कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
17 Sep 2022 - 1:01 am

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

आधीचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

सकाळी आठ वाजता उठून तयारी झाल्यावर नाश्त्याला दही आणि टोमॅटो केचपच्या साथीने मेथीचे पराठे खाऊन आम्ही साडे नऊच्या सुमारास करमळी पासून ४६ कि.मी. अंतरावरच्या 'हळर्ण' किल्ल्यापासून (अलोर्ना किल्ला / Alorna Fort ) सुरुवात करून नंतर 'कोलवाळ', 'शापोरा' आणि 'अग्वाद' हे उत्तर गोव्यातील चार किल्ले आज पाहायचे असे ठरवून निघालो.

”map”/

सोमवारची सकाळ असल्याने कामावर जायला निघालेल्यांची वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने होती त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले होते, परिणामी मांडवी नदीवरचा पूल ओलांडायलाच वीस-पंचवीस मिनिटांऐवजी पाऊण तास लागला. सव्वा अकराच्या सुमारास हळर्ण किल्ल्याच्या आधी चौदा किमी. वर असलेल्या कोलवाळ गावात पोचलो तेव्हा उजवी कडे वळल्यास 'थिवीचा किल्ला' (Thivim Fort) म्हणूनही ओळखला जाणारा 'कोलवाळ किल्ला' (Colvale Fort) अगदी जवळ असल्याचे गुगल मॅप दर्शवत होता म्हणून आधी तो बघायचे ठरवले.

मॅप फॉलो करत थोडे पुढे गेल्यावर गावातून जाणाऱ्या एका अरुंदशा रस्त्याच्या डावीकडे हि 'कोलवाळ किल्ला' नावाची पार खंडर स्वरूपात अस्तित्वात असलेली वास्तू दृष्टीस पडली.

”Colvale-Fort”/

उत्तर गोव्यातल्या बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावाच्या परिसरात सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी तीन किल्ले बांधले होते. त्यातले दोन किल्ले कालौघात पूर्णपणे नष्ट झाले असून हा कोलवाळ किल्ला तेवढा चिऱ्याच्या (जांभा) दगडांत बांधलेला एक बुरुज आणि अन्य बांधकामाचे किरकोळ भग्नावशेष अशा स्वरूपात शिल्लक उरला आहे.

कोलवाळ किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

कोलवाळ किल्ल्याचे प्रवेशद्वार

शेवटचा फोटो.


थोडेफार भग्नावशेष सोडून ह्या लहानशा किल्ल्यात पाहण्यासारखे खरंतर काही नाही. आतली एकमेव विहीर देखील दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली आहे. एकंदरीत इथे जे काही पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याच्या गतवैभवाबद्दल कुठलीही कल्पना येत नाही आणि किल्ल्याची दुरावस्था बघता स्थानिकांची आणि सरकारची उदासीनता त्याला कारणीभूत असावी हे लक्षात येते. पुरातत्व खात्याने हा किल्ला संरक्षित स्मारक असल्याचा छोटासा बोर्ड बाहेर रस्त्यावर लावला असला तरी मुळात जतन/संवर्धन करण्यासारखे विशेष काही उरलेच नाहीये.

काल पाहिलेल्या 'बेतूल' किल्ल्याचा पण केवळ एक बुरुज तेवढा शाबूत होता पण किमान तिथली लांब पल्ल्याची तोफ आणि आजूबाजूचा परिसर तरी अतिशय प्रेक्षणीय असा होता, पण इथे अक्षरशः काहीच बघण्यासारखे नसल्याने वेळ वाया गेल्यासारखे वाटले.

असो, बाराच्या सुमारास इथून चौदा किमी वर असलेला 'हळर्ण किल्ला' पाहायला आम्ही निघालो. पंधरा मिनिटांत आठएक किमी अंतर पार केल्यावर भावाला चहा प्यायची इच्छा झाल्याने 'पिर्णा' (Pirna) गावातल्या चौकात एक थांबा घेतला.

फेब्रुवारीच्या त्या पहिल्याच दिवसाने गोव्यातल्या थंडीचे सूप वाजल्याची जाणीव करून दिली होती. एकतर दुपारचा सव्वा बाराचा सुमार, त्यात गेल्या बारा दिवसात कधीही जाणवला नव्हता असा उकाडा जाणवत होता त्यामुळे मी चहा पिण्याऐवजी चहावाल्याच्या शेजारीच असलेल्या 'रुक्मिणी बार अँड रेस्टॉरंट' मध्ये जाऊन मस्तपैकी चिल्ड बिअर पिणे पसंत केले. तसाही काल संकष्टी असल्याने बहिणीच्या इच्छेचा मान राखत चक्क गोव्यात असून सुद्धा 'ड्राय डे' पाळला होता. त्याची कसर आज भरून निघणे स्वाभाविकच होते 😀

पाऊण वाजता तिथला कार्यक्रम आटपून निघालो आणि एक वाजण्याच्या सुमारास हळर्ण किल्ल्या (Alorna Fort) जवळ पोचलो.

”Alorna-Fort-1”/
”Alorna-Fort-2”/

वळणावरून दिसणारा किल्ल्याचा कॅप्सूल बुरुज

”Alorna-Fort-3”/

किल्ल्याच्या अगदी समोर असलेली शापोरा नदी

”Alorna-Fort-4”/

हळर्ण किल्ल्याचे प्रवेशद्वार

”Alorna-Fort-5”/

आत प्रवेश करताच दुतर्फा ठेवलेल्या तोफा

प्रवेशद्वारातून आत शिरताच उजव्या बाजूच्या तोफेच्या मागच्या अंधाऱ्या देवडीत आराम करण्यासाठी पहुडलेल्या किल्ल्याच्या सुरक्षारक्षकाने डाव्या बाजूच्या तोफेवर ठेवलेल्या रजिस्टर मध्ये नाव, गाव, फोन आणि गाडी नंबर अशी माहिती लिहून आत जाण्याचे फर्मान सोडले. त्याप्रमाणे करून आम्ही आत प्रवेशकर्ते झालो आणि किल्ला पाहायला सुरुवात केली.

सावंतवाडीचे संस्थानिक 'खेम सावंत' ह्यांचा १७०९ साली मृत्यू झाल्यानंतर गादीवर बसलेले त्यांचे पुतणे 'फोंड सावंत' ह्यांनी आपल्या शासनकाळात पोर्तुगीजांना शह देण्यासाठी त्याकाळी सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखाली असलेल्या हळर्ण ह्या गावी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शापोरा नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला बांधला होता. पुढे १७४६ साली तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी किल्ल्याचे नूतनीकरण केल्याच्या खुणाही आढळतात जसे की खास पोर्तुगीज शैलीत नंतर बांधून काढलेला कॅप्सूल बुरुज.

जांभ्या दगडाचा वापर करून चहुबाजूने बांधलेली मजबूत तटबंदी, चारही कोपऱ्यांत चार बुरुज आणि बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी चढावाच्या मार्गिका अशी ह्या किल्ल्याची संरक्षणात्मक रचना आहे. आतली अनेक बांधकामे कालौघात नष्ट झाली असली तरी एक तीन खोल्यांची बैठी चाळवजा इमारत, विहीर, किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही सुस्थितीत आहेत. तसेच आजूबाजूचा परिसरही प्रेक्षणीय आहे आणि खाजगी वाहन असल्याशिवाय इथे पोचणे बरेचसे अवघड असल्याने गर्दीही नसते त्यामुळे शांतपणे आजूबाजूचा निसर्ग अनुभवत खूप मोठाही नाही आणि लहानही नाही असा हळर्ण किल्ला पाहणे हा एक छान अनुभव ठरतो.

हळर्ण किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

पहिला फोटो

शेवटचा फोटो


सुंदरसा हळर्ण किल्ला पाहून आम्ही इथून जवळपास ३० किमी अंतरावर असलेला शापोरा (Chapora Fort) हा पुढचा किल्ला पाहायला मार्गस्थ झालो.

”Map-2”/

चाळीसेक मिनिटांचा प्रवास केल्यावर चांगलीच भूक लागली असल्याने दुपारी सव्वा दोनच्या सुमारास म्हापसा येथील गोविंद फॅमिली रेस्टॉरंट येथे जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे पंजाबी थाळी आणि लस्सीचा आस्वाद घेऊन भरल्या पोटाने शापोरा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आणि साडेतीनच्या आसपास किल्ला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग लॉट मध्ये बाईक लावून टेकडी चढायला सुरुवात केल्यावर पंधरा-वीस मिनिटांत शापोरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.

”x”/

शापोरा किल्ल्याचे प्रवेशद्वार

”x”/

तटबंदीवर उजवीकडे दिसणारा कॅप्सूल बुरुज

सोळाव्या शतकात उत्तर गोव्यातील आजच्या बार्देश (बारदेश/Bardez) तालुक्यात शापोरा नदीच्या नदीमुखाजवळच्या टेकडीवर आदिलशाहीत बांधला गेलेला हा किल्ला 'शाहपुरा' नावाने ओळखला जात होता. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी त्या प्रदेशावर ताबा मिळवल्यावर त्यांच्या राजवटीत 'शाहपुराचा' अपभ्रंश 'शापोरा' असा झाला.

छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३ मध्ये हा किल्ला जिंकून घेतल्यावर दिल्लीच्या तख्तावर बसण्याच्या महत्वाकांक्षेपोटी शंभूराजांशी हातमिळवणी केलेला औरंगजेबाचा बंडखोर पुत्र 'मोहम्मद अकबर' हा १६८६ साली संभाजी महाराजांनी त्याला पर्शियाला पाठवेपर्यंत काही काळ इथे तळ ठोकून राहिला.

पुढच्या काळात किल्ल्याचा ताबा सावंतवाडी संसंस्थानाकडे गेला मात्र त्यांना केवळ दोन वर्षेच हा किल्ला आपल्या अधिपत्याखाली राखता आला. त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर १७१७ मध्ये किल्ल्याचे मोठ्याप्रमाणावर नूतनीकरण केले आणि खास पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सूल बुरुज व आणीबाणीच्या काळात निसटून जाण्यासाठी खाली समुद्र किनारा आणि शापोरा नदीच्या काठापर्यंत जाणारे भुयार असे काही वैशिष्ट्यपूर्ण बदल किल्ल्याच्या रचनेत केले.

१७४१ मध्ये सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखालील पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्याने त्यांच्या अंमलाखालील प्रदेशाची सीमा उत्तरेकडे अधिक विस्तारली गेल्याने ह्या किल्ल्याचे लष्करीदृष्ट्या महत्व कमी झाले. पुढे १८९२ मध्ये पोर्तुगीजांनी शापोरा किल्ल्याचा वापर पूर्णपणे थांबवल्यावर मात्र त्याची रया गेली असली तरी आजघडीलाही ह्या भव्य किल्ल्याच्या मजबूत तटबंदीचा बराचसा भाग, कॅप्सूल बुरुज आणि किल्याचे मुख्य प्रवेशद्वार शाबूत आहे.

पूर्ण स्वरूपातला 'किल्ला' म्हणून इथे फार काही बघायला मिळत नसले तरी ह्या प्रशस्त किल्ल्याचे आवार आणि आजूबाजूला दिसणारे समुद्र, वॅगॅटोर बीच,शापोरा नदी आणि वनराईचे नयनरम्य असे देखावे मात्र खूपच प्रेक्षणीय आहेत.

शापोरा किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

किल्ल्यावरून दिसणारा अरबी समुद्र

शापोरा नदीचे नदीमुख

किल्ल्यावरून दिसणारा वॅगॅटोर बीच

किल्ल्यावरून दिसणारा देखावा

तटबंदी

तटबंदी (शेवटचा फोटो)


शापोरा किल्ला पाहून साडेचारच्या सुमारास आम्ही आजच्या दिवसात पाहायचा ठरवलेला शेवटचा किल्ला म्हणजे 'अग्वाद किल्ला' पाहायला निघालो. सहा वाजता किल्लाप्रवेश बंद होत असल्याने अधे मध्ये कुठेही न थांबता कांडोळी (Condolim), कळंगुट (Calangute) अशा गावांतील गजबजलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत पस्तीस चाळीस मिनिटांत सतरा कि.मी. चा प्रवास पूर्ण करत किल्ल्याच्या समोरच्या पे अँड पार्क मध्ये बाईक लावून सव्वापाचच्या सुमारास तिकीट काउंटर गाठले पण प्रवेश मोफत होता.

”x”/

अग्वाद किल्ल्याचे तिकीट काउंटर

पोर्तुगीजांच्या समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराच्या सुरुवातीच्या कालखंडात हॉलंडचे रहिवासी म्हणजे 'डच' हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. ह्या डच लोकांनी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला इ.स. १६०४ मध्ये मांडवी नदीमुखात सात जहाजांच्या मदतीने पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजांची एक महिनाभर पूर्णपणे नाकाबंदी केली होती.

मांडवी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या 'रिस मागोस' (Reis Magos Fort) आणि दक्षिण किनाऱ्यावरच्या 'गॅस्पर दिआस' (Gaspar Dias Fort) ह्या पोर्तुगीजांच्या दोन्ही किल्ल्यांवर तोफा होत्या पण त्यांची मारक क्षमता कमी पल्ल्याची असल्याने नदीमुखात नांगरून ठेवलेली 'डच' जहाजे त्यांच्या निशाण्याच्या टप्प्याबाहेर होती. त्यामुळे हि नाकाबंदी भेदण्यासाठी त्यावेळी पोर्तुगीजांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

ह्या घटनेतून बोध घेऊन लगोलग त्यांनी आपली बंदरे आणि व्यापारी मार्ग सुरक्षित करण्याच्या उद्देशाने झुआरी नदीमुखावर 'मोर्मुगाओ' (मुरगाव किल्ला / Mormugao Fort) तर मांडवी नदीमुखावर 'अग्वाद' (आग्वाद किल्ला / Aguada Fort) असे दोन किल्ले बांधायला घेतले.

१६०६ साली 'अग्वाद पॉइंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरवजा टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८० मीटर्स उंचीवर बांधण्यात आलेला हा 'अग्वाद किल्ला' म्हणजे सतराव्या शतकातील पोर्तुगीज संरक्षणात्मक स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. ह्या प्रशस्त किल्ल्यातील प्रमुख आकर्षणे म्हणजे इथली पाणी साठवण्यासाठी बांधलेली विशाल टाकी आणि प्राचीन 'दीपगृह'

टीप: वरील माहिती किल्यात लावलेल्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील फलकांवर लिहिलेल्या माहितीबरहुकूम आहे, जालावर मिळणाऱ्या माहितीत सनावळींमधे तफावत आढळून येते. त्या फलकांचे फोटोज खाली स्लाईड-शो मध्ये दिले आहेत.

”Water-Tank”/

पाणी साठवण्यासाठी बांधलेली टाकी

पोर्तुगीज भाषेतील 'अग्वाद' (Aguada) शब्दाचा मराठीत अर्थ 'पाण्याचा स्रोत' असा आहे. मांडवी नदीमुखाच्या उत्तर दिशेला असलेल्या ह्या किल्ल्यात पिण्यायोग्य गोड्यापाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत. ह्या नैसर्गिक स्रोतांतून मिळणारे पाणी ह्या विशाल भूमिगत टाकीत साठवले जात असे आणि लांबच्या समुद्री सफरीवर निघालेल्या जहाजांना पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था ह्या अग्वाद किल्ल्यातून केली जात असे.

”Light-House-1”/

दीपगृह

”Light-House-2”/

दीपगृह

अग्वाद किल्ल्यात पाहायला मिळणारे १३ मीटर्स उंचीचे 'दीपगृह' (Light House) आशिया खंडातले सर्वात जुने दीपगृह मानले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी १८६४ साली हे दीपगृह बांधण्यापूर्वी 'हिल ऑफ पायलट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजीतल्या टेकडीवर मोठा जाळ पेटवून पोर्तुगीज जहाजांना मार्गदर्शन केले जात असे. काही तांत्रिक दुरुस्त्या करून शंभर वर्षांपेक्षा थोडा अधिक काळ हे दीपगृह वापरात होते. १९७६ साली किल्ल्याच्या उत्तरेकडे एक नवीन दीपगृह बांधून ते सेवेत आल्यावर ह्या प्राचीन दीपगृहाचा वापर बंद करण्यात आला.

अग्वाद किल्ल्याचे 'अप्पर अग्वाद' (१६०६ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीवरील पठारावरचा मुख्य किल्ला) आणि 'लोअर अग्वाद' (१६१२ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीच्या पायथ्याशी नदीमुख आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेला किल्ल्याचा भाग) असे दोन भाग आहेत.

लोअर अग्वादच्या दक्षिणेकडील (नदीमुखाकडील) भागाचा उपयोग 'अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार' (Antonio de Oliveira Salazar) ह्या पोर्तुगालच्या हुकूमशहाच्या राजवटीत त्याच्या राजकीय विरोधकांना कैदेत ठेवण्यासाठी इथल्या मूळच्या जुन्या छोटेखानी तुरुंगाचा विस्तार करून ह्या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कारागृह म्हणूनच केला जाऊ लागला होता.

पुढे अधिकृतपणे त्याचे रूपांतर 'अग्वाद मध्यवर्ती कारागृहात' (Aguada Central Jail) झाले आणि २०१५ सालापर्यंत हे गोव्यातले सर्वात मोठे 'मध्यवर्ती कारागृह' म्हणून ओळखले जात होते. २०१५ मध्ये इथल्या सर्व कैद्यांना कोलवाळ इथल्या मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आल्यावर गोवा पर्यटन विकास महामंडळाने हे कारागृह आपल्या ताब्यात घेतले आणि ह्या तुरुंगाचे रूपांतर आता गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पोर्तुगीज राजवटी विरोधात आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि बलिदान दिलेल्या अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून केंद्र सरकारच्या 'स्वदेश दर्शन' योजनेअंतर्गत सुमारे 22 कोटी रुपये खर्चून एक 'स्वातंत्र्य संघर्ष संग्रहालयात' करण्यात आले आहे.

१९ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीत ह्या कारागृहात ठेवण्यात आलेल्या टी. बी. कुन्हा आणि राम मनोहर लोहिया ह्या मुक्ती सैनिकांना समर्पित केलेले दोन खास सेल ह्या संग्रहालयात आहेत.

लोअर अग्वादच्या पश्चिमेकडील (अरबी समुद्राकडील) बराचसा भाग १९७४ साली सुरु झालेल्या ताज हॉटेल्स ग्रुपच्या (Taj Hotel Group) 'ताज फोर्ट अग्वाद रिसॉर्टने' (Taj Fort Aguada Resort) व्यापलेला आहे.

अग्वाद किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

पहिला फोटो

डावीकडे वरती कोपऱ्यात दिसणारे नवीन दीपगृह

डावीकडे मांडवीचे नदीमुख, समोर दोना पावलाचे भूशीर तर उजवीकडे अरबी समुद्र

किल्ल्यावरून दिसणारा देखावा

किल्ल्यावरून दिसणारा देखावा

मावळतीकडे झुकणारा सूर्य

माहिती फलक

शेवटचा फोटो


चारशे वर्षांपेक्षा जुना असूनही छान देखभाल राखली गेल्याने सुस्थितीत असलेला हा प्रेक्षणीय असा अग्वाद किल्ला पाहून साडेसहाच्या सुमारास आम्ही ३० कि.मी. वर असलेल्या करमळीला जायला निघालो. रस्त्यात काही ठिकाणी ट्राफिक लागल्याने तासाभरात मुक्कामी पोचलो तेव्हा भाऊजीही ऑफिसहून घरी आले होते. मग फ्रेश होऊन मी, भाऊ आणि भाऊजी असे तिघे आठच्या सुमारास बाहेर पडलो आणि चालत चालत करमळी रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या 'विल्शा बार अँड रेस्टॉरंट' मध्ये प्रवेशकर्ते झालो.

रुचिपालट म्हणून मालिबु (Malibu) ह्या कॅरेबियन रम बेस्ड कोकोनट लिकरच्या जोडीला आमच्या दोघांसाठी स्टार्टर म्हणून 'तंदूर लॉलीपॉप' आणि भावासाठी 'फिंगर चिप्स' अशी ऑर्डर दिली गेली. निवांत गप्पा मारत २-२ पेग्ज झाल्यावर साडेनऊच्या सुमारास आमच्या शुद्ध शाकाहारी बहीण आणि भावासाठी ह्याच हॉटेलमधून सोलकढी, पनीर पराठे आणि काश्मिरी पुलाव पार्सल घेऊन भाऊ घरी निघून गेला तर मी आणि भाऊजी जवळच असलेल्या एका गाडीवर मिळणारे 'रस-ऑम्लेट' खायला गेलो.

जुन्या गोव्यातून करमळी स्टेशनकडे येतानाच्या रस्त्यावर स्टेशनच्या अलीकडे एका स्थानिक दांपत्याचा आपल्या घरासमोर हातगाडी लावून अंडी आणि चिकनच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. बाकीचे पदार्थही चविष्ट असतात असे ऐकून आहे पण इथे मिळणारे 'रस-ऑम्लेट' विशेष प्रसिद्ध आहे. डबल किंवा सिंगल ऑम्लेटवर ओतलेला चिकनचा रस्सा आणि पाव अशा स्वरूपात मिळणारा हा पदार्थ खायला चार-पाच किलोमीटरच्या परिघात राहणारी कित्येक मंडळी नित्यनेमाने येतात. मी इथे पहिल्यांदाच हा प्रकार खाल्ला आणि मलाही तो आवडला.

खाणे झाल्यावर तिथून रमत गमत निघालो आणि साडेदहाच्या सुमारास घरी पोचलो. आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो.


क्रमश:

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Sep 2022 - 9:31 am | मुक्त विहारि

रस-ऑम्लेट, हे नांव पहिल्यांदाच ऐकले

मी पण पहिल्यांदाच 'रस-ऑम्लेट' बद्दल त्यादिवशी ऐकले होते 😀, पण ऑम्लेटचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर कांदा-टोमॅटो घालून मिसळ-पाव सारखे खाल्ले आणि आवडलेही. फक्त फरसाण ऐवजी अंड्याचे ऑम्लेट आणि उसळी ऐवजी चिकनचा रस्सा एवढाच काय तो फरक 😂

नागनिका's picture

18 Sep 2022 - 3:05 pm | नागनिका

आंब्याचा रस आणि ऑम्लेट अशी डिश माझ्या डोळ्यासमोर आली आधी :)

हे राम! आंब्याचा रस आणि ऑम्लेट ???
हे कॉम्बिनेशन कसे लागेल ह्याची नुसती कल्पना करून बघितली तरी मला कसेतरीच व्हायला लागले 😂 😂 😂

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 12:48 am | मुक्त विहारि

होऊ शकेल

एखाद्याला ते पण आवडेल

दाबेली आणि श्रीखंडाचे पाणी (ज्याला "पियुष", असे गोंडस नाव आहे.) मिटक्या मारत मारत खाणारे आणि पिणारे बघीतले आहेत ...

जाऊ दे,

दाबेली आणि श्रीखंडाचे पाणी, आवडणारे वेगळे...

टर्मीनेटर's picture

20 Sep 2022 - 11:47 am | टर्मीनेटर

दाबेली आणि श्रीखंडाचे पाणी

कल्पनातीत 😂

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Sep 2022 - 11:48 am | ॲबसेंट माइंडेड ...

सुरेख! हा भागही आवडला.
👌

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2022 - 1:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्लाईड शो मधे फोटो दाखवताना पहिला फोटो व शेवटचा फोटो अशा सुचना लिहायची कल्पना आवडली,
भटकंती आवडली आहे.
आता पुन्हा जेव्हा गोव्याला जाईन त्या आधि ही लेखमाला परत एकदा वाचणार.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

18 Sep 2022 - 3:11 pm | टर्मीनेटर

ॲबसेंट माइंडेड ...आणि पैजारबुवा
प्रतिसादासाठी मनःपुर्वक आभार 🙏

@ पैजारबुवा

स्लाईड शो मधे फोटो दाखवताना पहिला फोटो व शेवटचा फोटो अशा सुचना लिहायची कल्पना आवडली

पुन्हा पुन्हा तेच फोटो पहिले जाऊ नये म्हणून टाकले तसे कॅप्शन्स 😊 पण तुम्ही त्याची दखल घेतलीत हे बघून त्या कल्पनेचे सार्थक झाले 🙏

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2022 - 5:35 pm | चौथा कोनाडा

फोटो दाखवताना पहिला फोटो व शेवटचा फोटो अशा सुचना लिहायची कल्पना आवडली,

+ १

हेच बोल्तो !

मस्तच!अग्वाद भारी आहे.
इतक्या मोठ्या अंतराने भटकंती लेख लिहिताय,तरी तुम्हाला सगळं छान लक्षात आहे अगदी काय मेनू होता तेही :)
सच्चे भटके(प्रवासी) :)

टर्मीनेटर's picture

18 Sep 2022 - 4:19 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी मनःपुर्वक आभार 🙏

इतक्या मोठ्या अंतराने भटकंती लेख लिहिताय,तरी तुम्हाला सगळं छान लक्षात आहे अगदी काय मेनू होता तेही :)

ह्यात स्मरणशक्तीचा कमी, आणि तंत्रज्ञानाचा जास्ती वाटा आहे 😊

पूर्वी लोकांना अशा छोट्या छोट्या तपशिलांसाठी रोजनिशी किंवा टिपणे लिहावी लागत होती, आता तंत्रज्ञानामुळे असा खटाटोप करावा लागत नाही!
मला प्रवासवर्णन लिहिताना व्हॉटसऍप, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर त्या-त्या वेळी घरच्यांना किंवा मित्रमंडळींना पाठवलेले मेसेजेस, फोटो, व्हिडीओ, खरडलेल्या पोस्ट्स आणि गुगल मॅप्सची टाइमलाईन अतिशय उपयुक्त ठरतात.
त्यात माझे खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड नखरे असल्याने बाहेर असताना मी काय खातो-पितो ह्याविषयी घरच्यांना प्रचंड उत्सुकता असते त्यामळे त्यांना अशा गोष्टींचे रिपोर्टींग चालूच असते 😀. त्या मेसेजेसचाही लेखनात उपयोग होतो, फक्त हे असले किरकोळ वाटणारे मेसेजेस डिलिट न करता त्यांचा बॅकअप ठेवला कि पुरेसे होते!

अरे वा!
वाचताना हाच विचार करत होतो की इतक्या बारीकसारीक गोष्टी कशा आठवल्या..

रस ऑमलेट पाच सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा खाल्ले आणि नंतर परत परत खाल्ले. एअरपोर्ट रस्त्यावर कॅफे गोवा मध्ये हा प्रकार मिळतो. ओरिजिनल च्या किती जवळ आहे, माहिती नाही, पण हा प्रकार मला खूप आवडला.
(तो रस्सा शाकुती असतो, असं त्या कॅफेमध्ये कळलं. खखो गोयंकरांना माहिती!)

एअरपोर्ट रस्त्यावर कॅफे गोवा मध्ये हा प्रकार मिळतो

पुण्यात विविध खाद्यससंस्कृतींमधले पदर्थ बऱ्यापैकी मिळतात, अर्थात ऑथेंटिक चवीत आणि पुण्यात मिळणाऱ्या त्या पदार्थांच्या चवीत बरीच तफावत असते असे माझे वैयक्तिक मत! पण तुम्हाला आवडलंय म्हणताय मग कधी एअरपोर्ट रस्त्यावर येणे झाले तर 'कॅफे गोवा' मधले रस ऑम्लेट नक्कीच ट्राय करण्यात येइल 👍

कुमार१'s picture

17 Sep 2022 - 3:56 pm | कुमार१

सुरेख! हा भागही आवडला.

Nitin Palkar's picture

17 Sep 2022 - 7:45 pm | Nitin Palkar

ओघवती भाषा, सविस्तर पण नेमके वर्णन, अभ्यासपूर्ण माहिती आणि अतिशय सुंदर प्रकाश चित्रे ही तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. हा भागही सुंदर.

नागनिका's picture

18 Sep 2022 - 3:07 pm | नागनिका

दीपगृह मस्त

टर्मीनेटर's picture

18 Sep 2022 - 4:01 pm | टर्मीनेटर

कुमार१ | Nitin Palkar | नागनिका

प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏

हो हे असे एकतर जरा विचित्रच लागेल खरे .. परंतु आपण जसे वेगवेगळ्या संस्कृतीतील पदार्थ अनुभवतो तेवहा असे जाणून येते कि अरेच्या असेही एकत्रीकरण करता येते कि !
काही अनुभव
- साधारण पने दही आणि लिंबू एकाच पदार्थात वापरले जात नाही ( विशेष म्हणजे कोशिंबिरीत) पण ग्रीक ताझिकि नामक काकडीचं कोशिंबिरीत ते असते ,चांगली लागते अशी कोशिंबीर
- अननस आणि चिकन बर्गर हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा कसेसेच वाटले पण पुढे खाल्यावर काही एवढे वाईट लागले नाही
- मोदकाचा उलट प्रकार ( मलेशियात ) पहिला म्हणजे जपानी निगिरी मध्ये जसे भाताच्या लादीवर माशाच्या तुकडा किंवा इतर पदार्थ ठेवतात तसे तांदुळाच्या उकडीचं आयताकृती लादीवर खोबरं आणि गुळाचे सारण थापले होते ( गुल नसून कदाचित पाम ची साखर असवि )
- गार भात आणि कच्चा मासा ! ( सुशी) ऐकूनच कसे तरी वाटायाचे ... पण मग सवय झाली ( अगदीच गारढोण असेल तर ते जरा खोलीचे तापमानाला आणून मग खाल्ली तर जास्त चांगली
- केळे घातलेला शिरा येवधीच सवय परंतु दाक्षिणात्य लोक अननस , द्राक्षहि घालतात .. अगदीच वाईट लागत नाही
- आंब्याच्या लोणच्या च्या खारात मुरविलेली कोंबडी ...

दही आणि लिंबू एकाच पदार्थात वापरले जात नाही ( विशेष म्हणजे कोशिंबिरीत) पण ग्रीक ताझिकि नामक काकडीचं कोशिंबिरीत ते असते ,चांगली लागते अशी कोशिंबीर

+१
दही आणि लिंबू एकत्रपणे वापरलेली 'काकडीची' आणि 'गाजर + टोमॅटो' च्या कोशिंबीरी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खल्ल्या आहेत, त्या पण छान लागतात चवीला.

अननस आणि चिकन बर्गर हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा कसेसेच वाटले पण पुढे खाल्यावर काही एवढे वाईट लागले नाही

२०१३ मध्ये कामानिमित्त दोन दिवसांचा चीन दौरा झाला होता. चीन मधले जेवण एकंदरीतच अतिशय बेचव असल्याने त्यावेळी शांघाय शहरातील एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये त्यातल्या त्यात परिचयाची म्हणून 'चॉप्सी' (भारतात 'चायनीज चॉप्सी' नावाने मिळणारा त्यातल्यात्यात स्पायसी चायनीज खाद्यपदार्थ) मागवली होती.
तिथे तो पदार्थ वरती साधारण पाऊण इंच जाडीचा अननसाचा स्लाइस ठेऊन सर्व्ह केला होता. चॉप्सी अतिशय बेचव होती पण तो अननसाचा तुकडाच त्यावेळी प्रचंड चविष्ट वाटला होता 😀 बाऊलभर अननसाचे काप आणि त्यावर टॉपिंग म्हणून थोडासा तो चॉप्सी नावाचा पदार्थ अशा स्वरूपात ती डिश मिळाली असती तर फार बरे झाले असते असे वाटून गेले!

- केळे घातलेला शिरा येवधीच सवय परंतु दाक्षिणात्य लोक अननस , द्राक्षहि घालतात .. अगदीच वाईट लागत नाही

+१ हे छान लागते.
अननस व पेरुचे बारीक तुकडे आणि द्राक्षे घालुन नुसता भात खाणारी एक दाक्षिणात्य व्यक्ति परीचयाची आहे !
बाकीचे तुम्ही सांगीतलेले पदार्थ जसे की 'मलेशीयन मोदकाचा उलट प्रकार', 'भाताच्या लादीवर माशाच्या तुकडा किंवा इतर पदार्थ ठेवलेली जपानी निगिरी' आणि 'गार भात आणि कच्चा मासा! ( सुशी)' खाणे तर दुरच पण नुसती त्यांची चव घेउन बघणेही माझ्या आवाक्याबाहेरचे आहे 😂

असो, प्रत्येकाची आपापली वैविध्यपुर्ण खाद्यसंस्कृती आणि आवडी-निवडी...अजून काय.
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

चौकस२१२'s picture

20 Sep 2022 - 2:16 pm | चौकस२१२

चीन च्या दौऱ्यात मला तरी जेवण बेचव असे वाटले नाही ....
म्हणजे इथे जे सर्वसाधारण चिनी जेवण मिळते ते पाश्चिमात्यांसाठी थोडे मवाळ असते त्या मानाने प्रत्यक्ष चीन मध्ये तरी जेवण बऱ्यापैकी चविष्ट होते

पाहूणा असल्यामुळे आणि बहुतेक मला खादाडी आवडते हे त्यांना माहिती झाल्यामुळे रोज चीन मधील वेगळ्या प्रांतातील उपहारगृहात वरात निघायायची
त्यातील शेझवान नक्की आठवते, जवळ जवळ प्रत्येक पदार्थात तांबदड्या सुक्या मिरची चा वापर ठळक होता
तळलेलया तांबड्या अख्या मिरच्या ताटलीभर पसरलेलया आणि त्यावर भाजलेलं वेगवेगळे मासाचे तुकडे (शंख /ईल वगैरे ) ... त्याल त्या मिरचीची धुरी लागलेली .. अहाहा ...
खाऊ त्यांच्या देशा ....

प्रत्येकाची आपापली वैविध्यपुर्ण खाद्यसंस्कृती आणि वैयक्तिक आवडी-निवडी...अजून काय!
मझ्यासारख्या (अळणी जेवण बिलकुल पसंत नसलेल्या) माणसाला परदेशात उपासमार टाळ्ण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, केएफसी, डॉमिनोज अशा आंतरराष्ट्रीय उपाहारगृहांच्या साखळ्या फार मोठा आधार वाटतात.

परदेशात उपासमार टाळ्ण्यासाठी
दोन तीन कल्पना देतो भारताबाहेर विशेष करून पाश्चिमात्य देशात जर जेवण मिलमिलीत वाटत असेल तर )
- इंडोनेशियन जेवण जर मिळाले तर ते भारतीय जेवणाच्या जवळचे असते
-जवळ तंबास्को बाळगणे हे अर्थात सर्वश्रुत आहेच
- मेक्सिकन साल्सा मध्ये जहाल तिखट मागवत जा ( हॉलॅपिन्यो मिरचं चे काही असेल तर ते घेत जा )
- आशियाई ( चिनी/ मले / सिंगापोर / थाई ) पद्धतीच्या उपहारगृहात मी नेहमी १ गोष्ट मागवतो ते म्हणजे सोया सौस मध्ये कापलेल्या तांबड्या बर्डस आय मिरच्यांचे काप ,, जसे भारतीय चिनी उपहारगृहात व्हिनेगर मध्ये हिरव्या मिर्चांचे काप स्टेट तसे ) हा पण जर मशायचा गंध आजबात म्हणजे अजिबात आवडता नसेल तर या अश्या मध्ये मध्ये चुकून ते फिश सौस घालणार नाहीत ना हे मात्र बघा
- जपानी वसाबी
तळटीप
अर्थात वैयक्तिक आवडी-निवडी. हे आहेच आणि वर्षनुवर्षे ज्याची सवय त्याने जे समाधान मिळते त्याला पर्याय नाही .. हे खरे त्यात दुमत नाही .. फक्त सर्वसाधारान "सर्वत्र प्पर देशात संपक अन्न आणि उपासमारी होतेच" असे नाही एवढेच म्हणणे आहे

अनिकेत वैद्य's picture

19 Sep 2022 - 10:36 am | अनिकेत वैद्य

गोवन पदार्थ म्हणले कि बरेचदा केवळ फिश करी राईस किंवा माश्याचे बरेचसे प्रकार बहुतेकांना माहित असतात. पण एखाद्या अस्सल गोवेकराला विचाराल तर तो/ती अनेक वेगवेगळे पदार्थ सांगेल.
रॉस/रस ऑम्लेट हा तसाच एक पदार्थ.
अ. ज्या दिवशी मांसाहार वर्ज असेल अश्या दिवशी वेगवेगळ्या भाज्यांची 'कापं' करण्याची पद्धत आहे. म्हणजे बटाटा, वांगं, कांदा किंवा इतर भाजी ची चकत्या करून मसाला लावून तांदळाच्या पिठात/ रव्यात घोळवून शॅलो फ्राय करणे. (फिश फ्राय ची शाकाहारी आवृत्ती)
ब. पोर्तुगीजांनी आणलेला बिबिन्का हा नारळ, अंडे, गुळ वापरून केलेला गोड पदार्थ
क. केवळ मार्च, एप्रिल महिन्यात केले जाणारे आणि मिळणारे 'उराक' हे अल्कोहोलयुक्त पेय. ह्या पेयाची शेल्फ लाईफ जेमतेम २, ३ महिन्याची असल्याने वर्षभर मिळत नाही.

अजूनही अनेक पदार्थ असतील, मला माहित असलेले सांगितले.

ज्या दिवशी मांसाहार वर्ज असेल अश्या दिवशी वेगवेगळ्या भाज्यांची 'कापं' करण्याची पद्धत आहे. म्हणजे बटाटा, वांगं, कांदा किंवा इतर भाजी ची चकत्या करून मसाला लावून तांदळाच्या पिठात/ रव्यात घोळवून शॅलो फ्राय करणे. (फिश फ्राय ची शाकाहारी आवृत्ती)

वांग्याचे अशाप्रकारे काप आपल्या महाराष्ट्रातही केले जातात, गोव्यात बटाटा आणि कांद्याचेही करतात हे नव्हते माहीत!

पोर्तुगीजांनी आणलेला बिबिन्का हा नारळ, अंडे, गुळ वापरून केलेला गोड पदार्थ

मला आवडतं 'बिबिन्का' खायला!

केवळ मार्च, एप्रिल महिन्यात केले जाणारे आणि मिळणारे 'उराक' हे अल्कोहोलयुक्त पेय. ह्या पेयाची शेल्फ लाईफ जेमतेम २, ३ महिन्याची असल्याने वर्षभर मिळत नाही.

गोव्याची 'उराक' हे माझे प्रचंड आवडते पेय आहे! ('उराक' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात देखील गुपचुप काढली जाते 😀. मुळचे 'झाराप' आणि 'कसाल' चे असलेले दोन मुंबईकर मित्र मे महिन्यात गावाहुन येताना चांगले पाच लिटरचे कॅन भरुन घेउन येतात.) फेब्रुवारीच्या उत्तरर्धापासुन एप्रिलचा पुर्वार्ध हा तिचा मुख्य सिझन! (काही वेळा आंब्याप्रमाणे मोहर उशिरा आल्यास किंवा काजुची बोंडे नैसर्गिकरीत्या झाडावर लवकर न पिकल्यास तो लांबतो). बाकी बाटलीबंद स्वरुपात गोव्यातील वाईनशॉप्स मधे वर्षभर 'उराक' मिळते पण त्यात बिलकुल मजा नाही! ह्या लेख मालिकेच्या सहाव्या भागात उल्लेख केलेला माझ्या बायकोचा मामा त्याच्या मित्राच्या डिस्टीलरीतुन एप्रिल-मे महिन्यातील त्याच्या मुंबई भेटीत दरवर्षी आठवणीने माझ्यासाठी 'उराक' घेऊन येतो 😊

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

पोर्तुगीजांनी आणलेला बिबिन्का हा नारळ, अंडे, गुळ वापरून केलेला गोड पदार्थ
असाच काहीसा डच लोकांनी इंडोनेशियात आणलेला हा पदार्थ बघा ...
https://en.wikipedia.org/wiki/Kue_lapis

इंटरेस्टींग... पण लिंक वरच्या माहीती वरुन हा पदार्थ डचांनी इंडोनेशियातुन नेदरलँडमधे नेल्याचे वाटतंय. चु.भु.द्या.घ्या.
Kue lapis:
Place of origin- Indonesia
"Kue lapis is an Indonesian kue, or a traditional snack of steamed colourful layered soft rice flour pudding. In Indonesian lapis means "layers". This steamed layered sticky rice cake or pudding is quite popular in Indonesia, Suriname (where it is simply known as lapis) and can also be found in the Netherlands through their colonial links."

श्वेता२४'s picture

19 Sep 2022 - 11:16 am | श्वेता२४

प्रवासवर्णन लिहीण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. कारण सर्व तपशीलवार वर्णन,नकाशे, फोटो, खाद्यसंस्कृती या सर्वांमुळे त्या भूभागाचा योग्य परिचय होतो. मीही यापूर्वी गोव्याला गेली आहे. परंतु विशिष्ट लोकप्रिय ठिकाणेच पाहिली. तुमच्या लेखमालेमुळे उर्वरीत गोव्याचाही परिचय झाला. धन्यवाद.

@ श्वेता२४,
तुम्ही सर्व भाग सलग वाचुन काढलेत हे वाचुन आनंद झाला!
उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2022 - 5:36 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात !
सुंदर प्रचि आणि सुरेख भटकंती वर्णन !

तुमच्या बरोबर किल्यांची सफर झाल्याचा अनुभव आला !

MipaPremiYogesh's picture

19 Sep 2022 - 5:56 pm | MipaPremiYogesh

हा पण भाग मस्त झाला आहे. तपशीलवार लिहिल्याने आणि slideshow असल्याने चार चांद लागले... मस्त

किल्ल्यांची सफर खूपच आवडली. वर्णन आणि फोटो एकदम सुरेख. आग्वाद आणि शापोरा पाहिलेले असल्याने ही भटकंती अगदीच भिडली.
शापोरा किल्ल्यावर आधी फारसे कुणी जात नसत. पण 'दिल चाहता है' सिनेमात ह्या किल्ल्याचे नेत्रसुखद चित्रीकरण आल्यामुळे हा किल्ला एकाएकी पर्यटकांच्या नकाशावर आला आणि आता इथे कायम गर्दी असते

उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

शापोरा किल्ल्यावर आधी फारसे कुणी जात नसत. पण 'दिल चाहता है' सिनेमात ह्या किल्ल्याचे नेत्रसुखद चित्रीकरण आल्यामुळे हा किल्ला एकाएकी पर्यटकांच्या नकाशावर आला

'दिल चाहता है' ह्या २००१ साली आलेल्या सिनेमानंतर शापोरा किल्ल्यावर हौश्या-नवश्या पर्यटकांची वर्दळ वाढली हे नक्की, पण त्या आधीही 'अग्वाद', 'शापोरा' आणि 'रीस मागोस' हे तीन किल्ले 'गोवा साईट सिइंग' टुरच्या कार्यक्रमात समाविष्ट असायचे. त्यातल्या अग्वाद किल्ल्यावर सर्वात जास्त पर्यटक संख्या असली तरी शापोरा किल्ल्यावरही बऱ्यापैकी पर्यटकांची उपस्थिती असायची हे मी माझ्या १९९६ ते २००२ ह्या सात वर्षात एका विशिष्ट कारणासाठी दरवर्षी गोव्यात सुमारे पंधरवडाभर मुक्काम केला होता तेव्हाच्या अनुभवावरुन सांगु शकतो. त्याविषयीची काही माहिती पुढच्या भागातल्या थोड्या स्मरणरंजनात येइलच 😀

हे रोचक आहे. दिल चाहता पूर्वी शापोर्‍याचे नाव कधी फारसे ऐकण्यात आले नव्हते. तुमच्या स्मरणरंजनाची वाट पाहतो आहेच.

तुमच्या स्मरणरंजनाची वाट पाहतो आहेच.

फार गमतीशीर आहेत तेव्हाच्या आठवणी, कॉलेज कुमार असतानाच भरपुर अय्याशी करण्याची सुरुवात तिथुनच झाली होती 😂

टर्मीनेटर's picture

20 Sep 2022 - 10:55 am | टर्मीनेटर

चौथा कोनाडा | MipaPremiYogesh
प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2022 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळे फोटो आणि वर्णने चाळतोय. फोटो स्लाइडची आयडीया भारीय. आवडली.
फोटो पाहतोय सध्यापूरते. चालू ठेवा....!

-दिलीप बिरुटे

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

फोटोंच्या स्लाईड-शो चा वापर ह्या आधी 'ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव.' आणि 'दुबई : मरूभूमितले नंदनवन' ह्या लेख मालिकांच्या काही भागांमध्येही केला होता. कार्यबाहुल्यामुळे कदाचित ते भाग आपल्या वाचनातुन निसटले असावेत.

एक_वात्रट's picture

20 Sep 2022 - 1:57 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णन नेहेमीप्रमाणेच सुंदर! आपल्या लेखांसाठी नवनवीन विशेषणे शोधण्याचा आता कंटाळा आल्यामुळे सध्यातरी एवढेच म्हणतो. रस आम्लेट वर्णन ऐकून भलतेच छान वाटते आहे, आता गोव्यात गेल्यावर खायला हवे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

20 Sep 2022 - 2:09 pm | टर्मीनेटर

उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रस आम्लेट वर्णन ऐकून भलतेच छान वाटते आहे, आता गोव्यात गेल्यावर खायला हवे.

जरुर खाउन बघा, नक्कीच आवडेल.

श्वेता व्यास's picture

20 Sep 2022 - 4:04 pm | श्वेता व्यास

सर्व भाग वाचले. फोटो, प्रवासवर्णन आणि खादाडीही सुरेख. आपणच जणू कोकण गोव्यात निवांतपणे फिरतोय असं जाणवतंय वाचताना.

अरे वाह! काल 'श्वेता२४' ह्यांनी आणि आज 'श्वेता व्यास' म्हणजे तुम्ही सर्व भाग वाचलेत, भारी योगायोग आहे हा 😊

उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

श्वेता व्यास's picture

20 Sep 2022 - 7:12 pm | श्वेता व्यास

भारी योगायोग आहे हा खरंच की!
मी कालपासूनच वाचतेय पण आज पूर्ण झाले :)

कपिलमुनी's picture

20 Sep 2022 - 8:46 pm | कपिलमुनी

स्लाईड शो ची कल्पना आवडली . कसे केलेत याबाबत सेपरेट धागा काढा

मुनिवर्य याबाबत चार वर्षांपूर्वी खालचे दोन सेपरेट धागे काढले होते,

पण हाय रे दैवा... त्यावेळी त्यातले काही कोड्स माझ्या सर्वर वरून iframe द्वारे इथे धाग्यात दर्शवले होते. मागे सर्वर अपग्रेड केला तेव्हा काही गोष्टी बदलल्यामुळे आता ते कोड्स धाग्यात दिसत नाहीयेत 😞
हरकत नाही, ही मालिका आणि दिवाळी अंकाचे काम संपले कि पुन्हा ते धागे नव्याने अपडेट करतो.

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रंगीला रतन's picture

21 Sep 2022 - 4:30 pm | रंगीला रतन

वर्णन भारीच!!! फोटू एक नंबर \m/
पुभाप्र.

सुरेख वर्णन! सुंदर फोटो!! मजेदार लेख!!!
.

तर्कवादी's picture

23 Sep 2022 - 4:02 pm | तर्कवादी

तुमच्या स्लाईडशोवरील अद्ययावत धाग्याची प्रतिक्षा करत आहे

कॅलक्यूलेटर's picture

23 Sep 2022 - 5:49 pm | कॅलक्यूलेटर

स्लाईड शो ची कल्पना आवडली . कसे केलेत याबाबत सेपरेट धागा काढा - खूप फोटो अपलोड करण्यापेक्षा हे कमी वेळखाऊ असेल असे वाटते. या धाग्याच्या प्रतीक्षेत

रंगीला रतन|अथांग आकाश| तर्कवादी | कॅलक्यूलेटर
प्रतिसादासाठी आपले मन:पुर्वक आभार 🙏

‘स्लाईड शो’ वरील जुने धागे लवकरच अपडेट करतो.

नचिकेत जवखेडकर's picture

28 Sep 2022 - 12:40 pm | नचिकेत जवखेडकर

येक लंबर फोटू अन वर्णन!!

गोरगावलेकर's picture

19 Oct 2022 - 4:07 pm | गोरगावलेकर

नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि वर्णन.