
पार्करचे पेन
======
-राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४)
मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती.
भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या. त्यामुळे माझ्या आईबद्दल मनात राग, मत्सर अशा भावना पण निर्माण झाल्या होत्या. या भावना नंतर मामाला आणि आजी-आजोबांना लिहीलेल्या पत्रातून जेव्हा व्यक्त व्हायला लागल्या तेव्हा मामाने मला पार्करचे बॉलपेन भेट म्हणून पाठवले. अर्थातच बॉलपेनला शाईच्या पेनची प्रतिष्ठा तेव्हा नसल्यामुळे मी नाखूष होतो. पण दुधाची तहान ताकावर भागविण्याशिवाय पर्याय नव्हता.
आईने ते पेन बर्यापैकी पण मोजूनमापून वापरले. कोथरूडला राहायला आल्यावर ते पेन गोदरेजच्या कपाटात अगदी लॉकरमध्ये गेलं. मी कधी कधी त्याच्याबद्दल विचारायचो. तेव्हा "ते तुला मी देणार नाही" हे शब्द मनावर घाव करून जायचे.
८४-८५ च्या सुमारास अचानक माझे ग्रह बदलले. आईने ते पेन अचानक मला बहाल केले. ते पेन मिरवताना खूप भारी वाटायचेच पण त्या पेनाच्या गुळगुळीतपणामुळे उत्तेजित होऊन मी अनेक इमले रचले. ज्यांना पार्कर पेनाचं माहात्म्य कळायचं ते जास्तच कौतुक करायचे. त्यामुळे स्वर्ग गाठल्याची भावना निर्माण झाली होती, हे मात्र नक्की.
८५ साली पवईला शिक्षणासाठी गेल्यावर अर्थातच पेन माझ्याबरोबर नेण्याची परवानगी मिळाली. मी ते वापरायचो पण काळजीपूर्वक.
एके दिवशी अचानक माझ्याकडून ते हरवले गेले...
आई फार रागावल्याचे आठवत नाही पण त्यामुळेच कदाचित आईचे पेन आपण सांभाळू शकलो नाही, ही अपराधीपणाची भावना परत एकदा खोलवर रूतून बसली.
मग सुरु झाला तश्शाच एका दुसर्या पेनाचा शोध...
पुणे, मुंबई त्यासाठी बर्यापैकी पालथे घातले. एक-दोन ठिकाणी पेन बघायला मिळाले पण त्याला आईच्या पेनाची चकाकी नव्हती, तसेच किंमत आवाक्याबाहेरची होती, शिवाय ते ओरिजिनल आहे की नाही याची पण खात्री नव्हती. एकदोनदा मामाकडे परत एकदा पेन "मागावे" अशी इच्छा निर्माण झाली, पण "कुणाकडे काही मागायचे" हे आमच्याकडे "अतिशय निंद्य" मानले गेले असल्याने मी तो विचार गिळून टाकायचो (कुणी आपणहून काही दिलं तर ते साधकबाधक विचार करूनच स्वीकारायचे या शिकवणीचा परिणाम इतका खोल झाला आहे की त्यामुळे न मागता मिळालेल्या गोष्टींचे अप्रूप पण त्याच प्रमाणात वाटत राहते. )
पण ते असो.
२००० साली आई गेली, तरीही मी पेनाचा शोध चालू ठेवला. एक दिवस मला इंटरनेटवर एका ठिकाणी त्या पेनाचा शोध लागला आणि असेही कळले की पार्करने त्या पेनाचे उत्पादन आता थांबवले आहे. परत एकदा मी अस्वस्थ झालो. पेनाची किंमत २७ डॉलर इतकी होती. मी "नगाला नग" म्हणून तीन पेनं स्वत: घ्यायचे ठरवले. मामाला भारतात येताना आणशील का विचारल्यावर तो "हो" म्हणाला तेव्हा मला काय आनंद झाला ते माझं मलाच ठाऊक! मी पेनं स्वत: खरेदी केली आणि मामाच्या अमेरीकेतल्या पत्त्यावर मागवली. त्याने त्याच्या भारतवारीत आणली आणि माझ्या हवाली केली.
त्या तिन पेनांनी "आईच्या पेना"च्या भरपाईचे थोडेफार समाधान मिळालं, पण आईचे पेन वापरण्यातला भारीपणा त्यात नाही ही खंत आहे. आज ती तिन ही मी कपाटात भरपाई केल्याच्या समाधानाने ठेऊन दिली आहेत.
हा अनुभव मानवी स्वभावाच्या महत्त्वाच्या पैलूवर उजेड टाकतो...
एखाद्या मुलाचे एखादे खेळणे हरवले तर "नगाला नग" म्हणून दुसरे आणून दिले तरी मूळ खेळण्याचा आनंद देईलच असे नाही. *मूळ खेळणे जेव्हा मिळते तेव्हा ज्या भावना निर्माण झालेल्या असतात त्या खेळण्याला अर्थ/आनंद समाधान देतात.* तसे किंवा त्यापेक्षा अधिक समाधान, आनंद दुसर्या खेळण्यातून मिळाले तर आणि तरच खेळणे हरवल्याचे दु:ख नाहीसे होते. काळाच्या ओघात आपण बदललेले असतो त्याचाही परिणाम अनुभूतीवर होतोच...
दुसरी नोकरी, दुसरे घर, बागेतले दुसरे झाड आणि दुसरा जोडीदार/संसार इ० गोष्टींचे पण तसेच आहे...
या विषयावर अक्कल शिकविणारे बरेच भेटले म्हणून शेवटी लिहून मोकळा झालो...
प्रतिक्रिया
1 Oct 2025 - 6:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.
2 Oct 2025 - 7:51 pm | युयुत्सु
माई
धन्यवाद!
3 Oct 2025 - 10:52 am | रामचंद्र
शेफर/शीफर?
3 Oct 2025 - 7:50 am | गवि
सुंदर लेख..
3 Oct 2025 - 11:54 pm | श्रीरंग_जोशी
हृद्य आठवण.
लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.
7 Oct 2025 - 7:26 pm | सविता००१
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.
8 Oct 2025 - 1:44 pm | चौथा कोनाडा
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय !
मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !
9 Oct 2025 - 5:38 pm | रामचंद्र
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!
25 Oct 2025 - 10:23 am | निमी
खरंच असे हळवे कोपरे असावेत आणि ते जपावेतही..छान लिखाण.