सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत? तर उत्तर येते 'साडी'! बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले, लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असेही हेच वस्त्र! आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच.. साडी! हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे, चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वसन. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे.
साडी हा वैश्विक वसनसंस्कृतीतला सगळ्यात जुना आणि अजूनही वापरत राहिलेला वस्त्रप्रकार आहे! साडी हे नाव संस्कृत 'शाटी' म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले आहे. त्याचेच प्राकृत रूप साडी. जुन्या जातक कथांमध्ये स्त्रीच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका या शब्दाचा उल्लेख येऊन गेलेला आढळतो.
बदलत्या वस्त्रविश्वाचा आढावा घेताना भारतीय स्त्रीच्या वस्त्रसंस्कृतीची कशी उत्क्रांती होत गेली, हे बघत आपण जाऊन पोहोचतो ते थेट सिंधू संस्कृतीत. तसे कापसापासून वस्त्र तयार करणे हे मेसापोटेमियन संस्कृतीत सुरू झाले होते. तिथूनच हे सिंधू संस्कृतीत प्रवेश करते झाले. त्यामुळे लंगोट नेसण्याच्या आत्ताच्या पद्धतीने त्या काळात असे वस्त्र नेसले जायचे. देहाच्या वरच्या भागात काही नेसायची पद्धत पुढेही अनेक वर्षे भारतात नव्हती. अगदी थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या कातडीने वरचे अंग झाकले जाई. त्यामुळे गळ्यात विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल असे. मुळात आपल्या देशातल्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रकारच्या तापमानाने फार कपडे घालणे ही कधीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे भारतीय वस्त्रसंस्कृतीत कपड्याचे महत्त्व हे जास्त सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रकारचे आहे.
नंतर आर्य लोक भारतात प्रवेशते झाले. त्यांच्याकडून संस्कृत शब्द मिळालाय 'वस्त्र'. आणि अग्निपूजक आर्यांनी लाल रंगाचे महत्त्व वाढवले. लाल रंगाला प्रजोत्पादन, पावित्र्य याचे प्रतीक समजले जाई. त्यामुळेच अजूनही उत्तर भारतीय लग्न ही लाल साडीत लावली जातात! तर या काळातही, सर्वांगाला गुंडाळलेले एक कापड असाच स्त्रियांचा वेष दिसतो. यात परिधान म्हणजे अंतरीय म्हणजेच कमरेला नाडीसदृश धाग्याने (मेखलेने) धरून ठेवलेले वस्त्र, थंडीत प्रवर म्हणजे चेहरा झाकण्यासाठी आच्छादन आणि उत्तरीय जे शालीसारखे खांद्यावरून घेतले जाई. हे फक्त त्या काळातल्या श्रीमंताची चैन होती बरे! गरीब स्त्री-पुरुष लंगोटीतच वावरत होते.
यानंतरच्या काळात मात्र आताच्या साडीसारखे बदल हळूहळू दिसायला लागले ते मौर्यांच्या आणि संगाच्या काळात. म्हणजे सांचीचा प्रसिद्ध स्तूप बनल्याचा काळ. १८७-७८ ख्रि.पूर्व काळ हा. या काळात कमरेवरच्या कायाबंधाला वस्त्र खोचले जाऊन त्याच्या निर्या आताच्या धोतरासारख्या खोचल्या जाऊ लागलेल्या त्या काळात सापडलेल्या चित्रांवरून आणि पुतळ्यांवरून दिसते.
( दोन्ही चित्रे विकिपिडियावरील मुक्त स्रोतावरून साभार)
काही शतकांनंतर गुप्तांच्या काळात शिवलेले कपडे दिसायला लागतात. याच काळात घागरासदृश वस्त्र नेसायला सुरुवात झालेली दिसते. तसेच शिवलेल्या चोळ्याही चित्रांमध्ये दिसू लागतात. याआधीच्या काळात कंचुकी म्हणजेच वस्त्राचा एक पट्टा छाती झाकायला वापरलेला दिसतो. संस्कृत साहित्यात त्याचे उल्लेख येऊन गेलेले आढळतात.पर्शियन लोक शिवण्याची कला आपल्यासोबत घेऊन आले आणि भारतीय स्त्रियांच्या वस्त्रसंस्कृतीत बदल होऊ लागले. याच काळात अजंठ्यामधील चित्रांमध्ये शर्टासारखे जॅकेट ब्लाउझ म्हणून वापरायला सुरुवात झालेली दिसते. तरीही त्या काळातल्या उच्चवर्णीय स्त्रिया चोळी घालत नसत. नोकरवर्गात चोळी आधी वापरली जाऊ लागलेली दिसते. मुळात या बदलाचे कारणही बाहेरून आलेल्या या लोकांची वस्त्र होती. त्यांच्याप्रमाणेच आपणही वरचे अंग झाकूनही त्याचे सौष्ठव दाखवता येईल, हे दिसून आल्यावर चोळीसदृश कपडे वापरणे वाढले असावे. तसेच बौद्ध ,जैन धर्मांच्या प्रभावामुळेही आकर्षक प्रलोभक दिसू नये, म्हणून वरचे अंग झाकणे आवश्यक समजले जाऊ लागले.
(जालावरून साभार - मुक्त स्रोत)
कालौघात या जॅकेटचे स्वरूप बदलत ते आखूड आणि फक्त छातीवर तंग बसणारे असे वस्त्र - म्हणजेच चोळी म्हणून वापरले जाऊ लागले. संत ज्ञानेश्वरांच्या काव्यात तेराव्या शतकात 'चंदनाची चोळी' शब्द येऊन गेलेला आढळतो. या चोळीवर वस्त्राचा ओढून घेतलेला भाग म्हणजेच पदर. हा पदर मात्र आपण रोमन संस्कृतीतून घेतला आहे! रोमन लोकांमध्ये वस्त्राचा एक भाग पुढे ओढून तो डाव्या खांद्यावर टाकलेला असे. ही झाली साडीची ओरिजिनल स्टाईल! असेच दोन पायांच्यामधून वस्त्र नेऊन मागे खोचले जाई आणि पुढे पदर ही झाली नऊवारी पद्धतीने साडी नेसायची सुरुवात!
(जालावरून साभार)
गुप्तकाळात मात्र अशा काष्टा पद्धतीने साडी नेसणे हळूहळू मागे पडत अंतरीय लुंगीसारखे गुंडाळले जाऊ लागले. सकच्छ साडी महाराष्ट्र आणि दक्षिणेपुरतीच नेसली जाऊ लागली. त्यामुळे उत्तर भारतीय साडी नेसणे हे गुंडाळून आणि आपले नऊवारी नेसणे हे निर्या मागे नेऊन खोचणे असा फरक तयार झाला. अशा प्रकारे आपल्या खंडप्राय देशात निरनिराळे समाज या साडी नेसण्यात थोडेसे फरक करत आपले वेगळेपण टिकवू शकले आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीवर साडीचा पडलेला हा लक्षणीय प्रभाव आहे.
मुघलकाळात भारतीय वस्त्रांमध्ये उपयुक्ततेच्या पुढे जाऊन सौंदर्यीकरण होऊ लागले. तलम कापड, नक्षीकाम, कलमकारी, जरीचा वापर, कुंदनचा वापर, सिल्क मार्गाने येणारे उत्कृष्ट सिल्क अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव वस्त्र सजवण्यामध्ये होऊ लागला. मुघल सम्राटांच्या दरबारी कसलेले कारागीर जरीकाम, शिवणकाम करीत असत. मुघल जे ब्रोकेडचे कापड वापरत असत, ते त्यांच्या प्रभावामुळे जगभर 'किन्खापी' म्हणजेच 'किन ख्वाब' अर्थात 'सोनेरी स्वप्न' अशा नावाने अजूनही ओळखले जाते. चेहरे झाकण्याची पद्धत सुरू झाल्याने पदराची लांबी वाढली. सलवार-कमीझसारखी वस्त्रप्रावरणे थंड प्रदेशात लोकप्रिय होऊ लगली. याच काळात साडी घागरा पद्धतीने नेसताना पारदर्शक वस्त्रामागे अवयव झाकण्यासाठी मध्ये घागरा घातला जाऊ लागला. त्यावर घ्यायचा दुपट्टा ही साडीची वेगळी स्टाईलही लोकप्रिय होऊ लागली.
(चित्र स्रोत - http://webneel.com/mughal-paintings)
मुघलांच्या कापडशौकाचा परिणाम म्हणून निरनिराळ्या गावांत विणल्या जाणार्या वस्त्रांमुळे त्या गावांची महती वाढली. बनारसी, बांधणी, पटोला, चंदेरी, महेश्वरी..... किती नावे घ्यावी! या सर्व ठिकाणांच्या साड्या आपण आजही हौशीने वापरतो!
यानंतरचा काळ म्हणजे भारतातले ब्रिटिश राज्य. तो युरोपातला स्त्रीने डोक्यापासून पायापर्यंत सर्व झाकलेले असण्याचा व्हिक्टोरियन कालखंड. याही काळात भारतात केरळ-बंगाल यासारख्या प्रांतांत चोळी घालायची पद्धत नव्हतीच. १८६०च्या आसपास रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्रनाथ हे पहिले आयसीएस अधिकारी असल्याने, त्यांना गव्हर्नरकडे पार्टीचे सपत्निक निमंत्रण असे. अशाच एका पार्टीला चोळी न घालता बंगाली पद्धतीने साडी नेसलेल्या ज्ञाननंदिनीदेवींना प्रवेश नाकारला गेला. आणि मग टागोर घराण्यातल्या स्त्रिया पाश्चात्त्य पद्धतीचे 'ब्लाउझ' घालून साडी नेसू लागल्या! जे सोयीचे आहे ती पद्धत आपोआप रुळत जाते, या नियमाला याही वेळी अपवाद न होता सर्वच प्रांतांत लज्जारक्षणासाठी ब्लाउझ घातलेच जाऊ लागले! अर्थातच या ब्लाउझांवर पाश्चात्त्य प्रभाव जास्त होता.
(चित्रस्रोत - http://www.bbc.com/news/magazine-30330693http://www.bbc.com/news/magazin...)
(चित्रस्रोत - विकिपिडिया)
महाराष्ट्रात याच काळात नऊवारी साडी काष्टा पद्धतीने नेसली जात होती. झाशीच्या राणीच्या चित्रात काष्टा पद्धतीची साडी नेसलेली घोड्यावर आरूढ राणी आपण बघितलीच आहे. राजा रविवर्म्यालादेखील मराठी पद्धतीची साडी हा पोषाख अगदी त्याच्या देवदेवतांच्या चित्रांमध्येही वापरावासा वाटला आहे. या प्रकारच्या साडीत स्त्रीचे सौंदर्य आणि सौष्ठव खूलून दिसते, असे त्याचे मत होते.
(चित्रस्रोत - विकिपिडिया)
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला बालगंधर्व नावाचे स्वप्न पडले आणि नऊवारी साडीतली मूर्तिमंत शालीनता तमाम मराठी स्त्रियांवर गारूड करून गेली. त्या काळात स्त्रियांची साडी नेसायची पद्धत चक्क एका पुरुषाने बदलली! दोन्ही खांद्यांवर पदर आणि पाय उघडे न दिसणारी नऊवारी पैठणी नेसलेली संगीत शाकुंतलमधली शकुंतला बनून आलेल्या बालगंधर्वांनी मराठी साडीचे एक युग अक्षरशः गाजवले. त्यांच्या नाटकात नेसल्या गेलेल्या प्रकारांच्या पैठण्या शालूंनी मराठी घरातली कपाटे भरू लागली!
(चित्रस्रोत - https://balgandharvarangmandir.wordpress.com/)
यानंतरच्या काळात साडीवर जसा इतिहास-भूगोलाचा प्रभाव पडत गेलाय, तसाच चित्रपटसृष्टीचाही मोठा प्रभाव पडत गेलाय. १९३७ सालात आलेल्या त्या काळातल्या सुपरहिट 'कुंकू' चित्रपटात शांता आपट्यांनी नेसली तशी साडी माझी आजी नेसत असे! सध्या सुरू असलेली फुग्याच्या बाह्यांच्या ब्लउझची फॅशनही तेव्हाचीच!
(आंतरजालावरून साभार)
१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत. तरी साडी नेसायची पद्धत अगदी साधीसुधी असे. पदर बहुधा एकत्र पकडून पिन लावणे इतपतच साडी नेसणे असे!
( चित्रस्रोत - https://www.google.co.in/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&ved=...)
अंगप्रत्यंग दाखवणारी चोपून बसवलेली साडी नेसायची अगदी नवी पद्धत आणली १९७५च्या आसपास मुमताजने. अजूनही लग्नांमध्ये हौसेने अशी साडी स्वागत समारंभांमध्ये नेसताना दिसतात.
(आंतरजालावरून साभार)
नव्वदच्या दशकात यश चोप्रांच्या सिनेमातल्या नायिका साडीमध्ये विलक्षण देखण्या दिसत. त्या साड्यांमुळे पेस्टल रंगाच्या, शिफॉनच्या प्लेन साड्या लोकप्रिय झाल्या. यश चोप्रांची चांदनी कोण विसरेल!
(आंतरजालावरून साभार)
आत्ताच्या काळातल्या नायिकासुद्धा स्टाइल स्टेटमेंट म्हणून साडी हिरिरीने वापरताना दिसतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी साडी नेसताना दिसतात. भले आता घोडा गेला, बुलेट आली! पण परंपरा म्हणून साडी हवीच आहे.
( चित्र स्त्रोत-http://indiatoday.intoday.in/gallery/gudi-padwa-chaitra-shukla-pratipada...)
हजारो वर्षांपासून स्त्रीचे सर्वांग झाकूनसुद्धा स्त्रीला मोहक दिसवणारा, कोणासाठी परंपरा सांभाळणारा तर कोणासाठी स्वतःची ओळख बनलेला हा वस्त्रप्रकार, साधेपणात सौंदर्य खुलवणारा, स्त्रीची शालीनता दाखवणारा, तर कधी स्त्रीच्या सौष्ठवाचे दर्शन घडवणारा ग्लॅमरस अवतार धारण करणारा, त्याच्या मर्यादा असूनही वेगवेगळ्या प्रकारांनी कारणांनी वापरला जातोय आणि जाणार आहे, हेच मला वाटते साडीचे स्त्री मनावरचे गारूड आहे!
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 4:20 pm | प्राची अश्विनी
खूप छान माहिती. सध्या १०० दिवस साड्यांचा विडा स्विकारला आहे.:)
8 Mar 2017 - 4:40 pm | अजया
बाबौ !
9 Mar 2017 - 6:51 pm | पैसा
मी पण कपाटातले हँगर्स झटकले आहेत!
8 Mar 2017 - 4:38 pm | मनिमौ
पण साडी प्रकार विशेष आवडता नसल्याने बाकी कोणी साडी चापून चोपून नेसली असेल तर मात्र बघायला आवडते
8 Mar 2017 - 4:49 pm | पूर्वाविवेक
खूप मस्त आणि सविस्तर लिहिलं आहेस.
कित्येक वर्षांपासून चालू असलेली साडीची जादू आजही तितकीच टिकून आहे.
8 Mar 2017 - 4:56 pm | पद्मावति
साडीसारखाच देखणा लेख.खूप आवडला.
8 Mar 2017 - 9:26 pm | जव्हेरगंज
लेख आवडला!!
8 Mar 2017 - 9:36 pm | प्रीत-मोहर
सुरेख. मलाही साडी खूप आवडते. जमेल तेव्हा हापिसात पण नेसून जाते मी
9 Mar 2017 - 12:44 pm | प्रीत-मोहर
आत्ता हे लक्षात आलं या लेखाचा हेडर फुटर पण जबरी आणि लेखाला अनुरुप आहेत
__/\__
8 Mar 2017 - 10:34 pm | इशा१२३
आवडत्या विषयावर सुरेख लेख अजया ! फोटोही समर्पक, देखणे निवडलेत!
8 Mar 2017 - 11:32 pm | पियुशा
अग बाई किती जूना इतिहास आहे साडी चा, लेख खुप आव्डला :)
9 Mar 2017 - 3:23 pm | विनिता००२
साडीचा सुरेख इतिहास :)
9 Mar 2017 - 3:27 pm | स्वप्नांची राणी
विलक्षण आहे हे!! एका जेमतेम नऊ गज वस्त्राची किती बदलती रुपं!!! मस्त लिहीलंय अजया!!!
9 Mar 2017 - 3:37 pm | लाडू
लेख छानच! मलाही साडी आवडते, ऑफिस मधेही आठवड्यातून एक दिवस आम्ही मैत्रिणी साडी नेसतो.
("चंदनाची चोळी" चा अर्थ पं. ह्रिदयनाथ मंगेशकरांनी एका कार्यक्रमात समजावून सांगितलं होता, तो वेगळा होता. ती "साडी-चोळी" मधली चोळी नव्हे...)
9 Mar 2017 - 3:54 pm | कविता१९७८
खुप छान माहीती
9 Mar 2017 - 4:08 pm | विभावरी
साडी बद्दल ची माहिती छानच .फोटो पण मस्त !
9 Mar 2017 - 6:32 pm | रेवती
साडीची मूळ माहिती पहिल्यांदाच वाचनात आली. लेखन आवडले.
9 Mar 2017 - 6:50 pm | पैसा
मस्त आवडीचा विषय!
9 Mar 2017 - 7:08 pm | मद्रकन्या
अगदी ठेवणीतल्या पैठणी सारखा जपून ठेवावा असा सुंदर माहितीपूर्ण लेख.
9 Mar 2017 - 8:33 pm | मीता
खूप माहितीपूर्ण लेख.. साडी नेसायला खूप आवडते . लेखही खूप आवडला ..फोटोहि अनुरूप आहेत
9 Mar 2017 - 11:04 pm | स्नेहानिकेत
अतिशय सुरेख लेख ,समर्पक फोटो!! साडीचा इतिहास अगदी छान उलगडलास अजया ताई!!
10 Mar 2017 - 11:16 am | उल्का
माहितीपूर्ण लेख आवडला.
10 Mar 2017 - 5:54 pm | सुचेता
त्यामुळे लेखही आवडला,
10 Mar 2017 - 6:15 pm | मोनू
खूप सुरेख लेख अजया...साडी तीच पण तिचे कालानुरूप बदलणारे रूप .... अत्यंत सुंदर मागोवा घेतला आहे. खूप अभ्यासपूर्ण लेख .
11 Mar 2017 - 1:33 am | इडली डोसा
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि देखणे माहिती संकलन असलेला लेख.
11 Mar 2017 - 1:56 pm | नूतन सावंत
आवडता पोशाख साडी,तिच्यांबद्दल इतक्या आत्मियतेने आणि अभ्यास जारून लिहिलेला लेख खूपच आवडला.छान लिहिलं आहेस अजया.
11 Mar 2017 - 2:38 pm | Maharani
मस्त माहितीपूर्ण लेख..
11 Mar 2017 - 3:06 pm | स्वाती दिनेश
सारखाच ग्रेसफुल लेख! आवडला.
स्वाती
13 Mar 2017 - 5:01 am | श्रीनिवास टिळक
अंजु मुद्गल कदम (Anju M Kadam) आणि आली माथन (Ally Mathan) या दोघीनी भारतीय साडीचा विश्वात प्रसार करण्याची मोहीम उघडली आहे. या दुव्यावर वेगवेगळ्या देशातील स्त्रिया साडीमध्ये दिसतात https://pbs.twimg.com/media/CnkXnKEWIAATqdI.jpg
या दुव्यावर अधिक माहिती मिळेल http://100sareepact.com/
13 Mar 2017 - 8:30 am | अजया
अरे वा! लिंकबद्दल धन्यवाद !
13 Mar 2017 - 11:37 am | मितान
साडी नुसती बघायला किंवा दुसऱ्यांनी नेसलेली आवडते.
पण माहिती वाचायला आवडले :)
13 Mar 2017 - 2:48 pm | पिशी अबोली
हम भी साडी प्रेमी हैं, इसलिये लेख अति आवडा हैं..
100 साडी pact करायचा विचार होता, पण फार सुंदर दिसण्यासारख्या जागी नाही राहत मी सध्या. तरीही जमेल तेव्हा साडी नेसतेच नेसते.
13 Mar 2017 - 2:57 pm | वरुण मोहिते
कि !!!
13 Mar 2017 - 6:52 pm | मारवा
जबर माहीतीपुर्ण लेख
आवडला फार.
13 Mar 2017 - 8:54 pm | हाहा
सुरेख झालाय लेख. फोटो पण छान. एकदम माहितीपुर्ण !
13 Mar 2017 - 9:17 pm | चौथा कोनाडा
सुंदर माहितीपूर्ण लेख !
13 Mar 2017 - 9:30 pm | मारवा
त्याविषयी थोडे व्यावहारीक मार्गदर्शन करावे काही रोचक प्रकार उदा नारायणपेठ साडी तसेच येवला पैठणी व ती कूठली मावळ कडची फेमस साडी त्याविषयी जमल्यास सचित्र माहीती द्यावी ही विनंती
14 Mar 2017 - 10:20 am | पैसा
सात आठशे असतील! =))
14 Mar 2017 - 10:10 am | अजया
छान कल्पना आहे . अभ्यास करुन नक्की लिहीन.
14 Mar 2017 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
अप्रतिम माहिती . आवडला लेख.
15 Mar 2017 - 2:11 am | श्रीनिवास टिळक
या दुव्यावर भारतातील विविध प्रकारच्या साड्यांची केंद्रे नकाशावर दिसतात
https://www.facebook.com/IndiaInNepal/photos/a.201359866561135.50198.199...
15 Mar 2017 - 11:59 am | सानझरी
लेख खूप आवडला!!
17 Mar 2017 - 8:06 am | मदनबाण
सुंदर लेख ! दागिन्यां नंतर पाखरांचा सगळ्यात मोठा विक पॉइंट ! ;)
यावर बरंच काही लिहता आलं असत मला... पण फक्त एक गाणं देउन काम भागवतो !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]
22 Mar 2017 - 11:34 am | आरोही
अतिशय सुंदर लेख. खूप माहिती मिळाली . साडी नेसायला आवडतेच.आणि भारतात तर इतक्या विविध पद्धतीने साडी नेसली जाते.त्यामुळे या वस्त्रावर खूप प्रेम आहे.या मस्त लेखासाठी खूप सारे आभार अजयाताई
22 Mar 2017 - 2:40 pm | जागु
साडीचा इतिहास खुप छान.
23 Mar 2017 - 1:23 pm | भुमी
सविस्तर लेख आवडला...
24 Mar 2017 - 4:43 pm | बरखा
साडी बद्दल खुप छान माहीती दिलीत. जुना ईतिहास ते आत्तपर्यतचा साडीचा वापर या बद्दल छान माहीती मिळाली.
24 Mar 2017 - 5:22 pm | सस्नेह
भारी आहे साडीचा इतिहास !
सुरेख साडी नेसणाऱ्या आणि ती दिवसभर इकडची निरी तिकडे होऊ न देता सांभाळणाऱ्या सर्व सुपरवूमन्सना __/\__
24 Mar 2017 - 6:33 pm | सूड
व्यवस्थित साडी नेसलेल्या आणि ती कॅरी करता येणार्या मुली-बायका-काकूज चारचौघींत नक्कीच उजव्या दिसतात. काही जणी साडी नेसल्यानंतर गौर सजवल्यासारख्या ढिम्म बसतात किंवा काहींनी जे काही नेसलंय त्याला साडी का म्हणावं हा प्रश्न पडतो.
25 Mar 2017 - 12:38 pm | अजया
मार्मिक निरीक्षण !
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद !