वॉटरगेट (भाग ६ - अंतिम भाग)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
17 May 2021 - 7:53 pm
गाभा: 

वॉटरगेट (भाग १)
वॉटरगेट (भाग २)
वॉटरगेट (भाग ३)
वॉटरगेट (भाग ४)
वॉटरगेट (भाग ५)
______________________________________________________________________________

मार्च १९७४ मध्ये निक्सन यांच्या ७ सहकर्‍यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले. निक्सन यांच्या सूचनेनुसार या ७ पैकी ५ जणांनी आपण दोषी असल्याचे आधीच न्यायालयात मान्य केले होते. काही महिन्यांनंतर उर्वरीत दोघेही दोषी सिद्ध झाले. निक्सनचे सहकारी चार्ल्स कोलसन, जॉन डीन यांना अटक झाली तर गॉर्डन लिडी, होवॉर्ड हंट यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली.

अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल व निक्सनचे सहकारी जॉन मिचेल यांना १९ महिने, या योजनेचा सूत्रधार गॉर्डन लिडी याला साडेचार वर्षे, निक्सन यांच्या कर्मचार्‍यांचा प्रमुख हाल्डमन याला १९ महिने व जॉन एनरिकमन याला १८ महिने तुरूंगावासाची शिक्षा मिळाली. या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ६९ आरोपींपैकी ४८ जण न्यायालयात दोषी सिद्ध ठरून त्यांना शिक्षा मिळाली.

विरोधी पक्षाच्या कार्यालयावर दरोडा टाकून त्यांची कागदपत्रे चोरणे, त्यांच्यावर हेरगिरी करणे, पाळत ठेवणारी सामग्री गुपचुप बसविणे या प्रकरणात प्रत्यक्ष अध्यक्ष गुंतलेले आहेत व अमेरिकन लोकशाहीसाठी हे लांच्छनास्पद आहे, हे चौकशी समितीचे मत झाले होते. त्यामुळे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने निक्सनविरोधात महाभियोग (Impeachment) प्रस्ताव दाखल करून घेऊन त्यांच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली.

निक्सन यांना चौकशी चमितीसमोर यावे लागले. त्यावेळी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या कॉल्सचे रेकॉर्डिंग द्यावे लागले. परंतु त्यातही त्यांनी लबाडी करून काटछाट केलेले रेकॉर्डिंग सादर केले. हे समितीच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सर्व मूळ ध्वनिफीती द्यायल्या लावल्या. यातील एक टेप Smoking Gun Tape या नावाने प्रसिद्ध आहे. यात निक्सन असे सांगतात की "आपल्या प्रशासनाने CIA चे संचालक रिचर्ड हॅम्स आणि व्हर्नॉन वॉल्टर्स यांच्याकडून FBI प्रमुख पॅट्रिक ग्रे यांना हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगून वॉटरगेट प्रकरणाचा तपास त्वरीत थांबविण्यास सांगावा.". निक्सन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत होते हे एव्हाना स्पष्ट झाले होते.

निक्सनने कर भरण्याच्या संदर्भात अनेकदा गंभीर उल्लंघन केले आहे हे देखील चौकशीत आढळले. अध्यक्ष आपल्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी वापरत होते हे सुद्धा तपासात दिसून आले.

संपूर्ण तपासणीनंतर सिनेट आणि प्रतिनिधींच्या हे लक्षात आले की की निक्सन यांनी राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांचा गैरवापर केला होता व ते करताना अनेकदा कायद्याचे उल्लंघन केले होते.

आता निक्सन यांची लोकप्रियता घसरली होती. त्यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर महाभियोग चालवावा यासाठी अनेक शहरातून निदर्शने होऊ लागली.


नागरिकांची निदर्शने


नागरिकांची निदर्शने

आता बचावाचा कोणताच मार्ग शिल्लक राहिल्याने निक्सन यांनी शेवटी ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


निक्सन यांचा राजीनामा


गैरप्रकार केल्याचे निक्सन यांनी नाकारले

मानहानी होऊन मुदतीआधी राजीनामा द्यावा लागलेले निक्सन हे अमेरिकेच्या जवळपास २०० वर्षांच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी तो प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ज मध्ये साध्या बहुमताने तर सिनेटमध्ये दोन तॄतीयांश बहुमताने मान्य व्हावा लागतो. अमेरिकन लोकशाही इतकी प्रबळ आहे की सिनेटमध्ये एकाच पक्षाचे, विशेषतः विरोधी पक्षाचे, दोन तॄतीयांश सभासद असणे खूप अवघड असते. या प्रस्तावाच्या बाजूने सिनेटमध्ये सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी मत दिले तरच दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते. यावर्षी ट्रंप यांच्यविरूद्ध महाभियोग चालविण्यास सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते. बिल क्लिंटन यांच्यविरूद्ध सुद्धा महाभियोग चालविण्यास सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते. पूर्वी १८६८ मध्ये तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॉन्सन विरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ज मध्ये साध्या बहुमताने संमत केलेल्या प्रस्तावाला सिनेटमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते.

अमेरिकन सिनेटमध्ये १०० सदस्य असतात व महाभियोग प्रस्ताव संमत होण्यासाठी त्या प्रस्तावाच्या बाजूने किमान ६७ सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. त्यावेळी सिनेटमध्ये विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे ५५ सदस्य होते. परंतु निक्सन यांच्याविरूद्ध असलेले आरोप अत्यंत गंभीर होते. सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारी कृत्ये, संसदेचा अपमान, न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणे, तपासाला असहकार्य, पुराव्यांमध्ये फेरफार करणे हे आरोप अमेरिकी खासदारांच्या पचनी पडणारे नव्हते. ऑगस्ट १९७४ च्या पहिल्या आठवड्यात निक्सनच्या रिपब्लिकन पक्षाच्या काही खासदारांनी निक्सनना सांगितले की तुमच्याविरूद्धचे आरोप अत्यंत गंभीर आहेत व तुमच्याविरूद्ध महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये आल्यास आम्ही प्रस्तावाच्या बाजूने मत देऊ. आपण आता वाचू शकत नाही हे निक्सनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवटी नाईलाजाने ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

निक्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर लगेच त्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निक्सन यांना त्यांच्या काळात त्यांच्याकडून झालेल्या सर्व गुन्ह्यासांठी पूर्ण व विनाअट माफी जाहीर केली. हा अमेरिकन जनतेला मिळालेला अजून एक धक्का होता.

जेराल्ड फोर्ड यांची कारकीर्द खूप रोचक आहे. निक्सन यांनी २० जानेवारी १९७३ या दिवशी दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून स्पायरो अ‍ॅग्न्यू यांनी सुद्धा दुसर्‍यांदा शपथ घेतली. परंतु काही काळातच १९७३ मध्ये गुन्हेगारी कटकारस्थान, लाचखोरी, अपहरण, करचुकवेगिरी अशा विविध आरोपांखाली त्यांची चौकशी सुरू झाली. १९६९ मध्ये प्रथम उपाध्यक्ष होण्यापूर्वी ते बाल्टीमोर काऊंटीचे मुख्य कार्यकारी व नंतर मेरीलँड राज्याचे गव्हर्नर (म्हणजे मुख्यमंत्री) होते. त्या काळात त्यांनी काही कंत्राटदारांकडून लाच घेतल्याचे आरोप होते. करचुकवेगिरीचेही आरोप होते. शेवटी१० ऑक्टोबर १९७३ या दिवशी त्यांना उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार निक्सन यांनी ६ डिसेंबर १९७३ या दिवशी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाचे गटनेते जेराल्ड फोर्ड यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली. नंतर वॉटरगेट प्रकरणामुळे निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे पुन्हा एकदा घटनेतील तरतुदीनुसार उपाध्यक्ष असलेले जेराल्ड फोर्ड यांची ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक झाली व या पदावर ते २० जानेवारी १९७७ पर्यंत होते.

अमेरिकेच्या इतिहासात काही वेळा मुदत पूर्ण होण्याआधीच राष्ट्राध्यक्ष निधन झाल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे पदावरून गेल्यामुळे त्यांच्या जागी नवीन राष्ट्राध्यक्ष येण्याचे प्रसंग घडले आहेत. परंतु उपाध्यक्ष पदावरून जाण्याचा प्रसंग एकदाच १८३२ मध्ये घडला होता, तेव्हा तत्कालीन उपाध्यक्ष जॉन कॅलहॉन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविण्यासाठी मुदत पूर्ण होण्याआधीच उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या काळात उपाध्यक्षपद रिकामे न ठेवण्याची कायदेशीर तरतूद नसल्याने पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्षपद रिकामे राहिले होते. परंतु निक्सन यांनी आपल्या आध्यक्षपदाच्या पहिल्या कार्कीर्दीत घटनादुरुस्ती करून उपाध्यक्षपद रिकामे न ठेवता त्या जागी नवीन उपाध्यक्ष नेमण्याचा कायदा केला होता. त्यामुळे १९७३ मध्ये उपाध्यक्ष स्पायरो अ‍ॅग्न्यू यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर निक्सन यांनी आपल्या अधिकारात जेराल्ड फोर्ड यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती व ८ महिन्यांनी प्रत्यक्ष निक्सन यांनाच राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने त्यांच्या जागी उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

निवडून न येता उपाध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष या दोन्ही पदांवर आरूढ झालेले जेराल्ड फोर्ड हे अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव!

जेराल्ड फोर्ड यांचा राष्ट्राध्यक्षपदी शपथविधी झाल्यानंतर ४ महिन्यांहून अधिक काळ उपाध्यक्षपद रिकामे होते. शेवटी १९ डिसेंबर १९७४ या दिवशी फोर्ड यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते नेल्सन रॉकफेलर यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली. म्हणजे २० जानेवारी १९७३ ते २० जानेवारी १९७७ या ४ वर्षांच्या काळात अमेरिकेला २ राष्ट्राध्यक्ष व ३ उपाध्यक्ष मिळाले.

हे प्रकरण तडीस नेण्यास वॉशिंग्टन पोस्टचे निर्भीड पत्रकार बॉब वॉडवर्ड्स व बर्नस्टीन, त्यांच्या पाठीशी ठाम उभे असलेले वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक, पडद्याआड राहून मदत करणारा मार्क फेल्ट, सॅम आयर्विन व टिप ओ'नील सारखे डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन पक्षातील निर्भीड भूमिका घेणारे सिनेटर्स, इतर माध्यमे आणि कोणत्याही दबावाखाली न आलेली निष्पक्षपाती न्यायव्यवस्था हेच कारणीभूत ठरले.

वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार बॉब वूडवर्ड्स आणि कार्ल बेर्नस्टिन यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून पुरावे मिळवून हे प्रकरण शेवटास नेले व त्याचा शेवट निक्सनना अर्धचंद्र मिळण्यात झाला. त्यांच्या या अतुलनीय, निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना पुलित्झर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रकरणावर त्यांनी नंतर "All the Presiden's Men" हे पुस्तक लिहिले ज्याची तडाखेबंद विक्री झाली. वूडवर्ड यांना ९/११ च्या हल्ल्यानंतर केलेल्या रिपोर्टिंगबद्दल २००२ मध्ये पुन्हा एकदा पुलित्झर पुरस्कार देण्यात आला.

"All the Presiden's Men" या चित्रपटाचे खालील ३ मिनिटांचे ट्रेलर अवश्य पहावे.

"https://www.youtube.com/watch?v=DC3YFyah_Yg"

याच चित्रपटावर आधारीत एका डॉक्युमेंटरी मध्ये या प्रकरणातील सर्व स्टेक होल्डर्सच्या मुलाखती, त्या काळातील तपास व इतर सर्व गोष्टींचे सविस्तर चित्रण आहे. ते सुद्धा पाहण्यासारखे आहे.

https://www.youtube.com/watch?v=Xo7KWzOgnf8&list=PLhEyhZUiBh7IXZGu-8vZ48...

या प्रकरणातील बरीचशी माहिती व पुरावे त्यांना एका अनामिक व्हिसलब्लोअर कडून निळाले होते. त्याचा उल्लेख त्यांनी "Deep Throat" असा केला होता. जवळपास ३२-३३ वर्षांनंतर २००५ मध्ये डीप थ्रोट कोण होता हे उघड झाले. एफबीआयचा माजी सहाय्यक संचालक मार्क फेल्ट हाच डीप थ्रोट होता.

Life, Liberty and Pursuit of Happiness हे अमेरिकन घटनेने जनतेला दिलेले तीन मूलभूत अधिकार आहेत. निक्सन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून यातील Liberty या अधिकारावर आक्रमण केले होते. परंतु अत्यंत समर्थ लोकशाही असलेल्या अमेरिकेने कोणत्याही दडपणाखाली न येता हे आक्रमण परतवून लावले व जनतेला दिलेल्या मूलभूत अधिकारांचे रक्षण केले.

वॉटरगेट प्रकरण हे सत्तेवर नियंत्रण ठेवण्याविरूद्ध झगडणार्‍यांच्या आणि शोधक, निर्भीड पत्रकारितेच्या विजयाचे प्रतीक आहे.

१९६० च्या दशकात अध्यक्ष केनेडींची झालेली हत्या, रशियाबरोबरील शीतयुद्ध, वर्णभेद विरोधात लढणारे मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या, सलग ७ वर्षे चाललेले व्हिएटनाम बरोबरील युद्ध व त्यात मरण पावलेले ५७,००० सैनिक अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे धक्का बसलेल्या अमेरिकन जनतेला वॉटरगेट प्रकरण व त्यात प्रत्यक्ष गुंतलेले अध्यक्ष निक्सन यामुळे अजून एक जोरदार मानसिक धक्का बसला.

वॉटरगेट या इमारतीत हे प्रकरण घडल्यामुळे या प्रकरणाला वॉटरगेट स्कँडल हे नाव मिळाले. नंतर क्लिंटन अंतर्गत मोनिकागेट, ररीगन अंतर्गत इराणगेट, फॉक्सवॅगन कार कंपनीचा घोटाळा ज्याला डिझेलगेट असे नाव पडले होते, अशी प्रकरणे प्रसिद्ध झाली.

इति लेखनसीमा.

____________________________________________________________________________________

ही मालिका लिहिण्यात माझे शून्य संशोधन आहे. वेगवेगळ्या लेखातून माहिती एकत्रित करून मी त्याचे संकलन केले आहे. त्यासाठी खालील माहितीस्रोतांचा आधार घेतला आहे. लेखांमध्ये तपशीलांच्या आणि व्याकरणाच्या काही चुका राहिल्या असण्याची शक्यता आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Gerald_Ford
https://en.wikipedia.org/wiki/Spiro_Agnew
https://en.wikipedia.org/wiki/Richard_Nixon
https://amp/s/www.history.com/.amp/topics/1970s/watergate
https://mr.istanbulbear.org/uotergeytskoe-delo-v-ssha-istoriya-6380
https://www.smithsonianmag.com/history/who-was-deep-throat-96058276/
https://bolbhidu.com/what-happened-at-watergate/
https://timesofindia.indiatimes.com/world/us/g-gordon-liddy-watergate-ma...
https://indianexpress.com/article/world/g-gordon-liddy-watergate-masterm...

प्रतिक्रिया

Bhakti's picture

17 May 2021 - 9:28 pm | Bhakti

लेखमाला खुप आवडली.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 May 2021 - 9:38 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. एका सुंदर लेखमालेचा समारोप.

शेवटी १९ डिसेंबर १९७४ या दिवशी फोर्ड यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते नेल्सन रॉकफेलर यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली. म्हणजे २० जानेवारी १९७३ ते २० जानेवारी १९७७ या ४ वर्षांच्या काळात अमेरिकेला २ राष्ट्राध्यक्ष व ३ उपाध्यक्ष मिळाले.

आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० जानेवारी १९७७ या काळात अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघेही त्यांच्या पदावर निवडून गेलेले नव्हते.

रिचर्ड निक्सन यांनी केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते. त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही होऊ शकला असता. अमेरिकेतील सामान्य माणसाचे निक्सन यांना तुरूंगात पाठवावे असेच मत होते. पण वॉटरगेट प्रकरण आपल्याला मागे सोडायला हवे असे म्हणत जेराल्ड फोर्ड यांनी अध्यक्षपदावर आल्यावर अध्यक्षांच्या अधिकारांचा वापर करून रिचर्ड निक्सन यांना कोणत्याही कोर्टाच्या कारवाईपासून अभय दिले. जेराल्ड फोर्ड यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. १९७६ मध्ये ते जिमी कार्टर यांच्याकडून निवडणुक हरले त्यामागे आर्थिक कारणांबरोबरच हे पण एक कारण होते असे म्हणता येईल. रिचर्ड निक्सन अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही सार्वजनिक आयुष्यात विशेषतः परराष्ट्र धोरणावरील वक्तव्ये/भेटी यातून बर्‍याच प्रमाणावर सक्रीय राहिले. त्यानंतरच्या अध्यक्षांनीही निक्सन यांच्याशी परराष्ट्रधोरणावर वेळोवेळी सल्लामसलत केली. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाल्यावर तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही परराष्ट्रधोरणावर ते निक्सनचे मार्गदर्शन घ्यायचे असे सांगितले.

रिचर्ड निक्सन आपला राजीनामा जाहीर करताना

जेराल्ड फोर्ड यांचा शपथविधी

श्रीगुरुजी's picture

17 May 2021 - 10:00 pm | श्रीगुरुजी

आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० जानेवारी १९७७ या काळात अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघेही त्यांच्या पदावर निवडून गेलेले नव्हते.

जेराल्ड फोर्ड हे इतके नशीबवान ठरले की अजिबात निवडून न येता त्यांना दोन्ही पदे मिळाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेताना शेवटी "So help me God" असे बोलतात. अमेरिकतील चलनी नाण्यांवर "In God We Trust" असे कोरलेले असते. हे वाक्य अमेरिकेचा व फ्लॉरिडा राज्याचा official motto आहे.

भारतात शपथ घेताना शपथेत देवाचे नाव अधिकृतपणे समाविष्ट केले तर अक्षरशः आभाळ कोसळेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 May 2021 - 10:05 pm | चंद्रसूर्यकुमार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेताना शेवटी "So help me God" असे बोलतात.

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७८९ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा शपथ झाल्यावर "So help me God" हे शब्द ते अनवधनाने बोलून गेले. त्यानंतर हे शब्द शपथेचाच भाग झाले. इतकेच नाही तर अध्यक्ष शपथ घेताना उजवा हात काटकोनात वर करतात आणि डावा हात बायबलवर असतो. हे बायबल अध्यक्षांच्या 'स्पाऊस' ने हातात धरलेले असते. भारतात शपथ घेताना असे काही केल्याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहत नाही.

biden

श्रीगुरुजी's picture

17 May 2021 - 10:09 pm | श्रीगुरुजी

मोदी किंवा वाजपेयींसारखा एखादा अविवाहीत किंवा विधुर भूतकाळात अमेरिकेचा अध्यक्ष झाला होता का? तसे असल्यास शपथ घेताना बायबल कोण हातात धरणार (एक खोडसाळ शंका)?

संदर्भ: Has There Ever Been a Single President?

>>James Buchanan is the only President to be single while in office. The First Lady during his presidency was Harriet Lane, Buchanan's niece.

यांच्या शपथविधीच्या वेळी बायबल कुणी धरले होते ते जालावर शोधावे लागेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 9:05 am | चंद्रसूर्यकुमार

यापूर्वी थॉमस जेफरसन, अ‍ॅन्ड्र्यू जॅकसन हे विधुर अध्यक्ष झाले होते. जॅकसनच्या पत्नीचे- रेचल जॅकसनचे तर निवडणुकीत तो जिंकला हा निकाल येणे आणि ४ मार्चला त्याने अध्यक्षपदाची शपथ घेणे या मधल्या काळात निधन झाले होते. अशावेळी अध्यक्षाची बहिण किंवा मुलगी यांना फर्स्ड लेडी म्हणून दर्जा दिला गेला होता.

निपा's picture

18 May 2021 - 12:04 am | निपा

ईश्वर कि शपथ ...

https://www.youtube.com/watch?v=sLNpFDHADqY&t=87s

आपले नेते नाही घेत का ? इथे काय केले आहे मग ?

निपा's picture

18 May 2021 - 12:12 am | निपा

https://www.mea.gov.in/Images/pdf1/S3.pdf

Oath of office
I, , do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as prime minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.
Constitution of India, Third Schedule, Part I

आपल्या देशात शपथ standardized आहेत . फ्रान्स मध्ये नाही , पण netherlands मध्ये पण हेल्प मी गॉड आहेच . होईल हळू हळू change ..

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 9:12 am | चंद्रसूर्यकुमार

हो बरोबर. पण do swear in the name of God असे म्हटलेच पाहिजे असे नाही. solemnly affirm असे म्हणत शपथ घ्यायची पण तरतूद आहे. अमेरिकेत 'सो हेल्प मी गॉड' ला पर्याय आहे किंवा तसे म्हणणे ऐच्छिक आहे असे वाटत नाही.

अमेरिकेत अनेक ऐतिहासिक भाषणांमध्ये अध्यक्षांनी आपला देवावर विश्वास असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. अ‍ॅब्रॅहॅम लिंकननेही गेटीसबर्ग भाषणात we here highly resolve that these dead shall not have died in vain -- that this nation, under God, shall have a new birth of freedom -- and that government of the people, by the people, for the people, shall not perish from the earth असे म्हटले होते.

श्रीगुरुजी's picture

18 May 2021 - 9:22 am | श्रीगुरुजी

भारतात शपथ घेताना गीता किंवा तत्सम धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथ घेणे पाहण्यात नाही. बहुतेक तशी परवानगी नसावी.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 9:28 am | चंद्रसूर्यकुमार

हिंदी चित्रपटात दाखवलेले खरे असेल तर न्यायालयात धार्मिक पुस्तकावर हात ठेऊन 'आपण सत्यच बोलू' अशी शपथ घेत असावेत. खखोदेजा.

पण कोणत्याही घटनात्मक पदाची शपथ घेताना मात्र धार्मिक पुस्तकावर हात ठेऊन शपथ घेत नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2021 - 9:48 am | श्रीरंग_जोशी

काही दशकांपूर्वीच न्यायालयात साक्षीच्या अगोदर शपथ घेताना प्रत्यक्ष धर्मग्रंथ हातात धरण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. प्रत्येकाला ते मानत असतील त्या देवाची शपथ घेण्याची मुभा असते. (माहितीचा स्रोतः माझे वडिल जे सत्र निवृत्त न्यायालयिन कर्मचारी आहेत).

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 10:08 am | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. हे माहित नव्हते.

मुक्त विहारि's picture

17 May 2021 - 10:01 pm | मुक्त विहारि

आवडली

अमर विश्वास's picture

17 May 2021 - 10:18 pm | अमर विश्वास

उत्तम लेखमाला ...

श्रीगुरुजी's picture

17 May 2021 - 10:53 pm | श्रीगुरुजी

लेखमाला वाचणाऱ्या व प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद!

या विषयावर लिहिण्याची इच्छा होती, परंतु जमत नव्हते. ३० मार्चला या प्रकरणाचा सूत्रधार गॉर्डन लिडी गेल्याची बातमी वाचल्यानंतर लिहायला सुरूवात केली. १ मे २०२१ पासून आयपीएल सामने स्थगित झाल्यानंतरच जरा वेगाने लिहिण्यास सुरूवात झाली. शेवटी आज अंतिम भाग पूर्ण केला.

१९९९ व २००० या दोन्ही वर्षी काही काळ मी व्हाईट हाउसपासून अगदी जवळ असलेल्या वर्ल्ड बँकेत प्रोजेक्टच्या कामाला जात होतो. वॉटरगेट कॉम्प्लेक्स तेथून खूप जवळ आहे हे तेव्हा माहिती असते तर वेळ काढून एकदा तो पाहून आलो असतो. आता परत त्या भागात गेलो तर नक्की पाहून येईन.

कॉमी's picture

17 May 2021 - 10:58 pm | कॉमी

पर्वा पर्वा ट्रम्प सुद्धा ओबामांवर निराधार आरोप करत होता, त्याला सुद्धा ट्रम्पने ओबामागेट असे नाव दिले होते.

सोत्रि's picture

18 May 2021 - 3:37 am | सोत्रि

माहितीवर्धक लेखमाला!

- (टोल‘गेट’ बाहेर यावं अशी ईच्छा असलेला) सोकाजी

प्रचेतस's picture

18 May 2021 - 7:35 am | प्रचेतस

मस्त मालिका झाली ही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2021 - 9:15 am | ज्ञानोबाचे पैजार

रोज येणार्‍या नव्या भागाची वाट पहायला लावत होती ही मालिका.

चंद्रसुर्यकुमार यांची पुरक माहितीही वाचनिय होती.

पैजारबुवा,

माहितीपूर्ण, उत्कंठावर्धक आणि वेगाने भाग प्रकाशित झालेली लेखमाला.

वॉटररगेट प्रकरणाची फर्स्ट-हॅन्ड माहिती होती पण फारसे तपशील माहित नव्हते. या लेखमालेमुळे इत्यंभूत माहिती मिळाली. श्रीगुरुजी यांना धन्यवाद. चंद्रसूर्यकुमार आणि इतरांचे माहितीपूर्ण प्रतिसादही आवडले.

---

या निमित्ताने, मिपावरच्या जाणकारांनी भारतीय-अभारतीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक scandals बद्धल लेख / लेखमाला लिहाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतो.

- वाचनप्रेमी वामन

सौंदाळा's picture

18 May 2021 - 10:40 am | सौंदाळा

मस्त झाली मालिका
वॉटरगेट नुसते ऐकुनच माहीत होते, एवढी तपशीलवार माहीती ओघवत्या तुमच्या शैलीत वाचायला मज्जा आली.
बरेच दिवसांनी तुम्ही असे लिखाण केले. लिहित रहा.

चौकटराजा's picture

18 May 2021 - 10:43 am | चौकटराजा

भारत काय किन्वा कोणताही देश काय ,पत्रकार माणसेच असल्याने ते " इझम ने " ग्रासले असण्याची शक्यता असतेच पण भारत देशात हा " ईझम " रोग पत्रकारांमधे जास्तच आहे ! भारत देशात पत्रकार एकादे प्रकरण फक्त "बातमी" म्हणून पुढे आणतात ,त्यापेक्शा जास्त टी आर पी वाली बातमी आली की सदर बातमी एकदम जुनी होते.
'तळे राखील तो पाणी चाखील ' हे भारतीय माणसाने स्वीकारले आहेच पण ते पत्रकारानीही स्वीकारले आहे ! पत्रकारानी बाब लावून धरून एखादे सरकारच पाडले वा एखाद्या राजकारण्याला पार तुरूंगात खितपत पडायला पाठवले अस्से प्रकरण भारतात कुणाच्या आठवणीत आहे का ? आण्णा हजारे यानी मनमोहन सिन्ग यान्चे सरकार पाडण्यात पत्रकारान्ची मदत घेतली असे जर कुणी म्हणणार असेल तर ते मला मान्य नाही .कारण मनमोहन यान्चे सरकार पडलेले नाही ते निवडणूक हारले !

चौकस२१२'s picture

18 Jun 2021 - 5:27 am | चौकस२१२

चांगली शोधपत्रकारिता ऐकण्याची / वाचण्याची / पाहण्याची चटक लागली आहे... खास करून भारतातून बाहेर पडल्यावर
यात गेली ४० हुन अधिक वर्षे कार्यरत असलेल्या फोर कॉर्नर्स हा ऑस्ट्रेलियन कार्यक्रम अवर्णीय आहे ... आज त्यांचा कार्यक्रम झालं आणि त्यातील काही स्फोटामुळे उद्या सरकार ला दखल घायवी लागली असे घडले आहे .
अर्थात बीबीसी किंवा अमेरिकेतल्या मोठया वाहिनी एवढी याला जगप्रसिद्धीची मिळत नाही कारण हा देश तसा छोटा आहे ...
याच बरोबर फॉरेन कॉरस्पाँडंट आणि डेटलायिन हे दोन कार्यक्रम जगातील घडामोडींवर बेतलेले असतात ..
कोणास उत्सुकता असल्यास तिन्ही कार्यक्रम जर पाहावे .. काही गोष्टी स्थानिक असल्यामुळे कदाचित संदर्भहीन वाटतील पण एक सरकारी मालकीचे असून सुद्ध स्वतंत्र बाणा कसा जोपासला जातो याची उदाहराणे आहेत .. पाश्चिमात्य लोकशाहीतील
https://www.abc.net.au/4corners/
https://www.abc.net.au/foreign/
https://www.sbs.com.au/news/dateline/

श्री गुरुजी ,, आपल्याला वेळ मिल्यालास आपण "केनेडींची हत्या" यावर पण एकादी लेख मला जरूर लिहावी

अनन्त अवधुत's picture

18 May 2021 - 12:07 pm | अनन्त अवधुत

माहितीपूर्ण लेखमाला.

वॉटररगेट प्रकरणाची माहिती होती पण इतके तपशील माहिती नव्हते. या लेखमालेमुळे बरीच माहिती मिळाली. श्रीगुरुजी यांना धन्यवाद. चंद्रसूर्यकुमार, आणि इतरांना माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

संजय पाटिल's picture

18 May 2021 - 12:10 pm | संजय पाटिल

सर्व भाग वाचले; फारच रोमन्चक माहिती आहे हि....
सवीस्तर लेखमालेबद्दल धन्यवाद!!

भारतात शोधपत्राकारीतेची अनेक उदाहरणे आहेत.
नगरवाला फोन प्रकरण
२जी स्पेक्ट्रम घोटाळा
अंतुलेंचा सिमेंट घोटाळा
हर्शद मेहताचा शेअर घोटाळा.

पण त्याचबरोबर अनेक दाबलेली प्रकरणे देखील आहेत.
रमेश किणी प्रकरणाचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही.

अगदी नवे म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरण.
यात शोधपत्राकारीता कुठे कमी पडते ते समजत नाही.
पण जिवावर उदार होऊन काम करणारे पत्रकार आणि त्यापेक्षाही त्यांना पाठिंबा देणारे पत्र प्रमुख आता विरळेच झालेत

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 1:35 pm | चंद्रसूर्यकुमार

नगरवाला फोन प्रकरण

नगरवाला प्रकरणात शोध पत्रकारितेविषयी माहित नाही. कारण स्टेट बँकेतून ६० लाख रूपये काढल्यानंतर काही तासातच नगरवालांना अटक झाली होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९८६ मध्ये हिंदुस्तान टाईम्समध्ये एक लेख आला होता त्यात नगरवाला सी.आय.ए चे एजंट होते असा दावा केला गेला होता. इंदिरा गांधींचा बांगलादेश प्रकरणातील सहभाग निक्सन प्रशासनाला डोळ्यात सलत होता म्हणून सी.आय.ए ने इंदिरा गांधींना बदनाम करायला म्हणून हे नगरवाला प्रकरण घडवून आणले असा आरोप होता. पण त्यासाठी कसलेही पुरावे लेखकांनी दिले नव्हते. तसेच इंदिरा सत्तेत असताना अमक्यामागे सी.आय.ए, तमक्यामागे सी.आय.ए हे आरोप कित्येकदा करायच्या त्यामुळे त्यात कितपत तथ्य होते कल्पना नाही.

हाच का तो बॉलीवूडचा प्रसिद्ध "विदेशी ताकतोंका हाथ"?

मराठी_माणूस's picture

18 May 2021 - 4:52 pm | मराठी_माणूस

पण जिवावर उदार होऊन काम करणारे पत्रकार आणि त्यापेक्षाही त्यांना पाठिंबा देणारे पत्र प्रमुख आता विरळेच झालेत

वर लेखात उल्लेख आहे तसा जनतेकडुन देखील पाठींबा आवश्यक असतो. त्याचा इथे अभाव आहे.

rahul ghate's picture

18 May 2021 - 2:03 pm | rahul ghate

श्री गुरुजी,
लेखमाला अतिशय रोचक व माहितीपूर्ण आहे , बरीच माहिती / तपशील पहिल्यांदा च वाचतो आहे.
धन्यवाद

तुषार काळभोर's picture

18 May 2021 - 3:03 pm | तुषार काळभोर

धन्यवाद, श्रीगुरुजी!

राजकीय भ्रष्टाचाराच्या बाबतीत अमेरिका भारतापेक्षा कितीतरी अधिक स्वच्छ असेल असे वाटलेले. विशेष काही फरक नाही!
पण त्याचवेळी काही गोष्टींत एकदम कॉण्ट्रास्टिन्ग फरक आहे. विशेषतः शोध पत्रकारिता.
आपल्याकडील, विशेषतः वृत्तवाहिन्यांवरील, पत्रकार/निवेदक अमेरिकन वृत्तवाहिन्यांची आंधळी कॉपी करतात.
आणि मराठी वृत्तनिवेदक तर शब्दशः एक एक शब्द, वाक्यरचना हिन्दी निवेदकांची कॉपी करतात. अर्थ लक्षात न घेता.

निक्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर लगेच त्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निक्सन यांना त्यांच्या काळात त्यांच्याकडून झालेल्या सर्व गुन्ह्यासांठी पूर्ण व विनाअट माफी जाहीर केली. हा अमेरिकन जनतेला मिळालेला अजून एक धक्का होता.

ऑ!! हे तर जबर धक्कादायक आहे!

अभिजीत अवलिया's picture

18 May 2021 - 10:57 pm | अभिजीत अवलिया

छान झाली लेखमाला.
जरी अमेरीकेत राजकीय भ्रष्टाचार असला तरी तो उघड झाल्यावर तेथील विरोधी पक्षाच्याच न्हवे तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील आपल्या नेत्याच्या विरोधात जाणे योग्य मानले हे कौतुकास्पद आहे. लोकशाही केवळ मोठी असण्यापेक्षा Matured असणे राष्ट्राच्या प्रगतीस हातभारक ठरते हे यातून सुचित होते.

जुइ's picture

19 May 2021 - 7:42 am | जुइ

या जगप्रसिद्ध प्रकरणावर आजवर बरेचदा टिव्हीवरच्या बातम्यांमधे उल्लेख पाहिले होते अन काही वेळा बातम्यांमधे वाचले होते. पण तपशीलवार वर्णन पहिल्यांदाच वाचले. या लेखमालिकेसाठी धन्यवाद.

जुइ's picture

19 May 2021 - 11:45 pm | जुइ

काही वर्षांपूर्वी आम्ही वॉशिंटन डिसीची सहल केली. तेव्हा वॉटरगेट इमारत बघणे सहज शक्य होते. भविष्यात जेव्हाही जाऊ तेव्हा नक्की बघू.

रोचक मालिकेची मेजवानी दिल्या बद्दल श्रीगुरुजींचे अनेक आभार .

सुखी's picture

19 May 2021 - 1:57 pm | सुखी

लेखमाला आवडली ...
अजून अश्या विषयांवर वाचायला आवडेल __/\__

चौकटराजा's picture

19 May 2021 - 4:28 pm | चौकटराजा

रोश विरुद्ध अ‍ॅडम्स ---- एका औषध कम्पनीचा अधिकारी व तेथील सरकारसह औषध नियम्त्रण सन्स्था व ती कंपनी यान्चे साटेलोटे यातील संघर्ष !

गॉडजिला's picture

19 May 2021 - 7:35 pm | गॉडजिला
चौकटराजा's picture

20 May 2021 - 5:24 am | चौकटराजा

होय !

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 7:24 pm | श्रीगुरुजी

सर्व वाचकांना व प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद!

धन्यवाद.

बोल भिडू वर याबद्दल वाचलं होतं ... पहिला भाग वाचून मनात शंका आली होती कि इथे तुम्ही पुन:प्रकाशित करत आहात कि काय :) ...
तुम्ही खुपच परिश्रम घेवून आणि संदर्भ वापरुन लेखमाला लिहिली आहे ..

पुलेशु !

श्रीगुरुजी's picture

20 May 2021 - 9:10 am | श्रीगुरुजी

बोल भिडू मधील लेख मी वाचला होता. संदर्भ यादीत मी त्याची लिंक दिली आहे. त्या लेखात बरीच वरवरची माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गॉर्डन लिडी, व्हिसल ब्लोअर डीप थ्रोट मार्क फेल्ट, टेप पुसण्याचा प्रकार अशा महत्त्वाच्या गोष्टी त्यात नाहीत. या गोष्टी मला इतरत्र सापडल्या व संदर्भ यादीत मी सर्व स्रोत दिले आहेत.

मी आधी लिहिल्याप्रमाणे यात माझे संशोधन शून्य आहे. मी फक्त वेगवेगळ्या स्रोतातून माहिती गोळा करून क्रमवार संकलन करून लेखमालेच्या स्वरूपात मांडली आहे.

ऐतिहासिक घडामोडी चर्वितचर्वण म्हणून फारच मजेशीर असतात. चालू घडामोडींशी मात्र त्यांचा चुकूनही संबंध जोडू नये.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Aug 2021 - 6:11 pm | अमरेंद्र बाहुबली

छान मालीका श्रिगुरूजी, आता नवीन काहीतरी लिहीयला घ्या. एरीया ५६ वगैरे

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Aug 2021 - 6:12 pm | अमरेंद्र बाहुबली

एरीया ५१*