लिपस्टिक - भाग १

विश्वेश's picture
विश्वेश in जनातलं, मनातलं
26 Jul 2011 - 11:04 am

"तू अशी कशी ग वेंधळी ... चल आता लवकर ..." मीना खेकसून अंजूचा हात धरून तिला बाहेर काढत होती. "अगं हो हो पोचू वेळेत ... मला लागतंय ... जरा हळू " ... अंजू हात सोडवत म्हणाली ...
त्यांची ती छोटीशी खोली सकाळी सकाळी मीनाने नेहमीप्रमाणे उदबत्तीच्या सुगंधाने मोहरून टाकली होती ... हे देखील एक कारण होते कि अंजू स्वता जरी लवकर उठली तरी लोळत पडायची मीनाची आंघोळ, युनिफोर्म घालणे, पूजा करणे हे सगळे आटपेपर्यंत. नाहीतरी तिला कुठे लवकर उठून दिवे लावायचे आहेत, तिची तर रात्रपाळी नेहमीचीच. "मी आंघोळ वगैरे करून येऊ कि .." अंजू मुद्दाम केसाचा पसारा करत म्हणाली ... "अगं बये मरूदे तुझी आंघोळ ... तुझी पापं एका आंघोळीने नाही धुतली जाणारेत ... चल आता ७:४१ पकडायची आहे, ती मिळाली कि मग रिक्षेने नेहमीच्या वेळेत पोचेन मी". लगबगीने मीनाने पटापट नेहमीच्या सगळ्या गोष्टी पर्स मध्ये कोंबल्या आणि पुन्हा एकदा मोर्चा अंजू कडे वळवला ... "हो राणी .. हे बघ लगेच निघू मला २ मिनिटे दे" अंजूने घड्याळाकडे बोट दाखवून सांगितले ... घड्याळ नेहमी प्रमाणे १५ मिनिटे पुढे होते आणि ते ७:२० अशी वेळ दाखवत होते. कल्याण च्या गांधी चौकातून स्टेशन ला जायला टांग्याने १० तर रिक्षेने ५ मिनिटे लागतात त्यामुळे मीना थोडी मंदावली. सहज मीनाचे लक्ष खोलीतल्या देव्हार्याकडे गेले ... आणि पुन्हा एकदा तिने डोळे मिटले आणि स्वताशीच काहीतरी पुटपुटु लागली. "चला उशीर होत आहे न तुम्हाला" मीनाची तंद्री अंजूने गदागदा हलवून मोडली. दोघी बाहेर पडल्या, कडी घातली, अंजूने कुलूप घातले आणि शेजारच्या घरात खिडकीतून किल्ली आत टाकली ती समोरच्या पोह्याच्या पातेल्याला जाऊन धडकली ... अंजू बाहेरूनच ओरडली "मावशे, किल्ली टाकली आहे ... दोन तासात येते, पोहे ठेवा रतन शेठ आमच्या करता थोडे आल्यावर खाते" खिडकीपाशी पोहे चिवडत ५ वर्षाचा रतन, शेजारच्या उमा मावशीचे रत्न बसले होते. उमा साळवी हि ह्या दोघींची मानलेली किवा गरजेने झालेली मावशी, आणि त्यांची घर मालकीण. साळवी काका रेल्वे मध्ये आहेत आणि इथे त्याच्या ४ खोल्या आहेत, दोन मध्ये ते स्वता रहातात, एक बंद आहे आणि एका खोलीत मीना आणि अंजू गेली ६ वर्ष रहात आहेत. किल्ली खिडकीतून फेकणे आणि बाहेरूनच निरोपांची देवाण घेवाण हे अगदी सवयीचे आहे सगळ्यांचे.

आज नेहमीच्या रस्त्याने वाड्यातून बाहेर न येता, मीनाने तळ मजल्यावरील जोश्यांचे दार वाजवले आणि दोघी त्यांच्या घरातून पुढे त्यांच्या दुकानात आल्या ... हा त्यांचा घाई असली कि वापयाचा शोर्ट कट होता, नाहीतर वाड्याचे मुख्य दार मागच्या बाजूला होते तिथून मूळ रस्त्यावर येण्यासाठी ५ एक मिनिटाचा वळसा पडायचा. जोश्यांचे व्हरायटी शॉप होते म्हणजे अगदी गोळ्या-बिस्किटे पासून पावडर-टिकल्या ते पेन्सिल सेल, क्रिकेट चे सामान, शालेय साहित्य, ब्रेड अंडी इत्यादी इत्यादी सगळे समान मिळायचे. जोशी आणि त्यांच्या सौ हे एका पोर्याला हाताशी घेऊन गेली १५ वर्षे हा धंदा चालवीत होते. हा पोर्या म्हणे त्यांना उकिरड्यावर सापडला... लग्नानंतर १२ वर्ष झाली तरी स्वताचे मुल नाही म्हणून त्याला घरात आणले आणि ३ वर्षांनी जोशी काकुना स्वताचे कन्या रत्न झाले ... तेव्हापासून ह्याचा पोर्या झाला. आणि त्याची रवानगी बिछान्यावरून थेट दुकानात गोणपाटावर झाली, शाळा सुटली. असो मीना आणि अंजू एव्हाना रिक्षा पकडून स्टेशन वर पोचल्या होत्या तेव्हा स्टेशन च्या घड्याळावर बरोबर ७:३२ झाले होते. मीनाने रिक्षेचे पैसे दिले तोवर अंजू तिकीट खिडकीवर गेली होती. घाटकोपर ला जाणारी टिटवाळा फास्ट बरोबर ७:४१ ला सुटली आणि मीनाने पुन्हा एकदा अंजूला दंडाला जोरात धरले "तुला नक्की आठवते आहे ना? तिथेच असेल ना? अन्जे माझी नोकरी जाईल ...", "दुसरी मिळेल, त्यात काय इतके ?" अंजूने मुद्दाम डिवचले. "इथे ४ वर्ष घासते आहे ... ते काही असे सोडायला नाही" मीनाला माहिती होते अंजू मुद्दाम करते आहे ते पण राग आवरला नाही तिला आणि तिने अंजूच्या दंडाला अजून जोरात आवळले "हो बरोबर आहे ... घासले म्हणून सोडायचे नाही कि तुझ्या शारुख करता ?" अंजूने पुन्हा एकदा डिवचले आणि आता तर अगदी नको त्या ठिकाणी. "बस कर अन्जे, एक तर तुझ्या वेंधळे पणामुळे हा हेलपाटा पडतो आहे आणि तू ..." मीनाने दंड सोडत विषय टाळायचा प्रयत्न केला. "बर बाई चुकले माझे, आता काय इथे पाय धरू ?" अंजू दंड चोळत म्हणाली. "पाय धरू नकोस तेवढे आपले काम वेळेत झाले म्हणजे मिळवले" मीना ने मान दुसरीकडे फिरवली. आता तिने एका हाताने लोकल चा दाराजवळचा खांब धरला होता आणि दुसर्या हाताने तिचा आपल्या गळ्यातल्या आय कार्ड शी चाळा सुरु झाला, सारखे ते स्वताभोवती फिरवायचे ज्याने गळ्यातल्या दोरीला पीळ पडायचा आणि मग पुन्हा तो पीळ सोडवायचा. तिने सहज आय कार्ड उचलले आणि बघितले "रेव्हेल्युशन मॉल, आर सिटी, एल बी एस मार्ग, घाटकोपर, मुंबई ४०००८६. तिचा एक खूप गोड फोटो त्यावर होता, तसे निरागस हसू तिला पुन्हा कधी फुटलेच नाही. पुढे तिचे नाव - मीनल महाजन

मीना उर्फ मीनल मुळची सांगलीची, अंजू पण. अंजू चे खरे नाव सोनाली होते, तिला अंजू हे नाव मुंबई ने दिले होते. मीनल आणि अंजू एका वर्गात, एकाच वाड्यात राहायच्या, अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी, मीना चे वडील गेले आणि तिने मावशीच्या ओळखीने ६ वर्षापूर्वी मुंबई गाठली, तिच्या बरोबर अन्जुनेही मुंबई गाठली. अंजूला आई वडील नव्हते ती तिच्या आजी आजोबांकडे वाढली, खरं तर मीना च्या घरीच वाढली. अंजूवर खूप जुने ऋण आहे महाजन कुटुंबाचे आणि त्यामुळेच अंजू मीनाला घट्ट धरून आहे. अंजू मीना पेक्ष बरीच धीट आणि बरीच हुशार आहे, त्यामुळे महाजन कुटुंब म्हणजे मीना ची आई, आजी आणि लहान भाऊ ह्या सगळ्यांचा मीना पेक्षा अंजू वर जास्त भरवसा आहे. गेले ६ वर्ष मीना आणि अंजू चे घाटकोपर ला नोकरी आणि कल्याण ला बस्तान असे चालू आहे, ३ महिन्यातून एकदा सांगली भेट ठरलेली, मीना ची, अंजू ६ वर्षात एकदाच गेली जेव्हा तिचा उरला सुराला परिवार आटोपला, त्यालाही आता ३ वर्ष झाली.

अंजूला उभ्या उभ्या मस्त डोळा लागला होता ... पुन्हा एकदा दंडाला जोरात पकड जाणवली आणि तिला जाग आली "चला ... आले घाटकोपर, तू पण ना अन्जे, कसलेही टेन्शन नाही तुला... झोपली कशी होतीस अगं तू ?" मीना अंजूला जवळ जवळ ओढत उतराणार्यांच्या लोंढ्यात ढकलत होती. शेवटी दोघी उतरल्या, मीनाने ने पटकन घड्याळाकडे बघितले ८:२२ झाले होते, सगळे अगदी ठरवल्याप्रमाणे वेळेत चालले होते.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

मुलूखावेगळी's picture

26 Jul 2011 - 11:25 am | मुलूखावेगळी

वाचतेय.
शिर्षकाचा न कथेचा काय संबंध असेल ते कळन्यास उत्सुक :)

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 11:53 am | सोत्रि

घाटकोपर ला जाणारी टिटवाळा फास्ट

त्या दोघी जर कल्याणला रहाताहेत तर "घाटकोपर ला जाणारी टिटवाळा फास्ट" काही झेपले नाही, सिएसटी किंवा दादर किंवा कुर्ला फास्ट असायला हवी ना ? की माझाच काही घोटाळा होतो आहे?

- (विरार फास्टचा प्रवासी) सोकाजी

किसन शिंदे's picture

26 Jul 2011 - 12:25 pm | किसन शिंदे

अ‍ॅक्चुअली ते टिटवाळ्याहून सिएसटीला जाणारी फास्ट लोकल असं असावं.

विश्वेश's picture

26 Jul 2011 - 12:28 pm | विश्वेश

मुंबई लोकल बद्दलच्या अज्ञाना बद्दल माफी असावी !

किसन शिंदे's picture

26 Jul 2011 - 12:47 pm | किसन शिंदे

माफी कसली मागताय भावा.

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 12:59 pm | सोत्रि

विश्वेश, माफी कसली मागतोस रे मित्रा, चालायचेच हे असे.
बाकी कथा उत्कंठावर्धक आहे असे सध्या तरी वाटते आहे.

(अंजलीची रात्रपाळी काय असावी ह्याचा अंदाज बांधला आहे, बघुयात बरोबर ठरतो का ते) :)

- (माफ करणारा दयाळु) सोकाजी

विवेक मोडक's picture

26 Jul 2011 - 1:37 pm | विवेक मोडक

पुढे काय होतंय ते बघु!

इरसाल's picture

26 Jul 2011 - 12:59 pm | इरसाल

लिपस्टिक वरून आठवले...
एक बुजुर्ग नेता आपल्या भाषणात :
ह्या आजकालच्या लिपस्टिक....ना यांचा रंग छान असतो ना ह्यांचा गंध छान असतो .............ना ह्यांची चव.

कच्ची कैरी's picture

26 Jul 2011 - 3:33 pm | कच्ची कैरी

हाहाहा :)

सुरुवात -परिचय छान.

लिहित रहा... वाचत आहे

५० फक्त's picture

27 Jul 2011 - 6:24 am | ५० फक्त

मस्त लिहिलंयस रे, येउ दे अजुन.