हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग २

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
17 Oct 2021 - 10:21 pm

०८ ऑगस्ट

आजचा आमचा पहिला थांबा होता गणिगत्ती जैन मंदिर. अगदी साध्याश्या या मंदिराकडे लोकांना आकर्षित करेल असं काहीच नाही; ना भव्य आकार, ना कुठली आकर्षक कलाकुसर. मला मात्र हे मंदिर त्या काळच्या राजांच्या उदार आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक वाटलं!

गणिगत्ती जैन मंदिर पाहून आम्ही निघालो हजाररामा मंदिराकडे. आता आम्ही हंपीच्या गाभ्यात प्रवेश करत होतो. विष्णुच्या रामावताराला वाहिलेल्या हजाररामा मंदिराचं नाव पडलं आहे त्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या रामायणातल्या अनेक प्रसंगांमुळं.


या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुख्यमंडपात उभे खांब बनवण्यासाठी वापरलेला काळा दगड. हा दगड फक्त याच मंदिरात दिसतो. हंपी परिसरात कुठेच हा दगड आढळत नाही, अर्थात फक्त या मंदिरासाठी तो कुठूनतरी आणला असावा.

हजाररामा मंदिराच्या शेजारीच आहे राजवाडा परिसर. राजा आणि इतर अतिमहत्वाचे लोक जिथे बसत आणि विजयनगर साम्राज्याचे कामकाज चालवत ती जागा. लहान मोठ्या अशा जवळपास ४० वास्तू या परिसरात आहेत. अर्थात् आज या वास्तुंचे चौथरेच ते काय उरले आहेत. चौथ-यांच्या वरचे मुख्य बांधकाम लाकडे वापरून केले गेले असेल म्हणून की काय?

हजाररामा मंदिराकडून वास्तुंचे अवशेष पहात महानवमी डिब्ब्याकडे निघालो की उजव्या बाजुला दिसते पुष्कर्णी. ही (बहुधा) हंपीतली सगळ्यात खोल आणि (नक्कीच) सगळ्यात देखणी पुष्कर्णी आहे. पुष्कर्णी आज जरी सुंदर दिसत असली तरी पन्नासेक वर्षांपुर्वी तिची अवस्था एका उथळ खड्ड्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड अशी होती. (संदर्भ: भारतीय पुरातत्व विभागाचे हंपी संग्रहालय). पुष्कर्णी शेजारीच असलेल्या आणि तिच्यात पाणी खेळवण्यासाठी उभ्या केलेल्या दगडी नळांची रचनाही आवर्जून पहाण्यासारखी आहे.

पुष्कर्णीशेजारीच आहे महानवमी डिब्बा. विजयनगर साम्राज्यातलं सगळ्यात महत्वाचं सभागृह. हंपीचे राजे इथेच महानवमी (विजयादशमी) साजरी करीत आणि राज्याचे इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही इथेच होत. जवळपास ८ मीटर उंच या चौथ-यावर चढून गेलं की वरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. अर्थात हे सभागृह एवढं उंच बांधायचं कारण काही कळत नाही, इथे चालणारे कार्यक्रम प्रजेलाही अगदी सहज दिसावेत म्हणून?

घड्याळात साडेबारा होत होते आणि ऊन अक्षरश: भाजून काढत होतं. खरं तर खोलीवर जाऊन AC लावून मस्त ताणून द्यावी असं वाटत होतं, पण कसंतरी स्वत:ला आवरलं आणि जवळच असलेलं राण्यांचे स्नानगृह पहायला निघालो. राण्यांचे स्नानगृह म्हणजे एक भला मोठा हौद आणि त्याच्या चारही बाजुंना असलेले रुंद व्हरांडे.

आत्तासारखं कडक, बोचरं ऊन पडलेलं असावं आणि जोरात पळत येऊन आपण ह्या हौदातल्या गार गार पाण्यात उडी मारावी - ऑगस्टमधल्या एका दमट, अस्वस्थ करणा-या दुपारी यापेक्षा आनंददायी गोष्ट काय असू शकते?

राण्यांचे स्नानगृह पाहून आल्यावर आम्ही एक छोटी विश्रांती घ्यायची ठरवली. ह्या भयंकर उन्हात उघड्यावर फिरण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही निघालो हंपी वस्तुसंग्रहालयाकडे. वस्तुसंग्रहालयाला जुजबी प्रवेशशुल्क आहे. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एकच तिकीट काढून तुम्ही लोटस महाल आणि गजशाळा, आणि विठ्ठल मंदीर ही ठिकाणंही पाहू शकता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं चालवलेल्या ह्या वस्तुसंग्रहालयात हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. मूर्त्या, नाणी, हत्यारं अर्थातच इथं आहेत, पण इथल्या दोन गोष्टी मला विशेष आवडल्या. पहिली म्हणजे अंदाजे २० फूट बाय २० फूट ह्या आकारात बनवलेलं हंपीचं प्रारूप (मॉडेल). हंपीतली मंदिरं, तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूच्या टेकड्या हे सगळं काही ह्या प्रारूपात आहे. हंपी नेमकं कसं आहे हे ह्या प्रारूपामुळे एका दृष्टिक्षेपात आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे हंपीला भेट दिलेल्या अंतर्राष्ट्रीय प्रवाशांनी केलेली हंपीची वर्णनं. ह्या वर्णनांमधून हंपीच्या राजांचं, त्यांच्या दिनचर्येचं, तिथल्या राज्यकारभाराचं आणि तिथं राहणा-या लोकांच्या जीवनशैलीचं दर्शन आपल्याला घडतं.

वस्तुसंग्रहालय पाहून आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यावर आम्ही तिथंच थोडी विश्रांती घेतली आणि उन्हं थोडी उतरल्यावर निघालो लोटस महालाकडे.

खरं सांगायचं तर, का कोण जाणे, लोटस महाल हंपीतला वाटतच नाही. मला तर हा महाल दुसरीकडून कुठूनतरी उचलून हंपीत अलगद ठेवल्यासारखा वाटतो. याचं कारण सोपं आहे - हंपीतल्या सगळ्या वास्तू आहेत हिंदू, लोटस महालात मात्र हिंदू वास्तुकलेचं एकही लक्षण दिसत नाही. ही वास्तू १००% इस्लामी वाटते. अर्थात्, महाल सुंदर आहे याबाबत काहीच वाद नाही.

लोटस महालाला तटबंदी म्हणून बांधलेल्या एका मोठ्या दगडी भिंतीतलं एक छोटंसं दार पार करून आपण गजशाळेजवळ पोचतो. लोटस महालाप्रमाणेच ह्या वास्तुवरचा इस्लामी वास्तुकलेचा प्रभावही अगदी सहज दिसून येतो.

गजशाळेशेजारीच आणखी एक वास्तू आहे. रुंद व्हरांडे असलेल्या ह्या वास्तुचं मूळ प्रयोजन काही कळत नाही. (माहूत/सैनिकांना राहण्यासाठी?) आज मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं इथे हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या विविध मूर्त्या ठेवल्या आहेत.

ह्या इमारतीत ठेवलेली एक गणेशमुर्ती

गजशाळेसमोरची हिरवळ फारच आकर्षक दिसत असली आणि तिच्यावर ताणून द्यायचा अनावर मोह होत असला तरी आम्ही तिथून निघालो. खरं तर विजयविठ्ठल मंदीर आमच्या आजच्या कार्यक्रमात नव्हते. पण वस्तुसंग्रहालयात घेतलेले तिकीट आज जर वापरले नसते तर ते उद्या पुन्हा काढावे लागले असते (गरीबी खूप वाईट...), तस्मात् आम्ही विठ्ठल मंदिराकडे निघालो.

विठ्ठल मंदीराजवळ गाड्या नेता येत नाहीत. तुमच्या गाड्या वाहनतळावर लावून पुढे विजेवर चालणा-या गाड्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जावे लागते. विठ्ठल मंदीराला हंपीतील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदीर म्हणता येईल - अर्थात् गर्दी बरीच होती- गाड्यांसाठी आणि मंदिरातही.

या मंदीराचे मुख्य आकर्षण आहे या मंदिरातला रथ. या रथाला आता ५० रुपयांच्या नोटेवरही स्थान मिळालेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Indian_50-rupee_note#/media/File:India_new...).

पूर्वी रथाला हात लावता येत असे, आत्ता मात्र रथाभोवती एक अनाकर्षक अशी साखळी ओढून घेतलेली दिसते - हा नक्कीच ‘इन्फ्लुएन्सर्सचा’ दुष्परिणाम असावा.

विठ्ठल मंदीरातल्या बहुबेक मंडपांची आता पडझड झाली आहे, तेव्हा आम्ही रथाजवळच रेंगाळलो. गर्दीमुळे अस्वस्थ व्हायला होत होतं - छायाचित्रे घेताना मला लोकांची अडचण होत होती किंवा माझी त्यांना. आता वाटतं, सुट्टीच्या दिवशी ह्या मंदिराला भेट देऊन आम्ही मोठीच चूक केली होती; वाचकांनी ही चूक करू नये. अर्धा एक तास घालवून आम्ही शेजारच्या एका मंदिराकडे निघालो. ह्या मंदिरात पाहण्यासारखे काहीच नाही. बाहेर दगडांवर आम्हाला एक दोन सरडे दिसले तेवढेच. आम्ही आधी ह्याच मंदिराला उत्किर्णित विष्णू मंदीर समजत होतो, पण खरं तर ते होते शिवमंदिर. उत्किर्णित विष्णू मंदीर विठ्ठल मंदीराच्या मागे आहे.

विठ्ठल मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो - हंपीतल्या एका नितांतसुंदर दिवसाची सांगता झाली होती!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Oct 2021 - 5:18 am | कंजूस

एकाच तिकिटात एकाच दिवशी तीन गोष्टी ( बऱ्याच आहेत त्यापैकी तिघांना तिकीटावर प्रवेश आहे.)अधिक इतर सर्व पाहणे अशक्य आहे हे मान्य.
तिकीटाचे तीन भाग करून दोन दिवसांसाठी प्रवेशाकरता असे छापायला हवे. म्हणजे चालणे दोन दिवसांत विभागले जाईल.
((सरकारी कारभारात ओडिट,अकाउंटिंग,पर्यटन,सुरक्षा अशा भागांचे कारभार वेगवेगळे चालतात आणि समंजसपणा + एकवाक्यता कमी असते. असो. ))
मग हंपी उत्सवाच्या वेळी रस्ते वाहतूक , सांस्कृतिक मंत्रालय आणि गृहखाते हे आणखी तिघे घुसतात. हेलिकॉप्टर फेरी ठेवल्याने विमान वाहतूक, हेरिटेज वारसा जतन सुरक्षितता,पुरातत्व खाते हेसुद्धा लक्ष घालतात. तर त्या वेळी हंपीला जाऊ नये.

अनिंद्य's picture

18 Oct 2021 - 12:09 pm | अनिंद्य

हंपीत हेलिकॉप्टर फेरी ?

असे आकाशातून हंपी एकाच नजरटप्प्यात बघायला फार आवडेल, वर्षभर असते का ?
असेच Hot Air Baloon फेरी सुरु झाली तर बहार येईल.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 1:05 pm | टर्मीनेटर

असेच Hot Air Baloon फेरी सुरु झाली तर बहार येईल.

कल्पना छानच आहे! ती प्रत्यक्षात आणण्याची KSTDC ला सुबुद्धी होवो 🙂

कंजूस's picture

18 Oct 2021 - 5:18 pm | कंजूस

असेच Hot Air Baloon फेरी सुरु झाली तर बहार येईल.

हो. कारण आवाज येत नाही. पण त्या फेरीत बराच वेळ जाईल म्हणून उत्सवात ठेवणार नाहीत.

कंजूस's picture

18 Oct 2021 - 5:16 pm | कंजूस

आम्ही गेलो तेव्हा हंपी उत्सव चालू होता. म्हणजे दिवसा काही नसतात कार्यक्रम. संध्याकाळी सुरू होतात. पुरी, खजुराहो,'एलफंटा' उत्सवाप्रमाणेच.
पण इकडे हेलिकॉप्टर ठेवली होती. देवळं पाहून दमलेलो म्हणून तिकडे रांग लावायला गेलो नाही. भीमाच्य गेटपाशी कुठे होता हेलिप्याड.
आता करोना पूर्ण गेल्यावर करतील चालू.
--------
हंपी उत्सवासाठी स्थानिक लोकच कारने येत असावेत रात्री. त्यामुळे होस्पेटात हॉटेल रुम मिळेल का ही धास्ती मिटली. अशा वेळी होस्पेटात राहाणेच बरे.

प्रचेतस's picture

18 Oct 2021 - 7:01 am | प्रचेतस

हा भागही आवडला.
कमल महालाची रचना मिश्र आहे. त्याचू शिखरं फांसना पद्धतीची आहेत. आणि खालचा भाग इस्लामिक शैलीत. गजशाळेतही असेच.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 11:06 am | टर्मीनेटर

मस्त!
गणिगत्ती जैन मंदिरा बाहेरील स्तंभ बघून मला अलेक्झांड्रीयातला पॉम्पे चा स्तंभ आठवला 🙂
हा रथ माझ्यासाठी हंपीतले प्रमुख आकर्षण आहे. BTW वस्तुसंग्रहालयाचे ४ फोटो दिसत नाहीयेत.

एक_वात्रट's picture

18 Oct 2021 - 11:30 am | एक_वात्रट

आपण लक्षात आणून दिल्यानुसार आता दुरुस्ती केली आहे, ते ४ फोटो आता दिसायला हवेत. जरा तपासून सांगाल का?

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 11:41 am | टर्मीनेटर

हो, आता दिसत आहेत.
धन्यवाद 🙏

प्रचेतस's picture

18 Oct 2021 - 11:34 am | प्रचेतस

त्या रथावर आधी लहानसे शिखर देखील होते जे आजही बाजूला पडलेले दिसते. अलेक्झांडर ग्रीनलॉच्या छायाचित्रात रथावरील शिखर स्पष्टपणे दिसून येते.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 11:44 am | टर्मीनेटर

त्या रथावर आधी लहानसे शिखर देखील होते

कसला भारी दिसत असेल तेव्हा तो रथ 😍

प्रचेतस's picture

18 Oct 2021 - 12:30 pm | प्रचेतस

हे बघा ते छायाचित्र, १८५६ मधले विठ्ठल मंदिर

a

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 12:55 pm | टर्मीनेटर

मस्त!
आजूबाजूला रान माजले होते तेव्हा 😔

तालिकोटच्या लढाईत विजयनगरचा पराभव झाल्यानंतर हंपी कधीच वसले नाही.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 1:01 pm | टर्मीनेटर

दुर्दैव!
इतके आखीव रेखीव, कोरीव शहर दुर्लक्षित राहिले/निर्मनुष्य झाले. त्यावेळच्या नागरिकांची मानसिकता काय असेल कोणास ठाऊक!

प्रचेतस's picture

18 Oct 2021 - 1:32 pm | प्रचेतस

विजयनगर कधीच पराभूत होणार नाही अशी तिथल्या नागरिकांची मानसिकता होती. अलिया रामराया तालिकोटला गेल्यावर देखील त्यांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालूच होते. रामराया पडल्यावर देखील विजयनगरला लगेच बातमी आली नाही, नंतर पळून आलेले राजेलोकांचे वंशज काही खजिना घेऊन दुसरीकडे गेले पाठोपाठ अचानक पाच शाह्यांची टोळधाड विजयनगरावर चालून आली, कत्तली झाल्या, जाळपोळ झाली, लुटालूट सुरु झाली, काही अपवाद जवळपास सर्व मंदिरातील प्रतिष्ठापित मूर्ती फोडण्यात आल्या, मंदिरे बाटवली गेली. जवळपास ६ महिने हा विध्वंस सुरु होता.

अनिंद्य's picture

18 Oct 2021 - 3:28 pm | अनिंद्य

@ प्रचेतस, यावर कर्नाडांचे Crossing To Talikota हे एक उत्तम इंग्रजी नाटक आहे. करोनापूर्व फेब्रुवारीत बंगलोरच्या अर्जुन सजनानी /साईट अँड साऊंड परफॉर्मिंग आर्टस् संस्थेतर्फे सुंदर प्रयोग बघण्याचा योग आला होता.

टर्मीनेटर's picture

19 Oct 2021 - 10:10 am | टर्मीनेटर

विजयनगर कधीच पराभूत होणार नाही अशी तिथल्या नागरिकांची मानसिकता होती.

फाजील आत्मविश्वास नडला म्हणायचा! पण ह्या सुंदर शहराबाबत जे झाले ते फारच दुर्दैवी वाटतंय.

आज दोन्ही भाग वाचले, हंपी सहल उत्तम चालली आहे.

या भागातले पुष्करणीचा आणि गजशाळेचा (श्वेत-श्याम) फोटो विशेष आवडले.

पु भा प्र

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Oct 2021 - 1:34 pm | ॲबसेंट माइंडेड ...

दोन्ही भाग वाचले.लेख व फोटो सुंदर.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग लगेच वाचून काढला ! आटोपशीर सहज लेखन व प्रचि अप्रतिम सुंदर ... सगळेच !

तिकिट पुन्हा काढावे लागले असते (गरीबी खूप वाईट...), तस्मात् आम्ही विठ्ठल मंदिराकडे निघालो.

ह्या हृदयद्रावक परिस्थितीत त्याच दिवशी विठ्ठल मंदिर पाहिले हे वाचून सदगतीत (स चा पाय कसा मोडायचा ?) जाहलो.
आमच्यावर ही दोनचार वेळा अशे भीषण प्रसंग आल्यामुळे आपॉपच सहवेदना व्यक्त झाली
😃

हे प्रचि कशाचे आहे ? वेगळेच दिसत आहे

fdter3425v

गोरगावलेकर's picture

22 Oct 2021 - 12:00 pm | गोरगावलेकर

थोडक्यात मस्त वर्णन. फोटोही छानच.