भारतीय उद्योग : भावना आणि व्यवहार

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
5 Jul 2011 - 9:19 pm

अलीकडे कॅम्लिन वर कोकुयो या जपानी कंपनीने मिळविलेल्या ताब्यासंदर्भात मिपावर टाकलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया मी आज ५ जुलै रोजी वाचल्या. छान, अभ्यासपूर्ण आणि खुल्या दिलाने लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचुन बरं वाटलं. प्रतिक्रिया मिळण्याने उमेद वाढते. मिपावर काही मंडळी कदाचित त्यांच्या भविष्यात स्वत:चा उद्योग उभा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतील त्यामुळे त्या प्रतिक्रिये मध्ये आलेल्या काही मुद्यांचा परामर्ष घेण मला क्रम प्राप्त वाटते, कर्तव्य म्हणुन. कारण मी स्वत: उद्योजक असल्याचा उल्लेख केला आहे आणि स्वत:चा उद्योग करताना भारतीय उद्योगांचा फैलाव होण्यासाठी शक्य ती सगळी मदत करणे हे मी स्वीकारलेलं व्रत आहे. लिखाणामध्ये काही वैयक्तिक बाबींचा उहापोह होण्याची शक्यता आहे. त्या मागील उद्देश माझी स्वत:ची टिमकी वाजविण्याचा नसून फक्त माझे अनुभव आपणास लिखाणाच्या ओघात कथन करण्याचा आहे. कृपया गैरसमज नसावा. इथे सुदैवाने मला कुणीच ओळखत नाही , मीही कुणाला अगदी एकाही व्यक्तीला भेटलो नाही वा ओळखत नाही. मिपाकरांच्या identity ची अद्याक्षरे आणि लेखनातुन झालेली अभिव्यक्ती व्यतिरिक्त काही माहिती नाही, हे छान.
आज एक मस्त योगायोग आहे. ५ जुलैचा. बरोबर पंधरा वर्षापूर्वी पाच जुलै ला मी माझा उद्योग सुरु केला. माझा उद्योग हा एक संपूर्ण उद्योग आहे. म्हंजे फक्त उत्पादन किंवा फक्त विक्री किंवा अन्य कुठली सेवा असे नसून संशोधन, उत्पादन, विक्री, विक्री पश्चात सेवा, अर्थ असे सर्व विभाग एकाच वेळी धो धो कार्यरत असणारा उद्योग आहे. उद्योग सुरु करण्याचे स्वप्न तसं विद्यार्थी असतानाच बघितलं होतं. ठिणगी इयत्ता सातवीत असताना पडली होती. खेळायला एका श्रीमंत मित्राकडे रोज जायचो. बहुतेक दिवशी खांद्यावर फाटलेलेच असणा-या माझ्या सदऱ्या कडे पाहुन माझ्या मित्राची आई एकदा मित्राचा एक जुना पण व्यवस्थित इस्त्री केलेला शर्ट घेऊन आली आणि म्हणाली हा घे तुला, वापर उद्या पासुन. XXXX चाच आहे त्यामुळे तुला छान येईल. तो शर्ट न घेता मी जोरात बाहेर पडलो. त्या माउलीचा हेतु चांगलाच होता, भाबडा होता हे आज ही मी सांगू शकतो. तिचा मला कधीच राग आला नाही. पण त्या दिवशी त्या विनंती वजा आदेशाने त्या चिमुकल्या जीवाला ब्रम्हांड आठवले होते. रात्रभर हुलकावणी देणारी झोप एका अजस्त्र निर्णयाला माझ्यात प्रसवत होती आणि पहाटे चौकातल्या दर्ग्यात अजान झाली तेव्हा निश्चय झाला होता, आपण श्रीमंत व्हायचं. श्रीमंत होण्याचे स्वप्न हे त्यानंतरच्या माझ्या संपूर्ण आयुष्याचे इंधन बनलं आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्यात एक धग जागवतं होतं. आयुष्यातल्या सुस्तावलेल्या वा सुखासीन क्षणात ही धग अंगाची सालट काढायची आणि उर्मी जिवंत ठेवायची. पुढे इंजीनियरिंगला असताना तिसऱ्यावर्षी श्रीमंत व्हायचे म्हंजे स्वत:चा उद्योग करायचे असा एक मार्ग सापडला आणि चौथेवर्ष संपल्यावर धगीचे रुपांतर आगी मध्ये झाले होते जी पुढे सहा वर्षे मला उद्योग सुरु होईतोवर झपाटून जायला मदत करत होती. त्या झपाटलेल्या अवस्थेत मला फक्त बेभान होऊन धावायचं एवढंच माहिती होतं. जो प्रकल्प मला सुरु करायचा होता त्याच्या विषयी मी पाहिलांदा मला एका अत्यंत आदरणीय असणाऱ्या आणि पितृतुल्य असणाऱ्या अभियंत्याला सोळा वर्षापूर्वी सांगितले त्यावेळी त्यांनी माझी जोरदार टिंगल केली होती. खरे तर टिंगल करण्यासारखेच मी वदलो होतो. ज्या प्रकल्पाच्या अगदी सूक्ष्मतम आकाराला सुमारे चाळीस लक्ष्य रुपये लागणार होते त्यासाठी माझ्याकडे एखादा हजार ही शिलकीत नव्हते. त्यांनी बऱ्यापैकी मोठी जागा लागेलसं सांगितलं होतं आणि माझ्याकडे माझी खुर्ची ठेवण्याची ही जागा नव्हती. पण माझ्या बेभान मनाला ते काय आणि कशासाठी बोलले हे ध्यानात घ्यायचे कारण नव्हते आणि एवढे प्रचंड पैसे आणि जागा लागणार म्हणुन दडपून ही जायचे नव्हते. त्यांच्या विधानानंतर एक वर्षात माझी सुरुवात झाली होती आणि गेल्या पंधरावर्षात माझा व्यवसाय शंभरहून अधिकपट वाढलाय. रुटीन कामामधून बाराव्यावर्षी पूर्ण मुक्त झालोय. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पुढल्या भराऱ्या मारणं चालू आहे. अन्यान्य वाहनाच्या ताफ्यात मर्सिडीज तेराव्या वर्षीच आली आहे आणि उत्पादनाला उपलब्ध असणारी जागा दीडदोन एकर आहे. देशभर सेवा आणि विक्रीचे स्वत:चे जाळे विणले आहे आणि माझ्या उत्पादनाच्या स्पर्धेत असणाऱ्या विदेशी आणि भारतीय कंपन्यांच्या तुलनेत आता माझी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लीज माफ करा, मला माझी टिमकी अजिबात वाजवायची नाही हे मी आधीच सांगितलंय आणि मी इथे कुणाला इम्प्रेस करणं शक्य नाही हे ही सांगितलंय. कारण मला इथलं कुणीच माहिती नाही. मला ज्यांना इम्प्रेस करायचे आहे आणि ज्यांच्या साठी मी प्रयत्न करतोय ते इथे मिपावर नाहीत आणि त्यापैकी कुणी इथे येणे केवळ अशक्य आहे. मला इम्प्रेस करायचं आहे इराण मधल्या एका oil कंपनीच्या अध्यक्ष्याला कारण मला त्याच्याशी ताबडतोब व्यवसाय चालू करायचं आहे. मला इम्प्रेस करायचे आहे शकिराच्या गावातल्या म्हणजे कोलाम्बियातल्या बगोटागावातल्या अलीशियाला. या अर्थतज्ञ आणि उद्योग-व्यावसाईक असणा-या अलीशियाच्या नेतृत्व कौशल्यावर मी कमालीचा फिदा असून तिने माझ्या उत्पादनांचा पसारा तिकडे वाढवावा असा तिला माझा आग्रह आहे. इत्यादी. त्यामुळे इथे मला कुणाला इम्प्रेस करायचे नाही पण हे ठामपणे सांगायचे आहे की व्यावहारिक गणितं करत व्यवसाय सुरु करता येत नाही आणि वाढवता येत नाही. उद्योग सुरु करणं, जिवंत ठेवणे आणि वाढवणं ही एक झिंग असते. इंग्रजीत ज्याला - passion - म्हणतात. डिस्ने पासुन धीरुभाईपर्यंत कोणत्याही महान उद्योजकाने व्यवसायाला कलाटणी देणारे, गगन भरारी घेणारे निर्णय व्यावहारिक गणितं मांडून घेतले नाहीत. त्या त्या वेळी त्या व्यवसायाच्या नेत्याच्या हृदया मध्ये एका विशिष्ट निर्णयाचे नगारे वाजत असतात, शेकडो घंटा आदळत असतात. त्यांना मेंदूतल्या सल्लागाराच्या चेतना जाणवतच नाहीत. असा माझा ही अनुभव आहे. निर्णय जन्माला आल्यावर जग त्याचे व्याहारिक आलेखावर विच्छेदन करत रहात. हिरकणीने बुरुजाची लांबी रुंदी मोजून मग वर जायचे ठरवले असते तर मराठी इतिहासाला हिरकणी मिळाली नसती. कुमार केतकरांच्या त्रिकाळवेध लेख मालिकेत एका माउली चा उल्लेख आहे. आपल्या तान्हुलावरून गाडीजाणार हे जाणवताच विजेच्या वेगाने येवून तिने गाडी उचलून फेकून दिल्याची एक घटना घडली आहे. ती झाल्यावर मानसोपचार तज्ञ त्या घटनेचा गेले कित्येक वर्षे आज अभ्यास करताहेत. व्यावहारिक गणित मांडत बसले की रिस्क घेता येत नाही आणि रिस्क घेता येत नसेल तर व्यवसाय करता येत नाही. नोकरी करण्या ऐवजी तेवढेच पैसे मिळवण्याचे अन्य काही तरी करणं एवढीच व्यवसाय करण्याची व्याख्या असेल तर ती उद्यमशीलता नव्हे. उद्यमशीलता ही झिंग आहे. जीवनाचा पराकोटीचा आनंद मिळवणे हा त्याचा उद्देश आहे आणि तो आनंद सातत्याने मिळावा, मिळत राहावा म्हणून त्याचा व्यवहार सांभाळावा. एवढाच त्यातल्या व्यवहाराला अर्थ आहे. उद्योग सुरु केल्यावर पैसा तसा लवकर मिळतो. हो मिळतोच. पैसा मिळतो याचे अप्रूप फार काळ रहात नाही तर त्यात होणाऱ्या निर्मितीचा कैफ धोधो चढत जातो. व्यवहार आणि ती झिंग (भावना) याचा सबंध भक्ती आणि ध्यानासारखा आहे. रामाचे सगुण रूप हे भक्तीचे निमित्त आहे ध्यानासाठी! म्हणजे मुळात मूर्ती हा हेतुच नाही. भक्ती हा ही फक्त मार्ग आहे. हेतू नाही. बहुतेक जनता मूर्ती मध्ये आणि भक्ती मध्येच अडकलेली दिसेल. "ध्यान" हा हेतु असतो. आणि एकदा का ध्यान लागलं की सगळी कडे प्रभू राम दिसू लागतो. व्यवहार हा मार्ग आहे. हेतु व्यवहार नाही. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठीच धंदा केला जातो. तो मिळत राहावा म्हणुन व्यवहारी असायचे. कैफ महत्वाचा
( क्रमश ......)

तंत्रविचार

प्रतिक्रिया

प्रामाणिकपणे मांडलेले कथन आवडले.स्वकर्तुत्वावर तुम्ही इतपत भरारी मारली हे काय कमी आहे काय. तुमचे अजून अनुभव वाचायला आवडतील.
-----------------------------------------------------------------------------------------------
आपल्या तान्हुलावरून गाडीजाणार हे जाणवताच विजेच्या वेगाने येवून तिने गाडी उचलून फेकून दिल्याची एक घटना घडली आहे
------------------------------------------------------------------------------------------------
मानवी शरीरात असणारी राखीव शक्ती ह्या मागे कार्यरत होत असावी म्हणजे दृश्य स्वरूपातली व राखीव मिळून एकत्र होणारी शक्ती आणि आवेग मिळून तार्किक दृष्ट्या हे शक्य आहे.

उदा. १० किमी पळून आलेला गालीगात्र माणूस पडून धापाप्तोय ज्याच्याकडून तसूभर हालचाल शक्य नाही त्याला जर कळले कि बाजूला साप आलाय तर तोच ताडकन उठून बाजूल होईल.हीच ती राखीव शक्ती.

गणेशा's picture

5 Jul 2011 - 9:52 pm | गणेशा

कोणी तरी अनुभवी माणुस माझ्याच मनातलेच बोलतो आहे असे वाटते आहे..
भावनिकता ही आकाश नसली तरी पंख ही असु शकते हे माझेच वाक्य पुन्हा पुन्हा मीच अनुभवतो आहे असे वाटते.

आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.. अनुभव ऐकायला आवडतील.
------

व्यावहारिक गणितं करत व्यवसाय सुरु करता येत नाही आणि वाढवता येत नाही. उद्योग सुरु करणं, जिवंत ठेवणे आणि वाढवणं ही एक झिंग असते -

मस्तच

चला आपल्या लेखनामुळे ३ वर्षा पासुन जो एक छोटा बिझेनेस करावा म्हणत आहे.. त्याचा संकल्प तरी आज ५ जुलै ला करतो. लवकरच सुरु करतो आणि. हेच तुमचे गिफ्ट समजा.

सुधीर मुतालीक's picture

9 Jul 2011 - 10:37 am | सुधीर मुतालीक

वा गणेशा, या लेखाच्या निमित्ताने जर आपण आपल्या व्यवसायाचा श्री गणेशा करणार असाल तर खुपच छान. भरघोस शुभेच्छा !

प्रास's picture

5 Jul 2011 - 9:56 pm | प्रास

तुमचे प्रामाणिक विचार वाचून खूप आनंद झाला.

पुढले भाग वाचण्यास उत्सुक.

स्वतःचा उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेला -

जयंत कुलकर्णी's picture

8 Jul 2011 - 10:17 pm | जयंत कुलकर्णी

// त्यांच्या विधानानंतर एक वर्षात माझी सुरुवात झाली होती आणि गेल्या पंधरावर्षात माझा व्यवसाय शंभरहून अधिकपट वाढलाय. रुटीन कामामधून बाराव्यावर्षी पूर्ण मुक्त झालोय. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पुढल्या भराऱ्या मारणं चालू आहे. अन्यान्य वाहनाच्या ताफ्यात मर्सिडीज तेराव्या वर्षीच आली आहे आणि उत्पादनाला उपलब्ध असणारी जागा दीडदोन एकर आहे. देशभर सेवा आणि विक्रीचे स्वत:चे जाळे विणले आहे आणि माझ्या उत्पादनाच्या स्पर्धेत असणाऱ्या विदेशी आणि भारतीय कंपन्यांच्या तुलनेत आता माझी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लीज माफ करा, मला माझी टिमकी अजिबात वाजवायची नाही हे मी आधीच सांगितलंय आणि मी इथे कुणाला इम्प्रेस करणं शक्य नाही हे ही सांगितलंय. कारण मला इथलं कुणीच माहिती नाही. मला ज्यांना इम्प्रेस करायचे आहे आणि ज्यांच्या साठी मी प्रयत्न करतोय ते इथे मिपावर नाहीत आणि त्यापैकी कुणी इथे येणे केवळ अशक्य आहे. मला इम्प्रेस करायचं आहे इराण मधल्या एका oil कंपनीच्या अध्यक्ष्याला कारण मला त्याच्याशी ताबडतोब व्यवसाय चालू करायचं आहे. मला इम्प्रेस करायचे आहे शकिराच्या गावातल्या म्हणजे कोलाम्बियातल्या बगोटागावातल्या अलीशियाला. या अर्थतज्ञ आणि उद्योग-व्यावसाईक असणा-या अलीशियाच्या नेतृत्व कौशल्यावर मी कमालीचा फिदा असून तिने माझ्या उत्पादनांचा पसारा तिकडे वाढवावा असा तिला माझा आग्रह आहे. इत्या////

अभिनंदन !

//नोकरी करण्या ऐवजी तेवढेच पैसे मिळवण्याचे अन्य काही तरी करणं एवढीच व्यवसाय करण्याची व्याख्या असेल तर ती उद्यमशीलता नव्////

नशिबाने आता तशी मानसिकता आपल्या सध्याच्या युवकात राहिलेली दिसत नाही.

आपल्या युवकांना उद्योजग बनवायच्या मोहीमेला शुभेच्छा ! त्या साठी काही करता आले तर मलाही आनंद होईल. असो.

ग्रेट!
यावेळी क्रमश: पाहून आनंद झाला.

अर्धवटराव's picture

8 Jul 2011 - 10:41 pm | अर्धवटराव

हॅप्पी झींग मित्रा :)

( झिंगारु) अर्धवटराव

सुनील's picture

8 Jul 2011 - 10:45 pm | सुनील

वाचतोय. पुढचे लवकर येऊदे.

श्रावण मोडक's picture

9 Jul 2011 - 9:35 am | श्रावण मोडक

हेच म्हणतो - पुढचे लवकर येऊ दे...

अभीनंदन तुम्ही कशाचे उत्पादन करता हे समजु शकेल का? (वेबसाइट)

सुधीर मुतालीक's picture

11 Jul 2011 - 6:51 pm | सुधीर मुतालीक

धन्यवाद. visit ; www.positivemetering.com

अर्धवटराव's picture

11 Jul 2011 - 10:13 pm | अर्धवटराव

तुमच्या अ‍ॅक्स्पोर्ट लिस्ट मध्ये ड्रॅगनचं नाव बघुन विशेष आनंद झाला.

अवांतरः तशी आमची उद्योगधंद्यातली समज विवादास्पद आहे हे आधिच कबुल करतो... नाहितर आमचा प्रतिसाद बघुन कोणि "त्यात काय मोठं विशेष?? " असा प्रतिसाद द्यायचा...

( निरुद्योगी) अर्धवटराव

तुमचे अनुभव सांगा.प्रेरणादयी आसतील.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jul 2011 - 4:07 pm | कानडाऊ योगेशु

स्फूर्ती देणारे लिखाण.
एरव्ही एकाच परिच्छेदात लिहिलेले असे भरघोस लिखाण दिसले कि वाचायची इच्छाच नाहीशी होते पण तुमचा लेख सुरु केला आणि वाचतच राहावेसे वाटले.
व्यवसाय करताना आलेले कसोटी पाहणारे अनुभव वाचायला आवडतील.
व्यवहार आणि अध्यात्माची घातलेली सांगड ही आवडली.
अभिनंदन आणि शुभेच्छा.!

स्मिता.'s picture

10 Jul 2011 - 6:24 pm | स्मिता.

असेच म्हणते.

प्रयत्नपूर्वक व्यवसाय सुरू करून त्यात भरभराट केल्याबद्दल अभिनंदन!

तुमची ही स्फूर्तीदायी लेखमाला तुमच्या अनुभवांनी भरून येऊ द्या. पु.ले.शु.

गणपा's picture

9 Jul 2011 - 4:36 pm | गणपा

स्फूर्तीदायक आहे ..
वाचतोय........

वारा's picture

11 Jul 2011 - 2:24 am | वारा

अनुभव वाचण्यास उत्सुक..
क्रमशः बघुन आनन्द झाला..

शाहिर's picture

11 Jul 2011 - 4:24 pm | शाहिर

पुढील भाग लौकर येउ दे !!

निखिल देशपांडे's picture

11 Jul 2011 - 5:50 pm | निखिल देशपांडे

पुढच्या भागाची वाट पाहतोय

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Jul 2011 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते

< स्टँडिंग ओवेशन />

धमाल मुलगा's picture

12 Jul 2011 - 1:00 pm | धमाल मुलगा

जिद्द, चिकाटी अन ध्येयाचा ध्यास ह्याचं मुर्तिमंत उदाहरण आहात खरं.
मोठं कौतुक वाटलं हा व्यावसायिकतेच्या प्रवासाचा धावता आढावा वाचून. त्याहून जास्त आवडलं ते म्हणजे देशी उद्योजकांना मदत करण्याचं धोरण. अभिनंदन आणि शुभेच्छा.

अवांतरः ह्या लेखाच्या निमित्तानं जागा+पैसा+राजकीय वरदहस्त ह्यांच्या अभावामुळं नाउमेद होऊन फसलेलं आमच्या एका धंद्याच्या स्वप्नाची टोचणी जागी झाली. :( असो.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jul 2011 - 10:34 pm | अप्पा जोगळेकर

अनुभवाची जोड असलेले अत्यंत स्फूर्तिदायक असे हे लिखाण आहे. तुमच्या व्यवसायास अनेक शुभेच्छा.
जर व्यवसाय करायचा झालाच तर तो इमाने इतबारे करावा आणि कोणतीतरी नवनिर्मिती करण्याचा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून करावा नाहीतर सरळसोट्पणे नोकरी करावी असे मत आधीपासूनच होते. हा लेख वाचून ते अधिकच बळकट झाले.