सोने : चकाकती प्रतिष्ठा !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
13 Sep 2017 - 4:23 pm

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.

सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा सुवर्णरोख्यामध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे.
भौतिक स्वरूपातील सोन्याला पर्यायी गुंतवणूक म्हणून केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना दोन वर्षांपूर्वी आणली.सध्याच्या नियमानुसार, या सुवर्ण रोख्यांत एका वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५०० ग्रॅमपर्यंतच गुंतवणूक करता येत होती. आता दर आर्थिक वर्षांसाठी व्यक्तींना ४ किलो, हिंदू अविभक्त कुटुंबाला (एचयूएफ) ४ किलो, तर सरकारने मान्यता दिलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांना २० किलोंपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे.

सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. ).
*************************************

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सहमत आहे. सोन्यासारख्या अर्थव्यवस्थेला भार ठरणाऱ्या गुंतवणुकीपासून खऱ्या देशभक्तांनी दूर राहिले पाहिजे. दुसरे म्हणजे सोने मिळविण्यासाठी पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केले जाते. एक ग्रॅम सोने मिळविण्यासाठी किती टन माती उपसावी लागते हे पाहिल्यास 'say no to dirty gold' असे साहजिकच म्हणावेसे वाटणार.

कुमार१'s picture

13 Sep 2017 - 8:54 pm | कुमार१

एस, आभार .
१ ग्रॅम सोने मिळविण्यासाठी किती टन माती उपसावी लागते हे पाहिल्यास 'say no to dirty gold' असे साहजिकच म्हणावेसे वाटणार.>>>>+१

वकील साहेब's picture

14 Sep 2017 - 11:30 am | वकील साहेब

ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. तर मग त्याला 500 ग्रॅम किंवा ४ किलो ची मर्यादा का आहे?

पगला गजोधर's picture

14 Sep 2017 - 11:51 am | पगला गजोधर

भारतीय (स्त्री / पुरुष), सोन्याच्या हव्यासा पोटी, परकीय चलन देऊन भारतात आयात करावे लागणारे सोन्याच्या, जास्ती नादी लागू नये म्हणून.
खनिज तेल पेट्रोलियम पदार्था नंतर, माझ्या वैयक्तिक मते, भारत हा परकीय गंगाजली सोन्याच्या आयातीवर करत असावा...

अत्रन्गि पाउस's picture

14 Sep 2017 - 12:24 pm | अत्रन्गि पाउस

गेली ५००-७०० किंवा त्याहून जास्त वर्षे ५-१० किलो सोने बाळगून असलेला माणूस हा श्रीमंत किंवा सुस्थितीतला धरला जातो, फक्त भारतात नाही तर बहुतेक सर्व जगात....

आजही धरला जाईलच

असे भाग्य दुसऱ्या कुठल्याही कमोडीटी ला जागतिक लेव्हल ला लाभलेले नाही ....

त्यामुळे अर्थशास्त्रीय तज्ञांचे म्हणणे काहीही असले तरी सर्व सामान्य माणसाला सोन्याचे मोल हे

सोन्याचेच

राहील

कुमार१'s picture

14 Sep 2017 - 12:34 pm | कुमार१

सर्वांचे आभार. हा विषय बहु पदरी आहे.
विविध प्रतिसादांचे स्वागत.

भारतातील सुवर्णरोख्यांसंबंधी एक बातमी खालील दुव्यावर वाचता येइल :
http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-76730
त्यातले दोन महत्वाचे मुद्दे :
१. याआर बी आय च्या या योजनेत ५४०० कोटी रु. जमा झाले आहेत.
२. गेल्या वर्षी या योजनेमुळे सोन्याच्या आयातीत १०% घट झालेली आहे.
तज्ञांनी अधिक माहिती दिल्यास आवडेल

कुमार१'s picture

25 Jun 2018 - 6:54 pm | कुमार१

अलीकडे जागतिक सुवर्ण परिषदेने जाहीर केलेली भारतातील सोन्याच्या मागणीबद्दल ची माहिती वाचली.

२०११ च्या सुरवातीला आपली वार्षिक मागणी १००० टन होती. आज ती ७५० टन इतकी घसरली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख.

सोन्याचे आकर्षण जगभर आहे... पण भारतात ते वेड म्हणावे इतके जास्त आहे.

विशेषतः भारतात, "अडीअडचणीसाठीची गुंतवणूक" हे कारण सांगून सोने घेतले जाते. मात्र, अडचणीच्या वेळेस "सोने विकणे अशुभ" असे म्हणून इतर सर्व उपाय थकल्यावरच नाईलाजाने सोने विकण्याचा विचार केला जातो. म्हणजे सोने हे राहत्या घरासारखी "भावनिक" खरेदी झाली... दोन्हीही गुंतवणूक नसतात... कारण, कागदावर त्यांची किंमत कितीही वाढली तरी ती वसूल करण्याला नेहमीच भावनिक विरोध असतो.

जी गोष्ट योग्य त्या किंमतीत हवी तेव्हा विकत घेऊन, किंमत हवी तेवढी वाढल्यावर कोणत्याही भावनिक अडथळ्याशिवाय विकून फायदा काढून घेता येतो, केवळ अश्याच गोष्टीच्या खरेदीला गुंतवणूक म्हणता येईल. सोन्याच्या बाबतीत, फार कमी भारतीय माणसांकडून ही अट पाळली जाते... त्यामुळे, भारतात सोने ही गुंतवणूक कमी आणि साठेबाजीचा छंद जास्त आहे.

अगदी घरटी १० ग्रॅम पासून ते श्रीमंताच्या घरी अनेक किलोपर्यंत असलेल्या सोन्याची बाजारभावाने किंमत काढली, तर संपूर्ण भारतात कित्येक वर्षे किती अनुत्पादक संसाधन (नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट) पडून आहे याची कल्पना यावी ! एका अंदाजाप्रमाणे, भारतात असे US$८०० बिलियन (सद्याच्या विनिमय दराने सुमारे रू५४ लाख कोटी) किंमतीचे २४,००० टन सोने पडून आहे. हा आकडा भारताच्या जीडीपीच्या सुमारे १/३ आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यात रिझर्व बँकेचे ५५७.७ टन आणि इतर ठिकाणचे ज्ञात हक्क/साठे मिळवले तर त्या सगळ्यांचे मूल्य भारताच्या जीडीपीच्या निम्मे होते म्हणजे सुमारे US$१२०० बिलियन होईल.

भारताची २०१७-१८ ची वित्तिय तूट US$१३.५ बिलियन इतकी होती. जर वर सांगितलेले सोन्याच्या रुपातल्या खाजगी अनुत्पादक संसाधनापैकी (नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट) निम्मे वापरात आले तर, त्याच्या चलनवलनाने निर्माण होणार्‍या सरकारी उत्पन्नाने, ही तूट चुटकीसरशी भरून निघेल. मात्र, भारत लोकशाही असल्याने, लोकांच्या खाजगी सोन्याबद्दल तशी काही सूचना करणेही राजकिय भूकंप घडवून आणेल !

जेम्स वांड's picture

26 Jun 2018 - 4:53 pm | जेम्स वांड

कुठून कुठून आणता राव असली अद्ययावत माहिती, तुमच्या बहुश्रुततेचं कौतुक करावे तितके कमीच आहे.

देवस्थान मंदिरे, इत्यादी मध्ये पडलेले सोने ह्यात ऍड केले आहे का? त्यांच्यावर तुमचं मत काय आहे? ह्याविषयी तुमच्या महितीप्रचुर शैलीत एखादी कॉमेंट वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2018 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

देवस्थान मंदिरे यांचे अंदाजे/ज्ञात सोने इतर ठिकाणचे ज्ञात हक्क*/साठे यात समाविष्ट आहे. बर्‍याच मोठ्या मंदिरांच्या धनाबद्दल सहजरित्या माध्यमात चर्चा होते, त्यांच्या संपत्तीची उघड मोजदाद होते, किंवा त्यांना सहज सरकारी अधिकार्‍यांच्या प्रशासनाखाली आणले जाते (उदा : केरळमधील पद्मनाभमंदीर, तिरुपती बालाजी मंदीर, इ), त्यामुळे त्यांच्या सोन्यासंबंधी माहिती काहीश्या विश्वासू अंदाजाने सांगता येते. मात्र, हे सर्व धर्मसंस्थांबाबत करा असे म्हटले तर राजकिय भूकंप होऊन भारतिय लोकशाही घोक्यात येईल ;) , त्यामुळे त्यांच्या सोन्याबद्दल अंदाज शक्य नाही.

असे काही असले तरी, राजकारण सोडून, केवळ अर्थकारणाच्या रुपात बघितले तर, घराच्या/संस्थांच्या किंवा बँकेच्या लॉकर्समध्ये पडलेल्या सोन्याचा काही भाग खेळत्या अर्थव्यवस्थेत आला तरी खूप फरक पडेल.

दोनेक वर्षांपासून सरकारने असे सोने खेळत्या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी एक डिपॉझिट/बाँड योजना जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी देवस्थानाने तिचा वापर करून (SBI Gold Scheme) बँकेत अगोदरच ठेवलेल्या सोन्यात १,३११ किलो सोन्याची भर टाकली होती आणि त्यांचा बँकेतील सोन्याचा आकडा ५ (पाच) टनापर्यंत वाढवला होता. इतर काही देवळांनीही कमीजास्त प्रमाणात योजनेत सहभाग घेतल्याच्या बातम्या पाहिल्याचे आठवते. हिंदू देवस्थानाच्या व्यवस्थापनात राज्यसरकारच्या नेमणूका होत असल्याने हे असे काही शक्य होते. इतर धर्माच्या कोणत्या संस्थेने या योजनेचा उपयोग केल्याचे माध्यमांत तरी नजरेस आलेले नाही.

कुमार१'s picture

25 Jun 2018 - 9:33 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल आभार !

कुमार१'s picture

26 Jun 2018 - 7:00 pm | कुमार१

सरकार भौतिक सोन्याऐवजी सुवर्ण रोखेसाठी उत्तेजन देत आहे. वैयक्तिक पाळीवर आपण असे करू शकतो आणि त्यातून
खालील बदलांची अपेक्षा क्रमाक्रमाने ठेवू शकतो:

दागिन्यांची कमी खरेदी >> गुंतवणुकीसाठी सुवर्णरोख्याना प्राधान्य >> गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांचा अधिकाधिक विचार >> दागिन्यांचे प्रदर्शन ही जी उपजत प्रवृत्ती आहे, त्याबाबतीत आत्मपरीक्षण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2018 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत. तसे केल्यास सोन्याशी असलेला भावनिक दुरावा जरा तरी दूर होऊन त्याच्याकडे गुंतवणूकीच्या दृष्टीने पाहणे सोपे होईल.

मार्मिक गोडसे's picture

27 Jun 2018 - 4:12 pm | मार्मिक गोडसे

ह्याच विषयावर इथे भरपूर चर्चा झाली होती.

गामा पैलवान's picture

27 Jun 2018 - 5:19 pm | गामा पैलवान

डॉ सुहास म्हात्रे,

युरोपीय राष्ट्रे प्रत्यक्ष सोन्याची मागणी करू लागलीत : https://www.rt.com/business/422200-death-knell-euro-gold/

डॉईश बँकेची परिस्थिती हलाखीची आहे. संभाव्य पेचप्रसंगाचा मुकाबला म्हणून जर्मनीच्या केंद्रीय बँकेने ५८३ टन सोनं मागवलं आहे : https://www.zerohedge.com/news/2018-06-22/why-germany-repatriated-583-to...

कठीण समय येता कोण कामास येतो? (उत्तर : खरंखुरं सोनं)

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2018 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. राष्ट्रांच्या बाबतीत सोने की भावनिक नाही तर भांडवली (अ‍ॅसेट) गुंतवणूक असते... त्यामुळे ही मागणी माझा मुद्दा बळकतच करत आहे.

युरोपियन सेंट्रल बँका अमेरिकेकडे ठेवलेले सोने परत मागवत आहे त्याची कारणे फार वेगळी आहेत... त्यांचा रोख अमेरिकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेकडे व राजकिय पतीकडे आहे.

(अ) सोने ठेवून घेतलेले कर्ज फेडून बरीच वर्षे झाली आहेत,
(आ) ज्याच्या हातात ते सोने आहे तो कर्जबाजारी झाला आहे,
(इ) त्याचाशी पूर्वी घट्ट असलेले प्रेमसंबंध आता बिघडलेले आहेत, आणि
(ई) त्याची राजकिय-सामरीक वट सद्या खूप घसरलेली आहे...
अश्या माणसाकडे तुमचे सोने असले तर तुम्ही काय कराल ?... तेच युरोपियन राष्ट्रे करत आहेत. :)

२. राष्ट्रिय सोन्याची तुलना वैयक्तिक सोन्याशी करता येत नाही. भारतिय लोकांची वैयक्तिक सोने खरेदी 'व्यावहारीक अ‍ॅसेट' नसते... ती वैयक्तिक 'भावनेशी गुंफलेली खरेदी' असते, वर म्हटल्याप्रमाणे राहत्या घरासारखीच. त्यातच, सोन्याची खरेदी दागिन्यांच्या स्वरूपात असली तर ते विकणे अधिकच कठीण होते... फार फार तर जुने दागिने मोडून नवीन दागिने बनवले जातात... म्हणजे केवळ 'मॉनेटायझेशन शून्य असते' नाही तर त्यावर 'सोन्याची घट + नवीन घडणावळ' असा अधिकचा खर्च होतो.

(फायद्याच्या हाव सोडून इतर कोणतीही) भावना मध्ये न येता "पैशात रुपांतरीत (मॉनेटाईज)" करता येते तीच खरी गुंतवणूक ! :)

राष्ट्रिय सोन्याची तुलना वैयक्तिक सोन्याशी करता येत नाही. >>>>>
हा मुद्दा पटला. तरीही दोन्ही बाजूंवर अभ्यासपूर्ण चर्चा वाचण्यास उत्सुक.

मार्मिक गोडसे's picture

27 Jun 2018 - 5:36 pm | मार्मिक गोडसे

कठीण समय येता कोण कामास येतो? (उत्तर : खरंखुरं सोनं)
ह्या खऱ्या सोन्यामुळे आपल्या देशाला कठीण समय येऊ शकतो.

कुमार१'s picture

27 Jun 2018 - 5:41 pm | कुमार१

रोचक आहे !

गामा पैलवान's picture

27 Jun 2018 - 8:17 pm | गामा पैलवान

डॉ सुहास म्हात्रे,

भारतिय लोकांची वैयक्तिक सोने खरेदी 'व्यावहारीक अ‍ॅसेट' नसते... ती वैयक्तिक 'भावनेशी गुंफलेली खरेदी' असते, वर म्हटल्याप्रमाणे राहत्या घरासारखीच.

भावनिक खरेदी असली तरी तिला व्यावहारिक मूल्य आहेच ना? केंद्रपेढीनं सोनं धरून ठेवलं तर तो बाब्या आणि सामान्य माणसाने ठेवलं तर ते कार्टं, असा भेदभाव का म्हणून?

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2018 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा फरक वर दोनदा लिहिला आहेच. तरीही, परत एकदा, अधिक उदाहरणांसह...

देशाच्या सोन्याच्या साठ्याशी भावनिक नाही तर निव्वळ आर्थिक, व्यापारी संबध व विचार जोडलेले असतात. आर्थिक जरूरीप्रमाणे जरूर पडेल तेव्हा ते सोने जास्तीत जास्त फायदा होईल त्याप्रमाणे खरेदी केले जाते, विकले जाते अथवा गहाण ठेवले जाते किंवा प्रत्यक्षात विक्रि/तारण न ठेवता 'केवळ त्याच्या माहितीवर, आंतरराष्ट्रिय बाजारात, देशाची आर्थिक पत सुधारते' उदाहरणार्थ :

अ) १९९१ साली भारताचा करंट अकाऊंट डेफिसिट (= आयात वस्तूंची किंमत - उपलब्ध असलेले परकिय चलन) भरून काढण्यासाठी गरज असलेले डॉलर्समधील कर्ज IMF कडून मिळविण्यासाठी, आरबीआयमधले सोने बँक ऑफ इंग्लंडकडे तारण म्हणून हस्तांतरीत केले गेले.

आ) भारताची आर्थिक परिस्थिती आणि परकिय चलनाच्या साठ्याची स्थिती सुधारल्यावर सन २००९ मध्ये, भारताच्या गुंतवणूकीत वैविध्ये आणण्यासाठी सरकारने, US$६.७ बिलियन मोजून IMF कडून २०० टन सोने खरेदी केले.

व्यक्तिगत सोने... विशेषतः भारतातील व्यक्तिगत सोने... ही अनेक पिढ्यांची भावनिक संपत्ती मानली जाते, तिच्या व्यावहारीक विक्रिची कल्पनाही अनेकांना सहज होत नाही. त्यामुळे, त्याला मुल्य असले तरी ते पुस्तकी स्वरुपात राहते, आर्थिक व्यवहारांच्या चलनवलनात येत नाही. म्हणजे एक प्रकारे (किमान त्याची नाईलाजाने का होईना, विक्री होईपर्यंत) ते नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट असते.

गामा पैलवान's picture

27 Jun 2018 - 10:16 pm | गामा पैलवान

डॉ सुहास म्हात्रे,

भावनिक असो वा व्यावहारिक सोनं पडूनच राहतं ना? घरात पडून राहील नाहीतर बँकेत पडून राहील. मग कुठे पडून राहिल्याशी काय मतलब?

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2018 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरचा प्रतिसाद परत एकदा शांतपणे वाचल्यास देशाचे सोने आणि वैयक्तिक सोने यातला फरक समजून येतील. ते तुम्हाला कमी वाटले असले तरी आंतरराष्ट्रिय व्यवहारांमध्ये ते खूपच लक्षणिय फरक असतात.

या विषयावर, माझी हीच लेखनसीमा.

गामा पैलवान's picture

28 Jun 2018 - 2:01 am | गामा पैलवान

डॉ सुहास म्हात्रे,

दोहोंतला फरक मला माहितीये. मी त्यांच्यातलं साम्य काय आहे ते शोधतोय. नेहमी आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा संदर्भ आला की जो तो भारतीयांच्या निजी सोन्यावर का घसरतो, याबद्दल कुतूहल आहे. खरंतर दोहोंचा काही संबंधच नाही मुळातून.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2018 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोने हे सोनेच असते... ते खाजगी मालकिचे असो किंवा सरकारी... हे झाले साम्य. पण, हे साम्य इथेच संपते... आणि त्यांच्या परिणामांतिल फरक सुरू होतात.

जागतिक स्तरावर विचार करता सोने खाजगी मालकिचे आहे की देशाच्या, याने देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप फरक पडतो.

Indians have long valued gold not only for its beauty and durability but also as financial security. Indian households have the largest private gold holdings in the world, standing at an estimated 24,000 metric tons. That figure surpasses the combined official gold reserves of the United States, Germany, Italy, France, China and Russia.
(संदर्भ : https://www.forbes.com/sites/greatspeculations/2017/10/11/germans-have-q...)

१. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, चीन आणि रशिया या सहा देशांच्या सामुहिक सरकारी सोन्यापेक्षा जास्त सोने एकट्या भारतियांच्या वैयक्तिक मालकीत आहे. यावरून भारतियांच्या "एनपीए"च्या स्वरुपात पडून असलेल्या वैयक्तिक मालकीच्या सोन्याच्या प्रचंड व्याप्तिची कल्पना यावी !

याविरुद्ध, इतर देशांच्या नागरिकांत व्यक्तिगत सोने साठवण्याची परंपरा (?हाव) नाही... तेव्हा तिथले व्यक्तिगत सोन्याचे साठे तिथल्या अर्थव्यवस्थेवर लक्षणिय परिणाम होईल इतके मोठे नाहीत.

यावरून, सोन्याची गोष्ट निघाली की भारतिय लोकांचे व्यक्तिगत सोने चर्चेत का येते हे समजायला हरकत नाही.

याशिवाय...

२. व्यक्तिगत मालकिचे सोने घरात अथवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असते व
(अ) त्याचा अर्थव्यवस्थेला काहीच उपयोग नसतो, ते अर्थव्यवस्थेला घातक एनपीएचे काम करते;
(आ) ते व्यक्तिगत असल्याने त्याचा देशाची जागतिक बाजारात पत वाढविण्यास किंवा देशाचे चलन स्थिर/बळकट करण्यास उपयोग होत नाही;
(इ) उलट, ते सोने विकत घेताना मोजलेली किंमत देशाबाहेर जाऊन किमती परकिय चलनाचा खर्च होते.

याविरुद्ध, देशाचे उर्फ सॉव्हरिन सोने देशाची बाजारातिल पत वाढवून तेथे त्याच्या चलनाला स्थिरता व बळ देते. यामुळे, जागतिक स्तरावर घेतली जाणारी कर्जे सहज व कमी दराने मिळतात, इतर देश व्यापार सोप्या आणि सहज अटींवर करतात... म्हणजे राष्ट्रिय (सॉव्हरीन) सोने देशाचे पैसे वाचवते.

सद्याच्या अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेकडे पाहता चीन, रशिया व जर्मनी त्यांचे राष्ट्रिय (सॉव्हरीन) सोन्याचे साठे वाढवत आहेत, ते याकरिताच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2018 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्थव्यवस्थेला मारक असलेला... व भारतात अत्यंत लोकप्रिय असलेला... खाजगी सोन्याचा अजून एक अवैध उपयोग म्हणजे... काळा पैसा लपवून ठेवण्यासाठी तो सोन्याच्या स्वरूपात ठेवणे.

डॉक्टर सुहास म्हात्रे,

देशाची बाजारातली पत वाढवण्यासाठी देशाच्या तिजोरीत सोनं नुसतंच ठेवलं जातं ना? मग ते खाजगी घरांत पडून राहिलं तर ते आळशी (=एनपीए) कसं काय होतं? देशाच्या तिजोरीत अशी काय जादू आहे की तिथे ठेवलेलं सोनं अचानक सक्रिय (=परफॉर्मिंग) होतं?

आ.न,
गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2018 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तरे स्पष्ट असलेले प्रश्न परत परत विचारण्याच्या तुमच्या चिकाटीचे कौतूक वाटते ! :)

आता एक शेवटचा प्रयत्न करून पाहतो.

देशाच्या तिजोरीची "जादू" अश्या प्रकारची असते...

सरकारला त्याचे देणे अथवा कर्ज चुकवायला (अ) सोने विकायची पाळी आली किंवा (आ) ते दुसर्‍या देशाच्या बँकेत तारण म्हणून ठेवण्याची पाळी आली* तर देशाच्या तिजोरीतले सोने त्यासाठी सहज व त्वरीत उपलब्ध असते. त्यामुळे, देश विश्वासू वाटत असल्यास ते सोने 'केवळ विचारात घेऊन'; आणि देश तितकास विश्वासू वाटत नसल्यास ते सोने 'किंमत/तारण या स्वरूपात वापरून' आंतरराष्ट्रिय आर्थिक व्यवहार होतात.

त्याविरुद्ध, देशाचे देणे अथवा कर्ज चुकवायला नागरिकांचे खाजगी सोने उपलब्ध नसते. म्हणून नागरिकांच्या खाजगी सोन्याचा देशाच्या आंतरराष्ट्रिय आर्थिक पतपात्रतेवर ('इंटरनॅशनल फिनान्शियल क्रेडिटवर्दीनेस'वर) प्रभाव पडत नाही.**

किंबहुना, याचसाठी, भारताला श्रीमंत लोकांचा गरीब देश असे म्हटले जाते.

===============================

* : असे भारताने १९९१ साली केले होते हे आठवत असेलच (याचा उल्लेख वर एका प्रतिसादात केला आहे).

** : वरच्या स्पष्टीकरणानेही मुद्दा ध्यानात येत नसल्यास, खालील प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर दिल्यास मुद्दा अधिक स्पष्ट होईल...

देशाचे देणे अथवा कर्ज चुकविण्यासाठी, तुम्ही तुमचे स्वतःचे खाजगी सोने, विकायला किंवा तारण ठेवायला, देशाच्या स्वाधीन कराल का ? :)

त्यानंतरही मुद्दा स्पष्ट होत नसल्यास... सोन्याच्या बाबतीत तरी, "अर्थकारणाचे तुमचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे, इतके नोंदवून रजा घेतो. :)

भारताला श्रीमंत लोकांचा गरीब देश असे म्हटले जाते.>>>+ ११११११
सही !

डॉ सुहास, धन्यवाद !

डॉक्टर सुहास म्हात्रे,

१.

देशाचे देणे अथवा कर्ज चुकविण्यासाठी, तुम्ही तुमचे स्वतःचे खाजगी सोने, विकायला किंवा तारण ठेवायला, देशाच्या स्वाधीन कराल का ? :)

एकाने खाल्लं तर शेण, मिळून खाल्ली तर श्रावणी. बस इतकंच सांगायचं होतं मला.

एकाने घरात ठेवलं तर अनुत्पादक सोनं. सगळ्यांनी मिळून ठेवलं तर भारी उत्पादक बनतं, नाही का?

२.

देश तितकास विश्वासू वाटत नसल्यास ते सोने 'किंमत/तारण या स्वरूपात वापरून' आंतरराष्ट्रिय आर्थिक व्यवहार होतात.

तारण म्हणून सोनंच ठेवायला पाहिजे असं बंधन नाही. भावी करसंकलन सुद्धा तारण ठेवता येतं. नेक्सिकोने १९ व्या शतकात केव्हातरी असंच केलं होतं. भारतात गाडी खाजगी सोन्यावरच का घसरते?

३.
१९९१ साली भारतासमोरचा प्रश्न परकीय चलनाचा दुष्काळ हा होता. सोन्याचा दुष्काळ नव्हे. शासनाच्या करसंकलानाचा दुष्काळ हाही नव्हे. मग रुपये छापून वाटायला काय हरकत होती? माझ्या सांगण्याचा मुद्दा अस्य की परत १९९१ सारखी काही परिस्थिती आली तर नागरिकांच्या खाजगी सोन्याच्या मागे लागण्याऐवजी इतर स्थावरे (=अॅसेट्स) शोधावीत.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2018 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. सगळ्यांनी मिळून ठेवलं तर भारी उत्पादक बनतं
सरकारी सोने म्हणजे देशातल्या सगळ्या नागरिकांचे खाजगी एकत्रित सोने नव्हे, तर भारतिय (किंवा इतर कोणत्याही देशाच्या) रिझर्व बँकेच्या ताब्यात असलेले सरकारी मालकीचे सोने; हे तुम्हाला माहीत असेल असे वाटले होते ! असो.

२. चर्चा सोन्याबद्दल चालली होती, इतर कश्याबद्दल नाही, तेव्हा इतर कोणत्याही संसाधना/तारणाबद्दल इथे चर्चा करणे अस्थानिय आहे. आता, तुम्हाला 'मुद्दा ध्यानात येत नाही' की 'मुद्दा समजावून घ्यायचा नाही याकरिता गोल पोस्ट बदलणे चालू आहे' यापैकी काय आहे हे तुम्हीच सांगू शकाल.

वरच्यासारखे काहितरी लिहून येईल असा अंदाज होता, म्हणूनच लिहिले होते...

सोन्याच्या बाबतीत तरी, "अर्थकारणाचे तुमचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे.

आता ती तफावत इतर बर्‍याच अर्थशास्त्रिय मुद्द्यांच्या बाबतिंत आहे, असे दिसत आहे !

गामा पैलवान's picture

8 Jul 2018 - 2:20 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

तुम्ही म्हणता की "अर्थकारणाचे तुमचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे. हे अगदी बरोबर आहे.

नेमक्या याच कारणासाठी जेव्हा सोन्याचा विषय निघतो तेव्हा भारतातल्या खाजगी सोन्यावर अनुत्पादक असा छाप मारणे सोडले पाहिजे. कारण की "अर्थकारणाचे लोकांचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2018 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. जनतेच्या खाजगी सोन्याला सरकारच्या अधिपत्याखाली ठेवून, त्याच्या बळावर देशाला कर्ज देणारी अर्थव्यवस्था ही तुमची कल्पना क्रांतीकारक आहे !

काही जण तिला कम्युनिस्ट कल्पना म्हणतील. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, जर तुम्ही ती व्यवहारात आणू शकला तर...

(अ) सर्वप्रथम, तुमच्या स्वतःच्या खाजगी सोन्याला देशाच्या हवाली करायची तयारी ठेवा,

(आ) एका झटक्यात भारताची जागतिक अर्थिक पतपात्रता कमीत कमी तिप्पटीने वाढेल,

(इ) अर्थशास्त्रातल्या क्रांतीकारक विचारासाठी पुढच्या नोबेल पारितोषिकासाठी तुमचे नाव पुढे येईल,

मात्र यालाही तयार रहा...

(ई) खाजगी सोने बाळगून असलेले (तुमच्या आप्तांसह) जगातले सर्व लोक तुमचा शोध घेऊ लागले तर आश्चर्य वाटणार नाही... सांभाळुन रहा (का ते स्पष्ट आहेच !) ! =)) =)) =))
(हघ्या, पण हे खरे होईल यात काडीमात्र संशय नाही.)

२. कारण की "अर्थकारणाचे लोकांचे वैयक्तिक तर्कशास्त्र" आणि "आंतरराष्ट्रिय अर्थकारणाचे तर्कशास्त्र", या दोघांत प्रचंड तफावत आहे. हे हवेतले विधान आहे ! =)) =)) =))

हे लोकांचे मत आहे असे ओढून ताणून बळजबरीने म्हटल्याने तुमच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते, हे तुमच्या ध्यानात आले आहे काय ?! :)

{बाय द वे, वैयक्तिक अर्थशात्र/तर्कशास्त्र (प्रायव्हेट इकॉनॉमिक्स/लॉजिक) = वैयक्तिक गैरसमजांवर आधारित चुकीचे अर्थशास्त्रिय/तर्कशास्त्रिय तर्क/विधाने}

(अ) अर्थशात्रावरचे लिखाण, (आ) या विषयाचा अभ्यास असलेल्या ज्या लोकांशी माझा व्यावसायिक व वैयक्तिक स्तरावर संबंध आलेला आहे, (इ) अर्थशात्राचा जरासाही अनुभव/अभ्यास असलेले लोक, इत्यादींपैकी कोणाचेही मत तुमच्याशी जुळत नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

जागतिक / राष्ट्रिय अर्थकारणाबद्दलचे तुम्ही स्वतःचे वैयक्तिक तर्क व गैरसमज बाळगण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.

असो, हा वास्तवावर अवलंबून असलेला वादविवाद न राहता, खाजगी तर्कावर (प्रायव्हेट लॉजिक) बेतलेला वितंडवाद होऊ लागला आहे... तेव्हा तो अधिक विनोदी बनण्याअगोदर त्याला माझ्यातर्फे पूर्णविराम देत आहे.

धन्यवाद !

गामा पैलवान's picture

8 Jul 2018 - 6:48 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

हा वास्तवावर अवलंबून असलेला वादविवाद न राहता, खाजगी तर्कावर (प्रायव्हेट लॉजिक) बेतलेला वितंडवाद होऊ लागला आहे...

अगदी बरोबर बोललात पहा.

नेमकी अशीच परिस्थिती सामान्य भारतीयाची आहे. आंतरराष्ट्रीय पत सांभाळण्यासाठी भारत सरकारला सोनं तिजोरीत ठेवावं लागतं. मग उद्या माझ्यावर हीच परिस्थिती आली तर माझ्याकडे सोनं हवं ना? सामन्य भारतीयाची अशीच विचारसरणी आहे. भले तुम्ही त्याच्याकडील सोन्यास अनुत्पादक म्हणून हिणवलं तरीही ती बदलणार नाहीये.

तुम्ही ज्याला प्रायव्हेट लॉजिक म्हणता ते हेच आहे. ते तुम्हाला कितीही विनोदी वाटलं तरी सामान्य भारतीयाला सुरक्षितता प्रदान करणारं आहे.

बाकी, जनतेच्या खाजगी सोन्याला सरकारच्या अधिपत्याखाली ठेवून त्याच्या बळावर देशाला कर्ज देणारी अर्थव्यवस्था ही माझी कल्पना नाही. जालावर शोधाशोध केल्यास लगेच सापडेल. त्यामुळे तिचे गुणगान करून मी तुम्हांस कंटाळवू इच्छित नाही. अखेरीस तुमच्या विनंतीस मान देऊन मी देखील चर्चा थांबवीत आहे.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

8 Jul 2018 - 9:03 pm | कुमार१

एक आठवण :

२००६ पर्यंत द. आफ्रिका हा जगातील सर्वात जास्त सोने उत्पादक देश होता. तिथल्या सोन्याच्या खाणीतील कामगारांचा भयानक छळ केला जाई. त्यांना तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणे आणि खाण अपघातात निधन पावलेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई ने देणे, असे अनेक प्रकार तेव्हा होत.

या चर्चेनिमित्ताने त्याची आठवण झाली आणि वाईट वाटले.

नुकतेच आपल्या रिझर्व्ह बँकेने ८.५ टन सोने खरेदी केले. गेल्या ९ वर्षांतील ही पहिली खरेदी आहे.

यामुळे आपला घसरता रुपया कसा सावरेल हे कोणी सांगेल का ?

कुमार१'s picture

28 Mar 2020 - 7:34 pm | कुमार१

‘तर सोनं गमावणार 'ही'ओळख’
लेख:

https://maharashtratimes.com/business/business-news/gold-safe-haven-stat...

कुमार१'s picture

2 Jul 2022 - 2:15 pm | कुमार१

झिंबाब्वेमध्ये चलनफुगवटा रोखण्यासाठी सोन्याच्या माध्यमाचा वापर (hedge).
अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय.
अन्य आफ्रिकी देशही त्या मार्गाने जाण्याच्या विचारात

https://tfiglobalnews.com/2022/07/01/zimbabwe-ditches-american-dollar-an...

अमर विश्वास's picture

2 Jul 2022 - 5:08 pm | अमर विश्वास

सोने आणि इक्विटी

गेल्या वीस वर्षात सर्वोत्तम परतावा देणारे सोने आणि इक्विटी हे दोनच ऍसेट क्लास आहेत ...
600*400

आणि ते परस्पर पूरक आहेत ... जेंव्हा इक्विटी खाली जातो तेंव्हा सोने जोशात असते ..
पोर्टफोलिओ मध्ये ५ ते ७% गोल्ड ऍसेट्स चा समावेश असावा

अमर विश्वास's picture

2 Jul 2022 - 5:15 pm | अमर विश्वास

सोने आणि इक्विटी

गेल्या वीस वर्षात सर्वोत्तम परतावा देणारे सोने आणि इक्विटी हे दोनच ऍसेट क्लास आहेत ...

.

आणि हे परस्पर पूरक आहेत ... जेंव्हा इक्विटी खाली जातो तेंव्हा सोने जोशात असते ..
पोर्टफोलिओ मध्ये ५ ते ७% गोल्ड ऍसेट्स चा समावेश असावा

कुमार१'s picture

2 Jul 2022 - 5:35 pm | कुमार१

धन्यवाद.
छान सचित्र माहिती