पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जनातलं, मनातलं
4 Jul 2011 - 12:05 am

"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence."

-Kurt Goldstein

इतिहासातील काही घटना त्या इतिहासाचा भाग असलेल्या शहरावर, प्रांतावर किंवा समाजावर एक ठळक, दूरगामी असा परिणाम करत असतांना दिसतात. अशा काही ऐतिहासिक घटनांनी एखाद्या प्रांताचा इतिहास आणि भूगोलही कायमसाठी बदलून गेला असण्याची उदाहरणे जगभर आहेत. अशीच एक अकल्पित आपत्ती आजच्या पुणे शहरावर बरोब्बर ५० वर्षापुर्वी ओढवली होती.

१२ जुलै २०११ हा पानशेतच्या प्रलयाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे. पन्नास वर्षांपूवी, १२ जुलै १९६१ ला सकाळी आठ वाजता पानशेतची भिंत खचली आणि लालभडक लोंढ्याचा आतंक सुरु झाला. कल्पनातीत आवेग घेउन मूठा नदी शहरावर चालून आली. लकडीपूलाचा सापळा झाला. नव्यापूलावर नदीपात्रापासून ५४ फूट उंच पाणी होतं. ओंकारेश्वराचा अजस्त्र नंदी कित्येक मीटर दूर फेकला गेला. आता महानगरपालिका भवन पीएमटी डेपो आहे तिथे एक विस्तीर्ण उद्यान होतं. ते आख्खं उद्यान वाहून गेलं. तलाव उखडला गेला.

१२ जुलै १९६१ ला नदीतीरानजीकचा विस्तृत भाग सात-आठ तास पाण्याखाली होता. शहराच्या मध्यवर्ती भागांत नदीकाठालगतच्या पेठांतून पाणी घुसले होते. संपूर्ण मंगळवार पेठ, शनवार, नारायण, सोमवार, कसबा या पेठा पाण्याखाली होत्या. सदाशिव, बुधवार, एरंडवणे, शिवाजीनगर या सकृतदर्शनी नदीपासून लांब असलेल्या भागांनाही पूराचा तडाखा सहन करावा लगला. मूठेच्या पाण्यानं मुळेस मागे रेटलं आणि ते पाणी संगमवाडी, खडकी यामधून पसरलं. नागझरी आणि माणीक कालव्यातून शिरलेल्या लोंढयानं रविवार आणि गणेश पेठाही बुडाल्या.

पुणेकरांवर हा घाला अचानक पडला. त्यांना संकटाची कोणतीही व्यवस्थित पूर्वसूचना मिळाली नव्हती. जेव्हा पाणी वाढायला लागलं, तेव्हा नुकत्याच झालेल्या भरपूर पावसामूळं नदीस मोठा पूर आला असं लोकांना वाटत होतं. तेव्हा नदीचं पाणी नेहमीच तीरावर शिरत असे त्यामुळे लोकांना ती गोष्टही विशेष भयसुचक वाटली नाही. आपत्तीच्या भयानकतेची पूर्ण कल्पना येण्या आधीच कित्येकांची घरंदारं पाण्याने पूर्णत: वेढली गेली. नदीचं पाणी किती पसरणार कळत नव्हतं. बेसावध लोकांना जीव वाचवून कुठे जावं कळत नव्हतं. घरातलं सामानसुमान तसंच टाकून लोक पळाले.
काही अडकले, काही सुटले.

दिवसभर उत्पात घडवून पाणी हटलं, तेव्हा आपद्ग्रस्त भागांतली हजारो घरं पूर्णपणे उध्वस्त झाली होती. सुमारे १० हजार कुटुंबं निराधार. घरातलं बहुतांश सामान वाहून गेलं होतं. आयुष्यभर अवलीपावली जमवत मिळवलेली सुबत्ता डोळ्यांदेखत पुसली गेली होती.

पण पुणेकर त्यातही ढळला नाही. उभा राहिला. धूळ झटकत त्यानं तुळया उभारल्या आणि पुणं पुन्हा बांधलं.

पानशेत प्रलयाचं थैमान, त्याने ग्रासलेल्या पुणेकरांच्या गोष्टी आणि पुनर्निर्माण ही एक मोठी गाथा आहे.

पानशेतच्या प्रलयानं जुनं पुणं लयास गेलं.
पुण्याचा मानबिंदू जी वाडासंस्कृती, ती नामशेष झाली. आज विद्येच्या माहेरघराचं 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मध्ये झालेलं परिवर्तन, किंवा पेन्शनरांच्या शांत शहरानं अंग चोरत आयटीबूमला करुन दिलेली जागा या सर्व बर्‍यावाईट बदलांची नांदी १२ जुलै १९६१ नं केली.

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या विलक्षण घडामोडींना आज उजाळा देण्यासाठी 'अथांग क्रियेशन्स' तर्फे आम्ही
'१२ जुलै १९६१: प्रलय, प्रत्यय' हा दृकश्राव्य कार्यक्रम घेत आहोत. पुण्याच्या भरारीची ही कहाणी व्हिडियोज आणि महितीपटांकरवी सादर केली जाईल. ती कहाणी आजच्या तरुणांस ऐकण्यास मिळावी आणि उज्वल आदर्शाचं कथन व्हावं असा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

त्यासाठी आम्ही जवळपास दीडशे पुरग्रस्तांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे चित्रीकरण, विलक्षण अनुभव, त्या काळातले व्हिडीओज आणी फोटोज, आणि तत्कालीन वृत्तपत्रे या सार्‍यांचा अर्क 'प्रलय, प्रत्यय' मध्ये पाहता येईल.

या कार्यक्रमास 'मराठी अभिमान गीत' आणि 'बालगंधर्व'चा संगीतकार कौशल इनामदारचं संगीत संयोजन लाभलंय. सुधीर गाडगीळ सूत्रसंचालक असून शरद पोंक्षे व्हिडियोजना निवेदन करणार आहेत.

पूरस्थितीशी लढलेले पुणेकर आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे प्रतिनिधी, मुळात प्रत्येकाने; त्या प्रेरक घटनांचा साक्षीदार होण्यासाठी यावं.

कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात, मंगळवार दिनांक १२ जुलै २०११ रोजी सायं ५ ते ८ या वेळात होईल.
कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरी प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या लवकरच उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रवेशिकांसंबंधी पुढील माहिती लवकरच या धाग्यावर दिली जाईल.

नक्की या. प्रलयाच्या इतिहासासाठी, असामान्य धैर्यासाठी !

--------------------------------------------------------------------------------------------------------

(सदर लेख अधिकाधिक वाचकांपर्यन्त पोचण्यासाठी अन्य मराठी संस्थळावर प्रकाशित केला आहे.
सदर लेखामुळे मिपाच्या प्रशासकीय धोरणांचे उल्लंघन होणार नाही, अशी आशा आहे.)

इतिहाससमाजबातमी

प्रतिक्रिया

पानशेत धरणफुटीबद्दल "अक्षरधूळ" या अनुदिनीवरील नुकताच एक लेख वाचनात आला होता..
धरण फुटून पुण्यात पाणी शिरलं तरी पुणे आकाशवाणी रागदार्या वाजवत होती.. पण बीबीसीवर मात्र पुण्यात पाणी शिरल्याची बातमी येऊन गेली होती... सकाळच्या प्रेसमध्ये गाळ रुतल्याने ती बंद पडली वगैरे विस्ताराने लिहीलंय इथे..
पानशेत 1961

यकु,
रागदार्‍या मुद्दाम कोणी वाजवत बसलं असल्यासारखंच म्हणताहात.
लेखात लिहिलेलं वाचलय मी पण तुम्ही अगदी तेवढचं वाक्य उचलून लिहिताय म्हणून मी म्हणतिये.
पानशेतचा पूर आला तेंव्हा आपल्यापैकी बर्‍याचजणांचा जन्मही झालेला नसणार.....
त्या काळी एकंदरीतच शांततेचं आयुष्य असणार.
उगीच नदीचं पाणी वाढलं म्हणून पळून कशाला जायचं असा विचार फक्त पुण्यातच नाही तर इतरही ठिकाणी झाला असता.....तसाच तो झाला. एखाद दुसर्‍या कुटुंबाचा गैर्समज समजू शकू पण हजारो कुटुंबांचा एकसारखाच गैरसमज कसा होइल? अपघात हे अपघातच असतात. असो.

लेखन आवडले.
माझ्या मावशीच्या घराची अवस्था अशीच झाल्याचे ऐकिवात आहे. त्यातून आर्थिकदृष्ट्या नंतर तिचे कुटुंब सावरले पण मानसिकरित्या कधीही सावरू शकले नाही. त्यावेळी मावशी ही नवी नवरी होती. नवा संसार एका वाड्यात बिर्‍हाडरू म्हणून सुरु केलेला वाहून गेला असल्याचे ऐकले आहे. अजून काही तिला विचारायचे धाडस झाले नाही.
पण पुणेकर त्यातही ढळला नाही. उभा राहिला. धूळ झटकत त्यानं तुळया उभारल्या आणि पुणं पुन्हा बांधलं.
असं तर आम्ही फक्त मुंबैकरांबद्दल ऐकले आहे. बॉम्ब स्फोट झाला की ते लगेच नव्या जोमानं आयुष्य सुरु करतात म्हणे! पुणेकरांनी त्यांची नक्कल केलेली दिसते.;)

सरकारी यंत्रणांची ढिसाळ कामगिरी लोकांच्या चांगलीच नजरेत आली. रोम जळत असताना सम्राट निरो फिडल वाजवत होता असे म्हणतात. आकाशवाणीने, आपण त्याचे आधुनिक वंशज असल्याचे पुराच्या काळात रागदारी ऐकवून दाखवून दिले. आता वीजच नसल्याने बहुतेकांना ते ऐकताच आले नाही हे त्यांचे नशीबच! नंतर समजले की बी.बी.सी. ने आकाशवाणीच्या आधीच, पुराची बातमी जगभर लोकांना ऐकविली होती. ( दुवा दिलेल्या अनुदिनीवरुन )

संबंधीत अनुदिनीकार हा पुराच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.

मी फक्त त्या लेखातील एक दोन हायलाईट्स सांगितल्या... अर्थात पूर आलाय, मग वाजवा रागदार्या असं काही झालं नसेल हे तर स्पष्ट आहे.. पण गावात पाणी शिरलेलं असूनही त्याबद्दल बातम्या न देता वेगळंच काहीतरी करणे एवढं फक्त मजेशीर वाटलं..

गावात पाणी शिरलेलं असूनही त्याबद्दल बातम्या न
सायबांनी सांगितलय ना पूर आलेला नाही.....मग ती बातमी द्यायची नाही.
पाण्यात बसून रागदार्‍या वाजवा पण सायबांचे ऐका असे दिवस ते!;)

तिमा's picture

4 Jul 2011 - 6:27 pm | तिमा

रेवतीताई,
तुमचा जन्म झाला नसला तरी आमचा झाला होता आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. 'रागदार्‍या' अनवधानाने वाजवल्या गेल्या असे जरी क्षणभर समजले तरी पुणे रेडिओवर अगदी दुपारपर्यंत पुराची परिस्थिती गंभीर नाही व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे उच्चरवाने सांगितले जात होते, ते त्या रागदारीपेक्षा 'असह्य' वाटत होते.
एकूणच परिस्थिती इतक्या ढिसाळपणे हाताळली गेली की नंतर नेहरु पाहणी करायला आले तेंव्हा नारायणपेठेत घरातल्या मोडक्या सामानाच्या ढिगावर एक म्हातारा बसला होता, त्याने त्याही परिस्थितीत 'आम्हाला तुमची कुठलीही मदत नको', असे बाणेदारपणे सुनावले होते.
आम्ही या सर्वाचे साक्षीदार आहोत. त्या नंतर जी मदत पुरवली गेली त्याची लूट कोणी केली हेही आम्ही अनुभवले आहे.

चिंतामणी's picture

4 Jul 2011 - 10:22 am | चिंतामणी

सदर लेख अधिकाधिक वाचकांपर्यन्त पोचण्यासाठी अन्य मराठी संस्थळावर प्रकाशित केला आहे.

म्हणजे कुठे कुठे?

आणि वेगवेगळ्या लेखकाच्या नावाने तो प्रसीध्द केला आहे का? :(

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jul 2011 - 12:28 pm | llपुण्याचे पेशवेll

पुण्याचा मानबिंदू जी वाडासंस्कृती, ती नामशेष झाली. आज विद्येच्या माहेरघराचं 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मध्ये झालेलं परिवर्तन, किंवा पेन्शनरांच्या शांत शहरानं अंग चोरत आयटीबूमला करुन दिलेली जागा या सर्व बर्‍यावाईट बदलांची नांदी १२ जुलै १९६१ नं केली.

सदर विधाने वाचल्यानंतर मटा वाचतो आहे असे वाटले असो. पानशेत पूरामुळे वाडासंस्कृती जोमाने उभी राहीली. लोकांना एकमेकांच्या आधाराची अपरिहार्यता असल्याने परस्पर सहाकार्याने वाडासंस्कृती पुन्हा उभी राहीली असे आमच्या घरातले जेष्ठ सांगतात ज्यांनी ६१चा पूर अनुभवला होता. आमच्या बाबांचे मामा ज्यांचा वाडा नारायण पेठेत मुठेश्वर मंडळापाशी होता त्यांचा तो वाडा वाहून गेल्यावर त्यांनी परत नवीन वाडा बांधून जुन्या सर्व भाडेकरूंना १ तरी खोली देता येईल अशी व्यवस्था केली होती हे आठवून गेले. नारायण पेठेतला मोडकांचा वाडा देखील ८-९ फूट पाण्यात होता. तेव्हा वरच्या मजल्यावरच्या भाडेकरूंकडे सर्व लोक नेसत्या वस्त्रांनीशी जाऊन थांबले व होड्या उपलब्ध झाल्या तेव्हा वरच्या मजल्यावरूनच होडीत उतरून सुरक्षित स्थानांकडे गेले.

सुनील's picture

4 Jul 2011 - 2:00 pm | सुनील

छान माहिती.

पानशेत धरण हे मातीने बांधले होते. त्यावरून आचार्य अत्रे यांनी सदर इंजिनियरची (नाव लक्षात नाही) निर्भत्सना करणारा लेख लिहिला होता. त्यानंतर, वस्तुस्थिती लक्षात आल्यावर त्यांची जाहीर माफीदेखिल मागितली होती.

त्याकाळातील वृत्तपत्रांची कात्रणे कुणाकडे असतील त्यांनी कृपया डकवावीत.

येण्यास नक्कीच आवडले असते ... परंतु मुंबईत असल्या कारणाने येवु शकत नाहिये हे खुप वाईट वाटते आहे.
कृपया या कार्यक्रमाच्या सिडीज..किंवा आनखिन काही बाहेर नंतर उपलब्ध होउ शकते का ? १२ जुलै ला रविवार असतात तर नक्की आलो असतो .