सामान्य माणूस काय करु शकतो?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 Mar 2021 - 7:58 pm
गाभा: 

मित्रहो आपण बर्‍याचदा समाज माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा करतो. काहीवेळा या चर्चा समाजात घडणार्‍या काही चुकीच्या किंवा दांडगाईने केल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल असतात. गुंडांनी, राजकारण्यांनी कायदे धाब्यावर बसवून केलेली मनमानी असो किंवा धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर सार्वजनिक वाहतूकीला अडथळे आणणारी वास्तू बांधणे किंवा कर्णकर्कश्य संगीत लावून मिरवणूका काढणे किंवा विशिष्ट समाजाने आपण अल्पसंख्यक किंवा अन्यायग्रस्त असल्याचा आणि त्याद्वारे राजकारण्यांना एकगठ्ठा मतदान करुन त्याबदल्यात सार्वजनिक जीवनात मनमानी करणे, गैरफायदे घेणे , समाजाचे धार्मिकस्थान बांधणे, पैसे वाटून धर्मांतर करणे किंवा काहीवेळा मोठी लोकसंख्या असणार्‍या समाजगटांनी संख्याबळावर राजकारण्यांना वेठीस धरुन स्वत:च्या फायद्याच्या योजना पदरात पाडून घेणे, रस्त्यात धनदांडग्याची महागडी गाडी तुमच्या साध्या कारला,बाईकला धडकली तर काहीवेळा तुम्हीच कसे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत होता याबद्दल वाद घालून नुकसानभरपाई न देता तो धनदांडगा चक्क सुटूही शकतो. पळूनही जाऊ शकतो. किंवा अगदी कामाच्या ठिकाणीही मॅनजमेंटकडून एखाद्या निरपराध्यावर अन्याय होऊ शकतो. राजकारणी,वकील,पोलिस आणि ऑफिसचे मॅनेजमेंट यांचे चक्क साटेलोटेही असू शकते. नियम धाब्यावर बसवून तुम्हाला निरोपही दिला जाऊ शकतो, पगार अडवला जाऊ शकतो, कपात केली जाऊ शकते, बालंट आणले जाऊ शकते. अगदी काहीही होऊ शकते.

असे एक ना अनेक अन्याय आपण पाहतो,अनुभवतो. हे सहन न होऊन समाजमाध्यमांवर त्याबद्दल रागही व्यक्त करतो. पण जे चुकीचे घडायचे ते घडतच राहते. परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिघडते. किंबहूना सामान्य लोक जास्तीतजास्त काय करु शकतात,किती उपद्रव करु शकतात याचा राजकारणी, गुंड, मवाली, दांडगेश्वर,लुटारु यांचा अभ्यास अजूनच पक्का होतो,नेमका होतो. पोलिसांची मदत घ्यावी तर तिथेही न्याय मिळेलच तोसुद्धा पदरचा एक पैसाही खर्च न करता याची शक्यता तशी कमीच. साधा मोबाईल फोन हरवल्याची पोलिसात तक्रार केली तर शोधण्यासाठी फोनच्या किंमतीइतके पैसे मागण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिस दरवेळी अन्यायच करतात असे नाही पण बहुतांश वेळा भरपूर शारिरीक,मानसिक,आर्थिक ताप होऊन, भरपूर कालापव्यय करुन मिळालेला न्याय हा न्याय कसा म्हणावा?

या सगळ्यात त्रास हा फक्त आणि फक्त सामान्य माणसालाच होतो. सोमिवरची अोरड सोमिवरच राहते. "कुठे या गुंड,राजकारण्यांच्या,धनदांडग्यांच्या नादाला लागता?" आपण कुटूंबवत्सल माणसे. उगाच यांना जाब विचारुन किंवा विरोध दर्शवून कशाला आपल्याच पायावर कुर्‍हाड मारुन घ्यायची असा विचार होतो. अर्थात यात चुकीचे काहीच नाही. आपण जरी अन्यायाला विरोध करणारे असू आणि त्यासाठी खस्ता खायची तयारी असली तरी यात आपले कुटूंबिय भरडले जाऊ शकतात. त्याची भिती वावगी नाहीच.

पण मग या अन्यायांवर काही असे उपाय असू शकतात का की ज्यामुळे राजकारण्यांना, गुंड-मवाल्यांना, समाजसंख्येच्या जोरावर दादागिरी करणार्‍यांना यात शिरकाव करता येणार नाही, झुंडशाही माजवता येणार नाही असा काही मार्ग असू शकतो का? इथे कोणी असा फारसा मानसिक ताप न होता किंवा शारिरीक इजा न होता सार्वजनिक जीवनातल्या अन्यायाविरोधात छोटा/मोठा लढा दिला आहे का? काय अनुभव होता? कमीतकमी त्रास होऊन असे अन्याय दूर करण्याचे काय उपाय/मार्ग असू शकतात?

अन्यथा हे असेच मागील पानावरुन पुढे जात राहील. अन्याय पाहणे किंवा अनुभवणे त्यातून मार खाणे किंवा नुकसान सोसणे आणि त्याबद्दल समाजमाध्यमांवर खंत व्यक्त करणे हे चक्र असेच फिरत राहील. यातून साध्य काहीच होणार नाही. ते कमीतकमी त्रासात साध्य होण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होऊ शकते. नवे मार्ग सापडू शकतात.

प्रतिक्रिया

कधी विरोध करायचा आणि कधी माघार घ्यायची ह्याचे उत्तम समज ज्याला असते तो गंभीर संकटात सापडत नाही.
अन्याय सहन करणे चूक च आहे त्या सहन करण्या मुळे अन्याय करणाऱ्या लोकांची हिम्मत वाढते.
पण अन्यायाचा प्रतिकार का भावनेच्या आहारी जावून न करता योग्य वेळ येण्याची वाट बघणे आणि तशी वेळ मिळाली की हिशोब चुकता करणे हा उत्तम मार्ग झाला.
पण त्या साठी प्रचंड सहनशीलता लागते.
पण विजय हमखास मिळतो.

पण अन्यायाचा प्रतिकार का भावनेच्या आहारी जावून न करता योग्य वेळ येण्याची वाट बघणे आणि तशी वेळ मिळाली की हिशोब चुकता करणे हा उत्तम मार्ग झाला.
पण त्या साठी प्रचंड सहनशीलता लागते.
पण विजय हमखास मिळतो...
बरोबर ..पण सहनशील असण्यापेक्षा कृतीशील असावं..त्रास होईल,पण अन्याय सहन नाही केला हा आनंद असेल.

लोकशाहीची एक चांगली गोष्ट म्हणजे लोकांची जितकी सहन करण्याची लायकी आहे तितकाच अन्याय ह्या लोकांवर केला जातो. आज विविध ठिकाणी आपल्याच देशांत भारतीयांना गुलाम किंवा जनावरां प्रमाणे जी वागणूक मिळत आहे त्याचे मूळ कारण म्हणजे तसलीच वागणूक ह्या लोकांना इंडिरेक्टली हवी आहे. तुमच्या गल्लीत जो गुंड आहे तो खरे तर पूर्णपणे बिनमहत्वाचा आहे. त्याला तुम्ही उद्या गोळी घालून मारले तर त्याच्याजागी दुसरा उपटसुम्भ निर्माण होईल. समस्या त्या गुंडांची नसून त्या गुंडाला अभयदान देणाऱ्या नेता मंडळींची आहे. एके काली मुंबईत कामगार चळवळी होत्या, दर चौथ्या दिवसाला संप होता, कामगारांचे पगार कमी आणि सर्वत्र गुंडगिरी जास्त होती. काळाच्या ओघांत हि गुंड मंडळी गायब झाली कारण त्या प्रकारची कामे गायब झाली. आधुनिक कॉर्पोरेट जगांतील गुंड काळे सूट घालून फाड फाड इंग्रजी बोलतात. ह्यांना लॉयर म्हटले जाते.

भारतीय लोकांना सरकारी बाबू, पोलीस मंडळी, नेते मंडळी ह्यांना प्रचंड सत्ता द्यावीशी वाटते. कोणी काय खावे आणि कुठल्या दिवीअशी कोणी कसले कपडे घालावेत ह्या सर्व विषयांवर सरकारी लांडग्यांनी निर्णय घ्यावेत असे भारतीय जनतेला सामान्य पणे वाटते. त्यामुळे जेंव्हा सरकार निर्णय घेते तेंव्हा कुणीही ब्र काढून सुद्धा त्याला विरोध करत नाही . उलट विविध प्रकारचे अंधभक्त ह्याला समर्थन करत राहतात. शेवटी ज्या सापाला तुम्ही दूध पाजत आहात तो मोठा होत जातो आणि नंतर एक दिवस आपल्या ढुंगणाला चावतो. तेंव्हा ओरडून फायदा नाही.

जेव्हा नेतेमंडळी आणि बाबू मंडळी ह्यांच्या हाती आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण करण्याची शक्ती येते तेंव्हा ह्या मंडळींना प्रचंड पावर मिळते ज्याद्वारे ते रातोरात गब्बर होऊ शकतात. मग लोभी आणि हव्यासी दुर्जन ह्या दोन्ही क्षेत्रांत घुसू लागतात आणि त्यांच्या आशीर्वादाने वाईटप्रवृत्ती वाढत जातात. समाजांत गुंडगिरी असण्याचे मूळ कारण शेवटी त्यांना असणारे सरकारी संरक्षण.

चांगले उदाहरण म्हणजे गोव्यांत दारूशी निगडित जवळ जवळ सर्व व्यवहार १००% कायदेशीर आहेत. दारूशी निगडित गैरप्रकार किंवा गुंडगिरी जवळ जवळ शून्य आहे. जे काही आहेत ते कर्नाटक आणि महाराष्ट्रांत दारू स्मगल करण्यासाठी आहेत. ह्या उलट महाराष्ट्रांतील स्थिती आहे. दारू सरकार नियंत्रित करत असल्याने तिथे प्रचंड भ्रष्टाचार, दारूचे ठेके चालवणारे शेकडो गावगुंड, अनधिकृत पण पोलिसांचा आशीर्वाद असणारे गुंड बरेच सोकाळले आहेत. त्याशिवाय मराठी ग्राहकाला निकृष्ट दर्जाची दारू प्रचंड पैसे देऊन मोजावी लागते हा भाग अलाहिदा. महाराष्ट्र पोलिसांचे बरेच रिसोर्सेस दारू शी निगडित गोष्टींवर खर्च केले जातात त्यामुळे इतर महत्वाच्या गुन्हांना द्यायला वेळ मिळत नाही. सरकारी आश्रयाने चालविल्या जाणाऱ्या दारूच्या ठेक्यांचे आणि त्यांच्या मक्तेदारीचे करदात्याच्या पैशानी रक्षण केले जाते. आणि वरून आव आणला जातो कि हे सर्व काही मराठी जनतेच्या भल्यासाठी केले जाते.

महाराष्ट्र सरकारच्या दारूविषयक धोरणाला सामान्य मराठी माणसाचा बराच पाठिंबा आहे. जे लोक स्वतः दारू पीत नाहीत अशी मंडळी दारूला सरकारने आणखीन नियंत्रित करायला पाहिजे ह्या मताची असतात. जे लोक स्वतः रिक्षा चालवत नाहीत त्यांना सरकारने रिक्षा भाडे आणखीन कमी केलेले हवे असते. जे लोक स्वतः फार्मसी चालवत नाहीत त्यांना औषधांचे दार सरकारने बळजबरीने कमी केलेले हवे असतात. सरकारच्या शक्तीला मर्यादा असावी असे कुणालाहि वाटत नाही. त्यामुळे सरकारी पसारा आणि त्यांची लुडबुड वाढत जाते. शेवटी जिथे सरकारी लुडबुड जास्त तिथे गुंडगिरी जास्त.

तुम्हाला तुमच्या समाजांत गुंडगिरी कमी हवी असेल तर प्रत्येक ठिकाणी होणारी सरकारी लुडबुड थांबवा आणि विरोध करा. प्रत्येकाला त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य असायला पाहिजे ह्या एक तत्वाचा पुरस्कार तत्वनिष्ठ पणे करा एकदा व्यक्तीस्वातंत्र्य वाढले कि गुंडगिरी आपोआप कमी होते.

टीप: बहुतेक गुंड मंडळी ह्या भाकड असतात. शिवसेनेनेच पहा. सामान्य दुकानदाराला त्याच्या दुकानावर "कराची" लिहिलेले आहे म्हणून धमकावयाला पुढे सरणारे शिवसेनेचे मर्द बोंबे स्कॉटिश शाळेच्या कुंपणाच्या आंत मात्र हातांत बांगड्या आणि नाकात नथ घालून जातात.

Rajesh188's picture

29 Mar 2021 - 1:50 am | Rajesh188

खऱ्या आयुष्यात अन्याय झाला तरी त्याचा विरोध करण्याची जिद्द कोणा मध्येच नाही.
Key बोर्ड बडवून स्फोटक विचार टाइप केले म्हणजे तो टाइप करणारा व्यक्ती अन्याय सहन न करणारा असतो असे नाही.

एक बंदूक धारी व्यक्ती 500 प्रवासी असलेले विमान hijack करतात 500 मध्ये एकाची पण हिम्मत विरोध करण्याची नसते..
10 सशस्त्र लोक करोड लोकसंख्या असणाऱ्या शहराला भीती दाखवू शकतात.
करोड पण एक पण व्यक्ती प्रतिकार करण्यास रस्त्यावर येत नाही .
Type करणे खूप essay आहे.
जीव धोक्यात घालून विरोध करणे तेवढेच कठीण..
10 पण अतिरेकी नसतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला करणारे .
अमेरिकेचा अध्यक्ष बंकर मध्ये बसला होता.
आणि अमेरिकन जनता दरवाजा लावून घरात.

फारच जोक मारता बा तुम्ही. त्या 9-11 नंतर अमेरिकेने अगदी सांगून सवरून साडे तीन मुस्लिम देशाचं वाळवंट केलेलं आहे. अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि अर्धा पाकिस्तान. अमेरिकेचा अध्यक्ष बंकर मध्ये असला तरी ती precautionary measure आहे. पण त्यानंतर तोराबोरा च्या गुहांमध्ये मध्ये लादेन समर्थकांचं पद्धतशीर पणे शोध घेऊन जी कत्तल करण्यात आलीय त्याबद्दल कधी तरी वाचा.

पिनाक's picture

30 Mar 2021 - 12:43 am | पिनाक

Learn technology to hack systems. त्या ज्ञानाची ची उपयोगक्षम शक्ती फार मोठी असते. (थेअरी म्हणून) असा विचार करा, की तुम्ही कुणाच्याही मोबाईल मध्ये घुसून काहीही करू शकलात तर तुमच्या प्रतिस्पर्ध्याची ची सगळी शक्ती बिनकामाची आहे. आणि (पुन्हा थेअरी म्हणून) कुठल्याही digital system ला तोडून प्रवेश करणे हे कधीही अशक्य नसते, अवघड नक्कीच असते.