राजमाची नावाचं मनोरंजन

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
14 Jun 2016 - 8:49 pm

काल पाऊस आणण्यासाठी सह्याद्रीत भटकावे म्हणून राजमाचीला जाणं झालं.कोंदिवडेमार्गे चढताना पाऊस लागला त्याअगोदर जांभळं खायला मिळाली.यावेळेस फोटोग्राफर मिपाकर स्टीव रॅाजर्स/ स्पा/मन्या इत्यादी एकचसोबत होता.फोटोग्राफीच्या टिप्स मिळणार होत्या.येताना तो एक विशलिस्ट घेऊन आलेला.म्हटलं बघू त्यातलं किती जमतंय ते.कर्जत गाडी येवो नाहीतर स्टेशनवरच फिरून आणलेला डबा खाऊन परत जाऊ.
वेळेवर कर्जतला गेलो आणि वडा ,डोसा चहा घेऊन सिक्ससीटर ओटोरिक्षा नाका/आमराई नाकाकडे कूच केलं.कर्जत बाजारही बदलत चाललाय गावरानपणा हरवून नवीन दुकाने येत आहेत.चौदा किमी अंतर उल्हास नदीकाठाने जाऊन कोंदिवडे गावात पोहोचलो तेव्हा साडेआठ वाजले होते.पावसाळी हवा आणि दूरवर दिसणारे राजमाचीचे मनोरंजन शिखर पहात खरवंडी गावाकडे चालत निघालो.ही वाट अधिक रम्य आहे,झाडीची आहे आणि हळहळू वर चढते.परतताना कोंडाणे लेणी -कोंडाणे गावाकडून येणार होतो.ही चढाची वाट फार दमवते आणि उजाड वाटते.ओटोसाठी परत कोंदिवडे गावातच यावं लागतं.धरण झालं तरी ही वाट बहुतेक बंद होईल/फिरवतील.एक गाव उठण्याच्या बदल्यात इकडचं दृष्य फारच सुरेख होईल हे मात्र खरं.खरवंडी गावाच्या आमराईतले आंबे संपलेले पण विहिरींना पाणी भरपुर होतं.एक छोटंसं गणेश देऊळ माघी गणपतीत गावकय्रांस बोलावतं.वाटेने वर चढतानाच पाऊस सुरू झाला आणि स्पा'ने विशलिस्टच्या दुसय्रा आयटमवर चेक केलं.(जांभळं खाणं पहिलं होतं. आंब्याचं प्रश्नचिन्ह बाकी आहे.)वरती एक वाजता पोहचताना परत जाणाय्रा पर्यटकांची रांग 'भेटली'."खाली उतरायला किती वेळ लागतो?" या प्रश्नाने हे लोक लोणावळा मार्गे आल्याची खात्री पटली.पण इकडून का जात होते सर्व हे नंतर कळलं.वाटेत गाडी फसली होती.
रविवार दुपारी राजमाचीला पोहोचत होतो तेव्हा मोठ्या संख्येने आदल्या दिवशी आलेले पर्यटक खाली कोंडाण्याकडे उतरत होते.वरती शिरिष हॅाटेलचे जानोरे म्हणाले " काल इथे पाय ठेवायला जागा नव्हती.गडावर,तळ्याकडे,देवळाकडे मिळेल तिथे तंबू लागले होते.सर्वांचा एकच प्रश्न - काजवे पाहायला मिळणार का? एक पाऊस झाला की ते गायब होतात हे सांगून थकलो." हे सर्व फेसबुकच्या खरडींच्या प्रसिद्धीमुळे बहुतेक.रात्री दोन चार तुरळक काजवे चमकत होते पण हजारो काजव्यांचा डिस्कोलाइट शो असतो तो संपल्याने पर्यटक नाराज होऊन परतले.इतके दोन अडिचशे लोक वर राहूनही प्लास्टिक कचरा { राजगडावर असतो तसा} अजिबात नव्हता हे विशेष.

फोटो १) खरवंडी वाटेवरचे गणेश मंदीर
फोटो २) थोडे वरून
फोटो ३) वाटेत फोटो घेताना
फोटो ४) हॅाटेल शिरिष,पर्यटक आश्रयस्थान.
फोटो ५) तलावाकडे.
फोटो ६ ) तलाव.गोधनेश्वर मंदिराजवळ
फोटो ७) गोधनेश्वर मंदिर.
फोटो ८) गोधनेश्वर मंदिर. २
फोटो ९ ) नंदी, गोधनेश्वर मंदिर.
फोटो १०)पटांगण, गोधनेश्वर मंदिर
फोटो ११ ) मनोरंजन शिखर,गडाचा मुख्य पाण्याचा साठा यावर आहे.पुढे काळभैरव मंदिर.
फोटो १२)काळभैरव मंदीर
फोटो १३) फुलांचे फोटो काढताना
फोटो १४)रानफुले
फोटो १५) रानफुले
फोटो१६) कोंडाणे लेणी.
फोटो १७) कोंडाणे लेणी.२
फोटो १८) कोंडाणे लेणी.३

वरच्या रम्य वातावरणाने सुखावलो.शिरिष हॅाटेलात पोहे चहा घेऊन तलावाकडे गेलो.

तसं राजमाचीला बय्राचदा जातो.विशेष लक्षात घेण्यासारखी स्थित्यंतरं दिसताहेत.स्वच्छता भयानक वाढलीय ,भयानक कारण इतर गडांवर वाइट होत चाललीय.गडाचं रूप निरनिराळ्या दगडी वाटा बांधकामांमुळे लोभस होतंय.माहितीच्या पाट्या.गडावर जेवण राहाणं सोयी पुरवणारे गावकरी वाढले आहेत.
पर्यटकांची नवीन पिढी मात्र वेगळ्याच कोनातून पाहू लागली आहे."इथे येऊनच दोन खंभे घेऊ, रात्रीचा गड पाहू आणि सकाळी परत कामावर हजर राहू."
गावकरी म्हणतात "सरळ उभे राहता येत नाहीये तरी तळ्यावर आंघोळीला जातात.मागल्या महिन्यात दोन बुडाले.दोनचारजण अती करताहेत पण दुर्घटना झाली की वाइट वाटते.काही गपचीप पडून राहातात ते ठीक आहे.रात्री तीनलाही पर्यटक उठवतात चहा पोहे मागवतात त्यांच्यासाठी करतोच पण हे पिणारे राडा करतात त्यांच्यासाठी उठावेसेही वाटत नाही."

काल रात्री बाराला एक ग्रुप बाइक घेऊन आला.त्यापैकी एकजण श्रीवर्धनवरवर पाय घसरून पडला दोन वाजता. बेशुद्ध अवस्थेत खाली आणलं गावात.सकाळी धुक्यात दहा फुटांवरही दिसत नव्हते ते अंधारात दोन वाजता काय दिसणार होते? चार वाजता गाववाल्याच्या सुमोतून लोणावळ्याला नेलं.त्याची नवी कोरी बाइक तिथेच पडलीय. आता पोलीस पंचनामा होणार, ग्रुपमधल्या सगळ्यांची चौकशी होणार कोणी मुद्दामहून ढकलले का वगैरे. हेच लोक सकाळी हापिसात फुशारकी मारणार होते -" रातोरात गड 'मारला' आणि सकाळी हजर."
एकूण गडांकडे बघण्याची वृत्ती बदलतेय.

रात्री काजवे पाहाण्याची अपेक्षा नव्हतीच कारण पाऊस होऊन गेला होता इकडे.सोलर लाइट लागलेला तो दोन तासाने बंद झाल्यावर काजवे तुरळक दिसू लागले.सकाळी दोन्ही शिखरांवर जाऊन खाली गावात चहा पोहेसाठी आलो.

६ ) मनोरंजन शिखर,गडाचा मुख्य पाण्याचा साठा यावर आहे.पुढे भैरवनाथ मंदिर.

परतताना कड्यावर एक ठाकरबाई आणि तिची दहाएक वर्षांची मुलगी करवंदं शोधत होताना दिसली. "तुमचं गाव हे उधेवाडी का?"
" नाही,ते खाली दिसतंय मुंढेवाडी कोंडाण्याच्या बाजूला ते." "धरणात आमचं गाव उठतंय."
"इतक्या वरती आलात?"
"हो ,यावर्षी करवंद फार कमी लागलीत. ही घेऊन समोरच्या डोंगरावर ठाकरवाडी रेल्वे गाड्या थांबतात तिथे विकणार.सकाळी चार आणि दुपारी दोनच गाड्या थांबतात." तोपर्यंत मुलीने काढलेली करवंदं एका खळग्यात लपवून ठेवली. "पाटी भरत नाही म्हणून काढून ठेवतो,उद्या नेणार विकायला."
अठराशे वर्षांपुर्वीची पाण्याची टाकं गावाला अजूनही पाण्याची सोय करतात, पंधराशे वर्षांपासून हा डोंगर वापरात आहे, चारशे वर्षांपुर्वी एक शिवाजी नावाचा राजा मोगलांशी लढण्यासाठी हा किल्ला वापरायचा,१८१८ मध्ये इतरांनी वापरू नये म्हणून इंग्रजांनी बरेचसे बांधकाम उध्वस्त केले. इथल्या जीवनावर 'माचीवरला बुधा' कादंबरी येऊन पन्नास वर्षं झाली, आता आमच्या मनोरंजनाचे काम सार्थकी लावतोय.

कोंडाणे लेणीमार्गे आलो.लेण्यांची डागडुजी करण्याचं पुरातत्व खात्याने ठरवलेलं दिसतंय.उभे खांब पडलेले होते तिथे (कार्ल्याच्या लेणीत आहेत तसे) सिमेंटचे बसवत आहेत.स्तूप देखील दुरुस्त करणारेत.चला काही संपूर्ण तरी बघता येईल.आहे तसं तुटकंफुटकं बघण्यापेक्षा बरं.

खाली मुंढेवाडी वस्ती आहे ती धरणात उठणार आहे मशिनरी येऊन जय्यत तयारी झालीय.
कोंडाणे धरण नियोजित.काम पावसाळ्यानंतर सुरू होणार.पन्नासेक ट्रकस,डंपर,जेसिबी येऊन उभे आहेत आवारात.कोंडाणे गावापुढेच भिंत येणार.

तिथल्या आमराईत एक पिकलेला आंबा मिळाला आणि विशलिस्टवर शेवटची खूण झाली.मी कोय आणली, या रायवळांची रोपे जोमदार होतात.

प्रतिक्रिया

खरडफळ्यावरचे प्रतिसाद इथे पुन्हा देतोय.
""
प्रचेतस
Tue, 14/06/2016 - 11:52
राजमाची खूपदा अनुभवलाय. आता खूप बदललाय. तरीही पूर्वीच्या दिवसांची सय अजूनही येते. मी किमान १५ वेळा माचीवर गेलो असेन पण बिलिव्ह मी, मी अजून मनरंजनवर गेलो नाहीये. जाणं नेहमी होतं ते श्रीवर्धनलाच. मनरंजनची बाजू तिथून खूप छान दिसते.
एकदा भैरवनाथाच्या राउळापलीकडच्या झाडोर्यांत घुसलो होतो असंच. खूप घनदाट अरण्य आहे तिथे. एकदा ऐन पावसांत मधल्या ओढ्याच्या वाटेने साखळी करुन गेलो होतो. एकदा बिबट्याचे आवाज अगदी जवळनं ऐकले होते. तलावाकाठचं ते मंदिर आहे ते यादवकालीन आहे. टिपिकल स्तंभ आहेत तसे. एकदा कोंडाणे लेणी पाहण्यासाठी तिथून उतरत असताना मनरंजनच्या बाजूने दात विचकत एक हुप्प्या अंगावर आला होता. सहसा हुप्पे कधी अंगचटीला येत नाहीत.
काजव्यांनी लगडलेली झाडे तिथेच पाहिली होती. मधल्या फणसराईत रात्रभर भेकरांचं भुंकणं सतत सुरु असे.
खूपश्या आठवणी आहेत माचीच्या.""
***

नंदन
Tue, 14/06/2016 - 13:56
"अठराशे वर्षांपुर्वीची पाण्याची टाकं गावाला अजूनही पाण्याची सोय करतात, पंधराशे वर्षांपासून हा डोंगर वापरात आहे, चारशे वर्षांपुर्वी एक शिवाजी नावाचा राजा मोगलांशी लढण्यासाठी हा किल्ला वापरायचा,१८१८ मध्ये इतरांनी वापरू नये म्हणून इंग्रजांनी बरेचसे बांधकाम उध्वस्त केले. इथल्या जीवनावर 'माचीवरला बुधा' कादंबरी येऊन पन्नास वर्षं झाली, आता आमच्या मनोरंजनाचे काम सार्थकी लावतोय."
-- भेदक, मार्मिक इ. म्हणण्यापलीकडले!

"रविवार दुपारी राजमाचीला पोहोचत होतो तेव्हा मोठ्या संख्येने आदल्या दिवशी आलेले पर्यटक खाली कोंडाण्याकडे उतरत होते.वरती शिरिष हॅाटेलचे जानोरे म्हणाले " काल इथे पाय ठेवायला जागा नव्हती.गडावर,तळ्याकडे,देवळाकडे मिळेल तिथे तंबू लागले होते.सर्वांचा एकच प्रश्न - काजवे पाहायला मिळणार का? एक पाऊस झाला की ते गायब होतात हे सांगून थकलो." हे सर्व फेसबुकच्या खरडींच्या प्रसिद्धीमुळे बहुतेक.रात्री दोन चार तुरळक काजवे चमकत होते पण हजारो काजव्यांचा डिस्कोलाइट शो असतो तो संपल्याने पर्यटक नाराज होऊन परतले."
-- काजवे हे रुपक/प्रतीक अगदी चपखल आहे इथे.
अवांतर - हे आठवलं ('कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो' इ.)

नूतन सावंत's picture

14 Jun 2016 - 9:29 pm | नूतन सावंत

कंका,सुरेख.

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 9:31 pm | प्रचेतस

राजमाची म्हटलं की आठवतं ते वेळीअवेळी जाणं, उन्हापावसाचं फ़िरणं, पांगळोलीच्या घळीतनं उतरणं. परतीच्या मार्गावर हीच घळ चढणं मोठं जीवावर येणं, फ़णसराईनजीकचा तो धबधबा, डावीकडची दरी, उजवीकडची कातळभिंत ती पण मैलोनमैल आपल्यासहच चाललेली. ढाकचा रस्ता सोडून मधेच डावीकडे वळनं, तो तिथला गर्द रानाचा पट्टा, त्यातनं जाणारा मधूनच तीव्र होणारा तो हलकासा चढ़, रानपक्ष्यांचे आवाज, मधनंच हुप्याचं किचकिचणं, ते कुकुडकोंब्याचं हुप हुप, तो मधेच खळाळणारा ओढा, हाच ओढा माचीवरुन तळात झेपावाताना खूप सुरेख दिसतो, ते सरळ, डावीकडे परत उजवीकडे असे असे अखंड दिसतात राहणारे आवळेजावळे डोंगर, माचीची मूळ वेस, माची आवाक्यात आलीच असं वाटूनही पुढे सुरूच असणारी मैलाची वाट, ते झाडाखाली उघड्यावरच असणारं वीराचं स्मारक, ती हनुमानाची मूर्त, ते भैरवनाथाचं राऊळ, श्रीवर्धनाचा उत्ताल कडा, ऐन बालेकिल्ल्याच्या थोड्या खाली अगदी दरीच्या कडेला असणारं थंडगार पाण्याचं टाकं, ती तलावाच्या वाटेवरची आमराई, समोर दिसणारा ढाकचा बहिरी, तो नाकाड़ पुढे काढलेला मांजरसुंबा...

खूप आठवणी आहेत माचीच्या.

उल्का's picture

14 Jun 2016 - 10:14 pm | उल्का

खूप छान लिहिलंय.
फोटो पण सुंदर आहेत.

चला, परत एकदा राजमाचीला जायला हवे. छायाचित्रणासाठी हा परिसर म्हणजे स्वर्ग आहे. खूप छान वर्णन आणि तसेच प्रतिसाद आहेत. स्पा यांनी काढलेले फोटो पहायला आवडतील.

सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. लेख अतिशय आवडला.
माचीला जायचा योग कधी येईल कोणास ठाऊक. तोवर तुमच्या लेखावर समाधान मानले आहे.

सत्याचे प्रयोग's picture

14 Jun 2016 - 11:21 pm | सत्याचे प्रयोग

छान फोटो आणि वर्णन. पावसाळी वातावरणात जाणे तर सोने पे सुहागा

पद्मावति's picture

15 Jun 2016 - 1:29 am | पद्मावति

मस्तं!

स्पा's picture

15 Jun 2016 - 9:13 am | स्पा

राजमाची

यावर इतके काही वाचले होते, ऐकले होते पण प्रत्यक्ष जायचा योग येत नव्हता,पुण्याकडची काही मंडळी लोणावळ्याहुन जाम चालावे लागते म्हणुन बरीच वर्षे कलटी देत होती
शेवटी कंजूष काकांसोबत जायचा योग आला.मुद्दामुन रविवार सोमवार जायचे ठरले.म्हणजे गर्दी टाळता आली असती.कर्जतहुन कोंडीवड्याला वेळेत पोचलो, वातावरण भयानक गरम होते, काळे ढग चुकार येउन जात होते. एका विहिरीवर आधी पाणी भरुन घेतले, गणपतीला नमस्कार केला, आजुबाजुला जांभळांनी लगडलेली झाडी होती.मजबुत जांभळे हादडली आणि चालायला लागलो, कंजूष काकांच्या स्टॅमिनाला हॅट्स आॅफ, या वयातही हा माणुस न थांबता तरुणांना लाजवेल अशा वेगात किल्ले चढतो. वाटेत अनेक पक्षांची माकडांची साथ होतीच, मध्येच एक वीराचे स्थान दिसले, अधुनमधुन अनेक ओैषधी झाडांची ओळख कंकाका करुन देत होते.तेवढ्यात मुसळधार पावसाने गाठलेच,तसेच न थांबता चालत राहीलो.कर्जत बाजुने मजबूत चढण आहे. माथा काय येता येत नव्हता.आठ वेळा ओढा ओलांडून शेवटी वर पोहोचलो. तोवर दोन वाजलेले होते, उधरवाडीत अप्रतिम चहा पोहे मिळाले, अनेक हुच्च भ्रु ट्रेकर्स( नखशिखांत ब्रांडेड अॅकसेसरीझ ने युक्त) आजुबाजुला फिरत होते. कोणी अंकल इधर वाॅशरुम किधर हे विचारत होतं, कोणी सँडविच मिल सकताय का? असे अनेक बालिश प्रश्न , शेवटी एकदाचे सगळे परतीच्या मार्गाला लागले , शे पाचशे पब्लिक निघुन गेल्यावर उधेवाडी परत शांत झाली. आम्हीही भटकंतीला निघालो. उदयसागर तलाव पाहिला,गोधनेश्वराचे अप्रतिम देउळ पाहिले.आता बालेकिल्ल्यात जायची ना ताकद होती ना इच्छा . पाच सहा तासाची तंगडतोड झालेली होती. येताना परत एक चहा मारला, आणि काळभैरवनाथाच्या देवळात मुक्काम केला. वाटेत बरेच पक्षी दिसले, नावे माझ्या लक्षात राहात नाहीत ( कंकाका सांगतील). देऊळ छानच होते, फरशीबंद पटांगण होते. समोर श्रीवर्धन मागे मनोरंजन आजुबाजुला गच्च जंगल, याच शांततेच्या शोधात आलेलो होतो.ओले झालेले कपडे सुकवायला ठेवले,निवांत बसुन राहिलो. हळुहळु अंधार साचायला लागला, तुफान वारा सुटलेला होता,मेणबत्या होत्या पण त्यांनी टिकाव धरला नसता. म्हणुन रात्रीचे जेवण लवकरच उरकून घेतले. साफसफाई केली आणि मग गप्पा रंगल्या. कंकाका म्हणजे महाराष्ट्राचा चालताबोलता विकिपडिया आहे :)
पण माझ्या दुर्दैवाने त्यांना एकदाही कुठे अमानवीय शक्तीचा अनुभव आलेला नाही. रात्र झाली तसे अधुन ममधून काजवे चमकायला लागले ,अगदी खुप नसले तरी काजवे बघायची इच्छा पूर्ण झाली.रात्री पावसाचा आणि वार्याचा जोर इतका वाढला की आम्ही सरळ आत देवळात येऊन झोपलो. सकाळी उठल्यावर बालेकिल्ला पाहून आलो ,पण इतके धुके होते की फोटो काढता नाही आले.येताना परत चहा पोहे झाले, टाक्यांचे मधुर पाणी रिफिल केले आणि परतीला लागलो, येताना कोढांणे मार्गाने आलो, कारण लेणी पहायच्या होत्या. खुपच सुंदर पण आता उध्वस्त झाल्यात.तिथे त्या शांततेत थोडा वेळ बसलो आणि परतीला लागलो, खाली पावसाचा पत्ता नव्हता रणरणत्या उन्हात कोंडीवडे पर्यत पाय रेटत आलो.यावर्षीच्या पावसाळी ट्रेकिंगची सुरुवात मात्र दणक्यात झाली

नाखु's picture

15 Jun 2016 - 9:30 am | नाखु

धन्यवाद. जरी पुरेसे फोटो नसले तरी चित्रदर्शी वर्णन आवडले.

राहते घर गाव पाण्याखाली जाणार या कलपनेने कसे तरी झाले (आणि पिंची मध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण करून झोपडपट्टी बाधणार्यांचे लाड पाहून) आणखीनच वाईट वाटले. त्यांचे रीतसर आणि रास्त ठिकाणी पुनर्वसन झाले आहे का?

तुमच्या बरबर एकतरी ट्रेक करण्याची इच्छा असलेला नाखु

जगप्रवासी's picture

15 Jun 2016 - 10:47 am | जगप्रवासी

वर्णन इतक तपशीलवार असत की सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात.

कंकाका (शब्द जाम आवडला) सोबत एकतरी ट्रेक करायची इच्छा आहे.

अभ्या..'s picture

15 Jun 2016 - 12:25 pm | अभ्या..

से थँक्स टू मी फॉर कंकाका.
कंकाका इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत. एक ट्रेक तो बनता है उनके साथ.

कंजूस's picture

15 Jun 2016 - 10:58 am | कंजूस

"पुरेसे फोटो नसले तरी चित्रदर्शी वर्णन आवडले."
गडाचे फोटो वेगवेगळ्या कोनांतून घेतले तरी काही फारसा फरक येत नाही.इतर फुले,झाडे इत्यादिंचे भरपूर काढले आहेत.थोडे आणखी सोबती टाकेल तर वीस होतील मग धागा लोड होत नाही ओरड सुरू होईल.हवे असल्यास व्यनि करतो कारण खरडवहीतील काढता येत नाहीत.

कंजूस's picture

15 Jun 2016 - 11:04 am | कंजूस

एक भाजेलेणी भेट झालीय.
तुम्हास आम्हास जमणारा ट्रेक म्हणजे कोंडेश्वर(कामशेत मार्गे वीस किमी रस्ता आहे). वल्लीकडे विषय काढा.तिथेच वर फिरू.पुण्याकडून ट्रेक असा होतच नाही कारण तुम्ही वरतीच साडेपाचशे मिटरसला असता.२) आळेफाटा- माळशेज आल्यास हरिश्चंद्रगड आहे पण तो खतरनाक अवघड आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Jun 2016 - 11:36 am | स्वच्छंदी_मनोज

वल्लीकडे विषय काढा.तिथेच वर फिरू. >>> अहो, आम्ही राजमाची कट्टा करूया, तु प्लॅन कर आम्ही आलोच अशी विनंती करून थकलो वल्लीभौना पण कट्टा करण्याचे ते काय मनावर घेईनात :( :(

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 11:47 am | प्रचेतस

हल्ली जावंसं नाही वाटत नाही राजमाचीला.

तिथे लेणी नसल्याने तेवयेणार नाहीत, आम्ही गेली ४ वर्षे आगरह करुन झाली

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 12:01 pm | प्रचेतस

आहेत रे. खाली कोंडाणे आहेत. खुद्द गडावर कोरीव लेणं आहे. मनरंजनच्या पोटात खोदीव टाकी आहेत. पण हल्ली तिथली गर्दी सहन होत नाही. राजमाचीला शांतता मिळायचे दिवस गेले.

पावसाळ्यात नुसतं फणसराईपर्यंत जाऊन येऊ. एक तुफान धबधबा आहे तिथे. भिजू मनसोक्त.

चौकटराजा's picture

15 Jun 2016 - 3:33 pm | चौकटराजा

अलिकडे एक दर्पणसुंदरीचे शिल्प असलेली शिळा सापडली आहे म्हणे तिथे मग ,,,,,,,,

मुक्त विहारि's picture

15 Jun 2016 - 11:31 am | मुक्त विहारि

थोडी जळजळ झाली...आता इनो घेतो.

बादवे,

स्पाला भेटलात ते बरे झाले.

आम्हाला स्पाला भेटून युगे लोटली.

स्पा's picture

15 Jun 2016 - 12:04 pm | स्पा

खिक्क

मुक्त विहारि's picture

15 Jun 2016 - 1:30 pm | मुक्त विहारि

आता ह्या स्पाचे काय करावे?

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 12:06 pm | प्रचेतस

आम्हाला भेटलेला रतनवाडीत. :)

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Jun 2016 - 11:33 am | स्वच्छंदी_मनोज

कंकाका खफवरच्या विनंतीला मान देऊन नवीन धागा काढल्याबद्दल धन्यवाद. वर्णन आणी फोटो मस्त..

राजमाचीच्या खुप जुन्या आठवणी आहेत. अनेक वेळा राजमाचीला जायचा योग आलाय आणी साधे खेडेगाव ते पर्यटन स्थळ असे गावाचे स्थित्यंतरही पाहीलेय.
राजमाची ते ढाक असा एक ट्रेक राहीलाय आता कधी होईल ते बघायला हवे.

विनंती कशाला,धडाधड धागे काढीन पण मग भटकंती धाग्यांचा अतिरेक ओरड होते.खफवर थोडी चाचपणी केली. तुम्ही,वल्ली रविवार काढता आणि अशा ठिकाणी गर्दीला सामोरे जावे लागते.

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 12:47 pm | प्रचेतस

काही ओरड होत नाही. झाली तरी दुर्ल़क्ष करायचं आपण. मी नै का टाकले धडाधड ६/७ :)

शनि/रविवार शिवाय इतर दिवशी जमत नाही हो. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Jun 2016 - 1:21 pm | स्वच्छंदी_मनोज

ह्येच म्हणतो मी.

किसन शिंदे's picture

15 Jun 2016 - 1:12 pm | किसन शिंदे

काका शेवटचे राजगडावर कधी गेलेलात?

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 1:19 pm | प्रचेतस

किसना राजांचा मावळा आहे. सारखा राजगडावर जायला बघत असतो. :)

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Jun 2016 - 1:22 pm | स्वच्छंदी_मनोज

राजगडावर जायलाच ७ वाटा आहेत. कुठल्याही वाटेना जा आनंदच मिळतो..

राजगड- किसणा जन्मो जन्मीचे णाते आहे ते

किसन शिंदे's picture

15 Jun 2016 - 2:52 pm | किसन शिंदे

तसं नाही.

इतके दोन अडिचशे लोक वर राहूनही प्लास्टिक कचरा { राजगडावर असतो तसा} अजिबात नव्हता हे विशेष.

याबद्दल म्हणतोय मी. गेली तीन वर्षे सलग जातोय, पण मला तुम्ही म्हणता फार जास्त प्लास्टीकचा कचरा आढळला नाही.

दहा वर्ष झाली.आता सुधारलंय का?राजमाचीवर कोणी येऊन जेवण बनवून खाणारे कमी असतात तर राजगडावर पाणी मुबलक ,कोठारं राहायला,जेवण देणारे गावकरी नाहीत त्यामुळे ताटल्या पेले वर आणतात ते परत नेतीलच असं नाही - दरीमध्ये लोटत असतील.

नाखु's picture

16 Jun 2016 - 4:45 pm | नाखु

नक्की काय खरे हा लेख म्हणतो ते का वरचा प्रतिसाद?

शंकायनी नाखु

किसनाच्या दोन्ही डोळ्यात फक्त राजेच दाटलेले असतात , त्यांना मुजरा ठोकला झाले
हे कचरा वेग्रे सगळे मोह माया आहे

नाखु's picture

16 Jun 2016 - 5:02 pm | नाखु

असंही असेल.

पट(ले)ला नाखु

हा लेख वल्लीच्या खवत कालच चिकटवलाय.

सस्नेह's picture

15 Jun 2016 - 1:31 pm | सस्नेह

फोटो आणि वर्णन, म्हणण्यापेक्षा मनोगत आवडले.

वेल्लाभट's picture

15 Jun 2016 - 2:26 pm | वेल्लाभट

फार आवडलेलं ठिकाण. आणि एक अविस्मरणीय ट्रेक - माझी राजमाचीशी ओळख.
तुमचं वर्णनही आवडलं.. मस्त.

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 5:22 pm | प्रचेतस

ती आमराईतंनं जाणारी दगडी फरसबंद वाट खूप छान दिसतीय.
गोनीदांच्या तालमीत तयार झालेल्या मुकुंद गोंधळेकरांची राजमाची ग्राम सहाय्यक समिती खूप छान काम करत आहे. किल्ल्याचं जुनंपण जपून ठेवून नव्या सुधारणा.

शान्तिप्रिय's picture

15 Jun 2016 - 5:29 pm | शान्तिप्रिय

मिसळपाववर भटकंतीचा धागा म्हणजे नागपुरात संत्री, सोलापुरात चादरी, शिमल्यात सफरचंद आणि पुण्यात पुणेरी पाट्या.

अजया's picture

15 Jun 2016 - 6:43 pm | अजया

राजमाची भेट देण्याच्या यादीत वरचा नंबर लावून आहे! कधीतरी एखादा मधला दिवस बघून जायला हवे.पण एका दिवसात परत येणे झेपणारे दिसत नाही.
{कंकाकांच्या किल्ला चढण्याचे वर्णन ऐकल्याने या वयात लिहिण्याचे टाळले ;)}

एका दिवसात अशक्य आहे हो काकु

कंजूस's picture

15 Jun 2016 - 6:48 pm | कंजूस

आणखी काही फोटो

१ ) फूल अॅरोरूट?

२ ) गोधनेश्वराचे खांब

३ ) फूल रानहळद

४ ) श्रीवर्धन प्रवेश

५ ) कोंदिवडे लेण्याचे खांब नवीन करताहेत

६ ) वर जाताना कोंदिवडे ते घाटमाथा GPS track data

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 7:41 pm | जव्हेरगंज

अरे वा भारी!!

Rahul Sable's picture

30 Jun 2016 - 8:06 pm | Rahul Sable

५ जून ला रविवारी मी एकटाच पुन्याहून राजमाची ला गेलो होतो निमित्त होते काजवे पाहन्याचे आणि कँमेर्यात टिपन्याचे.डेक्कन क्विन ने सकाळी साडेआठला लोनावळ्यात पोहोचल्यानंतर माझी तुंगार्ली मार्गे पायपीट सुरू केली पहिल्यांदाच राजमाची वर जात होतो तेही लोनावळावरून पायी त्यामुळे आंतरजालावरून सर्व माहिती गोळाकरून निघालो. अपेक्षेपेक्शा १४ ते १५ किमी अंतर साडेचार तासात पुर्ण करून भैरवनाथ मंदिरा जवळ पोहोचलो. एवढ्या लवकर पोहचने शक्य झाले ते एका व्रुध्द स्थानिक माणसाने दाखवलेल्या शार्टकट मुळे जो मार्ग उधेवाडीकडे न जाता श्रीवर्धनच्या मागील बाजूने दोन्ही बालेकिल्ल्याच्या मधे असलेल्या भैरवनाथ मंदिरा जवळ जातो. दुपारी ढगाळ वातावरणात दोन्ही बालेकिल्ले पाहून उधेवाडीतून श्रीगोधनेश्वर मंदिरा जवळ न्याहारी केली. नंतर संध्याकाळ होईपर्यंत तळ्यावर माश्यांना खायला टाकून टाइमपास केला राञी उधेवाडीत निलेश वरे यांच्याकडे जेवण केले. जेवण झाल्यावर काजवे पाहण्यसाठी कँमेरा घेऊन निघालो किरकोळ काजवे दिसले माञ कँमेर्यात टिपता नाही आले निराश होऊन पुन्हा उधेवाडीतील निलेश वरे यांच्याकडे मुक्कामासाठी आलो. दुसऱ्यादिवशी सकाळी चहा नाश्ता घेऊन आठ वाजता उधेवाडीतून पायी चालत निघालो तासभर अंतर कापल्यावर एका बाईक वरून लिफ्ट घेऊन जुन्या मुंबई पुणे हाईवे वर आलो तेथील पुन्हा पायपीट करून लोनावळा स्टेशन वर आलो. असा हा माझा या महिन्यात केलेला राजमाचीचा पहिला ट्रक.

स्वच्छंदी_मनोज's picture

30 Jun 2016 - 8:15 pm | स्वच्छंदी_मनोज

राहुलभौ,

ट्रेक बद्दल अभिनंदन पण काळजीचा सल्ला -

तुमच्या सांगणानुसार, तुम्ही एकट्याने आणी तेही आंतरजालावरून आणी वर परत नेहेमीची वाट सोडून शॉर्टकटने ट्रेक केलात? असे करू नका हो. एकट्याने ट्रेक करण्यात निसर्गाशी तादात्म्य, एकरुपता, निर्भेळ आनंद वगैरे असेलही पण सोलो ट्रेक करताना झालेल्या अपघातांची बरीच उदाहरणे माहीती आहेत. तेव्हा सोलो ट्रेक टाळाच.

पुट्रेशु.

Rahul Sable's picture

10 Jul 2016 - 8:05 pm | Rahul Sable

मी नेहमीच योग्य ती काळजी घेऊनच ट्रेकिंग करतो कारण मला माझ्या मर्यादा माहिती आहेत पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे

खूप सुंदर लेख. मस्तच लिहिलय. राजमाचीच्या आठवणी जाग्या झाल्या.