आज या भागात आपण भारवाहकांबद्दल वाचणार आहोत. देवळांचा सर्वात खालच्या थरांनंतर भितींच्या टोकावर यांची शिल्पे सर्व देवळांवर आढळतात. ज्याठिकाणी तुळया येतात किंवा खांबावर छताचा भाग येतो त्यावर हे शिल्प आढळतेच. नुसता सांधा ठेवण्यापेक्षा हे वजन कोणीतरी उचलते आहे ही कल्पना करुन हे शिल्प तेथे लावणे ही कल्पनाच मला मोठी रम्य वाटते. सगळ्यात दुर्लक्षित अशी ही मूर्ती. सगळ्यात अभ्यासावेत तर त्यांच्या चेहर्यावरील हावभाव. सगळ्यात खाली असतात त्यांच्या चेहर्यावर जरा त्रासिक भाव मला आढळतो तर जसे जसे वर जात जाऊ तसे वजन हलके झाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील भाव सौम्य व प्रसन्न होत जातात. सगळ्यात वरचे तर नर्तनही करताना दिसतात. सगळ्या देवळाचे वजन उचलताना त्यांच्या चेहर्यामागे एक प्रकार्चा निर्विकारपणा लपलेला असतो असे मला उगीचच वाटते.
लाकुंडीच्या देवळावरील हा एक भारवाहक. मजबूत दंड व पाय. आपल्याकडे शरीर पिळदार दाखविण्याची पद्धत नसावी. ओठातून बाहेर आलेले सुळे बहुधा हे मर्त्य नसावेत हे दर्शवते. काही तज्ञ हे गंधर्व योनीतील आहे असे प्रतिपादन करतात.
जरी यांची वर्गवारी गंधर्व/यक्ष योनीत केलेली असली तरी मला यांच्यात आणि आपल्यात एक साम्य आढळते ते म्हणाजे भारवाहकाची त्यांची भुमिका. आपणही आयुष्यभर कसला ना कसलातरी भार उचलतच असतो. त्यातून कोणाचीच सुटका नाही. काय सांगावे हे त्याचेही प्रतिक असावे. खाली अजून काही भारवाहकाची छायाचित्रे देत आहे.
आपल्याला माहीत आहे की अफगाणीस्थानात फार पूर्वी हिंदू धर्माचे अधिष्ठान होते. त्या काळात जी काही देवळे होती त्यावर हिंदू मूर्ती शास्त्राचा प्रभाव पडला असणार. तेथे नंतर ग्रीकांच्या संस्कृतीचाही प्रभाव पडला हेही आपल्याला माहीत आहे. मग भारवाहकांचा प्रभाव का नाही पडणार ? एका बौद्ध देवळात ग्रीक देवतेला, अॅटलासला चक्क भारवाहकाची भुमिका दिलेली आढळते. ते चित्र खाली बघा. (हाड्डा, अफगाणिस्थान)
भारवाहकांची एक रांग.
लाकुंडीचे कितीही फोटो टाकले तरी समाधान होत नाही. मी तर जवळजवळ ५००/६०० फोटो काढले. फोटो काढल्यावर मुक्कामाला जाऊन सर्व फोटो लॅपटोपवर डाऊनलोड करायचे, कार्डे रिकामी करायची, सर्व बॅटर्या चार्ज करायच्या ही सर्व महत्वाची कामे करायची होती आणि सकाळी ताडपत्रीला रवाना व्हायचे होते...आता एवढे फोटो येथे टाकणे शक्य नाही...असो...
शेवटी ताडपत्रीच्या देवळावरील एका भारभावकाच्या एक शिल्पाचे एक छायाचित्र टाकून हे भारवाहक पुराण येथेच थांबवतो..... :-)
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
12 Jan 2017 - 3:22 pm | भम्पक
........
12 Jan 2017 - 3:36 pm | जयंत कुलकर्णी
मी दचकलोच ! मला वाटले मला भंपक म्हणताय की काय. म्हणजे म्हणायला हरकत नाही पण....
नंतर लक्षात आले आपला आयडी आहे तो...
एकदम पाहिले तर तसेच वाटते खरे.... ह..हा हा.....
12 Jan 2017 - 6:16 pm | प्रचेतस
भारवाहन करणारे हे गंधर्व नसून यक्ष.
बटबटीत डोळे, खुजी मूर्ती, सुटलेले पोटे, चार हात, विकृत चेहरा ही त्यांची काही प्रमुख लक्षणं. यक्षांचे प्रमुख काम म्हणजे भारवाहन.
काही संशोधक यक्ष ही संकल्पना ग्रीकांकडून आली असे मानतात कारण यक्षांचा अधिपती कुबेर. ह्याचे ग्रीक देव बेकस ह्याच्याशी साम्य आहे. बुटकी मुर्ती असल्यानेच यक्षांना कीचकही म्हटले जाते.
13 Jan 2017 - 3:41 pm | एस
नेहमीप्रमाणेच अप्रतिम! बेडसे लेण्यांतही काही छान मूर्ती आहेत भारवाहकांच्या, त्यांची आठवण आली.
14 Jan 2017 - 6:12 pm | अजया
नेहमीप्रमाणेच अ प्र ति म.
16 Jan 2017 - 1:09 pm | सपे-पुणे-३०
थोडक्यात पण अत्यंत माहितीपूर्ण लेख! सगळे फोटोही सुंदर आलेत. पूर्वी देवळं पाहताना केवळ खांबांवरची कलाकुसर किंवा नक्षीकाम हाच दृष्टिकोन ठेऊन बघितलं जायचं पण आता मिपावरचे असे लेख वाचून आपोआपच तो दृष्टिकोन बदललाय.
18 Jan 2017 - 12:13 pm | पैसा
कसलं अफाट डिटेलिंग आहे! जाऊन बघणे अत्यावश्यक आहे आता!
19 Jan 2017 - 3:56 pm | ज्योति अळवणी
खूप छान लिहील आहात. आवडलं
20 Jan 2017 - 9:03 pm | यशोधरा
सुरेख लेख आणि फोटो. वाचते आहे.