आठवणी दाटतातः रस्ता तेथे एस टी

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
24 Dec 2016 - 1:15 pm

.inwrap
{
background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26...);
background-size: 100%;
background-repeat: repeat;
}

रस्ता तेथे एस् टी

मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. वर्षात दोन सुट्ट्या. त्यामुळे चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. लाल बसनी बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते (महाड मार्गे) पाचगणी सात तासांचा प्रवास.

रस्त्यांची अवस्था बिकट. त्या रस्त्यांवर धावून धावून गाड्याही खिळखिळ्या. ड्रायव्हरनी इंजिन सुरू केलं की सतारीच्या तरफेच्या तारांप्रमाणे बसचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे थरथरायचा. सीटवर बसल्यावर आपलं डोकं जिथे टेकतं तिथे हल्ली कुशन असतं. ते लाड तेव्हां नव्हते. एक लोखंडी आडवा बार असायचा. शाळकरी वयात झोप अनावर होतेच. त्यामुळे पाचगणी (किंवा मुंबईला) पोहोचेपर्यंत डोक्याला मागे एक आडवं टेंगूळ यायचं. मुंबईला आईकडून टेंगळाचे लाड व्हायचे. मात्र पाचगणीला मित्रमंडळी त्याच्यावरच टपल्या मारून वेदनांची नवनवीन शिखरं दाखवायचे.

भरपूर गर्दी, प्रचंड उकाडा, अविरत थरथराट, गरम इंजिनमधून येणारा डीझेलचा वास आणि वळणावळणाचे रस्ते. या कॉकटेलमुळे खूपच जणांना बस लागायची. खिडकीपर्यंत पोचायला देखील वेळ मिळाला नाही तर बसमध्येच उलटी होणार. मग त्याचा दर्प! त्या ट्रिगरमुळे आणखी एखाद्याला बस लागणार. पुढच्या स्टॉपला एस्टीचा कामगार पाणी टाकून ते धुवून काढणार. प्रवास पुढे चालू.

वाचून असं वाटतं की असला प्रवास म्हणजे कसले हाल! पण तसं नव्हतं. माओ-त्से-तुंग ने लिहिलं आहे, “गरिबी भयावह केव्हां वाटते? जेव्हां तुलना करायला समोर श्रीमंती असते तेव्हांच.” उन्हाळ्यातला एस्टीचा प्रवास हा असाच असतो हेच गृहितक असल्यामुळे त्याचा त्रास व्हायचा नाही. (प्लीज नोट - ‘मामाच्च्या गावाला जाऊया’ या गाण्यात प्रवास ट्रेनचा आहे. एस्टीचा नाही!)

असाच एकदा मी पाचगणीला चाललो होतो. बहुदा सातवीत असेन. तिघांच्या सीटवर माझी aisle सीट. माझ्या सीटवर मधुचंद्राला निघालेलं जोडपं. माझ्या शेजारी नवरी, खिडकीशेजारी नवरा. नवरा ‘आ’ वासून डाराडूर ! बायको मात्र अस्वस्थ. मळमळण्याची सर्व लक्षणं दिसत होती. सबंद चेहरा पुन्हा पुन्हा चोळायचा, अस्थिर नजर – बाहेर बघायचं, लगेच आत, खाली, वर, पुन्हा बाहेर, मधूनच दीर्घ श्वास घेऊन सुस्कारा, पुन्हा पुन्हा आवंढा गिळायचा, मला उलटीच्या आधीचे सर्व classic symptoms पाठ होते.

शेवटी तिच्या पोटानी बंड पुकारलंच. तिनी घाईघाईनी पिशवीतून पंचा काढला, एका उमाळ्यात पोट पंचात रिकामं केलं आणि सांडू नये म्हणून वरून पंचाच्या मुसक्या बांधल्या. आपण चक्का बांधतो ना? तसा! मी टुणकन उडी मारून सुरक्षित अंतरावर उभा. तिनी चक्का तसाच हातात धरून उजव्या कोपरानी ढोसून नवर्याला उठवलं. “अहो, अहो. मला उलटी झाली.”

नवरा साखरझोपेतून जागा होऊन परिस्थिती त्याच्या लक्षात येईपर्यंत काही क्षण गेले. तोपर्यंत चक्का पंचातून बाहेर झिरपून थेंब पडण्याच्या बेतात होता. ते बघून तो बिथरला. त्यानी तिच्या हातातून पार्सल खसकन् ओढून घेतलं आणि खिडकीच्या बाहेर टाकून दिलं!

ती बिचारी “अहो आपला पंचा! आपला पंचा!” म्हणेपर्यंत पंचाचं विसर्जन झालं देखील!

त्यानी पंचा बाहेर टाकला मात्र, इरसाल शिव्या बाहेरून ऐकू आल्या आणि काही सेकंदातच कचकन् ब्रेक लावून बस थांबली! नवर्याच्या दुर्दैवानी चार रावण दोन राजदूत मोटारसायकल्सवर बसून चालले होते त्यातल्या दोघांना पंचाचा प्रसाद मिळाला होता ! त्यांनी मोटारसायकली आडव्या घालून बस थांबवली होती.

दोघेजण मागच्या दरवाज्यापाशी येऊन उघडण्यासाठी धडपडू लागले. त्यांच्या बर्याच शिव्या मी पूर्वी न ऐकलेल्या होत्या. कंडक्टर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करंत होता. “बस लागती तेला कोन काय करनार? धोयाला पानी देतो.” मात्र दरवाजा काही उघडू देत नव्हता. इथे डाळ शिजत नाही असं पाहिल्यावर दुसर्या दोघांनी ड्रायव्हरचा दरवाजा खुशाल उघडला आणि चढायचा प्रयत्न करू लागले. कंडक्टरसकट आम्हा सगळ्यांचं लक्षं पुढे गेलं त्याचा फायदा घेऊन मागच्या दोघांनी आत हात घालून मागचा दरवाजा उघडला आणि आत आले. कोणी पंचा टाकला होता ते त्यांनी बघितलेलं असावं. सरळ आमच्या सीटकडे येऊन “बाजू हो रे पोरा” असं म्हणत मला खसकन् उचलूनच बाजूला काढलं. नवर्याला कॉलरला धरून ओढलं आणि ठोकायला लागले. कंडक्टरसकट बाकी प्रवासी मधे पडले आणि लवकरच शांतता प्रस्थापित झाली. पण तोपर्यंत चार सहा तरी full blooded बुक्के बिचार्या नवर्याला खायला लागले होते.

फिरकीचे तांबे असलेल्यां प्रवाशांनी पाणी देऊ केलं. मांडलिक राजाप्रमाणे नवर्यानी रावणांचे शर्ट आणि केस धुतले. हळुहळु शिव्यांचा पूर आटला. फटफट्यांवर बसून ते चौघे रवाना झाले आणि आमचा प्रवास पूर्ववत् सुरू झाला.

पूर्ववत् म्हणजे खरोखरच पूर्ववत्.

दहा मिनिटे जेमतेम गेली असतील नसतील. बायकोचा रडवेला सूर मला ऐकू आला. “अहो, मला पुन्हा उलटीसारखं वाटतंय्. तुम्ही पंचा पण टाकून दिलात”

“मग कर ना ! माझ्या अंगावरच कर आता !”

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

24 Dec 2016 - 1:19 pm | संजय पाटिल

आरारारा...

शलभ's picture

24 Dec 2016 - 1:35 pm | शलभ

:D

तुषार काळभोर's picture

24 Dec 2016 - 2:03 pm | तुषार काळभोर

बिच्चारा... बिच्चारी...

गवि's picture

24 Dec 2016 - 2:45 pm | गवि

अरे देवा...

अजया's picture

24 Dec 2016 - 4:24 pm | अजया

:)

झिंगाट's picture

24 Dec 2016 - 9:23 pm | झिंगाट

शी........

Rahul D's picture

24 Dec 2016 - 10:55 pm | Rahul D

प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचा तुमचे कसब वाखण्यासारखे आहे.
लोल.

चांदणे संदीप's picture

25 Dec 2016 - 12:41 am | चांदणे संदीप

बिच्चारा... बिच्चारी...

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2016 - 12:51 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी अनुभव !!! =)) =))

तिनी चक्का तसाच हातात धरून >>> असं कशाला लिहिलंत ? आता श्रीखंड खाताना दर वेळेस तुमच्या लेखाची आठवण येणार =))

विशुमित's picture

29 Dec 2016 - 3:20 pm | विशुमित

अगदी अगदी...

कंजूस's picture

25 Dec 2016 - 9:49 am | कंजूस

आता हे पंचावर न लिहिता टिशुपेपरवर (वाळूचं डिझाइन )छान केलंत.

प्रचेतस's picture

25 Dec 2016 - 10:38 pm | प्रचेतस

खतरनाक.
ह्या अशाच एकाच आठवणीवर थांबू नका, तुमच्याकडे बरेच किस्से आहेत,येऊद्यात बैजवार.

खेडूत's picture

25 Dec 2016 - 10:51 pm | खेडूत

सॉलिड आठवण..
आजही कितीतरी ठिकाणी यष्टीला पर्याय नाहीच...
यष्टीच्या गोष्टीच गोष्टी- किती सांगाव्यात?

पैसा's picture

25 Dec 2016 - 10:52 pm | पैसा

अरारारारा!

किसन शिंदे's picture

25 Dec 2016 - 11:49 pm | किसन शिंदे

=)) =)) भयानक!!

कळवा पुलावरचा किस्सा आठवला एेरीलाला कचेरीत कामाला असतानाचा. त्यावेळी तर जशास तसे केले होते बुलेटवाल्याने.

स्वीट टॉकर's picture

26 Dec 2016 - 9:45 am | स्वीट टॉकर

डॉक्टरसाहेब,
मी आता चितळ्यांची एजन्सी घेत आहे. तुम्ही घरी चक्का लावूच नये, आमच्याकडून तयार श्रीखंड विकत घ्यावं म्हणून तर मी हा लेख लिहिला आहे! ;)

अजया's picture

29 Dec 2016 - 8:49 am | अजया

=)))

चावटमेला's picture

29 Dec 2016 - 12:42 am | चावटमेला

खरोखर च एक 'दाटलेली' आठवण :)

भारी अनुभव.. पण एकच आठवण लिहिलीत त्यामुळे जरा अपेक्षाभंग झाला..

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2016 - 9:02 am | टवाळ कार्टा

आरारारा =))

यावरुन एमटीडीसीने कोंकण प्रमोशनसाठी खालील गाण्याचा व्हिडो बनवावा.

चाल: "वाक्का वाक्का", गायिका: शकिरा.

एस्टीमधून या या
ओक्का ओक्का या या
एस्टीमधून या या
यंदा या कोंकणात..

बाळ सप्रे's picture

29 Dec 2016 - 4:16 pm | बाळ सप्रे

एस्टी रस्ते आणि उलटी एक समीकरण होतं.. क्वचितच एखादी एस्टी उलटीचे डाग नसलेली दिसायची..
काही खास गोळ्या पण मिळत एस्टीत उलटी होउ नये म्हणून..

बऱ्याच वेळा पाहिले आहे, एखादा प्रवासी घाई घाईत एस टी त चढतो, बरेच लोक उभे असतात पण एक सीट रिकामी असते. क्षणाचा ही विलंब न करता मटकन जाऊन बसतो, काही सेकंदांनी लक्ष्यात येत सीट वर कोणीतरी शीट (उलटी) केलेली आहे.

उभे असणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लाजवाब... जागतिक कीर्तीचा दिग्दर्शक सुद्धा कोण्या ही कलाकारांकडून ते दिग्दर्शित करून घेऊ नाही शकत..

खरच तेव्हा प्लास्तिक पिशव्या पण नव्हत्या . खरतर अश्या लोकानि औशध घेउन्च बाहेर पडावे. नाहितर काहि खाउ
नये.

मदनबाण's picture

30 Dec 2016 - 8:18 pm | मदनबाण

यक्क्क....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]