"वुई कॅन कूक" : सडाफटिंग पाकसिद्धी - भाग १

प्रास's picture
प्रास in पाककृती
21 Feb 2012 - 12:47 pm

या फेब्रुवारीच्या १८ तारखेला दुपारी बरोब्बर एकच्या सुमारास माझा भ्रमणध्वनि किरकिरला. उचलताच पलिकडून आवाज आला, "तयार?" मी एक दीर्घ श्वास घेऊन उत्तर दिलं, "तयार". दुसरं कुठलं उत्तर मी देऊच शकत नव्हतो, म्हणजे तसं करणं मला शक्यच होणार नव्हतं. माझ्यावर अशी वेळ माझ्या स्वतःच्याच कर्माने आलेली होती. दुसर्‍या कुणालाही मी त्यासाठी जबाबदार ठरवू शकलो नसतो. फोनवरच्या प्रश्नाला मी हे असं उत्तर देतोच आहे की माझं पूर्वायुष्य माझ्या डोळ्यापुढून सरकून गेलं अगदी चित्रपतात दाखवतात तसं फ्रेम बाय फ्रेम. तोपर्यंत तसं चांगल्यापैकी आयुष्य जगलेलो मी. डोकं बर्‍यापैकी चालणारं असल्याने वागण्या-बोलण्यात चटपटीत होतो. मित्र-मैत्रिणींचा गराडा सतत आजूबाजूला असायचा. काव्य-शास्त्र-विनोदामध्ये महाविद्यालयीन आयुष्य कसं झकास गेलेलं. यथावकाश पदवी मिळाली आणि माझ्या आयुष्याने आपले रंग बदलायला सुरूवात केलेली. त्याला तरी मी कसा दोष देणार? ते जिच्यामध्ये अस्तित्त्व दाखवत होतं ती दुनियाच आपले खरे रंग दाखवू लागल्याने तिच्या रंगात रंगण्यासाठी, स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, एक कॅमोफ्लाज् म्हणून का होईना, माझ्या आयुष्याला बदलावंच लागलं होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी ना ना तर्‍हेच्या उस्तवार्‍या आणि कामधंद्यासाठी केलेल्या मिनतवार्‍या यामुळे जीवनातल्या काव्य-शास्त्र-विनोदाची जागा नित्य-अत्र-विषादाने घेतली होती. पूर्वी एका हाकेसरशी धाऊन येणारे सुहृद् देखिल त्यांच्या त्यांच्या कामधंद्यामुळे दशदिशांना पांगले होते. जीवन भकास होऊ लागलं होतं. प्रकर्षाने जुन्या आठवणी दाटून येत होत्या पण त्यांच्या पुन:प्रत्ययासाठी कोणताही मार्ग दिसत नव्हता, अर्थात मला प्रयत्न सोडून चालणारच नव्हतं.

जीवनाच्या एकसुरी रहाटगाडग्यापासून काही क्षणांच्या विसाव्यासाठी, मैत्रीच्या नव्या नात्याची गुंफण करण्यासाठी आणि स्वतःलाच पुन्हा शोधण्यासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणजे म्हणजे तो उपरोल्लेखित फोन होता. अनेक दिवसांच्या व्यनिचर्चेनंतर मी, गवि आणि विमे तिघांनी एका आडबाजूच्या गावात एक रात्र, दोन दिवसांचा सडाफटिंग कट्टा करण्याचा प्लान केलेला होता. एकूण हा कट्टा यावेळी होतोय की नाही की पुढल्या आठवड्यात जातोय याबाबत अनिश्चितता होती पण ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी विमेंचा फोन आला आणि आम्ही दोघे दादरहून त्या अगदी इंटिरिअरला असणार्‍या गावाच्या दिशेने निघालो.

असा सडाफटिंग कट्टा मिपाकरांमध्ये पूर्वी झालाय की नाही याची आम्हाला कुणालाच कल्पना नव्हती. आत्तापर्यंतचे कट्टे कोणत्या ना कोणत्या हॉटेलच्या भरवशावर संपन्न झालेले होते. हा कट्टा मात्र याला अपवाद होता. यावेळी स्वतःला स्वयंपाकी बनवूनच उदरभरणाचा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी मग सकाळी सकाळी मी कोरडा शिधा आणि जामानिमा जमवला होता. पहिल्यांदाच तिथे जात असल्याने खुद्द गावात कोणत्या गोष्टी मिळतील आणि कोणत्या नाही याचा काहीच अंदाज मला तर नव्हताच पण अगदी गविंनाही नव्हता. मग पार साखर-मीठ, तेल, जिरं, मोहरी, हळद-तिखट यापासून ते डाळ-तांदूळ आणि भाज्या इ. इ. सर्व बरोबरच घेऊन प्रस्थान करावं लागलं. त्या सगळ्या वाणसामानाची भली थोरली पिशवी घेऊन शनिवार दुपारच्या गर्दीने ओथंबणार्‍या ट्रेनमध्ये मी आणि विमेंनी स्वतःला झोकून दिलं आणि मार्गक्रमणा सुरू केली. माझ्याकडच्या पिशवीमधलं सामान बघून कित्येकांच्या चेहर्‍यावर किराणामाल आणि भाज्यांचे व्यापारी वाटणारे हे दोघे लगेज् डब्यातून का प्रवास करत नाही आहेत असा प्रश्न स्पष्ट दिसत होता पण माझ्या मूर्तीमंत खूख्वार चेहर्‍याकडे आणि विमेंच्या जन्मजात सोफिस्टिकेटेड नि जंटलमन चेहर्‍याकडे बघून कुणी तो प्रश्न प्रकट विचारायचं धाडस केलं नाही.

थोड्याच वेळात श्रीस्थानक अर्थात ठाणे आल्यावर लोकांच्या गर्दीने आम्हा दोघांनाही हळूवारपणे खाली उतरवलं. श्रीस्थानकाच्या पूर्वेला गविंनी आम्हाला 'उचलून' (मग? अख्खं विमान स्वतःसह उडवू शकणार्‍या प्रतिहनुमानच जणू अशा गविंना आम्हा पामरांना उचलायला काय ते औघड?) आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांच्या वाहनातून आमची तिघांची त्या जागेकडे मार्गक्रमणा सुरू झाली. गविसुद्धा माझ्याइतकेच तयारीने आले होते, कांकणभर जास्तच! त्यांच्या गाडीची मागची बाजू पुन्हा एकदा वाणसामान आणि भाज्यांनी भरलेली होती. तेलापासून कांदे-बटाटे, मिरच्या-कोथिंबीरीच्या मसाल्यापर्यंत त्यांनी बरोबर घेतलं होतं आणि त्याबरोबरच कमी पडू नयेत म्हणून तीन - चार भांडी, सुरी, चमचे, प्लेट्स असा बहुतेक आवश्यक तो संपूर्ण संसार बरोबर घेतला होता. अगदी भांडी घासायचा साबण आणि स्क्रबदेखिल त्यांनी बरोबर घेतलेला. पाण्याच्या व्यवस्थेची तिथली माहिती नसल्याने ५ लिटर पिण्याचं पाणीही त्यांनी बरोबर घेतलेलं. यामुळे मागची सीट जवळ जवळ भरूनच गेलेली. मग मी थोडं बुलींग करून विमेंना तिथेच अ‍ॅडजेस्ट करायला लावून बसवलं आणि स्वतः गविंच्या शेजारी पुढे आरामात बसलो. (आपले विमे खूप को-ऑपरेटिव्हही आहेत बरं का!)

वेगाने आम्ही आमच्या इच्छित स्थळी निघालो खरे पण हाय रे कर्मा, एरवी १०-१२ मिनिटात संपणार्‍या हाय-वेने वाहतुक मुरंब्यामुळे तब्बल दीड तास घेतला. त्यानंतर विमेकाकांना भूक लागल्यामुळे रस्त्यात एका ठिकाणी ढाबे वजा हॉटेलात न्याहरी करून घेतली. सिंगचाचांच्या छपराखाली आल्यामुळे विमेकाकांनी छोले-भटुर्‍यांना उपकृत केलं. पण गविंनी आपला दाक्षिणात्य बाणा दाखवून डोसा प्रकाराचा आनंद घेतला. अस्मादिकांची एकादशी असल्याने मला केवळ प्लेटभर फिंगरचिप्स आणि अर्ध्या लीटरभर पंजाबी लस्सीतच भागवावं लागलं.

अशाप्रकारे भरल्या पोटाने आम्ही साधारण तीनच्या सुमारास आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. सदर स्थळ हे बर्‍यापैकी आतल्या भागात स्थित असलेल्या एका गावात, गावठाणाच्या टोकाशी असलेलं, सध्या वापरात नसलेलं गविंचं एक घरकुल होतं. मग गेल्या गेल्या गविंनी साग्रसंगीत स्थळदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. आम्हीही नवीन जागा असल्याने आजूबाजूचं छान आलोकन केलं. गविंनी शोधलेली जागाही भन्नाट होती. आजूबाजूला चिटपाखरूदेखिल नव्हतं पण निरनिराळ्या झाडं-वेली-झुडपांनी ती वेढलेली होती. दूरवरून कुठून तरी रेल्वे-इंजिनाची शिट्टी अधून मधून ऐकू येत होती. (हो, जवळपास कुठे तरी रेल्वेट्रॅक होता, नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुक निकालांचा रेल्वे-इंजिनाच्या शिट्टीशी काही संबंध नव्हता याची चाणाक्ष मिपाकरांनी नोंद घ्यावी.) तिथे आम्ही आमच्या पथारी पसरायचं ठरवलं पण विमेंनी तेवढ्यातच आम्हाला थांबवलं.

काय आहे की आम्हा तिघांपैकी विमें कामाला एकदम वाघ माणूस बघा! शेवटी तरूण, सळसळतं 'बॅचलरी' रक्त आहे त्यांचं! उत्साहात त्यांनी जागेच्या साफसफाईचा धडक कार्यक्रम हाती घेतला आणि तो फटाफट तडीस नेला. आम्ही (पक्षी: मी आणि गवि) मात्र विमेंच्या खंबीर हाताला हात लाऊन मम तेवढं म्हणून घेतलं. विमेंचा हात (नि हातातला झाडू) फिरल्याबरोबर जागेचा कायापालट झाला आणि ती जागा रात्रीच्या मुक्कामासाठी एकदम तैय्यार झाली. अशा तैय्यार जागीच मग विमेंनी आम्हाला पथारी पसरू दिल्या.

आता प्रश्न स्वयंपाकाचा होता. दिवस कलू लागलेला आणि थोड्याच वेळात अंधार पडणार होता. त्याआधीच पाकसिद्धी करून घेणं अगत्याचं होतं म्हणून मग आम्ही त्यामागे लागलो. आम्ही म्हणजे मीच. इतर कोण? मीच का? तर आता उपास होता माझा, त्यामुळे उपासाची व्यंजनं बनवण्याची जबाबदारी माझी होती. अन्यथा मला अंगठा दाखवत उपवासाला न चालणारे चमचमीत पदार्थ बनवले जाण्याची आणि ते माझ्यासमोर मिटक्या मारत गवि नि विमेंनी खाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मी ते नक्कीच होऊ देणं शक्यच नव्हतं.

स्वयंपाक सुरू करण्यापूर्वीही काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था करणं आवश्यक होतं. गविंच्या घरातला गॅस वर्षभर बंदच होता. शेगडी, गॅसची टाकी आणि दोहोंना जोडणारा पाईप यांचा एकमेकांबरोबर योग्य संपर्क साधून दिल्यावर आणि शेगडीचे तारेच्या ब्रशने आंजारून गोंजारून थोडे लाड करताच स्वयंपाकसिद्धीचा प्राण-सखा, तो अग्नि-नारायण आमच्यावर प्रसन्न झाला.

अर्थात शनिवारी रात्रीच्या मेन्युचा विचार* मी आधीच करून ठेवलेला. मग काय, समस्त मिपाकर पाकृस्पेशालिस्ट ताई-माईंना दंडवत नमन करून, घेतलं गुरूवर्य गणपाभाऊंचं नाव आणि पाकसिद्धीस तयार झालो.

मी आणलेल्या शिधा नि वाणसामानामध्ये पुढील जिन्नस होते -

१. भिजवलेला साबुदाणा - ५०० ग्रॅम

२. दाण्याचं कूट - १०० ग्रॅम

३. हिरव्या मिरच्या - २ (मध्यम आकाराच्या)

४. जिरं - २ चहाचे चमचे

५. मीठ - चवीनुसार

६. साखर - आवडीनुसार

७. (घराबाहेर करत असल्याने) शेंगदाण्याचं तेल - पाच चमचे

आता विचार केला की खिचडी बनवावी. साबुदाण्याची खिचडी आवडतेच सगळ्यांना! गवि नि विमेसुद्धा याला अपवाद नसतील. मग मी खिचडीसाठी पुढील प्रमाणे कृती केली -

एका भांड्यात भिजवलेला सगळा साबुदाणा घेतला. त्यात सगळं दाण्याचं कूट घातलं. त्यातच चवीनुसार मीठ आणि साखर टाकली. सर्व जिन्नस त्या भांड्यातच एकत्र करून घेतले. हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात कापून घेतल्या.

स्वच्छ कढई गॅसवर चढवली. त्यात शेंगदाण्याचं तेल सोडलं. खालच्या गॅसच्या मध्यम ज्योतीमुळे तेल तापल्यावर त्यात जिरं आणि मिरच्या सोडून फोडणी बनवली. पाठोपाठ त्यात आधी भांड्यात तयार केलेलं मिश्रण टाकून व्यवस्थित परतून घेतलं. आवश्यक तेवढं झार्‍याने वर-खाली करून घेतलं आणि जसे मिश्रणातले साबुदाणे पांढर्‍या रंगावरून पारदर्शकतेकडे झुकले, ती साबुदाण्याची खिचडी बनल्याची खूण मानून गॅस बंद केला.

ती खिचडी अशी दिसत होती.
सडाफटिंग पाकसिद्धी क्र. १ - साबुदाण्याची खिचडी

माझे गुरूवर्य बल्लवाचार्य गणपाभाऊ आणि समस्त मिपाकर पाकृस्पेशालिस्ट माता-भगिनींच्या कृपाशीर्वादाने माझं ५०% काम झालेलं. पण अजून ५०% बाकी होतं. एव्हाना विमेंच्या पोटात बहुदा कावळे कोकलू लागलेले पण काय करणार आणखी थोडा वेळ त्यांना थांबावंच लागणार होतं.

पोटातल्या कावळ्यांशी तडजोड करतानाच्या भावमुद्रेत विमे

मग पुन्हा गुरूवर्यांना मनोमन नमन करून मी माझा मोर्चा माझ्या त्या दिवशीच्या पुढल्या व्यंजनाकडे वळवला. आता माझ्या समोर जिन्नस होते -

१. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कूकरमध्ये २-३ शिट्ट्या देऊन चिंचेच्या कोळात उकडवलेले शेंगदाणे - २५० ग्रॅम

२. उकडलेले बटाटे - ३ (छोट्या आकाराचे)

३. उकडलेली (कच्ची) केळी - २

४. जिरं - ३ चहाचे चमचे

५. शेंगदाण्याचं कूट - २ चहाचे चमचे

६. गूळ - चवीनुसार

७. हिरव्या मिरच्या - ३ (मध्यम आकाराच्या)

८. शेंगदाण्याचं तेल - आठ चमचे

यांचा वापर करून मी शेंगदाण्याची उसळ बनवण्याचा घाट घातलेला होता. मी केलेली कृती अशी -

जिर्‍याच्या फोडणीत उकडलेले शेंगदाणे परतले जात असताना

पुन्हा (दुसरी) स्वच्छ कढई गॅसवर चढवली आणि त्यात शेंगदाण्याचं तेल सोडलं. खालच्या मध्यम काकड्यामुळे तेल तापल्यावर मी आधी सारखंच यात जिरं - मिरचीची फोडणी बनवली. मग त्यात सगळे शेंगदाणे टाकले आणि व्यवस्थित परतून घेतले.

उकडलेले बटाटे नि केळी टाकताना

शेंगदाणे, बटाटे नि केळी फोडणीत व्यवस्थित परतताना

मागोमाग त्यात उकडलेली केळी आणि बटाटे, छोटे छोटे तुकडे करून सोडले (या बटाट्याच्या नि केळ्यांच्या चिरण्यात विमेंनी सहर्ष हातभार लावला होता, मुलगा गृहकृत्यदक्ष आहे हो!) आणि ते ही शेंगदाण्याबरोबर पुन्हा परतले. मिश्रण व्यवस्थित परतलं गेलंय हे पाहिल्यावर त्यात जवळचं पिण्याचं स्वच्छ पाणी टाकलं, (साधारण आपल्याला उसळीत किती रस्सा हवाय या अंदाजाने पाण्याचं प्रमाण ठरवलं जावं.)

उसळीचा रस्सा बनवण्यासाठी त्यात पाणी घालताना

आता हे सगळं मिश्रण गॅसच्या मोठ्या ज्योतीवर रटरटवत ठेवलं. मिश्रणाला चांगली उकळी फुटून त्यातलं पाणी थोडसं आटल्यासारखं वाटल्याबरोबर त्यात दाण्याचं कूट टाकून चवीनुसार गूळ चिरून घातला. आणखी थोडा वेळ हे मिश्रण रटरटू दिलं आणि पुरेसा रस्सा उरल्यानंतर खालची ज्योत विझवली.

उसळीत गूळ चिरून टाकताना

आता पाकसिद्धी पूर्ण झाली होती. माझ्याकडच्या पोतडीतून मी उपवासाचा बटाट्याचा चिवडा आणि बटाट्याच्या सळ्या काढल्या. एका प्लेटमध्ये खिचडी, तिच्यावर शेंगदाण्याची आमटी घेऊन त्यांच्यावर बटाट्याचा चिवडा आणि बटाट्याच्या सळ्या भुरभुरवल्या आणि गवि नि विमेंना पेश केली 'प्रास'मेड 'फराळी मिसळ'.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. २ - शेंगदाण्याची उसळ आणि क्र. १ नि क्र. २ यांच्यापासून बनलेली पाकसिद्धी क्र. ३ - फराळी मिसळ

चवीला फराळी मिसळ कशी होती ते गवि आणि विमे जातीने सांगतीलच पण मला स्वतःला बल्लवाचार्यांच्या कृपेने सुयश लाभलं असंच मी मानतो. मिसळीची चव मला आवडली आणि मी तर बुवा ती भरपूर चापली. कारण दुप्पट खाल्ल्याशिवाय माझी एकादशी साजरीच होऊ शकली नसती.

साधारण साडे नवाच्या सुमारास आमचे खाऊन झाल्यावर पुन्हा विमेंनी उत्साहाने भांडी-प्रक्षालनाची मोहिम हाती घेऊन ती तडिस नेली आणि वरची ओळ पुन्हा सार्थ केली. यानंतर आपापल्या गिर्द्यांवर स्थानापन्न होऊन गप्पांना ऊत आला. भरल्या पोटाने विविध विषयांवर कडकडीत चर्चा घडल्या. अर्थात मिपावरच्या जुन्या कहाण्यांची उजळणी होऊन अनेक आयड्यांच्या कुंडल्या मांडल्या गेल्या. मला खात्री आहे की अनेक मिपाकरांना शनिवारी रात्री वारंवार ठसक्याच्या उबळींचा त्रास झाला असणार. माफ करा मित्रांनो, त्याला आम्हीच कारण होतो.

साधारण बाराच्या सुमारास बोलताबोलता अचानक विमे आम्हाला सोडून निद्रादेवीच्या कुशीत टपकले. त्यानंतर गवि आणि मी साधारण साडे तीनापर्यंत लढत होतो. आमच्या विषयांना काही धरबंध नव्हता. संगीत, चित्रपट, टिव्ही, वैद्यक, जंगल भ्रमण, गोवा, कोकण यादी भरपूर वाढू शकेल. सरते शेवटी उद्या परतीच्या प्रवासासाठी ताजंतवानं राहण्यासाठी थोडीशी का होईना झोप घेणं आवश्यक आहे असं वाटून त्या निर्मनुष्य स्थानी दूर वरून येणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वे-गाड्यांचे आवाज ऐकत आम्हीदेखिल अखेर निद्राधीन झालो.

क्रमशः
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

* खाण्याचा विषय निघाला की माझा मेंदू काँप्युटरपेक्षाही जोरात चालू लागतो - सौजन्य: चाचा चौधरी

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

21 Feb 2012 - 12:58 pm | कवितानागेश

कोथिंबीर राहिली! :)

--आगाउ माउ

प्यारे१'s picture

21 Feb 2012 - 1:02 pm | प्यारे१

एकादशीचा मुहुर्त साधून कट्टा?
देवा, हे मिपाकर कधी काय करतील ना!
खिचडी वृत्तांत छानच हो पण......!

बाकी, खादाडी वृत्तांत क्रमशः येईल असं स्वप्नातही नव्हतं वाटलं हो!

प्रचेतस's picture

21 Feb 2012 - 1:04 pm | प्रचेतस

मस्त वृत्तांत प्रासभौ.
साबुदाण्याची खिचडी हा आमचाही जीव की प्राण.
शेंगदाण्याची उसळ हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. शेंगदाणा कुटाही आमटी कित्येकदा घरी बनवली जाते पण हा प्रकार करून पाहायलाच हवा.

गवि's picture

21 Feb 2012 - 1:13 pm | गवि

आला का वृत्तांत.. वा वा..

अन्यथा मला अंगठा दाखवत उपवासाला न चालणारे चमचमीत पदार्थ बनवले जाण्याची आणि ते माझ्यासमोर मिटक्या मारत गवि नि विमेंनी खाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मी ते नक्कीच होऊ देणं शक्यच नव्हतं.

हो तर.. तुम्ही एकदोन सुरमई आणि कोंबड्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

एव्हाना विमेंच्या पोटात बहुदा कावळे कोकलू लागलेले..

फक्त विमेच्या? आणि माझ्या पोटातल्या कावळ्यांना विसरलास होय दुष्ट मनुष्या..?

बाकी मिसळीच्या टेस्टविषयी.

मिसळ फक्कड होती रे प्रासा..

ठाण्याच्या गोखले उपाहारगृहात किंवा पनवेलच्या "राहुल" मधल्याइतकी उत्तम.. किंवा काकणभर सरसच.

जबरदस्त मजा आली.. बाकी प्रतिक्रिया यथावकाश.. आणि उत्तरार्ध आल्यावरही..

मी पहिल्या दिवशी केलेल्या खालील कामांचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध.

१. स्वयंपाककर्त्याला प्रोत्साहनपर शब्द वापरुन आणि सतत बोलून नैतिक बळ देणे.
२. विमेंच्या कामाचे कौतुक करणे.
३. साबुदाणा खिचडीवर बटाटा चिवडा, सळ्या इ चे थर लावून त्यावर प्रासभाऊची शेंगदाणे उसळ ओतून मिसळ तयार करणे आणि
४. ती खाणे..

इत्यादि अत्यावश्यक कामांच्या स्वरुपात माझा सहभाग होता.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2012 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा

४. ती खाणे.. >>>

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Mar 2012 - 9:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हो तर.. तुम्ही एकदोन सुरमई आणि कोंबड्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

अगदी अगदी. मी तर १-२ कोंबड्या फस्त करायचा बेत केला होता. पण प्रास भाऊंनी सफाईदार पाने सूत्रे हातात घेऊन फराळी मिसळीचा बेत पुढे केला. काय झाली होती ती मिसळ... झकास !!! त्यामुळे कोंबडी न मिळाल्याचे दुख: अजिबात नाही झाले. एकतर मी फराळी मिसळ हा प्रकारच कधी खाल्ला नव्हता. बरीचशी संपवली आम्ही.

विमेंच्या कामाचे कौतुक करणे.

हीहीही. कौतुकाबद्दल आभार. पण काम कुठले केले मी ? सगळी कामे तुम्हीच तर केलीत. खरेदीपासून ते जेवण बनवणे, वाहन सारथ्य करणे, हॉटेलात पैसे देणे, इ इ कामे तुम्ही दोघांनीच तर केलीत. मी आपला आरामात जाऊन राहून खाऊन परत आलो. नाही म्हणायला थोडीशी साफ सफाई केली म्हणा. पण त्यात काय आहे ?? बाय द वे, ती गच्ची साफ केली मी १५ मिनिटे खर्च करून पण ती वापरलीच नाही आपण :-(

असो, उर्वरित प्रतिसाद दुसऱ्या भागाला....

ताक. :- हापिसात सायबाचे मन आमच्यावर (म्हणजे आमच्या कामावर) फारच जडल्याने धागा आला तेव्हा प्रतिसाद देता आला नव्हता. म्हणून आता उशिराने देत आहे.

- हापिसात सायबाचे मन आमच्यावर (म्हणजे आमच्या कामावर) फारच जडल्याने

कंस, विमे, कंस टाकत जा असाच..!!!! ;-)
नाहीतर वाटलं असतं काय करतोय ह्या विमेला त्याचा साह्यब ;-)

अन्या दातार's picture

21 Feb 2012 - 1:16 pm | अन्या दातार

काय काय करत असता ब्वा तुम्ही. झकास झालेलं दिसतंय एकंदरीतच.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2012 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा

@पण माझ्या मूर्तीमंत खूख्वार चेहर्‍याकडे >>>
सॉलिड लिवलय हो प्रास भाऊ,बाकी हा कट्टा खरच आगळा/वेगळा झाला म्हणायचा,तुमची पदार्थ बनवण्याची सिद्धी-पाक आहे हो अगदी...मजा केलीत म्हणायची,आणी जेवढा आनंद ह्या अश्या खाण्यात आहे,त्याहुनही अधिक अश्या शांत ठिकाणी जाण्यात आहे,हे मात्र पटले :-)

>>>>>खाण्याचा विषय निघाला की माझा मेंदू काँप्युटरपेक्षाही जोरात चालू लागतो - सौजन्य: चाचा चौधरी

---- ----- गवि आणि विमे यांनी प्रास यांना सतत काहीतरी खाऊ घालावे आणि असे सडाफटिंग लेखन वारंवार करुन घ्‍यावे..
मझा आया..
वाचायलाच एवढी मजा वाटली तर तिथे किती मजा आली असेल त्याची कल्पना करुन इनो घेतल्या गेले आहे..

सुहास झेले's picture

21 Feb 2012 - 2:55 pm | सुहास झेले

अगदी अगदी..... :) :)

पियुशा's picture

21 Feb 2012 - 2:09 pm | पियुशा

अरे व्वा !
सडाफटिंग जबराच !
पा.क्रु. विभागात स्वागत आहे :)

५० फक्त's picture

21 Feb 2012 - 2:36 pm | ५० फक्त

लई भारी आयड्या आहे ही, अजुन काय काय मजा केली हे पुढच्या भागात वाचुन स वि अस्तर प्रतिसाद दिला जाईल.

नगरीनिरंजन's picture

21 Feb 2012 - 2:47 pm | नगरीनिरंजन

(उपवासाची का असेना) मिसळ, इष्टमित्रांची संगत, निवांत जागा आणि पोटभर गप्पा! भारी कॉम्बिनेशन आहे.
इनो घेतले आहे.

मी कस्तुरी's picture

21 Feb 2012 - 3:19 pm | मी कस्तुरी

सह्ही झालीय खिचडी आणि मिसळ :-)

विमे आणि प्रासदादा यांचे एकमेकां साह्य करु :

स्मिता.'s picture

21 Feb 2012 - 4:21 pm | स्मिता.

फराळी मिसळ बघून तोंडाला पाणी सुटलं. मिपावरच्या आणखी एका बल्लवाची ओळख समोर आली म्हणायची.
मस्त लिहिलंय, पुढचा भागही लवकर लिहा.

आत्मशून्य's picture

21 Feb 2012 - 4:43 pm | आत्मशून्य

हा हा हा. मस्त.

प्रास भाउ मुख्य लाइन टाकायची राहीली की... मिपाकर्स डु नॉट कुक एनी डिफ्रंट थिंग्स, दे जस कुक डिफ्रंटली.

सानिकास्वप्निल's picture

21 Feb 2012 - 4:37 pm | सानिकास्वप्निल

फक्कड जमून आलीये मिसळ :)
पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत

नि३सोलपुरकर's picture

21 Feb 2012 - 4:58 pm | नि३सोलपुरकर

प्रास भाउ..
इष्टमित्रांची संगत, निवांत जागा आणि पोटभर गप्पा ....याला तोड नाही.
@नगरीनिरंजन :- १०० % सहमत.

स्वातीविशु's picture

21 Feb 2012 - 5:09 pm | स्वातीविशु

फोटो दिसत नाहीत. :(

वपाडाव's picture

21 Feb 2012 - 6:21 pm | वपाडाव

मग आमच्या परममित्राला नक्कीच भेटा...
इथे = http://www.misalpav.com/user/930
*ओ माय फ्रेंड गणेशा, तु रहेना साथ हमेशा*

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2012 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

*ओ माय फ्रेंड गणेशा, तु रहेना साथ हमेशा*>>>

किसन शिंदे's picture

21 Feb 2012 - 5:15 pm | किसन शिंदे

प्रासभौ, तुमच्या फराळी मिसळीची पाककृती पाहून आम्हाला ठाण्यातल्या गोखले उपहार गृहातल्या उपवासाच्या मिसळीची आठवण झाली. :)

मी-सौरभ's picture

21 Feb 2012 - 5:49 pm | मी-सौरभ

या तुमच्या घरी एकदा आता गटारी स्पेशल कट्टा जमवा मग बगा आमी किती काम करतो ;)

मोदक's picture

21 Feb 2012 - 6:06 pm | मोदक

भारी वृतांत

वपाडाव's picture

21 Feb 2012 - 6:22 pm | वपाडाव

लैच कातिल की...

पैसा's picture

21 Feb 2012 - 7:24 pm | पैसा

आता हे तुमचं पाककौशल्य आम्हाला कधी प्रत्यक्ष बघायला मिळेल असा विचार करतेय!

रेवती's picture

21 Feb 2012 - 8:40 pm | रेवती

भारी वृत्तांत आणि सडाफटिंगगिरी.
फोटुंमुळे समजले की खिचडीत दाण्याचे कूट कमी पडले होते.;)
मला मिसळ न मिळाल्याने जळजळ व्यक्त करून झाली आहे.
क्रमश: आवडले, म्हणजे तसेच असायला हवे होते.
नाहीतर इतकं वाणसामान नेऊन त्याचं काय करणार हा प्रश्न पडला होता.
विमेंचे नाव नोंदवून घेण्यात आलेले आहे.

गवि's picture

21 Feb 2012 - 9:32 pm | गवि

प्रासचेही नोंदवा ....

रेवती's picture

21 Feb 2012 - 11:55 pm | रेवती

अच्छा! हे माहित नव्हतं. त्यांचंही नाव नोंदवण्यात आल्या गेले आहे.;)

हंस's picture

21 Feb 2012 - 9:29 pm | हंस

अगदी भन्नाट कट्टा झालेला दिसतोय. बाकी विमेंचा फोटो बघुन एसटी किंवा पीमटीच्या मागे असणार्‍या जाहिरातीची आठवण झाली :)............."वाट पाहीन पण फराळी मिसळच खाइन" ;)

जोशी 'ले''s picture

22 Feb 2012 - 8:03 am | जोशी 'ले'

लय भारी हो प्रास, जाम मजा केलीय मिपाकर त्रिदेवांनी...लिखानाची खास-प्रास ईष्टाइल आवडली गेली आहे, अजुन येउ द्या.

बाकी गविंचा एक ही फटु नसल्यामुळे त्यांच्या उपस्थिती बद्दल शंका घ्यायला वाव आहे. (त्यांच्या घरकुलात कट्टा झाला असला तरी आम्ही शंका घेणार).... आणि हो, कोणी चाणाक्ष पणे म्हणेल की प्रास आणि विमेंचा फटु गविं नीच काढलाय पण कॅमे-यातलं 'टायमर' हे तंत्रज्ञान आम्हाला ठाऊक असल्याने असली बिनबुडाची विधानं आम्ही कदापी सहन करणार नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

16 Mar 2012 - 11:17 pm | अविनाशकुलकर्णी

वा भाऊ....मजा आली वाच्ताना...मस्त मस्त..
कधि मधी आम्हालाहि बोलवा..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Mar 2012 - 12:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही या की हॉटेल कट्ट्यांना.. मग हळूहळू अशा प्रायवेट कट्ट्यांना पण जाता येईल :-)
आधी पहिलीत मग इयत्ता वाढत गेल्या की काही काळाने पाचवीत

(पाचवीतला) विमे