प्रायव्हसी – भाग २

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in काथ्याकूट
15 Jan 2021 - 9:46 am
गाभा: 

सर्वात आधी विचार करुया की आपल्या माहितीची कुणाला गरज आहे? गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच कंपन्यांना ग्राहकांची माहिती हवी असते. मग ती एखादी बँक असो वा इंशुरन्स कंपनी, कपडे विकणारी कंपनी असो वा अ‍ॅमेझॉन. कुठलीही कंपनी असो, गूगल, अमॅझॉन, फेसबुक, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट हे सगळे यात गुंतलेले आहेत.

जाहिराती दाखवून आपला माल जास्तीत जास्त लोकांना कसा विकता येईल, वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या किमतीत माल विकून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याचा विचार कंपन्या करतात. वरवर पाहता हे योग्य आहे. कंपनीला जास्तीत जास्त किंमतीत माल विकून फायदा कमवायचा आहे आणि आपल्याला स्वस्तात स्वत तोच माल घ्यायचा आहे. पण हे पारडे कंपन्या स्वतःच्या बाजूने झुकवायला बघतात. आणि त्याच्यासाठी फेसबुक, गूगलसारख्या जाहिरातदार कंपन्या त्यांना मदत करतात.

फुकट किंवा स्वस्त मालाची जाहिरात करून कंपन्या इतर प्रकारे स्वत:चा फायदा करून घेतात. तो म्हणजे तुमची खाजगी माहिती मिळवून. उदा: समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला विमानाने जायचे आहे आणि तुम्ही अ‍ॅपलचा लॅपटॉप वापरून तिकिटे बघत आहात, तर कंपनीला कळते. अ‍ॅपलचा ग्राहक जरा उच्च्भ्रू असतो म्हणून ते तुम्हाला तिकिटाची किंमत जरा वाढवून सांगतात. जर कुणी घाईत असेल किंवा जर कुणाला कल्पना नसेल तर तो जास्त किमतीत खरेदी करतो, ज्यामुळे कंपनीला अर्थातच जास्त फायदा होतो. म्हणजे तुम्ही प्रायव्हसी ऐवजी फक्त सोय बघितली, २-४ ठिकाणी त्याच तिकिटाची चौकशी केली नाही तर तो व्यवहार तोट्याचा पडू शकतो. समजा १ कुटुंबातील ४ जण सिंगापूरला सहलीला चालले आहेत आणि १ तिकिट २ हजार रुपये महाग पडले, तर तुम्हाला ८ हजाराचा फटका पडला ना?

आता निव्वळ फेसबुकचे उदाहरण घेऊ की त्यांनी आजपर्यंत खाजगी माहितीचा कसा दुरुपयोग केला आहे.

  • युजरची माहिती संमतीशिवाय विकण्याचा फेसबुकला बराच पूर्वीपासून अनुभव आहे. Federal Trade Commission (FTC) ने २०१२ सालीच फेसबुकला दणका दिला होता.
  • व्हॉटसअ‍ॅप आणि युजर प्रायव्हसीचा हा पहिलाच प्रयत्न नाही. ४ वर्षांपूर्वी (२०१६ साली) असाच प्रयत्न केला होता.
  • फेसबुक युजरबद्दल ९८ प्रकारची माहिती गोळा करते आणि त्याचा वापर जाहिरात दाखवण्यासाठी करते.
  • फेसबुकवर फसवाफसवी चालते. कंपन्या पैसे देऊन खोट्या प्रोफाइल्स बनवू शकतात आणि लाइक्स विकत घेऊ शकतात. याचा उपयोग आपल्या बाजूने जनमत तयार करायला होतो.
  • फेसबुकवर तुम्ही प्रायव्हेट अकाउंट तयार करू शकत नाही, टोपण नाव वापरू शकत नाही. तिथे तुमची खरीखुरी माहितीच द्यावी लागते, ज्याचा वापर मग ते जाहिराती दाखवण्यासाठी करतात.
  • प्रायव्हसी सेटिंग्स फेसबुक मुद्दाम लपवून ठेवते किंवा बदलत रहाते, ज्यामुळे युजरला स्वतःची माहिती प्रायव्हेट ठेवायला जास्तीत जास्त त्रास होईल.
  • फेसबुक स्वतःपण इतरांकडून युजर डेटा विकत घेते, पण ते सांगत नाही.
  • फेसबुक कंपनी युजर डेटा स्वतःकडे ठेवत असली तरी जाहिरातदारांना विकते. उदा. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका आणि मास्टरकार्ड
  • फेसबुकने माहिती कमीत कमी ४ चायनीज कंपन्यांना (Huawei, Lenovo, Oppo and TCL) पण विकली आहे ज्या अमेरिकन इंटेलिजन्सनुसार चायनीज सरकारबरोबर संलग्न आहेत.

फेसबुकने जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी किती फसवाफसवी केली आहे आणि युजर डेटाचा किती दुरुपयोग केला आहे, अश्या अनेक लिंक्स उपलब्ध आहेत, पण त्या सगळ्याच शोधणे मला शक्य नाही. पण शोधल्यास तुम्हाला अजून माहिती नक्की मिळेल.लोकांची माहिती गोळा करून त्याचा वापर करणारे स्वतःच्या प्रायव्हसीबाबत मात्र खूप जागरुक असतात.मार्क झुकरबर्गला जेव्हा विचारलं की तू काल कुठल्या हॉटेलमध्ये राहिलास याची माहिती देशील का? तेव्हा त्याने काय उत्तर दिले ते बघा.शिवाय, स्वतःची प्रायव्हसी जपण्यासाठी त्याने शेजारची ४ घरे ३० मिलियन डॉलरला विकत घेतली. हवाईमध्ये सुद्धा प्रायव्हसी जपण्यासाठी घराभोवती उंच भिंत बांधली.

माहितीचा दुरुपयोग अति झाला तर खाली लिहिलेली परिस्थिती वास्तवात यायला वेळ लागणार नाही.

हॅलो, हा फेमस पिझा कंपनीचा फोन नंबर आहे का?
नाही, आम्ही गूगल पिझा कंपनी आहोत.
ओह, मी चुकीचा नंबर डायल केलेला दिसतोय.
नाही सर, आम्ही आता त्या कंपनीला विकत घेतलंय.
असं आहे होय. बरं, मला पिझा ऑर्डर द्यायची होती.
सर, तुमची नेहमीचीच ऑर्डर का?
नेहमीचीच? तुम्हाला काय माहीत ते?
सर, तुमच्या फोननंबर वरून आम्हाला माहीत आहे की गेल्या १५ वेळेला तुम्ही १२ स्लाइसचा लार्ज पिझा विथ डबल चीज, सॉसेज आणि थिक क्रस्ट ऑर्डर केला आहे.
हो, या वेळी पण तोच पाहिजे.
सर, मी सुचवू का की या वेळेस तुम्ही ८ स्लाइसचा व्हेजिटेबल पिझा विथ ब्रोकोली, मश्रुम आणि टोमॅटो असा घ्यावा.
नको, मला तो भाज्यांचा पिझा आवडत नाही.
पण सर, तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे.
तुम्हाला काय माहीत?
तुमच्या एमेलमधल्या गेल्या ७ वर्षांच्या रिपोर्टवरून कळले तसे.
असु दे, असु दे. पण मला नकोय तो पिझा. आणि तसं पण मी कोलेस्ट्रॉलचं औषध घेतो.
पण सर, तुम्ही औषध नियमीत घेत नाही. गेल्यावेळी तुम्ही हॅपिहेल्थ फार्मसीमधून फक्त ३० टॅबलेट्स खरेदी केल्या त्या पण ४ महिन्यांपूर्वी.
मी अजून टॅबलेट्स दुसर्‍या फार्मसीमधून घेतल्या.
पण सर, तुमच्या क्रेडिट कार्डवर तसं काही दिसत नाहीये.
मी रोख पैसे दिले.
पण सर, तुमच्या बँक स्टेटमेंटवर तर दिसत नाहीये की तुम्ही पुरेसे पैसे काढले.
माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे.
पण सर, अशी रक्कम जाहीर केलेलं तुमच्या टॅक्स रिटर्नवर दिसत नाहीये.
खड्ड्यात गेला तुमचा पिझा. मला या गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सगळ्याचा वीट आला आहे. मी आता दूर एका बेटावर जाऊन राहाणार आहे, जिथे फोन पण नसेल आणि इंटरनेट पण नसेल.
मला तुमच्या भावना समजतात. पण सर, तुम्ही पासपोर्टशिवाय जाणारच कसे? कारण आमच्या रेकॉर्डनुसार तर तो २ महिन्यापूर्वीच संपला.

Remember: You’re Not the Customer; You’re the Product

क्रमशः

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Jan 2021 - 9:50 am | कुमार१

रोचक माहिती

उपाशी बोका's picture

15 Jan 2021 - 9:54 am | उपाशी बोका

संपादक मंडळ - कृपया क्रमशः टाकावे. प्रायव्हसी कशी जपावी, यासाठी अजून १ भाग टाकायचा विचार आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jan 2021 - 10:13 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटचे उदाहरण तर फारच आवडले
खरंच असे झाले तर?
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 10:41 am | मुक्त विहारि

रोचक माहिती

उपाशी बोका's picture

16 Jan 2021 - 3:57 am | उपाशी बोका

प्रायव्हसी संदर्भातल्या या २ धाग्यांना मिळालेला थंड प्रतिसाद बघून खरं सांगायचं तर वाईट वाटले. प्रायव्हसी या विषयात कुणालाच फारशी रुची नाही, असे दिसतेय एकंदरीत.

ज्यांना कुणाला हा विषय गंभीर वाटत नाहीये किंवा असं वाटतय की १) मी कशाला काळजी करू? माझ्याकडे लपवायला खाजगी काहीच नाहीये किंवा २) असं वाटतंय की मी जाहिराती बघून विचलित होतच नाही, मला काही फरक पडत नाही किंवा ३) एवीतेवी माझी माहिती सगळ्यांना माहितच आहे, काय फरक पडतो? त्यांनी गेल्या २ दिवसातली बातमी बघावी.

Flo नावाचे अ‍ॅप १००+ मिलियन (म्हणजे १० कोटी+) स्त्रिया वापरतात. त्यांची मासिक पाळी आणि प्रेग्नन्सीच्या संदर्भातली माहिती Flo अ‍ॅप फेसबुककडे पाठवत होते (जाहिराती दाखवण्यासाठी) आणि ते पकडले गेले. खरं सांगायचं तर FTC दिलेली शिक्षा अगदीच मामुली आहे आणि आपलं काहीच वाकडं होणार नाही असेच या कंपन्यांना वाटणार आहे. यावरून कदाचित पटेल की युजरची खाजगी माहिती लीक होण्याची परिस्थिती किती गंभीर आहे आणि दुर्लक्ष करण्याजोगी नाही.

योग्य की अयोग्य, हे व्यक्तिगत असते

मी तरी, हळूहळू, आंतरजालापासून, दूर किंवा सुरक्षित अंतरावर रहायचे ठरवले आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jan 2021 - 12:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

झुक्या पण नियमित मिपा वाचतो हे बर्‍याच जणांना माहित असल्यामुळे कदाचित लोक ह्या धाग्यावर व्यक्त होत नसतील, आपले थोबाडपुस्तक खाते बंद होईल या भितीने.

किती प्रतिसाद आले त्याचा विचार न करता तुम्ही तिसरा भाग लिहाच,

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

16 Jan 2021 - 12:40 pm | मुक्त विहारि

मिपा वरच्या चर्चा वाचूनच, आंतरराष्ट्रीय धोरणे ठरवली जातात, असा माझा पण अंदाज आहे

बोका's picture

16 Jan 2021 - 12:23 pm | बोका

उपाशी बोका, तुमचे लेख आवडले. लिहित रहा.
बर्‍याच जणांना प्रायव्हसी हा फार गंभीर विषय वाटत नाही. माझा अनुभव सांगतो.
आजुबाजुच्या सोसायट्यांनी 'मायगेट' हे गेट सिक्युरीटी अ‍ॅप आणि सेवा वापरायला सुरवात केली. मायगेट चा विक्रेता आमच्या सोसायटीतही आला आणि एक वर्ष फुकट सेवा देउ केली. कमीटी सदस्य म्हणाले, फुकट आहे , सुरक्षा वाढेल ,तर वापरून बघु.
मी प्रायव्हसी च्या मुद्द्यावर विरोध केला, पण एकटा पडलो. फक्त सदस्यावर वापरायची सक्ती करता येणार नाही ही अट मान्य करुन घेतली.
मायगेट सेवा वापरल्याने तुमचा बराच डेटा त्यांच्याकडे जाणार. जसे ...
-तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट
-घरात कोणकोण आहेत.
-लोकेशन शेयर केल्यास, घरातील कोण घराबाहेर आहे.
-तुमच्या घरी कोण नोकर आहेत, त्यांचे फोन नं. फोटो, आधार
-तुमच्या घरी कोण पाहूणे येतात, त्यांचे फोन नं. आणी सोसायटीच्या वॉचमनने काढल्यास फोटो.
-तुम्ही कोणत्या घरपोच सेवा वापता
-स्विगी/ झोमॅटो बरोबर विशेष करार आहे. स्विगी /झोमॅटो थेट तुमच्या ऑर्डर ची माहिती मायगेट ला देतात.
- मोलकरणीचे रेटिंग द्यायची सोय (?)
- इत्यादी ...

एवढे सगळे देऊन काय मिळणार तर, कोण केव्हा आले गेले याच डिजिटल लॉग. कोणाला आत सोडायचे हे वॉचमनच ठरवणार.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2021 - 12:38 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2021 - 7:30 pm | धर्मराजमुटके

बोका साहेब. अगदी हीच परिस्थिती आमच्या इकडे आहे. आमच्या सोसायटीच्या मंडळाने देखील सदस्यांना न कळविताच "नो ब्रोकरहुड" हे अ‍ॅप घेतले. "नो ब्रोकरहुड" वाल्यांनी सॉफ्टवेअर आणि त्याबरोबर मोबाईल देखील फुकट दिला आहे. प्रायव्हसी हा एक मुद्दा झाला पण ही अ‍ॅप अजून दोन प्रकारांमुळे निरुपयोगी किंवा त्रासदायक आहेत.
१. बर्‍याच फ्लॅट मधे मोबाईल ला नेटवर्क नसते त्यामुळे सोसायटी सदस्याला पटकन आपल्याकडे कोण आले आहे याचे नोटीफिकेशन मिळत नाही.
२. बर्‍याच स्त्रियांच्या बाबतीत असे घडते की त्या घरच्या कामात गढून गेलेल्या असतात त्यामुळे किंवा अजून काही कारणांमुळे त्यांच्या फोनची अवस्था "मधू इथे आणि चंद्र तिथे" अशी असते. त्याची परिणीती आलेल्या पाहुण्यांना गेटवर ताटकळण्यात होते.

आता हे "नो ब्रोकरहुड" वाले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही फुकट देतात म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. असो.

आमच्या सोसायटीने मायगेट आणायचा प्लॅन रद्द केला. जर पुढे गेले असते तरी मी माझा डेटा दिला नसता. जर mandatory केलं असतं तर योग्य authority कडे तक्रार केली असती. इथे आम्ही गव्हर्नमेंट ला दाद देत नाही. सोसायटीला देऊ काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे स्मार्टफोनच नव्हे तर मोबाईल सुद्धा नाही असं मी सांगू शकतो. काय करता बोला.

ब्राझील मध्ये असताना अश्या प्रकारच्या सेवांनी मला प्रचंड उब आणला होता. तिथे फोटोच नाही वर तुमच्या सरकारी ओळखपत्राचा सुद्धा फोटो घेतला जात असे. दुर्दैवाने भारतांत असल्या फालतू प्रोसेस चे प्रेम तथाकथित "सचिव" मंडळींना जास्त असते. सोसायटीचे सेक्रेटरी ह्यांचा रुबाब प्रेसिडेंट ट्रम्प पेक्षा जास्त असतो. भारतांत ह्या सेवा फेमस होऊ नयेत हि ईश्वर चरणी अपेक्षा.

पूर्वी सायबर कॅफे मध्ये तुमच्या ID कार्डाचे फोटो मागायचे. मग मुलींचे फोटो, घराचे पत्ते वगैरे हि मंडळी इतर पोरांबरोबर शेर करायची मग "फ्राड़शिप" वाले सन्नी (सलमान) वगैरे घराबाहेर घुटमळायचे फोन करायचे.

ह्या असल्या फालतू सेवांनी विनाकारण लोक घरी येण्याचे बंद होतात. वृद्ध मंडळींना वगैरे कोणी मग भेटायला जात नाही. एकदा पुण्यात कुणाला तरी भेटायला गेले तर म्हणे ह्या रजिस्टर वर सही करून कारण द्या. मी लिहिले "न्यूक्लीअर लाँच कोड आणले आहेत, काकूंनी उद्दघाटन करावे असे वाटते म्हणून आले आहे".

फेसबुक ला काय ठाऊक आहे ह्यापेक्षा आपल्या बिल्डिंग मधील लोक, पोलीस, हॉस्पिटल्स, बँका आपली माहिती किती सुरक्षित ठेवतात ह्याबद्दल सतर्क राहणे जास्त आवश्यक आहे.

पिनाक's picture

20 Jan 2021 - 12:38 pm | पिनाक

Nuclear launch codes.. LOL
पुढच्या वेळी नक्की वापरणार मी

गामा पैलवान's picture

25 Jan 2021 - 10:55 pm | गामा पैलवान

मी पण वापरणार केव्हातरी.
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2021 - 12:40 pm | मुक्त विहारि

तिसरा भाग कधी?

उपाशी बोका's picture

22 Jan 2021 - 11:50 am | उपाशी बोका

पुढचा भाग लिहितो लवकरच. अर्धा झाला आहे, पण मिपावर एकदा लिहिले की एडिट करता येत नाही, त्यामुळे पूर्ण झाला की टाकतो.

दोन भाग वाचले.
तिसरा भाग कधी?

रांचो's picture

22 Jan 2021 - 4:19 pm | रांचो

छान माहिती मिळते आहे. पु. भा. प्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jan 2021 - 5:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

खरेच चकटफू मिळते म्हणुन बर्‍याच गोष्टी वापरतो आपण, कितीतरी अ‍ॅप्,क्रेडिट कार्डे आणि काय काय.
पण जगात फुकट असे काहीच नसते. आवळा देउन कोहळा काढणे सर्रास चालते. माहिती विकणे वगैरे तर अगदी कॉमन. म्हणजे व्होडाफोन ची सर्विस बेकार म्हणुन एयरटेल ला एम एन पी केले तर लगेच दुसर्‍या दिवसापासुन वेगवेगळे मार्केटिंग कॉल्स यायला सुरुवात. अमेझॉन वरुन खरेदी केली तर लगेच चेपु,तुनळीवर त्याच प्रकारच्या जाहिरातींचा मारा.