मेसाई हि महाराष्ट्रातील पुर्वीच्या काळात लोकाश्रय लाभलेल्या देवतांपैकी एक देवता असावी असे दिसते.
संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवर्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात -
घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई ||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
-राजाई
(संदर्भ)
संत एकनाथ आणि संत तुकाराम (दुजोरा हवा) मेसाई देवीच्या भक्तांच्या अंधभक्तीवर टिका करताना दिसतात.
देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ।।
नैवेद्य वाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।।
बळेंची मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।।
बळेंची आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ।।
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ।।
एका जनार्दनी ऐसा देव । येथे कैसा अमुचा भाव ।।
~ संत एकनाथ गाथा २५८६; [५]
प्रेमे पूजी मेसाबाई सांडोनीया विठाबाई
काय देईल ती वोंगळा सदा खाय अमंगळा
आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी
तैसी नोहे विठाबाई सर्व दिनाची ती आई
न सांडिची विठाबाई एका जनार्दन पाही
~ संत एकनाथ गाथा २५८७; [५]
सांडोनीया विठाबाई कां रे पूजीता मेसाई
विठाबाई माझी माता चरणीं लागो इचे आता
संत एकनाथ गाथा २५८८.[५]
संत एकनाथ गाथा वेषधाऱ्याच्या भावना क्रमांक २५८६,२५८७ आणि २५८८ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z100222113342/view संस्थळावर जसे प्राप्त झाले
तिजेस पूजी अनामिकांचे देव । काळकाई विणाईसी धरी भाव । म्हणे वो मेसाई मले पाव । तुले शूरण आलों कीं ॥१७॥
~ संत शेख महंमद
नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।
- संत तुकाराम (अभंग संत तुकारामाच्यां गाथेतून असण्या बद्दल दुजोरा हवा)
*** काही माहिती दुवे ***
* मेसाई देवी यात्रा आरणी.ता,जिल्हा.उसमानासबाद
* मेसाई देवी यात्रा धनेगाव.ता,जिल्हा.बीड
*** माहिती हवी ***
१) महाराष्ट्रात (इतर राज्यात असतीलतर) मेसाई देवीची मंदिरे कुठे कुठे आहेत ?
** आता पर्यंत माहित झालेली मंदिरे आणि जत्रा, कान्हूर मेसाई (ता. शिरूर जिल्हा पुणे) , आरणी - जिल्हा उस्मानाबाद, धनेगाव -जिल्हा बीड, मेसाई पठार (पन्हाळा ते पावन खिंड पदभ्रमण मार्ग - संदर्भ:१ , २ ) जिल्हा कोल्हापूर .
२) वेगवेगळ्या संतांनी या देवीवर एक्सारखा रोष धरण्या मागे संतांची भूमिका काय आहे
३) या देवी बद्द्ल आणखी काही माहिती असेल तर हवी आहे.
४) http://www.transliteral.org/pages/z100122195347/view या धाग्यावर केशवस्वामी म्हणून कुणी दिसतात त्यांच्या आणि संत एकनाथांच्या अभंगात खूपच साम्य दिसते हे केशव स्वामी संत एकनाथांच्या आधीचे का नंतरचे (किंवा कोणत्या शतकातले ?) असावेत
५ ) मेसाई जवळगा इथे मेसाई मंदिर असल्यास माहिती हवी आहे
६) युट्यूबवर उपलब्ध भक्तिगिते पहाता मेसाई देवी बद्दल काही लोककथा-आख्यायिका उपलब्ध असण्याची शक्यता दिसते, दुजोर्या सहीत आख्यायिका माहिती करुन हव्या आहेत.
७) खांबाळा येथे मेसाई उत्सव युट्यूबर दिसतो आहे, हे खांबाळा पो.मुगट,. ता.मुदखेड, जि.नांदेड. असल्याची खात्री करुन हवी आहे.
८) युट्युबवर मणेराजुरी येथील एक मेसाई देवी जत्रा दिसते आहे हे सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी असल्याची खात्री करुन हवी आहे.
९) मेस्को माता मंदिर (जुने ) जळगाव बद्दल माहिती हवी आहे.
१०) अकोली जिल्हा अकोल येथे मेसाई देवीचे मंदिर असल्यास माहिती हवी आहे.
प्रतिक्रिया
8 Dec 2015 - 6:25 pm | पैसा
परशुरामाने जमदग्नीच्या आज्ञेवरून आईचे शीर धडावेगळे केले. परंतु जमदग्नीला नंतर आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि त्याने रेणुकेला पुन्हा जिवंत करावे असे ठरवले. रेणुकेचे शीर मिळेना, म्हणून समोर आलेल्या एका मातंगीचे शीर कापून ते रेणुकेच्या धडाला चिकटवले. तेव्हा रेणुकेच्या पूजेआधी मातंगीची पूजा होईल असा वर परशुरामाने तिला दिला. अशी कथा काही ठिकाणी प्रचलित आहे. हीच मातंगी काही ठिकाणी मायराणी, मेसको, मेसाई या नावांनी संबोधित आहे. तिची पूजा करायचा मान महार किंवा मातंग समाजातील स्त्रियांना आहे.
मुळात रेणुका म्हणजे मृत्तिकेच्या वारूळ स्वरूपातील आदिम लोकांची पूजा करण्याची देवी. वारुळात रहाणारा नाग, भैरोबा, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, स्कंद, सुब्रह्मण्य, हे क्षेत्रपाल म्हणून पुजले गेले. रेणुका, यल्लाम्मा, जोगुळांबा, एकवीरा, मातंगी या सर्व एका देवीची रूपे आहेत. तशीच मेसको, मायराणी ही त्याच देवीची अन्य नावे आहेत. या सर्वाचे उत्कृष्ट विवेचन ढेरे यांनी केले आहे.
रेणुका आणि मातंगी यांचे एकत्व दर्शवणारी शीर जोडण्याची कथा दिसते तसेच देवतांचे संस्कृतीकरण करताना परशुरामाची कथा जोडलेली दिसते. मायराणी आणि उत्तर भारतात माताराणी म्हणून पुजली गेलेली देवी एकच असावी. दक्षिण भारतातही यल्लम्माच्या अशाच स्वरूपाच्या कथा आहेत. सर्व भारतात या ना त्या स्वरूपात या कथा सापडतात.
मेसको ही आदिम रहिवाशी महार-मातंग यांची देवता म्हणून क्षुद्रदेवता गणली गेली त्यामुळे मराठी संतांनी तिच्या पूजेचा निषेध केला आहे. तुम्ही उल्लेख केलेला तुकोबांचा अभंग गाथेत २३८४ क्रमांकाने आहे असे ढेरे म्हणतात. त्याशिवाय शेख महंमदाच्या योगसंग्राममध्ये १२.४९.८२ क्रमांकाने पुढील अभंग आहे.
शिमगा फाल्गुन होळीचे दिनी|नग्न होऊन पूजिती मायराणी|
ती डोळे दवडी अवलक्षणी|जो पाहू जाय त्याचे|
खंडेराव असे नापिक होऊन्|तराळी जगदंबा वाहे पाणी|
दरबार झाडी मेसको मायराणी| भैरव गस्ती करितसे|
अन्यत्रही शेख महंमदांनी उल्लेख केला आहे की:
तुकाई ना नरसो मायराणी|वसती स्मशानी|भोगे घालिती गोंधळ|
दासबोधात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे: (४.५.१६)
जाखमाता मायराणी| वाळा वगुळा मानविणी|
पूजा मांगिणी जोगिणी| कुलधर्मे करावी|
________________________________
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी या मायराणीचे नग्न पूजन केले जात असे असे या उल्लेखावरून दिसते. श्री. कृ.वि.आचार्य कालगावकरांनी काही ब्राह्मण घराण्यातून प्रचलित असलेला मायराणीचा कुलधर्म वर्णन केला आहे. या कुलधर्माला विकेशा विधवेला बोलावून सन्मानाने जेवू घालायचे असते.
बाबा पदमनजींनी हिंदूधर्माचे स्वरूप भाग दुसरा मधे 'मेसाई, मेसकू' या शीर्षकाखाली पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
बाबा पदमनजींनी उल्लेख केलेला भादवी हा मेसकोचा पूजा दिवस "माहूर भादवी" म्हणूनही प्रसिद्ध आहे. या माहूर संबंधामुळे मेसको-मातंगी-रेणुका एकच असा संकेत सहज दिसण्यात येतो. यमाई, मरीआई वगैरे देवता गावोगावी दिसतात तीही याच देवतेची नावे-रूपे होत.
9 Dec 2015 - 11:20 am | माहितगार
तुमच्या प्रतिसादा नंतर गूगलवर जरा अजून शोध घेतला तर 'मेसाबाई' हे नाव (कदाचित दलित समाजात) अजूनही अल्प प्रमाणावर का होईना प्रचलित असावे असे दिसते. बाबा पदमनजी (इ.स. १८३१ - ऑगस्ट २९, इ.स. १९०६) म्हणजे तसे अलिकडचे, ट्यांनी केलेला उल्लेख "मेसाईच्या समजुतीसाठी धान्य, मेंढरे, बकरे, वगैरे पूजासाहित्य देतात." त्या शिवाय संत एकनाथांच्या अभंगाततही (बळीप्रथा-अंधश्रद्धा-त्यातून उद्भवणारा मांसाहार) निषेधाच्या उल्लेखाने देवीचे पुजन प्रचलीत असल्याचे दिसते; तेव्हा कोणत्या न कोणत्या स्वरुपात मेसाईचे सार्वजनिक प्रतिमा पुजन प्रचलीत राहीले असण्याची शक्यता वाटते. केतकर ज्ञानकोशात मेसाईवर शोध मिळाला नाही परंतु केतकर ज्ञानकोशात 'मायराणी' देवीचा उल्लेख (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८ चा हवाला देऊन) आहे त्यात मायराणीचे देउळ कुठेही आढळत नसल्याचा उल्लेख आहे. माझ्या व्यक्तीगत मते संशोधकांनी अधिक शोध घेतल्यास सार्वजनिक प्रतिमापुजनाचे आधार उपलब्ध व्हावयास हवेत.
ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग वर मेसाई बद्दलचे एक (बहुधा उपरोधीक) भारुडही आढळले. संत एकनाथांच्या वर दिलेल्या अभंगात "नाचताती शिमगी सोंगा" असा उल्लेख आहे, मी दोन दिवसापुर्वीच महाराष्ट्रातील आदिवासी लोकपरंपरांबद्दल वाचताना एका आदिवासी जमातीत शिमग्याच्या दिवशी विनोद-थट्टा मस्करी साठी सोंगाडे लिंगाची प्रतिकृती बांधून नृत्यादी हावभाव करत असल्याचा उल्लेख वाचला त्यातही 'सोंग' असाच शब्द होता (नेमका तो संदर्भ मी नोंदवून ठेवला नाही पुन्हा कधी हाताशी आल्यास पहावे लागेल). याचाच उल्लेख संत शेख महंमदांनी केला असेल का की खरोखरही नग्न होऊन पुजन केले जात असेल; परंतु तसे असते तर संत एकनाथ आणि संत तुकाराम दोघेही अत्यंत स्पष्टवक्ते आहेत त्यांनीही तशी नोंद केली असती म्हणून संत शेख महंमदांच्या उल्लेखा बद्दल अल्पशी साशंकता वाटते पण त्यांच्या अभंगातील उल्लेखा प्रमाणे असणे अशक्यही नसावे -भूतान मध्ये आजही लिंग प्रतिक पुजन पवित्र समजले जाण्याचे उल्लेख मिळतात आसामातली एक नदी 'आई' (अर्थ सुद्धा आई) भूतान मधून वाहत येते, (आपल्या कडील बगाड परंपरा बंगाल झारखंडच्या आदिवासी चक्रपुजेशी साधर्म्य दाखवणारी आहे)
सामाजिक दबाव, न्युनगंड, सांस्कृतीक अपवर्ड मोबिलीटीमुळे अथवा एकत्रित परिणाम म्हणून स्व-परंपरा नाकारण्याची प्रवृत्तीही बर्याचदा दिसून येते. वारकरी संत समुदाय सुधारणावादी असून सुद्धा मेसाई-मायराणीसाठी होणार्या बळी प्रथेचा वारकरी संताकडून होणारा निषेध स्विकारुन स्व परंपरेत बदल करणारे आणि बदलास उशीर करणारे यात सामाजिक सहसंबंध हा अधिक संशोधनास उपयूक्त विषय असावा असे वाटते.
* दाते कर्वे शब्द कोशातही मायराणी बद्द्ल ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर उल्लेख मिळाला
अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण रोचक प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.
9 Dec 2015 - 2:14 pm | पैसा
शिमग्याला सोंग आणणे हे कोकणातही असते. होळीच्या आधी खेळे वगैरे असतात त्यांच्याबरोबर संकासूर, गणपती, नटी वगैरे पोशाख केलेले लोक नाचत येतात. त्यांना शिमग्याची सोंगे असेच म्हणतात.
लिंगपूजा सगळीकडेच आहे की. शिवलिंग म्हणजे दुसरे काय आहे?
मेसाईची देवळे कुठे आहेत असे तुम्ही विचारले आहे, त्याबद्दल माहिती नाही. पण मेसाई हीच मरीआई असे वाटते. तिची देवळे गावोगावी असतात. रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात मी वाढले. तिथे गावच्या रवळनाथ, महालक्ष्मी, गणपती, रामेश्वर, मारुती यांच्या देवळांच्या समूहात एक मरीआईचे देऊळ आहे. हे देऊळ म्हणजे मागच्या बाजूला भिंत आणि वर छप्पर असलेला एक चौथरा आहे. या देवळात भिंतीला टेकून काही गोल फत्तर होते. त्याना शेंदूर वगैरे लावलेला असायचा. या देवळात जायची आम्हाला प्रचंड भिती वाटायची. गावची गुरवीण्/गुरव या देवळातली पूजा करत नसत. मात्र तिथे रोज फुले वाहून उदबत्त्या लावलेल्या असायच्या. ते कोण करत होते याबद्दल कधीच चौकशी केली नाही किंवा कोणी आवर्जून माहिती दिली नाही. नंतर बौद्ध झालेले लोक तिथे यायचे असे काहीसे ऐकलेले पुसट आठवत आहे.
9 Dec 2015 - 2:29 pm | माहितगार
या देवतेचा काही कारणाने मृत्यूघातक आजाराशी संबंध लावला असेल तर मेसाई आणि मरीआई दोन्ही एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मरीआईची तर असंख्य मंदीरे आहेत.
9 Dec 2015 - 11:46 am | माहितगार
केतकर ज्ञानकोशात मायराणी आणि राजरा (राजेश्वरी/राजराजेश्वरी) यांच्या कुलाचारातील एक साम्यवाटते.
.....हा कुळधर्म म्हणजे वपन केलेल्या विधवेचें पूजन होय. अशी पूजन करून घेणारी विधवा क्वचित मिळते. अशी विधवा जेव्हां कधीं मिळेल तेव्हां हा कुळधर्म उरकून घेतात. विधवेस हळदकुंकू देतात तें ती आपल्या कपाळी लावते. गंधपुष्पादिकांनीं मस्तकावर तिचें पूजन करतात. लुगडें, खण व चांगली दक्षणा तिला देतात आणि जेवू घालून तिची रवानगी करतात. मायेचें जें स्वरूप वर्णन करतात त्यावरून कांहीं एक प्रकारच्या समजुतीनें ह्या 'मायराणी' ची उत्पत्ति झाली असावी.
.....'राजरा देवीची सवाष्ण' म्हणून एक असाच प्रकार जुन्नर, नगर, नाशीक वगैरे प्रांतीं आहे. (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८) संदर्भ केतकज्ञानकोश
याच राजराजेर्वरीचा कोकणी ज्ञानकोशात खालील प्रमाणे उल्लेख आहे. (पै ताई खालील कोकणी उतार्याचा -कॉपीराइट फ्री :)- मराठी अनुवाद करून मिळाल्यास आभारी राहीन : हा कोकणी ज्ञानकोश बहुधा गोवा विद्यापीठ कृत असावा आणि त्यांनी बहुधा विकिपीडियन्सच्या विनंती वरुन त्याचा कॉपीराइट त्याग केल्यामुळे विकिस्रोतावर मुक्तस्वरुपात उपलब्ध आहे)
राजराजेश्वरीः एक देवी. दशमहाविद्यांतली जी चवथी शक्ती भुवनेश्वरी, तिकाच भैरव तंत्रांत राजराजेश्वरी अशें म्हळां. राजापरस चड वैभव भोगपी आनी ब्रह्मा, विष्णु, महेश, ह्या देवांचीं आसनां करून तांचेर बसपी म्हणून हिका राजराजेश्वरी म्हणिल्ली आसा. ब्रह्मा, विष्णु, रूद्र ह्या देवांनी आपआपल्याक दिल्लीं कामां आनी ताका लागून ते मेल्लेवरी जाले. अशी शाक्त तंत्रांतली कल्पना आसा. अशा वेळार ही तांच्या मड्याचेर उबी रावन विश्वाची वेवस्था चलयता अशें तातूंत म्हळां.
उत्तर प्रदेशांतल्या उनाव जिल्ह्यांत बांगरमऊ नांवाच्या गांवांत हिचें नामनेचें देवूळ आसा. हांहाची मूर्ती तंत्रशास्त्र आनी योगशास्त्र हांच्या आदारान तयार केल्ली आसा. हाचेभायर नेपाळ, रामेश्वर, आनी विदर्भांतल्या मंडला किल्ला ह्या स्थळांनी तिचीं देवळां आसात.
राजराजेश्वरीक राजरा अशेंय म्हण्टात. महाराष्ट्रांतल्या कांय ब्राह्मणांच्या घरा हिचे टाक आसतात. ह्या टाकांनी तिंच्यो सात प्रतिमा आसतात. हे देवीच्या नांवान एक कूलधर्म आसता. घरांत लग्नकार्य जालें म्हण्टकच हो कूलधर्म करतात. कांय कडेन चैत्र पुनवेकूय हो कूलधर्म करतात. हाका साडेसात मनशांचो कूळधर्म म्हण्टात. साडेसात मनशांमदीं एक घरचो मेवणो, एक भायलो मेवणो, एक ब्राह्मण, एक सवायशीण, एक ब्रह्मचारी (अर्दो मनीस) आनी एक विधवा अशा मनशांक जेवपाक आपयतात. हातुंतले विधवेक मायगोसावीण वा विठ्ठलबाष्ण अशें नांव आसा.
ह्या वेलार केल्लें जेवण साडेसात मनशांपरतेंच करतात. जेवण करून उरिल्लें अन्न जमनींत पुरतात ना जाल्यार गांवाभायर व्हरून उडयतात. हें जेवण घरांतल्या कुमारिकांचे नदरेक पडूंक दिवपाचें नासता अशी समजूत आसा.
कों. वि. सं. मं.
संदर्भ
9 Dec 2015 - 11:49 am | पैसा
झकास माहिती! थोड्या वेळाने रूपांतर करून देते.
9 Dec 2015 - 1:43 pm | पैसा
राजराजेश्वरीः एक देवी. दशमहाविद्यांतली जी चौथी शक्ती भुवनेश्वरी, तिलाच भैरव तंत्रांत राजराजेश्वरी असे म्हटले आहे. एखाद्या राजापेक्षा जास्त वैभवशाली आणि ब्रह्मा, विष्णु, महेश, ह्या देवांचीं आसने करून त्यावर बसणारी म्हणून हिला राजराजेश्वरी म्हटले आहे. ब्रह्मा, विष्णु, रूद्र ह्या देवांनी आपल्याला दिलेली कामे पूर्ण केली आणि त्यामुळे थकून मृतवत झाले. अशी शाक्त तंत्रांतली कल्पना आहे. अशा वेळी ही त्यांच्या प्रेतांवर उभी राहून विश्वाची व्यवस्था चालवते असे त्यात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशांतल्या उनाव जिल्ह्यांत बांगरमऊ नांवाच्या गांवांत हिचें सर्वात पहिले देऊळ आहे. तिथली मूर्ती तंत्रशास्त्र आणि योगशास्त्र यांच्या आधाराने तयार केली आहे. याशिवाय नेपाळ, रामेश्वर, आणि विदर्भांतल्या मंडला किल्ला ह्या ठिकाणी तिचीं देवळे आहेत.
राजराजेश्वरीला राजरा असेही म्हणतात. महाराष्ट्रांतल्या कांही ब्राह्मणांच्या घरांतून हिचे टाक असतात. ह्या टाकांवर तिंच्या सात प्रतिमा असतात. या देवीच्या नांवाने एक कुलधर्म असतो. घरांत लग्नकार्य झाले की हा कुलधर्म करतात. कांही ठिकाणी चैत्र पौर्णिमेला हा कुलधर्म करतात. याला साडेसात माणसांचा कुळधर्म म्हणतात. साडेसात माणसांत एक घरचे मेहुण, एक बाहेरचे मेहुण, एक ब्राह्मण, एक सवाशीण, एक ब्रह्मचारी (अर्धा माणूस) आणि एक विधवा अशा माणसांना जेवायला बोलावतात. यातील विधवेला मायगोसावीण अथवा विठ्ठलबाष्ण असे नांव आहे.
ह्या वेळेस केलेला स्वयंपाक साडेसात माणसापुरताच करतात. जेवण करून शिल्लक अन्न जमिनींत पुरतात नाहीतर गांवाबाहेर नेऊन फेकतात. हें जेवण घरांतल्या कुमारिकांच्या दृष्टीस पडू द्यायचे नाही अशी समजून आहे.
9 Dec 2015 - 2:21 pm | पैसा
भुवनेश्वरी देवी आणि साडेसात माणसे यावरून हा सप्तमातृका + गणपती पूजन याच्याशी संबंधित कुळधर्म आहे असे दिसते. देवांच्या शक्ती/स्त्रीरूपे षष्ठी, महालक्ष्मी, गणपती यांचे साहचर्य आणि संबंध याविषयी लज्जागौरी पुस्तकात अतिशय सुंदर विवेचन आहे. इथे सगळेच देणे अवघड आहे. ढेरे यांचे लज्जागौरी आणि लोकदैवतांचे विश्व ही दोन पुस्तके अवश्य मिळवून वाचा. षष्ठी ही मुलांचा घात करणारी अशी समजूत असल्याने असल्याने तिला खूश करायची चाल पडली. जसा गणपती मुळात विघ्नकारक विनायक होता तो नंतर विघ्नहर्ता झाला तसेच.
विधवा हे महालक्ष्मीची बहीण षष्ठी ऊर्फ अलक्ष्मीचे रूप आहे. ती परित्यक्ता समजली गेली आहे.
म्हणूनच यावेळी केलेला स्वयंपाक इतर कोणी खाऊ नये अशी चाल दिसते.
सप्तमातृका याच साती आसरा. जिवती पूजन षष्ठी पूजन हे या षण्मातृका आणि स्कंद या बालघातक देवांनी मुलांवर संकटे आणू नयेत म्हणून करण्याची चाल पडली. सप्तमातृका म्हणजे स्कंदाच्या सहा माता आणि पार्वती. स्कंद आणि गणपती हे दोघे परंपरेत एकरूप मानले गेले. तसेच सप्तमातृकांना वेगवेगळ्या देवांची रूपे आणि शक्ती असल्याची कल्पना करण्यात आली. संतानप्राप्तीसाठी लज्जागौरीची पूजा आणि मुलांचा घात होऊ नये म्हणून या सप्तमातृका आणि स्कंद (गणेशाची) पूजा अशी चाल ढेरे वर्णन करतात. या सर्वच प्रथा या मातृदेवतेचे पूजन करण्याकडे निर्देश करणार्या आहेत.
राजराजेश्वरी हे नवरात्रात देवीचे एक रूप म्हणून वाचलेले आठवते. याबद्दल अधिक माहिती विकिपेडियावर उपलब्ध असेल.
9 Dec 2015 - 2:24 pm | माहितगार
सुरेख माहिती आणि टिपण्यांबद्दल धन्यवाद. ढेरेंची पुस्तकांबद्दल उत्सुकता वाढली आहे ती मिळवून नक्कीच वाचेन. 'मेसाई' चर्चेच्या निमीत्ताने अजून एक शंका मनात आली मायराणीचे काही अभंगातून वर्णन जल देवता अथवा यक्षीणी असे आले आहे तर काही अभंगातून स्मशानाशी संबंध जोडलेला दिसतो आहे, स्मशान शब्दाची व्युत्पत्ती स्मशान-मशान-मेसान अशी काही नाही ना हे कृ.पा. कुलकर्णी किंवा इतर व्युत्पत्ती कोशातून तपासून घेता येईल का ? पुर्वी देवी नावाचा एक गंभीर जिवघेणा आजार होता त्या आजाराची देवता म्हणून मेसा - मेसान असा शब्द संबंध जोडला गेल्याची काही शक्यता असू शकेल का ? असे वाटले.
9 Dec 2015 - 2:51 pm | पैसा
मायराणीचे वर्णन जलदेवता अथवा यक्षिणी म्हणून आले असेल तर ती साती आसरा (सप्तमातृका)मधे गणली गेली आहे हे नक्कीच!
स्मशानवरून मसान-मेसाई अशी व्युत्पत्ती आहे का हे शोधावे लागेल. जवळचे शब्द नक्कीच दिसत आहेत!
देवीच्या आजाराशी संबंधित एक चाल मी अगदी लहान असताना पाहिलेली आठवते आहे. तेव्हा काही वेळा रस्त्यात शेणाचे पो त्यावर राख, फुले, गुलाल वगैरे घालून पूजा केलेले सापडायचे. तर ज्यांना अंगावर गाठी येऊन ताप येईल ते काही लोक गळ्यात फुलांच्या माळा आणि कपाळाला कुंकू, गुलाल लावून रस्त्याने नाचत, घुमत जायचे. तेव्हा "बोल बोल बोल मोठ्या बायांची हो" असे काहीतरी म्हणत जायचे. या प्रकाराला बाया असे म्हणत. म्हणजे "बाया त्यांच्या अंगात आल्या" म्हणून ते घुमत आहेत आणि त्यांच्यावरून ते शेण उतरवले की ते बरे होतील अशी समजूत होती. तो देवीच्या आजाराशी संबंधित प्रकार आहे असे आईने सांगितलेले आठवते. मात्र हे लोक बरे होत असत. तेव्हा त्याना देवीचा आजार न होता, दुसरा कसला ताप आणि गाठी आलेल्या असाव्यात असे वाटते. नंतर देवी निर्मूलन झाले तसा हा प्रकार दिसायचा बंद झाला.
9 Dec 2015 - 2:55 pm | माहितगार
अंगात येणे प्रकारात प्रतिमा अथवा मुर्तीची तेवढी आवश्यकता पडत नसावी अशीही एक शक्यता दिसते. देवाघरी जाणे म्हणतो तसे देवीघरी म्हणजे मेसाणात असेही कदाचित असू शकेल. आणि आजारात देवीची उपासना / नवस उपयूक्त ठरतील या श्रद्धेने मुळात जलदेवता अथवा यक्षिणी असूनही विघ्नहर्ताची एवजी विघ्नकर्ता समजून पुजन झाले असेही कदाचित शक्य असू शकेल. एकुण विषय रोचक आहे.
9 Dec 2015 - 3:44 pm | माहितगार
भा.रा. तांबे लिखीत अंगाई गितात सटवाई षष्टीदेवी आणि जोखाईचा उल्लेख दिसतो आहे.
9 Dec 2015 - 2:43 pm | माहितगार
हरिविजय चे कवि कुणी श्रीधर दिसताहेत हे कोणत्या काळातील आहेत ?
जळीच्या मेसको मायेराणी । मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥। २७॥
-दासबोध दशक तिसरा समास दुसरा : स्वगुणपरीक्षा
9 Dec 2015 - 8:27 pm | सतिश गावडे
कवी श्रीधरः श्रीधर नाझरेकर (१६५८ - १७२९)
मराठी विश्वकोशातील संदर्भ
पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या आवारात यांचा वाडा आहे.
9 Dec 2015 - 8:45 pm | माहितगार
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभारी आहे.
9 Dec 2015 - 4:36 pm | माहितगार
मेसाई बद्द्ल बळी प्रथा आणि नवससायासांमुळे संतानी निषेध केला असेल, जोखाई देवते बद्दल शोधता शोधता समर्थ रामदासांच्या नावावर असलेल्या अभंग उल्लेखाकडे सहज लक्ष गेले. गणेशाबद्दल 'लाडु मोदकांचा काळ' अशी टिका केवळ तुकाराम महाराजांच्या अभंगातच आहे असे समजत होतो अगदी जवळपास तसेच शब्द समर्थ रामदासांच्या अभंगातही दिसत आहेत. समर्थ "लाडू मोदकांचा काळू" काळ शब्दाला एक उकार जोडतात एवढेच ?,
समर्थ रामदासांच्या नावावरील अभंग खालील प्रमाणे
संत तुकारामांच्या गाथेतील अभंग (केतकर ज्ञानकोशात जसा दिसला)
'लाडु मोदकाचा काळ' या दोघांच्याही प्रतिमेत एवढे साम्य आहे की या दोघांनीही ह्याच शब्दातील तिसर्या कुणाची टिका उचलून आपापल्या शब्दात बांधली असावी असे असेल तर दोघांच्याही शब्दात एवढी एकसारखे रुपक योजण्याची क्षमता असलेली व्यक्ती अथवा साहित्य कोणते किंवा दोघे एकमेकांना भेटून त्यांनी आपला संबंधीत अभंग दुसर्याशी शेअर केला असावा अथवा समाजात अशा प्रकारचा वाक्प्रचार असावा अथवा दोघांपैकी एकाच्या अभंगावरून दुसर्याच्या अभंग संग्रहात प्रक्षीप्तपणे घुसवला गेला असावा.
दुसरे असे की गणपती पुर्विच्या काळात विघ्नकर्ता देवता समजली गेली तरीही ते कारण संत रोषास पुरेसे वाटत नाही. समर्थ रामदासांच्या नावावर चक्क गणेशाची आरती सुद्धा दिसते. अजून एक कारण समर्थ आणि तुकाराम हे दोघेही वैष्णव आणि गणेशही शैव संप्रदायातील देवता पण अद्वैताचा बोलबाला होत असतानाच्या काळात शक्य तेवढ्या बहुतांश देवतांना स्विकारण्याचा पायंडा विकसीत होण्याच्या काळात गणेश देवतेवरील रोष पुरेसा उमगत नाही असे वाटते.
9 Dec 2015 - 4:39 pm | प्रचेतस
उत्तम चर्चा.
पन्हाळा उतरल्यावर म्हसईचं लांबलचक पठर लागतं. तिथे म्हसई देवीचं लहानसं मंदिर आहे. ही म्हसई उपरोक्त लेखातील मेसाई असावी.
9 Dec 2015 - 5:00 pm | माहितगार
आंतरजालावर कान्हुर (मेसाई) ता. शिरूर, जवळगा (मेसाई), निजामपूर-भामेर रस्ता जिल्हा धुळे असे तीन उल्लेख दिसताहेत पण मंदिरांबद्दल खूपच कमी माहिती दिसते आहे.
9 Dec 2015 - 7:47 pm | पैसा
म्हसाई पण असते का? म्हसोबाचे गोल गोटे बरेच ठिकाणी पाहिलेत.
9 Dec 2015 - 7:57 pm | प्रचेतस
ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य आहेत. जीवाई, सटवाई, मेसाई, म्हसाई, तांदळाई, मेंगळाई, मेंगाई, आंबळाई, काळाई, शितळाई, मांजराई, वाघजाई आणि कित्येक इतर.
ह्यांचे मूळ शोधणे खूपच अवघड. कित्येक देवता स्थानिक आदिवासींनी पूर्वापार पूजलेल्या आढळतात, अगदी हजारो वर्षे. देवराईंमध्ये असलेल्या दगड, मूर्ती हे ह्यांचे उत्तम उदाहरण.
अगदी मरीआई सुद्धा बर्याच जणांना माहितीच असेल. मला नेहमीच वाटते की हे इंग्रजांच्या मदर मेरीचे स्थानिकांनी केलेले अपभ्रष्ट रूप असावे.
9 Dec 2015 - 8:06 pm | पैसा
मर आणते ती मरीआई. उलट धर्मांतर झालेल्या लोकांनी हिंदू लोकांच्या जत्रा सारखे मदर मेरीसाठी फेस्त सुरू केलेत.
9 Dec 2015 - 8:08 pm | प्रचेतस
मरीआईचे इंग्रज, पुर्तुगेजकालाच्याही आधीचे काही उल्लेख आहेत का?
9 Dec 2015 - 8:16 pm | पैसा
कारण ती मुख्यत्वे महार मांग समाजाची देवता आणि क्षुद्रदेवता गणली असल्याने माहीतगार यांनी संतांच्या अभंगात दिलेत तसे त्याहून जुने उल्लेख कुठे असतील तेवढेच.
9 Dec 2015 - 8:44 pm | माहितगार
जरासा अवघड प्रश्न आहे-(आज सकाळ पर्यंत मलाही तुमच्याप्रमाणेच वाटत होते :)), ट्रांसलीटरल डॉट ऑर्ग वर संत एकनाथांचे एक भारूड दिसते आहे. ट्रांसलीटरलवरच दाते कर्वे कोशात साथीची देवता मृत्यूदेवता असा उल्लेख दिसतो आहे.
9 Dec 2015 - 9:04 pm | प्रचेतस
नाथांच्या भारूडात मरिआई म्हणजे ही निश्चितच ही मूळ इथलीच लोकदेवता असल्याचा सबळ पुरावाच. आज कित्येक वर्ष ही मूळची मदर मेरी असल्याचा गैरसमज दूर झाला.
9 Dec 2015 - 9:54 pm | माहितगार
वास्को द गामा १४९८ मध्ये भारतात पोहोचला, १५१० पर्यंत पोर्तुगीजांनी गोवा अध्यायास सुरवात केली; संत एकनाथांचा जिवन काल इ.स. १५३३-१६०० असेल आणि त्यांनी लेखन वयाच्या सतराव्यावर्षा नंतर केले असेल तर त्यांचा लेखन काल १५५० पासून चालू व्हावयास हवा, त्या काळात प्लेग किंवा इतर एखादी साथ आली आणि म्हणून मरीआई देवतेचा लगोलग प्रसार झाला असेल आणि पोर्तुगीजांकडून मेरीची साथीतून वाचवणारी देवता अशी ओळख दिली असेल तर एवढ्या कालावधीत प्रसार अशक्य नसला तरी कठीण वाटतो.
अर्थात मदर मेरीची स्वतंत्रपणे मंदिरे भारतीय स्वभावास अनुसरुन आली असण्याची शक्यता शिल्लक राहतेच एकदा दोन्ही नावे एकसारखी झाली कि मदर मेरीच्या मंदिरांची स्वतंत्र ओळख राहणार नाही असे ही होऊ शकते.
9 Dec 2015 - 10:05 pm | प्रचेतस
हे तसे असंभवनीय वाटते. कारण नाथांचे जवळपास सर्व आयुष्य पैठण, खडकी ह्या परिसरात गेले. जेमतेम ४०/५० वर्षाच्या काळात मरिआईचा सर्वदूर प्रसार होणे अशक्य वाटते. आजही मरिआईची मंदिरे ठाणे- कोकण ह्या पट्ट्यातच जास्त आढळतात. गोवा सोडला तर पुर्तुगेझांना भारतात तसे स्थान नव्हतेच. कट्टर catholic असलेल्या पुर्तुगेझांमध्ये मदर मेरी कितपत पूजिली जात होती ह्याची तशी शंकाच वाटते.
9 Dec 2015 - 10:22 pm | पैसा
पोर्तुगीजांचा वावर गोव्याच्या तीन तालुक्यांपुरता १७८८ पर्यंत मर्यादित होता. त्यात त्यानी धुमाकूळ घातला. १५६० मधे बारदेश आणि तिसवाडी तालुक्यात एकाच दिवशी २८० देवळे पाडल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर त्या देवळांच्या जागी चर्चेस उभी झाली.
9 Dec 2015 - 10:47 pm | सूड
ठाणे जिल्ह्याच्या किनार्यालगतच्या काही भागांतही तो असावा.
9 Dec 2015 - 11:15 pm | पैसा
दमण दीव, चौल, वसई, मुंबई भागात पोर्तुगीज १५३०-३५ मधे आले असं दिसतंय. मात्र तिथे गोव्यातल्यासारखी सगळी देवळे सरसकट पाडून चर्चेस केली नसावीत.
9 Dec 2015 - 10:26 pm | माहितगार
ख्रिश्चनांची एक ब्रँच बरीच आधी केरळात पोहोचली होती म्हणतात, पण तरीही मदर मेरीची दक्षीणे पासूनच काही जुनी मंदिरे आढळल्यास वेगळी गोष्ट आहे. ऑदरवाइज मरीआई हि स्वतंत्र स्थानिक देवता असण्याचीच शक्यता अधिक वाटते.
10 Dec 2015 - 12:37 am | pacificready
@वल्ली, RC लोक च मेरी ला पण मानतात ना? सवत्स धेनु?
Protestant फ़क्त येशु ला मानतात. RC रविवार सुट्टी तर protestant सृष्टि निर्मिती चा पहिला दिवस मानतात.
13 Dec 2015 - 11:09 pm | मांत्रिक
@ वल्लीः
कट्टर catholic असलेल्या पुर्तुगेझांमध्ये मदर मेरी कितपत पूजिली जात होती ह्याची तशी शंकाच वाटते.
कॅथाॅलीक मेरीला परमपूज्य मानतात. त्यांच्यात व प्राॅटेस्टंटांत हा मुख्य भेद आहे. कॅथाॅलीक प्रेयर "एव्हा मारी" प्रसिद्ध आहे.
9 Dec 2015 - 8:14 pm | पैसा
यांच्या कथा जाम मजेशीर असतात. मी रहात होते ते बसणी गाव. तिथे महालक्ष्मी आणि रवळनाथ असे गावचे देव आहेत. आणि डोंगराच्या पलिकडे केळ्ये गाव आहे. तिथे नवलाई, पावलाई आणि वाघजाई अशा तीन देव्या आहेत. कथा अशी की रवळनाथ बहिणीशी (महालक्ष्मीशी) भांडून या तीन देव्यांशी लग्न करायला डोंगर पार करून निघाला होता. तेव्हा महालक्ष्मी रडत रडत त्याच्या मागून धावली. डोंगर माथ्यावर ती पडली आणि तिचे गुडघे आपटले. तिथे कातळात लहान लहान वाटीच्या आकाराचे खड्डे आहेत. मग रवळनाथाचे लग्न काही झाले नाही. आता याची आठवण म्हणून दर वर्षी नवलाई पावलाई आणि वाघजाईची पालखी बसणी गावात येते. तशी महालक्ष्मी आणि रवळनाथ हे १२ वाड्यांचे अधिपती म्हणून त्यांच्या पालख्या आसपासच्या गावात नेतात. मात्र या तीन देव्या आणि महालक्ष्मी यांच्या पालख्या वर्षातून एकदाच समोरासमोर येतात. दर वर्षी या पालख्या भेटवणे आणि नाचवणे हा मोठा कार्यक्रम असतो.
9 Dec 2015 - 9:00 pm | प्रचेतस
अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात आहे. दर श्रावणात सुरुवातीला गणपतीची द्वारयात्रा होते. पालखी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्ताई ह्या अनुक्रमे पिंपरीगाव, वाकड, रावेत आणि आकुर्डी ह्या चार दिशांना देवींना जाऊन भेटत असते.
बाकी तुमच्या बसणीच्या महालक्ष्मीचे वैदिकीकरण झालेले दिसते.
9 Dec 2015 - 9:25 pm | पैसा
ती रवळनाथासोबत आहे म्हणजे तेच ना! गंमत म्हणजे ही जुनी स्थानिक मातृदेवता, तिचे नाव महालक्ष्मी झाले तरी ती विष्णुपत्नी महालक्ष्मी असे कधी म्हणत नाहीत आणि तिच्या बाबत लोकांमधे कथा ज्या पूर्वापार चालत आलेल्या असतात त्या तशाच असतात.
9 Dec 2015 - 9:00 pm | प्रचेतस
अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात आहे. दर श्रावणात सुरुवातीला गणपतीची द्वारयात्रा होते. पालखी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्ताई ह्या अनुक्रमे पिंपरीगाव, वाकड, रावेत आणि आकुर्डी ह्या चार दिशांना देवींना जाऊन भेटत असते.
बाकी तुमच्या बसणीच्या महालक्ष्मीचे वैदिकीकरण झालेले दिसते.
9 Dec 2015 - 9:33 pm | कंजूस
उच्चवर्णियांत ,राजे यांना मुलगा होणे महत्त्वाचे वाटत असले तरी इतरांना मुल होणे अथवा झालेली मुले दगावणे याविषयी चिंता असावी.त्यासाठी काही देवतांना शांत करायचे तर बळी हवाच.बळी प्रकरण फार वाढल्याने संतमंडळींनी विरोध केला असावा.राजगडाच्या पायथ्याशीही एका देवीला अजूनही बकरे देतात.ती देवी राजाई म्हणत असावेत.कार्ल्याची एकविरा कोळी ,महादेव कोळी यांची देवी असली तरी तिला माशांचा बळी का आवडत नाही तर मासे अगोदरच मेलेले असतात म्हणून असेल.कोंबडे बकरे सदैव एका पायावर तयार असतात मरायला.
9 Dec 2015 - 10:16 pm | माहितगार
शक्य आहे. गुगल बुक्सवर जिजाबाईकालीन कागदपत्रे नावाच्या ग्रंथाचा केवळ स्निपेट व्ह्यू दिसतो आहे त्यात मेसाईचा उल्लेख दिसतो आहे जाणकारांनी हा उल्लेख अभ्यासून दुजोरा दिल्यास बरे पडेल.
9 Dec 2015 - 10:53 pm | माहितगार
संत नामदेवांच्या १२७०-१३५० बाबतीत रोचक भाग असा की संत नामदेव "जाखाई जोखाई उदंड दैवते, वाऊगेची व्यर्थ श्रमतोसी...क्षुद्र देवता जीवदान बळी | तेणे न पावती सुख कल्लोळी||" असा उपदेश देत आहेत, त्यांची पत्नी राजाई मात्र संत नामदेवांचे लक्ष संसारात वापस यावे म्हणून मेसाईचा धावा करत आहे :) एकुण या विषयावरील समाज प्रबोधनाच्या सुर्वातीचे श्रेय संत नामदेवास जावयास हवे. ( महानुभावांचा या विषयावर तत्कालीन दृष्टीकोण काय होता ह्याची माहिती मिळाल्यास रोचक ठरेल असे वाटते)
13 Dec 2015 - 6:32 pm | माहितगार
मरीआईलाच तामीळनाडून मरीअम्मन म्हणून ओळखले जाते. ग्रामदेवता म्हणून या देवीची मंदिरे तामीळनाडूत आहेत, त्यांनी पुर्वेत थायलंड सिंगापुर व्हिएतनाम सगळीकडे या देवतेची मंदीरे पोहोचवली आहेत. हि देवी वेंकोजीराजे भोसले यांनाही प्रसन्न झाल्याचा आणि त्यांनी तंजावूर मध्ये या देवतेचे मंदीर बनवून घेतल्याचा उल्लेख दिसतो. या देवतेचे वर्णन वैदीक पुर्व आहे समजून संस्कृत, वेद आणि उत्तरभारतीय संस्कृतीस विरोध करणार्या तमिळींना हि देवता पुर्वकालीन समजून विशेष प्रिय झाली आहे.
इंग्रजी विकिपीडियावर उधृत एका आख्यायीकेत देवीचा (स्मॉलपॉक्सचा) आजाराशी संबध असल्याचा उल्लेख स्पष्ट दिसतो तरीही मरी शब्दाचे उच्चारण मारी असे करून मारी शब्दाचा अर्थ तमिळमधील पाऊस शब्दाशी लावला जात असल्याचे इंग्रजी विकिपीडिया लेखावरून दिसते.
त्रिशुळावरील दहाव्या शतकातील मरीअम्मनची प्रतिमा
13 Dec 2015 - 6:33 pm | माहितगार
संदर्भ इंग्रजी विकिपीडिया लेखाचा दुवा
13 Dec 2015 - 8:55 pm | मांत्रिक
राजराजेश्वरी भगवती ललिता (द प्लेफुल वन) ला म्हणतात. ललिताचा अर्थ खेळकर खोडकर मुलगी. ती मायेची साम्राज्ञी होय. तिच्या प्रभावाने परब्रह्म भ्रमित होऊन दिक्कालाच्या जाळ्यात अडकते. या जगाची उत्पत्ती तिच्या मायाशक्तीनेच शक्य होते म्हणून ती राजराजेश्वरी (क्वीन ऑफ क्वीन्स)
तिच्यापुढे ब्रह्मा विष्णु महेश हे देखील यःकश्चित बालके आहेत. तिच्या मायाशक्तीने भ्रमित होऊन ते हा पंचभूतात्मक संसार भोगू लागतात. या चक्रातून तिच्या कृपेशिवाय मुक्ती नाही.
13 Dec 2015 - 9:02 pm | मांत्रिक
एका सत्पुरुषाने मला भगवती राजराजेश्वरीचा मंत्र सांगितला होता. तो इथे नमूद करतो:
ओम नमो भगवती राजराजेश्वरी सागरतीर महामायापुरनिवासिनी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अन्नपूर्णा शक्तीदेवी अंबेमाते उदयो$स्तु...
मंत्र वाचिक उच्चारण करावयाचा असून उजवा हात चंद्राकार धरुन नाभीपासून उभा वर घेऊन (मंत्रोच्चाराबरोबर) मंत्र संपतेवेळीस सहस्रार चक्रावर आडवा ठेवतात. या मंत्राचा आदेश कुंडलिनी जागृती साठी आहे. गुरुने सांगितल्याशिवाय प्रयोग करू नये ही विनंती.
13 Dec 2015 - 9:14 pm | मांत्रिक
अश्विन नवरात्रात पाचवा दिवस ललिता पंचमीचा आहे. त्याचा गहन अर्थ तोच. पंचमी म्हणजे पंचभूतात्मक संसार. त्याची साम्राज्ञी ती ललिता, द प्लेफुल वन...
बाकी पैसाताईंच्या अभ्यासाला साष्टांग दंडवत.
खुप दुर्मिळ गोष्टी सांगितल्या आहेत.
13 Dec 2015 - 9:16 pm | मांत्रिक
माहितगार साहेबांनी जे पहिले स्तवन दिले आहे त्याचा गूढ अर्थ समजला. तो शेयर करायचा आहे. पण सध्या मोबल्यावर असलेने ते शक्य नाही. पुढच्या शनीवारी देईन.
14 Dec 2015 - 10:55 am | माहितगार
अनुषंगिक अवांतर येऊद्या; पण धाग्याचा मुख्य उद्देश दैवतांचा मानववंश आणि सांस्कृतीक विकासाच्या इतिहासाचा अभ्यास असा आहे.
प्रतिसाद आणि चर्चा सहभागासाठी आभारी आहे.
14 Dec 2015 - 12:36 pm | माहितगार
मेसाई हिच देवता बहुधा तेलंगाणात मैसम्मा नावाने पुजली जाते असे दिसते, आणि तेलंगाणातील 'मैसम्मा' देवतेचा एथनोग्राफीक अभ्यास पुरेसा असल्यामुळे गूगलबुक्स मध्ये बर्या पैकी पुस्तकातून मैसम्माचे उल्लेख आणि अभ्यास दिसतो. मसोबासुद्धा महाराष्ट्र, तेलंगाणा आणि कर्नाटकासाठी कॉमन देवता दिसते पण मसोबा देवतेचा स्वतंत्र एथनोग्रफीक अभ्यास कदाचित कमी पडत असल्यामुळे गुगलबुक्सवर माहिती कमी दिसते.
त्यामुळे मसोबा बद्दल माहितीसाठी इंग्रजी विकिपीडिया लेखावर अधिक अवलंबावे लागेल. मसोबाची मंदिरे सहसा गावाची सीमा अथवा स्मशानांच्या आसपास आढळून येतात मसोबाची मुर्ती सर्वसाधारणपणे त्रिकोणी आकाराची असते, साधारणतः मेसाई/मैसम्माचे आणि मसोबाचे बद्दल विश्वासात आणि बळी इत्यादी पुजन पद्धतीत समानता असावी, मसोबाच्या बाबतीत दसर्याच्या दिवशीही मसोबाचे पुजन होते असा आणखी एक उल्लेख दिसतो. इतर समाजाता मसोबाची पुजा होतेच परंतु दलित समाज मसोबा पुजनात अधिक अग्रेसर असल्याचे उल्लेखांवरून दिसते.
संदर्भ: मसोबा बद्दलचा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आणि गुगलबुक्सवरील काही पुस्तके.
14 Dec 2015 - 2:08 pm | माहितगार
मैसम्मा देवतेस तेलंगाणा आणि तेलगु संस्कृतीत बराच सन्मान तसेच अभ्यासकांच्या नोंदींचे प्रमाणही चांगले आहे असे दिसते. त्यामुळे आदीवासी समाज > मागासवर्गीय > बहुजन > अभिजन > ते सिनेमा गितांसहीत समकालीन लोकप्रीय संस्कृतीतील उत्सव असा या देवतेचा प्रवास सहज लक्षात येतो. मसोबा प्रमाणेच ग्रामदेवता तसेच आजारपणाशी संबंधीत स्मशानाजवळील देवता असे स्वरुप असले तरी इतरही उत्सव तेलंगाणात तेवढ्याच प्रमाणात होत असावेत.
Life Style, Indian Tribes: Locational Practice, Volume 3 या गुगल बुक्सवर उपलप्ध पुस्तकातील नोंदीनुसार लमाणी समाज त्यांच्या तांड्यांपासून काही अंतरावर मरम्मा, तुलचम्मा आणि मैसम्माच्या मुर्ती असतात ज्यांची ते लोक पुजा करण्यापुर्वी व्हाईटवॉश करून कुंक वाहून स्वतंत्रपणे अथवा सामुदायीक पणे पक्षी किंवा प्राण्याचा देवतेस बळी अर्पण केला जातो. याच पुस्तकात तेलंगाणातील पारंपारीक देवतांचे पुजन करणार्या शिकारी जिवनपद्धती जगणार्या चेंचु आदिवासींची माहिती आहे, चेंचु आदिवासींच्या द्रविडकुलातील बोली भाषेस चेंचु भाषा म्हणून ओळखले जाते. चेंचु आदीवासी मैसम्माचे पुजन स्मॉलपॉक्स आजारापासून देवतेने संरक्षण करावे म्हणून जसे करतात तसेच ते शत्रुंपासून संरक्षण तसेच चांगली शिकार मिळावी म्हणूनही मैसम्माची आळवणी करतात अर्थातच हि त्यांची आळवणी देवतेस बळी अर्पण करून केली जाते.
S.C. Dube यांचे Indian Village हे पुस्तक मैसम्माची दखल ग्रामदेवता म्हणून घेते. कुटूंबांची काळजी घेण्यासाठी मैसम्माचे जसे गावात मंदिर असते तसे -मसोबा प्रमाणेच- गावाच्या सीमेवर सीमेचे आणि शेतीचे संरक्षणार्थ मंदीर मैसम्माचे मंदीर असते.
दमट हवेत उगवणार्या मशरुमांचे उपलम्मा या नावाने मैसम्माची उपदेवता म्हणुन पुजन केले जाते. काही जमातीतील लोक उपल्लमेस इतके सॉलीड घाबरतात की उपलम्मेचे मागे लागू नये म्हणुन आळ्वणी पुजन कोंबडीचा बळी करतातच पण स्वतःचे घरही बदलतात, या पुजनातील राजरा देवीच्या पुजनाशी आढळणारे एक साम्य म्हणजे शिल्लक प्रसाद अन्न पुरले जाते नाहीतर देवता आपल्या मागे लागून आपल्या घरात येईल समजतात. तर काही अभिजन कुटुंबे उपलम्मेचे विशेष भिती न बाळगता राजरोस पुजनही करतात. (संदर्भ)
अभिजन समाज मैसम्मा आणि दलितांकडून पुजन होणार्या मैसम्मा सारख्या देवतांना तेवढाच सन्मानाने बघत नाही -हे बहुधा बळीप्रथा निषेधामुळे असावे= या बद्दल कांचा इलय्या नावाच्या लेखकाच्या पुस्तकात नाराजीचा सूर दिसतो. तरीपण इतर पुस्तके आणि आंतरजालीय स्रोत तपासले तर तेलगु पॉपसंस्कृतीने मैसम्मास बदलत्याकाळात बर्यापैकी अंगिकारले असावे असे वाटते, मैसम्माचे गावोगावी पारंपारीक उत्सव होतातच सोबतच मोठ्या शहरी असलेल्या मैसम्माच्या मंदिरांच्या उत्सवांना आणि सिनेमादी गित प्रकारातून चांगलासा प्रतिसाद असावा असे वाटते.
आता पर्यंतच्या वाचनातून मेसाई/मैसम्मा मसोबा या देवतेची मुळे आदीम काळापर्यंत खोलवर जातात असे दिसते मेसा शब्द मराठी, तेलगू, कन्नड भाषेत प्रचलीत दिसतो 'मेसान' शब्दाशी संबंधीत दिसतो पण शब्द नेमका कोणत्या भाषेतून येतो आणि त्याचा नेमका अर्थ यांचे पुर्णतः आकलन अद्यापी होत नाही असे वाटते.
22 Apr 2017 - 11:26 pm | माहितगार
माझाच बहुधा नवरात्र विषयकही धागा आहे पण तो शोधता आलानी म्हणून तुर्तास या धाग्यात घेत आहे.
आत्ता गूगल न्यूज वर 'punjab culture' या टर्मवर शोध घेतला तर Cultural Weaves हि इंडीयन एक्सप्रेसची ११ एप्रिलची बातमी दुवा दिसतो, बातमी दुव्यासोबत गूगलन्यूजने एक ज्येष्ठा गौरींचे वाटेल असे छायाचित्र सोबत दाखवले आहे (-जे मला इथे लिकं देण्यात यश आले नाही -कुणास जमल्यास दुवा द्यावा) पण प्रत्यक्षात इंडीयन एक्सप्रेसच्या बातमीत ते छायाचित्र नाही.) छायाचित्रात लाल कापडांनी पुतळ्यांना गुंडाळले आहे पण चेहरे नसावेत टोकावर पिवळे फुल किंवा वस्त्र काही तरी आहे पुतळ्यांना दोर्यांनी बांधले आहे म्हणून त्या ज्येस्ठा गौरीच आहेत का अशी शंका आली आणि मग त्या पुतळ्या किंवा देवी नेमक्या कोणत्या आणि कशाच्या अशी उत्सुकता वाटली. आणि पंजाबात असे खरेच काही असू शकेल का हि शंका आली.
कुणास माहित असेल तर सांगावे.
22 Apr 2017 - 11:32 pm | यशोधरा
माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात राजराजेश्वरीचा उल्लेख आहे. २ एक दिवसांत लिहिते.
23 Apr 2017 - 1:42 pm | माहितगार
नक्की वाट पहातो. धन्यवाद
23 Apr 2017 - 8:24 pm | सिरुसेरि
अभ्यासपुर्ण लेखन .
"तामिळनाडूतील मरीअम्मन ---मरीआईलाच तामीळनाडून मरीअम्मन म्हणून ओळखले जाते. ग्रामदेवता म्हणून या देवीची मंदिरे तामीळनाडूत आहेत . "
हे वाचुन काहि गाजलेल्या तामिळ चित्रपट गीतांमधेही मारिअम्मा व अन्य लोकदेवतांचा उल्लेख असल्याचे आठवते .
उदाहरणार्थ - करकाटम हे प्राचीन लोकनृत्य पावसाची देवता असलेल्या मरीअम्मन या देवीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो . करगाटकरन हा चित्रपट या नृत्यकला कारांच्या जीवनावर आधारीत आहे . खालील माहिती विकीवरुन साभार -
Karakattam (Tamil: கரகாட்டம் or "karakam (கரகம் 'water pot') dance") is an ancient folk dance of Tamil Nadu performed in praise of the rain goddess Mariamman. The performers balance the water pot on their head very beautifully.[11] Traditionally, this dance is performed in two types - Aatta Karakam is danced with decorated pots on the head and symbolizes joy and happiness and is mainly danced for entertainment, while the Sakthi Karakam is performed only in temples as a spiritual offering.
करगाटकरन मधील एका गाण्याची लिंक . यातील इलायराजा यांचे संगीत खुप गाजले होते --- https://www.youtube.com/watch?v=HfOSajWi6Bc
असेच अजुन एक आठवलेले गाणे - या गीतामधे जक्कम्मा या लोकदेवतेचा उल्लेख आहे . समाजातील वाढती अराजकता कमी होण्यासाठी नायक गाण्यामधुन या देवीला विनवितो आहे . -- https://www.youtube.com/watch?v=-itH8oc2bx0
13 Dec 2018 - 11:31 am | nanaba
As per Ra chi dhere, lakshmi nrusimha madhali lakshmi her chenchu adivasi nchi mulagu chenchu lakshmi ahe.
Actually lakshumi is a common name. So it is not necessarily the same lakshumi.