यांनी घडवले माझे मराठी...

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 May 2022 - 5:53 am

(दि. २७/२/२०२२ रोजी झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा लेख अन्यत्र प्रकाशित झाला होता. आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त तो काही सुधारणांसह इथे प्रसिद्ध करत आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !)
……

आपली मातृभाषा आपल्या कानावर बालपणापासून पडू लागते. पुढे आपले विविध टप्प्यांवरील शिक्षण आणि जनसंपर्क यातून ती विकसित होते. माझी मराठी भाषा विकसित होण्यात माझ्या अनेक गुरुजनांचा वाटा आणि मार्गदर्शन आहे. अशा सर्व गुरूंचा धावता आढावा या लेखात घेतो.

ok

आपले मराठीचे शिक्षक म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर शालेय शिक्षक येतात. पण आपले आद्य शिक्षक हे खरे तर आपले माता-पिता व कुटुंबीय असतात. मला माझ्या आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांचा सहवास अधिक लाभला. आजी शालेय शिक्षिका होती. ती मराठी व हिंदी शिकवायची. त्यामुळे चांगले मराठी बोलायचे व लिहायचे संस्कार तिच्याकडून झाले. आजी-आजोबांमुळे त्यांच्या पिढीचे काही विशिष्ट शब्द वारंवार माझ्या कानावर पडायचे, जे माझ्या समवयस्क मुलांना माहीत नसायचे. त्यातला एक म्हणजे ‘तिगस साली’ (तिगस - तिगस्ता = गेल्याच्या मागील वर्षी). शेतीतील पिकांसंबंधी बोलताना हा शब्द शेतकऱ्यांच्या तोंडी पुढे मी बऱ्यापैकी ऐकला. आजी मराठी लेखनही करायची. तिच्या लेखनात ‘सांप्रत’ हा शब्द बऱ्यापैकी यायचा. तो माझ्या मनात रुजला. पुढे मी लेखन करू लागल्यावर तो माझ्या लेखनातही बर्‍यापैकी डोकावे. पुढे मी प्रयत्नांती त्याला काढून ‘सध्या/हल्ली’ असे लिहू लागलो. माझी आजी छोटी मोठी पुस्तके लिहून स्वतः प्रकाशित करायची. त्या काळची छपाई खिळे जुळवून असायची. त्यामुळे छपाईच्या पहिल्या खर्ड्यात प्रचंड चुका असायच्या. मग त्या सगळ्या प्रतीचे मुद्रितशोधन आम्ही कुटुंबीय घरी एकत्र करत असून. त्यातून ह्रस्व /दीर्घ आणि शुद्धलेखनाच्या इतर अनेक गोष्टींवरचे चांगले संस्कार माझ्यावर झाले.

माझ्या आजीचे शैक्षणिक टप्पे स्तिमित करणारे आहेत. तिचे लग्न झाले तेव्हा ती फक्त सातवी उत्तीर्ण होती. पुढे पाच मुलांचा संसार ओढतानाही तिची शैक्षणिक जिद्द तिला अस्वस्थ करत होती. मग तिने नोकरी करता करता बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिक्षणाला सुरुवात केली. पुढे ती आणि माझे काका दोघेही बरोबर मॅट्रिक झाले. पुढचा योगायोग म्हणजे तिचे बीए आणि माझ्या काकांचे एमबीबीएस एकाच वर्षी पूर्ण झाले. पुढे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ती गप्प बसली नाही. माझे वैद्यकीय शिक्षण चालू असतानाच तिने पीएचडीसाठी नाव नोंदणी केली. आणि या सर्वांचा कळस म्हणजे तिची विद्यावाचस्पती (पीएचडी) आणि माझी एमडी असे दोन्ही टप्पे एकाच वर्षी पूर्ण झाले ! तेव्हा तिचे वय होते ७५. तिच्या आयुष्यातील हे विलक्षण शैक्षणिक योगायोग आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.

मराठीच्या शालेय शिक्षकांमध्ये कायम लक्षात राहिलेले आहेत ते म्हणजे डॉ. वि. य. कुलकर्णी. आमचे शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांचे स्वतःचेही पीएचडीचे शिक्षण चालू होते. त्या काळी असे शिक्षक शाळांमध्ये दुर्मिळ असायचे. त्यांनी मराठी भाषेसंबंधी बरंच काही शिकवलं होतं. ते सर्व एकदम सांगता येणार नाही. परंतु कायम लक्षात असलेले उदाहरण लिहितो (हे यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिलेले आहे). आम्ही नववीत असताना एके दिवशी चालू विषय बाजूला ठेवून त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितले,

“आता आज मी तुम्हाला जी गोष्ट शिकवणार आहे ती कायम लक्षात ठेवा. ह्या गोष्टीबाबत समाजात ९० टक्के लोक चुकीचे लिहिताना मला दिसतात. ही चूक तुमच्या हातून पुढे आयुष्यभर होऊ नये असे मला वाटते. तेव्हा लक्षपूर्वक ऐका”.

मग त्यांनी आम्हाला ‘द्ध’ हे जोडाक्षर नीट कसे लिहायचे ते शिकवले. आज आपण मराठीतील अनेक ठिकाणचे लेखन पाहिले असता आपल्याला हे जोडाक्षर ‘ध्द’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसते. इथे एक मूलभूत गोष्ट अशी आहे. या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा. म्हणून ते योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे. अनेक मराठीचे प्राध्यापक सुद्धा ही घोडचूक करताना दिसतात तेव्हा मला आमच्या वरील शिक्षकांची आठवण सातत्याने येत राहते. खुद्द स्वतःचे नाव ‘उद्धव’ असलेले किती जण आपले नाव शुद्ध लिहीत असतील हाही एक कुतूहलाचा विषय आहे ! 😀

माझ्या शालेय जीवनात मी सकाळ, केसरी आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे वाचत लहानाचा मोठा झालो. त्या काळात या वृत्तपत्रांमधील मराठी लेखन हे आदर्शवत होते. कित्येकदा कुटुंबात चर्चा होत असताना जर आपल्याला मराठी शुद्धलेखन किंवा भाषेसंबंधी अन्य काही शंका आली तर घरातील एखादी व्यक्ती पटकन, “अरे कालच्या दैनिकात असे लिहीले आहे म्हणजे ते बरोबरच असलं पाहिजे”, असे म्हणायची. इतका विश्वास तेव्हा काही वृत्तपत्रांबाबत वाटत असे. (आजची परिस्थिती आपण जाणतोच. इ-वृत्तपत्रांमधील मराठी तर टिंगलीचा विषय व्हावा ही शोकांतिका आहे).

तेव्हाच्या सकाळमधील बातमीलेखन, केसरीचे अग्रलेख आणि तरुण भारतमधली विविध रंजक स्फुटे या सगळ्यांमधून मराठीचे चांगले शिक्षण होई. अलीकडील वृत्तपत्रीय मराठी भाषा बरीच बिघडलेली असली तरी गेल्या ४-५ वर्षात मला काही चांगले मराठी शब्द वृत्तपत्रांमधून आलेले दिसले. सदनिका, निश्चलनीकरण, उत्परिवर्तन, अंतरभान, नाममुद्रा ही त्यापैकी पटकन आठवणारी काही नावे. आकाशवाणीवरील मराठी बातम्या हा चांगल्या मराठीचा एक स्रोत आहे हे मी आवर्जून नमूद करतो. माझ्या लहानपणापासून मी त्या ऐकत आलो आहे आणि आजही (अन्य माध्यमांच्या तुलनेत पाहता) तो एक चांगला स्रोत आहे, हे मला सांगावेसे वाटते.

मी पदवीधर झाल्यानंतर वृत्तपत्रातून मराठी लेखन करत होतो. एके दिवशी ‘सकाळ’मध्ये संपादकीय पानावर अगदी मधोमध एक भला मोठा लेख आलेला होता. त्याचे शीर्षक ‘इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत प्रचंड भेसळ’ या आशयाचे होते आणि लेखक होते आचार्य केळकर. मग त्यांनी नेहमीची अनेक उदाहरणे देऊन आपण मराठी माणसे कसे गरज नसताना अनेक इंग्रजी शब्द वारंवार लेखनात आणि बोलण्यात वापरतो याची उदाहरणे दिली होती (‘मॉर्निंग वॉक’पासून ते हॅपी दिवाली वगैरे पर्यंत सर्व). पुढे त्यांनी म्हटले होते की, आता निव्वळ हा लेख लिहिण्याचा किंवा मराठी भाषा दिनानिमित्त चर्चा करण्याचा विषय नाही. आपल्याला याविषयी जर खरंच काही भरीव करावेसे वाटत असेल तर आपण एकत्र जमून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरी एक बैठक बोलावली होती. मी मोठ्या उत्साहाने त्या बैठकीला गेलो. बैठकीपूर्वी जे लोक जमले होते त्यात आमचे एक संस्कृतचे शिक्षकही होते. गप्पांच्या नादात त्यांनी असा विचार मांडला की हे इंग्रजीचे आक्रमण वगैरे लेख लिहायला ठीक आहे. परंतु शेवटी भाषा ही नदीसारखी प्रवाही असली पाहिजे. नंतर बैठक सुरू झाली. त्यात आचार्यांनी प्रास्ताविक केले आणि परभाषांमधील शब्द आपल्या भाषेत येणार हे अटळ आहे हे मान्य केले. परंतु त्यांनी लगेच लोकमान्य टिळक यासंदर्भात काय म्हणत असत याचे उदाहरण दिले. टिळक म्हणायचे,

“परभाषेतील शब्द हे आपल्या भाषेत पीठात मीठ इतक्याच अल्प प्रमाणात असावेत. मीठ जर फारच जास्त होऊ लागले तर संपूर्ण भाकरीच खारट होते”.

तेव्हा केळकरांनी आम्हाला या वाक्याला आदर्श मानायला सांगितले आणि आपण उगाचच किंवा लहर आली म्हणून जे इंग्रजी/हिंदी शब्द संभाषणात व लेखनात घुसडत राहतो, ते टाळावेत असे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी एक सोपा घरगुती उपाय करायला सांगितला. ते म्हणाले, “आपल्या नोकरी-व्यवसायाच्या दिवशी आपल्या शुद्ध मराठी बोलू वगैरे प्रकार करून चालणार नाही. परंतु सप्ताहातील जो आपला सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी आपण स्वतःपुरता मराठी शुद्धीकरण दिवस मानायचा”. मग त्या दिवशी करायचे काय ते त्यांनी अगदी रंजकपणे सांगितले. “सकाळी आवरून झाल्यानंतर छानपैकी झब्बा घाला. त्याला दोन्ही बाजूला खिसे असतील. मग एका बाजूच्या खिशामध्ये ३०-४० पंचवीस पैशांची नाणी ठेवा” (होय, तेव्हा २५ पैशांना ‘किंमत’ होती). हे ऐकल्यावर आमचे कुतुहल वाढले.

ते पुढे म्हणाले, “आता करायचं एवढंच. दिवसभर तुम्ही घरच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात याल. जेव्हा तुम्ही मराठी माणसाशीच बोलत आहात तेव्हा तुमचे वाक्य बोलून झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात आले की, आपण गरज नसताना उगाच इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात घुसडले होते, तर मग त्या प्रत्येक इंग्रजी शब्दामागे स्वतःला २५ पैशांचा दंड करायचा ! मग डाव्या खिशात हात घालून एक नाणे बाहेर काढून ते उजव्या खिशात टाकायचे. असे करत करत शेवटी तो दिवस संपेल. दिवसाखेर स्वतःला केलेल्या दंडाची रक्कम किती जमा झाली ते बघा. ती रक्कम कोणाला तरी दान करून टाका. असे नियमित करत राहा आणि मग हळूहळू दंडाची रक्कम कमी कशी करता येईल याचे तुम्हालाच भान येईल”. नंतर हा प्रयोग मी एक दोनदा केला व त्याची मजा घेतली. पण नंतर असे ठरवले की यातला मथितार्थ आपण लक्षात घ्यायचा. मग घरी आणि मित्रांमध्ये बोलताना (आणि लिहिताना) जाणीपूर्वक मराठी शब्दांचा वापर वाढवू लागलो तांत्रिक शब्द वगळता विनाकारणच आपण आधुनिकता म्हणून जे इंग्रजी शब्द घुसडत असतो त्यांचा वापर कमी केला. सुरुवातीला असे प्रयत्नपूर्वक बोलताना अडखळायला होते. ते कदाचित समोरच्याच्याही लक्षात येत असते. पण एकदा जिभेला आपण वळण लावू लागलो की मग ते आपसूक घडू लागते. इथे हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक नित्याचे उदाहरण देतो. ‘मुख्यमंत्री’ व ‘पंतप्रधान’ हे शब्द मराठीत चांगल्यापैकी रुळलेले आहेत. असे असताना सुद्धा मराठी माणसे संभाषणात त्या शब्दांची इंग्लिश लघुरूपे उठसूठ का वापरतात? जर ते शब्द पूर्ण उच्चारायला कष्ट वाटत असतील तर त्यांतील अनुस्वाराकडे दुर्लक्ष करून आपण मुम आणि पप्र अशी लघुरूपे अगदीच रूढ करू शकतो.

अशा आचरणानंतर पुढे काही वर्षांनी मला माझ्यात काय बदल झाला आहे याची पावती चक्क माझ्या मुलाकडूनच मिळाली. तो आठवीत शिकत होता. आम्ही सहज हिंडायला बाहेर पडलो होतो. मी त्याला नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातासंबंधी सांगत होतो तेव्हा तो एकदम म्हणाला,

“बाबा मला एक जाणवलं आहे. तू जेव्हा मराठी बोलत असतोस तेव्हा तू चांगल्या मराठी शब्दांचाच वापर हटकून करतोस आणि जेव्हा तू आम्हाला इंग्लिशचे काही सांगतोस तेव्हा तू ते इंग्लिशमधूनच व्यवस्थित सांगतोस. आता तू ‘अपघात’ हा शब्द वापरलास, पण माझ्या संपर्कातील इतर मोठी (मराठी) माणसे त्यासाठी सर्रास इंग्लिश शब्द वापरताना दिसतात!”

त्याच्या अनुभवविश्वात त्याने माझी इतरांशी तुलना केली आणि त्यातून त्याचा अभिप्राय त्याने मला दिला. माझ्यात हा जो काही बदल घडला त्याचे श्रेय मी आचार्य केळकर यांनाच देईन. त्यांनी जाणीव करून दिलेली अजून एक गोष्ट म्हणजे आपली स्वाक्षरी मराठीत (देवनागरीत) करणे. तीही सवय अंगवळणी पडली.
या निमित्ताने आमच्या त्या बैठकांमध्ये घडलेला अन्य एक उपक्रम सांगतो. जेव्हा आपण म्हणतो की मराठी भाषेचा अभिमानाने वापर होत राहिलाच पाहिजे, तेव्हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपली भाषा ही अर्थकारणाची भाषा झाल्याशिवाय त्याला योग्य ती प्रतिष्ठा मिळत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन तत्कालीन मराठी उद्योगपतींना आम्ही काही पत्रे लिहिली होती. त्या काळी किर्लोस्कर, गरवारे हे जोरात होते. पत्रांमध्ये आम्ही असे म्हटले होते,

“महोदय, आपण आपापल्या कार्यालयांमध्ये नोकरीचे अर्ज स्वीकारण्यापासून ते इतर अनेक गोष्टी लिहिताना मराठीच्या वापराला उत्तेजन द्यावे. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेल्या उमेदवारास नोकरी देताना निव्वळ त्या मुद्द्यावरून डावलले जाऊ नये”.

कालांतराने आमचा तो गट काही सक्रिय राहिला नाही. पण माझ्या मनाशी मी एक गोष्ट ठरवून ठेवली की, भाषणे, आंदोलने, चळवळी, शासनाकडे मागण्या या सगळ्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, आपण स्वतःला सुधारत राहणे. मी जेव्हा मराठी बोलेन किवा लिहीन, तेव्हा जाणीवपूर्वक मराठी शब्द नीट वापरेन; उगाचच होणारा इंग्रजी/हिंदी शब्दांचा मोह टाळेन. हा प्रयत्न मी माझ्यापुरता सातत्याने करत राहतो (समोरच्या व्यक्तीला मात्र कुठल्याही सूचना द्यायच्या नाहीत हे पथ्य पाळतो). व्यवहारातील संभाषणात जो काही मिश्रभाषेचा वापर चालतो त्यात सामील व्हावे लागतेच. पण निदान स्वतःच्या भाषण आणि लेखनापुरती तरी मराठी शक्य तितकी जपावी अशी आंतरिक भावना आहे.

आपण जेव्हा ‘माझे गुरु’ असे म्हणतो तेव्हा सर्वप्रथम प्रत्यक्ष एखादी व्यक्ती ही तर सर्वात महत्त्वाची. पण त्याचबरोबर विविध माध्यमे देखील आपली अप्रत्यक्ष गुरूच असतात. थोडे पुढे जाऊन असे म्हणतो की, एखादा प्रसंग सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. हा प्रसंग घडला साधारण भारतामध्ये संगणक येऊन थोडासा कालावधी लोटला होता तेव्हा. नुकतीच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ही नावे सामान्यांच्या कानांवर वारंवार पडू लागली होती. त्या दरम्यान महाराष्ट्रात एक अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले. त्यामध्ये एका गृहस्थांनी (आता नाव विसरलो) या दोन नव्या तांत्रिक इंग्लिश शब्दांसाठी अनुक्रमे यंत्रणा आणि मंत्रणा हे शब्द सुचविले होते. ते संमेलनामध्ये त्यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. ही वाचलेली बातमी सुद्धा माझ्यासाठी एक शिक्षकच ठरली.

आयुष्याच्या त्या पुढील कालखंडात ‘मराठीचे शिक्षक’ असे बिरूद मी ज्याला लावू शकतो ते म्हणजे एक मासिक आहे आणि ते म्हणजे ‘अंतर्नाद’. मराठीच्या विकासाचे ध्येय ठेवून हे मासिक सुरू झाले होते. अन्य कुठल्याही मासिकामध्ये नसलेली एक विशेष गोष्ट इथे होती. ते म्हणजे मासिकाच्या पहिल्या पानावरील श्रेयनामावलीत “व्याकरण सल्लागार : यास्मीन शेख’ हे नाव ठळकपणे छापलेले असायचे. व्याकरण सल्लागार नेमलेले कदाचित हे मराठीतील एकमेव मासिक असावे. तेवीस वर्ष हे मासिक चालले आणि नंतर बंद पडले. या काळात मी तिथे दीर्घकाळ लेखन केले. या मासिकातील अन्य लेखनातून आणि विविध सूचनांमधून मला मराठी लेखन सुधारत राहण्याची चांगली प्रेरणा मिळाली. सामाजिक वापरातील काही रूढ इंग्लीश किंवा तांत्रिक शब्दांना प्रयत्नपूर्वक चांगले मराठी प्रतिशब्द शोधणे हा भागही त्या मासिकात चांगल्या प्रकारे चर्चिला जायचा. नमुन्यादाखल दोन उदाहरणे देतो. फोनच्या दोन प्रकारांसाठी स्थिरभाष आणि चलभाष हे सुंदर शब्द मला तिथे शिकायला मिळाले. ‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले. यावरही तिथे छान चर्चा झाली होती. म्हणून हे मासिक माझ्या आयुष्याच्या मध्य टप्प्यावरील माझे मराठीचे शिक्षकच म्हटले पाहिजे.

मराठी भाषेच्या विकास आणि प्रचारासाठी पोटतिडकीने काम करणारे गोरे नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांचे काही लेख नंतर वाचनात आले. त्यांची एक दोन भाषणेही ऐकली त्यातूनही माझे मराठीचे शिक्षण होत राहिले. तसेच अन्य मराठी माणसे वापरत नसलेले काही नित्याचे मराठी शब्द आपण जाणीवपूर्वक वापरताना त्याबद्दल लाज किंवा दडपण वाटेनासे झाले.

२०१७ पासून मी आपल्या संस्थळावर वावरत आहे. इथे मराठी भाषाविषयक काही धागे आतापर्यंत निघालेले आहेत. गेल्या दोन वर्षातील कोविडमय काळात मी काही शब्दखेळ नावाचे धागे काढले. तिथे नियमित येणाऱ्या सभासदांनी मराठी शब्द, वाक्यरचना इत्यादी संबंधी अनेक चांगल्या आणि मौलिक सूचना केलेल्या आहेत. त्यातून माझ्या मराठीचा चांगला विकास झाला. त्या दृष्टीने माझे हे सर्व सहकारीही या टप्प्यातील माझे मराठीचे शिक्षकच म्हणता येतील.
माझे मराठी अनेक अंगांनी घडवणाऱ्या अशा सर्व शिक्षकांचा मी ऋणी आहे. भाषा नदीप्रमाणे प्रवाही असणार हे पटते. पण तरीसुद्धा परकीय शब्दांना आपण नदी-पुराच्या लोंढ्याप्रमाणे मराठीत घुसू देणार का, हा विचार करण्याचे भान या गुरुजनांमुळे मला आले.

ok
(भाषा भेसळ असह्य झाल्यावर असे व्यक्त होण्याखेरीज आपण काय करू शकतो?)

यंदाच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त हे मनोगत इथे सादर करावे वाटले. एरवी या विषयावरील आपले विचार सांगायचे तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण, अशी एकंदरीत कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गतायुष्यात डोकावता आले आणि भाषाविषयक स्मरणरंजन झाले.
धन्यवाद !
................................................................................................................................................

भाषाविचार

प्रतिक्रिया

भाषाविषयक स्मरणरंजन आवडले.
तुमच्या आईचे कौतुक आहे.
आकाशवाणीवरील ( आणि टिवीवरील) वृत्तनिवेदकांचे उच्चार शुद्धच असतात. त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.

कुमार१'s picture

1 May 2022 - 8:53 am | कुमार१

तुमच्या आईचे

>>> नाही, आजीचे.
..

त्यांना एक भाषेचा अभ्यासक्रम { स्वखर्चाने } पूर्ण करून परीक्षा द्यावी लागते.

>>> चांगला उपक्रम व नियम.

छान !भाषेचा अभिमान बाळगणे त्यासाठीचे विविध प्रयत्न प्रसंग, वर्णनआवडले. औपचारिक शिक्षणाची भाषेचे चांगले शिक्षक लाभणे हे खुप महत्वाचे आहे.भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं!
बरीच वर्षे वाचन कमी होत तेव्हा कविता गाणी,व्याकरणाची पुस्तके जी मन लावून वाचायची, शिक्षकांनी​ मराठी समृध्द झाले.(लेखामुळे बरोबर समृध्द शब्द समजला :))
एक उदाहरण आठवतेय
वर्गात लाईट गेल्यानंतर पुन्हा आल्यावर मुलं ओरडली "लाईट आली" बाई म्हणाल्या "नाही लाईट आले ,गेले असं म्हणायचे."

कंजूस's picture

1 May 2022 - 8:09 am | कंजूस

आणि वीज आली/ गेली.
दिवे आले/गेले.

Bhakti's picture

2 May 2022 - 9:01 am | Bhakti

ओह , समृद्ध
मी अनेकदा अत्यंत जलद वाचून चुकीची संकल्पना​ करून घेते.
धन्यवाद कंकाका!
आशीर्वाद हा शब्दही शाळेत कायम शिकवला गेलाय.

"वाचेन" ..... वाचेल नाही हो
मराठी व्याकरणात
मी वाचेन ..... तो/ती वाचेल असे लिहीतात.
मी येईन....... / तो/ती येतील
मी जाईन .... तो/ती जाईल

विजुभाऊ यांनीही तोत्तोचान या पुस्तक परिचय धाग्यात चूक दुरूस्ती सुचविली _/\_
त्याचप्रमाणे बेलभाषा हे पुस्तक कधीही मी वाचत राहते.खुप छान आहे.
या ठिकाणी राज्य मराठी विकास संस्था बेलभाषा आणि अनेक मराठी भाषेविषयी पुस्तके,ग्रंथ आहेत.

कुमार१'s picture

2 May 2022 - 9:23 am | कुमार१

बेलभाषा हे पुस्तक

चांगला दुवा दिलात धन्यवाद.
बेल भाषा हा शब्द लेखिकेच्या बेलवलकर आडनावावरून आला आहे, की त्याला अन्य काही अर्थ आहे ?

:) योगायोग आहे,भाषेला वाहिलेला बेल पत्र _/\_
वाचाच एकदा :)

कुमार१'s picture

2 May 2022 - 9:55 am | कुमार१

भाषेला वाहिलेले बेलपत्र >>> सुंदर अर्थ व योगायोग.
नक्की वाचेन.

कर्नलतपस्वी's picture

1 May 2022 - 7:46 am | कर्नलतपस्वी

आताच एअर फ्रान्स मधून प्रवास केला. उदघोषक, उदघोषीका फक्त फ्रेंच भाषेतच सूचना देतात.क्वचितच इतर भाषांचा उपयोग करतात.
इतर भाषीय प्रवाशांना काहीच कळत नाही..
मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.

प्राची अश्विनी's picture

1 May 2022 - 8:15 am | प्राची अश्विनी

फार सुंदर लेख.
तुमच्या आजीचं कौतुक वाटलं. काय नाव त्यांचं?

कॉमी's picture

1 May 2022 - 8:34 am | कॉमी

खूप छान लेख. आजींचा शिक्षणप्रवास खूप स्फूर्तिदायक आहे.

कुमार१'s picture

1 May 2022 - 9:31 am | कुमार१

व्यक्तिगत माहितीसाठी व्यक्तिगत संपर्क केल्यास बरे होईल. 😀
आभार !

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2022 - 8:42 am | श्रीरंग_जोशी

तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी वाचून मी नेहमीच भारावून जातो. आज या लेखामुळे त्यामागची पार्श्वभूमी कळली. माझ्या स्वतःच्या मराठी भाषेच्या 'असेल तेवढ्या' नैपुण्यासाठी तुमच्याप्रमाणेच कुटुंबीय, शिक्षक व सभोवतीचे इतर लोक यांचा मोठा वाटा आहे. ते तथाकथित नैपुण्य टिकवणारे अन वृद्धींगत करणारे घटक म्हणजे गेल्या दीड दशकांतला मनोगत अन मिपासारख्या मराठी संस्थळांवरचा वावर अन भारताबाहेरचे वास्तव्य.

कुमार१'s picture

1 May 2022 - 9:27 am | कुमार१

सकाळच्या सत्रात लागोपाठ प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचे मनापासून आभार !

आज रविवार आणि महाराष्ट्र दिन असे दोन्ही आहेत. हा लेख आज प्रसिद्ध करणे उचित आहे. परंतु मनात वाटले होते, की आज सुट्टीचा दिवस असल्याने वाचकांचे लक्ष लवकर जाणार नाही. परंतु आपण सर्वांनी माझा हा समज खोटा ठरवलात त्याचा आनंद वाटतो.

वरील प्रतिसादांमधील काही मुद्द्यांची दखल नंतर स्वतंत्रपणे घेतो.

कुमार१'s picture

1 May 2022 - 9:49 am | कुमार१

• भाषा भेसळ हा माझा संभाषणातला प्रश्न झालाय हे खरं!
• मातृभाषा टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न केला पाहिजे.

>>>>>>
मराठीप्रेमी माणसाची याबाबतीत तारेवरची कसरत होतच आहे. निदान आपल्या कुटुंबात आणि या संस्थळावरील लेखनात तरी आपण आपली मराठी जपूया आणि विकसित करूया ही इच्छा.
.....

तुमचं उत्कृष्ट प्रतीचं पण तरीही सहजसोपं वाटणारं मराठी

>>>> ‘सहजसोपं’ चा स्वीकार करतो. पण ‘उत्कृष्ट प्रतीचं’ हे विशेषण नको ! तसे लिहिणारे माझ्यासाठीही आदर्श असतील.

कंजूस's picture

1 May 2022 - 11:44 am | कंजूस

एखादा मराठी शब्द रुजवला पाहिजे.

‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले.

आइची एक पाककृती 'तुम्हा सर्वांसाठी' देत आहे. वगैरे.

कुमार१'s picture

1 May 2022 - 12:21 pm | कुमार१

मराठी व इंग्लिश भाषेतील क्रियापदांची संख्या या मुद्द्यावरील एक रोचक लघुलेख इथे

यातील हे निवडक :

इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो.

मिसळपाव's picture

1 May 2022 - 9:02 pm | मिसळपाव

कुमार१,
लेख आवडला. तुमच्या आजीने पंच्चाहात्तराव्या वर्षी पीएचडी विद्यावाचस्पती ( ;-) ) पदवी मिळवली वाचून स्तिमित झालोय! कुठल्या क्षेत्रात आहे त्यांची पदवी?

थोडं 'उद्धव' शब्दाबद्दल. आधीच चुकीचा लिहीला जातोय शब्द म्हणताय आणि त्यात कळफलकावर तो नीट लिहीताच येत नाहीये! निदान संगणकावरनं नाही लिहीता येतंय, कदाचित फोनवरनं किंवा गुगल टाईप वगैरे काही वापरून लिहीता येत असेल नीट. द ला ध जोडला की असा दिसतो - द्ध - आणि ध ला द जोडला की असा - ध्द. ध वर / खाली होतोय ईतकंच. पण "आम्लवात" आणि "अल्मा मॅटर" मधे जसे "म ला ल" आणि "ल ला म" जोडले आहेत, तसं द आणि ध च्या बाबतीत करताच येत नाहीये. थोडक्यात म्हणजे, कोणी ......या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा...... हे तंतोतंत लिहून दाखवलं तर 'उद्धव' दुरूस्त होईल!! असं का व्हावं कळफलकावर कोण जाणे. 'द' ला काना नाही त्यामुळे नाही. कारण ड किंवा ह ही अक्षरं 'बड्या', 'बाह्य' अशा जोडाक्षरांमधे व्यवस्थित लिहीता येताहेत. असो.

अर्थात हा प्रश्न कळफलकावरनं लिहीतानचा आहे - हाती हवा तसा लिहीता येतोय. पण जरा उत्सुकता चाळवली गेली त्यामुळे हा उहापोह करतोय ईतकंच :-)

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कुमार१'s picture

1 May 2022 - 9:22 pm | कुमार१

उहापोह आवडला.

आजीच्या विद्यावाचस्पती पदवीचा विषय "तीन प्रमुख रामायण ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास" होता. त्यांचे मार्गदर्शक अर्थातच त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. कडकही होते. यांनी ७ वर्षे तिला अगदी पिदवून घेतले !
त्याकाळी संपूर्ण प्रबंध प्रथम हस्तलेखनातच लिहावा लागे.
......
द्ध >>>> 'द्' नंतर ध असे शेजारी लिहीणे
>> हाही पर्याय बरोबर आहे. हे देखील आम्हाला कुलकर्णी गुरुजींनी शिकवले होते.

आता संगणकावरील लेखनातील मजा सांगतो. विविध प्रकारांनी आपण टंकन करत असतो..
गूगल इनपुट टूल्स वापरुन टंकन केले की आपोआपच ‘द्ध’ असे रूप येते.
अन्य काही प्रकारे 'द्' नंतर ध असे आपण व्यवस्थित फोडूनही लिहू शकतो.

पण अन्य काही जाल-चौकटीतील एक गंमत पहा. तो पाय मोडका द आणि अख्खा ध जर आपण जवळ आणले तर आपोआप त्याचे शुद्ध एकत्रित रूप द्ध तयार होते प्रयत्न केला तरी सुटे राहतच नाही.

मुक्त विहारि's picture

2 May 2022 - 12:06 pm | मुक्त विहारि

लेख आवडला

लेख आवडला! तुमच्या आजीचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे 🙏

सस्नेह's picture

2 May 2022 - 6:12 pm | सस्नेह

आजींचे अभिनंदन आणि अशी जिद्दीची आजी मिळाल्याबद्दल तुमचेही !

अभिप्रायाबद्दल आभार !
.....

अशी जिद्दीची आजी

>>>
आता हा विषय चाललाच आहे तर तिच्या जिद्दीचा एक भारी शैक्षणिक किस्सा सांगतो.

आजीच्या एमए च्या शिक्षणाचा किस्सा तर भलताच रोचक आहे. तो तत्कालीन शासकीय धोरणावर प्रकाश टाकणारा असल्याने लिहितो. बीए झाल्यानंतर माझी आजी मनपाच्या शाळेत नोकरीस होती. आता तिला डोहाळे लागले होते एमए करायचे. पण तेव्हा एक विचित्र शासकीय नियम होता. या नोकरीतील शिक्षकांना एमए ला बसण्यास परवानगी नव्हती. आजीच्या मनात द्वंद्व झाले. पण शेवटी तिला शैक्षणिक उन्नती महत्त्वाची वाटली. तिने चोरून एमए साठी अर्ज भरला आणि एमए झाली.

याचा सुगावा अधिकाऱ्यांना लागलाच. नियमानुसार कारवाई झाली आणि तिला राजीनामा द्यावा लागला. मग तिने तिच्या कारकीर्दीची उरलेली वर्षे एका खेड्यात जाऊन खाजगी शाळेमध्ये नोकरी केली. शिक्षणाच्या जिद्दीपुढे तिने सरकारी नोकरी जाण्याचा धोका सुद्धा पत्करला.
...
तो नियम कालांतराने उडवला गेला व त्यापुढच्या पिढीतील शिक्षकांचे कल्याण झाले.
तोपर्यंत, ज्यांनी कोणी नियमभंग केला असेल त्यांना किंमत चुकवावी लागली !

Bhakti's picture

3 May 2022 - 7:12 am | Bhakti

बापरे ,कमाल आजी_/\_

प्रदीप's picture

3 May 2022 - 5:06 pm | प्रदीप

पण 'माझे मराठी' वर मात्र मी ठेचकाळलो आहे.

ते 'माझी मराठी' असायला हवे, नाही का ?

माफ करा, हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे, पण विषयच तसा आहे.

कुमार१'s picture

3 May 2022 - 5:39 pm | कुमार१

हे थोडेसे क्षिद्रान्वेषण होत आहे,

>> अजिबात नाही ! चांगला मुद्दा काढलात.
मी असे स्पष्टीकरण देतो :
१. माझे मराठी बोलणे/ लिहिणे (त्यांनी) घडवले.

२. माझी मराठी भाषा (त्यांनी) घडवली.

संदर्भानुसार क्रियापद बदलू शकेल का ? जरूर सांगावे.

अखेर (माझे) घडणे ही प्रक्रिया आयुष्यभर चालू राहणार आहे..... 😀
.........
किंवा बोलीभाषेत :
" माझे संस्कृत इतके चांगले नाही" ( नपुसकलिंगी वापर)

प्रदीप's picture

3 May 2022 - 7:09 pm | प्रदीप

तुमच्या स्पष्टीकरणाशी १०० % सहमत आहे.

Nitin Palkar's picture

4 May 2022 - 8:58 pm | Nitin Palkar

क्षिद्रान्वेषण की छिद्रान्वेषण....?

कुमार१'s picture

4 May 2022 - 9:03 pm | कुमार१

छिद्रान्वेषण पाहिजे.

मित्रहो's picture

4 May 2022 - 12:00 pm | मित्रहो

खूप सुंदर लेखय
तुमच्या आजींना त्रिवार अभिवादन, दंडवत
मराठी भाषेतील बरेच शब्द संस्कृतशी साधर्म्य राखून आहेत. एक काळ असा होता की भाषणात संस्कृतमधले श्लोक सांगितले तर श्रोत्यांवर प्रभाव पडतो असा समज होता म्हणून त्याचा वापर व्हायचा आता तिचा जागा इंग्रजीने घेतली. संस्कृत, हिदी, कानडी, गुजराती या भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषेतील शब्द म्हणायचे की मूळ मराठीचेच शब्द हा प्रश्न आहेच. मला तरी वाटते भाषा ही काळपरत्वे आणि जागेनुसार बदलतच जाते. हा बदलाचा प्रवाह थांबविणे कठीण आहे. फक्त इंग्रजीच नव्हे तर कालांतराने काही मँडरीन किंवा स्पॅनिश भाषेतील शब्द सुद्धा मराठीत आले तरी आश्चर्य वाटायला नको. आजची मराठी ही शंभर वर्षापूर्वीच्या मराठीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे.
छान लेख खूप धन्यवाद

नगरी's picture

4 May 2022 - 4:51 pm | नगरी

डॉक,ज्योत पेटवलीत,तोफ तर उडणार

कुमार१'s picture

4 May 2022 - 5:49 pm | कुमार१

चांगले मुद्दे आलेत.
या विषयाला दोन बाजू आहेत हे मान्य आहे.
दोन्ही बाजूंचे माझे विचार मी लेखात व्यक्त केले आहेत.
आता वाचकांनीही त्यांच्या मतानुसार जरूर व्यक्त व्हावे.
काहीच हरकत नाही...

Nitin Palkar's picture

4 May 2022 - 9:23 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख..... नेहमीप्रमाणेच.
सध्या सर्वसाधारणपणे गुगल इंडिक कि बोर्ड वापरला जातो (वै म). यात अनेक शब्द चुकीचे टंकले जातात. उद् घाटन (वस्तुतः हा एकच शब्द आहे) पण हा शब्द टंकताना तो उद्घाटन असा टंकला जातो. अर्थातच हा 'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे.... हे खरे आहे ... तरी .....

कुमार१'s picture

4 May 2022 - 9:32 pm | कुमार१

'गुगल इंडिक कि बोर्ड'चा दोष आहे

सहमत. आपण हस्तलेखनात जेवढे शुद्धलेखन व्यवस्थित करू शकतो त्या तुलनेत संगणकाने केलेल्या लेखनाला मर्यादा आहेत. तुम्ही म्हणता तो कळफलक कदाचित माझ्या चलभाषमध्ये असावा. परंतु मोठ्या संगणकावर टंकन करताना मी तो वापरत नाही.
सध्या माझे धोरण असे आहे. आधी बोलून टंकन करून घेतो. ते वर्डमध्ये व्यवस्थित साठवतो आणि मग गूगल इनपुट टूल्सने त्याचे संपादन करतो. एकंदरीत हा अनुभव चांगला आहे.
परंतु चलभाषवरच्या शुद्धलेखनाला मर्यादा येतात हे निरीक्षण.

सुशान्त's picture

18 May 2022 - 2:24 pm | सुशान्त

चलभाषयंत्रावर नीट लिहिण्यासाठी स्वरचक्र हे साधन चांगले आहे. वापरायला सोपेही आहे.

उत्तम आणि सातत्यपूर्ण लेखन.

तर्कवादी's picture

5 May 2022 - 4:44 pm | तर्कवादी

लेख आवडला. मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दलचा आग्रह भावला. आपण शुद्ध मराठी शब्द वापरत गेलो तर लोक हसतील किंवा काय अशी भिती बाजूला ठेवून जास्तीत जास्त शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला हवा.
अवांतर :
अलीकडे काही दिवसापासून मिपावर वार्यातला "र्य" नीट टंकता येत नाही. दुसर्‍या सईटवरुन आणला आणि इथे चिकटवला तरी इथे गडबडतो (जसे : वार्‍यातला) .
अशीच समस्या मला भ्रमणध्वनीवर (मोबाईल फोन) पण येते (मिपा नव्हे तर कुठल्याही अ‍ॅपमध्ये) मग त्यावर उपाय म्हणून मी एकदा मला हवा तसा र्य जालावरुन घेतला (कॉपी केला) आणि "टेक्स्ट शॉर्टकट" पर्यायाद्वारे त्या र्य चा rya असा शॉर्टकट बनवला. आता मला जेव्हा भ्रमणधवनीवर र्य टंकायचा करायचा असतो तेव्हा मी rya टंकतो आणि मग भ्रमणधवनीकडून सुचविलेल्या पर्यायातून माझा र्य निवडतो.

कुमार१'s picture

6 May 2022 - 4:54 pm | कुमार१

अभिप्राय, पूरक माहिती, शुद्धलेखन चर्चा आणि प्रोत्साहनाबद्दल आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे !

तुम्ही इतके नेटके कसे लिहिता ह्याबद्दल कुतूहल होतेच. त्यांतील बऱ्याच गोष्टींचा उलगडा हा लेख वाचून झाला.

कुमार१'s picture

18 May 2022 - 4:22 pm | कुमार१

आभार.!
स्वरचक्र सवडीने पाहतो.

कुमार१'s picture

25 May 2022 - 9:32 pm | कुमार१

आताच मी सह्याद्री वाहिनीवर अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात सई परांजपे यांची मुलाखत पाहिली. त्या मराठी खूप छान बोलतात. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वतः केलेली 'खंत ' ही कविता म्हणून दाखवली. ती मराठी भाषेच्या दुरवस्थेबद्दल आहे. खूप आवडली

मिळाल्यास जरूर वाचा.