जाहिराती

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in काथ्याकूट
23 May 2022 - 12:56 pm
गाभा: 

प्रस्तावना:
बरेच दिवस या विषयावर लेख लिहायचा विचार होता. पण आळसामुळे जमत न्हवते. शेवटी आज ठरवले की याबद्दल लिहूयाच. आपल्या सर्वांना सतत जाहिरातींचा भडिमार कळत-नकळत सहन करावा लागतो. कधी कधी त्याचा खूप त्रास पण होतो, पण शेवटी पर्याय काय म्हणून आपण गप्प बसतो आणि तो त्रास मुकाट्याने सहन करतो. पुढे पुढे अशी वेळ आली की विविध कंपन्यांना आपला माल विकण्यासाठी, ग्राहकांबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आणि त्यानुसार आपल्या जाहिराती सतत बदलत ठेवायची सवय लागली. (dynamic advertising) मी सुरुवातीला शोध घेतला की मी पैसे द्यायला तयार आहे, मी पैसे देऊन असे प्रॉडक्ट विकत घेईन ज्यामुळे त्या कंपनीला पैसे मिळतील आणि मला अनावश्यक जाहिराती पण बघाव्या लागणार नाहीत. पण मी जसा-जसा यात गुंतत गेलो, तसे-तसे मला कळले की ग्राहकाला असा पर्याय खूप कमी आहे. ग्राहकाची व्यक्तिगत माहिती गोळा करण्यातच कंपन्यांना जास्त रस आहे, कारण अशी व्यक्तिगत माहिती इतरांना विकून (वेळप्रसंगी लिलाव करून) जास्त फायदा मिळतो. त्यातून मी प्रायव्हसीबद्दल जागरूक झालो. शेवटी मला कळलं की या जाहिरातदारांना शह देण्यासाठी, मला स्वतःला एक प्रॉडक्ट समजले पाहिजे आणि एका जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. म्हणून मी जाहिरात कशी करावी याबद्दल अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच एक कॅट-अ‍ॅण्ड-माउस असा खेळ सुरू झाला. यातून मी जे शिकलो, ते म्हणजे हा लेख. तुमचा एखादा (लघु)उद्योग असेल तर याचा फायदा होईल. तसेच तुम्हाला जाहिराती आवडत नसतील तर तुम्ही त्याविरुद्ध लढा द्याल, प्रायव्हसीबद्दल तुम्ही जरा जागरूक व्हाल, अशी आशा.

सगळ्यात महत्त्वाचे. तुम्हाला तुमचा माल खपवायचा असेल तर माहिती पाहिजे की बाजारात उत्तम काय विकले जाते?

  • Babies
  • Fear
  • Addiction
  • Sex
  • Peer pressure & persuasion from friends
  • Sweet memories
  • Celebrity Endorsements
  • Health, Happiness, Spiritual enlightenment

ग्राहकाची इंद्रिये ताब्यात घ्या - चव, सुवास, स्पर्श, आवाज आणि सर्वात महत्त्वाचे दृष्टी

  • तुमच्या दुकानात खाद्यपदार्थ विकत असाल तर फ्री सँपल्स द्या. फुकट मिळते ते सर्वांना आवडते.
  • परदेशात मॉलमध्ये फिरत असाल आणि विशेषत: महागड्या दुकानात गेलात की आत शिरल्या शिरल्या दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला कदाचित सुवास (fragrance) येईल. याचे कारण एअर कंडिशनिंगमध्ये सुवास मिसळलेला असतो. सुवासामुळे तुम्ही दुकानात रेंगाळण्याची शक्यता जास्त आणि जितका जास्त वेळ दुकानात रहाल तितकी खरेदीची शक्यता जास्त. काही काही दुकाने आता यात इतकी तरबेज झाली आहेत की स्त्रियांचे आवडते आणि पुरुषांचे आवडते सुगंध वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात.
  • कॅफेत शिरल्या-शिरल्या ब्रेड किंवा कॉफीचा, घर विकत असाल तर फ्रेश कुकीजचा वास येईल असे बघा.
  • दुकानात मंद संगीत वाजेल ते बघा. रोमँटिक किंवा पियानोचे संगीत उत्तम. जितके मंद संगीत, तितका दुकानातून फिरण्याचा वेग मंदावतो. याउलट बार असेल तर सॉफ्टरॉक संगीत लावा. जसा वेळ जाईल, तसे दिवे मंद करा.
  • दार बंद केल्यावर गाडीचा आवाज कसा येतो, आयडल असताना आणि टॉप स्पीडला इंजिनचा आवाज कसा असावा, याच्यावर BMW च्या अकुस्टिक इंजिनीयर्सनी संशोधन करून प्रॉडक्टमध्ये बदल केले आहेत.
  • ग्रोसरीच्या दुकानात भाज्यांवर पाण्याचा फवारा मारला जातो, तो मुख्यतः ग्राहकांना खुश करण्यासाठी जास्त आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी कमी असतो.
  • सेलवर असणार्‍या वस्तूंच्या किमती रु. १९, ६६९, १०९ अशा विषम ठेवा. सेलवर असणार्‍या वस्तूंचे टॅग्ज पिवळ्या रंगात लिहा.
  • याउलट क्वालिटी प्रॉडक्ट असेल तर किंमत १०००, २५०० अशी सम ठेवा.
  • दुकानाच्या रंग संगतीकडे लक्ष द्या. तुमचा कॅसिनो असेल तर लाल, सोनेरी रंग वापरा. लाल रंगामुळे ग्राहकाला झोप येणार नाही आणि तो जास्त वेळ जुगार खेळत बसेल.
  • प्रॉडक्ट पॅकेजिंगकडे विशेष लक्ष द्या. म्हणूनच कॉस्मेटिक्स, अत्तरे सुबक बाटल्यांमध्ये विकली जातात आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट कागदी पिशवीतूनच दिले जातात.

मार्केटिंगच्या विविध आयडिया (माल खपवायला उपयोगी, ग्राहक असाल तर शेंडी कशी लावली जात आहे, ते समजायला उपयोगी)

  1. समजा तुमचे वडापाव विकायचे दुकान आहे तर लॉयल्टी कार्ड काढा. १० वडापाव खाल्लेत की १ फुकट. चहा/कॉफीचे दुकान असेल तर चहा फुकट वगैरे. ग्राहक दुसरीकडे न जाता तुमच्याकडेच येत रहावा, म्हणून उत्तम उपाय.
  2. जनरल किराणा माल विकायचे दुकान असेल, तर लॉयल्टी कार्डवर इतर काय माल विकला गेला आहे, ते बघा. त्यानुसार ग्राहकाला एखादे फुटकळ १०%, २०% डिस्काउंट कूपन पाठवा. तुमची आत्ता पर्यंतची खरेदी १००० रुपये झाली की ५० रुपये सूट द्या.
  3. किंमत दुप्पट करा आणि मग एकावर-एक फुकट Buy One, get one FREE द्या. ( FREE शब्द मुद्दाम बोल्ड आणि कॅपिटल मध्ये लिहिला आहे, हे आलं ना लक्षात?)
  4. विविध लोकांना वेगवेगळ्या किमती लावा. ग्राहक विंडोज काँप्युटर वापरत असेल तर एक किंमत लावा, अ‍ॅपल मॅक किंवा आयफोन वापरत असेल तर जास्त किंमत लावा. एअरलाईन्स यात पारंगत आहेत.
  5. आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या वेळी, वेगळीवेगळी किंमत लावा.
  6. हवामानानुसार किंमत बदला. पाऊस पडत असेल तर चहाची किंमत २ रुपये जास्त करा, उन्हाळ्यात चहाची किंमत १ रुपया कमी करा पण तेव्हा पन्हे विका ५ रुपये जास्त दराने.
  7. दुकानात सिक्युरिटीच्या नावाखाली कॅमेरे लाऊन, बास्केट/कार्टमध्ये सेन्सर बसवून मुव्हमेंट पॅटर्नचा अभ्यास करा, त्यानुसार कुठले प्रॉडक्ट कुठे ठेवायचे ते ठरवता येईल.
  8. प्रॉडक्टचा आकार कमी/जास्त करा. शांपूची बाटली ५०० मिली लीटर असेल, तर त्याच किमतीत ४०० मिलीलीटर विका.
  9. परदेशात एकाच वस्तूची किंमत वेगळी असू शकते. M.S.R.P. प्रकार नाही. एअरपोर्टजवळ पेट्रोल्/गॅसोलिन जास्त दराने विका.
  10. जाहिरात करताना २५० रुपयांना १ असे न म्हणता, १००० रुपयात ४ असे म्हणा. ग्राहकाला वाटेल की किमान ४ नग घ्यावे लागतात, त्यामुळे जास्त माल खपेल.
  11. महागडे प्रॉडक्ट लगेच नजरेस पडतील, अश्या उंचीवर ठेवा. इतर स्वस्त माल गुढग्याच्या लेव्हलला ठेवा. मात्र चॉकलेट लहान मुलांना सहज दिसतील अशी खालच्या रॅकवर ठेवा.
  12. दूध, दही, अंडी अश्या नियमित लागणार्‍या वस्तू दुकानाच्या आतल्या टोकाला ठेवा, म्हणजे ग्राहकाला पूर्ण दुकानात कोपर्‍यात जावे लागेल आणि त्याच्या वाटेत इतर महाग गोष्टी पेरून ठेवा, ज्यामुळे impulsive buying ची शक्यता वाढेल. अजून एक म्हणजे चेकआउट जवळ चॉकलेट/कँडी ठेवा.
  13. घडाळ्याच्या दिशेने (clockwise) जायचा रस्ता ठेवला तर ग्राहक पटापट खरेदी करून त्वरित बाहेर पडतो. म्हणून शक्य झाले तर प्रवेश दुकानात उजवीकडे ठेवा आणि एक्झिट डावीकडे ठेवा.
  14. तुमचे फर्निचर विकायचे दुकान असेल तर ग्राहक आत शिरला की त्याला सहजा सहजी बाहेर जायचा रस्ताच मिळणार नाही, त्याला संपूर्ण दुकान फिरूनच बाहेर पडावे लागेल, अशी रचना करा. IKEA दुकानाचा अभ्यास करा.
  15. आता नवीन ट्रेंड असा आहे, मालाची जागा सतत बदलत ठेवा. म्हणजे ग्राहकाला दुकानभर शोधत हिंडत बसावे लागेल. पण अजून संशोधन पूर्ण झालेले नाही, त्यामुळे तुमच्या जबाबदारीवर असे प्रयोग करा.
  16. दुकानात सोईस्कर अशा छोट्या बास्केट शक्यतो ठेऊ नका, भल्या मोठ्या कार्ट ठेवा. त्यामुळे कार्ट भरून माल घेण्याची शक्यता वाढते.
  17. माहितीची खुशाल देवाण घेवाण करा. ट्रेडर जो सारख्या दुकानाला आदर्श माना. क्रेडिट कार्डाचा पत्ता बघा आणि खुशाल ग्राहकाला रेसिपीची मासिके पाठवा. खरंतर मासिकेसुद्धा जाहिरातींवरच जगतात, सबस्क्रिप्शनवर न्हवे. त्यामुळे ते पण आनंदाने तयार होतील.
  18. ग्राहक कायकाय खरेदी करतो, किती वेळा माल परत करतो, किती वेळा बदलून घेतो, कुठले क्रेडिट कार्ड वापरतो याचा बारकाईने अभ्यास करा.
  19. तुमचे ऑनलाईन दुकान असेल तर फेसबुक, लिंक्डईन यांना आदर्श माना. ग्राहकाच्या फोनमधून त्यांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती बेधडक चोरा.
  20. ब्राउजर कुकीज, आय.पी. अ‍ॅड्रेस, वेब हिस्टरी, बीकन्स (beacons) बेधडक वापरा.
  21. अ‍ॅमेझॉनला आदर्श माना. ग्राहकाला अकाउंट उघडायची सक्ती करा. दुकानात जाऊन एखादा कसा निनावीपणे खरेदी करू शकतो, तशी संधीच एखाद्याला देऊ नका. मग इतरांनी काय खरेदी केली, याचे रिव्हू किती छान आहेत, याचा मारा करा.
  22. तुमच्या ग्राहकांचा बहुमूल्य डेटा खुशाल इतरांना विका किंवा विकत घ्या. बँक असाल आणि एखाद्याने कर्ज घेतले की ती माहिती इंशुरन्स कंपनीला विका, क्रेडिट कार्ड कंपनी असाल आणि ग्राहकाचे उशीरा पेमेंट आले की ती माहिती बँकेला विका म्हणजे बँक लगेच पर्सनल लोनची माहिती ग्राहकाला पाठवू शकेल.
  23. जिथे जिथे पब्लिक डेटा मिळेल तिथे हात मारा. ७/१२ चा उतारा/प्रॉपर्टी रेकॉर्ड्स्/ ड्रायव्हर लायसेन्स/Department of Motor Vehicles (D.M.V.) इथून डेटा मिळवा.
  24. कॉलेज असाल तर विद्यार्थ्यांचा डेटा क्रेडिट कार्ड कंपनीला विका म्हणजे ते क्रेडिट कार्ड ऑफर त्यांना पाठवू शकतील.
  25. ग्राहकाकडून गोड बोलून माहिती काढून घ्या. तुमचे रेस्टॉरंट असेल आणि ग्राहक आला, भरपूर रिकामी जागा आहे तरी त्याला रिझर्व्हेशन आहे का विचारा, तुम्हाला रिझर्व्हेशन कोड पाठवतो या नावाखाली त्याचा फोन नंबर, इमेल विचारून घ्या आणि मग भरपूर स्पॅम खास ग्राहकांसाठी खास ऑफर पाठवायला त्याचा सढळ वापर करा.
  26. तुमची कंपनी बर्‍यापैकी मोठी असेल आणि मार्केटिंगचे छान बजेट असेल तर टी. व्ही. सिरियल, सिनेमात प्रॉडक्ट प्लेसमेंट करा.
  27. सेलिब्रिटीकडून जाहिरात करून घ्या.
  28. खोटा रिसर्च प्रसिद्ध करून घ्या.
  29. सरकार दरबारी लॉबिईंग करून स्वतःला सोईस्कर कायदे बनवून घ्या.
  30. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांच्या विरोधात न थकता काम करा. ठराविक कालावधी नंतर प्रॉडक्ट मुद्दाम तुटेल किंवा बिघडेल असे प्रॉडक्ट डिझाइन करा, ग्राहकाला दुरुस्ती फक्त आमच्याच दुकानात करता येईल अशी अलिखित सक्ती करा, त्यांना स्पेअर पार्ट मुद्दाम मिळणार नाहीत अशी सोय करा, Right to repair ला विरोध करा. या बाबतीत अ‍ॅपल, जॉन डिअर या कंपन्यांना आदर्श माना.
  31. ग्राहकांचा डेटा चोरायला काँप्युटर, टॅबलेट्स, फोन, कार अशा विविध ठिकाणांचा यथेच्छ वापर करा आणि प्रत्येकाची प्रोफाईल बनवा, म्हणजे हवी ती माहिती लगेच हाताशी असेल.

ग्राहकाची कुठली-कुठली माहिती गोळा कराल?

ग्राहकाच्या खरेदीच्या सवयी, नाव, पत्ता, फोन नंबर्स, ईमेल, race, स्त्री की पुरुष (gender), sexual orientation, marital status, शिक्षण, किती उत्पन्न, धर्म, राजकारणाचा कल, कुटुंबातील इतर व्यक्ती, नुकतेच झालेले जन्म/मृत्यू, ठरलेली लग्न, झालेले घटस्फोट, ग्राहकाच्या वाहनांची माहिती, पेट(pet)ची माहिती, आवडत्या गोष्टी (फूड, संगीत, पुस्तके वगैरे) आणि नावडत्या गोष्टी पण, मित्र-मैत्रिणी-इतर नातेवाईक इत्यादी.

आता इतका डेटा कष्टाने मिळवला मग त्याचा वापर नको का? म्हणून डेटा मायनिंग करा.
Data mining – You are being watched

  • सतत पाळत ठेऊन जास्तीत जास्त माहिती गोळा करा आणि सतत अ‍ॅनॅलिसिस करा. माहिती सतत अद्ययावत ठेवा.
  • ग्राहकाचा फोन म्हणजे अलिबाबाची गुहा आहे आणि ज्यात खजिना आहे. सतत ट्रॅकिंग करा: GPS data, user location, time when digital coupon redeemed, what type (20% or more discount only)
  • तुमचे स्वतःचे मॉडेल्स बनवा. म्हणजे कसे ते बघा. समजा तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनी आहात मग जर एखादा ग्राहक वस्तू गहाण ठेवत असेल (pawnshops मध्ये), massage parlors,tire retread shops, marriage counselors, bail & bond payments, bars & nightclubs मध्ये जात असेल तर त्याचे क्रेडिट लिमिट कमी करू शकता, याउलट कॅसिनोमध्ये वारंवार जात असेल तर त्याचे क्रेडिट लिमिट जास्त करू शकता. (using 4 digit merchant category code)
  • ग्राहकाचा डेटा उदारपणे शेअर करा. जितका डेटा अचूक असेल, तितके तुमचे अंदाज बरोबर ठरतील.
  • ग्राहक भविष्यात कसा वागण्याची शक्यता आहे, याचा आधीच अंदाज येण्यासाठी Predictive modeling करा.

ग्राहकांचा तोटा:

  • आपल्याला योग्य किमतीत वस्तू/सेवा मिळाली की नाही, हे त्याला कळतच नाही.
  • ग्राहकाला तुलना करताच येत नाही. त्यासाठी एकच माल वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी विकायचा. उदा: गाद्या (Mattresses), A/c units
  • आपला खाजगी डेटा गोळा होत आहे हे बर्‍याचदा कळतच नाही आणि कळले तरी ते बंद करण्याचा पर्यायच ग्राहकाकडे नसतो. ( त्याला तसा तो उपलब्धच केला जात नाही).
  • खाजगी डेटा सगळीकडे पसरला जातो, विकला जातो.
  • ग्राहकांच्या विरोधात वर्तणूक Anti-consumer behavior ( उदा: Right-to-repair ला विरोध वगैरे.)

पण ते मरू दे. आपल्याला काय करायचय ग्राहकांच्या हिताचे आणि सोईचे? आपला माल विकून आपण मालामाल झालो की मग बास.
काय म्हणताय? मी पण कुणाचा तरी ग्राहक आहे? हम्म, जरा विचार करावा लागेल मग.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

23 May 2022 - 8:53 pm | प्रमोद देर्देकर

बाप रे एवढी काळजी घेतली जाते काय?

जाहिरात व्यवसायातला अविभाज्य भाग!
छान उदाहरणे दिली आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 May 2022 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रायव्हसी जपण्याचा एकच उपाय आहे वल्कले नेसून जंगलात रहाणे, मनुष्यवस्तीत रहायचे असेल तर याला काही पर्याय नाही.
कोणतीही खरेदी करताना तारतम्य वापरले तर असल्या सगळ्या सापळ्यांचा काही उपयोग होत नाही.
रच्याकने :- लेख प्रचंड आवड्ला आहे.... वाखुसा
पैजारबुवा,

कोणतीही खरेदी करताना तारतम्य वापरले तर असल्या सगळ्या सापळ्यांचा काही उपयोग होत नाही.

सहमत
ज्या ग्राहकांना आपण अशा सापळ्यांना बळी पडून अनावश्यक खरेदी करायची नाहीये त्यांच्याकरिता एकच सोपे पथ्य आहे ते म्हणजे आपली खरेदीची याची बनवून मग खरेदीला जाणे आणि यादीप्रमाणेच खरेदी करणे.
अर्थात या सगळ्याला सापळा म्हणणे हा एक दृष्टीकोन झाला - दुसर्‍या कोनातुन बघायचे झाल्यास हे मॉल्स ग्राहकाला अनेक वस्तु बघायची, हाताळायची संधी देतात , मग त्यातुन आपल्याला काय हवं ते निवडून ग्राहक खरेदी करु शकतो. ही गोष्ट ग्राहकाकरिता अनेकदा आनंददायी असू शकते. कधी एखादी आवडीची अनेक दिवसांपासून मनात असलेली वस्तु अचानक सापडते तेव्हा तो आनंद आगळाच असतो... तो आनंद मी विकत घेत असतो तेव्हा "अमूक रक्कम खर्च झाली " हा मुद्दा नसतो.

पारंपारिक पद्धतीच्या दुकानात गेल्यावर दुकानदार विचारतो "बोला , काय देवू ?" तेव्हा खरेतर खरेदीचा उत्साह मावळतो ..कदाचित मला आणखी काही खरेदी करायचे असते पण मी दुकानदाराला म्हणू शकत नाही की "तुमच्या दुकानात काय काय आहे ते सगळं दाखवा (निदान सांगा तरी)"
तसेही आता मध्यमवर्ग / उच्च मध्यमवर्ग यांची क्रयशक्ती बरीच वाढली आहे... उलट सगळी क्रयशक्ती वापरून मनसोक्त चंगळ करावी इतके पर्याय अजूनही उपलब्ध नाहीत (निदान भारतात तरी - खास करुन लहान शहरांत वगैरे) असेच काही वेळा वाटते.

तुषार काळभोर's picture

24 May 2022 - 6:06 pm | तुषार काळभोर

विशेषतः हा परिच्छेद:

पारंपारिक पद्धतीच्या दुकानात गेल्यावर दुकानदार विचारतो "बोला , काय देवू ?" तेव्हा खरेतर खरेदीचा उत्साह मावळतो ..कदाचित मला आणखी काही खरेदी करायचे असते पण मी दुकानदाराला म्हणू शकत नाही की "तुमच्या दुकानात काय काय आहे ते सगळं दाखवा (निदान सांगा तरी)"

आमच्या दुकानदाराला मी असाच त्रास देतो. पण लहानपणापासून मैत्री असल्याने ते चालतं. बाकी ग्राहकांना तो वैतागतोच. तेही नैसर्गिकच म्हणा. आतमध्ये फिरून हवं ते घेणं हे बऱ्याचदा सोयीस्कर पडते.

सुबोध खरे's picture

25 May 2022 - 11:49 am | सुबोध खरे

सॉक्रेटिस हा तत्ववेत्ता एकदा बाजारात फिरत होता

तेंव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले कि गुरुजी तुम्हाला काहीच विकत घ्यायचे नाही तर तुम्ही बाजारात का फिरत आहात?

त्यावर सॉक्रेटिस म्हणाला बाजारात किती अनावश्यक वस्तू विकायला आहेत हे पाहतो आहे.

हि गोष्ट इसवी सना पूर्वी ४०० वर्षे ची गोष्ट आहे. मग आता २५०० वर्षांनी बाजारात किती किती आणि काय काय विकायला असेल?

बाकी-- चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली तेंव्हा

तर्कवादी's picture

25 May 2022 - 3:05 pm | तर्कवादी

बाकी-- चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली तेंव्हा

बरोबरच आहे, दुसर्‍या कुणी घेतली एखादी वस्तु की ती पहायला मिळते, तिची उपयुक्तता कळते मग ती घ्यावीशी वाटू शकते.
बाजारात नवीन आलीय म्हणून लगेच कुणी प्रत्येक वस्तु घेण्यास जात नाही.. याउलट थोडं थांबू, दुसर्‍या कुणी घेतली तर त्यांच्याकडून अभिप्राय काय मिळतो ते बघू असा दृष्टीकोन असतो. जे जास्त श्रीमंत असतात किंवा इतरांपेक्षा जास्त हौशी व प्रयोगशील असतात ते आधी घेतात.. बाकीचे हळूहळू अनुकरण करतात.. त्यांना एखादे उदाहरण , दुसर्‍या कुणाचा अनुभव माहिती करुन घेणे गरजेचे वाटते. आता इंटरनेट, युट्युबवरील परीक्षण सांगणार्‍या चित्रफिती यामुळे हे सोपे झालेय.
पण त्याचप्रमाणे दुसर्‍याच्या अनुभवावरुन त्यांना उपयुक्तता वाटली नाही तर ती वस्तू घेत नाहीत. अलिकडचे उदाहरण अलेक्सा - माझ्या बघण्यात काही हौशी लोकांनी अलेक्सा घेतलं पण इतर अनेकांना ते केवळ एक मनोरंजक यंत्र वाटलं त्याची उपयुक्तता फारशी दिसली नाही तर लोकांनी ते घेतलं नाही. मी ही ते घेतलं नाही.

हे फक्त खरेदी बाबतच नाही तर जीवनातील अनेक गोष्टींबाबत लागू होते (उदा. शिक्षण, करिअर, पर्यटन ई). प्रथम धाडस करणारे अगदी थोडेच असतात. फार काय एखादा चित्रपट बघायला जाण्यापुर्वीही आपण बहुधा परीक्षण वाचतोच की (किंवा युट्युबवर बघतो).

स्वराजित's picture

24 May 2022 - 12:51 pm | स्वराजित

खुपच माहीतीपुर्ण लेख

चौथा कोनाडा's picture

24 May 2022 - 2:05 pm | चौथा कोनाडा

अतिशय अभ्यासपुर्ण लेख !
उदाहरणे देखिल समर्पकच !

आजच्या बाजारयुगात अश्या येन केन प्रकारेन ग्राहकांना गळाला लावायचे असे अनंत प्रकार होणार !
आपली व्यक्तिगत माहिती किती गुप्त राहू शकेल हाच प्रश्न आहे. आता व्यक्तिगत माहिती डिजीटली प्रचंड वेगात पसरत राहणार !
आपल्या खर्‍या गरजा ओळखून नको त्या गोष्टींवर काट मारणे हाच या वर उपाय आहे.

खुप दिवसांनी छान लेख वाचला !

शित्रेउमेश's picture

24 May 2022 - 2:19 pm | शित्रेउमेश

मस्त... लेख प्रचंड आवडलेला आहे :)

चांगला सर्वसमावेशक लेख,मेहनत दिसतेय (जाहिरात न करताही )

आता program algorithms लावलीआहेत म्हणे,त्यामूळे cctv camera ग्राहकांचे चेहरे बघून ML (मशीन लर्नींग ) व AI ( आर्टीफीशल इंटेलीजेंश) ने तो fb शी ताडून नाव,पत्ता मिळवून मग mall मधे कुठे रेंगाळतो पाहून संबंधीत जाहीराती त्याच्या mobile वर पाठवून हा algorithm पाठवून देतो.

एका WA post मधे वाचले की अमेरीकेत 16-17 वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या घरी baby products चे जाहीरात पत्रक आले होते. कारण नकळत ती मुलगी mall मधे त्या शेल्फस् जवळ रेंगाळली होती.
(कहर म्हणजे dad आणि डाॅक्टर mom यांनाही माहीत नसलेली 'बातमी' खरी होती म्हणे, बोंबला,,,)

मुक्त विहारि's picture

24 May 2022 - 5:51 pm | मुक्त विहारि

वाखूसा

श्रीगुरुजी's picture

24 May 2022 - 10:04 pm | श्रीगुरुजी

कॅसिनोत आलेले जास्त काळ थांबावेत म्हणजेच पर्यायाने जास्त पैसे खर्च करावे यासाठी तेथे प्राणवायूचे प्रमाण जास्त ठेवलेले असते. त्यामुळे आलेले कायम ताजेतवाने राहतात व कंटाळा येत नाही. तेथील महिला कर्मचारी सुद्धा अत्यल्प वस्त्रात वावरत असतात. स्लॉट मशीन अधूनमधून तुम्हाला जिंकवून थोडी नाणी देतात, त्यामुळे आपण अजून जिंकू या आशेने लोक अजून नाणी यंत्रात टाकत राहतात व शेवटी खिसा रिकामा झाल्यानंतरच थांबतात.

सुबोध खरे's picture

25 May 2022 - 12:01 pm | सुबोध खरे

The famous quote by Abraham Lincoln says: “You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you cannot fool all of the people all of the time.

हि म्हण जुनी झाली.

२१ व्य शतकातील नवी म्हण अशी आहे

you can fool all of the people all of the time provided you have a huge marketing budget.

अमेझॉन वर शेण सुद्धा २३८ रुपये किलोला उपलब्ध आहे

https://www.amazon.in/Ugaoo-Cow-Manure-1-Kg/dp/B07D7PTJPN

तर्कवादी's picture

25 May 2022 - 3:10 pm | तर्कवादी

अमेझॉन वर शेण सुद्धा २३८ रुपये किलोला उपलब्ध आहे

गाय पुर्ण आयुष्यभर दूध देत नाही.. पण आयुष्यभर गाय पोसावी लागते .. गायीला खायला तर लागतंच.. मग विकणार काय ? तर अर्थातच शेण...

वामन देशमुख's picture

25 May 2022 - 12:33 pm | वामन देशमुख

लेख आणि अनेक प्रतिसाद आवडले.

पाषाणभेद's picture

1 Jun 2022 - 6:49 pm | पाषाणभेद

आणखी एक - या लेखाची जाहिरात करा अन जास्तीत जास्त पसरवा.

:-)

रच्याकने, लेख चांगला आहे.

सौन्दर्य's picture

1 Jun 2022 - 11:34 pm | सौन्दर्य

माझ्या माहितीतल्या एका मुलीला 'पिजन टो'वर सर्जरी करणाऱ्या जाहिराती तिच्या फेसबुकवर दिसू लागल्या. 'पिजन टो' म्हणजे पायाचा अंगठा व त्याच्या बाजूचे बोट हे पावलाच्या आतल्या बाजूला थोडेसे वळलेले असते. तिला पिजन टो जन्मजातच होता पण तिने त्यावर उपचार करण्याचा साधा विचारही कधी केला नव्हता त्यामुळे त्या दृष्टीने आंतरजालावर किंवा इतरस्त्र कोठेही शोधणे, किंवा बोलून माहिती मिळवणे दूरच होते. मग प्रश्न असा उद्भवतो की मग फेसबुकला तिला 'पिजन टो' आहे हे कसे कळले ?

माझ्या मते तिने फेसबुकवर तिचे फोटो लावले असतील ज्यात तिचा पाय पूर्ण दिसत असेल, फेसबुकने तिचा पूर्ण फोटो स्कॅन करून कोठे काय व्यंग दिसते का ह्याचा शोध घेतला असला पाहिजे व त्यानुसार जाहिराती दाखवायला सुरवात केली असावी.

तुम्हाला काय वाटते ?

कानडाऊ योगेशु's picture

2 Jun 2022 - 9:15 am | कानडाऊ योगेशु

फेसबुक च्या अनुभवाबद्दल सहमत.
मलाही गेल्या काही दिवसांपासुन अचानकच Suggested For You नावाने अनेक मुस्लीमअनुनय करणार्या जाहीराती दिसु लागल्या आहेत.आणि हा प्रकार ब्लॉक करण्याचा काहीच पर्याय नाही. अगदी फेसबुक अकाऊंटच डिलिट करण्याचा विचार करतोय.

इंटरनेटच्या सुरवातीच्या काळात आपण जर गुगलवर काही सर्च केले तरच त्या संदर्भातल्या जाहिराती दिसायच्या. आत आपण साधे बोललो तरी त्या संदर्भातल्या जाहिराती येत असल्याचे जाणवले. ह्याची पुढची पायरी म्हणजे मनात काही विचार जरी केला तरी त्या अनुषंगाने जाहिराती दिसू लागतील.

तर्कवादी's picture

2 Jun 2022 - 5:38 pm | तर्कवादी

ती मुलगी भारतात आहे की परदेशात ?

सौन्दर्य's picture

2 Jun 2022 - 10:42 pm | सौन्दर्य

ती मुलगी भारतात आहे.

काही वर्षांपूर्वी सॅमसंग टीव्हीने देखील काही संचात मॉनिटर्स लावले होते ज्या द्वारे घरातील माणसे कोणते प्रोग्रॅम बघतात त्याचा डेटा गोळा करत होते. कोणीतरी कम्प्लेंट केली आणि सॅमसंगने हे मान्य केले.

आग्या१९९०'s picture

2 Jun 2022 - 11:17 pm | आग्या१९९०

सेट टॉप बॉक्सनेही असा डेटा मिळवता येतो ना?