छायाचित्रण भाग ९. छायाप्रकाशाचा खेळ

एस's picture
एस in काथ्याकूट
2 Mar 2014 - 6:19 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्
छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्
छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स
छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)

सूची
       १. प्रकाशाचे गुणधर्म
       २. व्यस्त वर्ग नियम
       ३. सावल्यांचे स्थान
       ४. शुभ्रसंतुलन आणि रंगअचूकता
       ५. नैसर्गिक प्रकाश वापरताना
       ६. पूरक क्षणदीप्ती (फिल फ्लॅश)
       ७. हाय-की प्रकाश आणि लो-की प्रकाश

      मागील भागात आपण छायाचित्रणाचा एक कला म्हणून विचार करताना रचनाविचार आणि प्रतिमेच्या दर्जावर पडणारा रचनाविचाराचा प्रभाव, तद्अनुषंगाने प्रेक्षकांच्या मनावर प्रतिमेच्या मागील तुमचा दृष्टिकोन ठसण्याची क्रिया ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. त्याच लेखात सांगितल्याप्रमाणे रचनाविचार ही छायाचित्रणाच्या कलेतील पहिली पायरी आहे. आणि एकदा तुम्हांला उत्तम रचनाविचार साधता येऊ लागला की मग या प्रवासातला पुढील टप्पा म्हणजेच प्रकाश योग्य रीतीने टिपण्याची दृष्टी आणि कौशल्य आत्मसात करणे हा होय.

छायाचित्रणातील प्रकाशाचे स्थान...

      छायाचित्रणातील प्रकाशाचे स्थान किंवा प्रकाशाचे महत्त्व एका वाक्यात सांगायचे झाले तर ते असे सांगता येईल - "विदाउट लाइट, देअर इज नो पिक्चर!" हे खरे आहे की प्रकाशच नसेल, तर छायाचित्रण करताच येणार नाही. आणि जर उत्तम छायाचित्रण करायचे असेल तर प्रकाशाचे गुणधर्म, प्रकाशसंवेदकांची प्रकाश टिपण्याची क्षमता, कॅमेर्‍यात या माहितीवर होणारी प्रक्रिया आणि शेवटी एक छायाचित्रकार म्हणून तुम्हांला जाणवणारा प्रकाश - जो सर्वसामान्यांना त्याच विषयवस्तूंच्या ठिकाणी जाणवणारही नाही - या सगळ्यांचा एक सुंदर मिलाफ तुम्हांला घालता आला पाहिजे.

      हा लेख वाचल्यानंतर तुम्हांला तुमच्या विषयवस्तूंवरील प्रकाश दिसू लागेल आणि तो प्रतिमेत कसा दिसेल याचाही अंदाज बांधता येऊ लागेल. प्रकाश जसे छायाचित्र बनवू शकतो तसेच छायाचित्र बिघडवूही शकतो. प्रकाशाचे गुणधर्म व्यवस्थित समजून घेतल्यास व तुमच्या कॅमेर्‍याच्या क्षमतेचा योग्य वापर केल्यास तोच प्रकाश तुमच्या प्रतिमांना एका वेगळ्याच उंचीवर कसा नेऊन ठेऊ शकतो याचाही उलगडा होईल.

प्रकाशाचे गुणधर्म -

तीव्र प्रकाश आणि सौम्य प्रकाश (Hard light and Soft light)
      हार्ड लाइट आणि सॉफ्ट लाइट ह्या दोन संज्ञा जवळपास प्रत्येक छायाचित्रकाराला माहीत असतातच. थोडक्यात सांगायचे झाले तर हार्ड लाइट म्हणजेच तीव्र प्रकाश हा तीव्र आणि सुस्पष्ट कडा असलेल्या सावल्या निर्माण करतो, तर सॉफ्ट लाइट म्हणजे सौम्य प्रकाशामुळे निर्माण होणार्‍या सावल्या ह्या तशाच सौम्य व प्रकाशित भागामध्ये मिसळून जाणार्‍या असतात. तीव्र प्रकाश हा साधारणपणे एखाद्या छोट्या, स्पष्ट प्रकाशशलाका निर्माण करणार्‍या (Directional) आणि तीव्र प्रकाशस्रोतामुळे निर्माण होतो. उदा. मध्यान्हीचा तळपता सूर्य किंवा स्टुडिओमध्ये डिफ्यूजर न लावलेले स्टुडिओ स्ट्रोब्ज. सौम्य प्रकाश हा त्याउलट एखाद्या मोठ्या, विस्तृत आणि फिल्टर होऊन येणार्‍या प्रकाशस्रोतामुळे निर्माण होतो. ह्याची उदाहरणे म्हणजे ढगाळ वातावरण असतानाचा प्रकाश किंवा घराच्या आत अर्धपारदर्शक पडदे लावलेल्या खिडकीतून येणारा प्रकाश किंवा मोठ्या भिंतीसारख्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाश.

      बहुतांशी वेळेस छायाचित्रणाच्या कार्यशाळांमधून दिला जाणारा सल्ला असा असतो की जितके शक्य होईल तितका तीव्र प्रकाश टाळा. सौम्य प्रकाशच चांगल्या छायाचित्रणाला सर्वोत्तम. हे खूपदा खरे असले तरीही छायाचित्रणात तीव्र प्रकाशाला काहीच स्थान नाही असे अजिबात नाही. उलट उत्तम छायाचित्रकार हा छायाचित्रणाच्या प्रस्थापित 'ओल्ड स्कूल फिलॉसॉफी' ला पदोपदी आव्हान देतच आपला रचनात्मकता खुलवत असतो.

      सौम्य आणि तीव्र प्रकाश हे वेगवेगळे मूड खुलवतात. सौम्य प्रकाशामुळे तुम्हांला जास्त रंगछटांची व्याप्ती (टोनल रेंज) मिळते, तसेच विषयवस्तूच्या सावली पडलेल्या भागातील बारकावे जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्या प्रतिमांमध्ये टिपले जातात. सौम्य प्रकाशामुळे मानवी दृष्टीला सोसवेल आणि मानवी वृत्तीला मानवेल असे विषयवस्तूंचे ज्ञापन व आरेखन करता येते. सौम्य प्रकाश तुमच्या छायाचित्रांना एक प्रकारचा डौल (Elegance) आणतो. भावनांची तरलता व्यक्त करण्यासाठी सौम्य प्रकाशाला पर्याय नाही. याचमुळे व्यक्तिचित्रणात विशेषतः फॅशन फोटोग्राफीमध्ये, ग्लॅमर फोटोग्राफी म्हणजेच विवस्त्र किंवा अर्धविवस्त्र छायाचित्रणात, फूड फोटोग्राफी आणि शास्त्रीय महत्त्व असलेल्या मॅक्रोसारख्या छायाचित्रणातही सौम्य प्रकाश वापरला जातो.

      याउलट भावनांना तितक्याच तीव्रपणे हिंदोळे देण्याची क्षमता तीव्र प्रकाशात असते. तीव्र प्रकाशामुळे जास्त कॉन्ट्रास्ट मिळतो, प्रतिमेतील हायलाइट्स म्हणजे अतिप्रकाशमान भाग हे पूर्णपणे पांढरे येतात (ब्लो-आउट होतात) आणि प्रतिमेतील सावल्या ह्या अतिशय गडद अशा येतात.

      तीव्र प्रकाशाचा वापर प्रतिमेच्या दृश्यातला भेदकपणा किंवा निराशाजनकता अशा सीमारेषेवरील भावना दाखवण्यासाठी परिणामकारकतेने करता येतो. बरीचशी स्ट्रीट फोटोग्राफी, वार्तांकन स्वरूपाचे छायाचित्रण तीव्र प्रकाशाचा सुयोग्य वापर करूनच केले जाते.

प्रकाशाचे रंग-तापमान (Color-temperature of Light)
      रंग-तापमानाची व्याख्या अशी आहे - कलर टेम्परेचर इज द टेम्परेचर ऑफ् अ‍ॅन आयडिअल ब्लॅक-बॉडी रेडिएटर अ‍ॅज इट इज रेडिएटिंग लाइट ऑफ् अ ह्यू कम्पेरेबल टू दॅट ऑफ् द लाइट-सोर्स इन् क्वेश्चन. किंवा अजून सोप्या शब्दांत - द टेम्परेचर अ‍ॅट विच अ ब्लॅक बॉडी वुड एमिट रेडिएशन ऑफ् द सेम कलर अ‍ॅज अ गिव्हन ऑब्जेक्ट. आता हे इतकं सोप्पं आहे म्हटल्यावर अजून काय लिहिणे! *WALL* *wacko*

      रंग-तापमान ही संज्ञा प्रकाशभौतिकीतील संज्ञा कमी आणि शुद्ध भौतिकशास्त्रातील व्याख्या जास्त आहे. तरीही छायाचित्रणाच्या दृष्टीने प्रकाशाचे रंग-तापमान जाणून घेणे आणि फिल्टर किंवा रॉ प्रोसेसिंग सारख्या विविध मार्गांनी त्याचा अंतिम प्रतिमेवरील परिणाम योग्य रितीने नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक असते. वेगवेगळ्या प्रकाशस्रोतांचे रंग-तापमान वेगवेगळे असल्यामुळे नितळ पांढरा प्रकाश दर्शवण्याऐवजी सर्व प्रकाशस्रोत कुठल्या ना कुठल्या प्रकारे एखाद्या रंगाच्या छटेला जास्त झुकते माप देतात. यालाच कलर-कास्ट असे म्हणतात. उदाहरणार्थ, बल्बच्या उजेडाला एक पिवळेपणा किंवा नारिंगी रंगाची झाक असते. दुपारच्या उन्हात समुद्रकिनार्‍यांच्या प्रतिमेत कूल निळ्या रंगाचे वर्चस्व जाणवते.

      रंग-तापमान हे तापमानाच्या केल्विन स्केलवर मोजले जाते. उबदार छटांचे केल्विन तापमान हे कमी असते, तर शीत छटांचे केल्विन तापमान हे जास्त असते. उदा. केशरी-पिवळ्या छटेच्या मेणबत्तीच्या उजेडाचे केल्विन तापमान हे १२००K ते १८००K असू शकते, तर निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी सूर्यप्रकाशाचे तापमान हे १००००K पेक्षाही जास्त असू शकते. असा सूर्यप्रकाश कॅमेर्‍याच्या प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर गडद निळी छटा म्हणून टिपला जातो. एखादी शुभ्र इमारत सकाळच्या कोवळ्या उन्हात मातकट लालसर रंगाची दिसेल तर तीच इमारत भरदुपारी निळसर रंगाची असल्याचा भास होईल. हा त्या-त्या प्रकाशाच्या रंग-तापमानाचा प्रभाव आहे. योग्य रंग-तापमान टिपण्यासाठी आताच्या डिजिटल युगात व्हाइट बॅलन्स रॉ पोस्ट प्रोसेसिंगमध्ये हवा तसा बदलता येतो.

प्रकाशाची दिशा (Direction of Light)
      आपल्याला प्रकाश शक्यतो सौम्य व सर्व बाजूंनी येणारा असेल तर तो आल्हाददायक वाटतो. पण हाच प्रकाश जर फक्त मोजक्याच दिशांतून येत असेल तर मात्र त्यावेळची आपली भावना प्रकाशाच्या दिशेनुसार बदलू शकते. तीच वस्तू किंवा तोच चेहरा वेगवेगळ्या दिशेतून येणार्‍या प्रकाशामुळे दरवेळी वेगवेगळा भासू शकतो. हा परिणाम विशेषतः व्यक्तिचित्रणात आणि वन्यजीवछायाचित्रणात खूपच जाणवण्यासारखा असतो. उदा. एखाद्याच्या चेहर्‍यावर जर चेहर्‍याच्या पातळीतूनच प्रकाश पडत असेल तर ते आपल्याला नॉर्मल वाटते. पण हाच प्रकाश जर फक्त छातीकडून वर येत असेल तर तोच चेहरा भुतासारखा घाबरवणारा वाटू शकतो. सूर्योदय व सूर्यास्ताच्यावेळच्या लांब सावल्या, बाजूने येणारा प्रकाश (साइड लाइटिंग) हा परिणाम नाट्यमय वाटू शकतो. पार्श्वभूमीकडून येणारा प्रकाश (बॅकलाइटिंग) मुळे एक जादूसारखा किंवा अवास्तविक परिणाम देऊ शकतो.

      व्यक्तिचित्रणात प्रकाशाची दिशा ही फारच महत्त्वाची ठरते. कारण प्रतिमेतून व्यक्त होणारा मूड बदलणे एवढेच कार्य प्रकाशाची दिशा करत नसते, तर एकाच व्यक्तीचे एकाच पोजमध्ये घेतलेली छायाचित्रे केवळ प्रकाशाची दिशा बदलल्याने अगदीच वेगवेगळी भासू शकतात.

समोरून येणारा प्रकाश (फ्लॅट लाइट किंवा ब्यूटी लाइट) विषयवस्तूला कमी गोलाई असल्याचा भास निर्माण करू शकतो. जबड्याच्या खालून थोडे बाजूने चेहर्‍यावर पडणारा प्रकाश तुमच्या मॉडेलच्या डोळ्यांमध्ये चमक निर्माण करू शकतो. केसांवर मागून थोडा बाजूने पडणारा प्रकाश (हायलाइट्स) तुमच्या मॉडेलच्या चेहर्‍याला एकदम त्रिमितीय खोली प्राप्त करून देतो. समोरून उंचावरून येणारा प्रकाश नैसर्गिक प्रकाशाचा भास निर्माण करू शकतो.

प्रकाशाची तीव्रता (Intensity of Light)
      प्रकाशाची तीव्रता जरी प्रकाशस्रोतांवर अवलंबून असली तरी प्रकाशाच्या तीव्रतेचा आणि कॅमेर्‍यातील अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओच्या विविध कॉम्बिनेशन्सचा खूप जवळचा संबंध आहे. कमी तीव्रतेचा प्रकाश म्हणजे कमी प्रकाश आणि जास्त तीव्रतेचा प्रकाश म्हणजेच लख्ख उजेड किंवा प्रखर प्रकाश.

      कमी प्रकाशात काम करताना, उदा. पक्ष्यांची छायाचित्रे घेताना सुयोग्य शटर इन्टर्वल (१/५००s किंवा त्याहीपेक्षा फास्ट) वापरावा लागतोच. सूर्यास्तानंतर मात्र जास्त फास्ट शटर इन्टर्वल वापरता येत नाही. मग तिथे जास्तीत जास्त मोठे अ‍ॅपर्चर वापरून चित्रणकक्षेचा (डेप्थ ऑफ् फिल्ड) चा बळी द्यावा लागतो, कारण आयएसओ ६०० पेक्षा जास्त वाढवता येत नाही. नाहीतर प्रतिमेत कुरव (नॉइज) निर्माण होतो. त्याचबरोबर प्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास स्लो शटर इन्टर्वल वापरून मिळवता येणारे मोशन ब्लर सारखे परिणाम मिळवणे शक्य होत नाही. त्यासाठी खूपच लहान अ‍ॅपर्चर वापरून व आयएसओ १०० ठेऊनही उपयोग होत नाही. अशा वेळी लेन्समधून येणार्‍या प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी एनडी फिल्टरचा वापर करावा लागतो. आयएसओच्या किमतीवरही प्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम होतो. अंधुक प्रकाशात कमी आयएसओ ठेऊन कॅमेरा हाताने धरून छायाचित्र घेणे अवघड जाते कारण कॅमेरा किंचितही हलला तरी येणारी प्रतिमा ही धूसर असते.

      जिथे कमी प्रकाशात छायाचित्रण करायचे आहे तिथे प्रकाशाची कमतरता योग्य प्रकाशस्रोत वापरून भरून काढावी लागते. त्याचप्रमाणे जास्त प्रकाशात छायाचित्रण करताना प्रकाशाची तीव्रता ही फिल्टर, सॉफ्टबॉक्स, परावर्तक वगैरे वापरून कमी करावी लागते.

अंतराचा व्यस्त वर्ग नियम -

      हा नियम तसा बर्‍याचशा भौतिक राशींना लागू असला तरी फक्त प्रकाशाच्या बाबतीत तो खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो: "प्रकाशाची तीव्रता (Intensity) ही प्रकाशस्रोतापासून असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते."

      तसा हा नियम सर्वच प्रकारच्या प्रकाशाच्या बाबतीत तितकाच खरा आहे. मात्र छायाचित्रणात ह्या नियमाचा वापर मुख्यत्वे फ्लॅश आणि स्टुडिओ स्ट्रोब सारख्या कृत्रिम प्रकाशयोजनेची विविध कॉम्बिनेशन्स बनविण्यासाठी केला जातो. वेगवेगळे लाइट मीटर, ज्यांच्या सहाय्याने इन्सिडेन्ट प्रकाश मोजून 'एक्स्पोजर' सुचवले जाते, त्यांच्यामागचे कार्यतत्त्वही हाच नियम आहे.

      समजा तुम्ही एक प्रकाशस्रोत वापरून एखाद्या विषयवस्तूची प्रतिमा घेत आहात. विषयवस्तूचे प्रकाशस्रोतापासूनचे अंतर पाच फूट आहे. लाईट मीटरने सुचवलेले अ‍ॅपर्चर समजा f/16 आहे. अंतर दुप्पटीने वाढवून जर दहा फूट केले, तर विषयवस्तूवर मूळ प्रकाशाच्या किती पट कमी प्रकाश पोहोचायला हवा? याचे अचूक उत्तर 'निम्मा प्रकाश' हे नसून 'एक चतुर्थांश प्रकाश' हे आहे. म्हणजेच अंतर दुप्पट वाढल्यावर प्रकाश '२ च्या वर्गाच्या व्यस्त पटीत' म्हणजे 'एक चतुर्थांश' इतकाच राहील.

      हा नियम स्पष्ट होण्यासाठी खालील आकृती पहा.

InverseSquareLaw

सावल्यांचे स्थान -

      छायाचित्रणामध्ये खूपदा सावल्यांकडे केवळ प्रकाशाचा अभाव एवढ्या मर्यादित अर्थानेच पाहिले जाते. त्यामुळे या क्षेत्रात स्थिरावलेले छायाचित्रकारही बर्‍याचदा केवळ प्रकाशाबद्दल बोलत असल्याचे दिसते. उदा. लॅण्डस्केप छायाचित्रणात 'मॅजिक अवर लाइटिंग' म्हणजे संधिप्रकाश किंवा पहाटेची झुंजूमुंजूची वेळ याबद्दलच जास्त बोलले व लिहिले जाते. तीच गोष्ट फॅशन छायाचित्रकारांची. तेही आपण स्टुडिओमध्ये अमूक प्रकाशयोजना साधायला कसे तास न् तास घालवतो याचाच उहापोह करत बसतात. अशा एकांगी चर्चा व साहित्यामुळे छायाचित्रणाच्या क्षेत्रात प्रकाश याच गोष्टीला महत्त्व दिले जाऊन सावल्यांकडे दुर्लक्ष केले जाण्याकडे कल वाढतो असे दिसते. एवढेच नव्हे तर, या कलेला छायाचित्रण असे म्हणण्याऐवजी प्रकाशचित्रण हा शब्दप्रयोग काही छायाचित्रकार वापरू लागले आहेत. असोत. सावल्यांच्या बाबतीत अनेकांच्या ज्ञानाचा एकंदरीत उजेडच असल्याचे दिसते.

      पण छायाचित्रणात निव्वळ प्रकाशाकडे बघून चालत नाही. सावल्यांशिवाय प्रकाश केवळ निरर्थक आहे. जसे प्रकाशाचे काही विशिष्ट असे गुणधर्म असतात तसेच सावल्यांचेही आहे. सावल्याही प्रकाशाइतक्याच सजीव असतात. सावल्यांमुळे प्रकाशाला आकार मिळतो, अर्थ मिळतो आणि प्रेक्षकांचे लक्ष प्रकाशित भागाकडे वेधले जाते. सावल्यांच्या भागातही काही प्रकाश असतोच. गडद, तीक्ष्ण सावल्या किंवा फिकट, धूसर सावल्यांमुळे छायाचित्राचा भडक, अंगावर येणारा अथवा तरल हळुवारपणा दर्शवणारा परिणाम घडून येण्यास त्यामुळे मदत होते.

आकार व रेषा अधोरेखित करणे (Define Shapes and Lines)

      सावल्यांमुळे प्रतिमेतील विषयवस्तूंचे आकार, त्यांच्या कडांमुळे निर्माण होणार्‍या रेषा व या सगळ्यांच्या परस्परसंबंधाला अधिक उठाव मिळतो आणि प्रतिमेत एक प्रकारची गतिमानता किंवा त्याविपरीत स्थैर्यसुद्धा प्रस्थापित होते. विशेषतः लांब होत गेलेल्या सायंकाळच्या सावल्या ह्या प्रतिमेत रचनाविचाराच्या दृष्टीने लक्षवेधी अशी एकच एक विषयवस्तू नसतानाही अशा प्रतिमेत एक जिवंतपणा आणतात.

वैधम्र्य आणि नाट्यमयता (Contrast and Dramatic Effects)
      सावल्यांचे गुणधर्म हे तद्अनुषंगिक प्रकाशाच्या गुणधर्माशी निगडित असतात. उदा. प्रखर उन्हामुळे निर्माण होणार्‍या सावल्या ह्यासुद्धा ठळक व गडद असतात, तर सौम्य प्रकाशाच्या सावल्या तशाच धूसर व फिकट असतात. सावल्या अशा प्रकारे प्रतिमेतील प्रकाशाला संतुलित करतात. ह्याच गुणधर्माचा वापर करून प्रतिमेत नाट्यमयता निर्माण करता येते.

      एकमेकात मिसळले गेलेले प्रकाश व सावल्या अशी विषयरचना त्या विषयवस्तूचा परिणाम ठळक करते. उदाहरणार्थ सूर्यास्ताच्यावेळचे आकाशात विखुरलेले ढगाळ पुंजके व त्यांच्यातून डोकावणारा संध्याप्रकाश. गडद सावल्यांचा वापर पृष्ठभूमीत (फोरग्राउंड) सावल्यांचे आकार (सिल्यूट्स) दर्शवण्यासाठी करता येतो. सावल्यांच्या आकारातील तिरपेपणा प्रतिमेत विषयवस्तूंची गती नियंत्रित किंवा अधोरेखित करण्यासाठीही रचनात्मकतेने वापरता येतो.

प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी (Grabbing Focus)
      रचनाविचारात बर्‍याचदा अनावश्यक किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टी मुख्य विषयवस्तूवरील प्रेक्षकांचे लक्ष विचलित करू शकतात. सावल्यांचा वापर अशा दुय्यम गोष्टींवरील प्रकाश कमी करून त्यांच्यातील तपशील झाकण्यासाठी करता येतो. आधीच्या भागात मोठे अ‍ॅपर्चर वापरून पार्श्वभूमी धूसर करून मुख्य विषयवस्तूवर प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधायचे हे दाखवले होते. अशी पार्श्वभूमी सावलीत असल्यास मोठे अ‍ॅपर्चर असणारी लेन्स नसतानाही असाच परिणाम साधता येतो.

पोत दर्शविण्यासाठी (Showing Texture)

      प्रकाशकिरणांची दिशा, तीव्रता आणि विषयवस्तूच्या पृष्ठभागाशी त्यांचा कोन यावर विषयवस्तूच्या पृष्ठभागाचा पोत ठळकपणे दिसणार की नाही हे ठरते. सावलीतल्या भागाची सुरुवात होते त्या प्रकाश व सावलीच्या सीमारेषेवर हा परिणाम जास्त दिसून येतो. उदा. चंद्राची अष्टमीसारख्या रात्री घेतलेली प्रतिमा.

      याच कारणासाठी व्यक्तिचित्रणात प्रकाशाची तीव्रता डिफ्यूजर, रिफ्लेक्टर, सॉफ्ट बॉक्स सारखे लाइट मॉडिफायर्स वापरून सौम्य केली जाते. तसेच एकापेक्षा जास्त प्रकाशस्रोत विविध दिशेने वापरले जातात. नाहीतर मॉडेलच्या चेहर्‍यावरील मुरुमांचे खड्डे, डाग इत्यादी प्रतिमेत दिसून येतात व फॅशनविश्वात ते चालत नाही.

शुभ्रसंतुलन आणि रंगअचूकता -

      शुभ्रसंतुलन (White balance) हा डिजिटल युगाचा एक खूप मोठा फायदा आहे. व्हाइट बॅलन्सचे कार्य हे प्रत्यक्षातील रंगछटा जशाच्या तशा प्रतिमेत उतरविणे हे आहे. कॅमेर्‍याच्या संवेदकाचे प्रकाशकूप (Pixels) हे फक्त प्रकाशाची तीव्रता टिपू शकतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर विद्युतसंवेदक हा मूळचा कृष्णधवलच असतो. पण संवेदकाच्या प्रत्येक प्रकाशकूपावर RGB फिल्टर लावलेले असतात. त्यामुळे कॅमेर्‍यातील मायक्रोप्रोसेसर विशिष्ट अल्गोरिदम वापरून मूळ कृष्णधवल निविष्टी विदा (Input data) चे रंगीत प्रतिमेत रूपांतर करत असतो. इतक्या खोलात जाऊन हा विषय पाहण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या कॅमेर्‍यांमध्ये एकाच विषयवस्तूच्या प्रतिमेच्या रंगछटा समान प्रकाशातही वेगवेगळ्या का येतात हे समजावे म्हणून. व्हाइट बॅलन्स म्हणजे कॅमेर्‍यात कैद झालेले रंग आणि मूळ विषयवस्तूचे रंग ह्यात तुलना करून प्रतिमेतील रंग जास्तीत जास्त नैसर्गिक करता येण्याची सोय. अचूक व्हाइट बॅलन्स साधल्यास प्रतिमेत कुठल्या एकाच रंगाचे प्राबल्य (Color cast) दिसत नाही. डोळ्यांनाही असे रंग जास्त आल्हाददायक आणि नैसर्गिक वाटतात.

      शुभ्रसंतुलनाला व्हाइट बॅलन्स का म्हणतात याचे उत्तर म्हणजे व्हाइट बॅलन्स हा प्रतिमेतील पांढर्‍या रंगाचा पांढरेपणा ठरवतो. एकदा ते ठरवता आले की बाकीचे रंग आपोआप समायोजित होतात. पूर्वी कॅमेर्‍यांना पांढर्‍या रंगाचा उदासीनपणा (Neutrality) हा पांढरे कार्ड कॅमेर्‍यांपुढे धरून सांगावा लागायचा. त्या कार्डाच्या शुभ्रपणावर मग कॅमेरे इतर रंगछटांची मूल्ये ठरवत असत. त्यामुळे या प्रकाराला शुभ्रसंतुलन असे म्हणू लागले. अजूनही काहीकाही परिस्थितींमध्ये जेव्हा उपलब्ध असणारा प्रकाश संतुलित नसतो तेव्हा चौकटीत विषयवस्तूच्या जवळपास पांढर्‍या कागदाचे काही तुकडे ठेवून प्रतिमा घेतली जाते आणि नंतर फोटोशॉपमध्ये क्लोन करून हे तुकडे प्रतिमेतून वगळले जातात. याला दुसरा पर्याय म्हणजे ज्या डीएस्एल्आरमध्ये एक्स्पोजर लॉकसाठी वेगळे बटन असते त्यात एक्स्पोजर लॉक करून कागदाचे तुकडे बाजूला काढून शटर रिलीज बटन पूर्ण दाबले जाते. अर्थात याला कौशल्याची गरज आहे. प्रत्यक्ष फिल्डमध्ये कॅमेर्‍यावर हात साफ करण्याऐवजी बरेचजण आजकाल फोटोशॉपवर जास्त विश्वास ठेवतात. असो.

      कॅमेर्‍यातील ऑटो व्हाइट बॅलन्स हा बहुतांशी परिस्थितींमध्ये अचूक परिणाम देतोही. पण तो कधीच गंडणार नाही असे नाही. बव्हंशी कॅमेर्‍यांमधील अल्गोरिदम आणि मायक्रोप्रोसेसर इंजिन हे काही विशिष्ट परिस्थितीत अचूक शुभ्रसंतुलनाची निवड करू शकत नाहीत. हे विशेषतः अश्वेतवर्णीय लोकांचे व्यक्तिचित्रण करताना प्रकर्षाने दिसून येते. कॅमेरा उत्पादक शक्यतो श्वेतकांतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग लक्षात घेऊन तो जास्त छान दिसेल अशा पद्धतीने अल्गोरिदम बनवतात. त्यामुळे गौरकांती किंचित उबदार व गुलाबी रंगछटेकडे दाखवण्याचा अशा अल्गोरिदमचा कल असतो. हेच तत्त्व अश्वेतवर्णीय आणि विशेषतः भारतीय वर्णछटेला लागू पडेल असे नाही. म्हणून व्यावसायिक छायाचित्रकार हे व्यक्तिचित्रणात ऑटो व्हाइट बॅलन्सवर अवलंबून न राहता केल्विन स्केलमध्ये कस्टम व्हाइट बॅलन्स ठरवून मग कार्य करतात.

      अचूक व नैसर्गिक शुभ्रसंतुलन नेहमीच चांगले दिसेल असेही नाही. खूपदा अचूक शुभ्रसंतुलन हे त्या प्रतिमेच्या विषयाला किंवा प्रतिमेत सांगितल्या जाणार्‍या गोष्टीला कधीकधी तितका उठाव देत नाही. अशा वेळी कॅमेरा ऑटो व्हाइट बॅलन्सवर ठेवण्याऐवजी वेगळाच मेनू वापरून एक नवीन ताजेपणा प्रतिमेत आणता येतो. उदाहरणार्थ सूर्यास्ताचे दृश्य टिपण्यासाठी ऑटो व्हाइट बॅलन्स एकदमच फिका वाटतो. त्याऐवजी क्लाउडी शुभ्रसंतुलन (Cloudy white balance) ठेवून जास्त उबदार आणि गर्द रंग मिळवता येतात. कधीकधी दिवसाउजेडी खडकाळ भागाचे छायाचित्रण करताना डेलाइट व्हाइट बॅलन्सऐवजी टंगस्टनसारखा मेनू वापरून अतिरंजित पण छान दिसणारी प्रतिमा घेता येते. सांगायचे तात्पर्य एवढेच की योग्य शुभ्रसंतुलन ही प्रयोगाची आणि सरावाची बाब आहे.

नैसर्गिक प्रकाश वापरताना -

      छायाचित्रकार शक्यतो कृत्रिम प्रकाशयोजनेपेक्षा आणि विशेषतः फ्लॅश किंवा क्षणदीप्ती प्रकारच्या प्रकाशाला नाके मुरडतात. सर्वात सुंदर प्रकाश हा नैसर्गिक प्रकाश असतो असे कुणीही चटकन सांगेन. पण नैसर्गिक प्रकाशाचा वापर कसा करायचा हे माहीत नसेल तर मग तुमच्या प्रतिमेच्या दर्जाचा सर्वात मोठा शत्रू हा त्यातील चुकीचा नैसर्गिक प्रकाश ठरू शकतो. याला नाव जरी नैसर्गिक प्रकाश असे असले तरी अशा प्रकाशाचे तीव्रता, दिशा, आकार, रंगतापमान इत्यादी गुणधर्म दिवसाच्या प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे असतात. हा नैसर्गिक प्रकाश वापरण्यामागचा सर्वात मोठा अडथळा आहे.

      नैसर्गिक प्रकाशाला तसे म्हणत असले तरी नैसर्गिक प्रकाशाच्या स्रोतांमध्ये सूर्याखेरीज इतरही प्रकाशस्रोत अंतर्भूत होतात. उदा. चंद्रप्रकाश, विजांचा कडकडाट, किंवा अगदी ध्रुवीय प्रदेशांमधील नॉर्दर्न फ़्लेअर्स सुद्धा! पण या भागात आपण सुरुवात म्हणून फक्त सूर्यप्रकाशाचा विचार करणार आहोत. नैसर्गिक प्रकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकाश तुमच्या छायाचित्रणासाठी अगदी फुकट उपलब्ध असतो. आणि तरीपण स्टुडिओमधील प्रकाशयोजनेपेक्षा नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रण करणे हे जास्त आव्हानात्मक असते. कारण नैसर्गिक प्रकाशाची उपलब्धता, तीव्रता, रंग-तापमान, दिशा, ही सगळीच गुणवैशिष्ट्ये दर क्षणाला बदलत असतात. त्यामुळे एकच विषयवस्तू दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेस आणि वेगवेगळ्या हवामानात एकदम वेगळीच दिसते.

      छायाचित्रणात नैसर्गिक सूर्यप्रकाश वापरताना विषयवस्तूवर तीन प्रकारे प्रकाश पडू शकतो.
            १. थेट सूर्यप्रकाश (उबदार आणि वैधम्र्ययुक्त)
            २. अभिसारित सूर्यप्रकाश (शीतल आणि कमी वैधम्र्ययुक्त)
            ३. परावर्तित सूर्यप्रकाश(तीव्र किंवा सौम्य, परावर्तक पृष्ठभागाचे गुणधर्म दर्शवितो)

      दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार आणि हवामानानुसार यातील प्रत्येक घटकाचे प्रमाण आणि तीव्रता बदलते.

वेळेचा नैसर्गिक प्रकाशावर परिणाम:

      दुपारी सूर्य डोक्यावर असतो. दुपारनंतर तो क्षितिजाकडे झुकू लागतो. त्यामुळे वैधम्र्य (contrast) कमी होते. कारण सूर्यप्रकाशाला वातावरणातून जास्त अंतर कापावे लागते. थेट सूर्यप्रकाशापेक्षा असा प्रकाश जास्त विखुरतो. आणि त्यातील निळ्या प्रकाशलहरींचे शोषण झाल्यामुळे असा प्रकाश उबदार आणि तांबूस बनू लागतो.

हवामानाचा नैसर्गिक प्रकाशावर परिणाम:

      ढगाळ वातावरण असताना ढगांचा प्रकार आणि त्यांच्या घनतेवर नैसर्गिक प्रकाशाची तीव्रता बदलते. थेट आणि अभिसारित सूर्यप्रकाशातील सीमारेषा अशा वेळी पुसट बनते. आणि परिणामी प्रकाश अधिक सौम्य आणि कमी वैधम्र्य दर्शविणारा असा बनतो.

नैसर्गिक प्रकाशाची दिशा:

      प्रकाश कुठून येतो आहे ह्यावर विषयवस्तूची प्रतिमेतील दिशा आणि स्थान ठरते. बर्‍याचदा विशेषतः सूर्यप्रकाश जिकडून येतोय त्याच दिशेला प्रतिमेतील व्यक्तींना पहायला सांगितले जाते, जेणेकरून प्रकाश त्यांच्या चेहर्‍यावर पडेल. पण ही पद्धत खूपदा चुकीची असल्याचे दिसून येते. उन्हे थेट डोळ्यांवर पडत असतील तर लोक डोळे बारीक करतात. त्यांचे गाल वरच्या बाजूला आकसले जातात. आणि तुम्ही तुमच्या विषयवस्तूंना चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवायला सांगितले तर प्रतिमेत त्यांचे दात जास्त चमकदार दिसून डोळ्यांवरचे लक्ष हे लोकांच्या दातांकडेच जास्त जाते. त्याचबरोबर डोळ्यांच्या भोवती सावल्या पडून लोक थकल्यासारखे वाटतात.

      कडक उन्हात व्यक्तिचित्रण करताना लोकांना शक्यतो सावलीत उभे करून आणि कॅमेर्‍याच्या लेन्सवर थेट ऊन येणार नाही अशा पद्धतीने छायाचित्रे घ्यावीत. ऊन जास्त सौम्य असल्यास, उदा. सायंकाळी किंवा दुपारच्या तीव्र प्रकाशातही जर तुमच्याकडे परावर्तक (रिफ्लेक्टर) असेल तर लोकांना सूर्याच्या आणि कॅमेर्‍याच्या मध्ये उभे करावे. त्यामुळे त्यांच्या केसांवर छान चमक येऊन एक नाट्यमय प्रभाव निर्माण होईल.

      पण अशा वेळी चेहरा प्रकाशाच्या विरुद्ध असल्याने काळपट येण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त चेहरा प्रकाशमान होईल अशा प्रकारे परावर्तकाच्या सहाय्याने काही प्रकाश त्यांच्या चेहर्‍यांवर सोडावा किंवा पूरक क्षणदीप्तीचा वापर करावा. सूर्य मात्र प्रतिमेच्या चौकटीत येणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर लेन्स फ़्लेअर मुळे प्रतिमा धूसर आणि वॉश-आउट होऊ शकते.

      अजून एक चांगला पर्याय म्हणजे सूर्य हा व्यक्तींच्या बाजूला आणि थोडासा मागे ठेवून व्यक्तींची प्रतिमा घेणे. ह्या पद्धतीत चेहर्‍याची गुणवैशिष्ट्ये जास्त ठळकपणे अधोरेखित होतात.

      तुम्हांला जर छायाचित्रासाठी व्यक्तींना कशा पद्धतीने उभे करावे हे समजत नसेल तर आधी त्यांना एका जागी उभे करून त्यांच्याभोवती कॅमेर्‍याच्या व्ह्यू-फाईंडर मधून पहात प्रकाश तपासून पहा. नंतर पुन्हा हीच प्रक्रिया करा. फक्त या वेळी तुमच्या विषयवस्तूंना तुमच्याबरोबर स्वतःभोवती फिरायला लावा. आता कोणत्या पोज मध्ये आणि कुठल्या दिशेने प्रकाश आल्यावर छायाचित्र सर्वात चांगले येईल ह्याची कल्पना तुम्हांला येईल.

स्वच्छ दुपारचा सूर्यप्रकाश:
      भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना असा सूर्यप्रकाश थेट व सरळ जमिनीला लंबरूप असा असतो. ह्या वेळी सूर्यप्रकाश जास्त विखुरला जात नाही (diffusion), त्याचे विकिरण फारसे होत नाही (diffraction) किंवा जमिनीवरूनही अशा प्रकाशाचे परावर्तन तितकेसे होत नाही (reflection). त्यामुळे असा प्रकाश हा सर्वात जास्त तीव्र आणि रंग-तापमानाच्या दृष्टीने सर्वात पांढरा प्रकाश असतो. अशा प्रकाशाचा व्यक्तिछायाचित्रणात तितकासा उपयोग नसतो.

      पण काही परिस्थितींमध्ये मात्र असाच तीव्र प्रकाश उपयोगी ठरतो. उदा. पाण्याखालील छायाचित्रणात जास्त नितळ पाणी आणि स्वच्छ सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा असतो. दुपारच्या उन्हात असे छायाचित्रण छान जमून येते. पाणी नितळ असताना झरे, समुद्रकिनारे यांच्या प्रतिमा चांगल्या येतात. रिपोर्ताज म्हणजे वार्तांकन प्रकारच्या छायाचित्रणातही तीव्र प्रकाशाचा उपयोग प्रतिमेच्या विषयाचे गांभीर्य अधिक तीव्रतेने ठसविण्यासाठी करता येतो. तीव्र उन्हाच्या वेळी कृष्णधवल प्रकारच्या प्रतिमा सुरेख दिसतात. एचडीआर प्रकारचे छायाचित्रण करण्यासही तीव्र ऊन उपयोगी पडू शकते.

सकाळचा आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश:

      या वेळी उन्हे जर कललेली असतात आणि सावल्या थोड्या लांब होऊ लागतात. प्रकाश जास्त उबदार होऊ लागलेला असतो. विषयवस्तू जास्त त्रिमितीय वाटू लागतात. असा प्रकाश हा दुपारच्या उन्हाइतका रंग-उदासीन नसतो. पण सूर्यास्ताच्या वेळेसारखा तांबूसही नसतो. दुपारच्या तुलनेत हा प्रकाश जास्त तिरप्या सावल्या निर्माण करतो. ह्या सावल्या तितक्या गडद नसतात. पण सूर्योदय किंवा सूर्यास्तासारख्या त्या सौम्य आणि मंदही नसतात. त्यामुळे अशा सूर्यप्रकाशात खूप वैविध्यपूर्ण छायाचित्रण करता येते.

सूर्योदय/सूर्यास्ताच्या वेळचा सूर्यप्रकाश:
      या वेळेला छायाचित्रणाच्या क्षेत्रात ‘सुवर्णतास’ किंवा Golden Hour असे म्हणतात. सूर्योदयानंतर एक तास आणि सूर्यास्तापूर्वी एक तास उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश हा छायाचित्रणासाठी सर्वोत्तम मानला जातो. विशेषतः लॅण्डस्केप आणि व्यक्तिचित्रणासाठी ही वेळ खूपच चांगली असते. या वेळी सावल्या लांब पडतात आणि वातावरणात एक सोनेरी तांबूस प्रभा भरून राहिलेली असते. विविध भूरूपे आणि व्यक्तिचित्रणातील मुग्धता यांचे सर्वात प्रभावी चित्रण अशा प्रकाशात करता येते.

गोधूळिवेळचा सूर्यप्रकाश:
      सूर्यास्तानंतर सुमारे अर्धा तास आणि सूर्योदयापूर्वी अर्धा तास आकाशात सूर्य नसतो, पण मंद प्रकाश अवकाशात भरून राहिलेला असतो. यालाच Twilight असेही म्हणतात. आकाश हे दोन भागात विभागले जाते. एका बाजूला क्षितिजाखालील सूर्यामुळे उपोष्ण तांबूस छटा असते तर दुसरीकडे निळसर करडा रंग आपली शीतलता जपत पसरलेला असतो. अशा प्रकाशात विषयवस्तू अतिशय सौम्य, वेगळ्याच रंगछटेच्या आणि शांत अशा भासतात.

      प्रकाश कमी असल्यामुळे कमी वैधम्र्य आणि ओव्हर-एक्स्पोजरचा धोका असतो. अशा प्रकाशात कुठलीच शुभ्र वस्तू शुभ्र दिसत नाही. त्यामुळे कॅमेर्‍यातील स्वयंशुभ्रसंतुलन विचित्र परिणाम दर्शवू शकते.

पूरक क्षणदीप्ती (फिल फ्लॅश) -

      'फिल फ्लॅश' (Fill Flash) या इंग्रजी संज्ञेसाठी 'पूरक क्षणदीप्ती' हा शब्द मला सुचलाय... :-P असोत. छायाचित्रणात प्रकाशसंवेदक माध्यमांच्या काही मर्यादा असतात. विशेषतः एकाच चौकटीत जर खूप प्रखर आणि खूप गडद अशा दोन्ही प्रकारचे भाग येत असतील तर तुमचा कॅमेरा एकतर प्रखर भाग योग्यपणे दिसेल असे मीटरिंग करेल, किंवा अंधारलेल्या भागासाठी मीटरिंग करून सावल्यांतील तपशील जास्त दाखवेल. पण दोन्ही प्रकारच्या मीटरिंगमध्ये दुसरा भाग नीट एक्स्पोज होत नाही. उदा. सावल्यांसाठी मीटरिंग केल्यास प्रतिमेतील प्रखर प्रकाशाचा भाग हा ओव्हर-एक्स्पोज म्हणजेच ब्लोन-आउट होतो, तर प्रकाशासाठी मीटरिंग केल्यास सावल्या पूर्ण काळ्या व गडद होतात. या मर्यादेचा त्रास सर्वात जास्त प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तींची छायाचित्रे घेताना होतो.

      आजच्या डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे TTL म्हणजेच 'थ्रू-द-लेन्स' फ्लॅश मीटरिंग. ज्याप्रमाणे कॅमेर्‍याचे एक्स्पोजर मीटरिंग असते तसेच आजच्या आधुनिक फ्लॅशमध्येही स्वतःचे मीटरिंग असते. टीटीएल् फ्लॅश स्वतःचे फ्लॅश आउटपुट किती असावे हे थेट लेन्समधून संवेदकावर पडणार्‍या प्रकाशाच्या तीव्रतेवर स्वतःच ठरवू शकतात. यालाच स्मार्ट थ्रू-द-लेन्स फ्लॅश तंत्रज्ञान असे म्हणतात. वेगवेगळ्या कॅमेरा उत्पादकांचे जशा इमेज स्टॅबिलायझेशन साठी IS, VR, OS, SSS, VC, SR अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत तशाच स्मार्ट टीटीएल् साठीपण प्रत्येक उत्पादक स्वतंत्र नाव वापरतो. उदा. कॅनन त्याला iTTL (इंटेलिजंट टीटीएल्) म्हणते तर निकॉन CLS (क्रिएटिव लाइटिंग सिस्टिम) म्हणते.

      टीटीएल् फ्लॅशचा एक मुख्य उपयोग हा पूरक क्षणदीप्तीसाठी म्हणजेच फिल फ्लॅश चा परिणाम साधण्यासाठी होतो. फिल फ्लॅश या तंत्रात दोन गोष्टी येतात. एक म्हणजे कॅमेरा हा विषयवस्तूच्या मागील पार्श्वभूमीसाठी मीटरिंगची आकडेमोड करतो आणि पार्श्वभूमीतील जास्त उजेडाचा भाग सौम्य दिसेल अशा प्रकारे एक ते दोन स्टॉप कमी एक्स्पोज करतो. इथून पुढे फ्लॅशचे काम चालू होते. हा फ्लॅश मग फक्त पृष्ठभूमीतील विषयवस्तू प्रकाशमान होईल एवढाच प्रकाश फ्लॅशमधून सोडते. अशा रीतीने जास्त उजेडाची पार्श्वभूमी असतानाही प्रतिमेत माणसांचे चेहरेबिहरे काळेकुट्ट न दिसता नीट गोरेबिरे दिसतात.

      फिल फ्लॅशचेही काही तोटे जरूर आहेत. त्यात एक तोटा असा आहे की फ्लॅश आउटपुट कमीजास्त झाले तर प्रतिमेतील छायाप्रकाशाचा समतोल बिघडतो. वेगवेगळ्या दिशेतून येणारा प्रकाश हा विषयवस्तूचा आकार कसा अधिक ठळक करतो हे आपण वर पाहिले आहे. हा थ्री-डी परिणाम फिल फ्लॅशमुळे बोथट होतो. यावर एक उपाय म्हणजे फिल फ्लॅश वापरताना फ्लॅश कॅमेर्‍यावर नेहमीच्या हॉट-शू च्या जागी न बसवता थोडा उंचावर, पण तरीही कॅमेर्‍याच्या अक्षातच सरळ वर धरणे. यामुळे एरवी व्यक्तिचित्रणात नाकाची सावली गालावर पडून प्रतिमा विचित्र येते तसे होत नाही व सावल्या जास्त सौम्यपणे विभागल्या जातात.

हाय-की प्रकाश आणि लो-की प्रकाश -

हाय-की प्रकाशयोजना:
      हाय की लाइटिंग म्हणजेच अत्यधिक प्रकाशात केले जाणारे छायाचित्रण. या प्रकारच्या प्रकाशयोजनेत छायाप्रकाशाचे गुणोत्तर जास्तीत जास्त सौम्य करणे हा उद्देश असतो. पूर्वीचे कॅमेरे आणि फिल्म हे जास्त वैधम्र्य असणारी दृश्ये नीट चित्रित करू शकत नसत. हा तांत्रिक दोष आताच्या कॅमेर्‍यांमध्ये बराच कमी झाला असला तरी आता हाय-की प्रकाशयोजना कधीकधी एखादी मनोवस्था दाखवण्यासाठी मुद्दाम रचली जाते.

      हाय की प्रकाशयोजनेमध्ये मुख्य प्रकाशाबरोबरच पूरक प्रकाश आणि पार्श्वभूमीवरील प्रकाश ह्यांची तीव्रता वाढवून प्रतिमेतील सावल्यांचा गडदपणा कमी केला जातो. पूर्वी यासाठी मोठमोठे तीन प्रकाशस्रोत (Three-point setup) वापरले जात. आता त्यांची जागा मोठे पडदे आणि सॉफ्टबॉक्स यांनी घेतली आहे.

      या प्रकाशयोजनेत दरवेळी कॅमेर्‍याची सेटिंग बदलावी लागत नसल्याने एरवी बरेच दिवस रेंगाळणारे फोटोशूट काही तासांमध्ये होऊ शकतात. बडे प्रॉडक्शन हाउसेस हल्ली अशा प्रकाशयोजनेचा वापर करून आणि तेचतेच मॉडेल्स घेऊन वेगवेगळ्या बिझनेस सिनारिओंसाठी स्टॉक फोटो घेऊन ठेवतात आणि विविध कंपन्यांना त्यांचे लर्निंग कोर्सेसचे मटेरिअल बनवण्यासाठी विकतात.

लो-की प्रकाशयोजना:
      नेहमीच्या प्रकाशयोजनेमध्ये मुख्य प्रकाश (Key light), पूरक प्रकाश (Fill light) आणि पार्श्वभूमीवरील प्रकाश (Background light) असे किमान तीन प्रकाशस्रोत वापरले जातात. चौथा प्रकाशस्रोत हा हायलाइट म्हणून ओळखला जातो, ज्याचा वापर केसांवर प्रकाशाची तिरीप सोडणे हा असतो.

      लो की लाइटिंग मध्ये शक्यतो एकाच प्रकाशस्रोताचा वापर केला जातो. सावलीतील भागाला किंचित प्रकाशित करण्यासाठी कधीकधी परावर्तक वापरले जातात.लो की प्रकाशयोजनेत विषयवस्तूच्या आकाराचे चढउतार जास्त उठावदारपणे दिसून येतात. यात एक प्रकारची डार्क फॅण्टसी असते. भीतीदायकता किंवा रहस्यमयता दाखवण्यासाठी छायाचित्रणात लो की लाइटिंगचा नेहमीच उपयोग केला जातो.

      मुख्य प्रकाश आणि पूरक प्रकाशाचे गुणोत्तर म्हणजे प्रकाशगुणोत्तर (Lighting ratio). हाय-की प्रकारात हे गुणोत्तर अतिशय मोठे असते, उदा. १:१. लो-की प्रकारच्या प्रकाशयोजनेत हे गुणोत्तर लहान असते, उदा. १:८.

Note: All the images in this article have been used under the Creative Commons licenses 'Public Domain Dedication CC0 1.0 Universal' and 'Attribution CC BY' types. These are not intended for any commercial use.

Image sources: www.flickr.com, www.pixabay.com and www.commons.wikimedia.org

नोंद - लेख वाचताना त्रास होऊ नये यासाठी आधीचा कॉफीटेबलबुक इफेक्ट काढून टाकला आहे. जर कुणाला काही शंका विचारायच्या असतील किंवा माहिती हवी असेल तर व्यनि करण्याऐवजी शक्यतो धाग्यांवरच विचारल्यास त्याचा फायदा इतरांनाही होईल आणि त्यात बाकीच्यांच्याही उत्तरांची भर पडू शकेल असे वाटते. तरीही व्यनिच करायचा असेल तरी हरकत नाही.

जाताजाता
"How many photographers does it take to change a light bulb? 50. One to change the bulb, and forty-nine to say, "I could have done that!" ... ;-)

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Mar 2014 - 10:54 pm | प्रचेतस

अतिशय जबरदस्त.
सध्या ही केवळ पोच.
परत प्रतिसाद पुनरेकवार हा भाग वाचल्यावर.

यसवायजी's picture

2 Mar 2014 - 11:43 pm | यसवायजी

बेष्ट.

खेडूत's picture

3 Mar 2014 - 12:23 am | खेडूत

हाही भाग आवडला.
तांत्रिक बाजू अजून समजायला अजून काहीतरी वाचावे लागणार.

अवांतर:
हे ऑफसेट प्रिंटींग सारखे लिहिलेत ते चित्रा शेजारी लेखन करताना अडचण येते म्हणून इमेज
चिकटवल्याने झाले आहे का?

एस's picture

3 Mar 2014 - 2:34 pm | एस

अवांतर:
हे ऑफसेट प्रिंटींग सारखे लिहिलेत ते चित्रा शेजारी लेखन करताना अडचण येते म्हणून इमेज
चिकटवल्याने झाले आहे का?

- एक्झॅक्ट्ली. ह्या फ्लिकरने वात आणला काल. दिवसभर प्रयत्न करूनही मनासारख्या सुस्पष्ट प्रतिमा येईनातच. पुढील भागापासून सादरीकरणापेक्षा माहितीवरच भर देण्यात येईल. मी हा लेख पीडीएफ स्वरूपात आणायचा प्रयत्न करून पाहतो. तयार झाल्यावर इच्छुकांना मेल ने पाठवता येईल. पाहूयात.

प्रतिमा मोठ्या केल्या आहेत आणि लिखाण (टेक्स्ट) ही वेगळे केले आहे. आता लेख वाचताना डोळ्यांना इतका त्रास होणार नाही... :-P सादरीकरणाला मात्र फाट्यावर मारले आहे. :-)

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2014 - 9:05 am | श्रीरंग_जोशी

पुन्हा पुन्हा वाचून त्यानुसार प्रयोग करून शिकण्यासारखा हा भाग आहे.
संपूर्ण लेखमालिकाच हौशी छायाचित्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मोहन's picture

3 Mar 2014 - 11:56 am | मोहन

धन्यवाद.

वा. खू. साठवण्यात आलेली आहे.

सुहास झेले's picture

3 Mar 2014 - 12:05 pm | सुहास झेले

सुपर्ब... आता सगळे जुने भाग एकदम वाचून काढले. अजून शिकायला आवडेल :)

छायाचित्रणातीलप्रकाशाचे स्थान व त्या खाली दिलेली ओळ "विदाउट लाईट देअर इज नो पिक्चर !" हे वाचल्यावर मला माझाच एका जुना प्रतिसाद आठवला :- प्रकाश हा फोटोचा आत्मा आहे,तो जर योग्य प्रकारे नियंत्रणात आणता आला तर फोटोमधे बरेच काही दाखवता येऊ शकते.
वेळ मिळताच लेख शांतपणे वाचीन्,वाचनखूण साठवुन ठेवली आहे. लेखावर घेतलेली मेहनत लगेच लक्षात येते. :)

शैलेन्द्र's picture

6 Mar 2014 - 7:05 pm | शैलेन्द्र

गौतम राजाध्यक्षांच एक वाक्य आठवलं,
"जगात फक्त एक सूर्य आहे, त्याचा वापर तुम्ही कसा करणार ते महत्वाचं"

बाकी, लेख, नेहमीप्रमाणेच, जबरदस्त..

स्पा's picture

3 Mar 2014 - 12:23 pm | स्पा

__/\__

एस's picture

3 Mar 2014 - 2:36 pm | एस

वल्ली, यसवायजी, खेडूत, श्रीरंग_जोशी, मोहन, सुहास झेले, मदनबाण, स्पा,

सर्वांचे आभार...

आगाऊ म्हादया......'s picture

5 Mar 2014 - 10:03 pm | आगाऊ म्हादया......

पचवतोय...खूपच खोलवर लिहिलेत...चार-पाच वेळा वाचावा लागेल.. इतरही भाग वाचतोय ...

धन्यवाद.छान समजावताय..

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2014 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर माहितीपूर्ण मालिका. यातले ५% टक्के जमले तरी बरीच चांगली चित्रे काढता येतील ! पुभाप्र.

एस's picture

6 Mar 2014 - 2:08 pm | एस

आगाऊ म्हादया...... , इस्पीकचा एक्का, आभारी आहे. लेख खूप मोठे होताहेत. पण हा विषय तुकड्यातुकड्यांनी समजून घेता येणे माझ्या मते शक्य नाही. म्हणून इतकी सखोल माहिती. :)

__/\__ लै भारी, स्वॅप्स.. सुंदर, माहितीपुर्ण मालिका..

सावल्यांच्या बाबतीत अनेकांच्या ज्ञानाचा एकंदरीत उजेडच असल्याचे दिसते.

हे वाक्य तर खासच आवडले..

कवितानागेश's picture

7 Mar 2014 - 4:30 pm | कवितानागेश

खूपच आवडला हा भाग.

प्रचेतस's picture

7 Mar 2014 - 4:54 pm | प्रचेतस

परत वाचला.
अधिकच आवडला.
वाचनखूण साठवली आहेच.

चौकटराजा's picture

7 Mar 2014 - 5:35 pm | चौकटराजा

एक दोन चार दिवसांसाठी आपले डोळे स्वॅप करू या. कारण इतक्या तपशीलवार लिहिलेला लेख तितक्याच सखोलपणे वाचणे आताच्या माझ्या डोळ्यानी शक्य होईल काय हा प्रश्न आहे. असो. लेख तरीही बराच मनापासून वाचायचा प्रयत्न केलाय.
रीम लाईट. शिल्होटी हे प्रकार माहिती होते. तसेच लो की चित्रिकरण आपण काही सिच्वेरशन मधे फिल्म मधे पहातो.( उदा पोलीस थर्ड डिग्रीचा वापर करतात ही कोठडी ) . मनोरूग्णाची भग्नावस्था 'हाय की' मधून दाखवता येईल काय ? बाकी पाच पाच वर्षे कॅमेरा हातात असणार्‍याना प्रकाशाचा दिशेचे लेन्सच्या कोनाशी काय नाते आहे याचा साधा सेन्स ही नसतो असा अनुभव आहे.दुपारच्या बाराचे वेळी अगदी फास्ट शटर अधिक फ्लॅश वापरला तर काय फायदा होईल याचा विचारच कोणी करताना दिसत नाही. प्रकाश जेवढा तीव्र तेवढीच सावली गर्द हे समीकरण थ्री डी एस मॅक्स मधे प्रकाश स्त्रीताची तीव्रता कमी अधिक करून मस्त समजते, असा अनुभव आहे. .
आपण दिलेल्या नैसर्गिक कमानीच्या उदाहरणातील तुलना फार महत्वाची आहे. कधी भडक रंग चांगले दिसतात व कधी नैसर्गिक हे समजून घेणेही महत्वाचे . ते दोन फोटो मात्र वेगळे आहेत असे मागच्या ढगावरून वाटतेय. काही उत्पादकांच्या
सेन्सरचे वैशिस्ट्य म्हणून एखाद्या कलरचा कास्ट बाय डिफॉल्ट येत असतो हे खरे आहे काय ?

एस's picture

7 Mar 2014 - 7:09 pm | एस

चला, बरं वाटलं तुमचा प्रतिसाद पाहून. मला वाटायला लागलं होतं की लेख जरा जास्तच 'बोजड' झालाय त्यामुळे सारखा सारखा खाली जातोय की काय... :-P...

यूटाहच्या वाळवंटातील त्या प्रसिद्ध कमानीचे दोन्ही फोटो वेगवेगळे असून दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी घेतले आहेत. त्यामध्ये जास्त वैधम्र्य देणारा आणि नैसर्गिक तांबूस रंगतापमानाचा प्रकाश विषयवस्तू जास्त खुलवतो हे दाखवायचे होते. हे उदाहरण विशेषतः आपल्याकडे ट्रेकिंग-कम्-फोटोग्राफी करणार्‍यांना जास्त मदत करेल.

काही उत्पादकांच्या सेन्सरचे वैशिस्ट्य म्हणून एखाद्या कलरचा कास्ट बाय डिफॉल्ट येत असतो हे खरे आहे काय ?

होय. निकॉनच्या तुलनेत कॅननच्या प्रतिमा किंचित उबदार आणि मॅजेन्टा कास्ट कडे झुकणार्‍या असतात हे मी मागील एका लेखावरील प्रतिसादात स्पष्ट केले होते. मात्र हे संवेदकावर अवलंबून नसून संवेदकाच्या अंकीय विदाचे रूपांतर प्रतिमेत करणार्‍या अल्गोरिदम वर अवलंबून असते.

राजो's picture

7 Mar 2014 - 7:28 pm | राजो

_/\_

अशक्य... वाचनखूण साठवली आहेच..

एक सजेशन स्वॅप्स.. फोटोग्राफीबद्दल मराठीमधे पुस्तके असण्याची शक्यता कमीच असेल. तुम्ही अप्रतिम लिहू शकाल..

एस's picture

10 Mar 2014 - 9:02 am | एस

सध्यातरी असा विचार नाही. मराठीमध्ये नुकतीच छायाचित्रणावर एक-दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'डिजिटल फोटोग्राफी - कॅमेरा आणि छायाचित्रण' हे डॉ. जितेंद्र कात्रे यांचे पुस्तक आहे. मी वाचलेले नाही. त्यामुळे आत्ताच शिफारस करू शकणार नाही.

पैसा's picture

28 Mar 2014 - 5:52 pm | पैसा

लेखातील माहिती तर सुरेखच! प्रतिशब्द शोधायची मेहनत आणि फोटो निवडतानही घेतलेली मेहनत जाणवते आहे. मिपावरच्या काही सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक म्हणेन मी याला!

पिलीयन रायडर's picture

28 Mar 2014 - 6:45 pm | पिलीयन रायडर

काय अशक्य सुंदर लेख आहे.. अरे काय माणसं आहात की कोण? किती तो अभ्यास.. बापरे...!

___/\____

नन्दादीप's picture

29 Mar 2014 - 9:00 am | नन्दादीप

वाचनखुणा साठवली आहे..

एस's picture

1 Apr 2014 - 6:09 pm | एस

पैसाताई, पिलीयन रायडर, नन्दादीप, सर्वांचे आभार... हे सर्व बेसिक म्हणता येईल इतकेच आहे. या निमित्ताने छायाचित्रणाच्या विश्वाची मलाही तोंडओळख होत आहे... :-)