एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
12 Mar 2022 - 12:03 pm

मध्यंतरी एक "झोल" म्हणतात तसा झाला. माझं आणि झोपेचं वाजलं. ती काही माझं ऐकेना. माझ्या डोळ्यांत उतरेना. रात्रभर झोप नाही. क्वचित कधीतरी लागलीच तर तास दोन तास. रात्री बारा , बारा,एक, एक वाजेपर्यंत मी तळमळायची.(प्रेमात पडलेली नसतानाही) नंतर जरा झोप येतेय असं वाटायचं तर बाथरुमला लागायची. तिकडं जाऊन आल्यावर पुन्हा झोपेची आराधना. सफल होगी तेरी आराधना, काहेको रोए।असं म्हणून मी माझं समाधान करुन घ्यायची. पण छेः! झोप माझ्याशी फटकूनच वागायची. पहाटे साडेतीन नंतर डोळे जरा जड व्हायचे तर साडेपाच वाजता नेहमीच्या वेळेला मी टक्क जागी.

मग उगीचच योगासने प्राणायाम करायची. वेळ घालवण्यासाठी पहाटे आंघोळच काय उरकून घ्यायची. टीव्ही लावायची. स्वतःशीच भेंड्या खेळायची. असं काहीबाही मी करायची.

मग ठरवलं एखाद्या ओळखीच्या डॉक्टरांकडे जायचं (जोशी म्हणू.. किंवा तुम्ही त्यांना देशपांडे किंवा कुलकर्णीही म्हणू शकता.) आणि चक्क एखाद्या "ट्रॅंक्विलायझर" गोळीचं प्रिस्क्रिप्शन मागायचं. त्याप्रमाणे मी ओळखीच्या डॉक्टरांकडे गेले. माझी झोपेची तक्रार सांगितली. त्यांनी प्रिस्क्रिप्शन तर दिलं नाहीच उलट माझंच एक बौद्धिक घेतलं. ते म्हणाले," झोपेची गोळी घेऊ नका. लागेल हो आपोआप झोप. किती दिवस लागणार नाही? म्हातारपणी अशीही झोप कमीच होते. (मला म्हातारी म्हणतोस काय! तू म्हातारा,तुझा बाप म्हातारा,तुझी....) शिवाय ह्या गोळ्यांची सवय लागू शकते. कमी डोसमध्ये भागेनासं होतं मग पेशंट कडून डोस वाढवला जातो. झोप नैसर्गिकपणे लागलेली चांगली. कृत्रिम उपाय करु नयेत. या गोळ्यांनी सतत झोप येते. बुद्धी, विचारशक्ती काम करेनाशी होते. त्याची सवय लागते. अहो,आपले पंतप्रधान मोदीजी,तसंच योगी आदित्यनाथ आणि रामदेवबाबा तर फक्त चार तास झोपतात. पण किती कार्यक्षम आहेत ते! मी काही तुम्हाला असे प्रिस्क्रिप्शन लिहून देणार नाही. जप करा.ध्यानधारणा करा. एक महिनाभर आपण वाट पाहू." झोपेच्या गोळ्या! किती भयंकर शब्द! मनःशांतीसाठी ट्रॅंक्विलायझर घेणं हा शब्द किती माइल्ड आणि सोफिस्टिकेटेड वाटतो.

तर अशा रितीने डॉक्टरांनी हात झटकले. मी म्हटलं,"अहो,मी गेले आठ दिवस रात्रीची एखादा तास झोपतेय. डोकं दुखतंय. डोळे जळजळताहेत. आसपास काय चाललंय. कोण काय बोलतंय ते समजेनासं झालंय. मला कसलाही मानसिक त्रास, टेन्शन नाही. शारीरिक व्याधी नाही. पण झोप येत नाही हे सत्य आहे. प्लिज , गोळ्या लिहून द्या. आय प्रॉमिस,मी त्याचा गैरवापर करणार नाही." इतकं गयावया करुनही डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या नाहीत.

मी पाय आपटत घरी आले.एव्हांना मला झोप येत नाही हे सत्य घरच्यांना आणि जवळच्या नातेवाईकांना माहीत झाले होते. अनेकांनी अनेक उपाय सुचवले. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्या. डोक्याला मसाज करा. झोपण्यापूर्वी आंघोळ करा. धार्मिक पुस्तके वाचा. ओंकाराचा जप करा. संध्याकाळी सात नंतर टीव्ही वरच्या बातम्या बघू नका. मन प्रक्षुब्ध होतं. इ. इ.

मग एके दिवशी आय मीन रात्री माझी मलाच शरम वाटली. वाटले एका झोपेपायी आपण किती लाचार झालोय. मूर्ख माणसाची जी लक्षणं संस्कृत सुभाषितात सांगितली आहेत त्यात
"व्यसनेन तु मूर्खाणां
निद्रा ,कलहेन वा।"

असं म्हटलंय. मी व्यसन आणि कलह करत नसले तरी निद्रेसाठी लाचार होते. ठरलं, नेहमीच्या वेळेला गादीवर पडायचं. झोपेची रोजची वेळ चुकवायची नाही. किती वेळ आणि किती रात्री झोप येणार नाही? कधीतरी तर येईलच. डॉक्टरांचं ऐकायचं.

एके रात्री वाटलं की झोप येण्यासाठी पाढे म्हणून बघूया. मी बे पासून पाढे म्हणायला सुरुवात केली. बे ते दहा पर्यंतचे पाढे बिनचूक पाठ होते. ते बिनचूक होते अशी मला खात्री आहे. लहानपणी मी साही सत्ते बेचाळीस हे बरोबर सांगायची पण तेच सात सख्खं असं विचारलं की मी बिचकायची. तिथं बेचाळीस हे उत्तर सांगता यायचं नाही. गोंधळ उडायचा.

अकरा, बारा,तेरा, चौदा, पंधरा चा पाढा म्हणता आला. पण सोळाचा पाढा चाचरत,चाचरतच म्हटला. सतरा, अठरा, एकोणीस हे पाढे आठवेनात. वीस चा मात्र बिनचूक म्हटला.(किती मी हुशार!) पण एकवीस ते तीस पर्यंतचे पाढे काही म्हणता येईनात. मग वाटलं, रात्री झोप येत नसताना एकवीस ते एकोणतीस पाढे पाठ करणं हा चांगला बौद्धिक, मानसिक,गणितिक (इथं इक् प्रत्ययान्त सर्व शब्द जोडावेत म्हणजे वाक्याला वजन येतं आणि वक्ता बुद्धिमान वाटतो.) असा व्यायाम आहे. त्यानं मेंदू थकेल आणि झोपेल.

मग जरा बरं वाटलं. मी लगेच उठले. २१ ते २९ पर्यंतचे पाढे गुणाकार करुन तयार केले. ते एका कागदावर लिहून काढले. ते रोज पाठ करायला सुरुवात केली.

पाढे पाठ करताना शाळेत गेल्याचं फिलिंग येतं. घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हटल्यावर परवचा म्हणायला लागायचा ,त्याची आठवण व्हायची. पाढे पाठ करण्यात अर्धा तास घालवला की मनाला समाधान वाटायचं. त्यानंतर झोप लागायची. खंडित,स्वप्नमय!पण लागायची. मी तेवढ्यावर समाधानी होते.

अशा पंधरा रात्री गेल्या. माझे सर्व पाढे पाठ झाले. अगदी २९ चा सुद्धा! मी तो म्हणून दाखवू शकते.

एकोणतीस एके एकोणतीस. एकोणतीस दुणे अठ्ठावन. एकोणतीस त्रिक सत्याऐंशी.एकोणतीस चोक सोळोदरसे. एकोणतीस पंचे पंचेचाळासे. एकोणतीस सख्खे चौऱ्याहत्तरासे. एकोणतीस सत्ते तिहोत्रीदोन. एकोणतीस अठ्ठे बत्तीस दोन. एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन. एकोणतीस दाहे नव्वद दोन. पुढचा तीसचा पाढा. सोप्पा आहे. मी म्हणू की नको? उद्या म्हणते. कारण मला .... खूपच.... झोप.... येतेय..... ओके गुड नाईट....!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:16 pm | मुक्त विहारि

मी झोप येत नसेल तर, पुस्तक वाचतो...

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2022 - 12:27 pm | चौथा कोनाडा

वा, वा आली म्हणायची झोप !
मस्त खुसखुशीत लिहिलंय !
+१

एकोणतीस अठ्ठे बत्तीस दोन. एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन. एकोणतीस दाहे नव्वद दोन.

हे खरे यश :-))

ग्रेट अभिनंदन, आजी !

खेडूत's picture

12 Mar 2022 - 1:31 pm | खेडूत

मस्त.
नेहेमीप्रमाणेच खुसखुशीत..
आजीबाई, ग्रेट.

सरिता बांदेकर's picture

12 Mar 2022 - 5:18 pm | सरिता बांदेकर

मस्त लिहीलंय.

Bhakti's picture

12 Mar 2022 - 5:29 pm | Bhakti

मस्तच!

Bhakti's picture

12 Mar 2022 - 5:29 pm | Bhakti

मस्तच!

Bhakti's picture

12 Mar 2022 - 5:31 pm | Bhakti

मस्तच!

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2022 - 10:28 pm | कर्नलतपस्वी

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो
शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो
यमराज जरी म्हणाला मी उद्या येतो
उद्याचे उद्या बघू म्हणून सुखाने झोप जातो

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2022 - 10:36 pm | कर्नलतपस्वी

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो
शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो
यमराज जरी म्हणाला मी उद्या येत आहे
उद्याचे उद्या बघू ,मला आता झोप येत आहे

मुक्त विहारि's picture

13 Mar 2022 - 12:59 pm | मुक्त विहारि

खरोखरच सुखी आहात...

कर्नलतपस्वी's picture

14 Mar 2022 - 8:03 pm | कर्नलतपस्वी

होय पुणेकर आहे दुपारी वामकुक्षी.सुद्धा आणी रात्री आठ तास. सकाळी सहा नंतर झोपत नाही रात्री साडे दहा नंतर जागत नाही.

सौंदाळा's picture

14 Mar 2022 - 12:05 am | सौंदाळा

आजी खूप दिवसांनी लिहिलेत.
मजेशीर लेख. आता परत निद्रानाश नको नाहीतर पिरिओडिक टेबल पाठ करावे लागेल. :)

चांदणे संदीप's picture

14 Mar 2022 - 2:47 pm | चांदणे संदीप

झोप लागण्यासाठीची खटपट प्रेरणा देणारी आहे आजी. :)

पाढ्यांसाठी माझी माझ्यापुरती सोपी आयडिया आहे एक. १०-११-१२-१५-२०-२१-२२-२५- ३० हे पाढे सहज पाठ होतात, आहेत. जे होत नाहीत त्यासाठी ह्या पाढ्यांचाच आधार घेऊन थोडी पटकन बेरीज केली तर काम होऊन जाते. उदा., सतरा आठे? पंधरा आठे वीसासे... त्यात सोळा मिसळले की झाले काम. सोळा यासाठी की पंधराच्या पुढे सोळाच्या पाढ्यात आठ मिसळायचे आणि सतरामध्ये आठ दुणे सोळा. मग, सतरा आठे छत्तीसाशे. शिंपल! नाही का? माझ्यासारख्या आळशाला तरी हेच बरे वाटत आलेले आहे. तरीसुद्धा पुढेमागे झोप न लागण्याचा त्रास सुरू झाला तर पाढे पाठ करायला घ्यावेच लागणार! :/

सं - दी - प

शिंपल ? कसले शिंपल हो ?

तीनदा वाचले. मेंदूतील तिढा आणखी पिळला गेला इतकेच झाले तुमच्या या युक्तीच्या वर्णनाने.

ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

चांदणे संदीप's picture

14 Mar 2022 - 9:03 pm | चांदणे संदीप

हा...हा.. पाढे पाठ करायचे नव्हते किंवा झालेच नाहीत म्हणून हे शिंपल उद्योग!

सं - दी - प

"एकसष्ठ दोन" यावरुन एक रोचक आठवण. अंकलिपीत (अलकंपीत) असलेले पाढे पाठ केले तरी मोठ्या तीन अंकी आकड्यांचे वेगळेच रुप वापरले जाई. मीटरमधे बसावे म्हणून असणार. उदा. विसासे, चव्वेचाळासे, दाहोदर्से (कोणी दुग्गोदर्सेही म्हणत), बावन्नीदोन, एकसष्ठ दोन, नव्वदीदोन..

लेख मजेशीर.

विजुभाऊ's picture

14 Mar 2022 - 11:55 pm | विजुभाऊ

मस्त लिवलयास आज्जे

जेम्स वांड's picture

15 Mar 2022 - 8:08 am | जेम्स वांड

खुसखुशीत अन खुमासदार लेखन आहे, आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2022 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत लेखन आवडलं. ''जेव्हा ती यावी वाटते, तेव्हा ती अजिबात येत नाही. इतकं मात्र कळलं आहे''

-दिलीप बिरुटे

हो ना ...

मग ती बस असो किंवा प्रेयसी ....

कविता, झोप, पण अशाच आढेवेढे घेतात

अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात....अपवादानेच नियम सिद्ध होतो, असे म्हणतात ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2022 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात....

कायम 'उन्मनी' अवस्थेत राहून, टपटप पडणा-या प्रतिसादांच्या लेंड्यावरुन ते लक्षात येतंच, कमी करा हो ...! (ह.घ्या) ;)

धुरांडीच्या हार्दिक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 7:59 pm | मुक्त विहारि

मिपा आधीही अभिव्यक्ति स्वातंत्र्य बाळगून होते आणि आजही आहे...

किंबहुना, एकमेकांच्या मतांचा आदर राखणारे आणि व्यक्तीगत द्वेष न बाळगणारे, मिपा हे माझ्या दृष्टीने एकमेव व्यासपीठ आहे ...

आजी's picture

26 Mar 2022 - 8:46 am | आजी

मुक्तविहारी-झोप येत नसेल तर तुम्ही सुचवलेला उपायही चांगला.
चौथा कोनाडा-अभिप्राय वाचून बरे वाटले.

खेडुत, सरिता, Bhakti -अभिप्रायाबद्दल धन्यवाद. थॅंक्यू.

कर्नलतपस्वी-धन्य आहे तुमची. वेळा पाळण्याच्या बाबतीत अगदी काटेकोर दिसता आहात!

सौंदाळा-हो.मी खूप दिवसांनी लिहिले आहे. आता नियमित होईलसं वाटतंय. तुमचा अभिप्राय गंमतीशीर.

चांदणे संदीप-तुमचा उपाय भारी.

गवि-तुम्ही चांदणे संदीपना उत्तर दिले आहे. लेख आवडला हे वाचून समाधान वाटलं. तुमची आठवणही रोचक.
विजुभाऊ-धन्यवाद.
जेम्स वांड-थॅंक्स.
प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- ''जेव्हा ती यावी वाटते, तेव्हा ती अजिबात येत नाही. इतकं मात्र कळलं आहे''.. हाहाहा. खरं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारी-"मिपा"तुम्ही म्हणता तसेच आहे.