देश

तेजस आठवले's picture
तेजस आठवले in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 6:00 pm

शुक्रवार.अण्णांचं सगळंच वेगळं होतं. इतकी वर्षं त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज येत नसे.
अण्णांनी दंडावर बसलेल्या डासाला शांतपणे रक्त पिऊ दिलं आणि मग उडून जाण्याच्या बेतात असताना चिरडलं. बोटाला लागलेलं रक्त संपादकाच्या हाताला पुसून टाकायला ते विसरले नाहीत.
अण्णा म्हणजे त्याच्यासाठी जणू देवच. ते म्हणतील ती पूर्व. "एक काम करा, आजच्या फ्रंटपेज हेडलाईनला त्याचं नाव ___ ऐवजी ___ छापा. मंगळवारी आतल्या पानात एका ओळीची दिलगिरी व्यक्त करून टाका."

शुक्रवारी संध्याकाळी उसळलेली दंगल अखेर मंगळवारी कशीबशी शांत झाली.
=======================
अत्यंत क्रूर अशी त्याची संघटनेत ख्याती होती.त्याने बनवलेल्या बॉम्बने आजवर हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले होते. एका विशिष्ट दिवशी ह्या सगळ्या कृत्यांची गणना पुण्यकर्मांत होणार होती. स्वतः सुरक्षित राहून ही सगळी नृशंस हत्याकांडे घडवून आणणारा तो आज शत्रूच्या ताब्यात आला होता.लष्कराने त्याला अत्यंत शिताफीने पकडले होते. आता सुटका होणे अशक्य. त्याच्या अटकेचे वृत्त फोटोसकट त्या देशातल्या प्रत्येक पेपरची हेडलाईन होती.

"ए हा बघ ना कसला हँडसम आहे. संधी मिळाली ना, तर मी ह्याच्याबरोबर पळून जाईन. कसला क्युट दिसतो !" - तिरंगा बिर्याणीचा घास घेताना ती मैत्रिणीला म्हणाली.
=======================
ते सगळे होडीत बसले. नऊजण होते त्याच्याबरोबर. प्रत्येकाकडे एक धर्मग्रंथ दिलेला होता. कपाळाला गंध आणि मनगटात केशरी दोरा बांधलेला होता.साधूंच्या वेशात त्यांना ओळखणे कोणालाच शक्य नव्हते. उतरण्यापूर्वी त्यांनी एकदा पुन्हा प्रार्थना केली. सुकामेवा आणि गोळ्यांचे वजन भरपूर झाले होते. किनाऱ्यावर आल्यावर त्यांनी शांतपणे चालत स्टेशन गाठले. प्रचंड गर्दी पाहून त्यांना हायसे वाटले.

प्रत्यक्ष प्रशिक्षण तसे जुजबीच झाले होते त्यामुळे बहुतेकांचा नेम चांगला नव्हता. पण आता नेम धरायची गरज नव्हती....
रिकाम्या पुंगळ्यांचा खच स्टेशनभर पडला होता.
=======================
"ह्या देशाला झेंडू दहशतवादाचा धोका सगळ्यात जास्त आहे. कालचा भ्याड हल्ला हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे. दहशतवादाला धर्म नसतो.हा झेंडू दहशतवाद ह्या देशातील सामाजिक सलोखा बिघडवतो आहे. दहशतवादाला रंग नसतो.ह्या झेंडू दहशतवादाला जबाबदार... "
त्या देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेलं विधान ऐकून तो खुश झाला. सगळं ठरल्याप्रमाणे झालं होतं. त्याने लाडक्या कुत्र्याला एक भलंमोठं हाडूक टाकलं आणि तो कार्यालयात जाण्यासाठी तयार होऊ लागला.

आयएसआय मुख्यालयात आज उत्सवी वातावरण होतं. फतेह झाली होती.
========================
"उद्याच्या मोर्च्याची तयारी झाली का रे, मला ह्यावेळी काहीही गडबड नाही पायजेल"
"व्हय साहेब, समदं नीट जुळवलंय "
"बकरं गावलंय ना ?"
"व्हय."
"ह्या कानाचं त्या कानाला कळालं नाही पाहिजेल. त्याच्याभोवती सगळी आपलीच मानसं असली पाहिजेत. एकबी बाहेरचा नको जवळपास. उद्या सकाळपासून त्याला पान्याचा एक थेंबही द्यायचा नाही. स्टॉक आहे ना भरपूर?"
"जी"
"पुलावर गोंधळ घालायचा. असं धुमशान झालं पाहिजे, की निस्ता धुरळा उडाला पाहिजे. उजव्या अंगाला द्या ढकलून. पान्याखाली दोनच फूटावर दगडं हायीत.

"दहाव्याला त्येच्या म्हातारीला वीस हजार पोचव."
============================
तिचं वय झालं होतं. आताशा हाताला पुस्तकाचं वजनही झेपत नसे. आपल्या पीएचडीच्या प्रबंधावर तिने एकदा हात फिरवला. तरुणपणी हजारो किमीचा प्रवास केला होता, शेकडो समकालीन वास्तू पालथ्या घातल्या होत्या. माती चिखल उपसला होता. पुरातन अवशेषांच्या बाजूला जागून रात्री राखणही केली होती. सत्य शोधून काढताना डगमगली नव्हती. एकदोनदा हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता, पण वाचली. आजचा निकाल ऐकला आणि तिला भरून आलं.आपल्या धर्मावर झालेल्या भयंकर आघाताच्या, लाखो धर्मबांधवांच्या हत्याकांडाच्या वेदनांवर फुंकर घातल्यासारखं वाटलं.
पाणी प्यायला म्हणून ती स्वयंपाकघराकडे निघाली. कॉलेजमधून नुकतीच घरी आलेल्या नातीचा फोनवर बोलण्याचा आवाज येत होता.

" हो हो संध्याकाळचा प्लॅन नक्की. मला प्रचंड आवडतं. बरं झालं ना हे ___भारतात आले, नाहीतर आपल्याला ____ कसं खायला मिळालं असतं !"

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jan 2020 - 6:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

काय लिवलय... डोस्क फुटायची वेळ आली शेवटाला जाई पर्यंत
पैजारबुवा,

आनन्दा's picture

22 Jan 2020 - 1:55 am | आनन्दा

व्यापक कट

कुमार१'s picture

22 Jan 2020 - 8:04 am | कुमार१

वास्तवदर्शी !

जालिम लोशन's picture

22 Jan 2020 - 3:25 pm | जालिम लोशन

मार्मिक.

सर्व प्रतिसादकर्त्यान्चे आभार.

टर्मीनेटर's picture

24 Jan 2020 - 6:27 pm | टर्मीनेटर

जबरदस्त लिहिलंय! आवडले.
एक शेवटची सोडून बाकी सर्व घटनांचा संदर्भ लगेच लागला.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मराठी कथालेखक's picture

28 Jan 2020 - 4:40 pm | मराठी कथालेखक

काय ते तुटक तुटक लिहिणं.. जे लिहायचं ते सरळ , थेट आणि बेधडक लिहावं की..