हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग १

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
15 Oct 2021 - 2:32 pm

एखादं ठिकाण पाहून झालं की त्याच जागी पुन्हा जायला मी नाखूश असतो; मला तो पैशांचा नि वेळेचा अपव्यय वाटतो. पण काही जागा याला अपवाद आहेत. ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, ओर्छा, मांडू, हंपी इ. काही. ह्या जागा पाहून झाल्या असल्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा त्यांना भेट द्यायचा मानस आहे. ह्या यादीतल्या हंपीला भेट द्यायचा विचार बरेच दिवस मनात होता; शेवटी ह्या ऑगस्ट महिन्यात तो योग आला.

मी पहिल्यांदा हंपीला गेलो ते २०११ साली. अर्थात् ती आमची धावती म्हणता येईल अशी भेट होती. आम्ही हंपी उरकली ती दोन दिवसांत आणि तीही काय पहायचे, कसे पहायचे याचे काहीही पूर्वनियोजन न करता. यावेळी मात्र काय नि कसे पहायचे याचे नियोजन करून गेलो होतो. तरीही काही ठिकाणं पहायची राहिलीच. पण काही हरकत नाही, ह्या कारणामुळे पुन्हा एकदा हंपीला जाणे होईल, नाही का?

हंपीबाबत मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले गेले आहे - किंबहुना मराठी प्रवासवर्णानांमध्ये हंपीचा क्रमांक पहिला असेल. त्यामुळे या लेखमालेत मी फार काही लिहित बसणार नाही; फोटो जास्त नि मजकूर कमी असे ह्या लेखमालेचे स्वरूप असणार आहे. मात्र काही माहिती हवी असेल तर वाचकांनी जरूर विचारावी, मी ती देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

०६ ऑगस्ट

हंपीला जायचे ‘पुणे - सातारा - कोल्हापूर - धारवाड - गदग - हंपी’ आणि ‘पुणे - सोलापूर - वियजपूर (बीजापूर) - हंपी’ असे दोन मार्ग आहेत. पहिल्या मार्गात असलेला घाट, त्या रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि एकूणच त्या रस्त्याची खराब स्थिती पाहता आम्ही दुसरा मार्ग निवडला. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी सकाळी हंपीला पोहोचायचे आमचे नियोजन होते. असं केल्यामुळे शनिवारचा एक जास्तीचा दिवस आम्हाला स्थलदर्शनासाठी मिळणार होता. साडेनऊचे नियोजन असले तरी आम्हाला निघायला सव्वा दहा झाले. उरळीकांचनपर्यंत गाड्यांची ब-यापैकी गर्दी असली तरी पुढचा रस्ता मात्र मोकळा होता. पुणे सोलापूर रस्ता उत्तम स्थितीत आहे. मी म्हणेन की पुण्यातून बाहेर पडणा-या सगळया रस्त्यांत हा उत्तम रस्ता आहे.

रात्री एक वाजता सोलापूरच्या अलीकडे कुठेतरी आम्ही चहा घेतला.

आजकाल कुठेही बाहेर जायचे म्हटले की आधी RT-PCR चाचणी करून घ्यावी लागते. त्यात आम्ही महाराष्ट्रातले (करोनासाठी कुप्रसिद्ध राज्यातले) - तेव्हा सगळ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी करूनच निघालो होतो. एवढ्या रात्री कुणी चाचणीचे रिपोर्ट पाहणार नाही असा आमचा होरा, पण कर्नाटकात शिरताच रस्त्याशेजारीच बनवलेल्या एका तपासणी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी आमची गाडी कडेला घ्यायला लावली. ‘कुठे चाललात? हंपीला? कर्नाटकात सध्या वीकेंड लॉकडाऊन आहे, सोलापूरला परत जा आणि सोमवारी या.’ हवालदार साहेबांनी असं म्हणताच आमच्या तोंडचे पाणी पळाले. पण आम्ही चाचणी रिपोर्ट दाखवताच हवालदार साहेब जरा मवाळ झाले. त्यांनी आमची नावे तिथल्या वहीत लिहून घेतली - पण त्यानंतर ते काहीच बोलेनात - जा असेही म्हणेनात आणि थांबा असेही म्हणेनात. तेव्हा आता आपल्याला पुढे जायची परवानगी मिळाली आहे असा समज आम्ही करून घेतला आणि तिथून दबक्या पावलांनी सटकलो.

विजयपूर होस्पेट रस्त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर म्हणता येईल ‘झकास!’. चारपदरी सरळसोट रस्ता, मध्ये विस्तीर्ण दुभाजक, अगदी तुरळक गर्दी या कारणांमुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याची मजा १००% अनुभवता येते. त्यात रात्रीची वेळ, तेव्हा गर्दी आणखीनच कमी होती. विजापूर पार केल्यावर आम्ही एका पेट्रोलपंपावर गाडी कडेला घेतली. जवळपास एक तास आम्ही त्या पेट्रोलपंपावर असू - पण झोप येत नव्हती आणि गाडीत झोपायला जागाही नव्हती - तेव्हा हॉटेलवरच जाऊन झोपू असं ठरवून आम्ही निघालो. वाटेत एका टपरीवर चहा घेऊन आम्ही हंपीला पोहोचलो तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते.

०७ ऑगस्ट

केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीतल्या खोल्या ताब्यात घेतल्यावर आम्ही पहिल्यांदा आंघोळी केल्या आणि मस्त ताणून दिली. रात्री दहा वाजल्यापासून आम्ही जागे होतो, तेव्हा अगदी मेल्यासारखे झोपलो. दुपारी एक/दीडला उठून जेवणे केले आणि आमचे हंपीतले पहिले स्थलदर्शन करायला बाहेर पडलो.

आमचा पहिला थांबा होता ‘पट्टभीराम मंदिर’. हंपीतले हे सगळ्यात मोठे (विजयविठ्ठल मंदिराहूनही मोठे) मंदिर आहे. अनेक लोक याच्याशी सहमत होणार नाहीत, पण माझ्या मते हे हंपीतले सगळ्यात देखणे मंदीरही आहे. आडबाजूला असल्याने ह्या मंदिरात फारशी गर्दी नसते. किंबहुना आम्ही गेलो तेव्हा एकूणच हंपीमध्ये फारशी गर्दी नव्हती.

आम्ही हॉटेलातून निघालो तेव्हा पाऊस पडत होता. आम्ही मंदिरात शिरताच तो थांबला. हवेत आलेला गारवा, ढगाळ आकाश आणि समोर हे सुंदर, देखणे, निर्मनुष्य मंदीर. हंपीतली आमची सुरूवात तर उत्तम झाली होती!

मंदिराच्या गर्भगृहाभोवती एक संपूर्ण अंधारा प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गातून प्रदक्षिणा मारणे हा एक थरारक, रोमांचकारी अनुभव असतो. अगदी न विसरता घ्यावा असा.

मंदिर पाहून आम्ही जवळच असलेली पुष्कर्णी आणि गुंबज द्वार पहायला गेलो. हंपीत अनेक पुष्कर्ण्या आहेत, ही त्यातलीच एक.

पुष्कर्णी पाहून आम्ही निघालो गुंबज द्वाराकडे. गुंबज म्हणजे घुमट (आठवा विजयपुरचा तो गोल गुंबज). अशी अनेक द्वारे आपल्याला हंपीत दिसतात. पुर्वी संपूर्ण हंपी शहराला मजबूत तटबंदी होती आणि ही द्वारे हाच शहरात शिरण्याचा एकमेव मार्ग होता. पण फक्त शहरात शिरायचा दरवाजा एवढाच यांना अर्थ नव्हता. त्यांचा एकूणच ऐसपैस पसारा पहाता, आत शिरत असलेल्या मालाची तपासणी करणे, त्यावर कर वसूल करणे या कामांसाठी आणि आलेल्या उतारूंना क्षणभर विश्रांती घ्यायला एक जागा म्हणूनही त्यांचा उपयोग होत असावा.

गुंबज द्वार पाहून आम्ही निघालो आणखी एका द्वाराकडे - भीमद्वाराकडे. हे दार गुंबजद्वारापेक्षाही जास्त ऐसपैस आहे. एका मोठ्या दगडावर कोरलेल्या भीमाच्या आकृतीमुळे ह्या द्वाराला त्याचे नाव मिळाले आहे.

भीमद्वार पाहून होईतो साडेसहा वाजले होते. अजून बराचसा प्रकाश होता, तेव्हा एखादे ठिकाण पदरात पाडावे असे ठरले. भीमद्वाराशेजारीच गणिगत्ती जैन मंदिर आहे, पण ते आत्ता बंद झाले होते. आम्ही नकाशात थोडा शोध घेतला आणि फार लांब नसलेले तलारीगट्टा द्वार पहायला निघालो.

द्वार म्हटल्यावर आपल्यापुढे जे चित्र येते अगदी तसेच तलारीगट्टा द्वार आहे. गावांत शिरताना आजकाल कमानी दिसतात तसे. या दारातून आजही वाहतूक चालू आहे. (विजय विठ्ठल मंदीर पाहण्यासाठी याच दारातून जावे लागते.) छतावर जाण्यासाठी द्वाराच्या दोन्ही बाजूला पाय-या आहेत. आजूबाजूचा परिसर मोठा रमणीय आहे. छोटयामोठ्या टेकड्या, त्यांवर आडवेतिडवे पडलेले वेगवेगळ्या आकारांचे दगड, दूरवर पसरलेल्या केळीच्या बागा. काहीही न करता नुसते शांतपणे पहात रहावे असे दृश्य.

तलारीगट्टा द्वार परिसरात अर्धा एक तास घालवून आम्ही परत निघालो. चला, हंपीतला पहिला दिवस तर अगदी छान गेला! उद्या? हंपीतली काही प्रसिद्ध मंदिरे!

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

15 Oct 2021 - 4:09 pm | तुषार काळभोर

काही फोटो अतिशय उत्कृष्ट आहेत.
पहिला दिवस अतिशय सुंदर आणि आनंददायी झाला.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत..

कंजूस's picture

15 Oct 2021 - 5:15 pm | कंजूस

विजयपुरा अगोदर पाहिले होते का?

एक_वात्रट's picture

18 Oct 2021 - 11:07 am | एक_वात्रट

बिजापूर (वियजपूर) आधीच पाहून झाले आहे. तिथला गोल घुमट अशक्य सुंदर आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2021 - 12:17 pm | चौथा कोनाडा

सुंदर वर्णन आणि प्रचि तर अप्रतिमच !

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 10:55 am | टर्मीनेटर

अरे वाह! पुन्हा हंपी....
बर आहे, मला जाण्या आधी जितकी जास्ती माहिती मिळेल तेवढी चांगलीच.
छान झालाय पहिला भाग.

वामन देशमुख's picture

19 Oct 2021 - 1:34 pm | वामन देशमुख

फोटोज् आणि वर्णनही अगदी अप्रतिम आहे.

लेखमाला फॉलो करत आहे.

पुढच्या महिन्यात हंपी होस्पेट भागात फिरायला जाण्याचा विचार आहेच; या लेखमालेचा निश्चितच खूप उपयोग होईल.

फोटो खुप सुंदर आहेत.आणि हंपी सहलही छान.