महिला दिना निमित्त हातावर पोट घेऊन जगणार्या कष्टकरी महिलांची स्थिती दर्शविणारी एक कविता :
सावित्रीच्या लेकी, आम्ही सावीत्रीच्या लेकी
घेऊनिया पोट हाती, जगू पा़खरांच्या साठी
आम्ही सावित्रीच्या लेकी
बालपण गरीबीतूनी, हौस परि शिकण्याची
निरागस बालपणी, गाठ लग्नबंधनाची
नाही तमा उन्हाची ती, नाही पायी वहाणाही
संसाराचा भार माथी, वाटचाल एकटीची
कोवळ्या त्या वयातूनी, ल्याली मातॄत्वाची लेणी
तिला उमगलं नाही, ते वरदान कि शापचि
बासनात पुस्तक पाटी, डाव संसार मांडूनी
वणवण पोटासाठी, एक हाती दुजे पोटी
जीवा ओढ खोपट्याची, चूल तीन दगडांची
खापराचा तवा भांडी, असे तिची ही संपत्ती
अठरा विश्वे दारिद्र्याची, भ्रांत सदाच पोटाची
नाही संपला तो कधी, संग तिचा गरीबीशी
दुर्दम आशा जगण्याची, प्रतिकूल परिस्थिती
जमवूनी काडी काडी, कष्ट घरट्याच्या साठी
नाळ तिच्या शिक्षणाची, तुटून ती गेली
पाखरांना सांगे परि ती, शिक्षणाची महती
अशा सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी
प्रतिक्रिया
8 Mar 2014 - 11:03 pm | आयुर्हित
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी
तिच्या आरोग्य व शिक्षणासाठी,जागवा यंत्रणा सारी
8 Mar 2014 - 11:27 pm | पैसा
महिला दिनाच्या शुभेच्छा!