वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. या शाखेचा संस्थापक प्रवरसेन-१ चा मुलगा सर्वसेन याला मानण्यास हरकत नाही. याचे राज्य इंध्याद्री रांगांच्या दक्षिणेपासून गोदावरीपर्यंत पसरले होते. इंध्याद्री म्हणजे ज्या डोंगररांगात अजंठ्याचे लेणी आहेत त्या डोंगराची रांग. याला त्याच्या राज्यकारभारात त्याच्याच एका महत्वाच्या मंत्र्याची मोलाची मदत झाली. त्याचे नाव होते ‘रवी’. हा एका ब्राह्मणाला त्याच्या क्षत्रीय पत्नीपासून झालेला मुलगा होता. या घराण्याने मागे म्हटल्याप्रमाणे वाकाटकांच्या पुढील पिढ्यांना अशीच मोलाची साथ दिली असे शिलालेखांवरुन कळते. या सर्वसेनाने आपली राजधानी वत्सगुल्म येथे हलिविली.म्हणजे आत्ताचे वाशीम. हे एक पौराणिक शहर आहे व याचा उल्लेख वात्सायनाच्या कामसुत्रामधेही आहे असे म्हणतात. हा त्याकाळी एक पवित्र प्रदेश मानला जायचा कारण वत्सऋषींच्या तपामुळे पवित्र झालेल्या या देशाला अनेक देवांनी आपले वसतीस्थान बनविले. याच सर्वसेनाने प्राकृतात हरिविजय रचले. या अत्यंत सुसंस्कृत राजाने अंदाजे ३५५ सालापर्यंत राज्य केले.
आजारी राजकुमारी.....नंदाने (बुद्धाचा भाऊ) संसार त्याग केल्याची बातमी ऐकल्यानंतर चक्कर आलेली ही स्त्री. मला मागे उभी राहिलेली डोक्यावर पांढरे वस्त्र घेतलेली (नर्स) इथली वाटत नाही....
सर्वसेनानंतर त्याचा मुलगा विन्ध्यसेन हा गादीवर आला. याला विंध्यशक्ती-१ या नावानेही ओळखले जाते. याने कुंतलदेशाच्या राजाचा पाडाव केला. याच वेळी राष्ट्रकुटांचा उदय होत होता. त्या घराण्याच्या संस्थापकाने म्हणजे मानांका नावाच्या राजाने बऱ्याच लढाया करुन गोदावरीच्या दक्षिणेकडील प्रदेश पादाक्रांत केला जो वाकाटकांच्या ताब्यात होता. या राष्ट्रकुटांच्या संस्थापकाच्या एका शिलालेखामधे त्याने कुंतल व विदर्भ जिंकुन घेतल्याचा उल्लेख सापडतो. या राजांची राजधानी मानपुरा नावाची होती. हे शहर बहुदा हल्लीचे सातारा जिल्ह्यातील ‘माण’ असावे. (म.म. मिराशी). थोडक्यात हे राजे दक्षिण महाराष्ट्रावर राज्य करत होते. त्यांचे शेजारी होते, अश्मक आणि विदर्भ. अश्मक म्हणजे हल्लीचा अहमदनगर व बीड जिल्हे व त्याच्या आसपासचा प्रदेश. अश्मक बहुदा वाकाटकांचे मांडलिक असावेत. हा जो राष्ट्रकुटांचा संस्थापक मानाका होता तो विंध्यसेनाच्या समकालीन होता. या दोघांच्याही शिलालेखात एकमेकांवर विजय मिळविल्याच्या नोंदी असल्यामुळे असे अनुमान काढता येते की त्यांची युद्धे झाली पण ती निर्णायक नव्हती. राष्ट्रकुटांचा दुसरा राजा देवराजाच्या काळात कुंतलदेश गुप्तसाम्राज्याच्या प्रभावाखाली आला त्यामुळे राष्ट्रकुटांचा त्रास वत्सगुल्म वाकाटकांना झाला नाही. विंध्यसेनाने धर्ममहाराजा हे बिरुद धारण केले. त्याच्या राज्यकारभारात त्याचा पंतप्रधान प्रवर याची त्याला बरीच मदत झाली असा उल्लेख घटोत्कच लेण्यामधे आहे. याने ४०० सालापर्यंत राज्य केले असावे.
य चित्रात त्याकाळातील एक सजलेले घर दिसत आहे. खिडकीत दोन भांडी दिसत आहेत बहुदा कुठल्यातरी सणाची तयारी चालली असावी.
विंध्यसेनानंतर त्याचा मुलगा प्रवरसेन-२ हा गादीवर बसला. दुर्दैवाने हा अल्पजिवी ठरला. तो मेला तेव्हा त्याचा मुलगा आठ वर्षाचा होता. या युवा युवराजाचे नाव मात्र अजंठामधील शिलालेखात नष्ट झाले आहे पण याचा मंत्री एक किर्ती नावाचा होता हे ज्ञात आहे. ४५० साली याचा मुलगा देवसेन हा गादीवर बसला व याचा बेरारमधे सापडलेला एक ताम्रपट ब्रिटिश म्युझियममधे ठेवला आहे. हा परत आणायला हवा. हा ताम्रपटही वाशीममधून प्रदान करण्यात आला होता असा उल्लेख त्यात आहे. यावरुन वाशीम त्यांची राजधानी बराच काळ होती असे मानायला जागा आहे. वाशीममधे सध्या या घराण्याबाबत काही माहिती मिळते आहे का ते पाहिले पाहिजे. बऱ्याचदा जमिनजुमल्याच्या भानगडींमुळे लोक आपल्याकडे असलेले ताम्रपट, जुनी कागदपत्रे बाहेर काढायला घाबरतात. असो. या देवसेनालाही हस्तीभोज नावाचा एक अत्यंत कर्तबगार पंतप्रधान लाभला होता ज्याने त्याच्या राज्याची घडी अत्यंत व्यवस्थित लावली. याच्या ताब्यात आपले राज्य सोपवून देवसेनाने कला शास्त्र याच्यात लक्ष घातले. या हस्तीभोजाचे नाव अजंठा आणि घटत्कोच लेण्यामंधे कोरलेले आहे जे त्याच्या मुलाने म्हणजे प्रसिद्ध वराहदेव याने कोरवले आहे असे मानले जाते. ४७५ साली देवसेनानंतर हरिसेन गादीवर बसला. हा अत्यंत शूर व महत्वाकांक्षी होता दुर्दैवाने त्याच्या असंख्य विजयाबद्दल अजंठायेथील शिलालेखात वाचता येत नाहीत. विदर्भाच्या चहूदिशेला असलेल्या सत्ताधिशांचा पराभव तरी केला किंवा त्यांच्याकडून जबरी खंडणीतरी उकळली. उत्तरेला अवंती म्हणजे माळवा, पूर्वेला कौसल (छत्तीसगड), कलिंग(महानदी व गोदावरीमधील प्रदेश) व आन्ध्रा म्हणजे गोदावरी व कृष्णेमधील प्रदेश व पश्चिमेला लाट (गुजरात) व त्रिकुट (नाशिक) हे सर्व प्रदेश त्याने स्वत:च्या अमलाखाली आणले. हरिसेनाने हुशारीने या राजांना पदच्युत न करता तो त्यांच्याकडून फक्त खंडणी घेत राहिला. ज्या अर्थी त्याने माळवा जिंकले होते त्यावरुन त्याने थोरल्या शाखेचेही राज्य आपल्या अमलाखाली आणले होते असे म्हणण्यास हरकत नाही. आन्ध्रामधे त्याने सालंकायन राजांना पदच्युत करुन त्यांचे राज्य विष्णूकुंदीन राजा गोविंदवर्मन याला दिले. याच्याच मुलाने म्हणजे माधववर्मन याचे लग्न हरिसेनाच्या मुलीशी लावून त्याने वाकाटकांशी नाते जोडले. याने साधारणत: ५०० सालापर्यंत राज्य केले.
याचा प्रधान वराहदेव जनतेत अतिशय प्रिय होता. याच्यावर राजा व प्रजा दोघांचाही विश्र्वास होता व त्याने तो सार्थ ठरविला असे म्हणण्यास हरकत नाही. यानेच अजंठामधील १६ क्रमांकाची लेणी खोदली व त्यात किती अप्रतिम शिल्पे व चित्रे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. एक लक्षात घेतले पाहिजे की राजा हिंदू धर्माचा खंदा पुरस्कर्ता होता व हा बौद्ध धर्माचा तरीही त्यात कसलीही अडचण दोघांना भासली नाही. हे कसे शक्य झाले हे अभ्यासण्यासारखे आहे. कदाचित त्या काळात बौद्धधर्माला हिंदू धर्माचीच एक शाखा मानत असावेत. त्यातील लेखांवरुन वत्सगुल्म शाखेबद्दल उत्तम माहिती मिळते. आपल्याला ज्ञात असलेला वाकाटकांचा हरिसेन हा शेवटचा राजा. यानंतर एक दोन झालेही असतील पण त्यांची नावे कोणत्याही शिलालेखात वाचता आलेली नाहीत. ५५० साली या थोर घराण्याची उरलीसुरली सत्ता कलाचुरी राजांनी उलथविली. या राजांच्या इतिहासात शिरायला नको पण वाकाटकांची एवढी ताकदवान सत्ता अचानक कशी खलास झाली याची कारणे इतिहासात सापडत नाहीत. सामान्य माणसाला तर सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट कलाचुरी या घराण्यांबद्दल काही माहिती असेल की नाही याची शंकाच आहे. त्यांचे राज्य ज्या ज्या प्रदेशात आहे त्यात इतिहासाचे अनेक लेख सापडण्याची शक्यता अजुनही नाकारता येत नाही. जे ट्रेकर्स डोंगरदऱ्यातून हिंडतात त्यांनी या दृष्टीकोनातूनही पाहिले पाहिजे. कोणास ठावूक एखादा न वाचलेला शिलालेख सापडूनही जाईल.
वाकाटकांच्या एकुण सापडलेल्या शिलालेखांचा अभ्यास केल्यावर असे आढळते की वाकाटकांच्या काळात बौद्धधर्माला उतरती कळा लागली होती तर हिंदूधर्म परत एकदा जोमात उभे रहायचा प्रयत्न करत होता. (मिराशी). वाकाटकांच्या काळात उदंड साहित्य निर्मिती झाली पण त्यातील काहींबद्दलच आपल्याला माहिती आहे. त्यांतीला काहींचे वर झालेले उल्लेख बघता त्या साहित्यकृती किती महान असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. त्या साहित्यात आपण शिरायला नको कारण त्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. ते तुर्तास बाजूला ठेवून आपण आपल्या मुख्य विषयासंबंधित वाकाटकांची कामगिरी बघू तो म्हणजे वास्तूशिल्पकला व चित्रकला. त्यातुनही अजंठामधील. वाकाटकांच्या साम्राज्याचा विस्तार किती होता हे अजून निश्चित न झाल्यामुळे त्यांच्या हद्दीत किती देवळे बांधली गेली हे ज्ञात नाही. परंतू रामटेक येथील रामाचे देऊळ त्यांच्या या विषयातील गतीचे साक्ष देत उभे आहे. हे मंदीर अर्थातच मूळ स्वरुपात उरलेले नसून त्यात काळाच्या ओघात खूपच बदल झाले आहेत. त्याच टेकडीवर वाकाटकांच्या काळातील काही इमारतींचे अवशेष अजूनही नजरेस पडतात. तसेच प्रवरपूर म्हणजे आत्ताचे पवनार येथे वाकाटकांनी रामाचे एक भव्य मंदीर बांधले होते ज्याचे सुंदर अवशेष अजूनही सापडत आहेत. मध्यप्रदेश येथे तिगोवा व बांदवगडजवळ नाचना येथे त्यांची दोन मंदिरे जरा सुस्थितीत उभी आहेत. या मंदिरांचे बांधकाम लेण्यातील बांधकामासारखे आहे. विदर्भातील कलाकार मुर्तीकाम व चित्रकला यातही तरबेज होते हे आपल्याला अजंठातील चित्रांवरुन व मुर्तींवरुन सहज समजते. अजंठातील लेणी क्रमांक १६, १७ व १९ ही लेणी वाकाटकांच्या काळात खोदली गेली आहेत असे मानले जाते. यातील सोळावे हे हरिसेन वाकाटकांचा प्रधान वराहदेव याने खोदलेले आहे. हे एक महत्वाचे लेणे असल्यामुळे हे आपण आता पाहून घेऊ आणि मग पुढे इतिहासाचा तास चालू.......
लेणे क्रमांक १६: आपल्याला माहीत आहेच की याचा कर्ताकरविता होता सम्राट हरिसेनाचा अमात्य श्री. वराहदेव. याने आपल्या पदाला साजेशी अशी जागा त्या अर्धगोलाकृती डोंगरात निवडली. बरोबर मध्यभागी. याच्या कारकिर्दीत बरेच चढउतार येऊन गेल्यामुळे या लेण्यांच्या बांधकामातही अनेक चढ उतार झाले. वराहदेवाने हे लेणे खोदायला घेतले तेव्हा हरिसेनाच्या लेण्याचेही काम चालू होते. खुद्द राजाच्याच लेण्याचे काम चालू असताना त्याची खूपच कुचंबणा झाली असणार उदाहरणार्थ परकीय आक्रमणावेळी राजाच्या लेण्याचे बांधकाम अर्थातच थांबविता येणे शक्य नव्हते त्यामुळे वराहदेवाला स्वत:च्या लेण्याच्या बांधकामाशी तडजोड करावी लागली. अर्थात त्याने त्याच्या भव्यतेशी किंवा कलाकुसरीत कसलीही तडजोड केली नाही. हे बांधकाम बऱ्याच काळ चालू होते व त्याच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही ही खंत मनात ठेवूनच तो स्वर्गवासी झाला.
ह्युएनत्संगने अजंठ्याला भेट दिली नाही पण त्यावेळी त्याने प्रवाशांकडून व सतत फिरणाऱ्या बौद्ध भिक्खूंकडून बरीच माहिती गोळा केली त्यात वराहदेवाच्या लेण्यांच्या दरवाजात दोन मोठे हत्ती आहेत व ते रात्री कधी कधी गर्जना करतात असे नमुद केले आहे. हे शक्य नाही मग त्याकाळी तेथे हतींचा निवास होता का हा प्रश्र्न मनात उभा राहिल्याशिवाय रहात नाही. या रात्री ओरडणाऱ्या हत्तींना पार केले की डावीकडे वळण्याआधी एका नागराजाची मूर्ती नजरेस पडते.
तेथून वर गेले की नजरेस पडतो वराहदेवाचा प्रसिद्ध शिलालेख. त्यात वराहदेव म्हणतो,
‘ज्याच्यावर प्रजेचे व सम्राटाचे सारखेच प्रेम आहे अशा वराहदेवाने अत्यंत न्याय्य पद्धतीने राज्य केले. तो अत्यंत तेजाने सूर्याप्रमाणे तळपत आहे तर धर्म व गुणवत्ता हे त्याची किरणे आहेत. पवित्र धर्मशास्त्र हाच त्याचा सोबती असून तो या जगाचा गुरु, बुद्धाचा निस्सिम भक्त आहे.’
हा शिलालेख बहुदा या विहाराच्या उदघाटनाप्रसंगी कोरला असावा. गंमत म्हणजे काहीच मैल अंतरावर असलेल्या घटत्कोच विहारात याच्याच शिलालेखात तो एक अत्यंत धार्मिक हिंदू आहे असे जाहीर केले आहे. याचा सम्राट स्वत: हिंदू होता व तोही अजंठा येथे एक विहार बांधून धर्माला अर्पण करत होता. या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या भागातील सर्व राजे हिंदू होते. ते एकमेकांविरुद्ध युद्धे छेडत होते पण आपला हिंदू धर्म सांभाळून बौद्ध धर्माला उदार राजाश्रय देत. त्यांनी युद्ध जिंकले म्हणून पराभूत राज्यातील एकाही देवस्थानाला धक्का लावला नाही. काहीवेळा तर पराभूत राजा व विजयी राजा दोघेही एकाच देवस्थानाला सढळ मदत करीत. काही वेळा विजयी राजे अर्धवट पडलेले बांधकामही आपल्या देणगीतून पूर्ण करीत. हे सगळे बदलले मुसलमान आक्रमक भारतात घुसल्यावर. तो काळा इतिहास उगाळायला नको. मुसलमान राज्यकर्त्यांना असेही वागता येते हे कळाले पण फार उशीरा. व ज्यांना कळाले त्यांची संख्याही दुर्दैवाने जास्त नव्हती.
४६२ साली सुरु झालेले हे काम रडतखडत चाललेच होते. त्यातही मधे मधे खंड पडत होता. पण ज्या पद्धतीचे बांधकाम सुरु झालेले आढळते त्यावरुन वराहदेवाची योजना एक अद्वितीय विहार बांधण्याची होती हे निश्चित. याच वेळी बहुदा भिक्खूंना त्यांच्याच विहारात प्रार्थना करण्याची मुभा मिळाली असावी त्यामुळे या नंतरच्या विहारात गाभारे बांधण्यात आले. वराहदेवाने याच वेळी अजून एक वेगळी गोष्ट केली ते म्हणजे त्याने या विहारात भद्रासनातील बुद्धाचे मूर्ती स्थापन केली. बुद्धाचे पाय या मूर्तीत ठामपणे जमिनीवर ठेवलेले दिसतात. याच प्रकारची मूर्ती नंतर काही विहारात आढळते. ही मूर्ती स्थापन झाली तेव्हा साल होते अंदाजे ४७८. याच वेळी बहुतेक युद्ध सुरु झाल्यामुळे हे काम घाईघाईने उरकलेले स्पष्ट दिसते.
तसेच खांबावरचेही काम अर्धवट सोडण्यात आले. नशिबाने ४७७ साली वराहदेवाने एका शिलालेखात त्याच्या राजाच्या सिमांबद्दल लिहिले आहे ते वाचता येते. त्यात हरिसेनाचे राज्य या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत पसरले होते असा उल्लेख आहे. ४७८ नंतर अश्मकांच्या हल्ल्यांमुळे हे बांधकाम जवळजवळ बंदच पडले. या वेळी या विहारात धर्मानंद नावाचा महंत रहात असे. त्याने प्रमुख महंत बुद्धभद्राला २६ क्रमांकाचा चैत्य बांधण्यास चांगलीच मदत केली होती. हा बुद्धभद्र अश्मकांचा मित्र होता असे म्हणतात. ज्या ठिकाणी बिचाऱ्या वराहदेवाने आपले चित्र रंगवायचे ठरविले होते, त्या ठिकाणी याने स्वत:चे चित्र रंगवून घेतले. ज्यावेळी धर्नदत्ताने ही घुसखोरी केली त्यावेळी अमात्य वराहदेव हरिसेनाच्या दहा वर्षाच्या राजकुमाराला घेऊन रानोमाळ भटकत होता. त्यात शेवटी अश्मकांनाही या लेण्यांमधे विशेष रस राहिला नाही. यानंतर त्या ठिकाणी सगळा गोंधळच माजला व कारागीर अजंठा सोडून जाऊ लागले.....या गोंधळात राजाश्रय गेल्यावर अगंतुक व्यापाऱ्यांच्या देणग्या वाढल्या व त्यांनी आपल्याला पाहिजे तेथे पहिजे ती चित्रे रंगविण्याचा हट्ट धरला व भद्रदत्ताला तो मानावा लागला असणार. अक्षरश: हजारो चित्रे घुसडण्यात आली. त्याचेही प्रतिबिंब आपल्याला या व इतर विहारात दिसते. अर्थात त्याला विहार प्रमुखाला दोष देता येत नाही. त्याला तो विहार जिवंत ठेवणे गरजेचे वाटणे नैसर्गिक होते. शिवाय याच काळात त्याच्या २६ क्रमांकाच्या चैत्याचेही काम चालू होते व कलाकार व कारागीर सोडून जाणे त्याला परवडणारे नव्हते. ही हेळसांड पार नंतरच्या काळातही या विहाराच्या नशिबी होती.
काही वर्षापूर्वी एका हावरट अधिकाऱ्याने या विहारातील चित्रे काढून पैशासाठी विकण्याचा सपाटा लावला होता. (वॉल्टर स्पिंन्क्स) या विहाराच्या डाव्या भिंतीवर नंदाच्या धर्म प्रवेशाचे दृष्य रंगविले होते ते त्या माणसाने एका ब्रिटिश माणसाला विकले. अर्थात यातील अनेक चित्रांची औरंगाबादला पोहोचण्याआधीच वाट लागली. त्यातील एक मात्र १९१० मधे सॉथबीच्या लिलावात एक हजार पौंडाला लिलावात विकले गेले. हे ब्रिटनला नेले एका कॅप्टन विल्यम्स नावाच्या सैनिकाने. ते शेवटी बोस्टनच्या प्रसिद्ध संग्रहालयात पोहोचले आहे.
चोरीला गेलेले चित्र......
विहार क्रमांक १६ चा नकाशा व त्यावरील चित्रे. यातील काही ओळखणे आता शक्यच नाही.
याचा वऱ्हांडा ६५ फूट लांब व १० फूट ८ इंच रुंद आहे. या वऱ्हांड्याला सहा अष्टकोनी खांब आहेत जणू काही तो या खांबांमुळे उभा आहे असे वाटावे. यात डाव्याबाजूच्या भिंतीवर या विहाराबद्दल एक लेख खोदला आहे.
‘‘खिडक्या, दरवाजे, सुंदर चित्रे, नक्षिदार खांब व देवदेवतांच्या मूर्तींनी युक्त अशा या विहारात बुद्धाचे वास्तव्य आहे’’
आतील मंडप ६६ फूट ३ इंच लांब तर ६५ फूट ३ इंच रुंद आहे म्हणजे हा बरोबर चौकोनी खोदलेला आहे. यात एकूण २० खांब आहेत. मुख्य गाभाऱ्यात बुद्धाची जी भव्य मूर्ती आहे त्याच्या उजव्या बाजूला वज्रपाणी व डाव्या बाजुला पद्मपाणी त्याच्या सेवेत चौरी ढाळत आहेत. प्रदिक्षणेसाठी मार्ग सोडलेला आहे असे म्हणतात पण मला त्याची शंका येते. ही जागा बहुदा मूर्तीकाराच्या सोयीसाठी सोडलेली असावी.......
आता आपल्याला कशा प्रकारची चित्रे अजंठा लेण्यात रंगविली आहेत याची कल्पना आल्यामुळे ती रंगविताना कलाकारांनी ती कशी केली असतील या विषयी पुढील भागात माहिती घेऊ म्हणजे आपल्याला १७ क्रमांकाच्या विहाराकडे जाता येईल.........हा विहार खुद्द राजाचा आहे...........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
28 Feb 2014 - 5:37 pm | सौंदाळा
अप्रतिम.
अजंठाच्या फोटोंसकट तुमचा लेख वाचायला मिळतोय म्हणजे पर्वणीच आहे माझ्यासाठी.
28 Feb 2014 - 5:40 pm | जेपी
---^---^---^---^---
28 Feb 2014 - 5:42 pm | आत्मशून्य
मागिल भागातली शैली बदलल्यासारखी वाटते.
28 Feb 2014 - 7:59 pm | जयंत कुलकर्णी
शैली तीच आहे, तुम्हाला पेशंस नव्हता, तो आता आलेला दिसतोय.............:-) :-) पण वाचतायना आणि जेव्हा अजंठ्याला जाल तेव्हा हे वाचा म्हणजे बास........
1 Mar 2014 - 1:04 am | आत्मशून्य
अन शेवट भलतिकडे घेउन जाणारा...! जणु ऑफ तासाला विषय मागे पडला म्हणुन नावडत्या विषयाच्या शिक्षकाने घुसे करावी तसा प्रकार. या वेळी ते टाळलय हे बरं केलतं.
28 Feb 2014 - 6:29 pm | अनुप ढेरे
__/\__
28 Feb 2014 - 6:39 pm | अजया
पु.भा.प्र.
28 Feb 2014 - 7:03 pm | प्रचेतस
हा भाग पण अतिशय जबरदस्त.
अजिंठ्याबरोबरच वाकाटकांच्या इतिहासाची पण ओळख होते आहे.
बाकी विहार क्र. १७ हा हरिषेणाने खोदविला नाही. हे लेणे हरीषेणाच्या कुणा एका मांडलिकाने खोदविले आहे. वॉल्टर स्पिंक्सच्या मते हरिषेणाने लेणे क्र. १७ खोदवले ह्या मताचे खंडन डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी आपल्या "स्ट्डीज इन अजंता अॅण्ड एलोरा एपिग्राफ्स" ह्या पुस्तकात केले आहे.
१७ क्रमांकाच्या विहारात ह्या हरिषेणाचा मांडलिकाचा शिलालेख असून त्यात हरिषेणाचा गौरव केला आहे व स्वतःची (मांडलिकाची) वंशावळ दिलेली आहे.
वाकाटक राजवंशाच्या वत्सगुल्म आणि नंदीवर्धन अशा दोन शाखा. नंदीवर्धम म्हणजे रामटेकजवळचे नगरधन नामक खेडे. ह्या नंदीवर्धन शाखेवर बस्तरचा नलवंशीय राजा भवदत्तशर्मा याने आक्रमण करून नंदीवर्धन जिंकून घेतले. याउलट हरीषेण अथवा त्याच्या पुत्रावर आक्रमण झाल्याचा कसलाही अभिलेखीय, नाणकशात्रीय अथवा इतर पुरावा नाही.
हरिषेणाने जो विहार खोदविला ते लेणे क्र. १, ज्यात पद्मपाणी आणि वज्रपाणी बोधीसत्वाची जगप्रसिद्ध चित्रे आहेत. हा विहार खुद्द राजाचा असल्याने तो १६/१७ लेण्यांपेक्षाही अधिक नेत्रदिपक आणि अत्त्युच्च दर्जाचा आहे.
28 Feb 2014 - 7:42 pm | जयंत कुलकर्णी
वर मी १६ क्रमांकावर लिहिलेले आहे. बाकीचे अजून यायचे आहेत.......
28 Feb 2014 - 8:29 pm | जयंत कुलकर्णी
अनेक प्रवाद आहेत व अनेकजण आपापले म्हणणे तेवढ्याच अहमिकेने पुढे रेटतात. डंडिनाच्या दशकुमारचरित्रम प्रमाणे हरिसेनाने अश्मक व इतर मांडलिकांबरोबर शत्रूबरोबर निर्णायक युद्ध करण्याचे ठरविले असता अश्मकांच्या राजाने इतरांबरोबर आतून संधान बांधून हरिसेनाचा युद्धात वध केला. त्याच्या राणीला व लहान दोन मुलांना वराहदेव पळाला...पुढे काय क्झाले ते ज्ञात नाही. अनेक लोकांचे म्हणणे वाचले की त्यांचे बरोबर वाटते कारण निश्चित असा लेखी पुरावा नसल्यामुळे असे होत असते.......
28 Feb 2014 - 9:17 pm | प्रचेतस
सहमत आहे.
दंडीचे दशकुमारचरित मी वाचले नाहिये पण डॉ. देशपांडे यांचे मते त्यात वत्सगुल्म शाखेवर आक्रमण झाले असा उल्लेख नाहिये. दंडी फक्त विदर्भावर आक्रमण झाले असा म्हणतो.
अर्थात कसल्याही गोष्टीला पुरेसा सबळ पुरावा नसल्याने वाकाटक राजवटीचा अस्त नेमका कशामुळे झाला हे अजूनही एक रहस्यच राहील.
बाकी तुम्ही लेखात १७ क्रमांकाचा विहार हां राजाचा असल्याचे म्हटले आहे त्या अनुशंगाने मी वरील म्हणणे मांडले.
लेखमालेच्या पुढिल भागांची वाट पाहात आहेच हे सांगणे न लगे.
28 Feb 2014 - 9:19 pm | जयंत कुलकर्णी
सहमतीवर सहमत...............:-) अर्थात असे क्वचितच होते........:-)
28 Feb 2014 - 9:36 pm | प्रचेतस
:)
28 Feb 2014 - 7:06 pm | कवितानागेश
छान. :)
28 Feb 2014 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटोसह वर्णन वाचायला मजा येत आहे ! पुभाप्र.
1 Mar 2014 - 12:31 am | मुक्त विहारि
आणि प्रणाम.
(आयला, ह्या इतक्या सुंदर आणि अप्रतिम लेखावर , अज्जुन काय प्रतिसाद देणार?)
10 Mar 2014 - 2:44 pm | पैसा
हे तुमचे लेख म्हणजे इतिहास आणि चित्रे/शिल्पे यांचा अमूल्य खजिना आहे आमच्यासाठी!