ध्रांगध्रा - १९

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Jan 2022 - 11:45 pm

त्या अष्टकोनी दगडाच्या चकतीला महेश जिवापाड जपतोय. बॅगेत व्यस्थित गुंडाळून ठेवली आहे.तरीही तो ती पुन्हा पुन्हा तपासतो. खंदकात उतरण्यापूर्वी बॅग नीट बंद केली आहे. खंदकात पाणी आमच्या कमरेपर्यंत आलंय. माझा पाय कशात तरी अडकला. खाली पडणार तेवढ्यात महेश मला सावरतो. मी उभा रहातो.पण या गडबडीत महेशच्या खांद्यावरून सॅक निसटते. पाण्यात पडते. कशामुले काय माहीत . सॅक न तरंगता. थेट पाण्यात तळाला जाते.

मागील दुवा ध्रांगध्रा - १८ http://misalpav.com/node/49824

महेश सॅक शोधायला खाली वाकतो. तो पाण्यात आडवा झालाय.त्याच्या पाठोपाठ मी ही. गढूळ पाण्यात नीट दिसत नाही. पण महेशला सॅक सापडलीये.त्याने ती हातात पकडली आहे हे मला दिसतय. आम्ही दोघेही पाण्यातून आता खंदकाच्या त्या पायर्‍या असलेल्या घाटकडे चाललोय. पायर्‍या चढतोय. समोर पांढरी गावाची कमान उभी आहे. आम्ही कमानीतुन पलीकडे जातो. या वेळेस रस्त्यात कोण आहे कोण नाही याकडे आमचे लक्ष्यच नाही. गावच्या मुख्य रस्त्यातून चालत आम्ही सरळ मंदीरापर्यंत येतो.
इथे येताना मनातून टरकलो होतो. गेल्या वेळचा अनूभव खरेच भितीदायक होता. त्यातून पुन्हा जायची आमची दोघांचीच काय पण कोणाचीच तयारी असणार नाही. पण आम्हाला त्या खिरलापखिरला पासून सुटका हवी आहे. त्यासाठी कुठलंही अग्निदिव्य करायला आमची तयारी आहे. दोघांपैकी कुणीही नुसतं अहं जरी म्हंटलं असतं तर आम्ही इथे नसतो. खिरलापखिरलाच्या मानसीक जाचापासून सूटका या एकाच गोष्तीने सगळ्या भितीवर मात केलीये.
महेश इतकीच मलाही मंदीराच्या पायर्‍या उतरायची घाई आहे. पायर्‍या उतरून थेट सभा मंडपात . समोरच्या खांबांचे या वेळेला नीट फोटो घ्यायचे आहेत. सभा मंडपातून महेश थेट गाभार्‍यात जातो. त्या पाठोपाठ मी ही. कोपर्‍यातल्या दरवाजातून खाली उतरत जाणार्‍या पायर्‍यांवरून आम्ही दोघेही एका मोठ्या सभा मंडपात उतरतो. जमिनीखाली इतका मोठा सभा मंडप असू शकतो ? महेशने मोबाईलमधला टॉर्च ऑन केलाय. त्या उजेडात भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली दिसतात. माणसांची प्राण्यांची स्त्रीयांची, नाच करताना ,खेळतानाची शिकार करतानाची.महेश ज्या ठिकाणावरून ती दगडाची चकती उचलली तो भिंतीचा कोनाडा शोधतोय. त्याची भिरभिरणारी नजर एका भिंतीवर स्थिरावते. भिंतीवरच्या एका आकृतीकडे महेश बोट दाखवतो. माझे लक्ष्य वेधतो. ती आकृती पाहिल्यावर मी नखशिखांत शहारतो. ती मूर्ती खिरलापखिरला ची आहे. त्याचा चेहेरा मी कधीच विसरू शकत नाही. राठ कुरळे केस, जाड भुवया, मोठे रागीट वटारलेले डोळे.... हाच हाच मला स्वप्नात येऊन"ए ऊठ " म्हणणारा.
महेशने सॅक मधून तो अष्टकोनी चपटा दगड काढला. आणि त्या खिरलापखिरलाच्या पाया जवळच्या चौथर्‍यावर ठेवला. हलकसा आवाज झाला तो सभा मंडपात घुमला. मूळ जागेवरची वस्तू जिथे होती तिथे परत आली. आता हे खिरलापखिरलाचं आमच्या स्वप्नात येणं थांबणार या विचाराने डोक्यावरचं मणामणाचं ओझे उतरल्यासारखं वाटतय.
आम्ही दोघेही रिलॅक्स झालोय. सभा मंडपातली शिल्पे पहातोय. मोबाईलची बॅटरी पुरवून पुरवून वापरतोय. भिंतीवरचं , खांबावरचम एक एक शिल्प न्याहाळतोय. कॅमेर्‍यात टिपून घेतोय.
" अरे हे काय!" महेश कसल्याशा आश्चर्याने ओरडतो. त्याला काहितरी नवं सापडलं असावं मी त्या दिशेला पहातो." शिवा हे बघ या इथे पण एक दार आहे. दारातून पायर्‍या दिसताहेत खाली जायला... आलोच मी" मी काही बोले पर्यंत महेश त्या दारातून आत गेला पण. इथे सभा मंडपातच इतका अंधार आहे. खाली तो आणखीनच गडद असेल.अंधारात कशाला अडखळला आणि मोबाईल खाली पडून बंद झाला तर मोबाइल शोधणं राहू देत बाहेर पडायची वाट देखील सापडणार नाही. माझ्या मनात असाच एक रँडम विचार चमकून जातो. कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. मी उभा आहे तेथूनच ओरडतो. " फार पुढे जाऊ नकोस रे. आपल्याकडे बॅटर्‍या संपत आल्यात." घुमलेला माझा आवाज मला वेगळ्याच जगातुन आल्यासारखा वाटतो.
" हो हो लक्ष्यात आहे माझ्या. फक्त इथूनच जरा नजर फिरवतो." दारातूनच महेशचा आवाज येतो. खूप कुठून तरी खोलातून आल्या सारखा. महेशच्या त्य उत्तराने मी थोडा आश्वस्त होतो. अंधूक उजेडात जमेल तेवढे एक एक शिल्प पहातो. सभा मंडपाच्या प्रत्येक सभा मंडपाच्या प्रत्येक भिंतीवर निरनिराळी शिल्पे आहेत..... अरे हा सभा मंडप ही अष्टकोनी आहे हे आत्तापर्यंत जाणवलंच नव्हतं.अष्टकोनी सभामंडप ही सुमेरीयन , इजिप्शियन शैली. त्यांनी पिरॅमिड बांधताना वापरली होती.हे वाचलं होतं. पण हे इथे असेल हा कधी विचारही आला नाही. अर्थात हे देऊळ इथे असेल हा तरी विचार कुणाला आला नाही अजून. हे देऊळ पहाणारे आपण पहिलेच..... मी देऊळ म्हणतोय पण इथे एकही देवाची मूर्ती दिसलेली नाही. ना जैन तीर्थकांरांची , ना भगवान बुद्धाची. ना विष्णूची नाही शंकराची पिंड किंवा बसलेला नंदीही दिसला नाही. अगदी क्वचित दिसणारी अग्नीची चारमुखी मूर्तीही सापडली नाही. पण मंदीर नाही म्हणावं तर ते वाद्य वाजवणारे बटू आहेत. आणि गुंफा तर नक्कीच नाही.
मग हे आहे तरी काय?
ज्या वेगाने मनात हे विचार चालले आहेत त्याच वेगाने हात कॅमेर्‍यावर चालू आहेत. पण एक आहे कुठल्याच आक्रमकांनी या मूर्तींची तोडफोड केलेली नाहिय्ये. त्या मुळे जी शिल्पे आहेत ती संपूर्ण दिसताहेत. अभंग. आणि अखंड. औरंगजेब म्हणे वेरूळचे कैलास लेणे दोन वर्षे फोडत होता.
खाम्ब तोलणार्‍या यक्षीणी पहाताना माझी नजर छताकडे जाते. अरे...... हो.... छतावर पण एक अष्टकोन आहे. त्यात एक फूल आहे. लांब पाकळ्यांचे . त्यातले स्त्री केसर पुंकेसर कोरीव कामात स्पष्ट दाखवलेत. कसलं बरं फूल आहे हे. जास्वंदी! नाही जास्वंदी नाही. त्याच्या पाकळ्या इतक्या लांब नसतात. ओळखीचं वाटतय. लांब ग्रामोफोनच्या कर्ण्यासारखा आकार त्यातून बाहेर डोकावणारे केसर..... अरे हे तर धोत्र्याचे फूल. धोत्र्याचे फूल? धोत्र्याचे फुल हे तर हडप्पन संस्कृतीतल्या विटांवर कोरलेले सापडले होते.... म्हणजे हे मंदीर त्या काळातले आहे? बापरे म्हणजे किमान पाचहजार वर्षे तरी जुने. माझं सगळं लक्ष्य छतावरच्या धोत्र्याच्या फुलाकडे आहे. फुलाच्या आजूबाजूला अष्टकोनात धोत्र्याची पाने आहेत. पानाच्या शीरासुद्धा दिसताहेत. अंधारामुळे उंचीचा अंदाज येत नाही. पण पंधरा एक फूट तरी असेल. मी पंधरा फूट खाली असूनही मला इतकं बारीक काम स्पष्ट दिसतंय. छातावर पानांच्या बाजुने गोलात आणखी काही आकार आहेत. धारदार दातंचा जबडा वासून अंगावर येणारा शार्क मासा,..... शिंगे उगारलेला बैल,...... माणसाचे रागीट तोंड असलेला विंचू...... आपापसात लढणारे खेकडे.... तलवार उपसलेला घोड्याचे शरीर असलेला योद्धा .....एकमेकांशी कुस्ती खेळणारे दोन पैलवान..... विंचू ...मासा... खेकडे .... कुस्ती खेळणारी दोन मुले.. काहितरी संगती लागतेय. मासा... बैल...खेकडा.. विंचू.... दोन मुले... मीन ..कर्क ....वृष्चीक ... मिथून ....अरे!.... या तर बारा राशी. पण या सगळ्या राशी रागीट आणि युद्ध करताना दाखवल्या आहेत. गंमत आहे. अशी शिल्पे कुठेच पहायला मिळाली नाहीत आजपर्यंत. कुठे ऐकल्याचं ही आठवत नाही. बारा राशिंची बारा शिल्पे. शार्क माशाच्या जबड्यातील दात मोजता येतील इतके स्पष्ट कोरले आहेत. बारा राशींची बारा शिल्पे..... त्या बाहेर आणखी एक गोल रिंगण . मी बारकाईने पहातो. .... चेहेरा वर केलेल्या पाठमोर्‍या माणसांची शिल्पे.
छतावर असले कोरीव शिल्पे कोरणारे कारागीर कसले असतील? आणि दगडात हे असं त्यांनी कोरलं असेल? ज्या काळात हे कोरीव काम घडले त्या काळी आवजारेही तेवढी प्रगत नसतील.......
जळ जवळ अर्धा पाऊण तास झाला असेल, मी कोरीव काम पहातोय. मानेला रग लागते असं छाताकडे मान वर करून बघताना इतकं मान वर करून आपण कधी असतंच नाही. माझ्या वाक्याला महेशने दाद दिली असती..... अरेच्चा हा अजून आला कसा नाही?
महेश..... महेश ....... महेश...... माझा आवाज घुमत परत मलाच प्रतिध्वनी म्हणून ऐकू येतो. प्रत्युत्तर काहीच येत नाही. थोडा वेळ थांबून मी पुन्हा हाक मारतो. पुन्हा तेच.प्रत्त्युत्तर नाही. कदाचित महेशला माझी हाक ऐकू गेली नसेल. मी जेथून महेश खाली गेला होता त्या बाजूला जातो. .... काहीतरी चुकतंय.इथेच तर होतम ते दार..... इथूनच तर महेश खाली गेला. ....... मला त्या बाजूला कुठलंच दार दिसत नाही..... दार जाऊ दे एखादा कोनाडा चौकट असे काहीच दिसत नाही. अरे हे काय झालं? इथली दगडी चौकट कुठे गेली? अर्धवट उजेडात नीट दिसलं नसेल म्हणून मी पुन्हा एकदा नीट पहातो... भिंत हाताने चाचपून बघतो. हाताने थापट्या मारून बघतो. पण तिथे दार चौकट असं काही असल्याची खूणही नाहिय्ये.
...........................................................अखंड,सलग दगडी भिंत . त्यावर कोरीव काम केलेलं आहे.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

26 Jan 2022 - 12:25 am | श्रीगणेशा

थोडा वेळ वाटलं की पुन्हा तीच कथा .. महेश घाबरून पळत येतो, काहीतरी वस्तू चोरून, दोघेही पळत घरी येतात.. चक्रात अडकल्यासारखे :-)

पण काहीतरी नवीन आहे कथेत आता. बहुतेक शिवाला प्रयत्न करून महेशला शोधायचा / सोडवायचा मार्ग शोधावा लागेल.

महेश बाकी अती उत्साही दिसतोय, मागचं सगळं विसरून परत एकदा नवीन तळघरात जायची काय गरज होती?

पण कथेतली उत्कंठा मात्र टिकून आहे!

विजुभाऊ's picture

26 Jan 2022 - 10:34 pm | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा - २० http://misalpav.com/node/49829

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2022 - 5:50 pm | चौथा कोनाडा

महेश गायब झाला की काय !
उत्कंठावर्धक सुरु आह कथा.