परवाच कुठेतरी वर्तमानपत्रात उंबर्डी गावाचा उल्लेख वाचला आणी ३ वर्षांपूर्वी केलेल्या आमच्या कुर्डूगड - देवघाट ते कावळ्याघाट - रायगड ट्रेकची आठवणी जाग्या झाल्या. त्याचा हा संक्षीप्त फोटो वृत्तांत -
झाले असेकी आमचा ग्रुप गेली काही वर्षे दर डिसेंबरमध्ये मेगाट्रेक किंवा क्रॉसकंट्री ट्रेक प्लान करतो त्याप्रमाणे २००८ च्या डिसेंबरमध्ये आम्ही कुर्डूगड - देवघाट - कोकणदिवा - कावळ्याघाट - रायगड असा २ दिवसांचा ट्रेक ठरवला होता. आम्ही एकंदर १२ जण जाणार होतो त्याप्रमाणे एस्टीचे आरक्षणही झालेले होते पण नेमके त्या दिवशी उंबर्डी गावामध्ये कुणाचेतरी लग्न होते त्यामुळे आरक्षण असूनही आम्हाला भांडुनच जागा मिळवावी लागली.
सकाळी जेव्हा जिते गावात उतरलो तेव्हा मिट्ट काळोख होता... आम्ही गावातल्याच हनुमान मंदीरात थांबून पुढे जायचे ठरवले. थोडेसे उजाडल्यावर जितेगावातून कुर्डूगडाच्या दिशेने निघालो.
कुर्डूगडाच्या दिशेने
पहिला टप्पा चढून आल्यानंतर समोर दिसणार डोंगर. ह्या डोंगराच्या पाठीमागे जिते गाव आहे.
पहिला टप्पा चढून आल्यावर समोर दिसणारा कुर्डूगड.
कुर्डूगडाच्या पायथ्याशी कुर्डूपेठ वस्ती आहे आणी किल्ल्यावर जायला पेठेतूनच वाट आहे. कुर्डूगड हा छोटासा किल्ला शिवकाळात बाजी पासलकरांच्या अखत्यारीत होता आणी त्यांच्या वतनाचे ठाणेही ह्याच किल्ल्यावर होते. कुर्डूपेठ गावातून किल्ला अगदीच जवळ आहे आणी किल्ल्यावर जायला साधारण पाऊणतास पुरेसा आहे.
कुर्डूपेठ वस्ती
कुर्डूपेठेतून किल्ला
किल्ल्याचा भग्न दरवाजा
किल्ल्यावरून दिसणारी पेठवाडी आणी खालच्या भागात दिसणारे कौलारु मल्लिकार्जुन मंदिर. ह्याच मंदिराच्या डावीकडून जाणारा रस्ता पुढे देवघाटाला जाऊन मिळतो.
कुर्डूपेठ गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट. समोर जे मल्लिकार्जुन मंदिर दिसतेय त्याच्या डाव्याबाजूने जाणारी वाट पुढे देव घाटाला जाऊन मिळते.
आता देवघाटाविषयी थोडेसे -
पूर्वापार घाट आणी कोकण यांना जोडणारे जे प्राचीन व्यापारी मार्ग होते त्यापैकी एक असणारा हा एक घाट. पेठ किल्ल्याच्या संरक्षणाखाली असलेला हा घाट कोकणातील उंबर्डी आणी देशावरील धाम्हणव्हाळ गावांना जोडतो त्यामुळे ह्याला उंबर्डीघाट किंवा लिंग्या घाट असेही एक नाव आहे. प्राचीन घाट परंपरेतला हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने ह्याघाटाला आणी साहिजीकच पेठ किल्ल्याला पूर्वी खूप महत्त्व असावे.
पेठ किल्ल्यावरून दिसणारा उंबर्डीघाटाचा मार्ग. प्रचंड खोल दरी, अत्यंत घनदाट जंगल, निर्मनुष्य वाटा
आम्ही पेठचा किल्ला करून साधारण १० वाजता देवघाटाकडे निघालो. गावातल्या लोकांकडून साधारण वाटेची माहिती घेतली होती. हे आवश्यकच होते कारण एकदा वस्ती सोडली की धाम्हणव्हाळ पर्यंत कुठेही वस्ती नाही. दुपारी १ वाजता आम्ही धाम्हणव्हाळला पोचलो आणी तेथेच एका मंदिरात दुपारचे जेवण केले. धाम्हणव्हाळला शिवकालातील २ सुंदर शंकराची मन्दिरे आहेत त्यापैकी आम्ही एक बघीतले पण वेळेअभावी दुसरे पाहता आले नाही. इथून आमचा पुढचा टप्पा होता घोळ गाव.
माझ्या माहितीनुसार धाम्हणव्हाळ ते घोळ गाव अंतर २ तासाचे होते पण गावात चौकशी केल्यावर ते ५-६ तासांचे आहे असे समजले तेव्हा आमचा धीर सुटला कारण आम्ही अशा ठिकाणी होतो की एकतर पुढे घोळ गावापर्यंत जायचे किंवा आलो तसे परत फिरायचे. कारण धाम्हणव्हाळहून वाहन पकडायचे म्हणजेसुद्धा २ तासाची पायपीट करुन ताम्हिणी घाटात यायचे किंवा तशीच २ तासांची पायपीट करुन पानशेतची एस्टी पकडायला जायचे. (काही दिवसांनी किंवा आत्तासुद्धा हे बदलले असेल कारण आम्ही गेलो तेव्हा लवासाच्या प्रोजेक्टचे काम धाम्हनव्हाळ गावापर्यंत आलेले होते). आमच्यातले अर्धेजण परत जाऊया म्हणत होते पण माझे मन काही आलो त्याच वाटेने जायला तयार नव्हते. शेवटी हो नाही करत दुपारी २.३० ला आम्ही घोळ गावासाठी जायला निघालो.
लवासा प्रोजेक्ट
धाम्हणव्हाळ ते घोळ रस्ता संपूर्णपणे निर्मनुष्य आणी सह्याद्रीच्या माथ्यावरुन आहे. एक छोटीशी पायवाट सोडली तर दुसरी वाट नाही मला वाटते ह्या वाटेचा भटके लोक कमी वापर करत असावेत. प्रचंड दमेलेले असूनही आम्ही फक्त चालत होतो पण योग्य रस्त्यावर आहोत की भलतीकडेच चाललोय याचा काहीही अन्दाज नव्हता आजूबाजूला फक्त घनदाट जंगल आणी मध्येच दिसणार्या दोन्ही बाजूच्या खोल दर्या. अंदाजे २ तास चालल्यानंतर एक खिंड (रेडे खिंड) लागली व त्यानंतर एक छोटेसे घर लागले. हा धनगरवाडा दिसल्यानंतर आमचा जीवात जीव आला.
रेडे खिंड
ह्या धनगरवाड्यापासूनही १.५ तास चालावे लागते तेव्हा दापसर गाव येते. ह्या दापसर गावापर्यंत पानशेतहून एस्टीचा रस्ता आलेला आहे. दापसर गाव येईपर्यंत आमच्या मध्ये काहीही त्राण शिल्लक नव्हते. आम्ही दापसर गावामध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर घोळच्या वाटेची चौकशी केली आणी उरलेसुरले त्राण पण संपले कारण दापसर गावातून घोळ अजूण १.५ तास होते. अगोदरच अंधार पडला होता आणी घोळ कुठल्या दिशेला आहे ह्याचाही एक घोळच होता. त्यावेळेला दापसर ते घोळ रस्त्याचे काम चालू होते (आता स्वारगेटवरून घोळला डायरेक्ट गाडी जाते) आणी जणू देवच धावून यावा तसा बांधकाम खात्याच्या मुख्य इंजीनियरने एका डंपरची व्यवस्था केली जो आम्हाला दापसर ते घोळ वाटेच्या खिंडीत सोडणार होता कारण कच्चा रस्ता तिथपर्यंत झालेला होता. डंपरने आम्हाला खिंडीत आणून सोडले आणी तो परत गेला. खिंडीत प्रचंड अंधार आणी रस्ताच्या कामासाठी डोंगर फोडून सुरुंग लावल्याने मोठमोठे दगड पडले होते. खिंडीच्या पलीकडे गेल्यावर आमची अवस्था अगदीच कठीण झाली. आगीतून फुफाट्यात...घोळ कुठे ते माहित नाही, परत जायचे म्हणजे दापसरपर्यंत १ तास उतरायचे आणी तिथेच रात्र काढायची म्हणजे मोठमोठ्या दगडांमुळे जागा नाही :( . शेवटी मनाचा हिय्या करून खिंडीतून पलीकडे उतरलो आणी पायवाटेने अंदाजे बॅटरीच्या प्रकाशात घोळ गावाकडे निघालो. नशीब आमचे की ही एकाच पायवाट होती. शेवटी असे ठरवले की ही जी पायवाट आहे त्यानेच चालत राहायचे. म्हटले कुठेना कुठे कुठल्यातरी गावात जाईलच की...शेवटी थकून भागून १ तास उतरल्यानंतर जेव्हा गावातली कुत्री भुंकण्याचा आवाज आला तेव्हा हायसे वाटले. गावात मिट्ट काळोख होता. गाव अगोदरच झोपी गेले होते. गावात शिरल्या शिरल्या दिसलेल्या शाळेत सॅक टाकल्या आणी समोरच्या घरातल्यांना उठवून विचारले की हे कुठले गाव आहे. त्यांच्या तोंडून घोळ ऐकल्यानंतर जीव भांड्यात पडला म्हणजे कसे वाटत असावे ते समजले. त्यांच्याकडूनच शाळेची किल्ली आणी जेवण बनवण्यासाठी लाकडे घेतली व जेवण बनवायला घेतले.
एवढे दमलो होतो की कसेबसे जेवण बनवले, जेवलो नि स्लीपिंग बॅग मध्ये शिरतानाच झोप लागली. झोपताना विचार केला की दिवसभरात आपली एकंदर किती चाल झाली तर सकाळी ७ वाजता जिते गावापासून ते रात्री ८ वाजता घोळ गावापर्यंत एकूण १३ तासांचा ट्रेक झाला :) .
सकाळी उठलो तेव्हा मस्त फ्रेश होतो आणी शाळेच्या बाहेर आलो तेव्हा कळले की घोळ गाव कसे वसले आहे.
क्रमश: ......
_________________________________________________
माझा मिसळपाववर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न. चुका असतील त्या आधीच कबूल करतो. थोडा संक्षिप्त वृत्तांत आहे पण हेच टायपतना खूप वेळ लागला.
ह्यातील सर्व फोटो मी काढले आहेत व त्यातील काही माझ्या मोबाईल कॅमेरातून काढले आहेत.
धन्यवाद...
प्रतिक्रिया
22 Jan 2012 - 4:45 pm | मनि२७
तुमचे मिपावर स्वागत !!! :-)
पहिला प्रयत्न असला तरी छान वाटला......
फोटो पण मस्त आहेत....
पुढील लेखनाला भरपूर शुभेच्छा.....
22 Jan 2012 - 4:52 pm | सुहास..
पार्ट एक मध्येच सलाम घातला रे तुला !!!
स्वागत !!
पुढच्या पार्टाची वाट पहातो आहे !! ;)
23 Jan 2012 - 4:29 am | मेघवेडा
तंतोतंत.
पुभाप्र.
22 Jan 2012 - 7:00 pm | प्रचेतस
वृत्तांत झकास झालाय. फोटोपण सुरेख. कुर्डुगड हा लिंग्या घाटवाटेचा टेहळणी दुर्ग आहे. घाटमाथ्यावर विश्रामगड अथवा मानगड आहे.
22 Jan 2012 - 10:45 pm | जाई.
फोटो आणि वृत्तांत छान आहे
22 Jan 2012 - 11:09 pm | वपाडाव
पहिल्याच चेंडुवर षटकार मारलाय आपण..... येउ द्या पुढील भाग.... फटु छान आले आहेत....
23 Jan 2012 - 8:37 am | अन्या दातार
तंतोतंत असेच बोलतो :)
23 Jan 2012 - 9:13 am | प्यारे१
तंतोतंत
23 Jan 2012 - 12:36 am | सुहास झेले
मस्त सुरुवात..... पुढे वाचायला उत्सुक आहे :) :)
23 Jan 2012 - 8:15 am | मराठमोळा
श्रीगणेशा छानच झालाय..
येऊ द्या पुढील भाग लवकर. :)
23 Jan 2012 - 9:44 am | पैसा
पहिलंच लेखन छान झालंय! फोटोही मस्त. पुढचे भाग लौकर येऊ द्या!
23 Jan 2012 - 10:42 am | उदय के'सागर
खुपच छान प्रवास वर्णन! आणि खुपच मस्तं अनुभव, पुढचा भाग लवकर येउ द्या.... वाट पहातोय :)
23 Jan 2012 - 11:45 am | स्वच्छंदी_मनोज
सर्वांचे धन्यवाद...
वल्लीजी... मानगड हा घाटमाथ्यावर नाहीये.. तो कोकणातच आहे आणी कुंभ्या घाटावर टेहळणीसाठी बांधलेला आहे...
लवकरच पुढचा भाग टाकतो...
23 Jan 2012 - 12:39 pm | सागर
फोटोवरुनच या सफरीची कल्पना यावी मनोज,
छान छायाचित्रे टिपली आहेत.
फोटोंना शब्दांची जोड दिल्यामुळे लेख प्रेक्षणीय बरोबरच वाचनीय देखील झाला आहे.
पुढील भागाची वाट पहातो आहे
23 Jan 2012 - 1:04 pm | मृत्युन्जय
मिपावर स्वागत आहे.
नविन आहे म्हणुन काही लिहित नाही असे म्हणणार्या, फालतु लेखांच्या जिलब्या टाकणार्या आणि डोळ्यात खुपणार्या शेकडो शुद्धलेखनाच्या चुका करणार्या लेखामध्ये तुमचा लेख उठुन दिसतो आहे. त्याबद्दल शुभेच्छा. मिपावर नव्याने लिहायला सुरुर करणार्या किंवा तसे भासवणार्या लेखांसाठी हा लेख एक आदर्श नमुना आहे असे वाटते.
बाकी ट्रेक सुंदर, माहिती नेटकी, फोटो छान. पुलेशु.
23 Jan 2012 - 3:38 pm | ५० फक्त
तंतोतंत - हेच म्हणतो. लेखन आणि फोटो पाहुन मस्त वाटलं,
23 Jan 2012 - 4:20 pm | मालोजीराव
सिंगापूर नाळेतून रायगड ,बोचेघोळ नाळेतून रायगड,बोराटा नाळेतून रायगड.....हितून गेलेलो ... मस्त वर्णन...यंदाच्याला व्हायाच पायजे !
कुर्डूगड - देवघाट ते कावळ्याघाट - रायगड आता हे पण काय तरी विनट्रेस्टिंग वाटू ऱ्हायलय !
(अवांतर : ...सेनापती बाजी पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्याचं बांधकाम झाल्याचं सांगण्यात येतं)
-मालोजीराव
24 Jan 2012 - 12:01 am | मोदक
पहिलाच लेख मस्त जमला आहे... आणखी येवूद्यात.
मोदक.
24 Jan 2012 - 10:19 am | मनराव
एकदम मस्त......!!!
24 Jan 2012 - 3:46 pm | गणेशा
अप्रतिम ...
लिखान ट्रेक आवडला.
24 Jan 2012 - 11:49 pm | बज्जु
झकास फोटो आणि वर्णन. पुढील लिखाण व ट्रेकसाठी शुभेच्छा.
25 Jan 2012 - 7:11 am | इन्दुसुता
झकास फोटो आणि वर्णन. पुढील लिखाण व ट्रेकसाठी शुभेच्छा.
अगदी असेच म्हणते.
25 Jan 2012 - 7:27 am | बिपिन कार्यकर्ते
सु रे ख ! ! !