छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

Shantanu Abhyankar's picture
Shantanu Abhyankar in जनातलं, मनातलं
1 Jun 2021 - 8:34 pm

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार
डॉ. शंतनु अभ्यंकर

छद्मवैद्यक म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर प्रथम नाव येतं ते होमिओपॅथीचं. त्यामुळे इथे उदाहरणे होमिओपॅथीची घेतली आहेत. शिवाय मी होमिओपॅथीचा(ही) पदवीधर असल्याने या क्षेत्रातला माझा अभ्यास थेट होमिओपॅथीशीच निगडीत आहे. छद्म वैद्यकीचे हे ढळढळीत उदाहरण. बाकी काही प्रमाणात शास्त्रीय, काही प्रमाणात अशास्त्रीय अशी बरीच आहेत.

या सगळ्याला मिळून पर्यायी, पारंपरिक आणि पूरक (पपापू) उपचार पद्धती म्हटलं जातं. यांची लांबच्या लांब यादी आहे. जगभरच्या अनेक पारंपारिक उपचार पद्धती यात येतात. तसंच जगभरातल्या चित्रविचित्र कल्पना असणाऱ्या लोकांनी निर्माण केलेल्या अगदी अलीकडच्या काही ताज्या उपचारपद्धतीही या सदराखाली येतात.
आपलीच पॅथी आधुनिक वैद्यकीला पर्याय आहे असा अनेक पॅथीपंथियांचा दावा असतो. याउलट या उपचारपद्धती म्हणजे शुद्ध भोंदूगिरी आहे, त्या अत्यंत अशास्त्रीय आहेत आणि उपचार होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा आधुनिक वैद्यकवाले तावातावाने करत असतात. पॅथी-पॅथीच्या या भांडणात, ‘तुमचंही बरोबर, यांचंही बरोबर, दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत’, असा समन्वयवादी सूर लावणारे बोके नेहमीच समाजमान्यतेचे लोणी पळवून नेतात.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्यामुळे पेशंटना या वादावादीत काडीचा रस नसतो. त्यांना फक्त बरं वाटण्याशी मतलब. कोणाच्या का कोंबड्याने असेना, सूर्य उगवला की झालं, अशी त्यांची भूमिका असते. हे ठीक आहे पण इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे इथेही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.

‘वैज्ञानिक पुराव्याची मला गरज नाही कारण विज्ञानाला न समजलेल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेतच की!’ हे वाक्य चमकदार आहे खास. चमकदार आहे आणि विज्ञानाला सगळं समजलेलं नाही, हे खरंही आहे. तुम्हालाच काही माहीत नाही तर आम्हाला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण?, असा उरफाटा सवालही केला जातो. विज्ञानाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, पण आपल्याला काय काय माहित नाही, हे विज्ञानाला माहीत आहे. विज्ञानाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, म्हणून हे काजळकोपरे कल्पनाशक्तीने भरून काढण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आपोआप प्राप्त होत नाही. अज्ञाताच्या शोधातच विज्ञानाची प्रगती दडलेली आहे. म्हणूनच पुरेशा पुराव्याअभावी केलेला कोणताही दावा विज्ञान नाकारतं.

मुळात आधुनिक वैद्यक आणि पपापू यांच्या पुराव्याच्या संकल्पनाच भिन्न भिन्न आहेत. आधुनिक वैद्यक ज्याला पुरावा मानतं आणि पपापू ज्याला पुरावा समजतात त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पुराव्याच्याही परी असतात. साराच पुरावा एका लायकीचा नसतो. अर्थात काही नवीन शोधणारा प्रत्येकजण माझाच पुरावा पुरेसा, असा दावा करतोच. त्यामुळे कोणता आणि किती पुरावा म्हणजे पुरेसा, हे ठरवणारं शास्त्र दरवेळी लक्षात घ्यावं लागतं. यानुसार आचरण करण्याचा, पुराधिष्ठित वैद्यकी (Evidence Based Medicine) आचरणात आणण्याचा, आधुनिक वैद्यकीचा प्रयत्न आहे.

पुराव्याच्या शास्त्रानुसार वैयक्तिक अनुभव, वैयक्तिक निरीक्षणे, गोष्टीरूप पुरावा, पेशंटची खुशीपत्रे हा सर्वात दुय्यम पुरावा. प्रयोगशाळेतील प्रयोग, प्राण्यांवरील प्रयोग हे त्याच्या वर. मग पुढे एखाद्या पेशंटला आलेला गुण, अनेक पेशंटना आलेला गुण, रोग्यांचा नियोजनबद्ध तुलनात्मक अभ्यास (केस कंट्रोल स्टडीज स्टडी), एपिदडेमिओलॉजीकल स्टडी, यादृच्छिक बृहदांध चाचणी (रॅंडमआइज्ड डबल ब्लाइंड ट्रायल) आणि अशा अनेक चाचण्यांच्या निष्कर्षांचे महा विश्लेषण (मेटा अॅनालिसिस) असे चढते थर आहेत.

तळाशी आहे, गोष्टीरूप पुरावा. आऊच्या काऊला बरं वाटलं, ‘देशोदेशीचे वैद्य हकीम झाले पण गुण येईना, शेवटी....’, अशा पद्धतीचा गोष्टीरुप पुरावा. पपापू मंडळींना असला पुरावा अति प्रिय असतो. पण एक गोष्ट म्हणजे पुरावा आणि अनेक गोष्टी म्हणजे सज्जड पुरावा हे समीकरण बरोबर नाही. कारण कथाकथन पूर्वग्रहदूषित, सोयीचं तेवढच सांगायचं असं असू शकते. फारतर संशोधन कोणत्या दिशेने व्हायला हवं हे सुचवण्यास अशा ष्टोर्यांचा उपयोग होऊ शकतो.
पुरावा म्हणून बरेचदा प्राण्यांतील प्रयोगांचा दाखला दिला जातो. पण जे उंदरीत घडते ते सुंदरीत घडेल असे नाही आणि जे वानरांत घडते ते नरांत घडेलच असं नाही. मानवी अनुभव सर्वांत महत्वाचा.

पण शिस्तबद्ध संशोधनाची एकूणच वानवा आहे. पपापू वाल्यांनी प्रत्यक्ष रुग्णांवर केलेले अभ्यास हे देखील अत्यंत तोकडे, दर्जाहीन आणि कोणताही पूर्वाभ्यास नसलेले असतात. या अभ्यासाच्या आधारे अचाट दावे केले जातात मात्र अचाट दाव्यांसाठी तोडीस तोड असा अफाट पुरावा सादर केला जात नाही.
अन्न व औषध विभाग आधुनिक वैद्यकीच्या औषधांसाठी अतिशय कडक तपासण्या, शास्त्रीय आणि काटेकोर निकष योजतो. हे योग्यच आहे. पण तोच विभाग या तथाकथित पर्यायी पद्धतींसाठी अतिशय गचाळ, तोकडे आणि निरर्थक निकष मान्य करतो. ही औषधे बाजारात येण्यापूर्वी आधुनिक औषधशास्त्रानुसारच्या, परिणामकारकता आणि सुरक्षितता जोखणाऱ्या, कोणत्याही तपासण्या त्यांच्यावर बंधनकारक नसतात. तपासण्या न करता बाजारात उतरता येत असेल, नफा कमावता येत असेल, तर संशोधनासाठी लागणारा प्रचंड पैसा कोण कशाला गुंतवेल? या कारणे संशोधन मागे पडत जाते. थोडक्यात परिक्षाच न घेता पदव्या वाटल्या तर ज्या प्रतीचे पदवीधर निर्माण होतील तीच गत या औषधांची होते आहे. अशा धोरणामुळे पपापू वैद्यकीचा आर्थिक फायदा होत असला तरी तात्विक बैठक डळमळीत होत असते.

शिवाय संशोधनातून विपरीत निष्कर्ष आले तर काय करायचं, ही एक मोठीच भीती आहे. बऱ्याच पपापू मंडळींची नकारात्मक निष्कर्ष स्वीकारायची तयारी नसते. त्यांच्या मते त्यांचे ज्ञान हे दैवी, पारंपरिक, प्राचीन, ग्रंथोद्भव, साक्षात्कारी, स्वयंप्रज्ञा, गुरु-जात, आजीबाईंच्या बटव्यातील, वगैरे वगैरे असल्यामुळे ते आपोआपच चिकीत्सेच्या उपर असते. त्यामुळे संशोधन करून सत्याचे लचांड मागे लावून घेण्यापेक्षा, झाकली मुठ सव्वा लाखाची हे धोरण सर्वांनाच सोयीचं असतं. त्यामुळे लुटुपुटीचं संशोधन हे पुरावा म्हणून दाखवून, मार्केट मारलं जातं.

अशा भातुकलीतल्या संशोधनावर अनेक संशोधन निबंध उपलब्ध आहेत. पैकी डॉ. एडझार्ड अर्नस्ट यांनी प्रसिद्ध केलेला १२ एप्रिल २०२१चा ताजा निबंध येथे आधाराला घेतला आहे.

‘भारत, होमिओपॅथी, अभ्यास’; असा शोध त्यांनी ‘मेडलाईन’वर घेतला. मेडलाईन ही वैद्यकीय संशोधनाला वाहिलेली वेबसेवा असून निरनिराळ्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेले शोधनिबंध इथे संगतवार लावलेले आढळतात. त्यामुळे ठराविक काळातील, ठराविक विषयातील, ठराविक लेखकांचे, असे निबंध एक गटवार शोधण्यासाठी या साइटचा चांगला उपयोग होतो.

त्यांना १०१ शोधनिबंध आढळले. पैकी ३१ निबंधांमध्ये भारतीय संशोधकांनी आपले निष्कर्ष मांडले होते. बाकी शास्त्राच्या इतर पैलूंबद्दल होते. ह्या ३१ पैकी ३१ही निबंध हे केलेल्या उपचारांचा फायदा झाला हे सांगणारे होते! थोडक्यात शंभर टक्के निबंध सकारात्मक निष्कर्ष दर्शवणारे होते!! असं कसं असू शकेल? नकारात्मक परिणाम दिसलेच नाहीत?, का ते तपासलेच नाहीत?, का नोंदलेच नाहीत? या सर्व प्रश्नांची भुतावळ आपल्या मानगुटीवर बसते. गंमत म्हणजे आधुनिक वैद्यकीच्या संशोधनात असा टोकाचा ‘आनंदीआनंद’ आढळत नाही. म्हणजे आता दोनच निष्कर्ष उरतात. एक, होमिओपॅथी अतिशय परिणामकारक असून हर परिस्थितीमध्ये आपलं काम चोख बजावत आहे किंवा हा सगळा संशोधनाचा खेळ, पोरखेळ असून त्यात गांभीर्यपूर्वक घ्यावं असं काही नाही. ही निव्वळ धूळफेक आहे.
कुठला निष्कर्ष जास्त बरोबर ते तुम्हीच ठरवा.

अमुक एक पॅथी आधुनिक वैद्यकीला ‘पर्याय’ आहे हा दावा, तसा धाडसाचा आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे हवेतून विभूती काढावी तशी कोणतीही जादूई चीज नाही. शरीररचनेचा सखोल अभ्यास, शरीरकार्याच्या गुंतागुंतीची जाण, आजारांबद्दल आणि आजाराला मिळणाऱ्या शारीर प्रतिसादाचे ज्ञान, जंतूशास्त्र, परोपजीवीशास्त्र; वगैरेच्या पायावर आधुनिक वैद्यकशास्त्राचे उपचार उभे आहेत. इतकच काय हे सारं रसायन-भौतिकी-जीव या मूलभूत शास्त्रांच्या संकल्पनांशी सुसंगत आहेत. पपापू च्या कित्येक कल्पना अशास्त्रीय, आणि बऱ्याचशा छद्मशास्त्रीय आहेत. उदाहरणार्थ होमिओपॅथीच्या औषधात एकही औषधी रेणू नसताना ती प्रभावी आहेत असा दावा केला जातो.

तेव्हा ‘पर्यायी’ वैद्यक याचा अर्थ औषधोपचारांना पर्यायी औषधोपचार, इतका मर्यादित घेऊन चालणार नाही. पर्यायीवाले तसा तो घेतही नाहीत. त्यांचे पर्यायी शरीररचनाशास्त्र आहे. पर्यायी शरीरक्रियाशास्त्र आहे. उदाहरणार्थ मानवी शरीर हे ब्लड, म्युकस, येलो बाईल आणि ब्लॅक बाईल यांच्या संतुलनातून चालतं असा एक प्राचीन सिद्धांत आहे. (बाईल म्हणजे मराठीतली बाईल नव्हे हं. ही इंग्रजी बाईल; मराठीत ढोबळ अर्थ ‘पित्त’) किंवा आजार हे ‘व्हायटल फोर्स’च्या असंतुलनाने होतात अशीही शिकवण आहे. किंवा सोरा, सिफिलीस, सायकोसिस आणि ट्यूबरक्युलोसिस या ‘मायाझम’मुळे (रोगकारक शक्ती) दीर्घ आजार होतात होतात म्हणे. यींग आणि यांग यांचा तोल सारे काही सांभाळतो असेही पर्यायी ‘शास्त्र’ आहे. कानावर विवक्षित बिंदुवर टोचताच, थेट शेंडीपासून *डीपर्यंत, निरनिराळे अवयव नियंत्रित होतात म्हणे. विज्ञानाला यातलं काही म्हणजे काहीही आजवर घावलेलं नाही. आधुनिक विज्ञानाने यातल्या बहुतेक संकल्पनांचा भोंगळपणा, भंपकपणा, पोकळपणा आणि मर्यादा केंव्हाच दाखवून दिल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक पपापू पॅथीचे स्वतंत्र आणि स्वयंभू शास्त्र आहे. सारे माणसाच्याच आरोग्याबद्दल आणि अनारोग्याबद्दल सांगत आहेत पण एकाचा मेळ दुसऱ्याशी नाही. हे अजबच आहे.

माणसाला पर्यायी पचन संस्था असते का? मग पर्यायी पचनशास्त्र कसं असेल? जसं ब्रिटिश भौतिकशास्त्र वेगळं, कोरियाचं रसायनशास्त्र वेगळं, काळ्यांचं बीजगणित वेगळं असं संभवत नाही; भारताचा ‘पर्यायी नकाशा’ संभवत नाही; तद्वतच धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आधारित स्वतंत्र शरीरविज्ञानही संभवत नाही. कल्पना करा उद्या पाकिस्तानने E=Mc२ ऐवजी, E=Mc३ या नव्या पर्यायी ‘इस्लामी अणूशास्त्रा’नुसार आम्ही अणुबॉम्ब बनवू असं काही जाहीर केलं, तर त्या बॉम्बला कोणी फुंकून विचारेल का?

खरं सांगायचं तर पर्यायी असं काही वैद्यक नसतंच. पर्यायी वैद्यक म्हणजे ज्या औषधोपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी नाही किंवा तपासलीच गेलेली नाही असे सगळे औषधोपचार. यातल्या एखाद्या औषधाची परिणामकारकता लक्षात आली आणि सुरक्षिततेचीही खात्री पटली; तर ते औषध ‘पर्यायी’ वगैरे काही राहत नाही. मग ते वैद्यकीच्या मुख्य प्रवाहात सामील केले जाते. आर्टेमेसुर हे चिनी जडीबुटीचे औषध, मलेरियाविरुद्ध उपयुक्त ठरल्याने, नुकतेच दाखल झाले आहे. सर्पगंधा हे रक्तदाबावरचे औषध हे आपल्याकडचे एक उदाहरण. अशी शेकडो उदाहरणे आहेत. असणारच. अहो जगभर सगळ्यांनाच आज्या होत्या आणि त्यांच्याकडे बटवेही होते. त्यातील औषधांचा अभ्यास करुन, त्यातूनच उधारउसनवारी करून, आजची औषधे बनली आहेत. त्या बटव्यातील काही औषधे उपयोगी, काही निरुपयोगी तर काही चक्क तापदायक निघणार हे तर उघड आहे. शेवटी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हेच खरे.

त्यामुळे पर्यायी, पूरक, पारंपारिक, नैसर्गिक, हर्बल, एनर्जी, इंटिग्रेटेड, होलिस्टिक वगैरे संज्ञा वैज्ञानिक वगैरे नसून मार्केटिंगला सोयीची म्हणून शोधलेली लेबले आहेत.
पण मुळात इतक्या अविश्वसनीय गोष्टींवर लोकं विश्वास ठेवतातच का, याची अनेक कारणे आहेत. माणसाचा मेंदू हा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी मुळी रचलेलाच नाही. आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात, भटक्या अवस्थेत निर्माण झालेला मेंदू, आधुनिक युगात वेळोवेळी आपली पुराणकालीनता दाखवून देत असतो. प्राचीन काळी स्वतःचा आणि आसपासच्या व्यक्तींचा अनुभव हेच ज्ञान आणि हाच पुरावा होता. अमुक फळ खाऊ नकोस ते विषारी आहे म्हटल्यावर विश्वास ठेवणे किंवा विषाची परीक्षा पाहणे, असे दोनच पर्याय होते. तेव्हा अनुभवी मंडळींचा सल्ला शिरसावंद्य मानणे हा जगणं सुलभ करणारा संस्कार होता. झाडीत कुठे सावली हलली, तर अंधारातले अंधुक ठिपके जोडून, झटकन तिथे वाघ आहे वा नाही हा निर्णय करायला आपला मेंदू उत्क्रांत झाला आहे. जवळ जाऊन खात्री करू पहाणं म्हणजे जिवाची जोखीम. सावधपणे लांबून निघून जाणं म्हणजे, जान बची लाखों पाये. असे झटपट निर्णय घेण्याने, गडबडीने माहितीचे ठिपके जोडल्याने, गफलती होऊ शकतात. वाघ नसताना तो आहे असं वाटू शकतं. पण या गफलतींची किंमत फारच किरकोळ. तेव्हा ही झटपट विचारपद्धती उत्क्रांत होऊन, त्यातल्या गफलतींसकट, आपल्या मेंदूत कोरली गेलेली आहे.
आधुनिक जगात विचार करण्याची ही पद्धत लोढणं बनली आहे. आजही विश्लेषणाऐवजी, गोष्टीरूप पुरावा आपल्याला अधिक भावतो. अर्धवट पुराव्यांचे ठिपके जोडून आजही आपण नकळतपणे चित्र पूर्ण करत असतो. आजही माणसाच्या मेंदूवर बुद्धीपेक्षा भावनांचा अंमल सहज चढतो.

जेनी मॅककार्थी या प्रसिद्ध अमेरिकन नटीच्या मुलाला, इव्हानला, ऑटीजम आहे. गोवराची लस दिल्यामुळेच ऑटीजम झाला असा तीचा दावा आहे. गोवराच्या, आणि एकूणच लसीकरणाविरुद्ध मोठी मोहीम तीने चालवली आहे. तिला यश येऊन अमेरिकेत आता गोवराने होणारे अर्भकमृत्यू वाढत चालले आहेत. पण, ‘लसीमुळे ऑटीझम होतो याला वैज्ञानिक पुरावा नाही, लस दिल्यानंतर काही घडलं म्हणून ते लस दिल्यामुळे घडलं असं म्हणता येत नाही’; असं म्हणताच जेनी डाफरली, ‘माझा इव्हान हेच माझं विज्ञान आणि इव्हान हाच माझा पुरावा!’

हे वाक्य काळजाला हात घालणारं असलं तरी अशास्त्रीय आहे. या भावनावेगातून, तर्कदुष्टतेतून, झटपट निष्कर्षातून, त्यातले चकवे चुकवत बाहेर येण्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान. तर्कसिद्धता शिकावी लागते. तर्कदुष्टता आपल्या मेंदूत कोरली गेली आहे. म्हणून तर इतके सगळे लोक पपापूच्या भजनी लागलेले दिसतात.
आणि म्हणूनच तर, ‘इतके सगळे लोक वापरतात, इतक्या पिढ्या वापरतात, ते काही मूर्ख आहेत का?’, असा भ्रामक युक्तिवाद लोकांना पटतो. ‘लोकप्रीयता आणि प्राचीनत्व, हीच सिद्धता’; हा एक लोकप्रीय तर्कदोष आहे. काळाच्या विशाल पटलावर अनेक कल्पना, अनेक युक्तिवाद, अनेक तथाकथित सत्य; ही लोकप्रिय (नाळेला शेण लावणे), लोकमान्य (मंत्राने सापाचे विष उतरवणे) इतकंच काय जगन्मान्यसुद्धा (रजस्वला अपवित्र असते) होती/आहेत. मात्र वैज्ञानिक निकषांवर घासून पाहता अशा कित्येक संकल्पना त्याज्य ठरल्या. थोडक्यात ‘जुनी’ पद्धत, लोकमान्यता, हा कोणत्याही पॅथीच्या शास्त्रीयत्वाचा पुरावा होत नाही.
तरीदेखील काही रुग्णांना पपापू पॅथीने बरे कसे वाटते, याची अनेक संभाव्य उत्तरे आहेत.

पपापू ही ‘जुनाट आणि असाध्य’ आजारांवर उपकारक आहे, अशी समाजभावना आहे. आपला आजार ‘जुनाट आणि असाध्य' असल्याचं मनोमन मान्य असल्यामुळे मुळात फार फरक पडेल, अशी अपेक्षा नसते. त्यामुळे पडेल त्या फरकाला रामबाण उपायाचा साज चढविला जातो.

कित्येक आजार मनोकायिक असतात. मानसिक समाधान लाभलं, की त्यांना उतार पडतो. होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात. बालपणापासून ते आवडीनिवडीपर्यंत आणि धंदापाण्यापासून ते बाई-बाटलीपर्यंत सगळ्याची आस्थेने आणि इत्थंभूत चौकशी केली जाते. दीड-दोन तास आपली कोणी आस्थेने विचारपूस केली, तर आपल्यालाही बरं वाटेलच की! आजाऱ्याला तर वाटेलच वाटेल.

कित्येक पपापूपॅथीय नंबर घातलेल्या पुड्या देतात. त्या पुड्यांवर औषधाचं नाव नसतं. त्यामुळे पॅरेसिटमॉल किंवा स्टिरॉइडच्या पावडरीही दिल्या जात असण्याची शक्यता आहे.

कित्येक आजार औषध न घेताही काही दिवसांनी आपोआप बरे होतात. अनेकदा आजारात निसर्गतः चढउतार होत असतात. त्वचेचे अनेक आजार, संधिवात आणि काही प्रकारचे कॅन्सरही असे हेलकावे खात असतात. त्या त्या वेळी चालू असलेल्या उपचारांना आयतं श्रेय मिळतं.
बहुतेक वेळा पपापू डॉक्टर मुळात चालू असलेली (आधुनिक वैद्यकीची) औषधे चालू ठेवून शिवाय उपचार देतात; यामुळे यशाचे पितृत्व स्वत:कडे ठेवून अपयशाचे खापर अन्यांच्या माथी मारायची सोय होते.

आपण काही उपचार घेत आहोत या कल्पनेनेच कित्येकांना बरं वाटतं. याला प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे औषधाची उपयुक्तता यापेक्षा सरस असल्याचे सिद्ध करावं लागतं. मात्र पपापू औषधांबाबत अन्न व औषध प्रशासनही अशा सिद्धतेची मागणी करीत नाही हे वर आलेलंच आहे. 'अ' हे औषध 'ब' या आजाराला उपयुक्त आहे असा दावा करायचा झाला, तर त्यासाठी निव्वळ असा उल्लेख पपापू ग्रंथात असल्याचे दाखवून द्यावे लागते. बस, एवढंच!

पपापू औषधाचा फायदा होतो का नाही हे जरा बाजूला ठेवू; पण या उपचाराचा तोटा काय होतो? होतो ना! वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा रुग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. छद्मोपचारांत वेळ दवडल्यामुळे मूळ आजार बळावतो, पसरतो, निदान होण्याला उशीर होतो. असे अनेक धोके संभवतात. चेहऱ्यावर पुरळ आले असे समजून नागिणीकडे दुर्लक्ष केले तर बुबुळावर फूल पडते. संडासवाटे रक्तस्राव होत असेल तर सर्व तपासणी केलीच पाहिजे. निव्वळ ‘रात्री चादर पांघरली होती की दुलई?' यावरून औषध ठरविले तर आतड्याच्या कॅन्सरचे निदान होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. थोडक्यात, वेळ जातो, पैसा जातो. उपचार चालू असल्याचे कृतक समाधान मिळते आणि हे घातक ठरू शकते.

डॉक्टर आणि पेशंटचं नातं पारदर्शी असायला हवं. माहितीची, उपचारातील भल्याबुऱ्याची प्रामाणिक देवाणघेवाण असायला हवी असं आधुनिक वैद्यक नीती मानते. पपापू यात कुठेच बसत नाही. भारतासारख्या गरीब देशाला तर असल्या छद्म उपचारांवर आणि कृतक संशोधनावर वेळ आणि पैसा खर्च करणे मुळीच परवडणारे नाही.
आता आर्सेनिक अल्बमचेच बघा ना. प्रतिबंधक होमिओ उपचार म्हणून आयुष मंत्रालयापासून सगळ्यांनी नगारे पिटले. ठायीठायीच्या कित्येक नगरपित्यांनी मोफत वाटपाच्या गंगेत, पुण्यस्नान उरकले. पण आजवर या दाव्याचा शास्त्रीय म्हणावा असा एकही अभ्यास उपलब्ध नाही आणि आता लस आल्यापासून तर आर्सेनिक अल्बमचे नावही नाही!

तेंव्हा या साऱ्या पद्धतींबाबत साधकबाधक विचार होणे नितांत आवश्यक आहे.

प्रथम प्रसिद्धी
अंनिस वार्तापत्र
एप्रिल २०२१

आरोग्यविचारलेखआरोग्य

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Jun 2021 - 9:14 pm | तुषार काळभोर

सध्याच्या साथीच्या काळात पर्यायी उपचार पद्धतीचे तज्ञ त्यांच्या स्वतःच्या किंवा कुटुबियांच्या उपचारासाठी कोणती उपचार पद्धती स्वीकारत असतील (याचा ठाम अंदाज आहे, तरी) हे पाहणे रोचक ठरेल.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्यामुळे पेशंटना या वादावादीत काडीचा रस नसतो. त्यांना फक्त बरं वाटण्याशी मतलब.

हे खरं.

बाकी चालू द्या.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2021 - 4:24 pm | प्रकाश घाटपांडे

गुण आला की नाही हे ठरवण्याचे अधिकार आपण पेशंटलाच देतो. त्यामुळे एखादी पॆथी ही अवैज्ञानिक असली तरी टिकून राहते ते या मुद्द्यामुळे. शिवाय पेशंटला परवडेल व सहज उपलब्ध असेल असे पर्याय तो निवडण्याचा प्रयत्न करतो. व्याधी नष्ट नसेलही झाली पण मला बर वाटल ना? कोण इथे अमर आहे? समजा प्लासिबो तर प्लासिबो इफेक्ट तर आहे ना! वैज्ञानिकते विरुद्ध व्यवहार्यता असे द्वंद्व आपल्या मनात असते.
अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घ्यावा लागेल

कॉमी's picture

1 Jun 2021 - 9:27 pm | कॉमी

उत्तम लेख. 'पर्यायी' वैद्यकशास्त्र काम करत असेल तर कसे प्रवाहात येते हे अत्यंत रोचक वाटले.

गॉडजिला's picture

1 Jun 2021 - 10:11 pm | गॉडजिला

खणखणीत लिखाण.

Bhakti's picture

2 Jun 2021 - 5:18 pm | Bhakti

+१११
छद्मवैद्यक पद्धती भारतात कशी सहज फोफावली आहे आणि लोक याला बळी का पडतात हे सहज समजले.
मानवी मेंदूच्या उत्क्रांतीची उदाहरणे खुबीने वापरली आहेत.
होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात.
+१

ह्या वर आधारित आधुनिक वैधक शास्त्र आहे असे समजले अगदी मान्य पण केले .
पण उपचार करणारे कोण असतात डॉक्टर त्यांना निष्कर्ष तरी काढता आला पाहिजे नक्की आजार कोणता आहे तो.निष्कर्ष काढल्यावर च उपचार करतील ना .
मुळात इथेच घोड पेंड खात आहे.
ते असे झाले परीक्षेला सर्व उत्तरांची कॉपी घेवून गेला आहे विद्यार्थी पण तो इतका ढ आहे की हो उत्तर कोणत्या प्रश्नांची आहेत तेच माहीत नाही.
रोगाचे निदान करण्यात सर्व डॉक्टर निशांत नसतात.
निदान चुकण्याा चे भारतात प्रमाण नक्कीच जास्त आहे.

गुल्लू दादा's picture

2 Jun 2021 - 8:34 pm | गुल्लू दादा

डॉ. एकतर गुणवत्तेवर किंवा चिक्कार पैसा भरून होता येते. अगदी डॉ. च spelling लिहिता येत नसेल तरीही. आता हेच डॉ. नंतर कोणाचे फॅमिली डॉ. झाले तर वाईट अनुभव येणारच.

सुबोध खरे's picture

2 Jun 2021 - 6:31 pm | सुबोध खरे

निदान चुकण्याा चे भारतात प्रमाण नक्कीच जास्त आहे.

याला काही पुरावा वगैरे ?

का नेहेमीच्यासारखे गॅस मारणे?

कंजूस's picture

2 Jun 2021 - 6:53 pm | कंजूस

गुण येतो. प्लासिबो वगैरेला बळी पडून काय लहान मुले हो हो बरं वाटतंय सांगतात? किंवा तळपायातली भोवरी, मुतखडा नाहीसा होणे हे काय प्लासिबोमुळे एक्सरे/सोनोग्राफीतून गायब होते?
पण चेटुक असेल. दहा वीस रुपयांत जातंय तर बरंच.

सतिश गावडे's picture

2 Jun 2021 - 9:37 pm | सतिश गावडे

माझे सतत टॉन्सिल येत, ते ही तिशीत. होमिओपॅथी डॉक्टर असलेला लहान भाऊ एका नामांकित इस्पितळात एका ENT डॉक्टरच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होता, त्याच्या ओळखीतून त्या ENT डॉक्टरना दाखवले. त्यांनी टॉन्सिल काढून टाकण्याचा सल्ला दिला.

मी सेकंड ओपिनियन म्हणून अजून एका प्रख्यात ENT डॉक्टरना दाखवले. त्यांनी तर 1001 टक्के ऑपरेशन करुन टॉन्सिल काढावे लागतील म्हणून सांगितलं. लगेचच ऑपरेशन आधी करावयाच्या भाराभर तपासण्या लिहून दिल्या.

याच दरम्यान मी टॉन्सिल्सवर होमिओपॅथी चांगले काम करते असे कुठेतरी वाचलं. मी भावाला म्हटलं, तू काहीतरी सुचव. एक प्रयत्न करून पाहू. नाही तर ऑपरेशन आहेच.

होमिओपॅथी औषधे सुरु केली आणि काही दिवसात सकारात्मक फरक दिसू लागला. पुढे काही दिवसांनी टॉन्सिल्स पूर्ण बरे झाले आणि आजतागायत परत कधीही आले नाहीत.

प्लासीबो किंवा छद्मवैद्यक असेल, होमिओपॅथी औषधाने माझा सतत टॉन्सिल्स येण्याचा त्रास कायमचा बंद झाला.

टीप: हे केवळ माझे अनुभवकथन आहे, वैद्यकीय सल्ला नव्हे.

प्लासिबो वगैरेला बळी पडून काय लहान मुले हो हो बरं वाटतंय सांगतात.

नैसर्गिक प्रक्रियेने बरेचसे आजार बरे होतातच कि.

पायाला जखम झाली असेल तर ती स्वतःहून बरी होतेच कि. आपली सर्दी/ खोकला स्वतःहून बरा होतोच कि.

हाड मोडल्यावर ते सरळ करून प्लास्टर घातल्यावर ते स्वतःहूनच जोडले जाते. (प्लास्टर घातले नाही तर ते वाकडे जोडले जाते.) लहान मुलांची हाडे ३ आठवड्यात जोडली जातात.काही मुलांची थोडी अगोदर काहींची थोडी नंतर. येथे पण इतर पॅथी वाले आमच्या औषधांमुळे हाड लवकर जोडले जातात असा सर्रास दावा करतात. आपल्या पँथी मुले वाकडे हाड सरळ जोडले जाईल का? असे विचारून पहा.

आपल्याला हगवण लागली असेल तर एक दोन दिवसात ती बरी होतेच मग त्यासाठी विश्रान्ती घ्यावी लागते पण लोकांची तोवर थांबण्याची तयारी नसते म्हणून मग डॉक्टरांकडे धावा.

कॉलरा मध्ये केवळ मीठ साखर पाणी देण्याचे कारण हेच आहे. ढाळ लागून शरीरातील पाणी नष्ट होते त्याची केवळ भरपाई करणे आवश्यक असते. दोन तीन दिवसात रुग्ण आपोआप बरा होतोच.

तसे कशाला करोना मध्ये बहुसंख्य रुग्ण स्वतःहून बरे होत आहेत.

ज्यांना करोना मुळे गुंतागुंत होते त्यांना त्यातून नैसर्गिक रित्या ठीक होई पर्यंत जगवणे हेच आधुनिक शास्त्रे करत आहेत. मग फुप्फुसात गुठळ्या होत असतील तर गुठळी न होण्याचे औषध दिले जाते फुप्फुसात पातळ तयार झाल्याने ऑक्सिजन शरीरात पोचत नसेल तर हवेतील २१ % ऑक्सिजन १ बार दाबाने देण्याऐवजी ऐवजी १०० % ऑक्सिजन आणि त्याने होत नसेल तर bipap ( अतिरिक्त दबावाने ऑक्सिजन देऊन जगवले जाते. जेंव्हा फुप्फुसातील पातळ दूर होते रुग्णाची ऑक्सिजन ची गरज कमी होत जाते आणि त्याला घरी पाठवले जाते.

इतर पॅथी( विशेषतः होमिओपॅथी) आमच्या पद्धतीत वेळ लागतो पण रोग मुळापासून बरा करतो आणि आधुनिक उपचार पद्धती रोग तिथल्या तिथे दाबून टाकतात असा सर्रास अपप्रचार करतात. त्याबद्दल खोदून विचार असे कसे करता येईल त्यावर त्यांचे उत्तर नसते.

पुण्यात असताना ज्यांना शल्य क्रिया करायची नव्हती अशा मुतखड्याच्या लष्करातले ६० रुग्णांचा मी तीन वर्षे पर्यंत पाठपुरावा( follow up) केला होता. यात पुण्यातील दिग्गज व्यावसायिक डॉ हबू( होमिओपॅथी) आणि वेणीमाधवशास्त्री, खडीवाले वैद्य, चंद्रशेखर जोशी वैद्य यांचा समावेश होता. तीन वर्षात एकही रुग्णाचा एकही मुतखडा गेलेला नव्हता.

गेली ११ वर्षे मी मुलुंड येथे व्यवसाय करत आहे माझ्या आसपासचे अनेक वैद्य होमिओपॅथी चे डॉक्टर माझ्या कडे याच रोगाच्या पाठपुराव्यासाठी येत असतात (कारण मी डॉक्टरांकडून वैद्यकीय नैतिकतेप्रमाणे पैसे घेत नाही). त्यांच्यापैकी एकालाही स्वतःच्या पॅथीचा फायदा झालेला नाही. पण तुम्हाला आमच्याकडे मुतखड्यासाठीऔषध नाही असे एकतरी वैद्य किंवा होमिओपॅथ सांगेल का? (तो धंद्याचा भाग आहे)

बाकी ज्याला जो उपचार घ्यायचा आहे तो तो घेणारच मग ते एखाद्या बाबांची उदी / भस्म असो कि महाराजांनी दिलेला ताईत असो किंवा कुठल्या पॅथी चे औषध.

ज्याला जे पचेल ते त्याने खावे आणि रुचेल ते बोलावे.

जाता जाता --- ते अर्सेनिक आलबम आणि सेपिया हि होमिओपॅथी ची औषधे काही कोटी डोसेस दिले गेले.त्याने करोना थांबला का? आजमितीला एकही होमिओपॅथ आमचे औषध निकामी ठरले असे प्रामाणिकपणे कबुल करताना दिसतो का? रेमडेसीव्हीर किंवा टोसिलीझूमॅब निरुपयोगी आहे हे सांगण्यात आधुनिक वैद्यकशास्त्र आपला कमीपणा मानत नाही. तेवढा प्रामाणिकपणा त्यांच्यात नक्कीच आहे.

बाकी चालू द्या.

गुल्लू दादा's picture

2 Jun 2021 - 8:23 pm | गुल्लू दादा

शब्दाशब्दाला सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2021 - 8:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. विषय वैद्यकशास्त्राचा असला तरी
लेखनाची शैली अशी ओघवती आहे आणि खुसखुशीत आहे की वाह उस्ताद वाह असे म्हणावे वाटले.

बाकी मूळ विषयावर जाणकार लिहितीलच. वाचायला असूच, आभार.

-दिलीप बिरुटे

चर्चा जी लोक अस्तित्वात असलेल्या कोणत्या ही vaidhik शास्त्र चा अभ्यास करून (कोर्स करून हा शब्द योग्य आहे)बाहेर डॉक्टर म्हणून येतात त्यांना त्यांनी केलेल्या course चे किती ज्ञान असते
सर्वच डॉक्टर ची पदवी मिळवणारे त्या शास्त्रात पारंगत असतात का?
Certificate वर त्यांनी मिळवलेली ग्रेड चा उल्लेख असलाच पाहिजे तो का नसतो?
सर्व शास्त्र चांगलीच असतात करण ती निर्माण करण्यात अती हुशार लोकांनी आयुष घालवलेले असते.
कोणत्या vaidhik शास्त्र पद्धतीचा अभ्यास करणारा व्यक्ती नी किती सक्षम पण ते ज्ञान
आत्मसात केलेले आहे हे महत्वाचे.
शास्त्र ला दोष देता येणार नाही ज्यांना ते आत्मसात करता आले नाही ते दोषी आहेत.
जेव्हा ekade शास्त्र nakam ठरते त्याला हीच लोक जास्त जबाबदार असतात .
फक्त ते स्वीकारणे अवघड वाटत म्हणून असले वाद निर्माण केले जातात.

गुल्लू दादा's picture

3 Jun 2021 - 9:02 am | गुल्लू दादा

सहमत.

मराठी_माणूस's picture

22 Jun 2021 - 3:06 pm | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/19062021/0/7/

ह्या पानावर तळाशी डाव्या हाताला आधुनिक चिकेत्सेबद्दल एक माहीती