरुन पडल्यामुळे घाबरलेल्या काकूंना सरकारी  रुग्णालयात घेऊन जाण्याची ते विनंती करु लागले. आमच्या गाडीत तर अजिबात जागा नव्हती. मग आमचे दोन सहृदय सोबती मोसानी जायला सज्ज झाले. आणि काका-काकू आमच्या गाडीत बसले. आमच्या मोसा स्वारांच्या बरोबर राहण्यासाठी गाडी बेताच्या वेगानीच जात होती. तरीही दोन-तीन झोकदार वळणे घेतल्यावर काकूंना एकदम उचंबळून आले आणि गाडी थांबविणे भाग पडले. त्यांना पाणी वगैरे देऊन आणि गाडी स्वच्छ करुन निघालो तर काकू 'गाडी नको मी रिक्षानी जाते असे म्हणाल्या' मग त्यांची रजा घेऊन आम्ही सुसाट निघालो. वाटेत सरकारी रुग्णालय दिसले. पण उपहारगृह मिळण्यासाठी मात्र बरीच प्रतीक्षा करावी लागली. पुन्हा एकदा रेल्वे फाटक वाट अडवून उभे होते. वाहतूकही बरीच खोळंबलेली होती. फाटक उघडल्यावर जड अंतःकरणानी नांदगावचा निरोप घेतला. 

२३. मावळत्या दिनकरा, निरोपाचा कातर क्षण

वाटेत चहा-फराळ झाला होता. रस्ताही सुंदर होता. दिव्यांचा माफक प्रकाश होता. अनंतनी पीडी वर आणलेल्या लता, रफी आणि किशोर कुमार यांच्या जादुई गाण्यांनी मनाचा ताबा घेतला होता. मागच्या सीटवरचे सोबती आळीपाळीने पेंगत, झोपा घेत होते. नाशिक जवळ येऊ लागले आणि माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली. रात्रीचे साडे-नऊ वाजले होते म्हणून जेवणासाठी गाडी थांबवली. मनपसंत भोजन व कडक चहा घेऊन तडक निघालो. तरी ठाणे गाठेपर्यंत पाऊण वाजला आणि एकमेकांचा निरोप घेण्याचा तो अटळ क्षण आला.


२४. अच्छा तो हम चलते हैं...

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2018 - 7:48 pm | प्रमोद देर्देकर

छान धावते वर्णन आवडले. मलाही अजून विदर्भ मराठवाडा इकडे जाणे जमत नाहीये कधी योग येईल कोण जाणे.

नवीन जागा आहेत. फोटोही छान.
पितळखोरे लेणी करण्याचा विचार होता तो आता फोटो पाहून बारगळला.
पुढच्या वेळेस रूट ट्रेसिंग करून मॅप टाका. कोणते स्थान कुठे आहे ते कळेल.

प्रचेतस's picture

5 Mar 2018 - 8:48 am | प्रचेतस

छान लिहिलंय, काही छायाचित्रे मात्र दिसत नाहीयेत.
पितळखोर्‍याचे यक्ष,द्वारपाल, पेगॅसस प्रेक्षणीय आहेत मात्र त्यांची छायाचित्रे कुठे दिसली नाहीत.

गोरगावलेकर's picture

4 Jun 2019 - 11:38 pm | गोरगावलेकर

आपल्या लेखातील पाटणा देवी व महादेव मंदिर या दोन जागा नुकत्याच पाहण्यात आल्या. खूप छान परिसर आहे. 44 डिग्रीचे रणरणते ऊन असूनही मंदिरांना भेट दिल्याचे सार्थक झाले.

पाटणा देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या दिपस्तंभांची घडण वेगवेगळी का असावी? एकाला दीपस्तंभ/दीपमाळ म्हणता येईल परंतु दुसऱ्याचा पृष्ठभाग पूर्णपणे सपाट आहे याचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळ्या काळातील असावेत का?

दीपा माने's picture

5 Jun 2019 - 6:59 am | दीपा माने

चित्रे दिसत नाहीत, काय कारण असावे?

दीपा माने's picture

5 Jun 2019 - 7:06 am | दीपा माने

मला वरील प्रतिसादक, गारगावलेकर यांच्या प्रतिसादातले चित्र दिसते आहे परंतु मुळ लेखातली चित्रे कां दिसत नाहीत याबद्दल मदत मिळेल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2019 - 10:38 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ट्रेक !

बहुतेक चित्रांच्या "पब्लिक अ‍ॅक्सेस परमिशन"ची समस्या असावी.

गोरगावलेकर's picture

11 Mar 2021 - 10:24 am | गोरगावलेकर

मूळ लेखातील फोटो काही कारणाने दिसत नाहीत. या निमित्ताने महादेव मंदिराचे काही फोटो देत आहे.