सकाळी सकाळी इ-मेल्स पहात असताना अचानक ऑफिस ऑर्डर दृष्टीस पडली !
“येत्या सोमवार पासून चेन्नै ऑफिसला रिपोर्ट करावे लागेल! ” चला, इथला मुक्काम संपला, मी मनाशी म्हटले.
मी त्यावेळी कंपनीच्या बेंगळूरू ऑफिस होतो. अधून मधून तिथं आमच्या हैदराबादच्या प्रोजेक्ट हेडची रि-व्यूह व्हिजिट व्ह्यायची. एका मिटिंग मध्ये त्यांनी टीम कल्पना दिली की आपला हा प्रोजेक्टचा काही भाग चेन्नईच्या ऑफिसला शिफ्ट करावा लागणार आहे, पण ती वेळ एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते! इथं फक्त माझीच बदली झाली होती !
चेन्नई ऑफिसचा पत्ता होता: एलकॉट सेझ आय टी पार्क, शोलिंग-नल्लूर, चेन्नई.
शोलिंग-नल्लूरचा आय टी पार्क:
सालं, शोलिंग-नल्लूर वै असली नावं ऐकलीच नव्हती आता पर्यंत. लगेच गुगलचा आधार घेतला. हे उपनगर मुख्य शहरापासून २५ किमि वर जुन्या महाबलीपुरम रोडवर होतं (ओएमआर: ओल्ड महाबलीपुरम रोड). हा परिसर टीसीएस, विप्रो, एचसीएल, कॉग्नीझंट असल्या दादा आयटी कंपन्यासाठी विख्यात होता. शोलिंग-नल्लूर या नावात “लिंग” असल्यामुळं हे शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असेल असं वाटलं होतं, पण असं काही नव्हतं ! इथलं प्रत्यङ्गिरा देवीचं मंदिर प्रसिद्ध होतं, पण प्रत्यङ्गिरा या देवीचं नाव देखील मी कधी ऐकलं नव्हतं ! त्यामुळं उत्सुकता चाळवली.
चेन्नईला जायच्या तयारीला लागलो. इथल्या पीजी हॉस्टेल मॅनेजरला कल्पना दिली, सगळे हिशेब चुकते केले, अन रविवारी दोन तीन बॅगांचा संसार घेऊन संध्याकाळी शोलिंगनल्लूरच्या कंपनी गेस्ट हाऊसला धडकलो. पुर्ण आठवडा नविन एरिया, जाण्यायेण्याचा रस्ता, बस-रिक्षा वाहतुक, नविन कलीग यांचा परिचय करून घेण्यात गेला. याच आठवड्यात जवळपासच पीजी हॉस्टेल बघून तिथं रविवारी शिफ्ट देखील झालो.
चेन्नई आणि शोलिंग-नल्लूर परिसर स्थळ नकाशा:
पीजीवरून ऑफिसला जाण्या येण्याचं रुटीन सुरु झालं. जेवण नाश्ता वै ची सोयीची ठिकाणं पाहून झाली. चार एक दिवसात कम्फर्ट लेव्हल आली. म्हटलं, आता बघूयात एखाद दिवस इथलं सुप्रसिद्ध देवीचं मंदिर, मॅप बघितला, तर मंदिर माझ्या हॉस्टेलच्या जवळपासच दिसत होतं. (गंमत म्हणजे माझ्या आठ पैकी कुठल्याच कलिगनं हे पाहिलं नव्हतें ! तीन तमिळ (त्यापैकी दोन चेन्नई शहरातले आणि एक ऊटीच्या पायथ्याच्या एका छोट्या गावातला होता) चार जण तेलगू होते आणि मी (एक) मराठी. सकाळी कंपनीच्या बसनं ऑफिसला यायंच आणि ड्युटी संपल्यावर अंधार पडल्यावर बसनंच शहरात परतायचं असं त्यांचं रुटीन असायचं. त्यामुळं आवर्जून इथं थांबून हे मंदिर बघणे हे असं काही त्यांनी केलं नव्हतं. एक दोघं मोटारसायकलवर ये-जा करायचे पण त्यांनीही हे मंदिर पाहिलं नव्हतं.
शोलिंग-नल्लूरमधील प्रत्यङ्गिरा देवी मंदिर, बकिंगहॅम कॅनॉल (उभा आणि किंचित तिरपा निळा जलपट्टा ) इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर स्थळ नकाशा:
पीजीच्या मालकाला मंदिराला कसं जायचं विचारल्यावर तमिळ मिश्रित इंग्लिश “ईट्ट्स व्हेर्री क्लोज्ज फ्राम हियर” असं सांगत मला थोडंफार समजेलं असा पत्ता सांगितला. एक दिवस साय़ंकाळी साडेसहा वाजता ऑफिस पीजीला परतल्यावर आज मंदिराला भेट द्यायची हे ठरवलं. मंदिर रात्री आठला बंद होणार असल्यानं घाई करणं भाग होतं. वेगात आवरून लगेचच कॉर्नरला आलो. रिक्षावाला पकडला. साठ रू. सांगितले. बरेच बारगेन केल्यावर देखिल दहाच रू कमी केले. म्हटलं वेळ कमी आहे. ठीकाय. दोन तीन मिनिटातच एक यू टर्न, एक राईट टर्न घेवून त्यानं एका मध्यम रुंद रस्त्याच्या कोपऱ्यावर मला सोडलं. काही मीटर आता असणाऱ्या मंदिराकडे बोट दाखवलं अन म्हणाला " हेच मंदिर, इथून पुढं रिक्षा जात नाही"
हे प्रत्यङ्गिरा देवी मंदिर बकिंगहॅम कॅनॉलच्या काठापासून जवळच आहे. बकिंगहॅम कॅनॉल म्हंजे थक्क करणारा प्रकार आहे. हा ८०० किमि लांबीचा आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस भारताच्या पुर्व किनायावर नदीची पात्रे, तलाव इ. जोडून बनविला. साधारण पुर्व किनार्यापासून आत एक किमी आत आहे. कॅनॉल जलवाहतुकीसाठी वापरला जात असे. हा आन्ध्रातल्या काकिनाडा पासून सुरु होतो ते तामिळनाडूतल्या विल्लीपुरम जिल्ह्यात समाप्त होतो. ब्रिटिशांच्या पहाणीनुसार हा कॅनॉल पुर्व किनारी वादळापासून संरक्षण करणारा ठरला. इस्कॉनचं एक देखणं श्रीकृष्ण मंदिर हे कॅनॉलच्याच काठावर पण, प्रत्यङ्गिरा देवी मंदिराच्या, थोडं तिरपं विरुद्ध दिशेला आहे. नदी पाहिल्यावर कसं मन सुखावतं तसं परिसरात फिरताना कॅनॉल पाहून मला सुखद वाटायचं !
रिक्षावाल्याचा हातावर दहा रू टेकवले. मनोमन रिक्षावाल्याला (पुण्यातल्या रिक्षावाल्याचे सुद्धा पुण्यस्मरण करून) सलाम केला. मंदिराच्या रस्त्याकडे पाहताच माझी थोडी निराशाच झाली !
मंदिराचा रस्ता
रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉलनीच्या नवीन इमारती तयार होत होत्या. काहींचे काम पूर्ण झाले होते तर काहींचे अर्धवट होते, बांधकामाचा राडारोडा आजूबाजूस पडला होता. दोन चार मिनिटात चालत मंदिराजवळ पोहोचलो ! मंदिराच्या प्रवेशद्वार परिसर पाहून फार इम्प्रेस झालो नाही. पायाखालचा रस्ता खडीचा होता, चारपाच पुजासाहित्याची दुकाने, फुगेवाले, थोडी अस्वच्छता असं होतं. वेळ कमी असल्यामुळं भाविकांची आत प्रवेश करण्याची लगबग सुरु होती. मी माझी पादत्राणे एका हाराच्या दुकानाजवळ काढली. पुजासाहित्य घ्यायचे टाळले. नेहमी टाळतो. लहानपणी पंढरपुरात विठठल मंदिरात हार, फुले, पुजा साहित्य याचे किती प्रदुषण होते अन त्याचा पुजार्यांना, स्वच्छाता ठेवणार्यांना किती त्रास होतो ते जवळून पाहिले होते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहचल्यावर मात्र मला फार भारी वाटलं !
चिनी पॅगोडाची आठवण करून देणारं असं उंच, भव्य आणि सुंदर रंगसंगतीने नटलेले केरळ शैलीतील दुमजली राजगोपुरम मनावर छाप पाडून गेले. आता पर्यंत पाहिलेल्या मंदिरांच्या गोपुरा पेक्षा हे खुप वेगळं होतं. आत गेल्यावर डाव्या बाजूस कार्याल हो ते, फोटो काढ्यायला परवानगी नाही असे अनेक नियमफलक होते ( त्यामुळे फारच थोडे फोटो नेटवर आहेत ) आत बऱ्यापैकी गर्दी दिसत होती.
मंदिराचे पुर्ण बांधकाम सिमेंटकॉन्क्रिट मध्ये होते ! का माहिती कुणास ठाऊक, मला हे मंदिर पुरातन अन दगडी नक्षिदार शिल्पकला असलले असावे असे वाटले होते ! नंतर चौकशी केल्यावर हे २०-२५ वर्षांपुर्वीच बांधलेले आहे आणि भाविकांच्या वाढ्त्या प्रतिसादामुळे वाढ्वणे अजूनही सुरु आहे असे कळले !
मंदिराच्या राजगोपुरमवरचा कळसः
राजगोपुरमद्वाराजवळच हातात शस्त्रे, आग धारण केलेल्या अश्या डाव्या बाजूला श्री मदुराई वीरन आणि उजव्या बाजूला श्री वेलादी जय-विजय सारख्या मूर्ती होत्या. भडक रंगात रंगवलेल्या या उग्र मूर्ती पाहून भीतीच वाटली आणि मंदिर कसे असेल याची कल्पना आली.
आता मध्ये बऱ्याच देवांच्या मुर्ती/देवळं दिसत होती. प्रवेशद्वारातून आता गेल्यावर लगेचच डाव्या बाजूस वराही देवीची मूर्ती होती. काही ठिकाणी पुजा-पाठ, अर्चना वै. तर दुसरी कडे लुंगी, पांढरे सदरे, रंगीबेरंगी साड्या, कपाळाला हळदकुंकू, भस्म असं टिपिकल दाक्षिणात्य वेशातले भाविक यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. प्रत्येक देवाला छोट्या छोट्या रांगा लागल्या होत्या. सर्वांचं पटापट दर्शन घेत मी पुढं सरकत होतो. मला तर देवांच्या मॉल मध्ये आल्यासारखंच वाटलं. मॉल मध्ये आल्यावर आपण भरभरून वाहणारे रॅक पाहत चकित होत राहतो, तसं देवांची संख्या पाहून माझं झालं. किती देव, देवता!
उदाहरणार्थ:
१. वराही देवी / वराही देवी
२. नील सरस्वती देवी
३. भगवान शरभेश्वर
४. गणपती
५. मुरुगन (कार्तिकेय)
६. पंचमुखी हनुमान (अंजनेय)
७. अग्नी
८. अय्यप्पा
९. नरसिंह
१०. राहू
११. केतू
१२. शिव महादेव
१३. कालीकम्बल देवी (कामाक्षी देवी)
१४. शनिदेव
१५. गुरुवायुराप्पा
ही फक्त झलक आहे. आणखी पाचपन्नास देव होते.
शेवटी पोहोचलो, प्रत्यङ्गिरा देवीजवळ. इथं तर खूप मोठी रांग होती. बेशीस्त असल्येल्या भाविकांना स्वयंसेवक सूचना देत होते. आचार्य लोकांची देखील ये-जा सुरु होती. एका बाजूला यज्ञ-याग सुरु होते, दुसऱ्या बाजूला काही स्त्रिया स्तोत्र पठण करत होत्या. हळदकुंकू हार यांची रेलचेल होती. प्रसादाचे वाटप सुद्धा एका काउंटर वर सुरु होते. मला भाषा समाजात नव्हती, एकंदरीत हा गुढ कोलाहल वातावरणात भरून राहिला होता.
प्रत्यङ्गिरा देवीच्या विक्राळ रूपाचे कल्पनाचित्रः
प्रत्यङ्गिरा देवीला नरसिंही, नरसिंहिका अथवा भद्रकाली असे ही म्हटले जाते. ती आदि-पराशक्तीचे रूप आहे, आणि भगवान शरभेश्वराची पत्नी आहे ! वैष्णव पंथात प्रत्यङ्गिरा ही नरसिंहाचा देवी अवतार मानली गेली आहे ! मुख सिंहाचे आणि मानवी (स्त्री) शरीर अशी ही देवी भगवान नरसिंह विष्णु, शिव आणि शक्ती यांचे एकत्रित प्रचंड अशी विध्वंसक शक्ती धारण करणारी आहे ! सिंह+स्त्री असं रूप असणारी प्रत्यङ्गिरा देवी म्हणजे दैवीशक्ती आणि पाशवी शक्ती यांचं प्रतिनिधीत्व करणारं रूप आहे.
नर-सिंहालाचा क्रोधाग्नि शरभाने शांत केला, पण त्यानंतर शरभालाही आपल्या विराट शक्तीचा अहंकार झाला, तेंव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी प्रत्यङ्गिरा देवीने अवतार घेतला. शरभाचा महासंहार त्यावेळी प्रत्यङ्गिरेचे (नारसिंही) रुप पराकोटीचं अक्राळविक्राळ भयंकर असं होतं. तिच्या श्वास-उच्वासामधून आगीचे लोळ आणि ठिणग्या बाहेर पडत होत्या. उन्मत्त झालेल्या शरभाचा प्रत्यङ्गिरा देवीने नि:पात केला अशी आख्ख्यायिका आहे आहे !
(शरभ अवताराची आख्ख्यायिका याच लेखात खाली दिलेली आहे)
मंदिरातील प्रत्यङ्गिरा देवीची मुर्ती:
http://www.sholinganallurprathyangira.com/assets/images/prath2-2000x1333...
देवीची मूर्ती तीन-साडेतीन फूट उंच असून काळ्या पाषाणात कोरलेली आहे. फुले, पुष्पहार आणि विविध अलंकारांनी सजवलेली मूर्ती सुंदर दिसत होती.
देवीपुढे डोके टेकवून दर्शन घेतले.
प्रत्यङ्गिरा देवीचे मंदिर महाराष्ट्रात असल्याचे (मला तरी) माहीत नाही, पण मुख्यत्वे तामिळनाडू, केरळ, श्रीलंका आदी ठिकाणी फार भक्तिभावाने पुजली जाते. या देवीची उपासना अघोरी पंथात मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्तरेतही निवडक ठिकाणी या देवीची पूजा होते. सिंगापूरला तामिळ बांधवांची मोठी वस्ती असल्याने इथे देखील या देवीचे मंदिर लोकप्रिय आहे.
शरभ अर्थात भगवान शरभेश्वर:
शरभेश्वर शिवाच्या अवतारांपैकीच एक. त्याच्या अवताराची आख्ख्यायिका अशी आहे.
दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपूच्या अत्याचारला विरोध करण्यासाठी त्याचा मुलगा भक्त प्रह्लादाने विष्णूची आराधना करून स्वतःला संरक्षित केले, हे पाहून चिडलेल्या हिरण्यकश्यपूने अनेक अघोरी उपाय योजले, पण प्रल्हादाला विष्णूकडून मिळालेल्या वरदानामुळे भक्त प्रल्हादला तो काहीच इजा करू शकला नाही. भक्त प्रल्हादाला राजा हिरण्यकश्यपू आणखी चिडला त्याने अत्याचाराचे थैमान मांडले. त्याला मिळालेल्या वरदानामुळे कोणीच त्याला काही करू शकत नव्हते. कारण त्याला ना मानव मारू शकणार होता ना पशू, ना दिवसा ना रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने. त्याचे अत्याचार वाढत राहिले. आपल्या भक्तांचे असे हाल होताहेत पाहून भगवान विष्णु यांनी नर-सिंहाचा अवतार घेतला, प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला.
भगवान शरभेश्वराचे कल्पनाचित्रः
https://www.mygodpictures.com/wp-content/uploads/2014/11/God-Of-Hindus-S...
हिरण्यकश्यपूचा वध करताना भगवान नर-सिंहाचा प्रचंड क्रोधीत होते. त्यांचा क्रोधाग्नि शांत व्हायलाच तयार नव्हता. हे पाहून भगवान शिवाने शरभाचा अवतार घेतला. हा अवतार (प्राणी) म्हणजे म्हणजे अर्धे शरीर सिंहाचे आणि उरलेले आठ पाय असलेल्या मृगाचे. पौराणिक कथानुसार हा अवतार म्हणजे सिंहापेक्षाही शक्तिशाली, पंख असलेला, आठ पाय असलेला अक्राळविक्राळ प्राणी, हा प्राणी इतका शक्तिशाली कि एका झेपेत एका पर्वतरांगातून दुसऱ्या पर्वतरांगेवर ! शरभाने भगवान नर-सिंहाचा क्रोध शांत करण्यासाठी नृसिंह स्तुति गाण्यास आरंभ केला, तरीही नर-सिंहाचा क्रोध शमला नाही. हे पाहून
भगवान शिवाने अर्थात शरभाने रौद्र रूप धारण केले. नर-सिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ब्रम्हांडात भराऱ्या सुरुवात केली. काही काळाने भगवान नर-सिंहाचा क्रोधाग्नि शांत झाला.
मंदिरातील भगवान शरभेश्वराची मूर्ती
आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्याच गडकिल्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे शरभाचे शिल्प आढळते.
निघताना पुनः प्रत्यङ्गिरा देवीपुढे माथा टेकवला, मनोभावे दर्शन घेतले, दक्षिणापेटीत ११ रू अर्पण केले आणि निघालो.
मी मंदिरात येऊन आता एक-दीड तास झाला होता साडेसात-पावणे आठ वाजलेच होते. आठ वाजता मंदिर बंद होत असल्यामुळे भाविकांची आत येण्यासाठी झुंबड उडाली होती. वातावरणातले आवाज, कोलाहल टिपेला पोहोचले होते. एका वेगळ्या वातावरणाचा, मंदिराचा अनुभव घेऊन मी हॉस्टेलला परतलो.
चेन्नईला असे पर्यंत नंतर दोन चार वेळी ऑफिसमधल्या सहकाऱ्याला / हॉस्टेल मधले मित्रांना हे मंदिर दाखवायला येण्याचा योग आला.
आता नवरात्रात मला हमखास शोलिंगनल्लूर आणि प्रत्यङ्गिरा देवी मंदिराची आठवण होते !
आज घटस्थापना ! हा लेख नेमका याच दिवशी लिहून पूर्ण झाला, प्रकाशित करता आला.
सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
प्रतिक्रिया
29 Sep 2019 - 7:22 pm | जॉनविक्क
दक्षिणा हा प्रकार सोडला तर दक्षिणेतील देवळं बघत फिरण्यात कसा वेळ निघून जातो कळतही नाही.
30 Sep 2019 - 8:42 pm | चौथा कोनाडा
खरंय, जॉनविक्क देवळं आणि शिल्पकला तर अप्रतिमच आहेत, बघताना भान हरपून जाते.
पूजा, अर्चना, दक्षिणा याबद्दल काय बोलायचं, पडतात काही लोक बळी.
इथं महाराष्ट्रात तर त्यांचे प्रतिनिधी पूजा- उपासनेचा भाग म्हणून दक्षिणेतील विविध मंदिरांना भेटी देऊन विविध प्रकारच्या पूजा घालायला लावतात (उदा. नागदेवता, नवग्रह, राहू केतू, नारायणनागबळी नाडीपट्टी, विविध प्रकारच्या शांत्या वैगरे ) त्याचा खरंच उपयोग होतो हे माहित नाही.
मला स्वतःला त्या गोष्टींचे आकर्षण नाही, त्यामुळे असल्या भानगडीत पडत नाही.
धन्यू जॉनविक्क !
29 Sep 2019 - 9:01 pm | कंजूस
मजेदार!
29 Sep 2019 - 9:20 pm | जालिम लोशन
+१
30 Sep 2019 - 10:01 am | उपयोजक
चांगली माहिती!
30 Sep 2019 - 10:51 am | यशोधरा
आयटी पार्क चांगले हिरवेगार आहे, असे दिसतेय.
देवीचे रूप भयंकर प्रकारातील दिसते आहे, रौद्रभीषण सौंदर्य.
30 Sep 2019 - 10:57 pm | चौथा कोनाडा
हो, परिसर छानच आहे. अन हे प्रचि तर हवेतून काढलंय, तपशिलामुळं आणखी हिरवंसुंदर दिसतंय.
वेलाच्चेरी पासून पुढे हा परिसर सुनियोजित आहे.
चेन्नै ते पुद्दूच्चेरी हा किनाऱ्यालगतचे ले-आऊट्स तर फ्रेन्चानी डिझाईन केलेत. अगदी ९० अंशात रस्ते, किनारपट्टीला समांतर.
या परिसरातून फिरताना खूप छान वाटते.
आणि देवीच्या भयंकर रूपाबद्दल काय बोलणार, साक्षात तंत्र आणि अघोरी पंथाची शक्तीदेवता ती !
अश्या मूर्ती पाहून घाबरायला होतं !
धन्यवाद, यशोधरा !
30 Sep 2019 - 11:16 am | सुधीर कांदळकर
छान. दंतकथा, आख्यायिका दिल्यामुळे मजा आली. प्रचि सुंदर. शरभेश्वरकथा ठाऊक नव्हती. मनोरंजक आहे. पुलेशु. धन्यवाद.
4 Oct 2019 - 10:41 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सुधीर कांदळकरजी !
लहानपणी कधीतरी ऐकलेली कथा या लेखाच्या निमित्तानं मला परत अभ्यासायला मिळाली.
प्रचि सगळी आंजावरून साभार आहेत (ही टिप लेखात समाविष्ट करायची राहिली, क्षमस्व !)
या मंदिरात फोटोला बंदी असल्यामुळे आंजावरचेच फोटो वापरावे लागले.
मी असे पंख असलेली देवाची मुर्ती पहिल्यांदाच पाहिली ! चकित व्हायचं काम होतं.
शरभेश्वरची जितकी मनोरंजक कथा, तितकेच रूप देखिल रौद्र !
30 Sep 2019 - 11:58 am | तुषार काळभोर
२००८-०९ मध्ये वर्षभर चेन्नैमध्ये होतो. तेव्हा ही मंदीरे बघितली आहेत.
पहिला शन्वार-रैवार होमसीक होण्यात घालवला. (ते एक वर्ष सोडलं तर मी कधी घराबाहेर राहिलेलो नाही. "गावी सुट्टित जायचो" म्हणजे दहा किमी. मामाचं गा सर्वात दूर- २२ किमी- सासवड / मी अजून मुंबई पाहिली नाही!!)
मग एक औरंगाबादचा कलंदर मित्र भेटला ऑफिसमध्ये. गंमत म्हणजे मी मराठी आहे हे त्याला माझ्या कॉम्प्युटरवर मिपा दिसल्यानं कळलं.
मग आम्ही भटकायला सुरूवात केली. आधी तिरुपती, मग कांचीपुरम, मग शहरातली मोठी मंदीरं, मग उपनगरातली मग आजूबाजूच्या गावांतली.
प्रत्येक वीकांताला किमान एक भेट मरिना/एलियट बीचची ठरलेली.
बाय द वे, आमच्या कंपनीचं मुख्य कार्यालय २००७-२०१६ शोलिंगनल्लूरमध्ये टेक्की आय्टी पार्कमध्ये होतं. तेव्हा २०१६ मध्ये एकदा आलो होतो. २०१६ ला ते थोडं खाली नवालूरमध्ये शिफ्ट झालं. मग आता येणं जाणं तिथं असतं.
7 Oct 2019 - 9:02 pm | चौथा कोनाडा
वाह पैलवान !
छान, म्हंजे मस्त योग आला चेन्नईचा !
मुंबई पाहिली नाही म्हंजे गंमतचय. टेक्की आय्टी पार्क म्हणजे जवळच होतं की. नवालूर म्हंणजे लांब गेलात की, कोवलम जवळ.
येणंजाणं तसं घाईतच होत असेल नै ?
माझा कांचीपुरम पाहायचा योग चुकला राव ! बदली झालं की एक बरं असतं, त्या निमित्तानं आपल्याला वेगळं जग बघायला मिळतं !
मिपा तर आपला बेस्ट फ्रेंड आहे, आणखी नवनव्या फ्रेंड्स बरोबर गाठ घालून देतो !
3 Oct 2019 - 8:45 am | दुर्गविहारी
खुपच सुंदर माहिती दिलीत. अशीच चेन्नई परिसराची सहल घडवून आणा.
पु. ले. शु.
3 Oct 2019 - 8:51 am | दुर्गविहारी
खुपच सुंदर माहिती दिलीत. अशीच चेन्नई परिसराची सहल घडवून आणा.
पु. ले. शु.
6 Oct 2019 - 2:51 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, दुर्गविहारी !
3 Oct 2019 - 12:05 pm | योगविवेक
नवरात्रीच्या काळात आपली मंदिर यात्रा वाचून आनंद झाला. असेच एक सरस्वती रुपातील आधुनिक विद्या मंदिर पहायला जरूर जावे असे सुचवावेसे वाटते.
Institute of Asian Studies
नावाची आंतरराष्ट्रीय प्राचीन तमिळ भाषेवर अभ्यास करणारी संस्था आहे. अनेक ताडपत्राच्या पोथ्या व अन्य ग्रंथ तिथे अभ्यासकांना वाचनार्थ ठेवलेले आहेत.
त्या ठिकाणी देशविदेशातील तमिळ जाणकार विद्वान - मलेशिया, चीन, इंडोनेशियातून येऊन- प्राचीन तमिळभाषेवर अभ्यासकार्य, आपले प्रबंध कार्यशाळेत सादर करतात.
आपल्याला वेळ मिळाला तर याठिकाणी जरूर भेट द्यावी. तेथील संचालक- संस्थापक जी जॉन सॅम्युअल्स अत्यंत आगत्यशील आणि महान तमिळभाषाकार आहेत.
या आधुनिक विद्यामंदिराला वेळ काढून जरूर भेट द्यावी आणि आपला अनुभव सागदर करावा अशी विनंती.
3 Oct 2019 - 11:25 pm | चौथा कोनाडा
खुपच माहितीपुर्ण प्रतिसाद आहे, अगदी रोचक, योगविवेक ! या संस्थेबद्दल प्रथमच वाचण्यात आले.
फारच इम्प्रेसिव्ह आहे संस्थेबद्दलची माहिती. भेट द्यायलाच हवी.
(बाय-द-वे, नाडीपट्टी फेम ताडपत्राबद्दल इथं काही संशोधन, चिकित्सा वै झाली असेल का ? असा प्रश्न मनात आला. )
ही संस्था थिरुवनमियुर इथं आहे, शोलिंगा नल्लूरच्या पासून जवळ.
मी एक दोनदा गेलो होतो थिरुवनमियुरला, पण वेळेअभावी मला कलाक्षेत्र या संस्थेला देखिल भेट देता आली नाही.
(नृत्य ( विशेषतः भरतनाट्यमचे) संगीत इ कलांची क्रमबद्ध शिक्षण देणारी जगप्रसिद्ध संस्था, विख्यात थिऑसॉफिस्ट डॉ रुक्मिणीदेवी यांनी कलाक्षेत्रची स्थापना१९४० मध्ये केली. या संस्थेचा परिसर खुप सुंदर आहे )
परत पुण्यात बदली झालीय, योग आल्यास नक्की भेट देणार या दोन्ही संस्थांना.
धन्यवाद, योगविवेक !
4 Oct 2019 - 8:35 am | प्रचेतस
चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा कट्टा करुयात लवकरच.
7 Oct 2019 - 4:15 pm | चौथा कोनाडा
वॉव ! नक्कीच प्रचेतस !
3 Oct 2019 - 2:36 pm | रविकिरण फडके
हा 'प्रत्यंगिरा' शब्द तुम्ही जसा टाईप केलात तो कसा केलात, हे कृपया सांगा.
4 Oct 2019 - 10:33 pm | चौथा कोनाडा
मलाही हा प्रश्न पडला होता, हा शब्द टंकायचा कसा ? शोधत बसायला वेळ नव्हताच. मग "प्रत्यंगिरा देवी" असं साधं टंकुन गुगल मध्ये सर्च केला.
विकिपेडियाच्या हिंदी पानावर "प्रत्यङ्गिरा" असा शास्त्रशुद्ध लिहिलेला दिसला, तोच प्रतून इथं चिटकावला.
मला हे कसं टंकायचं हे सापडलं की टाकतो इथे.
धन्यवाद, रविकिरणजी.
@मिपाकर्स हो, हे मिपावर कसं टंकायचे हे कुणी सांगू शकेल का प्लिज ?
3 Oct 2019 - 4:37 pm | खिलजि
सर्व छान लिवलेल आहे पण एक अवांतर प्रश्न पडलाय तोही तुमच्या माहितीच्या आधारेच
नक्की तुम्ही रिक्षावाल्याला किती रुपये दिले .. ५० रुपये कि १० रुपये ?
कारण तुम्ही हे लिहिलंय
"" रिक्षावाल्याचा हातावर दहा रू टेकवले. ""
3 Oct 2019 - 10:35 pm | चौथा कोनाडा
:-) बरोबर टिपलेत, मी ५० रु दिले.
फक्त १० रु कमी केले लिहिताना तो घोळ झाला.
धन्यु, खिलजी साहेब !
4 Oct 2019 - 7:50 am | दुर्गविहारी
मान गये आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोंको.
;-)
4 Oct 2019 - 7:28 am | जुइ
काही काळातील चेन्नई वास्तव्यात रोजचा कामावर जायचा येण्याचा रस्ता शोलिंग-नल्लूरहून होता. मात्र या मंदिराला भेट द्यायचा योग आला नाही. तुम्ही केलेले शोलिंग-नल्लूर परिसर आणि मंदिराचे वर्णन आवडले. देवीचे रौद्र रूप पाहून भीती वाटली.
9 Oct 2019 - 2:20 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, जुइ !
तुमचे चेन्नई वास्तव्याचे अनुभव वाचायला आवडतील !
4 Oct 2019 - 8:34 am | प्रचेतस
लेख खूप आवडला.
वाराहीची मूर्ती प्रामुख्याने आवडली. प्रत्यङ्गिरेचे मंदिर महाराष्ट्रात बहुधा नाहीच. शरभाची मूर्ती जबरदस्त. महाराष्ट्रात शरभाच्या प्रतिमा विपुल आहेत.
7 Oct 2019 - 8:47 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद प्रचेतस !
_/\_
हो, वाराहीची मुर्ती नाजुक आणि आकर्षक होती.
.. महाराष्ट्रात शरभांच्या विषयी तपशिलवार दीर्घ लेख वाचायला नक्की आवडेल !
4 Oct 2019 - 7:52 pm | सुबोध खरे
चेन्नई पुदुच्चेरी पूर्व किनारा रस्त्यावर पुढे सर्व नट नट्या आणि राजकारणी यांचे प्रसादतुल्य बंगले आणि मागे पुढे हिरवळ आणि झाडी असलेली घरे आहेत. एखाद्या श्रीमंत देशात आल्यासारखे वाटते.
महाबलीपूरम ला जाताना या रस्त्यावर गिंडी येथील सर्प उद्यान आणि पुढे वाडनेमली येथे सर्प तज्ञ श्री रोम्युलस व्हाईटेकर यांनी स्थापलेले मगरीचे उद्यान जरूर पहा.
बाकी तामिळनाडू मधिल सर्व मंदिरे सप्तरंगात रंगवलेली आणि शिल्पकलेने पूर्ण भरलेलीच आहेत.
आणि एकंदर तेथे दोनच ऋतू असतात उन्हाळा आणि पावसाळा.
5 Oct 2019 - 2:43 pm | चौथा कोनाडा
खरं आहे ! सगळी धनाढ्य उच्चवर्ग लोक तिथे राहतात !
या रस्त्याचं एक वैशिष्ठ्य आहे, आजुबाजुला कारखाने वा उद्योग नाहीत, या रस्त्यावर जड वाहने पळत नाहीत, प्रदूषण नाही, त्यामुळं हा रस्ता पायी अनुभवणं हा अनुभव अनुभव आहे.
विकांताला चेन्नई ते पॉण्डिचेरी बायकर्स जथथे या रस्त्याचा आनंद लुटत असतात !
गिंडीचं सर्पोद्यान पाहिलंय, जबरदस्त आहे.
ऋतू आणि मंदिराबद्दल सहमत. मंदिराच्या अति-रंगकामाचाही कंटाळा येतो. बटबटीत वाटतं. शिल्पकला तर भारीच असते.
धन्यवाद , सुबोध खरेजी !
4 Oct 2019 - 11:44 pm | जालिम लोशन
वांदलुर केलाबक्कम रोडवर रहाण्यासाठी सोईस्कर ठिकाण कोणते? की तांबरम सोईचे होईल? VIT Chennai ला भेट देण्यासाठी. दोन दिवस मुक्काम आहे.
12 Oct 2019 - 4:26 pm | चौथा कोनाडा
जालो साहेब, तांबरम सोयीचे होईल राहायला.
VIT Chennai परिसराच्या जवळदेखील राहायची सोया होऊ शकेल.
तिथं राहिल्यास एखाद्या संध्याकाळी तिथून जवळच्याच कोवलम बीचला भेट देता येईल. मासळी बाजारासाठी प्रसिद्ध आहे हे.
( केरळ मधलं कोवलम ते नव्हे)
सध्या चर्चेत असलेले मामल्लपुरम (महाबलीपूरम) हे इथून फक्त ३०-३५ किमी वर आहे, नियोजन केल्यास इथेहि भेट देता येईल.
धन्यू जालो साहेब,
5 Oct 2019 - 9:26 am | सुमो
मोबाईल वर प्रमुख इंडिक कीबोर्ड वापरुन लिहिता येतोय. पीसी वर नाही माहिती.
pratyaNGgira=प्रत्यङ्गिरा.
मिपावर मोबाईल ब्राऊजर मधून मात्र शब्द वेगळा दिसतोय.
नोटस ॲपवर बरोबर दिसतो आहे
5 Oct 2019 - 10:41 am | रविकिरण फडके
धन्यवाद!
'गूगल इनपुट साधने' वापरूनही तो येतो असं आता समजलं. फक्त, नेमकं काय स्पेलिंग टाईप करायचं ते शोधायला हवं.
5 Oct 2019 - 3:06 pm | चौथा कोनाडा
वॉव, जमलं मला पण मोबाईल वर इंडिक कीबोर्ड वापरुन. लक्ष्यात ठेवेन.
याची कुठे हेल्प फाईल / वेबपेज आहे का ?
धन्यु, सुमो !
5 Oct 2019 - 6:31 pm | बबन ताम्बे
मंदिरांची छान सफर घडवलीत चौको. सचित्र लेख आणि त्यासोबत आख्यायिका , त्यामुळे प्रवासवर्णन खूपच वाचनीय झाले आहे. येऊ द्या अजून प्रवासवर्णन .
10 Jan 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, बबन ताम्बे साहेब !
7 Oct 2019 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन माहितीपूर्ण आहे, आवडले. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
20 Oct 2020 - 1:16 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर !
11 Dec 2019 - 4:31 pm | प्रीत-मोहर
अय्यो चेन्नै!! २०११ सालाचे काही महिने ह्या ओ एम आर रोड वर राहिलेय. नॉस्टाल्जिक झाले!!
10 Jan 2020 - 1:47 pm | गणेशा
भारीच, धागा वरती आला म्हणून कळला..
मस्त सफर घडवून आणली.. छान लिहिले आहे
22 Oct 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, गणेशा !
15 Jan 2020 - 1:52 am | दिपस्तंभ
मी सिरुसेरी IT पार्क जवळ २ महिने राहायला होतो. अन ऑफिस होते नवलुर ला ETA techno park. परिसर चांगलाच आहे पण पाण्याचे दुर्भिक्ष आहे. खवय्येगिरी साठी तिथे OMR फूडपार्क, paradise biryani, सावकार पेठ, मरिना बीच, T. नगर प्रसिद्ध आहेत.
17 Oct 2020 - 4:27 pm | चौथा कोनाडा
आज घटस्थापना ! मागील वर्षी लिहिलेल्या या धाग्याची आठवण झाली.
(काही फोटो शेअरिंग संस्थळाच्या घोळामुळे अदृष्य झालेले दिसतायत)
कोविडमुळं अजूनही काही अपवाद वगळता मंदिरं उघडलेली नाहीत.
थोड्याच कालावधीत सर्व काही सुरळीत व्हायला लागेल अशी आशा व्यक्त करून,
आपणा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !
श्री देवीमातेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री देवीमातेच्या चरणी प्रार्थना..!
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
17 Oct 2020 - 7:10 pm | मदनबाण
छान माहिती, काही काळा पूर्वी माला मंत्रांवर जालावर शोध घेत असताना प्रत्यङ्गिरा देवीचा माला मंत्र ऐकण्यात आला होता, आज नवरात्रा निमीत्त्याने सकाळी हा माला मंत्र परत ऐकला आणि मिपावर हा धागा पाहिला हा एक विलक्षण योगायोग !
प्रत्यङ्गिरा माला मंत्र :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Genda Phool | Garba Mix | Kamlesh Jadhav | Janny Dholi
18 Oct 2020 - 5:51 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर आहे प्रत्यङ्गिरा देवी माला मंत्र. या निमित्ताने मला ही पहिल्यांदाच मंत्र ऐकायला मिळाला.
धन्यवाद, मदनबाण !
18 Oct 2020 - 6:41 pm | पॉइंट ब्लँक
छान माहिती दिलि आहे. फोटोसुद्धा मस्त :) "टु बि व्हिजिटेड लिस्ट " मध्ये भर पडली :)
20 Oct 2020 - 1:15 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, पॉइंट ब्लँक !
18 Oct 2020 - 10:11 pm | गोरगावलेकर
सफर व माहिती दोन्ही आवडले
22 Oct 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, गोरगावलेकर !
20 Oct 2020 - 7:40 pm | सिरुसेरि
सुरेख माहिती . पुर्वी शोलिंगनल्लुरला काही दिवस मुक्काम होता . मात्र या मंदिराला भेट द्यायचा योग आला नाही. बाकी , तिथे बस स्टॉपच्या पाठीमागे असलेला आविन हा दुध डेअरी प्लांट , ओएमआर रोड , ईसीआर रोड , तांबारम , कॅम्प रोड , वेलाचेरी , अड्यार या ठिकाणांना बसने असलेली कनेक्टिव्हिटी अशा आठवणी लक्षात आहेत .
22 Oct 2020 - 5:24 pm | चौथा कोनाडा
व्व, सिरुसेरि, छान, योग आला शोलिंगनल्लुरला रहायचा. शोलिंगनल्लु सेंटर आहे म्हटलं तरी हरकत नाही. या सर्व ठिकाणांना जायला यायला सोयीस्कर आहे. मला हामला हा परिसर (उकाडा सोडता) आवडलाच !
तुमी सिरुसेरि हे नाव देखील जवळच्या उपनगरावरून घेतलं इथल्याच उपनगरावरून घेतलंय हे भन्नाट आहे. वेलाचेरी , अड्यारला बऱ्याचदा गेलोय.
मला इथं आणखी हिंडायचे होतं पण लवकर बदली झाली :(
या प्रतिसादाने त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.
धन्यवाद, सिरुसेरि !
7 Oct 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा
सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवरात्रात मला या देवीची (आणि लेखाची देखिल) हमखास आठवण होते.
(काही फोटो दिसत नाहियत, सवडीने परत टाकण्याचा विचार आहे)
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
8 Oct 2021 - 9:09 am | प्रचेतस
हा लेख मस्तच होता.
तुम्ही अशाच अनवट ठिकाणांची सफर घडवत राहा.
8 Oct 2021 - 5:20 pm | Bhakti
अरे वाह !छान माहिती आहे.
ह्या देवीबाबत पहिल्यांदाच समजले.आणि आता शरभ या अवताराविषयी माहिती एकदम लक्षात राहणार आहे.