दिवाळी आली की सणाची तयारी, खरेदी, फिरणे या सगळ्याच्या योजना घरोघरी सुरू होतात. पण एक व्यक्ती अशीही आहे की, दिवाळीची चाहूल लागतानाच तिच्या बॅगा औषधांनी आणि कामाच्या इतर वस्तूंनी भरल्या जातात. ही व्यक्ती म्हणजे अहमदाबादच्या डॉ. प्रतिभा आठवले, दंतरोगतज्ज्ञ! गेली १६-१७ वर्षे त्या दर दिवाळीच्या सुटीत, कधीकधी मेमध्येसुध्दा ईशान्येकडील दुर्गम प्रदेशात नियमित जातात. दोन ते तीन आठवड्यांच्या तिथल्या मुक्कामात त्या तीन-तीन दिवसांची शिबिरे घेतात. ज्या वस्त्यांनी डेंटिस्टच काय, कुठलाच डॉक्टरही पाहिला नाही, त्यांना तपासून योग्य ते उपचार करतातच, त्याचबरोबर दातांची आणि इतर स्वच्छता, आहार, आरोग्य याबाबतही जाणीव, जागृती करतात आणि हे सर्व विनामूल्य - किंबहुना पदरमोड करून! त्यांच्याशी केलेली ही बातचीत...
प्रश्नः 'डेंटिस्ट्री'कडे कशा वळलात? काही विशेष?
प्रतिभाताई: शालेय शिक्षण चाळीसगावात झालं. तिथे डेंटिस्ट नव्हताच. वडील प्राचार्य म.वि. फाटक हे पुण्यात गेले की दातांचे उपचार घेत. त्या डॉक्टरांनी मुलींसाठी ही शाखा चांगली, असं सुचवलं. त्यांची भेट घेतल्यावर मलाही त्यात रुची निर्माण झाली. त्यातच MBBS दोन-चार मार्कांनी हुकलं, हा योगायोग. मात्र माझं काम मला मनापासून आवडतं.
प्रश्नः आणि समाजकार्याकडे?
प्रतिभाताई: वडलांचं एक वाक्य नेहमीच असायचं, 'तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातूनच देशसेवा करू शकता, ते काही मोठं, वेगळं प्रकरण नाही.' त्याशिवाय बहुतेक वेळा मेच्या सुटीत पुण्यात मुक्काम, वेगवेगळी शिबिरं करताना सिंहगडापासून ट्रेकिंगची सुरुवात झाली. हिमालयाचं आकर्षण होतंच. लग्नानंतर एकदा 'गढवाल विकास निगम'ची जाहिरात वाचनात आली. ते सुरू झालं. ट्रेकिंगमध्ये लक्षात आलं की त्या दुर्गम प्रदेशातल्या लोकांना साधी साधी औषधं, उपचारही मिळत नाहीत. अशा लोकांसाठी काही करणं आवश्यक आहे, हा विचार घोळू लागला. मग काय? मनात तळमळ असली की मार्गही सापडतो.
प्रश्नः हे काम कोणत्या संस्थांच्या मदतीने झालं, की इतर काही?
प्रतिभाताई: विवेकानंद केंद्रांशी पूर्वीपासून संपर्क होताच. त्यातले प्रमुख कार्यकर्ते सतीशजी, प्रवीणजी दाभोळकर यांच्याशी चर्चा झाली. काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ईशान्येकडे त्यांचं पुष्कळ काम चालू होतंच. पण सगळा डोंगराळ भाग, दळणवळणाची खातरीची साधनं नाहीत. तेव्हा केंद्राकडे स्वत:चं वाहन हवं, त्याची तजवीज केली गेली आणि मग शाळांपासून सुरुवात केली. विद्यार्थ्यांची तपासणी, त्यांना सल्ला, उपचार, मार्गदर्शन याबरोबर जवळच्या वस्तीतील लोकांनाही सामावून घेतलं. यात सेवाभारती, अखिल विद्यार्थी परिषदेची वनवासी सेवा विकास समिती, कल्याणाश्रम, त्रिपुरातील NYAF या संस्थांचाही सहभाग मिळत गेला.
प्रश्नः या सगळ्या कामाला घरून कितपत पाठिंबा मिळाला?
प्रतिभाताई: खूपच. सासरे RSSचे कार्यकर्ते होतेच. शिवाय या कामासाठी शाळांच्या सुट्ट्यांचा काळ निवडल्यामुळे माझा नवरा - जयंत याचाही संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य होतं. सासऱ्यांचं प्रोत्साहन होतंच. ते स्वत: VRS घेऊन समाजकार्य करत होते. अंगात जोम आहे, तेव्हाच हातून चांगले काम घडेल याची जाणीव त्यांनी दिली. माझ्या ट्रेकिंगमुळे मुलींनाही आई अधूनमधून गायब होते याची सवय होती. एरवी आपण कुटुंबात असताना 'क्वालिटी टाईम' दिला, तर या 'गायब' होण्याचीही भरपाई होतेच ना?
प्रश्नः ट्रेकिंगच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
प्रतिभाताई: हिमालयातलं ट्रेकिंग म्हणजे निर्मळ, उत्कट आनंद. साहस, ध्येयनिष्ठा, चिकाटी, भव्य सौंदर्याचा दिव्य अनुभव हे तसं आहेच, त्याशिवाय तिथल्या लोकजीवनाचाही अनुभव येतो, तो मात्र मन हेलावून टाकणारा आहे. काश्मिरी स्त्रीचं सौंदर्य विख्यात आहे. पण मला हेही समजलं की बहुतेक स्त्रियांच्या तोंडात फक्त समोरचे दात तेवढे आहेत. उपचारांअभावी दाढा काढून टाकलेल्या, नीट खाता-पिता येत नाही; पण सांगणार कोणाला? ऐकणार कोण? उपचार दूरच! कष्ट करायचे, बस्. तेच आयुष्य. याच अनुभवांतून माझ्या सेवाकार्याची सुरुवात झाली. कारण ट्रेकिंग करताना कितीतरी वेळा दुर्गम भागात डॉक्टर म्हणून उपचारही करायची संधी मिळाली.
प्रश्नः ईशान्येकडच्या लोकजीवनाबद्दल काय सांगाल?
प्रतिभाताई: आपल्या मुख्य प्रवाहापासून संपूर्ण तुटलेले लोक आहे ते. चीन, बांगला देशाच्या सीमाप्रदेशामुळे कित्येक समस्या, असुरक्षितता, कम्युनिस्टांचा प्रभाव असे राजकीय घटक त्यात आहेतच. शिवाय डोंगराळ भाग, लहान लहान वस्त्या, गाव म्हणून एका व्यवस्थेचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आहाराबद्दल, आरोग्याबद्दल अज्ञान अन् अनास्था अशा असंख्य समस्या आहेत. जे शिक्षण म्हणून दिलं जातंय, त्याचा दर्जा अतिशय वाईट. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची आणि मुख्यत: आपण सारे 'भारतीय' आहोत ही जाणीव देण्याची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी तळमळीचे खूप हात हवे आहेत.
प्रश्नः दातांचे उपचार म्हणजे खूप आणि विशेष साधनांची गरज असते. हे कसं जमवलंत?
प्रतिभाताई: सुरुवातीच्या काळात औषधं, इतर साधनं आणि अगदी खुर्चीसुद्धा मी घेऊन जात होते. आता मात्र आसाम, मेघालय, त्रिपुरा येथे क्लिनिक्स सुरू केली आहेत. तेथे संघटनेतर्फे पगारी डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस येऊन उपचार देतात. त्याशिवाय मी गुवाहाटीच्या डेंटल कॉलेजच्या डीनना भेटून, इंटर्न्सतर्फे क्लिनिक चालू ठेवता येईल याची योजना सादर केली, पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मध्यंतरी आसाममधून एक तरुणी आणि मणिपूरमधून दोन तरुणी यांना अहमदाबादला नेऊन लॅब ट्रेनिंगची व्यवस्था केली. चारएक महिन्यात ते शिकून गेले आणि आता तेच स्थानिक तरुणांना तयार करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून काश्मीरमधील पुलवामा, बारामुल्ला इथेही कॅम्प्स केले.
प्रश्नः पण तिथे तर खूपच अशांत वातावरण असतं आणि ईशान्येकडेही तसंच! त्यात हे सर्व कसं जमलं?
प्रतिभाताई: हे पाहा, घाबरून राहायचं म्हटलं तर संपलंच सगळं! माझ्या कॅम्प्समध्ये कितीतरी वेळा काही रुग्ण येऊन गेले, ते आतंकवादी होते हे त्या वेळी किंवा नंतर समाजायचं. पण आपण त्या लोकांच्या मदतीसाठी काम करतोय, चांगलं काम करतो आणि त्यात राजकारणाचा संबंध नाही, तेव्हा जास्त भीती नसते. तसं काही प्रचारकांच्या जिवाला धोका झालेला आहे. पण शेवटी देवावर श्रद्धा ठेवून आपण आपलं काम करायचं, एवढंच मला समजतं.
प्रश्नः ज्यांना काही असं काम करायचं असेल, त्यांना काय सांगाल? कशी सुरुवात करावी? किंवा काय काम करता येईल?
प्रतिभाताई: करण्यासारखी असंख्य कामं आहेत. जे काही तुमच्याकडे आहे - तुमचं एखाद्या शाखेचं ज्ञान, प्रावीण्य, कला, कसब, कौशल्य ते सारं तिथे उपयोगात येईल. एखादा विषय, शिकवण, अगदी क्राफ्ट, शिवण, स्वयंपाकसुद्धा. कारण त्यांना साधा पण सात्त्विक, पौष्टिक आहार कसा घ्यायचा हेसुद्धा ठाऊक नाहीये. पण एक मात्र आवर्जून सांगेन की, भावनेच्या भरात काम करायला जाल तर 'आरंभशूरा'ची अवस्था होऊ शकते. त्यापेक्षा आधी प्रदेश पाहायला जा अन् नुसतं सृष्टिसौंदर्य न पाहता लोकांत मिसळा, त्यांच्याशी बोला, विशेषत: स्त्रियांशी; त्यांची सुख-दु:खं समजून घ्या, गरजा जाणून घ्या. त्यातून तुमचा कार्याचा मार्ग आणि स्वरूप तुम्हालाच समजेल.
प्रश्नः पुढच्या योजना काय?
प्रतिभाताई: काम करत राहायचं, क्षेत्र वाढवत जायचं, बस्स इतकंच! लडाखच्या भागातही आता पुढचा कॅम्प करायचाय. त्या दृष्टीने योजना चालू आहेत. कार्यकर्ते जोडणं हेही एक आहे.
प्रश्नः त्यासाठी प्रयत्न, मार्गदर्शन कशा रितीने करताहात?
प्रतिभाताई: पुष्कळ ठिकाणी व्याख्यानासाठी बोलावतात. त्यातून लोकांना माहिती मिळते. कोणी ना कोणी भेटतात, त्यांनाही मी आधी प्रवेश पाहा, माणसांना भेटा आणि मग काम सुरू करा हेच सांगते.
प्रश्नः तुमच्या अनुभवांचं पुस्तक तुम्ही लिहिलं आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळालाय. आणखीही पुरस्कार मिळाले आहेत, ते कोणते?
प्रतिभाताई: वास्तविक मी लिहीत गेले ते आईला वाचायला देण्यासाठी. त्याचं पुस्तक झालं ते आप्त-मित्र यांच्या पुढाकाराने, काम सुरू केल्यापासून बारा वर्षांनी.
प्रश्नः म्हणजे एका तपानंतर? तपश्चर्येचं फळ?
प्रतिभाताई: हो, तसं म्हणा हवं तर! त्यानंतर 'नाना पालकर' स्मृती समितीचा पुरस्कार मा. प्रकाश आमटे यांच्या हस्ते मिळाला. 'केशवसृष्टी पुरस्कार' डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते, तर 'लोकसत्ता'चा 'नवदुर्गा' पुरस्कार, गुजरातमधला 'जागृतजन पुरस्कार', ईशान्येकडच्या सेवाप्रकल्पांच्या 'आरोग्यमित्र' मेळाव्यात एक विशेष पुरस्कार हे नाव घेण्यासारखे मोठे पुरस्कार मिळाले. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावरचा 'इंडियन डेंटल असोसिएशन'तर्फे समाजकार्यासाठी म्हणून त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्तेही पुरस्कार मिळाला.
प्रश्नः म्हणजे कार्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत नाही?
प्रतिभाताई: हो, नक्कीच. पण या 'सार्थक'मधला आर्थिक भाग मात्र मी माझ्यासाठी स्वीकारला नाही हं! पुरस्कारांतून मिळालेल्या सगळ्या रकमा मी जेथे त्यांची गरज होती त्या कार्याकडे वळवल्या. अर्थात ईशान्येच्या राज्यातल्या कार्यासाठी!
प्रश्नः हे खरोखरच विशेष आहे. बरं, पण 'पूर्व रंग-हिमरंग' या पुस्तकाशिवाय इतर लेखन? काही छंद?
प्रतिभाताई: कधीतरी कविता करते. पण ते फुटकळ. वाचनाची आवड आहे, त्यात मराठी, हिंदी, इंग्लिशबरोबर गुजरातीतलं साहित्यही वाचते. चरित्र, आत्मचरित्र, कविता, माहितीपर पुस्तकं विशेष. शिवाय पेंटिंग, क्राफ्ट यातही मला रस आहे. तेही करते वेळ मिळाला की.
प्रश्नः लग्नानंतर गुजराती कशी शिकलात? आणि ईशान्येकडेही तिकडच्या भाषा शिकलात की काय?
प्रतिभाताई: छे! ते सोपं नाहीये. प्रत्येक पंचवीस मैलावर भाषा बदलते तिथे. त्यामुळे दुभाषा लागतोच. पण इथे अहमदाबादला आल्यानंतर मात्र सगळीकडे गुजरातीच. मग ऐकत, बोलत शिकले. वाचायलाही शिकले. आता तर भाषणही ठोकते गुजरातीत. लिहिणं मात्र फारसं मनावर घेतलं नाही. मुख्य म्हणजे दवाखान्यात काम करताना रुग्णाची भाषा येणं आवश्यक असतं. जिथे कायम राहतो त्या समाजात मिसळणंही येतंच ना! ते गेलं जमून.
प्रतिभाताई सहज बोलल्या, पण ते काहीच इतकं सहज जमून जाणारं नाहीये. स्वत:सह इतरांच्याही जगण्याला अर्थ देण्याचा ध्यास, तळमळ, चिकाटी, अदम्य उत्साह, कार्यशक्ती अन् इच्छाशक्ती यांच्याशिवाय हे 'जमून जाणं' घडत नाही हेच खरं. इतकी वर्षे चिकाटीने तन-मन-धन वेचून दुर्गम भागातल्या आपल्या देशबांधवांच्या अंगणात दिवाळीचा प्रकाश घेऊन जाणाऱ्या प्रतिभाताईंना पुढच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा!
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 11:55 pm | पैसा
ओळख खूप आवडली!
9 Mar 2017 - 9:06 am | पलाश
लेख आवडला.
9 Mar 2017 - 5:25 pm | प्रीत-मोहर
सुंदर ओळख करुन दिली आहेस. ईशान्येतील राज्यांमधे काम करताना काय काय त्रास होऊ शकतो याच ही पुसटशी का होईना कल्पना आहे.
डॉक्टरांना आणि त्यांच्या घरच्यांना सलाम .
9 Mar 2017 - 6:34 pm | मंजूताई
झालीये मुलाखत ! मी पण सहा महिने केंद्राच्या कामाने ईशान्य भागात नुकतीच राहून आले त्यामुळे अगदी अगदी झालं.
11 Mar 2017 - 4:14 pm | अजया
डाॅ आठवलेंबाबत यापूर्वी वाचले आहे. समव्यावसायिक भगिनी म्हणून अभिमान वाटला. त्यांना मदत करायला आवडेल.
13 Mar 2017 - 4:12 am | रेवती
मुलाखत आवडली. हे वेगळ्या क्षेत्रातले समाजकार्य आहे. अजया डोळ्यासमोर येत होती.
13 Mar 2017 - 12:14 pm | मितान
खूप सुंदर मुलाखत !!
प्रतिभाताईंना सादर नमस्कार ! त्यांच्या कार्याला हजारो हात लाभावे !
13 Mar 2017 - 1:51 pm | नूतन सावंत
खूप छान ओळख करून दिलीस मीराताई,वेगळ्या वाटेवरच्या मुसाफिराची.त्यांच्या कार्याला सलाम.
13 Mar 2017 - 2:15 pm | गामा पैलवान
मीराताई,
'भारत तेरे तुकडे होंगे' याला सणसणीत प्रत्युत्तर म्हणजे भारत जोडणे. डॉक्टर प्रतिभाताई हे कार्य जोमदारपणे करंत आहेत. त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांची ओळख करून दिल्यानिमित्त तुमचे आभार! :-)
आ.न.,
-गा.पै.
14 Apr 2017 - 5:19 am | रुपी
छान ओळख. त्यांच्या कार्याला सलाम. यानिमित्ताने तुम्ही पुन्हा लिहित्या झाल्या म्हणून छान वाटले. :)