टकटक

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
17 Mar 2017 - 1:38 am

"मी पोलिसांना फोन करीन, असा माझ्या मागे का येतोय?" अचानक माधवी संतापून मागे वळत म्हणाली. तिने एक हाक दिली असती किंबहुना किंचाळली असती तरी आजूबाजूच्या बिल्डींगमधले कोणी ना कोणी पळत आले असते. तिचा स्वर कापत होता मात्र ती ठाम दिसत होती.

"न..नाय वो म्याडम, मी घराकडं निघालोय.." तो गुटखा खाणाऱ्या पोऱ्या या अनपेक्षित हल्ल्यानं बावचळून गेला. मोबाईलवर वाजणारं "भीगे होंट तेरे.." नामक गाणं त्यानं घाईघाईनं बंद केलं.

"मी तसला नाय वो" काकुळतिला येऊन तो म्हणाला. एव्हाना त्याला घामही फुटला होता.

"चालता हो इथून आधी" तप्त सुरात माधवी म्हणाली. गेले बरेच दिवस तो पुलाखालच्या टपरीवर उभा असलेला तिला दिसायचा. त्याची नजर तिला कळतंच नव्हती असं नाही. पण हे आज जरा जास्तंच झालं होतं.

"माफ करा ताई, आपल्याला समजलं काय म्हणायचं ते, हितून पुढे नाय तरास हुणार" काहितरी कबूल केल्यासारखा तो पोऱ्या म्हणाला आणि शांतपणे तिथून निघून गेला.

आयुष्यात असा प्रसंग यायची माधवीची ही म्हटलं तर पहिलीच वेळ. अचानक आपल्यात हे कुठून बळ आलं याचंही तिला आश्चर्य वाटलं. तशी ती क्षणभरासाठी निर्धास्तही झाली. पण उद्या तो पोऱ्या पुन्हा त्या टपरीवर दिसला तर? हा प्रश्न तिला सतावू लागला.

मुळात महामार्गापासून इतक्या लांब खोली घ्यायची चूक तिला या आधीही जाणवली होती. ऑफिसमधून यायला अकरा वाजतात हा ही एक प्रश्न होताच. आधी वैष्णवी सोबत असायची. पण तिची शिफ्ट बदलल्यावर तिला एकटीलाच यावं लागायचं. या ओढ्याशेजारी वाढलेली झाडे. तिथे अंधारही खूप असायचा. एक किलोमीटरभर चालत जाण्याशिवाय आता काही पर्यायही नव्हता.

हातातल्या मोबाईलवर बटने दाबत तिने नागेशला फोन लावला. तसं ओळखीचं इथं फारसं कोणी नव्हतंही. रुमपार्टनर म्हणून भेटलेली वैष्णवी. आणि गाववाला म्हणून ओळखीचाच असलेला नागेश. त्यानेच तर तिला ती रुम मिळवून दिली. कधी भेटला तर हाय हॅलो व्हायचे तेवढेच. बाकी अजून ती नव्या शहराला सरावली नव्हती इतकेच.

"आज बऱ्याच दिवसांनी फोन केला, काय विशेष!" नागेश बहुतेक अर्धवट झोपेत असावा.

"डू मी अ फेवर नागेश. आणखी एखादी रुम बघशील का माझ्यासाठी. ही खूप लांब पडते रे"

"मी ट्राय करतो, पण कठिण आहे मिळणं. इथे माझी ओळख होती म्हणून लगेच मिळाली"

"किती अंधार असतो माहितेय का इथे. भिती वाटते येताना."

"डोन्ट वरी. मी करतो काहितरी. तू ये आपण बोलूच"

खरंतर माधवीला त्याची गाठभेट घ्यायची नव्हती. तसंही ऑफिसमध्ये कोणाशी बोलून तिला एखादी रूम नक्की मिळाली असती. पण ते गाववाल्या नागेशवर अविश्वास दाखवल्यासारखं वाटलं असतं.

ओढ्याकाठच्या काळ्याभोर अंधारात वीजेचे दिवे अगदीच तोकडा उजेड करत होते. गारठला वारा अंगावर शहारा आणत होता. माधवीने खाली वाकून चार दगड हातात घेतले. समोरच्या वळणावर रिकामटेकडी बसलेली कुत्री नेहमीसारखीच भुंकणार याची तिला खात्री होती. थोडासा झोपडपट्टी सदृश्य असा तो भाग होता. पण मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता.

हातातला मोबाईल पर्समध्ये ठेऊन ती चालू लागली. अकरा वाजून गेले तरी काही झोपडपट्ट्यांत अजूनही दिवे चालू होते. एका सांडपाण्याच्या नाल्याजवळ वसलेल्या झोपड्याकडे तिची नजर गेली. दरवाज्यात कोणीतरी उभं होतं. अंधारामुळे तिला ते नीट दिसलंही नाही. तिनं कुतूहलानं तिकडं नीट न्याहाळून बघितलं. दरवाज्यात हालचाल झाली आणि लगेच आतला दिवा लागला. तो माणूस पुन्हा दरवाज्यात येऊन उभारला. ते पाहून तिला धक्काच बसला. कारण त्या माणसाच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. वेड्यासारखी क्षणभर ती बधीरंच झाली. तो हलकट माणूस तिला आतमध्ये येण्यास खुणावत होता. प्रचंड भितीने माधवी गारठून गेली. ती पळत केव्हा सुटली हे तिलाही जाणवलं नाही. गल्लीतली रिकामटेकडी कुत्री तिच्यावर भुंकत होती. काही पळत तिच्या मागोमाग जात होती. त्यांचे ओठ मागे ओढल्यासाखे झाले होते. त्यातून तीक्ष्ण सुळे बाहेर डोकावत होते. त्यांची हावरी लपलपीत जीभ तोंडावरून फिरत होती. एक काळे कुत्रे तर बिल्डींग येईपर्यंत तिच्यामागे धावत होते.

जिने वर चढून आल्यावर माधवीने खोली उघडली. धपापत्या छातीनं दरवाजा लावून घेतला. सुन्न डोक्यानं प्लास्टीकच्या खुर्चीवर मग बराच वेळ बसून राहिली. हे शहर नवे असलेतरी एवढे किळसवाणे असेल असे तिला कधीच वाटले नव्हते. अंगातले कपडे बदलण्याचंही तिला भान राहिलं नाही. थोडंसं पाणी पिऊन ती बेडवर लवंडली. उद्या काहीही झालं तरी शिफ्ट बदलून घ्यायची तिनं मनोमन ठरवलं. झाला प्रकार कुणालातरी सांगायचा होता. वैष्णवीही आता उद्या सकाळीच येणार. तोपर्यंत वाट बघण्याशिवाय तिच्या हातात काहिच नव्हतं. नोकरी सोडून द्यावी असाही विचार तिच्या मनात चमकला. अगदी खिन्न नजरेनं ती गरगर फिरणाऱ्या पंख्याकडंच बराच वेळ बघत राहिली.

दरवाज्यावर टकटक झाली तशी ती भानावर आली. अश्या अवेळी कोण आले असावे अश्या विचारात तिने दरवाजा उघडला. समोर नागेश उभा होता.

"तू फोन केला होतास, म्हटलं काही प्रॉब्लेम तर नाही ना बघावं" आत येत नागेश म्हणाला. जवळच रहात असूनही बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ पहिल्यांदाच तो या खोलीत आला होता.

"तसं काही नाही अरे, येण्याजाण्याचं टेन्शन आहे." ती नागेशला कसं सांगावं या विचाराने अवघडली होती.

"बस ना"तिने नागेशला खुर्ची ओढून दिली.

"तू जरा घाबरल्यासारखी वाटतेस." नागेश खुर्चीवर न बसता तिच्याशेजारी बेडवर बसत म्हणाला.

"काही काळजी करू नकोस." नागेश तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

"उद्याच्या उद्या तुला पाहिजे तर सुट्टी टाकून रूम शोधून देतो" दुसरा हात केस बाजूला सारत तो तिच्या गालावर ठेऊ पाहत होता. तो अचानक झटकून तिनं त्याच्याकडे पाहिले. त्याचे ओठ मागे ओढल्यासाखे झाले होते. त्यातून तीक्ष्ण सुळे बाहेर डोकावत होते.

कथा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

17 Mar 2017 - 7:00 am | उगा काहितरीच

__/\__

काहीशी अपेक्षित वाटली, तरीही आवडली.

उल्फत पूर्ण करायचं मनावर घ्या .

चिनार's picture

17 Mar 2017 - 9:50 am | चिनार

मस्त जमलीये !!

किसन शिंदे's picture

17 Mar 2017 - 10:06 am | किसन शिंदे

मस्त

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2017 - 11:21 am | मराठी कथालेखक

छान

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2017 - 11:42 am | ज्योति अळवणी

अपेक्षित वळण पण तरिही वाचनीय

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2017 - 11:43 am | ज्योति अळवणी

अपेक्षित वळण पण तरिही वाचनीय

सुमीत's picture

17 Mar 2017 - 12:52 pm | सुमीत

अनपेक्षित शेवट, थरार, मस्तच

पुंबा's picture

17 Mar 2017 - 2:18 pm | पुंबा

फारच सुंदर.

पद्मावति's picture

17 Mar 2017 - 2:31 pm | पद्मावति

मस्तच!

अभ्या..'s picture

17 Mar 2017 - 2:58 pm | अभ्या..

केंद्र नाही, परीघ नाही, त्रिज्या नाही, व्यास नाही. ही जीवा आहे फक्त ९-१० अंशाची.
सो....आवडली/नाही आवडली....फिफ्टीफिफ्टी

वरुण मोहिते's picture

17 Mar 2017 - 3:05 pm | वरुण मोहिते

अपेक्षित .. नॉट जव्हेरभौ खास टच..भाऊ काहीतरी मस्त अपेक्षित आहे अजून

गामा पैलवान's picture

17 Mar 2017 - 7:24 pm | गामा पैलवान

जव्हेरगंज,

शेवट अगदीच अनपेक्षित निघाला. मला वाटलं की न बोलावता नागेश आला याबद्दल त्याचे माधवी आभार मानेल आणि सुळे बाहेर काढेल. तिचं पुढचं सावज तो नागडा माणूस असेल. तोही असाच (न बोलावता) तिच्या पाठलागावर येईल आणि जाळ्यात फसेल. गुटख्याचा तोबरा भरलेला तो ही असाच फशी पडेल. कदाचित झिंगलेल्या वा गुटख्याच्या चरबरीत घशांत सुळे खुपसायची मजा काही औरच म्हणून माधवी मनोमन सुखावेलही!

आ.न.,
-गा.पै.

हेमंत८२'s picture

17 Mar 2017 - 7:44 pm | हेमंत८२

अनपेक्षित. पण छान.

जव्हेरगंज's picture

17 Mar 2017 - 8:58 pm | जव्हेरगंज

धन्यवाद मंडळी,

जी.एंची 'वस्त्र' ही कथा वाचताना हे तोडकंमोडकं काहितरी सुचलं.

असो.

पैसा's picture

17 Mar 2017 - 9:04 pm | पैसा

शेवट अपेक्षित वळणाने झाला. पण कथा आवडली.