युरो ४ वा भारत ४ मानक पूर्ण करू शकत नसल्याने मारूती ८०० हे मॉडेल भारतातील प्रमूख शहरांतून बंद
करण्यात आले आहे. लवकरच तिची निर्मितीही थांबवण्यात येईल असे मला वाटते.
१९८४ पासून अतिशय लोकप्रिय असलेल्या ह्या गाडीचा प्रवास आता थांबत आहे. भारतातील चार-चाकी वाहनविश्वात
क्रांतीचा अग्रदूत असलेली ही कार एकेकाळी अनेक लोकांची ड्रीम्-कार होती. त्याअगोदर सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या गाड्या म्हणजे
प्रिमियर पद्मिनी, अॅम्बॅसिडर, कॉन्टेसा व जीप. (काही काळ स्टॅन्डर्ड) त्यातली अॅम्बॅसिडर व कॉन्टेसा आरामदायी असल्या तरी मायलेजचा
विचार करता फक्त सरकारलाच परवडत असत किंवा ऊस बागायतदार वा साखरसम्राटांनाच (एकूण एकच!). जीपही शिकारी, पोलीस, गुंड व
गावाकडचे शेतकरी ह्या मंडळींच्या आवडीची. म्हणजे उरली फक्त पद्मिनी!
पद्मिनी पांढरपेश्यांची लाडकी असली तरी तिच्यात कैक त्रूटी होत्याच. एकतर मोठ्ठा आवाज, स्टिअरिंगला डावीकडे असलेले गियर्स्..अन त्यातही
जरासुद्धा नाजूकपणा नाही. रिव्हर्स टाकतांना तर ताकद लावूनच गियर पाडायला लागायचा. डॅशबोर्डही अनाकर्षक, एसीची सुविधा नाही. अगदी कुणी कौतूकाने
बसविलाच तर गाडी अॅव्हरेजमध्ये मार खायची, पिक-अपवर परिणाम व्हायचा. त्यातल्यात्यात एक पंखा चालून जायचा. शेप एरोडायनॅमिक
नसल्याने म्हणा किंवा इंजिनची कमी शक्ती म्हणा, पद्मिनी ताशी ऐंशीच्या वर काही मजल मारू शकायची नाही. घाटात खूप वेळा उजवे पाऊल
वाकडे करून चवड्याने ब्रेक तर टाचेने अॅक्सिलेटर पंप करत गाडी चढवायला लागत असे. हॅन्डब्रेक हा नावालाच होता. अर्थात असल्या सगळ्या गुण
वैशिष्ठ्यांमुळे जो पद्मिनी सफाईदारपणे चालवेल तो कुठलीही गाडी चालवेल असे म्हटले जायचे ते उगीच नव्हे!
एक फायदा मात्र होता पद्मिनीत. तो म्हणजे तिची पुढची सीट सलग आडवी होती, दोन वेगळ्या नव्हत्या. ह्याचा फायदा प्रेमिकांना अन नवविवाहित
जोडप्यांना अवश्य व्हायचा. डाव्या कुशीत प्रियेला कवटाळून उजव्या हाताने सफाईदारपणे व्हील फिरवत महाबळेश्वरला जाण्यात काही औरच मजा असायची.
पण प्रिमियर कंपनीने स्पर्धा नसल्याने वा आळस म्हणूनही असेल कदाचित पण वर्षानूवर्षे तेच मॉडेल भारतीयांच्या माथी मारले. त्यामुळे १९८४ मध्ये मारूती ८०० चे
लोकांनी अतिशय हर्षाने स्वागत केले ह्यात काही आश्चर्य नाही.
आकर्षक रंग, रूप, छोटेखानी आकार, नाजूक स्टिअरिंग, मुलायम बिनाआवाजी गियर, उत्तम एसी, मस्त पिक-अप, फायबरचा झकास
डॅशबोर्ड अशी किती तरी फिचर्स ८०० मध्ये होती जी पूर्वीच्या कुठल्याच भारतीय गाडीत नव्हती. पार्किंगला जागाही फारशी लागायची नाही, छोट्या जागेत
पटकन वळायची ती गुणी ८००! मला आठवते आहे, एकदम सुरूवातीला म्हणजे ८४-८५ मध्ये लाल रंगाच्या ८००ची खूप फॅशन होती आणि त्या गाड्यांचे
नंबर गोळा करण्याची कसलीशी स्पर्धाही होती ज्यात लहान-मोठ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता.
गरिबांसाठी म्हणून बनवलेली ही कार सुरूवातीला कितीतरी वर्षे श्रीमंतांचीच लाडकी होती. प्रिमियरप्रेमी कितीही नाक मुरडून ' अहो किती हलकी
आहे, पत्रा तर म्हणे फायबरचाच आहे, हायवे वर बाजूने ट्रक गेला तर कलंडते म्हणे' असे शेरे मारत असले तरी लोक ती गाडी घेतच होते.
अर्थात पद्मिनी चालविण्याची सवय असलेल्या लोकांच्या हातात एकदम मारूती ८०० आल्यावर सुरूवातीला अपघात होणे साहाजिकच होते व तसे ते झालेही. त्यामुळे काही
काळ ८०० ला अॅक्सिडेन्ट कार असाही काळा डाग लागला होता. पण जशी लोकांना सवय होत गेली तशी अपघातही कमी होऊ लागले.
१९८४ ते जवळ जवळ २००२ साली अल्टो येइस्तोवर मारूती ८०० ने राज्य केलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही. किती तरी वर्षे मारूतीला (मला वाटते
ह्युन्डाई सॅन्ट्रो येईपर्यंत) पर्यायच नव्हता. काही काळ तर पाच गियर वाल्या ८०० ने अल्टोलाही चितपट केले होते, म्हणूनच बहुतेक कंपनीने पाच गियरचे
व्हर्जन तातडीने बंद केले. पण त्या गाडीला बराच जास्ती अॅव्हरेज होता हे नाकबूल करता येत नाही.
मीही ही गाडी कॉलेजमध्ये असतांना चार्-पाच वर्षे वापरली होती व त्या गाडीच्या माझ्या मनात त्या दिवसांत असू शकतात त्या सर्वप्रकारच्या आठवणी
दरवळत आहेत. सगळ्याच आज व्यक्त करू शकत नसलो तरी मित्रांबरोबर केलेल्या रायगड, महाबळेश्वर, दिवे-आगर इ पिकनिक्स.. फ्रेशर पार्टीच्या गंमती,
पुरूषोत्तम नाट्यस्पर्धा, चोरून बियर पिण्याचे हक्काचे ठिकाण अश्या कैक गोष्टी आज आठवतात. ह्या आठवणी तश्या फार जुन्या नसल्या तरी आता ती गाडीही माझ्याकडे नाही आणि ते मित्र, ते दिवसही परत येणार नाहीत. एट हंड्रेडही आता कालवश होत आहे. गुडबाय एट हंड्रेड.. तू आंम्हाला खूप काही दिलेस ते विसरणे अवघड आहे!
प्रतिक्रिया
7 Apr 2010 - 6:59 pm | स्वाती दिनेश
गुडबाय एट हंड्रेड.. तू आंम्हाला खूप काही दिलेस ते विसरणे अवघड आहे!
अगदी!
मलाही मारुती ८०० चालवायला आवडायची, एक तर अटकर बांध्याची असल्याने गल्लीबोळातून वाट काढायला पद्मिनी/अँबेसॅडर पेक्षा चांगली.. त्यामुळे सिटीत चालवायला ८०० बेस्ट होती...
स्वाती
7 Apr 2010 - 7:30 pm | चतुरंग
ही पहिली गाडी जी भारतात इतकी चालली. माझे चारचाकीचे लायसन्सही मला ह्याच गाडीवर मिळाले, त्यावेळी मी हैद्राबादला होतो.
छान होती गाडी. एकदम सुटसुटीत आणि छोटेखानी. 'हम दो हमारे दो' च्या जमान्याला एकदम फिट्ट!
(खुद के साथ बातां : रंगा, बाकी "डाव्या कुशीत प्रियेला कवटाळून उजव्या हाताने सफाईदारपणे व्हील फिरवत महाबळेश्वरला जाण्यात काही औरच मजा असायची" हा डॉक्टरांचा अगदी आतल्या गोटातला स्वानुभव म्हणावा की काय? ;) )
चतुरंग
7 Apr 2010 - 7:44 pm | रेवती
छानच आहे लेखन!
मारूती आठशेने राज्य केले असले तरी आल्टोही पहिल्यांदा दणक्यात भाव खाऊन गेली होती. २००१ ला आम्ही आल्टो घेण्याचे ठरवले होते ते आठवले. मला अजूनही अल्टो आवडते. वॅगन आर किती लोकप्रिय आहे ते माहीत नाही पण जरा चौकोनी वाटते. अर्थात उपयोगी असेल तर घ्यायलाच लागते.
सरकारलाच परवडत असत किंवा ऊस बागायतदार वा साखरसम्राटांनाच (एकूण एकच!). जीपही शिकारी, पोलीस, गुंड व
गावाकडचे शेतकरी ह्या मंडळींच्या आवडीची. म्हणजे उरली फक्त पद्मिनी!
हे प्रचंड आवडले.
रेवती
7 Apr 2010 - 8:17 pm | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
एक जोक मारुती वर-
एका हुच्चब्रु कुटुंबात- एक छोटा मुलागा बाल हनुमान पहाताना विचारतो
व्हाय धिस गॉड इज नेम्ड आफ्टर दि कार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Apr 2010 - 9:25 pm | डावखुरा
उत्तम जमुन आलाय......
"राजे!"
7 Apr 2010 - 9:51 pm | टारझन
व्वा दाढे साहेब :) लै भारी लेख ...
मारुती८०० सारख्या पिटुकल्या गाडीत बसतांना अंगं अंमळ झिप करावे लागते. एकदा ड्रायव्हिंग शिकु म्हंटलं तर च्यामायला पाय स्टेरिंगच्या वर .. गुतलं की निघायची पंचाईत :) छटाक आतपाव लोकांना बरी होती गाडी
-(एस.यु.व्ही प्रेमी) टारोबा फॉर्च्युनर
7 Apr 2010 - 11:39 pm | रेवती
तुला सगळ्याच गाड्यांमध्ये अंग झीप करावे लागेल.;)
हमर तुझ्यासाठी अगदी योग्य गाडी आहे.
रेवती
8 Apr 2010 - 12:21 am | टारझन
सगळ्या म्हणजे ... मारुती८०० ,ऑम्नी,अल्टो,झेन्,सॅट्रो,आणि इत्यादि गाड्या केवळ झिंगुंर आहेत ... :)
हो .. आता साहेबांच्या जुण्या आठवणी असल्याने त्यांना अंमळ आवडत असेल ती गाडी :)
हम्मर ... =)) =)) आंबाण्याला पोरगी नाहीये बहुतेक .. तिला पटवली असती तर कदाचित हम्मर परवडली असती ... :)
बाकी टोयोटा फॉर्चुनर ठिकाय ... पण तुर्त तरी आम्ही आमच्या "टाटा इस्टेट" मधे खुश आहोत .. :)
8 Apr 2010 - 12:26 am | प्रभो
मोठ्या अंबाण्याला हाये रे एक पोरगी
8 Apr 2010 - 1:13 am | देवदत्त
मुकेश अंबानी ला मुलगी आहे ईशा अंबानी .... फोर्ब्स टॉप १० वारसांमध्येही आहे..
8 Apr 2010 - 1:15 am | टारझन
भलतीच कंजुष दिसते अंबाण्याची पोट्टी .. तिला भुवया कोरायला पैसे द्या कोणी :)
हम्मर काय परवडणार नाय !
7 Apr 2010 - 11:17 pm | संदीप चित्रे
छोटेखानी पण सफाईदारपणे लिहिलेला लेख आवडला.
माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधींनी सामान्यांची गाडी म्हणून मारूती ८०० आणली होती किंवा ती त्यांच्या स्वप्नातली गाडी होती. चूभूदेघे !
माझेही पहिले चारचाकीचे शिक्षण आणि लायसन्सही मारूती ८०० वर मिळाले होते.
एकदम 'मस्के मेंसे चलनेवाली छुरी के माफिक जानेवाली' गाडी :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
9 Apr 2010 - 7:35 pm | तिमा
माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधींनी सामान्यांची गाडी म्हणून मारूती ८०० आणली होती
संजय गांघी यांना आधी स्वतःची मिनी कार बनवायची होती. म्हणून सर्व नियम वाकवून त्यांना जागा मिळून कंपनी काढून देण्यात आली. ती करण्यात त्यांना संपूर्ण अपयश आले. विरोधकांनी लोकसभा डोक्यावर घेतली होती. मग अब्रू वाचवायला माँ साहेबांनी सुझुकीला पाचारण केले. त्यानंतर सुझुकीने कारखाना चालू होईपर्यंत ओरिजिनल सुझुकी मारुती ८०० म्हणून विकल्या. त्यानंतर लोकांची स्मृती क्षीण झाल्याने मारुती ८०० चे श्रेय लाडक्या संजय बाबाला मिळाले.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
10 Apr 2010 - 4:15 am | सुचेल तसं
नगरच्या व्ही.आर.डी.ई. मधे मारुतीची चाचणी झाली होती आणि एका चढ असलेल्या ट्रॅकवर ती चढू न शकल्याने फेल झाली होती.
7 Apr 2010 - 11:48 pm | प्राजु
लेख आवडला.
मस्त जमून आला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
10 Apr 2010 - 8:45 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो.
दाढे साहेबांचे लिखाण नेहमीच वाचायला आवडते.
8 Apr 2010 - 1:00 am | सुचेल तसं
>>सरकारलाच परवडत असत किंवा ऊस बागायतदार वा साखरसम्राटांनाच (एकूण एकच!). <<
हा..हा... एकदम करेक्ट!!! मारुती ८०० अजुन एका कारणासाठी चांगली की बंद पडल्यावर धक्का मारायला सोपी... ;)
8 Apr 2010 - 11:34 am | सुप्रिया
गाडीचं स्वप्न पूर्ण करणारी आमची पहिली गाडी !! मला अजूनही ही गाडी फार आवडते. ड्रायव्हींग करायला सगळ्यात सोप्पी गाडी आहे ती.
9 Apr 2010 - 9:53 am | मदनबाण
दाढे साहेब मस्त लिहले आहेत...या लेखा वरुन "हमारा बजाज" चे दिवस आठवले.
(हल्लीच यूट्यूबवर राजदूत मोटरसायकच्या जाहिरातीचा इडियो शोधत होतो पण गावला नाय काय !!! :( )
(मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 11:29 pm | रामदास
नविन गाड्या मिळाल्या (काहींच्या घरी दोन -दोन) तेव्हा मला मिळाली नव्हती.पण माझी पहीली गाडी डुक्कर फियाट होती.खरंखुरं इटाल्यन इंजीन .मग एक दिवस तळच निखळला तेव्हा नाईलाजानी उभी केली पण नंतर काही वर्ष वापरतच होतो.
11 Apr 2010 - 10:53 am | डॉ.प्रसाद दाढे
प्रतिक्रियांबद्दल सर्व मिपाकरांना धन्यू. खूप दिवसांनी लेखन केलं होतं, तेही घाईघाईत झालं होतं, पण सगळ्यांना आवडलेलं पाहून बरं वाटलं.
मारूती ८०० ला पॉवर स्टिअरिंग नाही हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आजकाल ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी ते अत्यावश्यकच आहे. जशी जशी नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होईल तस तसे मॉडेलमधे सुधारणा करणे कंपन्यांचे कामच आहे. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ अमेरिकेत मोटार तज्ञ आहेत. ते मारूति ८०० हे 'नो आर अॅन्ड डी' चे उत्तम उदाहरण असे नेहमी म्हणायचे. ८०० ची महती एव्हढ्यासाठी की त्या गाडीमुळे सुबक, मऊ गाडीची सर्वसामान्य भारतीयांना सवय झाली. एका युगाची सुरूवात झाली.
असो, एका अर्थी मारूती ८०० ची पद्मिनी व्हायला लागली होतीच, आता कंपनी तिच्या जागी अशीच एखादी उत्तम खाशी सुबक ठेंगणी आणतीय का ते पाह्यचं.
11 Apr 2010 - 11:19 am | इंटरनेटस्नेही
पॉवर स्टिअरिंग असल्यामुळे आणि जोरदार पिक अप, वरवर पाहता नाजूक पण आतून दणकट फ्रेमिंग यामुळे झेन लोकप्रिय झाली. मारुती झेन ही आपल्या भारत भूमीतली पहिली एम पी एफ आय गाडी आहे.
(मुंबई पुणे एक्स. वे वर 145 केएमपीएच ने झेन पळवणारा) इंटरनेटप्रेमी.
16 Jul 2012 - 9:19 pm | मन१
कालपरवाच "मारुती" ब्रँडवर धागा आला होता, त्याची आठवण झाली.