...लोक जमलेले असतात. कार्यक्रमासाठी! काही मनापासून आलेले. काही कुणीतरी पकडून आणलेले. काही केवळ उत्सुकता म्हणून. काही परीक्षा पाहण्यासाठी. काही करमणुकीसाठी. काही थोडेसे कंटाळून. पण तरीही सगळे जण एका काहीशा वेगळ्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात... आणि ती येते. चक्क घोड्यावरून!!! जिजाऊमाता लहानग्या शिवबाला घेऊन घोड्यावरूनच येते. थेट १६व्या शतकातून आजच्या २१व्या शतकात आपल्या लोकांशी थेट संवाद साधायला येते आणि प्रत्येकाच्या मनाला हाक घालते. आपल्या गाण्यातून, बोलण्यातून प्रत्येकाच्या हृदयाला भिडते. आपल्या पवित्र भारतभूमीची आजची अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. त्या काळात परकीय सुलतानांपासून आपली माती आणि माता वाचवण्यासाठी शिवाजीराजांनी आयुष्य वेचलं, ते आजची अवस्था पाहण्यासाठी का? अजूनही माता-भगिनी सुरक्षित नाहीत? आपल्याच देशात? आपल्याच लोकांमध्ये? स्त्रिया घाबरलेल्या आणि पुरुषांच्या हातात दारू आणि गुटखा? याच्यासाठी स्वराज्य उभं केलं होतं? असे अनेक सवाल ही जिजाऊ विचारते आणि ऐकणारा श्रोतृवर्ग विचारात पडतो. या माउलीचा कार्यक्रम ऐकून आजपर्यंत ३७० जणांनी स्वत:हून दारू सोडल्याचं कळवलं आहे. हा अनोखा प्रबोधनपर नाट्य व संगीतमय कार्यक्रम करणाऱ्या आधुनिक काळातल्या जिजाऊ आहेत सौ. चैताली खटी! चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात राहूनही आज महाराष्ट्रभर आणि बाहेरही त्यांचे १०००च्या वर कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं आणि ऐकण्यासारखंही खूपच आहे. एकेक कार्यक्रमच तीन तासांचा करणाऱ्या या अत्यंत अभ्यासू आणि गुणी कलाकार ताईंशी थोडक्यात झालेली बातचीत इथे वाचकांसाठी देत आहे.
प्रश्नः तुम्ही या कार्याकडे कशा काय वळलात? आणि कधीपासून?
चैतालीताई: मी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होते. मिस्टर ACCमध्ये आहेत. तशीही समाजाची अवस्था पाहून वाईट वाटायचं. मी त्याबद्दल मुलांमध्येही बोलायचे. पण २०१२मधली दामिनी रेप केस झाली आणि मी आतून हलले. हे असं चालणार नाही, असं वाटलं. जनजागृतीसाठी काहीतरी करायलाच हवं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे असे कार्यक्रम असंच वाटलं. नाट्य हे फार प्रभावी साधन आहे. पण नाटक-सिनेमांमधून लोकांसमोर वाईट गोष्टीच ठेवल्या गेल्या, तर ते वाईटच घेतील. आपण सात्त्विक गोष्टी चांगल्या पद्धतीने ठेवल्या तर लोक नक्की बदलतील, असा विचार करून मी हे कार्यक्रम सुरू केले.
प्रश्नः अशा प्रकारचा नाट्य आणि संगीतमय कार्यक्रम करायचं कसं काय सुचलं? आणखी कुणाची मदत मिळाली का?
चैतालीताई: मी स्वत: संगीत विशारद आहे. गाण्याचं अंग आहे तसंच अभिनयाचीही आवड आहे. लहानपणी एकपात्री अभिनय आणि गाणं यांचे कार्यक्रम, स्पर्धा यात भाग घेतलेला होताच. विचार करताना एकेक गोष्टी घडत गेल्या, सुचत गेल्या. ज्यांनी पूर्वी समाज घडवला आहे, व्यक्ती घडवल्या आहेत तेच लोक आज पुन्हा आले तर त्यांना काय दिसेल आणि ते काय सांगतील, अशा पद्धतीची मांडणी करायची ठरवली. त्यात लोकसंगीत, पोवाडे, कीर्तन असे सगळे प्रकार आमच्या कार्यक्रमात मी घेत गेले. नुसत्या प्रवचनापेक्षा अशा प्रकारचा नाट्यमय कार्यक्रम जास्त परिणामकारक होतो असं लक्षात आलं. या सगळ्यात माझी आई सौ. नीता प्रभाकरराव पुल्लीवार हिचा मोठा सहभाग आहे. मी जे काही आहे, ते तिच्यामुळेच. कार्यक्रमाची संहिता लिहिण्यात तिचा मोठा सहभाग आहे.
सुरुवातीला मी नेहमीसारखीच साध्या कपड्यात हा कार्यक्रम केला. पहिला कर्यक्रम फक्त १५ मिनिटांचा होता. पण मला शाळेतल्या लहान मुलांनी सांगितलं, "बाई, तुम्ही वेगळे कपडे वापरा. त्या त्या लोकांची नाटकातल्यासारखी वेषभूषा वापरा. ते जास्त छान वाटेल." मग पुढच्या कार्यक्रमाला मी थोडा बदला केला वेषभूषेत, तर ते लोकांना फार आवडलं. त्यामुळे आता मी प्रत्येक भूमिकेसाठी वेगळी वेषभूषा वापरते. विवेकानंदांची भूमिका करताना भगवी कफनीसुद्धा वापरते.
दुसरा कार्यक्रम थोडाफार कीर्तनाच्या अंगाने जाणारा होता. मात्र तो अडीच तासांचा झाला. पुढे आणखी मोठा कार्यक्रम ठरवून करायला लागले. संगीताचा भाग मोठा असल्याने सोबत हार्मोनियम आणि तबला वाजवणारे असत सुरुवातीला. आता सिन्थेसायझरवर बरीच वाद्यं वाजवता येतात. आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे कमीजास्त माणसं असतात. पण मुख्यतः प्रयोग एकपात्रीच आहे.
प्रश्नः कोणकोणत्या व्यक्तिरेखा आजपर्यंत साकारल्या आहेत? त्यातील लोकप्रिय आणि परिणामकारक कुठल्या?
चैतालीताई: राजमाता जिजाऊ, शिवाजीराजे, राणी लक्ष्मीबाई, यशोदामैया, स्वामी विवेकानंद अशी काही व्यक्तिमत्त्वं आहेत, त्याशिवाय तुकारामांची आवलीदेखील केलीये. 'साई, तू माझा सांगाती' हा साईबाबांवरचा कार्यक्रम करते. शिवाय 'मन रामरंगी रंगले' या कार्यक्रमात श्रीरामाची नऊ रूपं दाखवते. कौसल्येचा राम कसा, भक्तांचा राम कसा, सीतेचा राम कसा... अशा गोष्टी सांगते. बरीच पुस्तकं वाचून मी यांच्या शिकवणीचा आणि इतिहासाचा अभ्यास केला आहे. त्यातूनच मी त्यांच्या व्यक्तिरेखा साकारते. यातील सगळ्यात लोकप्रिय जिजामाता! जिजाऊंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच फार ग्रेट आहे. त्यांनीच शिवरायांना घडवलं आणि असं घडवलं की शिवरायांनी समाज घडवला, स्वराज्य घडवलं. त्यांची पुण्याई थोर आहे. अजूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाने माणसं बदलतायंत! मात्र एक आहे. कार्यक्रमानंतर लोक सांगायला येतात, तेव्हा प्रौढांकडून मिळणारी प्रतिक्रिया असते की "बाई, तुम्ही किती छान गाता, किती छान दिसता." तरुणांपर्यंत मात्र मी सांगितलेला विचार पोहोचलेला दिसतो.
प्रश्नः कुठल्या कुठल्या सामाजिक प्रश्नांना हात घालता?
चैतालीताई: सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न स्त्रीसुरक्षा. त्यावर बोलताना मी अगदी कडक शब्दांत लोकांवर ताशेरे ओढते. कुणाला वाईट वाटलं तर वाटू दे! त्याइतकंच महत्त्वाचं स्त्रीभ्रूणहत्या. माझी जिजाऊ विचारते, "तुम्ही मलाच पोटात असताना मारलंत, तर पुढचा शिवबा कसा काय जन्माला येणार?" आजची आई कशी असावी, हेदेखील जिजाऊ सांगते. राणी लक्ष्मीबाईही सांगते, "मीच पोटी येणार आहे असं समजा आणि त्याप्रमाणे मुलीला वाढवा. तुम्हाला पुढे तिचा अभिमानच वाटेल." स्वामी विवेकानंद ज्ञानाची कास धरायला सांगतात, तर मीराबाई सात्त्विक आणि विशुद्ध प्रेम शिकवते. या सगळ्यातून व्यसनांबद्दलही मी बोलते. लोकांना विचारते की "शिवाजीराजे असे गुटखा चोळत वेळ वाया घालवत आरामात राहिले असते, तर आजचा दिवस आपण पाहिला असता का?" असे अनेक विषय कार्यक्रमात असतात. त्या त्या ठिकाणाप्रमाणे किंवा तात्कालिक असेही विषय असतात. मध्ये हैदराबादमध्ये केलेल्या कार्यक्रमात मी गोहत्याबंदीबद्दलही बोलले. त्यासाठी मी गाईच्या शेणाच्या आणि मूत्राच्या उपयोगांचा अभ्यास करून गेले होते. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी कुठलाही विषय मांडत नाही, की कुठली व्यक्तिरेखा उभी करत नाही.
प्रश्नः व्यसनमुक्तीचे अनुभव कसे आहेत?
चैतालीताई: नक्कीच चांगले आहेत. आजपर्यंत ३७० जणांनी दारू सोडल्याचं मला सांगितलं आहे. काही गावंही पूर्णपणे व्यसनमुक्त झाली आहेत. पण हे प्रमाण आणखी खूप वाढायला हवंय. पुष्कळ काम करावं लागेल त्यासाठी.
प्रश्नः कार्यक्रम कुठेकुठे झालेत? प्रवास कसा करता?
चैतालीताई:इथे विदर्भातच बऱ्याच ठिकाणी झाले. आजपर्यंत १००च्या वर कार्यक्रम झालेत माझे. लातूरला एक मोठा कार्यक्रम झाला होता स्टेडियमवर. जवळपास १०,००० लोक होते.
त्याशिवाय कोल्हापुरातही केलेत. हैदराबादमध्ये केले. तिथला गोहत्येचा प्रश्न मोठा आहे. त्यावर यशोदामैयाच्या व्यक्तिरेखेतून बोलले. आता बडोद्यातही करतेय कार्यक्रम.
प्रश्नः तुम्ही हे बोचणारे काही विषयही घेता. त्याबद्दल कुणी विरोध करतं का? कशा प्रकारचा?
चैतालीताई: व्यसनाबद्दल बोलते किंवा स्त्रीसुरक्षेबद्दल बोलते, तेव्हा कडक शब्द वापरले तरी लोकांना पटतं आणि मला माणसांत त्यामुळे बदलही होताना दिसतायत.
विरोध केला तो ब्रिगेडवाल्या लोकांनी. एका कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच येऊन भांडत होते आणि कार्यक्रम होऊ देणार नाही म्हणाले. त्यांना सांगितलं की "कार्यक्रम पूर्ण बघा, नंतर चर्चा करू." मग म्हणाले, "जिजाऊंचं काम चांगलं करता. पण ते 'भवानी' वगैरे मध्ये आणू नका. आम्ही देव मानत नाही."
मग त्यांना सांगितलं, "मी इतिहासाचा पूर्ण नीट अभ्यास करून हे मांडलंय. शिवाजीराजे माता भवानीचे भक्त नव्हते हे तुम्हीच मला दाखवून द्या कुठे लिहिलंय ते." त्या वेळेस काही घडलं नाही. पण नंतर काही कार्यक्रम पोलीस प्रोटेक्शन घेऊन करावे लागले. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोक जिथे जिथे विचारतात, "बाई, तुमची जात कुठली?" मी सरळ सांगते, की "मी त्या जातीपातीच्या पलीकडे आलेय. मी माणूस म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. काहीतरी चांगलं घडावं या हेतूने कार्यक्रम करतेय. तुम्ही पूर्ण कार्यक्रम बघा आणि मगच मला जात विचारा!"
याच कारणामुळे मी शक्यतो राजकारणी लोकांमध्ये जात नाही आणि त्यांचे कार्यक्रम फारसे घेत नाही.
प्रश्नः कुठल्या मोठ्या संस्थांनी या कामाची दखल घेतली का? कुठले पुरस्कार?
चैतालीताई: बऱ्याच लहानमोठ्या बिगरसरकारी सेवाभावी संस्थांनी (NGOsनी) माझे कार्यक्रम केलेत आणि कौतुक केलंय. पण जितकं काम आहे त्या प्रमाणात मीडियाने दखल घेतली नाहीये. अलीकडेच ब्राह्मणसभेचा 'कण्वश्री' पुरस्कार मिळाला मला. त्याशिवाय 'सृजन' या संस्थेनेही सत्कार केला होता. सिंधूताई सकपाळांनीदेखील माझा सत्कार केलाय. पण कार्यक्रम पाहिल्यावर लोक लक्षात ठेवतात आणि बदलतात, हाच मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी. मी डॉ. प्रकाश आमटेंना खूप मानते. ते अगदी दैवत आहेत माझे. मी काही प्रसिद्धीसाठी आणि बक्षिसांसाठी कार्यक्रम करत नाही.
एक अनुभव सांगते. मी नक्षली भागात प्रवासात होते. रात्रीची वेळ होती आणि जंगलात गाडी बंद पडली. पेट्रोलच संपलं. तेवढ्यात कुठूनतरी एक दुसरी गाडी आली. ते लोक नक्की कोण होते माहीत नाही. पण त्यांनी मला ओळखलं आणि "काय झालं? पेट्रोल हवंय का?" म्हणून विचारलं. कुठलाही त्रास न होता मदत मिळून आम्ही पुढे आलो. अशा भागातही लोकांनी ओळखून मदत करणं, हा मोठा पुरस्कारच झाला माझ्यासाठी.
प्रश्नः तुमचे इतर प्रकल्प, बालसंस्कार वर्ग आहेत त्याबद्दल सांगा.
चैतालीताई: सध्या चंद्रपुरात वेगवेगळ्या खेड्यांमध्ये ४० वर्ग सुरू आहेत. त्यात लहान मुलांना गाणी, गोष्टी अशा माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यात येणाऱ्या मुलांचं मी निवासी शिबीरंही घेते सुट्टीच्या दिवसात. या आदिवासी भागात मला फार गुणी आणि हुशार मुलं दिसली आहेत. चंद्रपूर हा खाणींचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथून अमाप पैसा निर्माण होतो. पण लोकांना फक्त जमिनीतलं धन दिसतंय. इथल्या मुलांमध्ये जे हिरे लपलेले आहेत, त्यांना कोण पैलू पाडणार? त्यासाठी मुलांमध्येच काम करण्याची आणि त्यांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी येण्याची माझी धडपड सुरू आहे. याशिवाय मी गरीब घरातल्या गरोदर स्त्रियाही एक वर्षासाठी दत्तक घेते. त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि प्रकृतीकडे लक्ष देते आणि बाळंतपण सुखरूप होण्याची व्यवस्था बघते. इथल्या चांगल्या मुलांना मी शिक्षणासाठी मदत केली आहे. एका मुलीला १२वीनंतर पुढे शिकायची इच्छा होती. पण ती फार गरीब घरातली होती. मी तिला माझ्याकडे ठेवून घेऊन तिच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. आता ती पोलिसात गेली आहे. गरीब परिस्थितीतल्या आणखी एका मुलाला पदव्युत्तर शिक्षणाचीही सगळी सोय करून दिली. हल्ली एका अपंग मुलीला सांभाळतेय.
प्रश्नः या सगळ्या कामाला घरून पाठिंबा कसा मिळतो?
चैतालीताई: मिस्टर ACC सिमेंट फॅक्टरी मध्ये उच्च पदाधिकारी आहेत. ते त्यांच्या कामात बिझी असतात. तसंही मी घरातलं सगळं सांभाळूनच बाहेरचे कार्यक्रम करते. चांगल्या कामाला त्यांचा पाठिंबाच आहे. मात्र प्रकृती सांभाळून काय ते कर असं बजावतात! मुलं नागपूरला शिकायला आहेत आणि त्यांचाही या कामाला पाठिंबा असतोच. मुलगी ऋचा उत्तम गाते , व अकरावीतला ऋग्वेद तबला वाजवतो. तो कार्यक्रमाला साथ देतो. मात्र मला घरगुती कार्यक्रमांना जायला वेळ मिळत नाही, म्हणून नातेवाईक जरा नाराज असतात. पण त्याला इलाज नाही.
प्रश्नः या कार्यक्रमांची फलश्रुती म्हणून तुम्ही काय सांगाल? आणि तुमचे पुढचे प्रकल्प काय आहेत?
चैतालीताई: व्यसनमुक्तीला मिळणारा प्रतिसाद हे तर फलित आहेच. त्याशिवाय मलादेखील असा कार्यक्रम करायला शिकवा असं सांगायला सगळ्या स्तरातून आणि सगळ्या धर्मातून मुली येतात. याचा मला फार आनंद आहे. कुठल्याही जाती-धर्माचा अडसर न येता त्यांच्यापर्यंत माझी कळकळ पोहोचली, असं मी समजते.
आत्ता सुरू आहेत त्याशिवाय संत मीराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि संत मुक्ताई या पुढच्या व्यक्तिरेखा आहेत. मीरेची व्यक्तिरेखा मुख्यत; तरुणांसाठी आहे. त्यांना विशुद्ध प्रेम शिकवायला दुसरं कोण आहे? मी पुढची आणखी काही वर्षं - निदान पन्नाशीपर्यंत तरी असे कार्यक्रम करू शकेन असं वाटतंय. कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांमध्ये काम करत राहण्याची माझी इच्छा आहेच. नुसतं आपलं आपलं मजेत घरी बसून टीव्ही बघत आयुष्य घालवणं व्यर्थ आहे. लोकांना जितका चांगला विचार देणं मला शक्य आहे तितकं काम मी करणारंच.
***************************
अत्यंत आत्मविश्वासपूर्ण पण निगर्वी अशा चैतालीताईंशी झालेल्या गप्पा या माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायक ठरलेल्या आहेत, त्या वाचकांसमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे. ही मुलाखत सर्व वाचकांनाही प्रेरणादायी ठरेल, याची मला पूर्ण खातरी आहे. वाचक त्यांच्याशी त्यांच्या इमेल आयडीवर ( chaitali11vijay@gmail.com ) संपर्क साधू शकतात.
प्रतिक्रिया
9 Mar 2017 - 9:46 am | पैसा
_/\_ हे सगळ्यांना जमणारे नाही!!
9 Mar 2017 - 10:04 am | प्रीत-मोहर
वाह खूप कौतुकास्पद काम करताहेत चैतालीताई. तुमच्या कामाला खूप जास्त शुभेच्छा!! अजुनही समाजोपयोगी काम करण्याची शक्ती आणि आरोग्य देव तुम्हाला देवो
9 Mar 2017 - 12:36 pm | पियुशा
ग्रेट वर्क !!!!
13 Mar 2017 - 5:50 pm | आरोही
+1
10 Mar 2017 - 2:03 am | रेवती
महान समाजकार्य करतायत या ताई.
10 Mar 2017 - 3:05 am | सविता००१
भारी काम करताहेत चैतालीताई
10 Mar 2017 - 12:29 pm | सुचेता
चैतालीताई च काम कोएतुकास्पद आहे
10 Mar 2017 - 3:50 pm | बरखा
मुलाखत वाचुन छान वाटले. समाजा बद्दल काहीतरी करण्याचे बरेच जण ठरवतात, पण चैतालीताईं सारख्या लोकांनाच हे करायला जमत. जर पुण्यात कधी यांचा कर्यक्रम होणार असल्याच कळालं तर बघायला नक्की आवडेल. ताईंना पुढच्या वाट्चाली करता शुभेच्छा.
10 Mar 2017 - 4:17 pm | अजया
दंडवत स्विकारा चैताली ताई.
10 Mar 2017 - 9:29 pm | नूतन सावंत
कमालका काम, इमेल आयडी दिलास ते बरं झालं. महिला दिनाच्या अंकाच्या निमित्ताने झाकली माणिकं उघडकीला येताहेत.कवितानागेश नेमके प्रश्न विचारून मुलाखत छान घेतली आहेस.
10 Mar 2017 - 10:29 pm | पद्मावति
_/\_येथे कर माझे जुळती.
11 Mar 2017 - 4:25 am | जुइ
असे काम खूप थोडे लोक करु शकतात. अतिशय प्रेरनादायी व्यक्तिमत्व.
11 Mar 2017 - 5:12 pm | कविता१९७८
छान मुलाखत
12 Mar 2017 - 3:36 pm | कवितानागेश
आपण मला इतक मोठे पण दिलत , त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली , आता परत नव्या जोमाने कामाला लागेन, अनहिता चे आभार. धन्यवाद ताई.
- चैताली खटी यांच्याकडून
18 Mar 2017 - 11:47 am | पूर्वाविवेक
प्रपंच सांभाळून छान परमार्थ साधलाय त्यांनी. सलाम त्यांच्या कार्याला.
19 Mar 2017 - 12:57 pm | संदीप डांगे
ग्रेट गोइन....!
21 Mar 2017 - 12:01 am | प्रश्नलंका
छान मुलाखत. चैताली ताईंना मनापासून दंडवत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
22 Mar 2017 - 9:01 pm | पिशी अबोली
छान मुलाखत!
23 Mar 2017 - 1:50 pm | मंजूताई
छान !छान मुलाखत. चैताली ताईंना मनापासून दंडवत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
7 Apr 2017 - 2:30 am | रुपी
छान मुलाखत! खूप प्रेरणादायी !!