जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..
ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..
"चांगली भरारी आहे राव, भिडली अगदी मनाला. पण यमकात जरा गंडलीय असे नाही का वाटत?" खरे तर नदीकिनारी फेसाळलेल्या लाटा कश्या आल्या हा प्रश्न दुसर्याच ओळीला माझ्या मनात आलेला, पण त्यावर गण्याचे स्पष्टीकरण ऐकायची ताकद माझ्यात नसल्याने मी हे विचारले.
"आजकाल असंच चालतं.. तू राहू दे रे अंड्या, हिशोबाचं बघ आपलं.." म्हणत गण्याने माझ्यावर ‘अरसिक’ अन त्यापेक्षाही जीवघेणा ‘आऊटडेटेड’ असा शिक्का मारून मला बाजूला सारले.
"चल आता चारोळीला शेर करतो" इति गण्या.
"चारोळीचा शेर?? म्हणजे आता तिचे हिंदीत भाषांतर करणार का राव तू? ... ऐन दुपार को, नदी के नार को..."
त्याला ती फेसबूकवर शेअर करतो असे म्हणायचे होते हे समजले असूनही मी असेच गंमतीने म्हणालो.
तर गेल्या पंधरा मिनिटांत गण्याने पाचपन्नास कविता वाचून एक तोडकीमोडकी चारोळी फेसबूकवर शेअर करायला शोधली होती. आपल्या मित्रांना ती आवडणार याची खात्री आणि तीस-चाळीस लाईक तरी कुठे गेले नाहीत याचा आनंद त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. या आधी मी कधी गण्याला कविता वाचनात आनंद घेताना पाहिले नव्हते. हा आनंद नक्कीच आपण काहीतरी लोकांसाठी शेअर करतोय याचा होता. शेवटी आनंद हा आनंदच असतो, आणि स्वतापेक्षा दुसर्याला आनंददायक असे आपण काही करत असू तर त्यातून मिळणार्या आनंदाला कशाचीच सर नाही. पण जे तीस-चाळीस जण त्याची नेटवरून शोधलेली कविता लाईक करणार होते त्यांना तरी खरेच ती कविता आनंद देणार होती का? त्यांनाही खरेच कवितेची आवड असणार होती का? का ते देखील केवळ गण्याला आनंद मिळावा म्हणून त्याने शेअर केलेली कविता लाईक करणार होते. अन इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले.
दुकानाचा माल आणण्यासाठी बरेचदा अंड्याचे दादरला जाणे होते. परवा देखील गेलो होतो. दादर स्टेशनजवळ काही मुलींचा ग्रूप दिसला. कुठल्यातरी सांस्कृतिक दिवसाच्या निमित्ताने हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये नटलेला, अन हिरवळ हिरवळ म्हणतात ती हिच हे अप्रत्यक्षपणे सांगून जाणारा. जवळपासच्याच एखाद्या कॉलेजच्या मुली असाव्यात. शाळेची मुले असली की कसे चटकन गणवेषावरून ओळखता येतात. नाहीच तर ‘कोणत्या शाळेचे रे तुम्ही?’ करत पटकन विचारता तरी येते. या बहुधा ईंजीनीअरींग कॉलेजच्या मुली असाव्यात. काही जणींकडे असलेल्या आयुधांवरून असा अंदाज बांधता येत होता. फोटोसेशन चालू होते. अर्थात, नटलेल्या अवस्थेत आजकाल हेच जास्त चालते. संध्याकाळी हेच फोटो ऑर्कुट-फेसबूक अश्या सोशल साईट्स वर अपलोड करून इतरांची वाहवा जी मिळवायची असते. वरवर पाहता धमाल चालू आहे असे वाटत असले तरीही प्रत्येकीचे लक्ष मौजमजा करण्यापेक्षा फोटो कसा चांगला येईल याकडे लागले होते आणि या नादात उगाचच त्या फोटो फ्रेममधील कृत्रिमता वाढल्यासारखी वाटत होती. चलता है, मुली म्हटल्या की नटण्याची आवड, नटूनथटून झाल्यावर हौसेने आरश्यात स्वताला न्याहाळणे आणि जमलंय असे वाटले की एखादी छानशी पोज देऊन छायाचित्र काढून घेणे हे आलेच.
पण मागे देखील एकदा रंगपंचमीच्या आदल्या दिवशी मला असेच दृश्य पाहायला मिळाले होते. यावेळी काही युवकांचा ग्रूप कॉलेज सुटल्यावर रंगपंचमी साजरी करत होता. आता हे साजरी करणे म्हणजे काय तर एकमेकांना रंग लावायच्या पोजमध्ये फोटो काढणे चालू होते. रंग लावायचा, लाऊन घ्यायचा आनंद लुटण्यापेक्षा त्यांना आपण एंजॉय कसे करतोय हे फोटो पाहणार्याला दिसले पाहिजे याचीच काळजी जास्त होती. जेणेकरून जेव्हा ते फोटो त्यांचे इतर मित्र बघतील तेव्हा बोलतील, "वाह यार, क्या मजा किया तुम लोगोंने...."
आजकाल कुठे पिकनिकला गेलो तरी हेच होते. निसर्गाला डोळ्यात नाही तर कॅमेर्यात कैद केले जाते. निसर्गसौंदर्याला स्वत:च्या फोटोंच्या बॅकग्राऊंडवर सजवून आपण त्या ठिकाणी जाऊन आलो हेच लोकांना दाखवायचे कौतुक भारी. काही जण तर त्या बॅकग्राऊंडचे देखील भान ठेवत नाहीत. आमच्या मॅडीचेच घ्या ना. गड्याला फिरायची भारी आवड. दर दुसर्या महिन्याला त्याच्या फेसबूक प्रोफाईलवर एका नवीन स्थळाचा फोटो अल्बम अपलोड झालेला दिसतो. मात्र प्रत्येक फोटोत तो एखाद्या कड्याच्या काठावर बसलेला, नाहीतर एखाद्या झाडाला लटकलेला. एखादा किल्लाच असेल तर त्याच्या दगडी प्रवेशद्वारापुढे भालदार चोपदारागत गडी छाती पुढे काढून उभा राहिलेला. पण प्रत्येक फोटोच्या केंद्रस्थानी तो स्वता आणि आजूबाजुचे सारे आऊट ऑफ फोकस. एक नाही, दोन नाही, तर ढिगाने फोटो तेच तेच आणि तसेच तेच. डिजिटल कॅमेराच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि अमर्यादीत मेमरीच्या स्वस्ताईमुळे हजारो फोटो काढले जातात आणि त्यातील निवडक(?) शेकडोंचे प्रदर्शन मांडले जाते. पण एवढे फोटो बघूनही शेवटी त्याला विचारावे लागतेच, की नक्की कुठे गेला होतास रे मॅड्या..
बाकी किल्ल्यांवरून आठवले, आजकाल तिथे असणारे मार्गदर्शक गाईड देखील चांगले की वाईट हे किल्ल्याची माहिती किती योग्य देतात यावर नाही तर फोटोसाठी चांगले स्पॉट सुचवतो की नाही यावर ठरवले जातात असे ऐकलंय.
या फोटो पुराणावरून आठवले, विवाहाचे फोटो तर असावेतच. शेवटी आयुष्यभराची आठवण आहे ती, एखाद्या अल्बममध्ये तिची साठवण करण्यात काही वावगं नाही. परवडत असेल तर विडीओ शूटही असावा. पण फोटो काय, कसे, अन किती काढायचे, तसेच नेमके काय टिपायचे हे फोटोग्राफरवरच सोडून देणे उत्तम ना. जर नवरा नवरी फेरे घेताना, हार घालताना, पाया पडताना, जेवताखाता फोटोसाठी पोज द्यायला लागले किंवा फोटो व्यवस्थित अँगलने खेचला जातोय की नाही याकडेच लक्ष द्यायला लागले तर आयुष्यातील सर्वोत्तम दिवस किती ठोकळेबाज पद्धतीने साजरा होईल ना त्यांचा...
आता इथे लग्न हा आयुष्यातील सर्वोत्तम दिवस या उल्लेखावर काही भुवया उंचावल्या असतील तर काही नजरा तिरप्या झाल्या असतील पण त्यावर पुढच्या एखाद्या लेखात..
अरे हो, लग्नावरून आठवले. आमच्या दादाचे लग्न घराजवळच्याच हॉलमध्ये होते. चालत निघालो तर जेमतेम दहा मिनिटांचे अंतर. नवरदेवाला घोड्यावर वा फुलाफुलांच्या गाडीत न बसवता एखाद्या टॅक्सीत कोंबले तरी मीटर पडायच्या आत दारात हजर व्हावे. पण अंड्याने मात्र वरातीसाठी हट्ट धरला. अंगात नृत्यकला असो वा नसो, त्याची तमा न बाळगता पुर्ण जोमात नाचायचे क्षण आपल्या आयुष्यात तुरळकच येतात. लग्नप्रसंगी तरी ही संधी सोडू नये या मताचा अंड्या. त्या दिवशी अंड्याच्या अंगात काय संचारले होते देव जाणे, मात्र आजही त्या नृत्यविष्काराची छायाचित्रे एखाद्याला दाखवली तर मी मद्यप्राशन करत नाही हे पटवणे अवघड होऊन जावे अश्या एकेक डान्सिंग पोज त्यात उमटल्या आहेत. असो, तर सांगायचा मुद्दा हा की, त्याच हॉलमधून निघालेल्या कित्येक वराती आमच्या वाडीच्या प्रवेशद्वारावरून जातात. दुकानातून डोके बाहेर काढले की नाका सहज नजरेस पडतो. त्या दिवशी देखील तेच चित्र. घोड्यावर बसून नवरदेव निघालेत. तरुणवर्ग आजूबाजुने चकाट्या पिटत चाललाय. त्यांनाच लाजवायला म्हणून खास काही काकूंनी फेर धरलाय. दोनचार पोरंटोरं (कदाचित त्यांचीच असावीत) सभोवताली लुडबुडताहेत. नाक्यावरून वळण घ्यायच्या आधी फोटोग्राफरने चौकातल्या उंचवट्यावरची जागा पकडून नेहमीप्रमाणे आवाज दिला आणि दुसर्याच क्षणाला इथून तिथून दहाबारा टाळकी हात उंचावत आणि गोंगाट करत त्याच्यासमोर जमली. नाचाच्या हावभावात किंचाळत असलेल्या त्या मुलांवर क्लिकक्लिकाट झाला आणि पुढच्याच वळणाला पुन्हा पांगापांग झाली. फोटोमध्ये आवाज रेकॉर्ड होत नसल्याने खरे तर त्यांना किंचाळायची गरज नव्हती, पण ते तसे का किंचाळावे लागते किंवा का सहजपणे किंचाळले जाते याचा विचार केल्यास बरीच उत्तरे सापडतील असे अंड्याला वाटले.
चलता है, बाकी जे या छायाचित्रणाचे झालेय तेच इतर आवडींचेही. गाणी ऐकण्याची आवड घ्या. कधीतरी शांत मूडमध्ये निवांत पडून गाण्यांचा लुत्फ घेण्यापेक्षा ट्रेन-बसच्या खडखडाटात शोऑफ म्हणून महागातले आयपॉड आणि हेडफोन लाऊन गाणी ऐकली जातात, सोबतीला गप्पा चालू असतात, तेरे पास कौनसा गाणा है याचे डिस्कशन. तर कधी गृहपाठाचा अभ्यास लिहिता लिहिता कानावर ती गाणी आदळत असतात. अंड्यानेही एक दोनदा अश्या प्रकारे गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या आवाजाशी स्पर्धा करत आयपॉडचा वोल्युम वाढवला खरे, पण अचानक एका सिग्नलला ट्रेन थांबली आणि कानात जोरदार घुमणारा संगीताचा आवाज, आपण नकळत कानांवर किती अत्याचार करत आहोत याची जाणीव देऊन गेला. खट करून ऑफ’चे बटण दाबले आणि त्या क्षणी निर्माण झालेली शांतता मनाला एक आगळाच आनंद देऊन गेली.
मोबाईलगेम सारखा कृत्रिम आनंद जगात दुसरा नसावा. त्यावर अंड्याने न बोललेलेच बरे. फार तर फार चार बाय सहा ईंचाच्या स्क्रीनवर बसल्याबसल्या डोळे फाडत स्वत:चेच रेकॉर्ड मोडत बसायचे. हल्ली तर ग्राफिक्स तंत्रज्ञानाने एवढी सुधारणा केली आहे की रेसिंग आणि फायटींगचे गेम मैदानी खेळांचा आनंद देऊन जातात म्हणे.
चलता है, या आणि अश्या बर्याच गोष्टी आहेत, जी आसपास दिसणारी मुले आजकाल सर्रास करताना दिसतात. करताना त्यांच्या चेहर्यावर एक आनंद दिसतो, नक्कीच दिसतो. पण का माहीत नाही या अंड्याला तो कृत्रिम भासतो. याला खरेच निर्मळ आनंद म्हणावे का, की फेक आनंद म्हणावे, की जमाना बदल गया है माँ जी बोलून चालवून घ्यावे.
- अंड्या उर्फ आनंद
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://misalpav.com/node/24353
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://misalpav.com/node/24356
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
31 Mar 2013 - 3:23 pm | टवाळ कार्टा
आज्काल शाळेतील मुलांचे गल्ली क्रिकेट बंद झालेय :(
31 Mar 2013 - 3:41 pm | साळसकर
अगदी अगदी.... या गल्ली क्रिकेटच्या आठवणींवर कधीतरी लिहायचेच असे अंड्याने आपल्या नोटपॅडवर टाचून ठेवलेय.. चला पण पहिला जेऊन येतो.. आज आपला मटणाचा रविवार.. :)
31 Mar 2013 - 3:37 pm | एस
जत्रेतील एखादी जॉयराइड पहावी, हो-नाही करता करता आपणही तिकिट काढून रांगेत उभं रहावं, मग नंबर लागल्यावर त्या बदकात किंवा मोरात किंवा पाळण्यात बसावं आणि हुर्रे... बस्स, दुनिया गोलच घुम्या है च्या तालात फिरत रहावं.
मस्त रे आन्द्या
1 Apr 2013 - 10:22 am | श्रिया
छान लिहिलंय, हलकंफुलकं! आधी ते लग्नातले, जेवणाच्या पंगतींचे फोटो पण काय नमुने असायचे. अशा फोटोसाठी एकसाथ सगळ्या जेवणार्यांनी हाताताला घास तोंडापाशी नेऊन फोटोग्राफरकडे बघत पोज दिलेली असायची.
1 Apr 2013 - 3:06 pm | आदूबाळ
सूर्य तोंडात, ताजमहाल चिमटीत असले फोटो तर लय वात आणतात राव...
1 Apr 2013 - 9:08 pm | साळसकर
धन्यवाद वरील सर्वच प्रतिसादांचे.. संडे असो वा मंडे.. वाचत राहा......
2 Apr 2013 - 6:36 am | शिल्पा ब
आवडेश. हे फोटोसाठी पोझ देणं प्रकरण तर अजिबात आवडत नाही.
2 Apr 2013 - 8:01 am | नगरीनिरंजन
अंड्याचा हा फंडा इतर फंड्यांपेक्षा जास्त आवडला कारण हा सगळ्यात जास्त मार्मिक आहे.
चेपु, गुग्गळ प्लस वगैरे इ-कट्टे भरायला लागल्यापासून तिथे फोटोंचा पिसारा फुलवून नाचणे हा एकमेव विरंगुळा निर्माण झाला आहे हे वास्तव चांगले खुलवून मांडले आहे.
आजकाल वास्तवापेक्षा इ-वास्तवात जास्त आनंद मिळतो हे खरे आहे आणि त्याचे कारण वास्तवातल्या कम्युनिटीचा र्हास आणि इ-वास्तवातला कम्युनिटीचा भास असावे असे वाटते.
2 Apr 2013 - 10:18 am | साळसकर
धन्यवाद सर, हा फंडा आवडल्याबद्दल आणि इतर वाचल्याबद्दल
अवांतर - आपली फारशी ओळख नसतानाही पटकन सर बोलावेसे वाटले कारण एक, अंड्याचे निरंजन नावाचे एक सर होते. कारण दोन आपले आयडी नगरीनिरंजन तसेच वजनदार आहे.. :)
2 Apr 2013 - 11:43 am | नगरीनिरंजन
साळसकर भौ,
एकवेळ शिव्या दिलेल्या चालतील पण सर नका म्हणू!
'सर' कोणाला म्हणावे याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया परीकथेतल्या राजकुमारांशी संपर्क साधावा. :)
2 Apr 2013 - 9:24 pm | साळसकर
हा हा .. ओके राव.. काहीतरी आचरट अर्थ दिसतोय.. चलो लिया मैने अपना `सर' पीछे.. :)
2 Apr 2013 - 11:05 am | सुबोध खरे
++ ११११११११११११११११
2 Apr 2013 - 10:38 pm | सस्नेह
विशेषतः लहान मुलांच्या ग्यादरिंगचे फोटो तर लै वात आणतात राव. या फोटोंचे आता तर व्हिडिओ झाले आहेत ! ते तर अगदी अंत पाहणारे प्रकर्ण !
22 Apr 2013 - 6:01 am | शुचि
मुक्तक आवडले
22 Apr 2013 - 12:00 pm | साळसकर
धन्यवाद स्नेहांकिता अन शुचीजी