रसिका स्टिच वर्क्स - कल्पकतेचा उत्तुंग व्यावसायिक प्रवास

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in लेखमाला
8 Mar 2017 - 6:15 am

.

सौ. रेखा सोलापूरकर - बोरकर यांचा बुलडाण्यात स्वतःचा 'रसिका स्टिच वर्क्स' हा संगणकीकृत एम्ब्रॉयडरीचा (कशिदाकामाचा) व्यवसाय आहे. केवळ एक छंद म्हणून सुरू होऊन हळूहळू व्यवसायात त्याचं रूपांतर होऊन आता देशांतर्गत आणि देशाबाहेरही विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवलं आहे. तुम्हा-आम्हा सर्वसामान्य स्त्रियांमधल्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी, करू इच्छिणार्‍यांसाठी प्रेरणादायी अशी ही कहाणी, या मुलाखतीतून थोडक्यात तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवते आहे.

1

प्रश्नः या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? सुरुवातीपासूनच कशिदाकाम हे मुख्य उद्दिष्ट होतं की आणखी काही?

रेखाताई: सुरुवात ढोबळमानाने शिवणकामाने झाली असं म्हणता येईल. शिवणकाम, भरतकाम करण्याची आवड शाळेत असतानापासून होती. पण ही आवड पुढे स्वतःचा व्यवसाय म्हणून विकसित करायची असं लहानपणी काही डोक्यात नव्हतं. तेव्हा एवढी ध्येयं, स्वप्नं वगैरे असा काही विचार नव्हता. कुठे काही नवीन पाहिलं की ते करून बघायची हौस होती. हातात कला होती ही परमेश्वरी कृपा. त्यामुळे सतत काहीतरी कलाकुसर, शिवणकाम करण्याकडे माझा कल होता आणि माझ्या आईबाबांनी यात मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे कलाकुसरीच्या काही वस्तू करणं, शिवलेल्या कपड्यांवर कशिदाकाम करणं, हलव्याचे दागिने करणं असे प्रकार शाळेत असतानापासून चालू होते. जेव्हा माझे वडील निवृत्त झाले, त्यानंतर घरी आर्थिक हातभार लावता येईल म्हणून मी याकडे याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायचा विचार केला, अर्थात अगदी लहान स्वरूपात. त्यादरम्यान शिवणकामाचे प्रयोग करत फोल्डिंग पर्स शिवली, त्यावर मोती वगैरे लावून ती सजवली. ज्यांनी पाहिली त्यांना आवडली आणि नवीन ऑर्डर मिळत गेल्या. केवळ ओळखीतून पुढे जे बघत गेले, त्यांना ही पर्स आवडत गेली आणि एका महिन्यात मी ५०० पर्सेस तयार करून दिल्या. या कामासाठी म्हणून मी कर्ज घेऊन नवीन शिलाई मशीन घेतलं होतं आणि पर्सच्या खपामुळे ते कर्ज अगदी लगेच फिटलं. कॉलेज सांभाळून जे काही जमत होतं, ते मी करत होते. पण कदाचित आताच्या व्यवसायाची सुरुवात एका अर्थाने तेव्हा झाली असं म्हणू शकतो. कारण आपल्याला हे छान जमतंय आणि त्यात काहीतरी असं मोठं करून विकावं हे तेव्हा पहिल्यांदा जाणवलं.

त्यानंतर एकदा मी जिल्हा परिषदेत गेले होते, निमित्त होतं जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी गणवेशाच्या आणि शाळेच्या दप्तरांच्या टेंडरचं. पण ते टेंडर मिळवण्यासाठी तिथला माणूस सरळ सरळ २० टक्के पैसे मागत होता. हे मला जमणार नव्हतं, म्हणून मग मी नाराज होऊन परत निघाले, तर आमच्याकडे फार आधी काम करणाऱ्या एक बाई योगायोगाने रस्त्यात भेटल्या. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना हे सगळं सांगितलं. त्या बाई जिल्हा परिषदेच्या तेव्हाच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कामाला होत्या. त्यांनी तिथे जाऊन माझ्याबद्दल सांगितलं. त्यांनी ताबडतोब मला बोलावून घेतलं, मी शिवलेली दप्तरं पाहिली आणि ताबडतोब शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की हे काम काही प्रमाणात तरी मला मिळायला हवं. हे साहेब पश्चिम महाराष्ट्रातले होते, त्यांच्या मनात विदर्भातल्या लोकांबद्दल अढी होती. माझ्या कामाने ते खूश झाले आणि विदर्भातल्या मुली इतकं मेहनतीने काम करू शकतात याचा त्यांना झालेला आनंद त्यांनी माझ्यापाशी बोलून दाखवला. जुन्या पद्धतीच्या शिवणयंत्रावर फक्त दोन कारागिरांच्या मदतीने मी ते काम वेळेत पूर्ण केलं. माझ्या आजवरच्या वाटचालीत हा पुन्हा एक मोठा टप्पा ठरला. याच शिलाईयंत्रावर मग मी तशी भरपूर कामं केली.

नंतर लग्न झाल्यावर काही वर्षं मुलांकडे लक्ष देण्यात गेली. पण मूळचा स्वभाव आणि आवड, शिवाय संसाराला आर्थिक हातभार लावता येईल या उद्देशाने मग काहीतरी करायचे विचार डोक्यात चालू झाले. त्या दृष्टीने संगणकीकृत शिलाई मशीन घ्यायचं हे माझ्या डोक्यात होतं. त्याबद्दल माहिती काढली तेव्हा तिथे आम्हाला या दुसऱ्या, म्हणजेच कशिदाकामाच्या मशीनबद्दल कळलं. ती माहिती बघून मला त्यात रस वाटला. नवीन काहीतरी करता येईल म्हणून बरीच स्वप्नंही दिसली, पण ही खूप मोठी उडी होती. एवढी मोठी गुंतवणूक करायची तर त्यातून आपल्याला फायदा व्हायला हवा. त्यामुळे धाकधूक होती. पण सरतेशेवटी ही उडी मारायचा निर्णय पक्का केला, कर्ज मिळणं वगैरे बाबीदेखील परमेश्वरकृपेने पार पडल्या आणि पहिल्या मशिनचं घरी आगमन झालं. माझ्या कामाची आधीपासून माहिती असल्याने, हे नवीन मशीन घरी येण्याआधीच माझ्याकडे ऑर्डर्स तयार होत्या.

या मशीनमध्ये सिंगल हेड, डबल हेड असे प्रकार असतात. खरेदीच्या वेळी त्या माणसाने सांगितलं होतं की जर तुम्ही दोन वर्षांत '१ हेड'च्या मशीनवरून '३ हेड'चं मशीन घेऊ शकलात, तर समजा की तुम्ही यशस्वी ठरलात. मी अभिमानाने सांगू शकते की एक वर्षातच मी '१२ हेड'चं मशीन घेतलं होतं आणि व्यवसायाने भरारी घेतली होती.

प्रश्नः मग हे मशीन घेतल्यानंतर पुढे कशा प्रकारे व्यवसाय विकसित झाला?

रेखाताई: सुरुवातीला लोक प्लेन साड्या आणून द्यायचे आणि त्यावर मी काम करून द्यायचे. डिझाइन, रंगसंगती हे सगळं मग प्रत्येक साडीनुसार बदलायचं. त्यामुळे प्रत्येक साडी हे आव्हान होतं. अर्थात ते आजही आहेच. शाळांच्या गणवेशावर लोगो करून द्यायचे. कुणाला आणखी कशावर डिझाइन्स हवी असतील तर ते करायचं. मग वाटलं की आपणच साड्याही विकत घेऊ आणि लोकांना देऊ. लोकांनाही जास्त वैविध्य मिळेल. मग त्याचा शोध सुरू झाला. सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी स्वतः जावं लागायचं, साड्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून, पारखून, योग्य ती किंमत ठरवून मग त्या इथे बुलडाण्यापर्यंत आणायच्या हे एक तसं वेळखाऊ आणि अवघड काम होतं. कारण बुलडाण्यात रेल्वेची सोय नाही. जवळपासचं मोठं शहरसुद्धा तसं दूरच. कुठला मोठा महामार्गही इथे नाही. पण तरीही अमदाबाद, बिलासपूर अशा अनेक ठिकाणी जाऊन मी साड्या आणते. उत्तम माल आहे हे स्वतः पडताळून बघते. कारण ग्राहकांना गुणवत्तेची खातरी असेल तर ते नक्कीच माझ्याकडे परत परत येतात हा मला विश्वास आहे. आता तर नेहमीच्या लोकांसोबत फोनवरही कामं होतात. तशा ओळखी झाल्या आहेत आणि विश्वासाची खातरी आहे. शिवाय काही नवीन असेल तर मी प्रत्यक्ष जातेच. साड्यांच्या सोबतीने मग ड्रेस मटेरियलसुद्धा ठेवायला सुरुवात केली. मग त्यातूनच कुर्त्यावर किंवा टॉपवर काम करायला सुरुवात केली. या सगळ्यात जर जम बसल्यानंतर मग 'दोहोड' म्हणजेच पांघरुणाचा एक प्रकार शिवायला सुरुवात केली.

आता साड्यांमध्ये एम्ब्रॉयडरीच्या सोबतीने कटवर्क, मिरर वर्क असे प्रकार करते. जरीच्या प्लेन काठाची साडी असेल, तर त्यावर वर्क करून देते, जेणेकरून ती आणखी उठावदार दिसेल. कुणाकडे लग्न असेल तर हमखास लोक माझ्याकडे येतात. कित्येक जण तर अगदी लाखांची खरेदी करतात. लोकांना काही कस्टम डिझाइन हवं असेल तर करून देते.
.

हे सगळं चालू असतानाच एकदा माझ्या मुलीला शाळेत स्नेहसंमेलनात नऊवारी हवी होती. तिच्यासाठी शिवताना हे इतरांसाठीही करता येईल ही कल्पना सुचली आणि तेही काम मिळालं. आता शाळांची स्नेहसंमेलनं हा माझ्या व्यवसायाचा महत्त्वाचा काळ असतो. नऊवारी शिवून देणं, डान्ससाठी सारखे ड्रेसेस करून त्यावर कशिदाकाम करून देणं असे बरेच उद्योग चालू झाले. प्लेन बेडशीट्सवर मी माझं कशिदाकाम करून देते. बेडशीट्स हे माझं वैशिष्ट्य आहे, कारण माझ्यासारखं मशीन असणारे अनेक जण असले, तरी अशी बेडशीट्स कुणाकडेच नाहीत. कारण या चादरींची साईज या मशीनवर सरळ सरळ जमत नाही, त्यासाठी बरेच कस्टम चेंजेस करावे लागतात. ते मी बराच वेळ देऊन, ट्रायल्स घेऊन जमवलं आहे. मुंबईत एकदा एक पंजाबी जोडपं भेटलं होतं, त्यांच्याकडे हेच मशीन होतं पण त्यांना हे मान्यच नव्हतं की मी हे या मशीनवर करू शकते. कारण नेहमीच्या प्रोग्रामपेक्षा वेगळ्या पद्धतीने करावं लागतं.

कुठलंच मटेरियल वाया घालवायचं नाही हे मी कटाक्षाने पाळते. नऊवारी शिवताना त्यातले काठ बरेचदा वापरात येत नाहीत. मग त्यातून कापडी जरीकाठाचे फोल्डिंग ट्रे बनवायची कल्पना सुचली. मग वॉलपिसेस करायला सुरुवात केली. मोबाईल कव्हर, पर्सेस, टेबलसाठी सेंटर पीसेस अशा अनेक फांद्या मग फुटत गेल्या आणि हा वृक्ष वाढत राहिला. या सगळ्यात माझी डिझाइन्स, रंगसंगती ही माझी ओळख आहे. मध्यंतरी मुंबईत माझ्या एका नातेवाइकांकडे मी केलेलं एक वॉलपीस बघून, लंडनमध्ये स्थायिक असलेल्या त्यांच्या एका स्नेह्यांचा फोन आला. त्यांच्या घरासाठी १२ फूट बाय ६ फूट असा एक मोठा वॉलपीस त्यांना हवा होता. मी त्याक्षणी हो म्हणाले, पण नंतर ते करताना अनेक सेटिंग्ज बदलून, वेगवेगळ्या गोष्टी बघून काम करावं लागलं, कारण ही साईज माझ्या मशीनसाठी नवीन होती. पण ते काम उत्तम जमलं आणि माझं काम राणीच्या देशातसुद्धा आता अभिमानाने झळकत आहे.

हे माझ्या कामाचे काही नमुने - हा लंडनला गेलेला वॉलपीस -
.
...

प्रश्नः तुला आजवर अनेक पुरस्कार मिळाले, त्याबद्दल सांग.

रेखाताई: २०११ साली जेव्हा मी सकाळ आणि मिटकॉन यांच्या उत्कृष्ट उद्योजिका पुरस्काराच्या मुलाखतीसाठी गेले, तेव्हा फक्त एका मैत्रिणीने सांगितलं म्हणून खरं तर अर्ज भरला होता. पुण्याला गेले तेव्हाही डोक्यात वेगळ्या ठिकाणचं प्रदर्शन डोक्यात ठेवून माझा सगळा माल सोबत घेऊन गेले. या पुरस्काराची मुलाखत त्यापुढे दुय्यम वाटली होती मला, कारण नेमकं काय आणि किती मोठं याची कल्पना नव्हती. तिथे गेल्यावर मला कळलं की सगळ्या फेऱ्या पार पडायला चार दिवस आहेत, म्हणजे तिथे थांबावं लागू शकतं. पहिल्या दिवशी एकूण ३५०० महिला उद्योजिका होत्या. सविस्तर मुलाखतीद्वारे त्यातून १४० महिलांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. यात सुरुवातीला त्यांनी मुख्यत्वे हे पाहिलं की या सगळ्या जणी स्वतःच हे काम करतात, की त्यांच्या नावाने त्यांच्या घरातले इतर सदस्य काम करतात. शिवाय व्यवसायाची सुरुवात तुम्ही स्वतः केलेली ही मुख्य अट होती, हे पडताळणं मोठं काम होतं. त्यातून मग २६ जणी पुढच्या फेरीसाठी निवडल्या गेल्या आणि अंतिम सहा जणी निवडल्या. त्यात नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातून प्रत्येकी दोन सुवर्णपदकं, दोन रौप्यपदकं आणि दोन कास्यपदकं असे पुरस्कार होते. त्यात नगरपालिका क्षेत्रातून मला उत्कृष्ट उद्योजिका म्हणून सुवर्णपदक मिळालं. यात तुम्हाला व्यवसायाची किती सखोल माहिती आहे, तुम्ही ते किती मनापासून करता, त्यासाठी काय तयारी केली जाते, व्यवहार कसे सांभाळता, संवाद कौशल्य अशा अनेक बाबी अनेक लोकांकडून मुलाखतीद्वारे तपासल्या गेल्या. मुलाखतीसाठी वेगळी तयारी केलेली नसली, तरीही माझं काम मी अनेक वर्षांपासून आणि मेहनतीने केलं होतं. मला माझ्या कामाची १०० टक्के माहिती होती. त्यामुळे मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात अडचण आली नाही. हा अनुभव खूप विशेष होता. मोठमोठ्या पदावर काम करणारे खूप लोक इथे भेटले. सहभागी स्त्रियांपैकी कित्येकांना बुलडाणा हे गावही माहीत नव्हतं. लहान गावातून गेल्याने न्यूनगंडाची भावना आली, विशेषतः सगळ्यांमध्ये जेव्हा मला बरेचदा वेगळं ठेवल्याचा अनुभव आला, काही जणी माझ्याशी बोलल्यासुद्धा नाहीत. अनेकींनी माझ्यासारख्या साधी साडी आणि वेणी, काहीही मेकअप नसलेल्या, कदाचित गावंढळ अशा अवताराकडे दुर्लक्ष केलं. पण सरतेशेवटी मी अग्रेसर ठरले. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण त्यामुळे प्रसारमाध्यमानी माझ्या कामाची नोंद घेतली, आणखी चार ठिकाणी माझं नाव माहीत झालं, त्यातून नवीन ओळखी झाल्या आणि मला स्वतःलासुद्धा एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला.

याशिवाय महालक्ष्मी सरसला मला तिसरं बक्षीस मिळालं. मुंबईला 'आम्ही उद्योगिनी' प्रतिष्ठानचा उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार मिळाला. ताराबाई शिंदे पुरस्कार, कृतिशील महिला सन्मान, स्वयंसिद्धा बहुरूपिणी पुरस्कार असे अनेक लहान-मोठे पुरस्कारसुद्धा मिळालेत. मिटकॉनच्या आजवरच्या एकूण ११ सुवर्णपदक विजेत्या स्त्रियांबद्दल उद्योगिनी, आम्ही यशस्विनी हे एक पुस्तक ८ मार्च २०१६ ला प्रकाशित झालं, त्यात या ११ जणींपैकी मी एक आहे. याचबरोबर 'पोलादी माणसे' हे प्रत्येक जिल्ह्यातील आयकॉन्सबद्दल पुस्तक आहे, त्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या २६ जणांमध्ये माझा समावेश आहे आणि मी एकमेव महिला आहे. विविध ठिकाणी भरणाऱ्या माझ्या प्रदर्शनांना मिळणार प्रतिसाद हीसुद्धा एक लोकांना काम आवडतंय याची पोच असते. दुबईला जेव्हा मी प्रदर्शनासाठी गेले होते, तेव्हा भारतात परत येताना मी एकही साडी किंवा बेडशीट परत आणलं नाही, हे विशेष होतं. शिवाय लोक जेव्हा फोन करतात, प्रत्यक्ष पुन्हा भेटले की काम आवडल्याचं सांगतात, त्यांच्या ओळखीने माझं काम आणखी लोकांपर्यंत पोहोचवतात... असे अनेक प्रसंग प्रत्येक वेळी पुरस्कारांप्रमाणेच वाटतात.
6

प्रश्नः व्यवसायाच्या निमित्ताने अनेक सरकारी योजना, सरकारी माणसं, बँक अशा विविध ठिकाणी अनुभव आले असतील. त्याबद्दल काय सांगशील? स्त्री म्हणून वेगळे असे अनुभव आलेत का?

रेखाताई: जोवर मी हे काम करत नव्हते, तोवर खरं तर काहीच माहिती नव्हती. नंतर हळूहळू कळत गेलं की सरकारच्या योजना अनेक असतात, पण त्या प्रत्यक्ष गरजूंना पोहोचण्याच्या साखळीत अनेक लोक असतात. त्यांचं कटकारस्थान, त्यांची मर्जी, गटबाजी अशा अनेक बाबी येतात, ज्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जास्त अडचणी येतात.

एकदा जिल्हा उद्योग केंद्रात मी कर्जासाठी गेले होते. सगळी कागदपत्रं जमा झाली. आता शेवटचं काम होणार, तेव्हा तिथल्या मुख्य अधिकाऱ्याने सही करायला नकार दिला. तिथे माझी जात आडवी आली आणि तसं मला स्पष्टपणे सांगण्यात आलं. तेव्हा मी त्या अधिकाऱ्याला म्हणाले होते की "मी तुमच्याच कार्यकाळात माझा व्यवसाय आणखी यशस्वी करून दाखवेन." पुढे स्टेट बँकेकडून माझं कर्ज मंजूर झालं आणि त्यांच्याच कार्यकाळात मला सुवर्णपदक मिळालं. पण मला आनंद वाटतो की आजवर माझ्याकडे आलेल्या ग्राहकांशी माझ्या किंवा ग्राहकांच्या जातीचा संबंध येत नाही.

महालक्ष्मी सरसला मी एका वर्षी स्टॉल लावला आणि यशस्वी झाले. पण त्यानंतर सलग तीन वर्षं इथल्या एका अधिकार्‍यामुळे मला तिथे जाता आलं नाही. असे प्रसंग कधीतरी नाउमेद करणारे असतात. एका वर्षी तर माझ्याकडे भरपूर माल तयार होता, पण ऐन वेळी नकार कळवण्यात आला. ज्यांनी आधल्या वर्षी माझ्याकडून खरेदी केली होती, त्यापैकी काहींचे मला फोनसुद्धा आले, पण मी काहीच करू शकत नव्हते.

स्त्री म्हणूनही काही लंपट लोकांकडून त्रास सहन करावा लागला, पण अशा वेळी सडेतोड उत्तर देऊन किंवा संबंधित वरच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यास मदतही मिळाली.

अशीच माझ्या एका प्रदर्शनाला एक महिला अधिकारी आली होती. ती प्रत्येक वस्तूकडे बघून हे सुंदर आहे ते सुंदर आहे असं म्हणत होती पण घेतलं काहीच नाही. माझ्याही काही डोक्यात आलं नाही. कौतुक करूनही तिने काहीच घेतलं नाही याचं वाईट वाटलं. पण नंतर लक्षात आलं की तिला तिच्या पदाचा गैरफायदा घेऊन फुकटात मिळेल ते वसूल करायचम होतं. तेव्हा असे अनुभव नवीन होते, आता असे लोक आपोआप ओळखू येतात आणि त्यांच्या वरवरच्या कौतुकाला मी बळी पडत नाही. मी जे काही करते, ते मेहनतीने करते. त्यामुळे उगाचच असं करणाऱ्यांना चार हात लांब ठेवते.

पण म्हणून सगळेच लोक वाईट असतात असं मी म्हणणार नाही. तेवढेच चांगले अनुभवदेखील गाठीशी आहेत. स्टेट बँकेकडून मी कर्ज घेतलं, तेव्हा मला अनेक लोकांनी मदत केली, प्रोत्साहित केलं, धीर दिला. त्यामुळे या काही वाईट अनुभवातून शिकायला मिळालं आणि त्याने माझ्या व्यावसायिक यशावर परिणाम झाला नाही.

प्रश्नः ग्राहक म्हणून आलेल्या लोकांचे, इतर कामानिमित्त भेटलेल्या लोकांचे अनुभव कसे होते?

रेखाताई: अनेक किस्से आहेत असे.

मुंबईला महालक्ष्मी सरसचा एक किस्सा. सत्तरीच्या एक बाई आल्या स्टॉलवर. मला म्हणाल्या, "खुर्ची दे", मग बसल्या. त्या आधल्या दिवशी शेअर टॅक्सीने जाताना माझ्या नणंदेसोबत होत्या. तिच्याकडून त्यांना माझ्याबद्दल कळलं. प्रत्यक्षात त्या दोघींचीही शेअर टॅक्सीपुरती ओळख. त्या आल्या, माझं काम प्रत्यक्ष पाहिलं आणि मला म्हणाल्या, "माझ्यासोबत चल." मला कळेना, काहीही ओळख नाही आणि असं कसं त्यांच्यासोबत जायचं, तेही स्टॉल सोडून? पण काय वाटलं माहीत नाही, मी नवऱ्याला आणि कारागिराला तिथे बसवून गेले. त्यांनी मला टॅक्सीने दादरला नेलं. प्रचंड मोठी इमारत होती आणि त्यात अनेक व्यावसायिक होते. ती इमारत त्यांच्या मालकीची होती. तिथे त्यांनी सगळ्यांना माझी ओळख करून देताना"माझी मुलगी आहे ही, हिच्यासाठी काहीही काम असेल तर द्या" असं सांगितलं. त्यांच्याकडून मला अजूनही खूप काम मिळतं. कुठले जन्मानुजन्माचे ऋणानुबंध असतील माहीत नाही, पण आजही आमचं अगदी घट्ट नातं आहे.

एकदा नागपूरला गेले होते. रस्त्यात एक प्रदर्शन दिसलं. माझं लक्ष सतत असंच असतं अशा ठिकाणी, जेणेकरून माझं काम नवीन लोकांना दिसेल. गाडी थांबवून मी तिथे चौकशी करायला गेले, त्या वेळी माझे काही नमुने दाखवत असताना एका बाईंनी ते पाहिल. माझं कार्ड घेतलं आणि नंतर मी बुलडाण्यात परत येत नाही, तर त्या बाई आकोटहून माझ्या दारात हजार होत्या आणि भरपूर खरेदी करून गेल्या.
माझ्या वडिलांचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं, म्हणून मी औरंगाबादला गेले होते. तेव्हा तिथल्या डॉक्टरांशी बोलताना सहज माझ्या या कामाबद्दल बोलले. त्यांनी "पुढच्या वेळी काही नमुने असतील तर आणा" असं सांगितलं. माझं काम बघून त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या एक कॉन्फरन्ससाठी डोळ्यांचं एक डिझाइन असलेली दोहोडची (पांघरुणाची) ऑर्डर दिली. तिथे तो प्रकार सर्व डॉक्टर लोकांना आवडला आणि माझं नावही झालं.

दिल्लीत घासाघीस खूप होते, हा एक प्रकार मला आवडला नाही. एक तर तिथे लोकांना खूप जास्त कशिदाकाम असलेले कपडे हवे असतात, त्यातही चमकी-खडे वगैरेचं जास्त. माझम काम थोडं नाजूक, सोबर आहे. त्यामुळे एकूणच दिल्लीकडे प्रदर्शन असेल, तर मला तेवढं आवडत नाही. याउलट मुंबईसारखे ग्राहक कुठेच नाहीत. भरभरून कौतुक करतात, भरपूर खरेदी करतात आणि त्यामुळे आनंद मिळतो.

माझे अनेक ग्राहक हे आता वर्षानुवर्षं माझ्याकडे येतात. मला त्यांच्या आवडीनिवडी आता जवळून माहिती आहेत, त्याप्रमाणे मी काम करू शकते. आणि बहुतेक वेळा स्त्रियांकडून माझ्या साड्यांबद्दल सगळी विचारणा होते आणि माझं नाव आपोआप सगळीकडे पसरतं. हेच मी केलेल्या इतर कामाबाबतसुद्धा होतं.

या व्यवसायाचा झालेला आणखी एक फायदा म्हणजे अनेक मोठ्या व्यक्तींची भेट झाली. दिल्लीतील प्रदर्शनात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या स्टॉलला भेट दिली. शेगावला उद्धव ठाकरेंची भेट झाली. स्टेट बँकचे महाप्रबंधक जेव्हा बुलडाण्याला आले होते, तेव्हा माझं कर्ज नुकतंच झालं होतं, मलाही त्यांच्यासोबत एका विशेष कार्यक्रमाला बोलावलं होतं. अशा लोकांकडून समोरासमोर त्यांचे अनुभव ऐकणं, त्यांच्यासमोर आपली कला सादर केल्याचा आनंद आणि त्यांचे कौतुकाचे शब्द हे नेहमीच आठवणीत राहतील. एका कार्यक्रमाच्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही प्रोत्साहन दिलं. मराठी चित्रपटसृष्टीतील काहींशी केसरीच्या टूरदरम्यान ओळख झाली आणि माझ्या साड्या तिथेही प्रसिद्ध झाल्या. यातील काहींचे अजूनही मला फोन येतात आणि "पुण्यात प्रदर्शन कधी?" अशी विचारणा केली जाते. मध्यंतरी लोणार येथे श्री श्री रविशंकर येणार होते. त्यांच्या भक्तांपैकी एकीने मला त्यांना भेट देण्यासाठी उपरण्यावर कशिदाकाम करायला सांगितलं. तिथे त्यांना हजारोंनी भेटवस्तू येतात, पण त्यांनी हे वेगळं म्हणून स्वतःजवळ ठेवलं आणि नंतर त्यांच्या सहकाऱ्याकडून ते ज्यांनी भेट दिलं, त्यांना फोनवर हे काम आवडल्याचं सांगितलं.

प्रश्नः या सगळ्यात अनेक अडचणी आल्या असतील, त्यांचा सामना कसा केलास? नवीन आव्हानं कशी पेललीस?

रेखाताई: सुरुवातीला जेव्हा सिंगल हेड मशीन होतं, तेव्हा मुळात त्या संगणकीय गोष्टी नवीन होत्या. मला एम्ब्रॉयडरीबद्दल माहिती असली, तरी ते सगळे प्रोग्रॅम करणे अवघड वाटायचे. या मशीन्सला प्रोग्राम देताना आपल्याला हवी ती रंगसंगती असलेलं डिझाइन, साइज आणि त्या त्या रंगांचे दोरे योग्य ठिकाणी सेट केले की बाकी काम मशीन करतं. पण हे होईपर्यंत खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं. कारण चुकीची सेटिंग्ज केली तर सगळंच वाया जाऊ शकतं. पण मग सरावाने ते जमत गेलं. यात आणखी एक आव्हान हे असतं की संगणकावर दिसणाऱ्या डिझाइनचा प्रत्यक्षात वेगवेगळ्या कापडाच्या प्रकारांवर उठावदारपणा वेगळा दिसतो. त्याचासुद्धा विचार करावा लागतो.

आता जेव्हा मोठं मशीन आणलं, तेव्हा या सगळ्याशी ओळख असल्याने कठीण वाटलं नाही. पण नवीन मशीन घरात आणण्यासाठी एक आ़ख्खी भिंत फोडावी लागली. पर्यायाने घरातले बदल अपरिहार्य होते. पण व्यवसायाचा एक भाग म्हणून हे होतच राहतं.

काम करायला कारागीर मिळणं हेही एक फार अवघड काम. ज्यांना थोडीफार माहिती आहे अशा मशीन्सची, त्यांना मी शिकवू शकते. पण त्यांची कामाची तयारी हवी. शिवाय एवढ्या लांबच्या लहान गावात राहायला त्यांचा होकार हवा. माझ्या घरातच माझा व्यवसाय चालतो, घरात माझी मुलं आहेत. त्यामुळे काम करणारी व्यक्ती विश्वासाची हवी. कारण २४ तास जर कुणी घरात राहणार असेल, तर मुलांची सुरक्षिततासुद्धा खूप महत्त्वाची आहे. सध्या जो काम करतो, तो राजू मूळचा उत्तर प्रदेशचा, पण मुंबईहून आला. तिथे अशाच प्रकारचं काम करायचा. आता घरातला सदस्य म्हणूनच राहतो. आता तोही माझ्या बरोबरीने "ये ऐसा करके देखेंगे, वैसा नहीं करेंगे" असं काय काय सुचवत असतो आणि प्रयत्नही करतो. या मुलांना मी अशा पद्धतीने शिकवते की त्यांना पुढे स्वतंत्र असे काही करायचं असेल, तर करता आलं पाहिजे. रंगसंगती, डिझाइन या बाबतीत मी कटाक्षाने लक्ष देते आणि ते सगळं ठरवलं की मग मशीनचं काम कारागीर करतो. इतर काही कामंही असतात. मशीनवर काम नाही, पण दिवसातून दोन तासांच्या कामासाठीसुद्धा फार कमी जण तयार होतात.

एकदा एक कारागीर अचानक काही न सांगता गायब झाला. ग्राहकांच्या ऑर्डर्स अशी कारणं देऊन अडवून ठेवू शकत नाही. अशा वेळी मला कंबर कसून जास्त काम करावं लागतं. पण सगळी माहिती असल्याने मी ते करू शकले.

कधीकधी मला वाटतं की परदेशात माझ्या कामाची दाखल घेतली गेली, पण इथे आजूबाजूला मात्र काही ठरावीकच लोक आहेत, ज्यांनी या कामाचं कौतुक केलं, मला प्रोत्साहन दिलं. यात इथले गावातले लोक आलेत आणि सरकारी कार्यालयातले लोकसुद्धा. ही एक खंत नेहमीसाठी आहे.

प्रश्नः या संपूर्ण प्रवासात घरच्यांबद्दल काय सांगशील?

रेखाताई: कुटुंबीयांची साथ हे सगळ्यात महत्त्वाचं. लहानपणापासून आईबाबांनी दिलेलं प्रोत्साहन तर होतंच. त्याशिवाय माझ्या पतींनी यात मला खूप मोठी साथ दिली आहे. मी बाहेरगावी असताना घर सांभाळण्यापासून तर माझ्यासोबत गावोगाव भटकणं, मला शक्य नसेल तर माल घरी आणणं आणि शिवाय या कामाचं कौतुक करणं.... हे सगळं नसतं, तर आज हे यश मिळालं नसतं. मी इथे नसताना मुलंही सहकार्य करतात. त्यांनी जर आईचा पदर सोडला नसता, तू कुठेही जायचं नाही हा धोशा लावला असता, तर हे कधीच शक्य झालं नसतं. त्यांना माझ्या आईकडे ठेवून मी बाहेरगावी जाते, तेव्हा निर्धास्तपणे जाऊ शकते यामागे माझे पती, मुलं आणि आईबाबा या सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे.

प्रश्नः मराठी लोक आणि व्यवसाय याबद्दल मराठी माणसाला धंदा जमत नाही असा लोकांचा नेहमीच दृष्टीकोन असतो. तुला या बाबतीत काय वाटतं आणि आता याच क्षेत्रात काम केल्यानंतर काही वेगळं जाणवलं का?

रेखाताई: मराठी लोक व्यवसाय करतच नाहीत असं नाही. अर्थात मलाही पूर्वी फारशी माहिती नव्हती. जशा माझ्या ओळखी वाढू लागल्या, तसे मलाही अनेक मराठी व्यावसायिक भेटले. त्यातही एकमेकांना साथ देणारे असे हे व्यावसायिक आहेत. पण अजूनही कदाचित मोठ्या प्रमाणात हे दिसायला हवं. अशी यशस्वी उदाहरणं लोकांसमोर जेवढी जास्त येतील, तेवढं नवीन लोकांना उद्युक्त करता येईल. माझ्यासाठी असे बरेच सहव्यावसायिक नेहमीच स्फूर्ती देणारे आहेत. फक्त हे सगळं आणखी व्यापक स्वरूपात व्हायला हवं.

प्रश्नः या क्षेत्रात येऊ बघणाऱ्या, किंवा एकूणच व्यवसायाची सुरुवात करणार्‍यांना तू काय सांगशील?

रेखाताई: तुम्ही जे करता, ते तुमचं ओरिजिनल काम हवं. पैसे देऊन तंत्रज्ञान अनेक जण आणू शकतील, पण या सगळ्यातली कला, त्यात बारकाईने लक्ष घालणं, पैसे मिळत आहेत म्हणून काम करण्यापेक्षा ते खरंच त्या व्यक्तीला छान दिसेल का, हा विचार करून मी काम करते. रंगसंगती ठरवते. माझी कल्पकता मी प्रत्येक साडीत, प्रत्येक वस्तूत पणाला लावते. माझ्याकडचा एक कारागीर सुरतला अशाच एका साड्यांच्या कारखान्यात कामाला होता. तिथे फार विचार न करता एकाच डिझाइनच्या हजारो साड्या तयार होत असतात. पण माझं काम कितीही वाढलं, तरीही मी त्यात जातीने लक्ष घालायला हवं असं मला वाटतं.

या क्षेत्रात सतत नवीन शिकत राहावं लागतं आणि एकदा व्यवसाय करायचा ठरवलं की मग झोकून द्यावं लागतं. तुमचं नाव झालं की लोकांच्या मागण्याही वाढतात, त्या सगळ्याशी जुळवून घेणं ही तारेवरची कसरत असते. जसं साड्या ही माझी सुरुवात होती, पण त्या लोकांना आवडताहेत म्हणून फक्त तेवढंच करून भागणार नाही. हे क्षेत्र सतत बदलत असतं. नवीन फॅशन येत राहतात. एकच एक प्रकार ६ महिन्यांत तर कधी दोन वर्षांत कंटाळवाणा होतो, जुना होतो. त्यामुळे तुम्हाला बाहेरच्या जगाचा सतत आढावा घ्यावा लागतो.

मला नेहमी वाटतं की बचत गट हे महिलांच्या एकीकरणाचं स्वरूप आहे. कलाकौशल्य असणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याकडे आहेत. पण घराबाहेर पडण्याची, मेहनत करण्याची तयारी असेल आणि घरच्यांचं सहकार्य असेल तर अनेक जणी पुढे येऊ शकतील. जेव्हा मी आता वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाला जाते, तेव्हा कित्येक नवीन क्षेत्रांची माहिती मिळते. महिलांनी किती प्रगती केली आहे हे दिसून येतं. कशिदाकाम हे माझं क्षेत्र, पण या प्रदर्शनात याशिवाय कितीतरी वैविध्यपूर्ण व्यवसाय करणाऱ्या आणि धाडसी, ध्येयवादी महिलांबद्दल माहिती मिळते, नवीन शिकायला मिळतं, आणि हुरूपही येतो.
.

प्रश्नः भविष्यात तुझ्या आणखी काय नवीन कल्पना आहेत?

रेखाताई: आता दहा वर्षांनी जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा समाधान तर आहेच, पण आणखी नवीन काय करता येईल हेच उद्दिष्ट आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुबईच्या प्रदर्शनादरम्यान तिथले लोक म्हणाले की तुम्ही मुंबईत व्यवसाय उभारा. आम्ही सगळा एक्स्पोर्ट करू. पण असं सहजासहजी एकदम इथून तिथे जाणं शक्य नाही. तिथे अगदी जागाही द्यायला लोक तयार आहेत, पण म्हणून सगळं लगेच जमून येईल असं नाही. तरीही त्या दृष्टीने भविष्यात विचार करता येईल. सध्या मुख्य शहरापासून दूर असल्याचा, इथे बुलडाण्यात बऱ्याच सोयीसुविधांचा अभाव, कारागिरांची कमतरता या काही गोष्टींची खंत आहे. त्यात काय प्रयत्न करून माझं काम सोपं होईल यासाठी विचार डोक्यात येतात. पण अजून प्रत्यक्षात घडू शकलं नाही. शिवाय काही ठिकाणी, उदा., मार्केटिंग, फेसबुकसारखी माध्यमं वापरून, आणखी जास्त चांगल्या प्रकारे तंत्रज्ञान शिकून स्वतःला अधिक सक्षम बनायचं आहे. पण सध्या हाच डोलारा पुरतो आणि काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. पण आता लवकरच मी १२ हेडच आणखी एक मशीन या वर्षी घेणार आहे, म्हणजे दुप्पट वेगाने काम होईल आणि उत्पादन वाढेल. यासोबतच रसिका पैठणी - म्हणजेच जरीच्या प्लेन काठांवर पैठणीचं कशिदाकाम केलेल्या साड्या करण्याचा विचार आहे. आता स्वप्नं वाढली आहेत आणि मुख्य म्हणजे ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आजवरच्या वाटचालीत मिळाला आहे.

या मुलाखतीसाठी तुझे मनःपूर्वक आभार!! तुझ्या व्यवसायासाठी अनाहिता आणि मिसळपावच्या संपूर्ण टीमतर्फे अनेकानेक शुभेच्छा!!

धन्यवाद. या मुलाखतीच्या निमित्ताने मी आणखी जास्त लोकांपर्यंत माझं काम पोहोचवू शकले, याचा आनंद आहे. पुणं, मुंबई इत्यादी शहरात माझी प्रदर्शनं होतात. कधीही आलात आणि रसिका स्टिच वर्क्स दिसलं, तर अवश्य भेट द्या.
माझा ईमेल आयडी - rasikaembroidaryworks@gmail.com
माझा पत्ता आणि संपर्क क्रमांक - रसिका स्टिच वर्क्स, चिखली रोड, बुलडाणा - ९४२२४४९६८८

रसिका स्टिच वर्क्स सुरू झालं, त्याआधीपासून मी रेखामावशीला ओळखते. जेव्हा मी पहिल्यांदा तिच्या साड्या पाहिल्या, तेव्हापासून ते आताच्या उत्तमोत्तम कलाकृतींपर्यंत तिचं काम प्रत्यक्ष पाहिलं आहे. प्रत्येक वेळी गेल्यानंतर त्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, पर्सेस, वॉलपीसेस बघणं म्हणजे डोळ्यांना मेजवानी असते. शिवाय मग दर वेळी काहीतरी नवीन प्रकार बघायला मिळतात आणि तिच्या कल्पकतेची कमाल वाटते. हे इतकं देखणं, अप्रतिम काम बघून सगळंच घ्यावंसं वाटतं. तिने स्वबळावर उभं केलेलं हे विश्व नेहमीच प्रेरणादायी वाटायचं. या मुलाखतीच्या निमित्ताने या तिच्या यशामागची मेहनत, तिचे आधारस्तंभ, अडचणीतून तिने काढलेला मार्ग हे मला जाणून घेता आलं आणि कितीतरी गोष्टी नव्याने कळल्या. कशिदाकामाचे हे देखणे धागे विणणं किती चिकाटीचं आणि मेहनतीचं आहे, हे बघून तिच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला. 'उंच माझा झोका' या अनाहिता महिला दिन अंकाच्या निमित्ताने हे सर्व मांडता आलं, याचा मनापासून आनंद आहे

विशेष सूचना - कुठल्याही खरेदी-विक्रीबाबत किंवा व्यवहाराशी अनाहिता आणि मिसळपाव प्रशासनाचा संबंध नाही.
===========================

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

8 Mar 2017 - 4:21 pm | मनिमौ

अप्रतिम. फारच सुरेख कलाकुसर आहे. पुढच्या वेळी विदर्भात गेल्यावर आवर्जून भेट देणार मी.

पैसा's picture

9 Mar 2017 - 1:17 pm | पैसा

प्रचंड आवडलंय हे. आपल्याला सगळ्यानाच शिवणकाम, भरतकाम थोडेफार तरी आवडते, पण ते एवढ्या मोठ्या उंचीवर नेणे! _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2017 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम कलाकुसर ! आपली कला जगभरात पोचवलेल्या एका मराठी उद्योगिनीची ओळख आवडली !

अभ्या..'s picture

9 Mar 2017 - 2:07 pm | अभ्या..

मस्तच.

बुलडाणा म्हनजे बरेच लांब सोलापूरपासून. आमच्या गावात असतं हे युनिट तर खूप काम दिलं असतं. (इथलं युनिट १२ हेडचे आहे पण माणूस फार माजुरडा आहे हो)

एनीवे तुमच्या ह्या क्रियेटिव्ह कामाला खूप शुभेच्छा. आडनावात का होईना सोलापूरकर आहात म्हणून जास्त शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 3:05 pm | संदीप डांगे

त्रिवार वंदन! हे जितकं वाचायला सहज वाटतं तितका सोपा आणि सहज प्रवास नाहीये! रक्त घाम अश्रू ओतूनच इतक्या उंचीवर पोचता येते...

असामान्य रेखाताई!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 5:03 pm | प्रीत-मोहर

+११

इच्छाशक्ती , मेहनत , ,कलाकारी आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम आहेत रेखाताई.

अजया's picture

11 Mar 2017 - 4:01 pm | अजया

ग्रेट!
या हिरकण्यांना प्रसिध्दी मिळायलाच हवी.

खरोखरच कल्पक! किति सुंदर काम आहे.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 4:19 pm | वरुण मोहिते

आता रेक्लमेशन ला एक्स्पो लागलाय तिकडे खूप ओळख होते कित्येक वर्षांपासून अश्या क्षेत्रातील ..

सर्व फोटो सुरेख आहेत. त्यांनी केलेले प्रामाणिक कष्ट सर्व उत्तरांमधून जाणवत राहिले. त्यांनी स्वत: नेसलेली साडी व ब्लाऊज सुंदर आहेत.

नूतन सावंत's picture

13 Mar 2017 - 10:19 am | नूतन सावंत

कलाकुसर हे कष्टाचे काम आहे,त्याचा व्यवसाय करून तो वाढवणे हे त्याहून कष्टाचे काम आहे,ही दोन्ही आव्हाने पेलणाऱ्या रेखातैना सलाम.
मधुरा छान विस्त्त्रृृत मुलाखत घेतली आहेस.

मोदक's picture

13 Mar 2017 - 11:07 am | मोदक

सलाम..

यांचे फेसबुक पान ही धाग्यात अ‍ॅडवा.

https://www.facebook.com/Rasika-stich-works-1845374312357294/

सविस्तर आणि प्रेरक मुलाखती साठी आभार मधुरा !

सुंदर काम..कल्पक अगदी..असामान्य रेखाताईंना सलाम..

सपे-पुणे-३०'s picture

19 Mar 2017 - 4:12 pm | सपे-पुणे-३०

किती आकर्षक काम आहे ! रेखाताईंची एक यशस्वी उद्योजिका म्हणून या मुलाखतीतून जितकी ओळख झाली तितकंच त्यांचं व्यक्तिमत्त्व सुद्धा प्रतिबिंबित झालंय. मधुरा त्याबद्दल तुझे आभार. मला रेखाताईंना भेटायला नक्की आवडेल.

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 7:52 pm | स्वाती दिनेश

जादू आहे ह्या रेखाताईंच्या हातात.
मधुरा, छान मुलाखत.
स्वाती

चाणक्य's picture

19 Mar 2017 - 11:14 pm | चाणक्य

आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचेही आभार.

खरंच फारच प्रेरणादायक प्रवास आहे हा.
या मुलाखतीसाठी धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

उत्तम लेख. एका नव्या प्रकारच्या व्यवसायाची ओळखं झाली.