कोण कुठली रोहिणी
अगणित आकाशगंगा
अगणित सूर्य गगनी
अगणित असती धरणी
त्यातून कोण कुठली रोहिणी?
काय तिचे सुख
नि काय तिचे दुःख
विश्वाच्या उलाढालीपुढे
आहे ते नगण्य
काय तिचे हेवे
नि काय तिचे दावे
एवढ्या भव्य संसारापुढे
क्षुद्र ते ठरावे
काय तिचे ज्ञान
काय तिचे विज्ञान
चराचराच्या गूढापुढे
नाही त्याला स्थान
म्हणूनच नम्र रहावे तिने
गर्व नको तिच्या मनी
अगणित मानवांमधून एक आहे
कोण कुठली रोहिणी
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख