माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 3

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
2 May 2016 - 4:46 pm

आज लंडन मधील दुसरा दिवस –

नवऱ्याला ऑफिसला लौकर जायचे असल्याने लौकरच सगळं आवरून तो ऑफिसला गेला. अजून माझा लंडन ट्यूब पास काढला नसल्याने आज मला कुठे लांब फिरायला जाता येणार नव्हतं. लंडन ट्यूब म्हणलं की आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन्सची आठवण येते. कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याचा सगळ्यात जलद मार्ग. फक्त यांच्या ट्रेन्स एसी असतात आणि आपल्याइतकी गर्दी नसते. लंडन ट्यूब हि ११ लाइन्स मध्ये विभागली गेली आहे . लंडन ट्यूबचा नकाशा आपलं काम एकदम सोप्पं करून टाकतो. मला माझ्या २१ दिवसांच्या वास्तव्यात कुणालाही कुठेही काहीही विचारण्याची गरज भासली नाही इतका व्यवस्थित नकाशा दर्शवलेला आहे, शिवाय ट्यूब मध्ये पुढचं स्टेशन कुठलं येणार आहे, त्यास्टेशन वरून कुठली लाईन जाते आहे , ती कुठे connect होणार आहे आणि कुठल्या बघण्याच्या जागा त्या स्टेशन वरून जाण्यासाठी आहेत हे सगळं announce करतात. स्टेशन च्या बाहेर पडताना या सगळ्या ठिकाणी कसे जायचे आहे याचे फलक आणि खुणा केलेल्या आहेत त्यामुळे कुठेच आपल्याला विचारावं लागत नाही.

लंडनची ट्यूब ही साधारण ९ झोन्स मध्ये फ़िरते. त्याच्या बाहेर national rails जातात. ट्युब मधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला ५ पौंडचं refundable deposite भरून Oyster कार्ड विकत घ्यावं लागतं ज्यावर तुम्ही हा पास activate करू शकता. तुम्हाला काहीही अडलं तर तिथे काम करणारे लोकं तुमच्या सेवेत तत्पर असतात व अतिशय व्यवस्थित माहिती सांगतात. हा पास कुठल्याही स्टेशन वर activate करता येतो. तुम्ही २ झोन्स चा पास काढलात तर त्यावर तुम्ही लंडन मध्ये १ ते ७ झोन फ्री मध्ये बस ने फिरू शकता त्यासाठी कुठलेही तिकीट काढावे लागत नाही.तुम्ही जर रेल्वे चा १ आठवड्याचा २ झोन्स चा पास काढलात तर तुम्हाला तो साधारण ३२ पौंड ला पडतो पण तुम्ही फक्त तेवढ्याच झोन मध्ये फिरू शकता.कितीही वेळा हं. त्या झोन बाहेर फिरायचे असेल तर तुम्हाला top up करावं लागतं. म्हणजेच त्यावर पैसे लोड करावे लागतात आणि तुमच्या प्रवासाच्या भाड्या प्रमाणे ते कट होतात. तुम्ही जसेजसे फिरणार आहात तसं Topup केलं तरी चालेल पण माझ्यामते ते जरा महाग पडू शकतं. मी रोजच फिरणार होते त्यामुळे मी पासच काढला. माझ्यामते बघण्याची मुख्य ठिकाण हि झोन १ आणि २ मध्येच आहेत. १ आणि २ झोनच्या बाहेर अजून बघण्यासारखी ठिकाणं असतील सुद्धा पण मी फिरलेली काही या १ आणि २ झोन च्या बाहेरची ठिकाणं म्हणजे Wimbeldon , Wimbley Stadium, Kew Gardens, Harry potter studios. इथे तुम्ही बस ने जाऊ शकता पण बस ने फिरणं म्हणजे खूप वेळखाऊ आहे. ट्रेन पटपट जाते. आणि हो तुमचं वास्तव्य संपलं की ते कार्ड परत करायचे म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्डवरचे उरलेले पैसे जर topup केल असेल तर आणि शिवाय deposite che ५ पौंड परत मिळतात.

एका ठिकाणाहून दुसरऱ्या ठिकाणी ट्यूबने जाण्यासाठी काही वेळा लाईन बदलावी लागते. त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर माझा ट्यूब पास काढून आम्ही ते सगळं बघायला जाणार होतो. नवरा आधी गेला असल्यामुळे त्याला सगळं माहीत होतं लाइन कशी बदलायची ते सगळं तो मला सांगणार होता जेणेकरून मी दुसऱ्या दिवसापासून एकटी फिरू शकेन. माझ्याकडे अख्खा दिवस होता त्यामुळे मी ठरवलं Hyde पार्क बघायला जाऊ. सगळं आवरून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर थोडं पुढे चालत गेल्यावर एका अनोळखी माणसाने मला सुप्रभात केलं आणि कसे आहात असं विचारलं. सुरुवातीला मी एकदम गोंधळून गेले असं विचारल्यावर. अनोळखी देशात एका अनोळखी माणसाने एकदम असा विश केलं की काय होणार न! तरी मी स्मितहास्य करून त्यांना विश करून पुढे निघाले. या गोष्टीची गम्मत वाटली मला. आमच्या घरापासून Hyde पार्क २ मिनिट चालत जाण्याच्या अंतरावर होतं तेवढ्या अंतरावर ३ सिग्नल्स होते. सगळे लोकं पाळत होते आणि :) काही काही लोकं म्हणजे असेही दिसले की जे गाडी येत नाही बघून पटकन रस्ता ओलांडत होते :) आपण च आपल्या माणसांचा उद्धार करतो :P गमतीचा भाग वगळा पण तिकडची शिस्त, स्वच्छता हे सगळं बघितल्यावर अनुभवल्यावर प्रसन्न वाटलं.

बागेमध्ये आल्यावर मला समजतच नव्हतं की मी कुठल्या बाजूला जाऊ इतकी ती बाग सर्व बाजूंनी पसरलेली आहे. जिथे पाहावं तिथे हिरवंगार. मग मी मनाशी ठरवलं, सरळ जाऊया म्हणलं बघूया आपल्याला कुठे नेतोय हा रस्ता. मला उत्सुकता होती आणि मज्जा वाटत होती कि एका अनोळखी देशामध्ये आपण असे एकटे फिरतोय.थोडं पुढे चालत आल्यावर मला पाणी दिसलं आणि थोडं पुढे गेल्यावर जो नजारा मी पहिला न तो इतका सुंदर होता. तिथे एक मोठ्ठा तलाव होता तलावाच्या आजूबाजूला झाडं , हिरवळ आणि तलावामध्ये वेगवेगळ्या रंगांची सुरेख बदकं , आणि गुलबट रंगांचे हंस आणि या सगळ्याच्या जोडीला शांतता !! इतकं प्रसन्न वाटत होतं.कितीतरी वेळ मी तिथे नुसतीच उभी होते हे सगळं डोळ्यात साठवत. तो तलाव खूप च मोठा होता. तलावाच्या बाजूने चालायला रस्ता सुद्धा होत. मी अर्धा तलाव फिरून आले. बराच वेळ असेन मी तिथे. आता थोडं उन पडायला लागलं होतं. तिथेही बरेच फोटो काढले आणि तिथून निघाले हे ठरवून च कि इथे रोज यायचं . तिथून घरी यायला मला ११ वाजले असतील. ट्युब पास नसल्याने कुठे जाता येणार नव्हतं त्यामुळे घरीच आराम केला.

संध्याकाळी मंदार आल्यावर तो फ्रेश झाला आणि मग आम्ही निघालो. एकतर माझा ट्युब चा पास काढायचा होता आणि ट्युब मधून लाईनकशी बदलायची हे सगळं दाखवणार होता मला तो. आम्ही ठरवलं कि जरा लांब जाऊया म्हणजे अंदाज येईल कसं फिरायचं याचा. आम्ही monument म्हणून एक स्टेशन आहे तिथे गेलो. आम्ही सेन्ट्रल लाईन वर रहात होतो तिथून monument ला परस्पर जाता येत नाही. मधे एक लाईन बदलावी लागते. Lancaster Gate स्टेशन वरून आम्ही Bank नावाच्या एका स्टेशनला आलो आणि तिथून लाईन बदलून Monument ला आलो. Monument स्टेशन वरून बाहेर पडलं की थोडं अंतर चालल्यावर एक मोठ्ठा स्तंभ आहे त्यालाच Monument to the great fire of London असं म्हणतात. हे एक स्मारक आहे. २ september १६६६ रोजी लंडन मध्ये एक खूप मोठी आग लागली होती. त्या आगीच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधण्यात आले. सन १६७१ ते १६७७ च्या काळात Monument बांधण्यात आलं. Monument च्या सुद्धा वर जाता येतं. ४ पौंड तिकीट असेल बहुतेक. आम्ही गेलो नाही पण.

Monument बघून झाल्यावर आम्ही आलो लंडन ब्रिजवर आणि समोर दिसली ती "The Shard " इमारत लंडन मधील खरंतर युरोप मधील सगळ्यात उंच इमारत. या इमारतीचा वरचा भाग हा अणकुचीदार शस्त्रासारखा आहे. आणि डाव्या बाजूला "Tower Bridge". लंडन मधल्या अप्रतिम architecture च उदाहरण म्हणजे Tower Bridge. दिव्यांच्या लखलखाटात काय सुरेख दिसत होता रात्री !! आणि तोही इतक्या लांबून. लंडन ब्रिज वरून The Shard आणि Tower Bridge दोन्ही भारी दिसतं. Tower bridge बद्दल पुढच्या भागात सविस्तर लिहीन. लंडन ब्रिज वर प्रचंड थंड वारा होता कारण खालून वाहत होतं थेम्सचं पाणी. खूप वाऱ्यामुळे फार वेळ तिथे थांबू शकलो नाही. या सगळ्या गोष्टी आमच्या वास्तव्यात किमान ४/५ वेळा वेगवेगळ्या वेळी नंतर पाहून झाल्या. त्याबद्दलची माहिती आणि फोटो लेखमाला पुढे जाईल तसं लिहित जाईन.

उशीर झाला होता तसा निघायला तिथून. भूकही लागली होती. एका फूड चेन मधून पार्सल घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यावर खाऊन दुसऱ्या दिवशी काय बघता येईल आणि कुठे कुठे जाता येईल यावर थोडं बोललो आणि झोपलो.

फोटोबद्दल :- फोटो शेअर करण्यासाठी दुसरी कुठली पद्धत उपलब्ध आहे का ? असेल तर कृपया सुचवा. फोटोचा साईझ कमी केल्यावर फोटो नीट दिसत नाहीये त्यामुळे फोटो टाकू शकत नाहीये.

क्रमश:

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 May 2016 - 5:05 pm | मुक्त विहारि

मिपा वर फोटो टाकण्यासाठी, खालील धाग्याची मदत घेतलीत तर उत्तम.

मिपावर चित्रे टाकण्याची कृती ====> http://www.misalpav.com/node/35690

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मेघना मन्दार's picture

2 May 2016 - 5:52 pm | मेघना मन्दार

बघते प्रयत्न करून..

एस's picture

2 May 2016 - 5:18 pm | एस

पुभाप्र.

चौकटराजा's picture

2 May 2016 - 5:37 pm | चौकटराजा

आपले वर्र्णन थोडेसे बाळबोध व घरगुती स्वरूपाची शैली असलेले आहे तरी त्यातही एक आपलेपणा वाटतोय. सबब आपण लिहित रहा ! आपण पाहिलेला तलाव बहुदा सर्पन्टाईन असावे. फोटो टाकण्यासाठी फोटोबकेट डोट कॉम चे सभासद व्हा.
तिथे एका फोटो अपलोड केल्यावर " डायरेक्ट लिन्क " वर क्लोक केले की लिन्क कॉपी होते व ती मिपावर पेस्ट करता येते.

मेघना मन्दार's picture

2 May 2016 - 10:39 pm | मेघना मन्दार

माफ करा पण हा माझा पहिलाच लेख आहे मिपावर. आणि खरं सांगू का? मी माझ्या मनातल्या भावना जश्या च्या तश्या लिहिल्या आहेत. मला खरंच जे वाटलं ही ट्रीप अनुभवताना ते मी यामध्ये लिहिलं आहे. पण तुमच्या प्रामाणिक प्रतिसादासाठी धन्यवाद :)

अजया's picture

2 May 2016 - 6:23 pm | अजया

पुभाप्र

प्रचेतस's picture

2 May 2016 - 6:45 pm | प्रचेतस

खूप सुंदर प्रवासवर्णन.
अतिशय आवडले.

रेवती's picture

2 May 2016 - 6:49 pm | रेवती

:)

सिरुसेरि's picture

3 May 2016 - 10:54 am | सिरुसेरि

सुंदर प्रवासवर्णन . मीना प्रभु यांच्या "माझं लंडन" ची आठवण आली.

संजय पाटिल's picture

3 May 2016 - 12:13 pm | संजय पाटिल

सर्व भाग वाचले, आवडले!!
पु.भा.प्र.

विशाखा राऊत's picture

3 May 2016 - 1:32 pm | विशाखा राऊत

मस्त लिहिले आहे

मेघना मन्दार's picture

4 May 2016 - 9:59 am | मेघना मन्दार

सर्वांचे मनापासून आभार !!