'तंबोरा' एक जीवलग - ८

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
23 Jan 2020 - 3:01 pm

आज बर्‍याच दिवसांनी आले इथं. दिवाळी अंकातील माझा लेख तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचला, आवडला, हे पाहून बरे वाटले. नंतर काही कारणाने माझी भ्रमंती सुरू होती. ती आतापर्यंत. मग लिहायला जमले नाही. तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. हवाही प्रतिकूल पडली होती त्या मुळे प्रकृतीचे आढेवेढे नेहमीचेच त्यातून आताच जरा सावरलेय पुढे लिहिण्याची थोडी उमेद वाटते आहे असो.

तालिम सुरू झाली इथपर्यंत लिहिले होते. काही हकिकतीही सांगितल्या होत्या. गाणार्‍याच्या आयुष्यात असे किस्से हकिकती असायच्याच. त्या प्रसंगानुरूप येतीलच पण बर्‍याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कलेबद्दल म्हणजेच शास्त्राबद्दलही लिखाणात काही येईल तर बरे. म्हणजे ही लेखमालिका केवळ हकिकती आणि किश्श्यांची न होता त्यात मुलभूत असे काही या कलेबद्दल येईल. तेही खरंच आहे. शास्त्राशिवाय कला नसतेच. जिथे जिथे सौंदर्य तिथे तिथे शास्त्र आलेच.

आमच्या कलेचा पाया म्हणजे कंठातला सूर. तो तयार हवा. तयार म्हणजे काय? तर सूराला काही गुणवत्ता/क्वालिटी असायला हवी. ठराविक मर्यादेपर्यंत ती सरावाने आणता येते. मुळात सूर म्हणजे तरी काय? कंठातून निघणारा ध्वनी. तो पल्लेदार हवा, एकसमान आला पाहिजे, त्यात गोलाई आणि गोडवा असायला हवा त्या शिवाय तो ध्वनी, त्याच्या मानलेल्या मूळ स्थानापासून ठराविक अंतर वर आणि खाली केला असता त्याच्या वर लिहिलेल्या गुणवत्तेत फरक पडता कामा नये. ठराविक काळापर्यंत हा ध्वनी कंठातून सलग काढता आला पाहिजे. पुढे तो ध्वनी सर्व स्वरात म्हणजे अ, आ, इ, ई , उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, या स्वरांच्या रूपामध्ये वरील गुणवत्तेचा र्‍हास न होता काढता आला पाहिजे हे सर्व आले म्हणजे तयार सूर!

दुसरे म्हणजे स्वरज्ञान. वर सांगितलेला जो ध्वनी म्हणजेच सूर त्याच्या मोजपट्टिवर ठरलेल्या बारा स्थानांवर अचूक पणे व स्थानांच्या कोणत्याही क्रमाअनुसार हुकमी काढता येणे किंवा कानावर पडलेल्या स्वराचे अचूक स्थान ओळखता येणे हेच स्वरज्ञान होय! ही ठरलेली बारा स्थाने म्हणजेच हिंदुस्थानी कंठसंगीतातले बारा स्वर. दोन स्थानांमधले आणखी सूक्ष्म बावीस थांबे म्हणजेच बावीस श्रुती. हे सर्व मेंदूचे काम.

तिसरे म्हणजे वरील दोन गोष्टींनंतर या स्वरस्थानांच्या कसरती. हे म्हणजे सौंदर्यीकरण. यात मिंड, खटका, मुरक्या, ताना, आलाप, पलटे झमझमा इत्यादी येतात. हे म्हणजे संगीतातले जिमनॅशियमच.

मी ज्या घराण्यांचे शिक्षण घेतले त्यामध्ये या तीनही गोष्टींना अत्यंत महत्व आहे. तसे ते सगळ्याच घराण्यात आहे म्हणा. या तीन गोष्टी आल्या की म्हणतात 'आवाज तयार आहे' त्या पुढे राग रागिण्या येतात. या तीन गोष्टी नसतील तर पुढच्या शिक्षणाला काही अर्थ नाही.
आता एक गोष्ट सांगते की, वरील तीन गोष्टी येऊन सुद्धा एखादा गाणारा प्रसिध्दिस येत नाही. तर ते प्रकरण आणखी वेगळे आहे.

मी लहानपणापासून आईकडे शिकल्यामुळे या तीनही गोष्टी तिनं मला प्रथम शिकवल्या म्हणून तयार होत्या. मग पुढच्या गोष्टी शिकायला खांसाहेबांच्याकडे सुरुवात केली. तरीसुद्धा त्यांनी एकदम शिकवले नाहीच. आधि या तीन गोष्टी माझ्याकडे आहेत की नाही याची चाचपणीच चालली होती कित्येक दिवस. मेहनतीत कसूर चालायची नाही. ही विद्या खरोखरच अत्यंत कष्टसाध्य आहे. कित्येकदा आपण उमेद हरतो, पुरे. बस्स झाले, या पुढे नाहीच जमणार. असेही होते शिकताना. पण योग्य गुरू आणि चिकाटी असेल तर या अडचणींवर सहज मात करता येते. खरा गुरू तोच की जो तुम्हाला तुमच्या नैसर्गीक क्षमतांचा वेध घेऊन जमेल की नाही हे आधी हेरतो. नैसर्गीकच कमतरता असेल तर पुढची मेहनत फूकट आहे हे जाणून तुमचा व त्याचा कालापव्यय करीत नाही. आणि क्षमता असेल असे आढळले तर मेहनतीची योग्य आणि अचूक दिशा दाखवतो.

क्रमशः

गौरीबाई गोवेकर.

कलालेख

प्रतिक्रिया

खूप दिवसांनी तुमचं लिखाण पाहून खूप खूप बरं वाटलं. पु.भा.प्र.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

24 Jan 2020 - 1:27 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद श्वेता

उगा काहितरीच's picture

23 Jan 2020 - 6:29 pm | उगा काहितरीच

आवडला हा भाग पण. बरेच दिवसांनी तुमचा लेख वाचून बरं वाटलं.
संगितातील बारकावे सोप्या शब्दांत सांगताय ते पण आवडलं.
लिहीत रहा आम्ही वाचीत आहोत.
धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

23 Jan 2020 - 7:29 pm | सुधीर कांदळकर

मॉप टायमाने केलेले लेखन आवडले. धन्यवाद.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

24 Jan 2020 - 1:28 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद सुधीरजी

मुक्त विहारि's picture

24 Jan 2020 - 10:43 am | मुक्त विहारि

वाचत आहे.

पुढील भाग लवकर टाका.

सुबोध खरे's picture

24 Jan 2020 - 12:03 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

24 Jan 2020 - 1:28 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद सुबोधजी

अनिंद्य's picture

24 Jan 2020 - 7:36 pm | अनिंद्य

'संगीतातले जिमनॅशियम' - गमतीशीर पण चपखल वाटले.
पु भा प्र

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

28 Jan 2020 - 2:05 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद अनिंदो