फाटक्या

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
28 May 2015 - 11:59 pm

३-४ दिवस मस्त सुट्टी जुळून आली होती . . आणि पुढे आम्ही टाकली होती . . गेले ८ महिने निस्ते काम काम काम याच्यातच घालवले होते . अगदी रविवारी पण काहीना काही काम काढून एक्स्ट्रा पैसा मिळवण्याच्या मागे होतो . पण आता कंटाळा नुसता भरून राहिला होता सगळी कडे . सो . बेंगलोर ला जायचं ठरलं . कॉलेज ची १-२ कार्टी होतीच तिथे . त्यांना फोनाफोनी झाली . आणि २ दिवस बेंगलोर -मैसूर ट्रीप . आणि एक दिवस त्यांच्या रूम वर बसून ओल्ड मंक आणि तंदुरी चिकन ची आराधना . असा फक्कड प्रोग्राम ठरला होता . . त्याप्रमाणे बुधवार संध्याकाळी मी न आकीब बस मध्ये चढलो होतो .

हा माझा शाळेपासूनचा मित्र . . मैत्रीला सुरुवात झाली पाचवी मध्ये . आम्हाला कन्नड विषय सुरु झाला होता . . जो अतिशय रटाळ वाटे . त्यात शिकवणारी बाई फक्त धडे वाचून जात असे . काय घंटा कळणारे अश्याने . आणि तेव्हा आम्हाला . एक हुशार मुलगा आणि एक साधारण पास क्लास मुलगा एकत्र बसवत . तिथेच हा भेटला . आणि एक गोष्ट दोघांच्या लक्षात आली होती . त्याचं कन्नड भन्नाट होतं . त्याची आई कन्नड माध्यमात शिकली होती . . आणि मुख्य म्हणजे शिकली होती . . इतर विषयात मी वस्ताद होतो . इंग्रजी हिंदी इतिहास या विषयांना कधी पक्की वही केलीच नाही . परीक्षेच्या २-३ दिवस आधी पुस्तक वाचायचं . आणि त्यावर नुसता पेपर भरत जायचा. हे विषय कधी पाठ करून जायचे नाहीत . हे घरातच शिक्षिका अस्ल्युअमुले समजलं होतं . मिळायचे ८५-९० . सो . परीक्षेच्या वेळेस एक ठराव पास झाला आमच्या दोघात . . बाकीच्या विषयात मी त्याला ७०+ घेऊन जाणार . तो मला कन्नड मध्ये ७०+ घेऊन जाणार . सिम्पल डील होती . आणि दहावी पर्यंत यात कधी खंड पडला नवता . .

त्यानंतर दोघांनी मिळून नुसता धिंगाणा घातला होता शाळेत . . आणि एवढं करून परीक्षेत व्यवस्थित फर्स्ट क्लास येत होतो , वर मिळेल त्या खेळात आणि स्पर्धेत उतरायचो . त्यामुळे कुठलेही टीचर काही करू शकत नवते आम्हाला . .
आता हाच मुलगा माझ्या बाजूला बसला होता . . या अतिशय जवळच्या मित्रांचं एक बरं असतं . ६-६ महिने भेटलो नाही , बोललो नाही तरी काही फरक पडत नाही . अगदी २ गल्ल्या सोडून घर आहे . तरीही भेट नाही होत . पण तरी भेटतो तेव्हा अगदी नॉर्मल चाललेलं असतं सगळं . . तोच दंगा , तीच चेष्टा मस्करी , आणि अगदी तेच काळजीचे शब्द . "आदी . साले सिगरेट कम कर . धुवे मे मर जाएगा साले खास खास के " आणि आमचं निलाजरेपणाने त्याला उडवून लाऊन विषय भलतीकडे वळवणे . सगळं अगदी रोज भेटत असल्यासारखं . .

सीबीटी हून बेंगलोर बस पकडली . ड्रायवर च्याबाजुला इंजिन कवर वर बसलो होतो . थंडीचे दिवस असल्यामुळे बुडाखालूनमिळत असलेली उब मस्त वाटत होती . आणि ड्रायवर , कंडक्टर दोघेही गप्पिष्ट होते . . मस्त गप्पा मारत दंगा करत चाललं होतं सगळं . आणि तेवढ्यात त्याच्या घरून फोन आला . . चेहरा अगदी काळवंडला त्याचा एकदम . .
"क्या हुआ?
" फाटक्या को फोन लगा. नंबर है तेरे पास? "
समजलो काय समजायचं ते . . इकडून तिकडून नंबर मिळवून फोन लावला . .

"बोला मराठे साहेब . एवढ्या रात्री काय काम काढलात . " जवळपास ११ वाजता फोन केला तरी ह्या माणसाचा आवाज जराही दमलेला नवता . .
"माशिदिसामोरचे मकानदार माहिती आहेत का? " मी
"हो . स्टेट बँक वाले ना? " फाटक्या

"हो . बायको गेली त्यांची . .पहाटे बिस्ती ला बोलवा . आणि तुमची नेहमीची मंडळी पण सांगा . " मी
"ठीक आहे . . तुझ्या बाबांना पण मीच सांगतो . . तू आता फोन नको करूस . घरी पोच . " फाटक्या .

फाटक्या . . किंवा अतुल फाटक . . अर्धं गाव याला केबल वाला म्हणून ओळखतं . . हे डिश टीवी प्रकरण मोठं व्हायच्या आधी याचा हाच धंदा होता . आता टाटा स्काय चा डीलर आहे . . तसा हा त्याचा मोकळ्या वेळेतला धंदा आहे . . मुख्य उद्योग . लोकांना अंत्यसंस्कारात मदत करणे .

प्रत्येक गावात असा एक तरी मनुष्य असतो . जो गावातल्या प्रत्येक अंत्यसंस्कारात पुढाकार घेतो . घरातली मंडळीना जेव्हा हि दुखद बातमी कळते , तेव्हा पहिला ते या माणसाला बातमी पोचवतात . पुढे तिरडी बांधण्या पासून ते स्मशानात दहन /दफन करण्यापर्यंत सगळे सोपस्कार हा पूर्ण जबाबदारीने पार करतो . .आता गाव संस्कृती ज्यांनी पहिली आहे त्यांना असा एक तरी माणूस नक्कीच आठवेल . नाही तर च्यायला एका बिल्डींग मध्ये वर्षानुवर्ष राहून एकमेकाची नावे कळायची मुश्किल आजकाल . . बरं हे सगळं तो पैश्यासाठी करतो का? तर नाही .

"मयताला खांदा दिला कि चार धाम केल्याचं पुण्य मिळतं लेका . कोणाकडे मयताच्या लाकडाला पण पैसे नसतात . तेवढाच आपला हि दानधर्म रे . तुम्ही गरिबाला खायला देता , त्याच्या पोरांना शाळेला पाठवता , फी भरता , पुस्तकं देता , आम्ही मयताला सगळं करतो . हे पण कोणी तरी केलंच पाहिजे ना? अरे अद्द्या सांगतो तुला . . आमच्या अज्ज्याच्या वेळेस सगळी मिळून ९ माणसे होती रे , आयुष्य भर भांडला साला सगळ्यांशी , ते संत म्हणाले ना . इथली पापे इथेच फेडावी लागतात . ती अशी. अरे स्मशानापर्यंत खांदे द्यायला लोक कमी पडले रे . तेव्हा पासून माझा बा गावात सगळ्या मयताला जातोय . आणि मी पण जातो . आणि पैश्याचं म्हणालास तर पडून आहे रे . आज आहे उद्या नाही . . कुठे तरी लोकांच्या उपयोगी पडावं . . लोक बामन बामन म्हणून आधी पाया पडत होती . आता जवळ पण करत नाहीत . भिक मागायची पण पंचायत करून ठेवले साली या जातीने . . असो . भोगतोय इथेच . . काय बरोबर ना? "

हि अशी माणसे . . याच्या बरोबर अजून ३ लोक असत . पांढरा बोडस (तरुणपणी टायफाईड झाला , आणि त्यानंतर हा माणूस कातडीचा रंग जाउन अक्षरशः पांढरा पडत गेला ) , लाकूड भिडे आणि मराठे मेस्त्री . . यातील बोडस हा स्टेशनरी दुकान चालवतो . भिड्या जळावू लाकडं विकतो , आणि मराठे लेथ मशीन चालवतो . . पण जवळपास च्या १०-१५ गल्ल्यात कोणी गेलेलं समजलं . मग तो हिंदू जैन मुस्लिम लिंगायत बेडर किंवा आणखी काहीही असो . हे हजर. अगदी कित्येक वेळा न बोलावता हि .

हि सगळी पन्नाशी उलटलेली माणसं . पण गावातली पोरं पण एकेरी हाक मारायची . हे लोक राहायचे हि तशेच . कुठे जाताना वाटेत पोरं दिसली कि त्यांच्यात खेळ , कुठे कोणाला पकडून त्याची बोटंच मोड , कोणाला दोन्ही कानाच्या बाजूला धरून उचलून 'सूर्य दाखव' आणि नंतर सगळ्यांना लीम्लेट किंवा अर्काच्या गोळ्या दे , असले प्रकार करत जाणारा असेल कोणी तर तो दोस्तच नाही का? आणि दोस्ताला कोण अहो जहो करतं?

तर रात्री १ च्या सुमारास आम्ही घरी पोचलो . फाटक्या आणि मकानदार (आकीब चे वडील ) बाहेरच थांबले होते आमची वाट बघत . . जबरदस्तीने खायला घातलं दोघानाही . आणि मग मुख्य चर्चा तिथेच सुरु झाली . . कधी उचलायचं आहे . नातेवाइक कधी पर्यंत येणार . . इत्यादी . . पण मला भीती हि होती . कि नवीन आलेला मौलवी या "बामणांना " या सगळ्या प्रकारात पुढे येऊ देईल का . .

झोप येण्याची शक्यता नवतीच . . आकीब रडत नवता . . पण काही बोलतही नवता . एकटाच शांत उभा होता गच्चीवर जाउन . घरात रडारडी करून दमलेल्या बायका हळू हळू झोपी चालल्या होत्या . . मित्राच्या वडिलांना एक-दोन तास झोप घ्यायला सांगून मी पण गच्चीवर गेलो . .
हे सगळं होई पर्यंत ३ वाजले होते . . पहाटेच्या अजान पर्यंत आम्ही तिथेच उभे होतो . एक शब्द नाही दोघांच्या तोंडून . मधेच जाऊन तो सिगरेट चं पाकीट घेऊन आला माझ्याच बेगेतून . पुढचे दोन तास फक्त तेवढीच काय ती हालचाल . .

पहाट झाली तशी सगळे लोक यायला लागले परत . आवराआवरी सुरु होईल म्हणून त्याला खाली पाठवलं . घरी जाउन पटकन आंघोळ उरकली . आणि निघणार तेवढ्यात मागून बाबांचा आवाज . . " थांब रे , भिडे अन बोडस इथेच येतेत . सगळे एकत्र जाऊ . . फाटक्या येईल तिथेच . ."

थोडा वेळ थांबून निघालो . फाटक पोचला होताच तिथे . त्याने बिस्ती ला पण बोलावलं होतं . . बिस्तीची बायको आणि बहिण यांनी मिळून मित्राच्या आईला शेवटची अंघोळ घातली अन तो देह अगदी सजवला होता फुलांनी , दागिन्यांनी . . मित्राच्या वडिलांनी एक गोष्ट चांगली केली होती . . सगळ्यांनी सकाळी नाश्ता केल्या शिवाय कोणत्याही कामाला हात लाउ नये असा दम भरला होता . . चाची ला लोकांना खायला करून घालायला खूप आवडायचं. अगदी आपले पदार्थ सुद्धा त्यांनी शिकून घेतले होते . . इतकी सुंदर गुळाची पोळी करायच्या . वाह . . असो . .
शुक्रवारचा दिवस होता त्यामुळे दुपारचा नमाज संपवूनच बाहेर पडू असं ठरलं सगळ्याचं मिळून . वेळ जवळ आली तसं मौलवी आणि त्यांचे ते " जमात के लोग " पण आले . . आणि होऊ नये तेच झालं . आल्या आल्या त्याने आम्हा ६-७ लोकांना बाजूला व्हायला सांगितलं . . आणि आम्ही झालो देखील . अपेक्षितच होतं . पण त्यानंतर जे झालं ते कधीच अपेक्षित नवतं . . कोणी हातच लावला नाही पुढे येउन . कोणीच उचलायला पुढे येईना . . तेवढ्यात तिथेच राहणारा एक म्हातारा पुढे होऊन म्हणाला . . "साब ये ४-५ लोग हर मय्यत मी आते . और येइच लोग उठाते . . बेटोंको सिर्फ हाथ लगाने दो . बाकी फिर ये लोग देख लेंगे . . इनके ये बम्मन लोगां बहुत पेढेसो रेहते . आपसे भी ज्यादा . उठाने दो इनको वरना और कोई हाथ नही लगेगा . . "

इतर वेळेस अगदी शांतपणे आपली कामं उरकून निघणाऱ्या फाटक्या च्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी बघितलं त्या दिवशी . .

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

29 May 2015 - 12:23 am | यसवायजी

.

बहुगुणी's picture

29 May 2015 - 1:34 am | बहुगुणी

कथाविषय समाजाच्या गाभ्याला हात घालणारा आहे. चांगलं लिहिलं आहे.

रुपी's picture

29 May 2015 - 4:07 am | रुपी

आवडली.

फक्त विरामचिन्हे अजून काळजीपूर्वक वापरली तर वाचणार्‍याला जास्त सोपं जाईल..

अद्द्या's picture

29 May 2015 - 12:30 pm | अद्द्या

पुढच्या वेळेस लक्शात ठेवेन. . धन्यवाद

किसन शिंदे's picture

29 May 2015 - 4:28 am | किसन शिंदे

कथा आवडली.

यशोधरा's picture

29 May 2015 - 5:14 am | यशोधरा

चांगलं लिहिलं आहे.

मुक्त विहारि's picture

29 May 2015 - 6:30 am | मुक्त विहारि

कथा आवडली....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 May 2015 - 6:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कथा/ अनुभव आवडली रे.

सस्नेह's picture

29 May 2015 - 6:50 am | सस्नेह

अगदी स्वाभाविक पण भिडणारे लेखन !

प्रचेतस's picture

29 May 2015 - 9:58 am | प्रचेतस

सुंदर लिहिलंस रे.

नाखु's picture

29 May 2015 - 10:08 am | नाखु

_/\_ !!!!

हळवा नाखु

gogglya's picture

29 May 2015 - 10:19 am | gogglya

___/\___

नाव आडनाव's picture

29 May 2015 - 10:41 am | नाव आडनाव

वाचता वाचताच मी माझ्या गावाला जाऊन आलो :) माझ्या गावाचं नाव रांजणगाव मशीद. गावाच्या नावात समजतं तशीच मुस्लिम वस्ती आहे बऱ्यापैकी गावात. सगळ्यांचे आपापसात संबंध चांगले. लग्न असो किंवा मयत, काही पब्लिक असतंच असतं. चांगलं लिहिलंय.

खूप छान लिहिलंय. लिहीत रहा.

पैसा's picture

29 May 2015 - 11:10 am | पैसा

खूप सुरेख लिहिलंय!

अद्द्या's picture

29 May 2015 - 12:29 pm | अद्द्या

धन्यवाद सगळ्यांचे :)

खेडूत's picture

29 May 2015 - 1:43 pm | खेडूत

वाईट अनुभव
- चांगला मांडलाय !

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 1:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

फाटक्या आवडला.

पैजारबुवा,

बॅटमॅन's picture

29 May 2015 - 2:38 pm | बॅटमॅन

एकच नंबर लिहिलायस बे. लैच भारी.

सूड's picture

29 May 2015 - 2:52 pm | सूड

.

अद्द्या's picture

29 May 2015 - 4:08 pm | अद्द्या

धन्यवाद ब्याट्या .

सूड न यस वाय जी . .

" ." हे काय समजायचं !!

सूड's picture

29 May 2015 - 4:24 pm | सूड

मी हे लेख स्पीचलेस झाल्यावर वापरतो.

"मी हे लेख वाचून स्पीचलेस झाल्यावर वापरतो." असे वाचावे

अद्द्या's picture

29 May 2015 - 5:03 pm | अद्द्या

अच्छा :)

यसवायजी's picture

29 May 2015 - 10:18 pm | यसवायजी

स्पीचलेस.
(आवडले असे म्हणता येत नाही अशा वेळेस वाचल्याची पोच.)

नूतन सावंत's picture

29 May 2015 - 4:53 pm | नूतन सावंत

फाटक्याच्याच काय माझ्याही डोळ्यात पाणी आलंय.सुरेख लिहिलंय.

नि:शब्द! कथा असो वा सत्य परिस्थिती, अतिशय सुंदर लेखन. डोळ्याच्या पापणीशी पाणी कधी जमा झाले ते कळलेच नाही.

पगला गजोधर's picture

29 May 2015 - 5:57 pm | पगला गजोधर

पण वेगळय़ा प्रकारचा....

+१ हाच प्रतिसाद टंकणार होते.

मोहनराव's picture

29 May 2015 - 6:05 pm | मोहनराव

_/\_

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 May 2015 - 6:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

_/\_

अद्द्यासाहेब मस्तच लिहिलंय! ये बात! लिहीत रहा!

स्पा's picture

29 May 2015 - 6:34 pm | स्पा

जमलंय एकदम

श्रीरंग_जोशी's picture

30 May 2015 - 7:56 am | श्रीरंग_जोशी

पाणी खोल आहे लेखनाचं.

मितान's picture

30 May 2015 - 12:26 pm | मितान

लेखन आवडले.

मृत्युन्जय's picture

30 May 2015 - 12:59 pm | मृत्युन्जय

लेखन आवडले. पुभाप्र आणि पुलेशु :)

शैलेन्द्र's picture

30 May 2015 - 1:07 pm | शैलेन्द्र

सुन्दर लिहीलय.. आवडल..

गुनि's picture

30 May 2015 - 1:38 pm | गुनि

मनाला भिद्ले!!!!!!!

लेखन आवडले, विरामचिन्हांचं खरंच मनावर घ्या. एवढ्या सुरेख लेखनात गालबोट वाटतं!

राही's picture

30 May 2015 - 2:20 pm | राही

लेख वेगळ्या विषयामुळे तर मनात ठसलाच शिवाय असा दु:खद अनुभव तटस्थपणाने मांडण्याची शैलीही आवडली.
असे सरमिसळ समाजातले आणखी अनुभव आपल्यापाशी असतील तर जरूर लिहावे.

अविनाश पांढरकर's picture

30 May 2015 - 2:29 pm | अविनाश पांढरकर

मस्त लिहिलंय

मधुरा देशपांडे's picture

30 May 2015 - 2:30 pm | मधुरा देशपांडे

छानच लिहिलंय. अशा वेळी हमखास धावुन येणारे आमच्या गावातले काही जण आठवले.

अन्या दातार's picture

30 May 2015 - 10:50 pm | अन्या दातार

अप्रतिम रे अद्द्या. __/\__

प्रसंग अगदी भिडला रावसाहेब!!
पुर्वी ३० उंबरठ्याच्या गावात सरणाचे १०० रुपये आमच्याकडुनच जायचे ते आठवले. परत मिळायचे की नाही माहित नाही, पण एकदा कॉलेजच्या खर्चाचे द्यावे लागले होते पर्स मधुन हे आठवतयं.

पाटील हो's picture

1 Jun 2015 - 11:10 am | पाटील हो

___/\___

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार :)

आणि विराम चिन्हे कमी करेन आता . अगदी लक्षात ठेऊन. सवय लागले ती एक काहीही कारण नसताना

अहो, प्रश्न कमी करण्याचा नाही, ती बरोबर जागी वापरायचा आहे. म्हणजे या कथेतच वाक्य पूर्ण झाल्यावर मध्ये जागा न सोडता पूर्णविराम दिला तरी मला वाटतं ९५% टक्के चुका बरोबर होतील.

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 7:51 pm | पॉइंट ब्लँक

एकदम मस्त लेखन!

एक एकटा एकटाच's picture

1 Jun 2015 - 8:12 pm | एक एकटा एकटाच

छान लिहिलय

पुढिल लेखणास शुभेच्छा

जेपी's picture

2 Jun 2015 - 3:47 pm | जेपी

आवडल..

रातराणी's picture

6 Jun 2015 - 3:49 am | रातराणी

छान लिहिलंय, पु ले शु!

नगरीनिरंजन's picture

6 Jun 2015 - 8:44 pm | नगरीनिरंजन

अतिशय परिणामकारक लिहीलंय! लिहा अजून.

आतिवास's picture

7 Jun 2015 - 7:09 pm | आतिवास

सुरेख आणि परिणामकारक.

स्वाती दिनेश's picture

7 Jun 2015 - 11:09 pm | स्वाती दिनेश

छान,परिणामकारक लिहिलं आहे,
स्वाती

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 4:25 pm | dadadarekar

छान

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 4:54 pm | तुडतुडी

मुसलमान हिंदूंसाठी धावून आल्याचा एखादा प्रसंग कोणाच्या माहितीतला आहे का ?

अद्द्या's picture

13 Jul 2015 - 5:48 pm | अद्द्या

हे का विचारलंय हि महिती आधी दिलीत तर बरं