टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा,
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा..
एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले,
हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले..
शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते,
अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते..
रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही ,
नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही..
कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे,
झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे..
-- शैलेंद्र
प्रतिक्रिया
26 Mar 2012 - 9:32 pm | प्रचेतस
सुंदर.
27 Mar 2012 - 1:58 pm | मूकवाचक
+१
26 Mar 2012 - 9:33 pm | अन्या दातार
छान.
26 Mar 2012 - 9:35 pm | गणेशा
अति सुंदर कविता ..
मनापासुन आवडली..
ग्रेस यांना योग्य मानवंदना !
मस्त शब्द
26 Mar 2012 - 9:41 pm | अत्रुप्त आत्मा
सुंदर... :-)
26 Mar 2012 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2012 - 9:49 pm | यकु
सुंदर!
26 Mar 2012 - 10:08 pm | सांजसंध्या
कविता अत्यंत सुंदर...
आज खूप वेगवेगळ्या काव्यांजली वाचायला मिळाल्या.
26 Mar 2012 - 10:22 pm | पैसा
छान कविता!
27 Mar 2012 - 3:36 am | चित्रा
धन्यवाद. ग्रेस यांना श्रद्धांजली..
26 Mar 2012 - 10:27 pm | चौकटराजा
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा..
वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ?
बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे.
मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?
26 Mar 2012 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ?
वेदना जाते किंवा उमटते, डसते किंवा सलते, जे काही लिहायचं ते कवीनं लिहून झालं आहे.
आपण काय अर्थ लावायचा तो लावावा. साक्षी पुराव्यासाठी कवी हवाच का ?
-दिलीप बिरुटे
(खडूस)
27 Mar 2012 - 8:30 am | चौकटराजा
@दिलीप कक्का ,
कविराजानी ही काव्य रूपी श्रद्धांजली वाहिली आहे. ती आमच्या ह्र्दयात खोल जाणवली आहे. हे नमूद झालेच आहे. त्याच वेळी ती एक
काव्यकृति आहे ना ? तिच्यात जे प्रश्न आस्वादकाला उभे राहिले ते त्याने विचारले . खूप चित्रपट पाहिल्याने ( १९६५ ते २०१२ सुमारे ४०००)
कथावस्तू बरोबर संकलन,सिनएमॅटोग्राफी, बॅग्रामुझिक ई ची संवय झाल्याने हा खडूसपणा आला आहे. आता मिपा वर तो आमचा मार्क होउ
पहात आहे. पण आपण "भारी समर्थ" यांच्या कविता वरचा आमचा प्रतिसाद पहा. त्यानी प्रेमात पडायला लावलंय !
दरम्यान आपल्या कंसात आपण एक बिरू( टे) दावली लावल्याने " आमची कोठेही शाखा नाही ही आमची " वेदना " आता गेली आहे.
हे उदास वार्या तू निघ कसा .
चौ रा.
27 Mar 2012 - 7:05 am | चौकटराजा
सांगायचा मुद्दा एवढाच की वेदना हा जीविताचा अपरिहार्य भाग आहे .कुणाच्याही वाट्याला येउ नयेत अशी दु: खे माझ्याही वाट्याला आली. तरीही
शिशिरामागुन वसंत असतोच. याचे भान ठेवले की वेदना सहन करता येते.
है रात अंधेरी पर दिया जलाना कब मना है - नीरज
26 Mar 2012 - 10:38 pm | शैलेन्द्र
"वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ?"
काही आयुष्य हीच एक वेदना असतात.. ग्रेस मला तसेच वाटले.. व्हॅन गॉग, आरती प्रभु, बालकवींसारखे.. ही वेदना ठणकणारी नाही, तर फक्त सलणारी, हुळहुळती.. खरंतर, वेदना गेली की आनंद व्हावा पण आज तसाही होत नाही.. म्हणुन उदास वारा...
"बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . "
काय आहे ते मलातरी कुठे माहित आहे? काही योजुन लिहायला बसलोच नव्हतो.. ग्रेस गेले या बातमीशी मनाला थोड मोकळ केल.. थोडा गाफील झालो आणी जे आल ते पुढे मांडल.. इतकच..
"मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे.
मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?"
पोट तर दोघही भरतात ना.. पिल्ल तर दोघांनाही होतातच ना.. ;)
27 Mar 2012 - 7:08 am | चौकटराजा
बरं झालं मी पक्षांचीच उदाहरणे दिली !
27 Mar 2012 - 7:42 am | शैलेन्द्र
सांगायचा मुद्दा असा की दिसण हा असण्याचा अपरीहार्य भाग आहे.. जोवर घारोबा- घारीनी---- व लांडोर-मोर एकमेकांना आवडतात तोवर आपल्याला प्रोब्लेम असायचं कारण नाही. हो की नाही? :)
27 Mar 2012 - 8:33 am | चौकटराजा
अपुरेपण संपत नाही देवा म्हणूनच तर तुझी आठवण येते !
26 Mar 2012 - 11:29 pm | मुक्तसुनीत
कविता आवडली. तुमच्या दु:खात मी सामील आहे इतकंच म्हणतो.
27 Mar 2012 - 8:33 am | स्पा
शैल्या लयच भारी
27 Mar 2012 - 8:55 am | जयंत कुलकर्णी
//टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा,
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा////
उच्च दर्जाच्या आरशात आपली प्रतिमा स्वच्छ दिसते. पण येथे याच काचेला तडे गेल्यामुळे (ही काच म्हणजे स्वतःच आहे - थोडक्यात मी माझ्यात जेव्हा डोकावून बघतो ) तेव्हा हे जाणवते की ही काच टीचली आहे...प्रतिमा धुसर झाली आहे... जेव्हा असे होते तेव्हा काय होणार अर्थातच दु:ख... त्याच्या मापकाचा पाराही वर चालला आहे. सुरवातीला हा पारा खाली होता कारण वेदना अस्फुट अशीच होती. ही अस्फुट वेदना गेली आणि तिची जागा तीव्र वेदनेने घेतली आणि मग आजुबाजुचे वातावरणही बदलून गेले.... भयाण उदास वारे वाहू लागले.....
असे काहितरी कविला भावले असावे...
उत्तम आणि बिलोरी कविता.
27 Mar 2012 - 9:50 am | चौकटराजा
जयंत राव ! यू मेड ईट !
धोबी होता म्हणून राम आणखीनच दिव्य पुरूष ठरला अन सीता ही दिव्य ठरली ! शैलू पहा रे जरा इक्डे !
27 Mar 2012 - 11:59 am | शैलेन्द्र
"शैलू पहा रे जरा इक्डे !"
काका, मी मागे जे म्हणालेलो तेच परत म्हणतो..
"पण मला म्हणायच अस की कवितेतल्या एका एका शब्दाला पारखुन त्याचे वजन करु गेले तर कविता हे एक शास्त्र होइल, किंबहुना बांधेसुद कविता पाडणे हे तांत्रीक काम ठरेल, कविच्या मनस्वितेला, जो माझ्या मते तरी कवितेचा प्राण आहे, जागा राहणार नाही. कविने ही कविता कोणत्या मुडमध्ये लिहीली ते आपल्याला माहीत नाही, पण ती माझ्या एका विशीष्ट संवेदनांना हलवुन गेली, आता जिथे ती मला भिडली, तिथे"च" इतरांना भिडावी, किंवा कविला जे म्हणायचेय, ते अगदी तसेच मला आकळावे असेही काही नाही. त्याअर्थी प्रत्येक कविता प्रत्येकापुर्ती वेगळी असते अस मला वाटत. शब्द्प्रामाण्यापेक्षा कवितेचा कोलाज, मनावर कोणते चित्र काढतोय ते अनुभवा असं मी जे म्हणतो ते त्या अर्थाने."
27 Mar 2012 - 12:47 pm | चौकटराजा
पुण्यात गानवर्धन नावाची एक भारतीय संगीताला ( खरेतर संगीतात भारतीय वगैरे असे काही नसतेच ) वाहिलेली संस्था आहे. त्यानी संगीत सुखसंवाद नावाचे ५२ लेख असलेले पुस्तक प्रसिद्ध केले होते व त्यात ५२ महाकलाकारांचे लेख होते. पार गायकाने कोणता व्यायाम करावा , दमसास कसा वाढवाना, राग, थाट ,रागांगे, रियाझ, ई. वर सुरेख प्रबोधन त्यात होते. कोणतेही सादरीकरण मग ते साहित्याचे असो वा स्वरांचे वा
रंगाचे वा पोताचे व रेषांचे त्यात सृजनशीलता ही नियमातच फिरत असते. कारण तो एक देणारा व घेणारा यांचा काही ठरलेल्या संकल्पना धरून केलेला संवाद असतो .त्याच पुस्तकात एका जागी म्ह्टलेले एक वाक्य येथे देतो
गायक हा रागाच्या नियमात परतंत्र होऊन स्वता: च्या उपजांचे
अनिरर्बंध स्वातंत्र्य उपभोगित असतो. म्हनूनच तर कालचा भैरव व आजचा भैरव हे नियमबदद्ध असूनही वेगळे वाटतात.
साहित्यात तर हे बंधन तीव्र होते कारण स्वर रंग किंवा रेखां सारखे शब्द हे अमूर्त नाहीत की त्यातून कोणताही अर्थ निघू शकतो.
प्रसिदद्ध कादंबरीकार आयरविंग वॅलेस यानी एकेका कादंबरीचे चार चार वेळा पुनलेखन केल्याचे प्रकत केले आहे. कच्चे लेखन अनेक तज्ञ लोकाना मित्राना दाखवून दुरूस्त करतो असे त्यानी म्हटले आहे. काही कादंबरीची बीजे सोळा वर्षे तशीच प्रसूति वेदना देत होती. असेही त्यानी
म्हटले आहे. मेड टू ऑर्डर करणारा कमर्शिअल चित्रकार देखील नियम व सर्जनशीलता यांचे मिश्रणच असते.
27 Mar 2012 - 1:05 pm | शैलेन्द्र
काका, तुमच्या मताचा आदर आहेच..
पण कमित कमी ग्रेससाठी काढलेल्या या धाग्यावर तरी मी त्याचे समर्थन करणार नाही, मान्यताही देणार नाही.
तुम्ही दिलेली सगळी उदाहरणे कवितेच्या बाहेरची आहेत इतकेच म्हणेन.
ग्रेसची एखादी कविता घेवुन, शब्दांच्या माध्यमातुन आपण तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करुयात का?
:)
27 Mar 2012 - 1:52 pm | गणेशा
@ राजाजी ,
कविता ही आत्मकेंद्रीत असते तर गाणे हे सार्वभौम असते.
कविता.. त्यातील भाव.. शब्दांची ठेवण हे फक्त आणि फक्त कवीशी निगडीत असते.. कविता ही त्या कवीची नवनिर्मीती त्याच्या मनाचे.. विचारांचे प्रतिबिंब असते...
तुम्ही म्हणता तसे गाण्यात असते..
गाणे हे सर्व लोकांना केंद्रित धरुन लिहिले/गायले जाते...
त्याला सार्वभौमत्व मिळावे हीच त्या मागची इच्छा असते..
त्यामुळे कविता आणि गाणे यात मुलभुत फरक राहतोच..
मला तरी गाणी श्रवणीय वाटली तरी, कवितेच्या शब्दांना गाण्यात रुपांतर करुन उगा यमकी गेयता आणायची नाहि आवडत.. आणि कुठल्याच कवीला त्याच्या मुळ भावनांशी फारकत घेणारे शब्द लवकर आवडणार नाही ...
सुरेश भटांसारखे खुप कमी जन आहेत ज्यांच्या लेखणीतुन गझल/ गाणे जन्माला येत होते( पण त्यासाठी संपुर्ण आयुष्य त्यांना तपश्यर्या करावी लागली, आयुष्यात ५ पुस्तकांच्या पलिकडे त्यांना जाता आले नाही. कारण उत्कृष्टतेसाठी मुबलक असणे गरजेचे नव्हते)
सुधीर मोघ्यांची एक कविता .. 'दयाघना' आठवते आहे .. व्वा .. गाणे व्हावे तर असे .. कवितेसाठी संगित बदलायला लावणे., गाणे वेगळ्या पद्धतीने गायला लावले पाहिजे..
------------------------------
@ शैलेंद्र :
ग्रेस यांना त्यांच्या कवितेचे स्वता रसग्रहन केलेले आवडत नव्हते.. पण आपण करुया.. प्रत्येक वाचकाला वेगळा भाव दिसतो त्यांच्या कवितेत ..
मागे एकदा ' भय ईथले संपत नाहि" चे रसग्रहण केले होते.. सापडवून आज रात्री देतो येथे.
-
तरीही या रिप्लाया निमित्त पुन्हा एकदा कविता वाचली..
सुंदर लिहिता तुम्ही.
27 Mar 2012 - 2:08 pm | चौकटराजा
कविता ही आत्मकेंद्री असते अन कादंबरी ती नसते ? मी स्वत: एका लेखकाच्या कादंबर्या शब्दांच्या लेवल वर दुरूस्त करून दिल्या आहेत. पण त्यातील थीम त्याचीच, प्लॉट त्याच्याच , पात्रे त्याचीच , त्या पात्रांचे परस्पर संबध त्याचेच, शैली त्याचीच मी इथे एकाही कवि च्या व्यक्त थीमला
दे धक्का केलेला नाही. सारे प्रतिसाद फक्त शब्दाभोवती फिरलेले आहेत. कारण अचुक शब्द हे तर संवादाचे प्रमुख साधन आहे. तसे व्यक्त होण्याचेही.
27 Mar 2012 - 2:29 pm | गणेशा
काका,
मी जनरल सांगतो आहे, वयक्तीक अनुभवाच्या लेवल वर तुम्ही मोठे आहातच ..
तुम्ही जे सांगता आहात ते योग्य आहे हे निसंकोचपणे मान्य.
आपली मते कधी विरुद्ध असली तरी मातर वयक्तीक घेवु नये ही इच्छा !
27 Mar 2012 - 2:38 pm | शैलेन्द्र
:) तसे काका मोकळ्या मनाचे आहेत..
27 Mar 2012 - 5:04 pm | चौकटराजा
आपण सगळेच प्रवासी घडीचे त्यात वैयक्तिक काय घ्यायचे
पारिजातकाचे आयुष किती ते
मग लयलूट सुगंधाची करायला का दचकायचे ?
27 Mar 2012 - 4:48 pm | शैलेन्द्र
धन्यवाद..
तसा मलाही रसग्रहणाचा कंटाळाच आहे.. पण नक्कि पाठवा..
27 Mar 2012 - 11:29 am | जयवी
अहा........ क्या बात है........!! उत्तम काव्य !!
जयंत.... तुम्ही सांगितलेला अर्थ.......... अगदी थेट पोचला !!
27 Mar 2012 - 11:34 am | ajay wankhede
आज नम्रपणे वाट मोकळि करायचा दिवस..
छान लिहलंय..
वेदना हि वेदनाच असते दु:खद असो कि सुखद..
अजय
27 Mar 2012 - 11:45 am | अन्या दातार
तरीच तुम्हीही बोळे काढलेले दिसतायत आज
27 Mar 2012 - 11:48 am | निश
शैलेन्द्र साहेब तुमची कविता म्हंजे कवितेतली भैरवी..
खरच मस्त लिहिली आहेत. एखाद्या संगीताची मैफल भैरवी ने समाप्त होते, तशी आयुष्याच्या मैफलीतुन कवी ग्रेस हे तुम्हा आम्हा रसिकाना भरभरुन आनंद देउन ते आपल्यातुन निघुन गेले आणि त्यांच्यावर केलेली तुमची कविता म्हंजे भैरवीच आहे.
27 Mar 2012 - 12:45 pm | मनीषा
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा,
सुरेख कविता..
दु:खाच्या महाकवीला ... ग्रेसफुल श्रद्धांजली !
27 Mar 2012 - 12:43 pm | अमृत
व सोबतीला मिपाकरांचे रसग्रहण सुद्धा.
अमृत
27 Mar 2012 - 12:56 pm | रुमानी
झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. खरच मस्त.
आवडली.
27 Mar 2012 - 1:44 pm | नगरीनिरंजन
सुंदर कविता!
ग्रेस यांना श्रद्धांजली...
27 Mar 2012 - 2:22 pm | ५० फक्त
अतिशय उत्कृष्ट श्रद्धांजली.
रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही ,
नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही..
खुप खुप धन्यवाद शैलेंद्र.
27 Mar 2012 - 8:51 pm | शैलेन्द्र
अहो धन्यवाद कसले? मीच आभारी आहे तुमचा
28 Mar 2012 - 3:27 pm | शैलेन्द्र
सगळ्यांचे मनपुर्वक धन्यवाद..