हंपी: भाग ८ (अंतिम) - विठठ्ल मंदिर आणि राजतुला

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
29 Apr 2021 - 3:42 pm

हंपी: भाग १ - चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं

हंपी: भाग २ - राजवाडा परिसर

हंपी: भाग ३ - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

हंपी: भाग ४ - दारोजी अस्वल अभयारण्य

हंपी: भाग ५ - विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी

हंपी: भाग ६ - कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर

हंपी: भाग ७ - अंतःपुर, पद्ममहाल आणि गजशाळा

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विठ्ठल मंदिर अर्थात विजय विठ्ठल मंदिर हे हंपीतले सर्वात महत्वाचे ठिकाण. हे प्रसिद्ध आहे ते इथल्या भव्य दगडी गरुडरथामुळे आणि इथल्या अद्भूत नादमय स्तंभांमुळे. याशिवाय इतरही अनेक आश्रर्ये ह्या मंदिरांच्या विविध अंगांवर आहेत. विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी दोन प्रमुख रस्ते आहेत. एक आहे पायी जाण्याचा आणि दुसरा गाडीमार्ग.
पायी जाण्याचा रस्ता जातो तो विरुपाक्ष मंदिराच्या पुढ्यात असलेल्या हंपी बाजारातून. तुंगभद्रा नदीकाठावर असलेले अवशेष बघत मातंग टेकडीला वळसा मारत दुमजली प्रवेशद्वारातून विठ्ठल मंदिरात पोहोचता येते. हा मार्ग आहे सुमारे ३ किलोमीटरचा. ह्या मार्गाने विठ्ठल मंदिरात जायचे म्हणजे आपल्या हातात भरपूर वेळ हवा, कारण ह्या रस्त्यावर जागोजागी असंख्य अवशेष आहेत. दुपारचे कडक उन्ह टाळण्यासाठी सकाळी लवकर उठून ह्या मार्गाने जाणे सर्वात इष्ट . दुसरा मार्ग आहे तो गाडीरस्त्याचा. कमलापूर कांपिली रस्त्यावरुन जाऊन अंजनेय मंदिरावरुन विठ्ठल मंदिराला जाणारा फाटा घ्यायचा. आणि तलरीगट्ट प्रवेशद्वारातून विठ्ठल मंदिराच्या अलीकडे असणारा स्टॉप गाठायचा. हे अंतर सुमारे ६/७ किलोमीटर पडते. येथे गाडी लावायची, इथूनही विठ्ठल मंदिर सुमारे दिड किलोमीटर आहेच, पण मंदिरात जाण्यासाठी बॅटरीने कार्यान्वित अशा गोल्फ कार सारख्या गाड्या आहेत. एका गाडीत सहा ते आठ लोक बसू शकतात. आमच्याकडे वेळ कमी असल्याने आम्ही येथे गाडीमार्गानेच आलो आणि विठ्ठल मंदिराकडे जाण्यास निघालो. बग्गी स्टॅण्डवर जाऊन तिकिट काढून गाडीत बसलो. इथून सतत आपल्या उजवीकडे दिसत राहतो तो लांबच लांब पसरलेला विठ्ठल बाजार. ह्याच रस्त्याला रथ मार्ग असेही म्हणतात.

विठ्ठल बाजार (Vittala bazaar)

स्टॅण्डच्या जवळच एक सर्वबाजूंनी खुली अशी मंदिरवजा इमारत आहे, ती म्हणजे गेज्जला मंडप. उत्सवाच्या दिवशी देवतामूर्ती पालखीत घालून आणल्या जात तेव्हा त्यांच्या विसाव्याचे हे ठिकाण असावे. इथून विठ्ठल मंदिरापर्यंतचा रस्ता धुळकट आहे. कच्चा रस्ता असल्याने धुळीचे लोटच्या लोट येथून उडताना दिसतात. इकडे उजव्या हाताला लागतो तो लांबच लांब पसरलेला विठ्ठल बाजार, विरुपाक्ष मंदिरापासून नदीकाठच्या रस्त्याने जर आलात तर आधी विठ्ठल मंदिर लागते आणि मग हा विठ्ठल बाजार आणि गाडी रस्त्याने आलात तर आधी विठ्ठल बाजार लागतो आणि मग विठ्ठल मंदिर. तुंगभद्रा नदीला समांतर असलेल्या ह्या लांबच लांब विठ्ठल बाजारात पूर्वीच्या वैभवाचे अवषेश आजही पाहता येतात. दोन्ही बाजूंना असलेल्या प्रचंड खडकांच्या पार्श्वभूमीवर ह्याचे सौंदर्य विलक्षण खुलून दिसते. ह्या बाजाराच्या मधेच एक भलीमोठी पुष्करणी आहे. अर्थात गाडीत असल्याने ती उतरुन पाहता आली नाही.

विठ्ठल बाजार

a

विठ्ठल बाजारातील पुष्करिणी

a

रथमार्गावरुन जाताना विठ्ठल बाजाराच्या विरुद्ध दिशेस एक मंदिरवजा मंडप दिसतो तो आहे कुदुरेगोम्बे मंडप, हेही बहुधा विश्रांतीचे ठिकाण असावे. कन्न्डमध्ये कुदुरे म्हणजे घोडा

कुदुरेगोम्बे मंडप

a

हे बघत बघतच विठ्ठल मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराच्या पुढ्यातच मंडप असलेल्या बाजाराची रचना आहे.

a

विठ्ठल मंदिर (Vittala temple)

हे हंपीतील सर्वात सुंदर मंदिर. देवरायाच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरात विजयनगरच्या विविध राजांच्या कारकिर्दीत भर पडत गेली, विविध बांधकामे होत राहिली. कृष्णदेवरायाच्या काळात ह्या मंदिराच्या विस्तारात प्रचंड भर पडली आणि इथले प्रसिद्ध संगीत स्तंभ असणारा रंगमंडप हा अच्युतरायाच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा असे तेथील एका शिलालेखावरुन मानले जाते.

प्रचंड विस्तार असलेल्या ह्या मंदिराला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत व प्रत्येक प्रवेशद्वार गोपुराने सजलेले आहे, आतमध्ये असंख्य मंडप, भव्य दगडी रथ असून तारकाकृती चौथर्‍यावर हे मंदिर उभारलेले आहे. विजय विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्ती मात्र नाही. तालिकोटच्या लढाईनंतर ६ महिने विजयनगर जळत होतं, भग्न होतं होतं त्यातच ही मूर्ती नष्ट झाली असावी असे मला वाटते.

पूर्वेकडील गोपुर
मंदिरात प्रवेश ह्याच गोपुरातून होतो. दगड आणि विटांपासून बनलेल्या ह्या गोपुरावर अनेक पौराणिक प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत. येथील तिन्ही गोपुरे ही कृष्णदेवरायानाए बांधलेली असावीत, ह्यांना रायगोपुरे अशीही संज्ञा आहे.

विठ्ठल मंदिराचे मुख्य गोपुर

a

गोपुरावरील शिल्पांकन

a

गोपुरावरील शिल्पांकन

a

विठ्ठल मंदिराच्या संकुलात प्रवेश करताच पहिली नजर जाते ती तिथल्या भव्य दगडी रथाकडे. डावीक्डे येतो तो कल्याण मंडप, त्याच्यापुढेच उत्सव मंडप आहे तर डावीकडे अजून एक मंडप आहे. सर्वच मंडप विविध शिल्पांनी नटलेले आहेत. तर मुख्य मंदिरात महामंडप अर्थात सभामंडप, अंंतराळ आणि गाभारा असे विविध विभाग आहेत.

दगडी गरुड रथ

विठ्ठल मंदिराचे हे सर्वात प्रमुख आकर्षण. प्रथमदर्शनी एकपाषाणी वाटणारा हा दगडी बनवला गेला आहे तो ग्रॅनाईटच्या मोठमोठ्या ठोकळ्यांनी, सांध्यांची जागा मोठ्या खुबीने विविध शिल्पे, नक्षीकामाने झाकलेली आहे. रथ एका चौथर्‍यावर उभारलेला असून रथाला चार दगडी चाके आहेत. ही चाके इतक्या हुबेहूब कोरली गेलेली आहेत की ती जणू आजही फिरतील असेच वाटते. चक्राच्या दांड्यात ही चाके बसवली आहेत. चाकांवर नाजूक नक्षीकाम आहे, चाकांच्याच बाजूला रथाच्या अधिष्ठानाखाली भारवाहक यक्षांनी रथ तोलून धरलेला आहे. रथ वाहण्यासाठी पूर्वी दगडी घोडे होते, जे आजमितीस पूर्णपणे नष्ट झालेले असून तिथे आता हत्ती बसवेलेले आहेत, मात्र मूळच्या घोड्यांच्या शेपट्या तिथे आजही बघता येतात. दोन घोड्यांच्या मध्यभागी रथात प्रवेश करायला दगडी शिडी आहे.
हे मंदिर विष्णूचे साहजिकच विष्णूचे वाहन गरुड ही ह्या रथाची देवता, ही मूर्ती पूर्वी रथात प्रतिष्ठापित होती, आजमितीस ती तेथे अस्तित्वात नाही.

दगडी रथ

a

रथाची चक्रे व बाजूला भारवाहक यक्ष

a

नंतर बसवलेले हत्ती आणि मूळच्या घोड्यांच्या शेपट्या

a

दगडी रथ

a

a

गोपुर आणि दगडी रथ

a

रथाच्या पुढ्यातच आहे विठ्ठल मंदिराचा महामंडप

महामंडप

ह्याच मंडपात विठ्ठल मंदिराचे अद्भूत नादमय स्तंभ आहेत. स्तंभ सतत वाजवून त्यांची हानी होत असल्याने सध्या तिथे वाजवून बघायला बंदी आहे इतकेच नव्हे तर दुरुस्तीच्या नावाखाली साधे महामंडपात देखील प्रवेश करायला बंदी आहे. गाभार्‍यात जायचे असल्यास डावीकडच्या लहानश्या दरवाजाने अंतराळात जाता येते. इथल्या वाजणार्‍या स्तंभांचे रहस्य समजून घेण्यासाठी ब्रिटिशांनी येथील एक दोन स्तंभ कापून एनेले असे म्हणतात, आश्चर्य म्हणजे ते पोकळ न निघता भरीव निघाले. महामंडपात जाता येत नसल्याने येथील बाहेरुन बघूनच समाधान मानावे लागते. मात्र आतमध्ये भरजरी स्तंभ आहेत, कित्येक शिल्पे ह्या स्तंभांवर कोरली गेली आहेत.

महामंडप आणि त्यातील नादमय स्तंभ

a

महामंडपाचा अंतर्भाग

a

महामंडप

a

महामंडपाच्या बाह्यभागांवर काही आगळीवेगळी शिल्पे आहेत, ज्यात पोर्तुगीज, अरबी, चिनी, मंगोलियन माणसांचे चित्रण आहे. ह्या परदेशी माणसांचे चित्रण महानवमी डिब्ब्यावर केलेलेही आपल्याला आढळून येते. विजयनगरच्या बाजारात घोड्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालत असे ह्या घोड्यांचे परीक्षण करताना हे परदेशी प्रवासी दिसतात.

दाढीवाला मंगोलियन मनुष्य

a

हे बहुधा पोर्तुगीज असावेत.

a

हे टोपीकर इंग्रज असावेत

a

हे देखील परदेशी सेवकच

a

येथील मूळची विठ्ठलमूर्ती कशी असावी ह्याची अल्पशी कल्पना आपल्याला महामंडपाच्या बाहेरच्या बाजूस असणार्‍या देवकोष्ठातील विठ्ठलमूर्तीवरुन येते.

देवकोष्ठातील विठ्ठलमूर्ती

a

इथेच अद्भूत मूर्ती कोरलेली आहे. या एकाच मूर्तीत खुबीने मकरतोरण, दोन किर्तीमुखे, प्रभावळ, दोन शरभ आणि शिवमुखरुपी शिवलिंग असे कोरलेले आहे.

a

महामंडपावर एका ठिकाणी राम लक्ष्मणाचे शिल्प कोरलेले आहे.

a

मुख्य मंदिराला फेरी मारताना हे डाव्या बाजूचे प्रवेशद्वार दिसते

a

तर विरुद्ध बाजूस दुसर्‍या बाजूचे प्रवेशद्वार नजरेस पडते.

a

महामंडप आणि मुख्य मंदिर बाहेरुन पाहून झाल्यावर आता आपण कल्याणमंडपाकडे येऊ.

कल्याणमंडप

कल्याणमंडप हा अनेक स्तंभ असणारा सर्व बाजूंनी खुला असलेला मंडप असून स्तंभावर भव्य व्याल, रामायण, महाभारतातील प्रसंग, विष्णूचे दशावतार, सुरसुंदरी अशा विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. कल्याणमंडपात लग्न लावली जात असत.

कल्याणमंडप

a

येथेही काही अद्भूत मूर्ती आहेत. एकाच मस्तकातून येथून बैल आणि हत्ती दोघांचाही आभास निर्माण केला गेलाय.

बैल आणि हत्तीचे जोडशिल्प

a

ऋषी, बैल हत्ती जोडशिल्प आणि झाडे उखडून हत्ती असणारी शिल्पपट्टीका

a

त्याचाच बाजूला एक रथारुढ वीर शुक, हंस आणि मयुरावरुन आलेल्या योद्ध्यांशी युद्ध करताना दाखवला आहे. शुक म्हणजे मदन, हंस म्हणजे ब्रह्मा आणि मयुर हे कार्तिकेयाचे वाहन, साहजिकच हा कुठलातरी पौराणिक प्रसंग असावा मात्र तो नेमका कुठला ते ध्यानात येत नाही, त्याच्या बाजूलाच नृत्य करणार्‍या नर्तिकांचे शिल्प आहे.

a

बाहेरील बाजूच्या स्तंभांवर भव्य व्याल आहेत. हे व्याल हत्तीची सोंड, सिंहाचा जबडा, हरणाचे कान, अश्वाची मान, वाघाचे शरीर, मोराचे शेपूट अशा विविध प्राण्यांच्या संकरातून बनवलेले असून ते मकरावर अधिष्ठित आहेत. एका ठिकाणी ह्या व्यालावर निमूळती टोपी घातलेला आणि आकडेबाज मिशा असलेला सैनिक आरुढ असून त्याच्या चेहर्‍यापट्टीवरुन तो परदेशी वाटतो.

स्तंभांवरील व्याल

a

मंडपांच्या आतील स्तंभांवर देखील असेच स्वारयुक्त व्याल आहेत. येथेच एक मूर्ती आहे ती खुद्द कृष्णदेवरायाची आहे असे मानली जाते.
कमलापूरच्या संग्रहालयात असणार्‍या कृष्णदेवरायाच्या मूर्तीचे ह्या मूर्तीशी साम्य आहे, मूर्तीला राजमुकुट आहे आणि कृष्णदेवराय बुटका होता असे म्हणतात त्याप्रमाणे येथील व्यालावरील स्वारमूर्ती बुटकी आहे.

कृष्णदेवरायाची मूर्ती

a

याखेरीज स्तंभांवर असलेल्या स्वारयुक्त व्यालमूर्ती

a

कल्याणमंडपातील दृश्य

a

आता आपण मंदिराच्या स्तंभांवर असलेल्या अवतारांपैकी काही मूर्ती पाहूयात.

विष्णू अवतारमूर्ती

मत्स्य अवतार

हा विष्णूचा पहिला अवतार. ही मूर्ती अर्धे शरीर मत्स्याचे आणि अर्धे विष्णूचे अशा स्वरुपात आहे.

a

कूर्म अवतार

हा विष्णूचा दुसरा अवतार. ही मूर्ती अर्धे शरीर कासवाचे आणि अर्धे विष्णूचे अशा स्वरुपात आहे.

a

नृसिंह अवतार

हा विष्णूचा चौथा अवतार

a

वामन अवतार

हा विष्णूचा पाचवा अवतार, वामनअवतार ओळखण्याची खूण म्हणजे बटु, त्याने धारण केलेली छत्री आणि हाती धरलेला कमंडलू

a

परशुराम अवतार

हा विष्णूचा सहावा अवतार, ह्याने हातात परशु धारण केलेला आहे.

a

राम अवतार

हा विष्णूचा सातवा अवतार, येथील शिल्पातला प्रसंग हा मारीचवधाचा आहे. सुवर्णमृगावर बाण चालवल्यावर मरणारा मारीच राक्षसरुप धारण करुन प्रकट होत आहे.

a

विठ्ठल अवतार

a

इथल्या स्तंभांवर विष्णू अवतारासंबंधित अजूनही कित्येक मूर्ती कोरलेल्या आहेत त्या पुढिलप्रमाणे

स्थौण नृसिंह

संस्कृत भाषेत स्थूण म्हणजे स्तंभ, स्थौण म्हणजे स्तंभातून प्रकटलेला. इथल्या मूर्तीत दुंभगलेला स्तंभ, त्यातून बाहेर पडलेला नृसिंह हिरण्यकश्यपूवर हल्ला करताना दिसत आहे. शेजारी प्रल्हाद हात जोडून उभा आहे.

a

इथेच नृसिंहाने हिरण्यकश्यपूला पकडलेले दिसत आहे तो तो नृसिंहाच्या तावडीतून सुटण्याची खटपट करतो आहे. याच्याच बाजूला पुढे विदारण नृसिंहाची मूर्ती देखील आहे.

a

एका ठिकाणी कृष्णाने गोपिकांची वस्त्रे पळवल्याचा प्रसंग कोरलेला आहे.

a

धनुष्य हाती धारण केलेल्या एका वीरांगनेच्या पायातील काटा एक सेवक टोकरुन काढत असल्याचे शिल्प मला फार आवडले.

a

कल्याणमंडपाच्या बाजूलाच अजून एक मंडप आहे, तिथेही पुष्कळ शिल्पे आहेत. हा बहुधा नाट्यमंडप असावा, येथे बहुतांशी वादकांच्या आणि नर्तकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, याशिवाय नृसिंहावतार, कृष्णावताराचे विविध प्रसंग देखील येते कोरलेले आहेत. विस्तारभयास्तव सर्वच येथे देणे शक्य नाही.

a

विठ्ठल मंदिराला वळसा घालत आल्यावर मंदिर संकुलाचे विविध कोनातून उत्तम दर्शन होते.

a

तटबंदीयुक्त भिंत, विविध मंडप आणि खडकाळ टेकड्या

a

कल्याणमंडपाच्या समोरील बाजूचा हा मंडप, येथे देखील वाजणारे स्तंभ आहेत आणि ते वाजवून बघता देखील येतात.

a

ह्या मंडपातही प्रत्येक स्तंभांवर पुष्कळ शिल्पे कोरलेली आहेत.

a

ह्या मंडपातून विठ्ठल मंदिर संकुलाचे सुरेख दर्शन होते.

a

a

a

a

विठ्ठल मंदिर अगदी व्यवस्थित बघायला किमान तीन तास तरी हवेत. आम्ही जवळपास अडीच तास ह्या मंदिरात होतो तरीही एकूण एक मूर्ती पाहून झाल्या नाहीत. संपूर्ण हंपीच अद्भुत असले तरी निर्विवादपणे विठ्ठल मंदिर हेच विजयनगरचा मेरुमणी होय. संंध्याकाळचे ६ वाजत आले होते, उन्हाळ्याचे दिवस असल्याने अजूनही भरपूर उजेड होता तेव्हा विठ्ठल मंदिराच्या मागेच असलेली राजतुला बघून येण्याचे ठरवले.

राज तुला (King's Balance)

ही हंपीतील एक अद्भुत रचना. नदीकाठच्या रस्त्याने येताना दुमजली प्रवेशद्वारातूनच आत येताच ही रचना आपल्याला दिसते, तर विठ्ठ्ल मंदिराच्या मागच्या बाजूस ही रचना आहे. विजयनगरचे राजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा विशिष्ट प्रसंगी आपली तुला करायचे आणि आपल्या वजनाइतक्या भरलेल्या वस्तू दान करत असत. ही तुला सोनं, चांदी, मोती, माणकं अशा विविध वस्तूंनी होत असे. दोन कलाकुसर केलेले स्तंभ आणि त्यांना जोडलेली नक्षीदार तुळई अशी याची रचना. तुला अडकवण्यासाठी तुळईत असलेली छिद्रे आजही बघता येतात.

राज तुला

a

राज तुला

a

राज तुलेच्या एका स्तंभांच्या पायथ्याला कृष्णदेवरायाची त्याच्या दोन राण्यांसह असलेली मूर्ती कोरलेली आहे, हे ही एक अद्भुतच.

a

राज तुला, एक भग्न मंदिर आणि दुमजली प्रवेशद्वार

a

a

तिथे जवळच एक भग्न मंदिर आहे

a

दुमजली प्रवेशद्वार (Two Storied Gateway)

a

येथून जवळच एक देखणे विष्णूमंदिर आहे. त्याचे नाव उत्किर्णित विष्णू मंदिर, ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या भिंतीवर एक पालीचे शिल्प देखील कोरलेले आहे.

उत्किर्णित विष्णू मंदिर (Inscribed Vishnu Temple)

a

हे सर्व बघून होईतो साडेसहा पावणेसात वाजले होते, सूर्य मावळतीला झुकला होता, आता आम्ही परत निघालो आणि गोल्फ कार मधून आलेल्या रस्त्यानेच बग्गी पॉईंटला आलो. आणि तिथे पार्क केलेल्या आमच्या गाडीत बसून परत मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच कर्नाटक पर्यटन महामंडळाच्या मयुरा भुवनेश्वरी संकुलात आलो. हंपी पाहून संपले होते, आणि आता सकाळी उठून परत पुण्यात यायला निघायचे होते. सकाळी उठल्यावर तेथेच नाष्टा केला आणि साधारण नऊच्या सुमारास हंपी सोडले. आलेल्या मार्गानेच म्हणजे हंपी-होस्पेट-कोप्पळ-गदग-हुबळी-बेळगाव करत रात्री ८ च्या सुमारास पुण्यात परत आलो.

ही माझी दोन दिवसांची हंपी सफर, सर्वच हंपी ३/४ दिवसताही बघणे अशक्य आहे. हंपी हे काही एकच ठिकाण नाही तर ते एक प्राचीन वैभवशाली शहर आहे, ते बर्‍यापैकी बघण्यासाठी किमान पंधरा दिवस तरी हवेत. दोन दिवसात माझी विरुपाक्ष मंदिर, कृष्ण मंदिर, हजारराम मंदिर, विठ्ठल मंदिर ही मोठी मंदिरे, तर महानवमी डिब्बा, राणीवसा, राजवाड्यांचे अवषेश ही शाही केंद्रे बघून झाली, मात्र नदीकाठचे अवशेष, पट्टाभिराम मंदिर, मातंग टेकडी, अच्युतराय मंदिर, अनंतशयनगुढी मंदिर आदी कित्येक महत्वाची ठिकाणे राहिलीही आहेत. अर्थात हेच हंपीला परत येण्यासाठी निमित्त आहे. विजयनगरच्या ह्या भग्न शहरात आता अधिक दिवस काढूनच यावे लागणार. तोपर्यंत ह्या मालिकेला अर्धविराम.

समाप्त.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

29 Apr 2021 - 6:20 pm | चौकटराजा

नदी पलीकडेही अनेगोंडी , हनुमानहळळी ,सानापुर तलाव ,तुंगभद्रा डॅम ई ठिकाणे देखील पाहण्यासारखी आहेत ! पण आता तिकडे मिळणारी भाड्याच्या स्कूटर ची सोय
बंद झाली आहे . पण अलीकडे गाड्या भाड्याने मिळतात . पुढे लांबवर एक मोठा पूल आहे त्याने आता जावे लागणार त्या बाजूला !

अभिजीत अवलिया's picture

29 Apr 2021 - 6:56 pm | अभिजीत अवलिया

छान माहीती. राज तुलाचे फोटो दिसत नाहीत.

प्रचेतस's picture

29 Apr 2021 - 8:55 pm | प्रचेतस

आता दिसत आहेत का बघा बरं.

अभिजीत अवलिया's picture

29 Apr 2021 - 10:39 pm | अभिजीत अवलिया

हो.

हंपी सफरसाठी तीन चार दिवस लागतील हे खरे आहे.

Bhakti's picture

29 Apr 2021 - 10:02 pm | Bhakti

वाह !
सुंदर हंपी लेखमाला.खुपच आवडली.
व्याल शिल्प साकारताना शिल्पकारांची कल्पनाशक्ती अफाट आहे.विष्णू अवतार मूर्तीमध्ये विठ्ठल मूर्तीचा एक तळहात कमरेवर नसून समोर केलेला आहे ना?मलातरी असं दिसलं.
पैठणच्या नाथ मंदिरातील विठ्ठल मूर्तीप्रमाणे.

प्रचेतस's picture

29 Apr 2021 - 10:12 pm | प्रचेतस

हो, दोन्ही हस्तमुद्रा किंचित वेगळ्या आहेत. पैठणची मूर्ती मात्र पाहिली नाही अजून.

Bhakti's picture

13 May 2021 - 1:37 pm | Bhakti

असलेली पैठण विजयी पांडुरंग_/\_
Vitthala
मी स्वतः ७ वर्षांपूर्वी हा फोटो काढला होता.आज सोशल मिडियावर आठवण होती.

प्रचेतस's picture

13 May 2021 - 3:42 pm | प्रचेतस

शैली अगदी जशीच्या तशी आहे. एक हात उपडा आणि दुसऱ्या हातात करंडा किंवा शंख असे काहीतरी.

अद्भुतरम्य जागेचे अद्भुतरम्य वर्णन प्रचुच्या लेखणीतून. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट आणि छायाचित्रे नीट जोडून.

मजा आ गया. या ठिकाणी गेले पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2021 - 1:13 pm | चौथा कोनाडा

व्वा, अतिशय सुंदर लेखन ! प्रचि देखील अप्रतिम.
दगडी रथाचे सर्व बाजूनी फोटो पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. त्यातला ब्लॅक-व्हाईट फोटो तर अप्रतिमच ! बैल आणि हत्तीचे जोडशिल्प- सुंदरच !
विष्णु दशावतार, उत्किर्णित विष्णू मंदिर हे खूपच आवडले !
धागा वाचताना रमून गेलो, वेळ कसा गेला ते कळले नाही !

प्रचेतस _/\_

सिरुसेरि's picture

30 Apr 2021 - 1:21 pm | सिरुसेरि

सुंदर फोटो आणी माहितीपुर्ण लेखन .

बंद ठेवली होती. तिथून जवळूनच जातात पण कुणी आत जात नाहीत.
उत्कीर्णचा आणि वराहचा बाहेरचा भाग शिल्पेरहीत भींत आहे.
पहिल्यावर पाल आणि दुसऱ्याच्या देवडीत वराह आहे.

प्रचेतस's picture

1 May 2021 - 10:48 am | प्रचेतस

उत्कीर्ण विष्णू मंदिर तसे आडबाजूला असल्याने तसे बंदच असते. विठ्ठल मंदिरात जाणाऱ्यापैकी १ टक्का मंडळी देखील येथे येत नसावीत.

गोरगावलेकर's picture

30 Apr 2021 - 2:13 pm | गोरगावलेकर

गेल्या ३-४ महिन्यात दोन्ही मुली वेगवेगळ्या वेळी हंपीला जाऊन आल्या. त्यामुळे येथील बरेच फोटो पाहावयास मिळाले होते.
परंतु फोटो व त्यातील बारकावे समजावून सांगण्याची आपली हातोटी विशेष आवडली.

सतिश गावडे's picture

1 May 2021 - 11:15 am | सतिश गावडे

काय लिहीलं आहे राव. फोटोही अतिशय सुंदर आहेत. आपण जाऊया इथे पुढे कधीतरी.

कंजूस's picture

1 May 2021 - 11:30 am | कंजूस

वल्लीच्या या ट्रिपमध्ये नव्हता तुम्ही?

गॉडजिला's picture

1 May 2021 - 12:58 pm | गॉडजिला

यं रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा |
नू चित्स दभ्यते जनः ||

आ त्वा विशन्त्वाशवः सोमास इन्द्र गिर्वणः |
शं ते सन्तु प्रचेतसे ||

प्रचेतस's picture

1 May 2021 - 4:44 pm | प्रचेतस

:)

भीमराव's picture

1 May 2021 - 1:22 pm | भीमराव

आता इतक्या वर्षांनी तिथं मंदिर आहे म्हटल्यावर अजून मुर्ती का बसवत नसतील?

चौथा कोनाडा's picture

1 May 2021 - 1:31 pm | चौथा कोनाडा

कश्याकरता बसवायची मुर्ती ? आधीच मूर्ती / पुतळ्यामुळे होणारे गोंधळ कमी आहेत का ?
तेथील लोक आणि आपण पर्यटक विनामुर्ती जगतोय ते काय वाईट आहे ?

भीमराव's picture

2 May 2021 - 11:25 am | भीमराव

ज्या कारणासाठी बांधणार माणसानं देऊळ बांधले होते, त्या च कारणासाठी मुर्ती बसवायची. किमान देऊळ बांधणाऱ्याच्या श्रद्धेची आठवण म्हणून तरी.

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 5:40 pm | चौथा कोनाडा

युक्तिवाद ठीक आहे, पण मुर्ती हवीच असा आग्रह धरणे माझ्या मते आवश्यक नाही !

प्रचेतस's picture

1 May 2021 - 4:47 pm | प्रचेतस

हंपी हे उध्वस्त शहर आहे. इथल्या बहुतांश देवळातल्या पूजेच्या मूर्ती नष्ट केलेल्या आहेत, आणि नंतरही त्यांची स्थापना करण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. सध्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने इतर कुणीही स्थापना करू शकत नसावेत.

कंजूस's picture

1 May 2021 - 6:44 pm | कंजूस

सहा फुटी भग्न मारुती आहे. वरचे छत कोसळू नये म्हणून दंड लावलेत. तो फोटो आहे माझ्याकडे.

सामान्य पर्यटक
१)विरुपाक्ष मंदिरामागची नदी ( तुंगभद्रा),सकाळी हत्तीची आंघोळ असते. मज्जा.
२) महानवमि डिब्बाचा चौथरा,
३) राणीचे स्नानागार पाहतात
आणि कटतात.
शाळेच्या सहली येतात तेव्हा इथे रांगेने नेतात आणि बसमध्ये बसवून परत जातात. झाली हंपी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 May 2021 - 2:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

नेटाने पूर्ण केलेली फोटोयुक्त दिमाखदार लेखमाला अतिशय आवडली

पैजारबुवा,

अप्रतिम शिल्पे आणि कोरीवकाम.
मस्त झाली हंपी सफर.
माझा हंपीला जायचा बेत रद्द दोनदा करावा लागला. कधी मुहूर्त लागणार के माहीत.
लेखमाला पूर्ण केल्याबद्दल आभार.
पुलेशु

चांदणे संदीप's picture

2 May 2021 - 8:16 pm | चांदणे संदीप

सर्व प्रकाशचित्रे आणि लेखन कहर आहे. इतके सविस्तर समजून घ्यायला पुन्हा जायला हवेच.

सं - दी - प

प्रचेतस's picture

3 May 2021 - 3:39 pm | प्रचेतस

सर्वांचे धन्यवाद. :)

वल्ली उर्फ प्रचेतस आम्हाला या ठिकाणी जाता येणे झाले नसले तरी तुझ्यामुळे हा अमुल्य वारसा पहायला मिळत आहे. माहिती आणि फोटो नेहमी प्रमाणेच उ त्त म !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2021 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतसर, आपल्या लेखनामुळेच दगडात असलेल्या शिल्प,लेण्यांची ओळख झाली. आपल्यामु़ळेच शिल्पांमागील इतिहास, आणि असलेल्या कथांचा उलगडा करणे, इतिहास सांगणे, लिहीणे यामुळे एक वाचक म्हणून मलाही आपल्यामुळे गोडी लागली. आपल्या लेखनप्रवासातला हंपीतला भाग असाच आवडला. अतिशय सुंदर अशी गतवैभवाची साक्ष देणारी भग्नावस्थेतील उभा तो विठ्ठला बाजार, ती राजतुला, अहाहा ! क्या बात. गोपुरावरील शिल्पांकन आवडलं. काय रेखीव शिल्प आहेत कलाकारांना दाद दिली पाहिजे. बटबटीत डोळ्यांचा तो व्याल, तो सुंदर रथ, विठ्ठल मूर्ती. वीरांगनेच्या पायातील काटा टोकरुन काढणा-या सेवकाचं शिल्प मलाही लैच आवडले. च्यायला रथाला पूर्वी घोडे जोडलेले होते हे तुमच्यामुळेच कळले नाय तर आम्ही आपले हत्तीचाच रथ समजला असतो. आता ती घोड्याची शेपूट शोधण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे, म्हणून आम्हालाही तो पत्ता लागला. सर्वच छायाचित्र आणि लेखन अप्रतिम. खुप आवडले.

कधीकाळी सुवर्णनगरीच असलेल्या परिसराचा काय भव्य इतिहास असेल असे सर्व अप्रतिम छायाचित्र पाहून वाटले. आणि आता केवळ भग्नावशेष. आपल्यामुळे एक उत्तम सफर आस्वादता आली. अशाच वेगवेगळ्या ठिकाणांची अशीच ओळख करुन देत राहा. पुढील भाग कोणता असेल त्या लेखनासाठी आत्ताच शुभेच्छा देऊन ठेवतो.
पुलेश.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

6 May 2021 - 7:23 pm | प्रचेतस

__/\__
धन्यवाद सर.

कंजूस's picture

6 May 2021 - 8:18 pm | कंजूस

नुनीझ किंवा पाईश यांची पुस्तके वाचून त्यातील नेमके कामाचे समर्पक संदर्भ इथे मराठीमध्ये दिल्याने काम सोपं झालं. कोणता गाईड हे सांगणारे?

तर लवकरात लवकर भारतदर्शन घडून नवनवीन लेखमाला सुरू व्हाव्यात.

स्मिता.'s picture

6 May 2021 - 9:53 pm | स्मिता.

तुमचे लेख बघून आणि वाचून एक वेगळाच आनंद मिळतो. ज्या गोष्टी आमच्या अल्पमती डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही आणी दिसल्या तरी उमगत नाहीत त्या खूप छान समजावून देता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2021 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वीरांगनेच्या पायातील काटा एक सेवक टोकरुन काढत असल्याचे जे शिल्प आहे ते खासच आहे, आता ती विरांगना आहे ते ठीक. पण प्रेयसीच्या पायातला काटा काढणारा तो प्रियकर वाटला. खरं म्हणजे त्या योध्याबरोबर तीही सोबत चालत असेल आणि तिच्या पायात काटा टोचला आणि तो काढेपर्यंत आपला बाण त्याने त्या सखेकडे दिला असेल अशी कल्पना येऊन गेली.

काल जेव्हा हे शिल्प पाहात होतो तेव्हा मला प्रेमरोग चित्रपटाच्या पोष्टरची आठवण आली. पोष्टरवर नायीकेच्या पायात रुतलेला काटा नायक काढतो असे एक पोष्टर (दुवा ) होते. माझ्या लहानपणी सिनेमाच्या जाहीराती हातगाडीवर एकमेकाला एक फळ्या उभ्या करुन पोष्टर चिपकावून फिरवायचे त्यावर हे चित्र होते त्याची आठवण झाली.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 May 2021 - 6:45 pm | प्रचेतस

:)

खतरा आहे ते पोस्टर.

Bhakti's picture

7 May 2021 - 9:49 pm | Bhakti

राज कपूर यांनी भारीच copy paste केलंय.
+१ पोस्टर.

कुणी पाहिला काय? आणि त्याचा उद्देश मनोरंजनाशिवाय हंपी दाखवणे होता काय?
अधुनमधून झीमराठी टॉकीज/ झी युवावर टिवीवर दाखवत असतात. आजही आहेच.

चौकटराजा's picture

7 May 2021 - 4:38 pm | चौकटराजा

मी पाहिला आहे पण तो इतका भंगार आहे की तो कधी आला व गेला हे कळले नाही. हंपीला भव्य पणा आहे पण कथा फुसकी असेल तर हंपी तरी काय करणार ? मी हंपी व ओरछा यांना सारखेच गुण देईन . दोन्ही गाजलेल्या राजवटी ,दोन्हीला सुंदर नदी ( तुंगभद्रा व बेटवा ) यांचे सानिध्य ,दोन्हीला तटबंदी,,दोन्ही निसर्गरम्य ! मात्र दोन्हीचे वास्तू वैभव एकदम वेगळे त्याबाबतीत ओरछा जरा उजवे आहे ! कदाचित हंपीतील बर्याचशा वास्तू भग्न झाल्या नसत्या तर माझे मत काहीसे वेगळे झाले असते ! आता सरकारने हंपीला टुरिझमच्या सोयी ,रस्ते वगैरेंवर खूप खर्च करायचे ठरवले आहे अशी बातमी आहे ! भारतातील माणूस सुधारत नसला तरी भारत-भू सुधारते आहे हे नक्की !

हंपीचं त्यातलं शूटिंग चांगलं आहे पण सिनेमा रटाळ आहे खूप.

हा उद्देश असेल तर सिआइडी मालिका अफलातून आहे. धावपळ दाखवताना संपूर्ण ठिकाण दाखवतात. जोडीला करमणूक असतेच.

चौथा कोनाडा's picture

7 May 2021 - 5:47 pm | चौथा कोनाडा

तमाशा सिनेमात पुर्वार्धात फ्रान्स जवळील कोर्सिका बेटाचं स्थलदर्शन होतं.
मटरगश्ती गाणं
💖

पुर्वार्ध चांगलाच जमलाय.

सुरिया's picture

13 May 2021 - 11:11 pm | सुरिया

आवडला कानडाऊ विठ्ठल.

जगप्रवासी's picture

18 May 2021 - 6:08 pm | जगप्रवासी

पण स्तंभाच्या पायथ्याला कृष्णदेवराय व त्यांच्या राण्या कोरलेल्या कोणी पहिल्या असतील? सर तुम्ही त्या दगडांना/ मूर्तींना बोलके करता. तुमच्यामुळे मलाही सवय लागली आहे की कुठेही गेलो आणि असं काही कोरीव काम दिसलं की त्यातले बारकावे शोधणं आणि संदर्भ लावणं सुरु होतं. तुस्सी ग्रेट हो सर. जाम मजा आली हि पूर्ण मालिका वाचायला.

अवांतर : मला ना तुमचं प्रचेतस पेक्षा वल्लीच नाव आवडतं.

प्रचेतस's picture

19 May 2021 - 6:07 am | प्रचेतस

धन्यवाद.
पण सर नका म्हणू हो, नुसतं प्रचेतस किंवा वल्ली म्हणा :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2021 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस पेक्षा वल्लीच नाव आवडतं.

मला सुद्धा. वल्ली हेच नाव आवडतं. एकदा प्रत्यक्ष भेटीतही त्यांना हेच सांगितलं आहे.
वल्ली आयडी पूर्ववत करण्याचा विचार व्हावा.

-दिलीप बिरुटे

बरेचदा वाचतेय की मित्र म्हणतात वल्ली नावच चांगलं,पण प्रचेतस नाव तुमच्या पुरातन लिखाणाला साजेसे वाटते.वल्ली आणि प्रचेतस या दोन्ही नावांचा विस्तार जमल्यास नक्की सांगा.

कंजूस's picture

30 May 2021 - 6:48 pm | कंजूस

करावे?
म्हणजे की मधल्या काळात झालेला बदल कुणाला माहीत नसल्यास टुब पेटेल.

सर टोबी's picture

30 May 2021 - 7:51 pm | सर टोबी

सकाळ या वृत्तपत्राने बाकी काही नाही तरी बऱ्याच मोठ्या मराठी भाषा असणाऱ्या वर्गाला एक लिहिण्याची सर्वसाधारण भाषा दिली. निदान लिहीतानातरी कुणी भाजीची पेंडी लिहीत नाही तर भाजीची जुडी असा शब्दप्रयोग करते. बांधकाम फोडल्यामुळे तयार होणारे दगड-धोंडे याला राडारोडा म्हटले जाते. पाणी आणि वीज पुरवठा अगदी ठप्प झाला तरी त्याचा विस्कळीत असा उल्लेख होतो. जे लोकं तो त्रास प्रत्यक्ष सहन करतात त्यांचा कसा तिळपापड होत असेल याची कल्पना करा. कारण विस्कळीत म्हणजे पाण्याची बारीक धार येते किंवा घरात दिवे अंमळ मंद प्रकाश देत आहेत असे नजरे समोर येते.

अशा या सकाळची अजून एक देणगी म्हणजे घरोघरी तयार झालेले व्युत्पत्तिकार. म्हणजे लोकं किरकोळीत अमका तमका शब्द हा कसा अपभ्रंश आहे याचा उहापोह वाचकांच्या पत्रव्यवहारात करीत असत. अशा या भाषा प्रभूंनी बऱ्याच वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड या दोन शहरांचे एकत्रित नामकरण करावे या विषयावर वाचकांच्या पत्रव्यवहारात खल केला होता. त्यात एका गृहस्थांनी जे नाव सुचविले ते आठवणीत अगदी कोरले गेले. त्यांनी सुचविले कि दोन शहरांना 'पिंचवड' असे नाव द्यावे. त्या प्रसंगाची आत्ता आठवण झाली.

जाता जाता: नादी लागायचे नाही हा शब्दप्रयोग टिकून आहे हि जरा समाधानाची बाब आहे. नाहीतर लोककलेवर आधारित जाम लोकप्रिय कार्यक्रम आहे "अमकी तमकीचा नाद करायचा नाही" त्याचे नाव झाले असते "अमकी तमकीच्या कच्छपी लागायचे नाही".

आयडीनावाचा उगम तसा विशेष नाही.

मिपावर यायच्या वेळी मी माझ्या खऱ्या नावानेच रजिस्टर केलं होतं पण तो आयडी काही तेव्हा मंजूर झाला नाही, नंतर परत रजिस्टर करताना सुचलं ते सदस्यनाव टाकलं ते वल्ली होतं जे लगेच मंजूर झालं आणि मिपावर प्रवेश झाला. मात्र मला ते सदस्यनाम आवडत नव्हते. कालांतरानं थोडा बदल हवा म्हणून प्रचेतस, स्ट्रायडर अजून एक दोन नावं ठरवली होती त्यातलं प्रचेतस (वरुणाचे एक नाव) जास्त आवडलं म्हणून मालकांकडून हे नाव बदलून घेतलं.

सुंदर लेखमाला, सुंदर चित्रे - नेहमीप्रमाणेच !

तुमचे लेखन नुसते वरवरचे नाही आणि बोजड माहितीछापही नाही - फार आवडले. हंपीचा योग बहुदा कुंडलीत नाही माझ्या त्यामुळे दुधाची तहान या लेखमालेवर :-)

हंपी-बदामीच नाही तर आग्रा-दिल्ली-अलाहाबाद, होशंगाबाद, तिकडे बंगालातले मुर्शिदाबाद, सिंध प्रांतातले थट्टा - मोहन्जोदरो, .. सगळ्या जागांचे वैभव नष्ट होण्याच्या आत स्वतःच्या डोळ्याने बघावे -अनुभवावे असा प्रबळ विचार देणारे लेखन.

अनेक अनेक आभार प्रचेतस !

प्रचेतस's picture

30 May 2021 - 7:18 pm | प्रचेतस

धन्यवाद अनिंद्य.
हंपी अवश्य बघाच. केवळ अद्भुत.

टर्मीनेटर's picture

11 Jul 2021 - 12:11 pm | टर्मीनेटर

खूप सुंदर झाली लेखमाला!
हा शेवटचा भाग वाचायचा राहून गेला होता. फोटो आणि वर्णन सुरेख आहे. हंपी गेल्या ४-५ वर्षांपासून आकर्षित करत आहे पण आत्तापर्यंत २ वेळा तिने हुलकावणी देऊन झाली आहे. नादमय स्तंभ आणि दगडी गरुडरथ ही माझ्यासाठी विशेष आकर्षणे आहेत.
अर्थात २ वेळा रद्द कराव्या लागलेल्या हंपी भेटीमागे कदाचित तिथे एकट्याने आणि तेही किमान १०-१२ दिवसांसाठी जाण्याचा योग नशिबात असावा असे आता मनोमन वाटू लागले आहे.

ह्या सुंदर आणि माहितीपूर्ण लेखमाले साठी खूप खूप आभार 🙏

जाता जाता : एक मिपाकर मैत्रीण डिसेंबर महिन्यात (दुष्टपणे) एकटीच हंपीला जाऊन आली आहे, तिच्याही हंपी वरील मालिकेची वाट बघतोय परंतु तुमची एवढी सुंदर मालिका अगोदरच इथे असताना परत त्या स्थळाबद्दल कशाला लिहायचे असे सांगून ती टाळाटाळ करत आहे 😀

प्रचेतस's picture

11 Jul 2021 - 5:13 pm | प्रचेतस

धन्यवाद.
त्यांनी नक्कीच लिहावे . हंपीवर कितीही आणि कितीदा लिहिले तरी तेही कमीच इतके वैविध्य आहे तिथे.

कंजूस's picture

11 Jul 2021 - 2:10 pm | कंजूस

म्हणजे की पाहिलं म्हणण्यापेक्षा 'केलं' हेच बरोबर आहे. ही रेंगाळायची जागा आहे. पण नेटवरच्या माहितीप्रमाणे जाऊ नये. ते भलत्याच ठिकांणांची ( हंपीतल्या) भलामण करत राहतात.
मूळ हेतू एखाद्या हॉटेलचं प्रमोशन.
नादमय स्तंभ आणि दगडी गरुडरथ ही माझ्यासाठी विशेष आकर्षणे आहेत.
गरुडरथ बरोबर. पण इथले नादमय स्तंभ चांगले नाहीत. त्यासाठी कन्याकुमारीजवळचे सुचिंद्रम आहे. भरपूर वाजवा.
वाजवता आले नाहीत तर तिथले कर्मचारी/ सेवेकरीच वाजवून दाखवतात.
मला होस्पेट शहरातच राहायला आवडलं. कारण संध्याकाळी , रात्री पाय मोकळे करायला मिळतात.

विठ्ठल मंदिरातील मुख्य स्तंभ वाजवायला २० वर्षापासूनच बंदी आहे, आता तिकडे ने वाजवता येतात ते उपमंडपातील आहेत, मुख्य मंडपातले खूपच भारी वाजतात असे म्हणतात.

टर्मीनेटर's picture

11 Jul 2021 - 2:41 pm | टर्मीनेटर

@ कंजूस काका चांगल्या टिप्स..
माझाही हॉस्पेटलाच राहण्याचा विचार आहे. एवढ्या लांब एकट्याने ड्राइव्ह करत जाण्यापेक्षा आता होस्पेट पर्यंत ट्रेन / बसने जाऊन तिथे बाईक भाड्याने मिळतात असे ऐकले / वाचले असल्याने बाईकवर स्थानिक भटकंती करायचा विचार आहे.

कन्याकुमारी खूप वर्षांपूर्वी केले होते, आता आठवत नसल्याने, पुन्हा करावे लागणार आता!

प्रचेतस's picture

11 Jul 2021 - 5:17 pm | प्रचेतस

सोलो जाणार असाल तर हंपी होम स्टे मध्येच राहणे सर्वात उत्तम. तुम्ही अगदी कोअर हंपीत राहता. बाईकची गरज फक्त कांपिली आणि आनेगुंदीला जायचे असेल तरच, हंपीच्या ऐन गाभ्यात राहण्यासारखे सुख नाही कुठेच.

अरे वाह, ही माहिती फारच उपयुक्त!
तसे करणे संपूर्ण हंपी पाहण्याच्या दृष्टीने बरे पडेल.
मगाशी येत्या १६ तारखेचे रिजर्वेशन मिळतंय का ते बघायला IRCTC वर गेलो, पण सध्या मुंबई - हॉस्पेट रूट वर (कोविड कारणे) थेट ट्रेन्स चालू नसल्याचा मेसेज आला...
आता ऑगस्ट - सप्टेंबर मधे तरी चालू होतात का त्याची वाट बघावी लागेल.

कंजूस's picture

11 Jul 2021 - 10:31 pm | कंजूस

माथेरान ओके. पण आवडत असेल तर.

असण्याचं कारण म्हणजे मी एकटा गेलोय आणि नंतर कुटंबासह ( पण आमचेच. ग्रुप नाही.) तर अशावेळी शहरच बरे पडते आणि आवडते. बोलायला कुणी सापडते. हालचाल लवकर सुरू होते.
बदामिलाही बस डेपो जवळ राहिलो. बस विचारून येण्यास, पहाटे उठल्यावर चहा मारून येण्यास बरे पडते. लेण्यांच्या जवळही गाववस्ती आहे आणि तिथे कर्नाटक सरकारचे केटिडिसि मयुरा आहे. पण सकाळी थंडाथंडाकूलकूल. चहा लवकर मिळत नाही. टपऱ्या लवकर उघडत नाही.

कंजूस's picture

11 Jul 2021 - 5:26 pm | कंजूस

उत्तम. तुंगभद्रा धरण, बाग, ते लखुंडी जाऊन परत येण्यासाठी प्रथम वापरा. कारण लखुंडीला (४० किमी ) जाऊन तेरा देवळं पटकन पाहता येतील. एक किमी परिसरांत सर्व आहेत.

होस्पेट ते हंपि ११ किमी. तिथे बाजार ते विठ्ठल देऊळ हे दोन किमी अंतर नदीकाठून पायीच जावे लागते . ते चुकवून भागणार नाही.

तुंगभद्रा धरणाअगोदर एक फाटा अनेगुंडीकडे जातो - -अनेगुंडी --नदी ओलांडून --इकडे --विठ्ठलमंदिराच्या कार पार्किंग कडे --तिकडून कमलापूर म्हणजे परत हंपीत ही राउंड ट्रिप वीसेक +किमीची फक्त बाईकनेच घडू शकते. बस सर्विस अजिबात नाही. आणि गाईड- रिक्षावाले येणारही नाहीत. असल्या टुअरमध्ये त्यांना कमाई नसते.

डिसेंबर जानेवारीत कधीतरी हंपी उत्सव होतो त्या तारखा साईटवर पाहून तेव्हा अजिबात जाऊ नका.

सुर्योदय/ सूर्यास्त पाहणे यासाठीही वापरता येईल दोन दिवस बाईक घेतल्यास. (कुठे ते नेटवर समजेल.)

अस्वल अभयारण्य पाहण्यासाठीही जाता येईल.

एकटाच गेलो तर हे सर्वच पाहणे सहजशक्य होईल, तुम्ही दिलेली ही माहितीही उपयुक्त आहे. आता रेल्वेसेवा पूर्ववत होण्याची वाट पाहायला लागणार आहे! १०-१२ दिवस हातात ठेऊन जाणेच श्रेयस्कर राहील हे नक्की 😀

कंजूस's picture

11 Jul 2021 - 10:39 pm | कंजूस

बिजापूर २,दिवस
बदामी २,दिवस
हंपी ३(लखुंडी धरून)दिवस
हंपी ( होस्पेट 08:00) ते मडगाव 14:00 रेल्वे आहे. दूधसागर धबधबा दिसतो.

सर्व देवळेच असल्याने अधिक काळ कंटाळवाणे होईल. इतर गमती काही नाहीत.