तुरीच्या दाण्यांची कचोरी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
26 Oct 2025 - 1:39 pm

"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते.
दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे.
१

२
आवश्यक साहित्य (भरणासाठी):
तुरीचे हिरवे दाणे (सोललेले): १ वाटी +१/२ वाटी मटार
ओले खोबर्‍याचे तुकडे: १ वाटी (बारीक कुट)
हिरव्या मिरच्या,आलं: २-३ (बारीक चिरलेल्या)
धनेपूड-३ टीस्पून
जिरे+बडीशेप पूड : १ टीस्पून
हळद: १/२ टीस्पून
लाल तिखट: १ टीस्पून (चवीनुसार)
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर+कसूरी मेथी : ३ टीस्पून (बारीक चिरलेली)
तेल: १ टेबलस्पून (भरण परतण्यासाठी)
आवश्यक साहित्य
मैदा: २ वाट्या
तूप किंवा तेल: ४ टेबलस्पून (मळण्यासाठी)
मीठ: १ चिमूट
गरम पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)

कृती-
: तुरीचे दाणे +मटार दाणे स्वच्छ धुवून घ्या.कुकरमध्ये २ शिट्टींत वाफवून घ्या.वाफवून झाल्यावर मिक्सरमधून मध्यम आकारासाठी फिरवून घ्यायचे.

एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. नंतर कुटलेले खोबर्‍याचे तुकडे, धने पावडर, हळद, लाल तिखट ,जिरे+बडीशेप पूड आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. उकडलेले तुरीचे दाणे+मटार दाणे घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवावे, जेणेकरून दाणे मऊ होतात पण फुटत नाहीत. शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे सारण तयार आहे.

पारीचे कणीक :
एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घालून चांगले मळा. हळूहळू गरम पाणी घालत मऊ आणि लवचिक डोघ तयार करा (खस्ता डोघासाठी तूप चांगले मिसळा). डोघाला १० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.

कचोरी भरून आकार द्या: डोघाची लहान-लहान गोळ्या करा . प्रत्येक गोळी चपट्या करून भरणाचा थोडा भाग भरून बंद करा. हाताने हलकेच चपटे करा किंवा लाटा जेणेकरून भरण बाहेर येऊ नये. मध्यभागी थोडे जाड ठेवा.
३
या कचोऱ्यांना वरतून तेल लावून #airfryer मध्ये १८०°वर १० मिनिटे ठेवा.नंतर उलटून परत १८०°वर ५ मिनिटे ठेवा.
किंवा
तळा: कचोर्‍या मंद आचेवर सोनेरी व्हायपर्यंत तळा.

४
ही कचोरी चटणीसोबत (लिंबू-मिरची चटणी किंवा कोथिंबीर चटणी) सर्व्ह करा.
ती २-३ दिवस टिकते, म्हणून स्टोअर करून ठेवता येते.

पौष्टिकता: तुरीचे दाणे प्रोटीन आणि फायबरने युक्त असल्याने ही कचोरी आरोग्यदायी आहे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Oct 2025 - 6:33 am | कंजूस

एक फोटो झाडाचाही हवा.

>> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा.

कचोरी झकास लागणारच.

दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे

श्वेता२४'s picture

27 Oct 2025 - 7:31 am | श्वेता२४

याची चव शेगाव कचोरीच्या जवळ जाणारी असेल असे वाटते.....पाककृती आवडली...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2025 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुरी-कचोरी आवडली आहे.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

27 Oct 2025 - 12:46 pm | टर्मीनेटर

भारीच 👍
"ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे."
सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?

अनन्त्_यात्री's picture

27 Oct 2025 - 1:09 pm | अनन्त्_यात्री

Dough या शब्दातील "gh" च्या सायलेंटत्वाला नाकारून बनविलेला "डोघ" हा नवशब्द रोचक वाटला

डोघ...इति कृ.बु.भाऊंचा शब्द आहे ;)

Bhakti's picture

27 Oct 2025 - 1:23 pm | Bhakti

सर्वांना धन्यवाद!
चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली.
पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा.
बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)

कंजूस's picture

28 Oct 2025 - 11:58 am | कंजूस

गुजराती लिली एटले हिरवी.

डुंगळी =कांदा
लिली डुंगळी =पातीचा कांदा

कर्नलतपस्वी's picture

27 Oct 2025 - 2:05 pm | कर्नलतपस्वी

तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या
दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या,

जीभ ही चटोरी, लपलप करी
केली मी कचोरी कुरकुरीत.....

मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.

यश राज's picture

27 Oct 2025 - 2:31 pm | यश राज

भारी दिसतेय कचोरी, लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन.

संजय पाटिल's picture

29 Oct 2025 - 6:50 pm | संजय पाटिल

छान!!!!
आमटी केली कि नाही अजुन?

तुमच्या बऱ्या अर्ध्याची मज्जा आहे.
एकूण प्रकरण चविष्ट दिसतंय.
तुरीची तिखट आमटी फक्त माहिती होती.
तुरीकचोरी नवी माहिती झाली.

गोरगावलेकर's picture

30 Oct 2025 - 2:48 pm | गोरगावलेकर

पाककृती आवडली .