वाईन - भाग २

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
12 Nov 2021 - 9:52 pm

(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १

पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...)

सौ: मग काय विचार केला आहे तुम्ही?
श्री: (गोंधळून) कशाचा विचार? आणि तू असं अचानक कोड्यात काय बोलते आहेस आज?
सौ: वाटलंच. माझं मन काही तुम्ही जाणू शकत नाही. आज १६ वर्षे संसार एकटीने चालवला. पहिल्यांदा काहीतरी मागितलं तर तुम्ही चेष्टेवारी नेला विषय.
श्री: (डोक्यात प्रकाश पडून) मी तुझी चेष्टा का करेल? आणि तेही वाईन वरून? उलट तूच माझी चेष्टा केली की काय असं मला वाटतंय. पण मला त्याचा राग नाही आला.
सौ: हो ना. येईलच कसा राग? मनापासून बोलायला, वागायला पाहिजे ना माणसाने राग येण्यासाठी. तुमचं डोकं नेहमी त्या स्क्रीन मधे. हाकेला ओ सुद्धा द्यायला तुम्हाला फुरसत नसते. कधी एकदाचं ऑफिस सुरू होतंय तुमचं असं झालंय. माझ्या जिवाला थोडी तरी शांतता मिळेल.
श्री: (मनातल्या मनात.. मी ही निवांत होईल ऑफिस सुरू झाल्यावर) बघ बरं, तुला करमणार नाही उलट, मी घरी नसल्यावर.
सौ: नाही करमायला काय झालं? मला स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून.
श्री: म्हणजे इतके दिवस बंद असलेला टीव्ही सुरू होणार. आणि त्या स्लो मोशन टाईप प्रसंग असलेल्या रटाळ मालिका पाहत तुझा दिवस आनंदात जाणार तर. हाहाहा.
सौ: हसा थोडे दिवस अजून. डब्यातलं थंड जेवण घ्यावं लागेल ऑफिसात, मग आठवेल की मागच्या दोन वर्ष तुम्हा सगळ्यांना वेळेवर, अगदी गरम जेवण मिळण्यासाठी मी किती राबले ते. आणि मी फक्त वाइनची एक बाटली मागितली तर एवढी चेष्टा केली.
श्री: चेष्टा नाही, गंमत होती ती. आणि डब्याचं म्हणशील तर माझ्या ऑफिसात आठवड्यातील काही ठराविक दिवस घेत जाईल मी जेवण, तेवढाच तुला आराम.
सौ: माझी काळजी असं भासवू नका. ऑफिसातील बिर्याणी, छोले भटुरे आणि राजमा चावल खाऊन-खाऊनच पोट सुटलय पाहा ते. हाहाहा.
श्री: पोटावर घसरू नको आता.
सौ: हाहाहा. पोटावर घसरता येईल अशी वेळ येईल, आताच लक्ष दिलं नाही तर.
(तेवढ्यात दारावरची बेल वाजते)
श्री: (पोटावरच्या रागात) तुझी शेजारची मैत्रीण कडमडली असेल. काहीतरी विशेष मेजवानी असेल आणि त्यासाठी कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, लसूण, इत्यादी आणायचं विसरले असतील. आणि ते देता-देता ती रेसिपी कशी करतात याचीही सविस्तर चर्चा करून घेणार तू आता. पुढील अर्धा तास निवांत आता मी.
सौ: माझ्या मैत्रिणीचं नावही घ्यायचं नाही. आपण गावी गेल्यानंतर त्यांनी मोजून ७ पार्सल घेतले की नाही, तेही कोरोनाची भीती असताना? सोयीने विसरले का?
श्री: (हळू आवाजात) पण ते ७ पार्सल मागविले कोणी?
सौ: कान तीक्ष्ण आहेत बरं माझे. त्या ७ मधील ३ तर तुमच्या दोघांसाठीचे कपडे होते.
(परत बेल वाजताच सौं नी दरवाजा उघडला, आणि अपेक्षेप्रमाणे सौं ची मैत्रीण आली होती. तिच्याकडून काहीतरी वस्तू श्री कडे देता-देता..)
सौ: पाहा. काही मागण्यासाठी नाही तर तुम्हाला टोमॅटोची चटणी आवडते मी असं सांगितलं होतं तिला एकदा, म्हणून ती आठवणीने आली आहे घेऊन. कोतं मन आहे तुमचं.
श्री: (आनंदाने) अरे वा! बघ, साखरेचे खाणार, त्याला देव देणार! देवाला काळजी माझ्या आवडी-निवडीची.
(सौ आणि तिची मैत्रीण यांच्यात परिसंवाद सुरू असताना, पार्सल घेऊन एक माणूस येतो, व सांगतो की सही करावी लागेल. सौ श्री कडे वळून...)
सौ: सही कशाला हवी आहे आता? काय मागवलं आहे तुम्ही?
(श्री काही सांगायच्या आत, तो पार्सलवाला मोठ्याने सांगतो की अल्कोहोलिक ड्रिंक आहे म्हणून सही लागेल. सौ ची मैत्रीण डोळे मोठे करून आपल्या घराकडे वळते. आणि सौ श्री कडे वळून डोळ्यातून एकाच वेळी राग, आश्चर्य, 'काय हे' असे भाव व्यक्त करते)
सौ: (आता एकदम हळू आवाजात, अजूनही मागे वळून वळून पाहणाऱ्या मैत्रिणीला ऐकू जाऊ नये म्हणून) काय हे? मला सांगायचं होतं आधी. मी कशाला गप्पा मारत बसले असते. आता काय वाटलं असेल तिला? पाहा कशी मागे वळून पाहत जाते आहे ती.
श्री: तुला कसं माहीत, ती मागे वळून पाहते आहे ते?
सौ: माझं लक्ष चौफेर असतं बरं, तुमच्यासारखं नाही.
श्री: ते राहू दे. पार्सल माझ्याकडे दे लवकर.
सौ: मी काय लगेच घेणार आहे का? निदान पाहू तरी द्या वाईनची बाटली दिसते कशी ते?
श्री: मुलं येतील इतक्यातच खेळून. त्या आधी लपवून ठेवायला नको का?
सौ: एवढं समजतं, उगीच शिकवू नका मला. हे पहा, किती लांबलचक नाव आहे हे - "अल्बर्ट बीचो चॅट्यून्यूफ..."
श्री: (हसून) अग ते "अल्बे बिशू शाहटोनफ ड्यू पाह्प" आहे.
सौ: गूगलवर शंभर वेळा उच्चार ऐकला असेल तुम्ही! आविर्भाव तर असा की तुम्हीच ठेवलंय हे नाव.
श्री: झालं का पाहून? दे पाहू इकडे तो बॉक्स.
सौ: विषय बदलला लगेच. नेहमीचीच सवय तुमची.
(बॉक्सवरील बारीक मजकूर वाचत, एकाच वेळी आश्चर्य आणि रागात) कुणी सांगितला होता हा उद्योग करायला तुम्हाला?
श्री: काय उद्योग? तू तर म्हणालीस वाईन एकदा घ्यायचीच आहे म्हणून.
सौ: पण त्यासाठी पाच अंकी खर्च कुणी सांगितला होता करायला? पैशांची किंमतच नाही तुम्हाला.
श्री: अगं, तू काय दररोज घेणार आहे का वाईन? मग उगीच कंजुषी कशाला?
सौ: जसं की मी घेणार आणि तुम्ही फक्त पाहतच राहणार?
श्री: कल्पना चांगली आहे, तू एकटीच घे. जास्त दिवस पुरेल तुला. चांगली चव असेल तर सांग, मी ५ ml घेईल कधीतरी.
सौ: तुमच्या डोक्यात अजून ५ ml च आहे का अजून?
श्री: (हसून) गंमत केली. सर्व गणित करून ठेवलंय.
सौ: वाईन म्हणजे काय गणित करून घ्यायची गोष्ट आहे का, औषध घेतल्यासारखं?
श्री: काहीही म्हण, मी सांगेल तेवढीच घ्यायची एका वेळी. आणि मी लपवून ठेवणार आहे बाटली, तुझा भरवसा नाही.
सौ: भरवसा तर मला नाही तुमच्यावर. कळू सुद्धा दिलं नाही कधी बाटली मागविली ते. मी होते मैत्रिणीसोबत गप्पा मारत तिथे, नाहीतर?
श्री: नाहीतर काय? मी एकट्याने संपविली असती असं म्हणायचं का तुला?
सौ: (हसून) एकट्याने? काय बिशाद आहे तुमची?
श्री: बघ बरं. तू जितकी घेशील त्याच्या अर्धी घेईल मी.
सौ: सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, हाहाहा.
(दारावरची बेल वाजते. घाईत लपवालपवी होते. नेहमीची संध्याकाळ सुरू होते आणि संपते. रात्री उशीरा..)
सौ: अहो, बाटली कुठे ठेवली आहे?
श्री: (झोपेतून जागे होत) मी नाही डोक्याला तेल लावणार आता, किती वाजले बघ.
सौ: (कपाळावर हात मारून) बरोबर आहे. त वरून ताकभात ओळखायला तैलबुद्धी लागते, ती नाही तुमच्याकडे. (रागात) वाइनची बाटली विचारतेय, वाइनची!
श्री: (डोक्यात अचानक प्रकाश पडून) हळू बोल. मी देतो शोधून.
सौ: शोधून? अरे देवा! मला वाटलंच! घरातील एकही वस्तू कधीही तुम्हाला सापडत नाही, मग लपवून ठेवायची उठाठेव कशाला करायची?
श्री: सापडेल...फक्त तू मदत कर थोडी शोधायला.
सौ: मदत? कळलं! म्हणजे मी घरभर शोधते, तुम्ही एका जागी बसून शोधल्याचं नाटक करा.
श्री: तू टेन्शन घेऊ नकोस, सापडेल.
(थोड्या वेळाने)
सौ: हे घ्या, सापडली!
श्री: कुठे ठेवली होती मी?
सौ: अडगळीच्या खोलीत.
श्री: तुझी परीक्षा घेत होतो. हाहाहा. म्हटलं पाहुयात सापडते का तुला.
सौ: इकडे या.
श्री: आता सापडली ना बाटली? मग कशाला?
सौ: (थोडा आवाज वाढवून) या म्हणाले ना!
(अडगळीच्या खोलीतील एक कोपरा.. जुन्या खुर्च्या, टेबल, मेणबत्त्या, उंच ग्लासेस, मंद प्रकाश आणि संगीत..)
श्री: (आश्चर्याने) असा प्लॅन होता का? आणि उंच ग्लासेस? कधी?
सौ: तुम्हाला काय वाटलं? सरप्राइज फक्त तुम्ही देऊ शकता?
श्री: आणि तुलाही अडगळीचीच खोली सापडली?
सौ: निवांत वाटला, अडगळीतला कोपरा..
श्री: आणि मनातला?
श्री व सौ: (एकसुरात, काचेच्या मधुर संगीतात, स्मितहास्यात)
चिअर्स!!

(समाप्त)

विनोदलेख

प्रतिक्रिया

कॉमी's picture

12 Nov 2021 - 10:46 pm | कॉमी

सुखांत !

सौंदाळा's picture

15 Nov 2021 - 3:05 pm | सौंदाळा

मस्तच
पहिल्या भागासारखाच सुंदर भाग. नवरा बायकोच्या एकमेकांना कोपरखळ्या पण खासच

खुशखुशीत! संवाद छान लिहिले आहेत.
मी पण मैत्रिणींबरोबर अख्खी बाटली सुला वाईन प्यायले एकदा ह्यांना नाय सांगितले :)

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 7:10 pm | मुक्त विहारि

आवडले

वाईन जास्त आवडत नाही, पण हा लेख आवडला ...

श्रीगणेशा's picture

15 Nov 2021 - 9:35 pm | श्रीगणेशा

मीही अजून वाईन किंवा तत्सम पेय कधीही घेतलं नाही, पण कयास आहे की वाइनची चव चांगली असावी, अनुभवी मिपाकर योग्य मार्गदर्शन करतीलच :-)

कॉमी, सौंदाळा, भक्ती, मुवी -- प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

चौकस२१२'s picture

16 Nov 2021 - 9:52 am | चौकस२१२

थंडीत उबदार अशी तांबडी शिराझ ( थंड नाही ) किंवा माफक पोतुगीज पोर्ट
उन्हाळी दिवसात थोडी गोडसर अशी थंड केलेली व्हाईट शिराझ किंवा स्पॅनिश रोझे ( पण ती फार गोड नसावी )
उन्हाळी दिवसात , अँटिपास्टो किंवा कोल्ड कट म्हणजे भाजून थंड केलेलं चिकन किंवा सलामी + ऑलिव्ह ( ग्रीक कालामाटा ) ऑलिव्ह तेलात बुडवून सार डो पाव आणि मस्त पांढरी वारुणी ( फार थंड नाही माफक थंड)
मासा ( कमी मसाल्याचा किंवा फक्त काली मिरी मीठ , आणि काही पार्सली / कोथिंबीर याबरोअबर थंड शारडोने
थोडेसे कोमट केलेलं ब्रि चीज आणि पिनांनवा ( पांढरी)

भारतीय पदार्थांबरोअबर वाईन अगदीच जात नाही असे नाही पण बरेचदा त्यातील मसाला , तोंडातील वाईन ची चव बदलतो असा माझा तरी अनुभ आहे
पण माफक मसाला असलेलया तंदुरी मधून काढलेली कबाब बरोबर पांढरी वारुणी चालते
आणि हो वाईन म्हणजे बायकांचे पेय हा विचार आगमय आहे .. वाईन मध्ये १३ टक्के अल्कोहोल असते आणि बीर मध्ये ५ %!

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2021 - 1:37 pm | चौथा कोनाडा

झकास जुगलबंदी.
अडगळीतला निवांत कोपरा..गावला आन मग काय मज्जाचमज्जा !
मजा आली वाचताना. +१

श्रीगणेशा's picture

1 Feb 2022 - 2:12 am | श्रीगणेशा

हा लेख लिहिताना वाइन ऑनलाईन ऑर्डर करून मागविता येईल अशी कल्पना करून लिहिलं होतं.

महाराष्ट्र सरकारने ही समस्या मनावर घेतली आणि आता दुकानातही वाइन मिळण्याची व्यवस्था केली आहे.

पुढे जाऊन, संपादक लोक "वाइन म्हणजे लिकर नाही" असं समाजप्रबोधन करत आहेत.

वाईनला चांगले दिवस आले आहेत.